यशदा
============================
.
.
ती म्हणाली..
मी समर्पित आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट.
इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही.
.
ती म्हणाली..
मी सुखात आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय.
इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही.
.
ती म्हणाली..
मी यशदा आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची.
इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही.
.
.
============================
स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९
प्रतिक्रिया
11 Jan 2009 - 10:29 pm | प्राजु
तीन वेगळी रूपं.. सुंदर.
आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Jan 2009 - 10:53 am | स्वाती फडणीस
:)
12 Jan 2009 - 11:21 am | श्रावण मोडक
मीरा, सुखदा, यशदा. वा!!!
अदृष्य वेदनांना (अव्यक्त) स्वर देणारी रचना. अभिनंदन.
12 Jan 2009 - 4:01 pm | स्वाती फडणीस
तुम्ही कविता वाचलीत.. :)
अफवाद फक्त मीरा.. यात मीरा नाहीये..
असलीच तर सीता आहे.
12 Jan 2009 - 4:25 pm | श्रावण मोडक
समर्पण म्हटले की आम्हाला मीराच आठवते. सीतेचे समर्पण आणि मीरेचे समर्पण वेगळ्या जातकुळीतले असावे. मी त्या ओळी वाचताना मला मीरेचे समर्पण वाटले. अर्थात, येथे या प्रतिमेचे योजन हा तुमचाच अधिकार आहे आणि त्यामुळे तुमचे म्हणणे मान्य.
12 Jan 2009 - 4:50 pm | स्वाती फडणीस
मीरेचे समर्पण आणि सीतेचे समर्पण वेग वेगळ्या जातकूळीचेच आहे.
12 Jan 2009 - 5:54 pm | स्वाती फडणीस
वेगळेपण
============================
.
.
डोळ्यांवर स्वप्नांची किरमीरी झूल पांघरून..
जमिनीपासून वितभरवर तरंगत..
त्याच किरमीरी धुंदीत..
दगड धोंडे ठोकरत जाणं..
तसं सोप्पच..!
फक्त वीतभर उचलून धरणारी धुंदी हवी..
कान्हा नावाची जादू काहीशी तशीच.
मीरा काय.. राधा काय.. किंवा..
अगदी तुझ्या माझ्या पर्यंतच्या गोपी..
अशाच तरंगत गेल्या..
पण असली नसली धुंदी उतरवून टाकणारं..
दुय्यमतेच पोखरणं..
डावेपणाच्या डावानं डावललं जाणं..
जमिनीवर आणून ठेवतं.. अगदी काटेरी अरण्यात..
आणि पर्यायच नसतो चालण्यास
तेव्हा चाललेलं पाऊल आणि पाऊल
धैर्याची परिसीमा गाठतं..
हेच ते वेगळेपण..!!!
मीरा आणि सीता असण्यात...
.
.
============================
स्वाती फडणीस.......................... १२-०१-२०९
21 Jul 2010 - 5:12 pm | यशोधरा
दुय्यमतेच पोखरणं..
डावेपणाच्या डावानं डावललं जाणं..
जमिनीवर आणून ठेवतं.. अगदी काटेरी अरण्यात..
आणि पर्यायच नसतो चालण्यास
तेव्हा चाललेलं पाऊल आणि पाऊल
धैर्याची परिसीमा गाठतं..
हेच ते वेगळेपण..!!!
मीरा आणि सीता असण्यात...
क्या बात है! निव्वळ सु रे ख!