"विष्णू पुराण" म्हणते की,
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।
म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे. आणि मग महाभारताच्या युगांतकारी युद्धानंतर तर छोटी छोटी राज्ये किंवा गणराज्ये किंवा स्वत:च्या सीमेत तुष्ट रहाणारे नंदांचे मगध साम्राज्य, हाच या भूमीच्या लोकांचा स्थायीभाव झाला होता.
या स्थायीभावाला प्रवाही केले ते कुठल्या हिंदूने नव्हे तर एक यवन राजा अलक्स्येन्द्र किंवा अलेक्झांडरने. आणि त्यानंतर मोडक्या राज्य, गणराज्यांतून एकसंध राष्ट्र बनवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला चंद्रगुप्त - चाणक्य या जोडीने. पण जर अनुक्रमे मौर्य, चेरा - चोला - पंड्या, सातवाहन, शुंग, महामेघवाहन, गुप्त, वाकाटक, कदंब, हूण, चालुक्य, राष्ट्रकूट, पल, चोल, गुर्जर - परिहार, चालुक्य, घोरी, दिल्ली, मुघल, मराठा आणि अगदी शेवटच्या ब्रिटीश साम्राज्यांच्या वेळच्या भारतीय नकाशांवर नजर टाकली तर आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते. आपण ज्याला भारत देश म्हणतो आणि ज्याच्या राष्ट्रवादाच्या्ा हाका आपल्या कानातून घुमू शकतात किंवा ज्या तश्या घुमताहेत म्हणून काही जणांना त्रास होऊ शकतो त्या भारताचा इतिहास खरा सुरु होतो तो १९४७ पासूनच. त्या आधीचा इतिहास हा "आर्यावर्ते, रेवाखंडे, जम्बुद्वीपेच्या" भूमीचा इतिहास आहे. हिंदुस्थान नामक काल्पनिक राष्ट्राचा नाही. भारत नामक देशाचा तर अजिबातच नाही.
भारत किंवा इंडिया नामक देशाचा ( मी इथे राष्ट्र हा शब्द जाणून बुजून टाळला आहे) जन्म ही एक दीर्घकाळ चाललेली आणि अजूनही अपूर्ण असलेली सामाजिक प्रक्रिया आहे. ती माझ्या सामान्य दृष्टीला कशी दिसते, ते सांगण्यासाठी आधी माझ्या मते देश आणि राष्ट्र या शब्दांचा अर्थ काय? ते सांगतो. देश म्हणजे भूभाग, ज्यात जमीन, जंगले, नद्या, पर्वतमाला, सजीव - निर्जीव असे सगळे काही आले. त्यामुळे देश ही संकल्पना आपोआप एका सलग भूभागाशी संबंधित आहे. तर राष्ट्र म्हणजे समाजमन. थोडक्यात देश म्हणजे हार्डवेअर आणि राष्ट्र म्हणजे सॉफ्टवेअर असे माझे गृहीतक आहे. रोजच्या व्यवहारातले उदाहरण घ्यायचे असल्यास देश म्हणजे आपली इमारत, तिच्या पुढची बाग, तिच्या कंपाउंड पर्यंतचा भाग. आणि राष्ट्र म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेची संकल्पना. मग ती संकल्पना हौसिंग सोसायटीची असू शकते किंवा अपार्टमेंट्सची. संकल्पना व्यक्तींचे हक्क आणि कर्तव्ये ठरवते आणि आपसातले वर्तन देखील.
आता हेच उदाहरण पुढे चालवायचे म्हटले तर, सहकारी गृह निर्माण प्रकल्पामागची सैद्धांतिक कल्पना आहे की, समविचारी लोक एकत्र येउन, आपली संस्था स्थापन करून, पैसे जमा करून, जमीन खरेदी करून, ती विकासकाकडून विकसित करून घेतात. म्हणजे संस्था आधी जन्माला येते आणि इमारत नंतर. सॉफ्टवेअर आधी बनते आणि मग त्या अनुषंगाने हार्डवेअर. अश्या सोसायटी मध्ये लोकांचे वर्तन एकसारखे असण्याची शक्यता जास्त असते. सामंजस्य आणि परस्पर सहकार्य इथे थोड्या जास्त प्रमाणात असू शकते. पण अश्या सोसायट्या आदर्श असल्या तरी फार क्वचितच बनतात. प्रत्यक्ष आयुष्यात, आपण बघतो की एखादा विकासक जमीन खरेदी करून, त्यावर इमारत बांधून, त्यातील घरे वेगवेगळ्या व्यक्तींना विकून, मग त्यांची एक सोसायटी तयार करून देतो आणि बाजूला होतो. म्हणजे इथे हार्डवेअर आधी तयार झाले आणि सॉफ्टवेअर नंतर. इथे सर्व सभासदांची मने चटकन जुळतीलच याची खात्री नाही. इथे को-ऑपरेशन नावालाच असते आणि लहान सहान गोष्टीवरून कुरबुरी चालू असतात. हे उदाहरण लक्षात ठेऊन आपण पुन्हा भारत देशाच्या इतिहासाकडे आणि भारतीय राष्ट्रीयत्वाच्या इतिहासाकडे वळलो तर आपल्याला एक वेगळेच चित्र दिसेल.
इथल्या कुठल्याही राजांना, सम्राटांना किंवा सुलतानांना राष्ट्र संकल्पनेत रस नव्हता. जो तो आपल्याला विष्णूचा अंश किंवा सार्वभौम म्हणवून घेण्यात रममाण होता किंवा मग खलिफाला नजराणा अर्पण करून सल्तनतीवरचा आपला हक्क स्थापित करून घेत होता. रयतेच गावगाडा जुन्या कृषीप्रधान, आणि मानवी श्रमांवर आधारीत अश्या स्वयंपूर्ण पण शोषणकारी जाती व्यवस्थेने सुरळीत चालला होता. राजे बदलल्याने समाजाच्या घटकांच्या परस्परांतील वर्तनात काही मोठे बदल होत नव्हते.
इथे ब्रिटीश आले व्यापार करायच्या मिषाने. मग आपल्या वखारींना संरक्षण म्हणून त्यांनी आपापली सुरक्षा यंत्रणा उभारण्यास परवानगी मिळवली. त्यासाठी मुलूखगिरी करणे हाच पेशा असलेली एतद्देशीयांचे भलेमोठे मनुष्यबळ त्यांना आयतेच तयार मिळाले. मग हीच सैनिकांची फौज तैनाती फौज म्हणून वापरत त्यांनी इथल्या परस्परांत भांडणाऱ्या राजे महाराजांना परस्परांपासून संरक्षण देण्यास सुरवात केली. आणि मग हळू हळू अगदी आसेतु हिमाचल नसेल पण बऱ्याच मोठ्या भूभागावर एकाच कायद्याचे राज्य आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यश मिळवले. आपल्या साम्राज्याच्या फायद्यासाठी नेटीव्हांच्या या देशात रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा तर टपाल, पोलिस आणि इंग्रजीचे शिक्षण अश्या अनेक सुधारणा आणल्या. हे साम्राज्य शोषणकारी होते पण त्याच वेळी नेटीव्हांना साहेबाच्या देशात जाऊन तेथील व्यवस्था शिकण्याचे स्वातंत्र्य देणारे देखील होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरवात नेटीव्ह लोकांनी विलायतेत घेतलेल्या कायद्याच्या शिक्षणात आणि त्यांना अनेक इंग्रजांनी केलेल्या मदतीत आहे असे माझे मत आहे.
म्हणजे होती राज्ये. मग आली साहेबाची कंपनी. मग आली तैनाती फौज. शक्य असेल तिथे संस्थाने आणि राज्ये जिंकली किंवा खालसा केली गेली. आणि आधीचे राजे बनले इंग्रजांचे मांडलिक किंवा मित्र. त्यांना चालू झाली तनखे आणि वार्षिक प्रीव्ही पर्सेस. मग झाला १८५७ चा फसलेला उठाव. (ज्याचा मला पटलेला हेतू होता इंग्रजांना हाकलून जुन्या राजांना पुन:प्रस्थापित करणे.) मग संपले कंपनी सरकारचे राज्य. मग भारत बनला ब्रिटीश पार्लमेंटच्या आधिपत्याखालील प्रदेश. मग इंग्रजांनी नेटीव्हांना दिलेल्या शिक्षणामुळे सुरु झाला भारतीय स्वातंत्र्यचा हुंकार. मग इंग्रजांच्या सहाय्याने उभ्या राहिलेल्या भारतीय काँग्रेस या संस्थेच्या नेतृत्वाखाली, सामान्य भारतीय कुळातून जन्मलेल्या लोकांनी चालवलेला स्वातंत्र्यलढा. मग दोन महायुद्धानंतर कर्जबाजारी झालेल्या ब्रिटनने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य.
आता यात गम्मत अशी, की मी तुमच्याकडून काही घेतले तर मी ते तुम्हालाच परत केले पाहिजे. या न्यायाने जर इंग्रजांनी राज्ये आधीच्या राजांकडून घेतली असतील तर परत जाताना त्यानी ती जुन्या राजांनाच परत दिली पाहिजेत. पण तसे झाले नाही. राजांनी स्वातंत्र्य लढा केला नव्हता. तो केला होता जनतेने. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी. शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला एक मोठा भूभाग ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त होत एक देश म्हणून प्रस्थापित झाला. महामानव बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली, जगातली सर्वात मोठी अशी लिखित स्वरूपातली राज्यघटना तयार झाली होती. पण तिचे मर्म लोकांना कळायचे बाकी होते. म्हणजे लेखी स्वरूपात घटनारुपी सॉफ्टवेअर तयार होऊन देखील मनात अजून राष्ट्र बनायचे बाकी होते.
क्रमश
प्रतिक्रिया
21 Feb 2016 - 9:27 pm | माहितगार
१) पौराणिक इतिहासांना अधिकृत इतिहास म्हणून स्विकारणे जड जाते म्हणून त्यावर मी भर देत नाही परंतु अश्वमेध यज्ञांचे (खखोदेजा पण एक राजकीय संस्कृतीचा अंशाची शक्यता म्हणून पाहता येईल -परशुरामाचे पृथ्वी जिंकणे, राम,अगस्त्याचे दक्षिणेत का काय येणे इत्यादी कथा कथा म्हणून बाजूस ठेवल्या तरी त्या मिथ्सचा मानसिक प्रभावही नाकारता येत नाही) अधिक उल्लेख असावेत ज्यात घोडा वर्षभरासाठी का काय सोडला जाई (जाणकारांनी दुरुस्त्या सुचवाव्यात) तो वर्षाभरात जिकडे जाईल तेवढा भूभाग जिंकला जाई. या अश्वमेध प्रकारात कितीही वर्णन केले तरी त्या काळात पूर्ण भारतभराची भूमी जिंकली गेली असे म्हणणे कठीण असावे पण यशस्वी राजाचा अश्वमेधाचा घोडा ज्या कोणत्या दिशेने गेला तेवढी एकसंघता येत असणार आणि बर्या पैकी फ्रीक्वेन्सीने बदलत असणार. म्हणजे वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या टोकाच्या राजांच्या खाली जगण्याचे जमवून घेण्याचे कौशल्य आणि संस्कृती राजघराणी आणि भारतीय समाजात वसत असावी असे म्हणता येईल का ?
२) हस्तिनापूर अथवा दिल्लीचे पूर्ण भारतावर प्रत्येकवेळी राज्य नसले तरी मुख्य प्रभाव अगदी पौराणिक काळापासून हस्तिनापूर अथवा दिल्लीचा होता हे खूपही डाऊनप्ले करता येत नाही.
३) भारतास गणराज्य -लोकांनी चालवलेल्या अथवा लोकांचा प्रभाव असलेल्या राज्यांची सवय होती- याबाबत जाणकार अधिक प्रकाश टाकतील पण मला गौतम बुद्धाच्या संन्यासपुर्व कथा लोकशाही प्रभावाच्या दृष्टीने पुरेशी रिलायेबल वाटते अर्थात जाणकार अधिक सांगू शकतील
21 Feb 2016 - 9:33 pm | माहितगार
१) राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते.
२) बर्याच वेळा एकाच राजाचा एकछत्रि अंमल नसलातरीही इमिडीएट अथवा एक्सटेंडेड परिवार राजघराण्यांचे राज्य अॅड केले तर राजपरिवारांचा प्रभाव अधिक मोठा दिसू शकतो.
21 Feb 2016 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
विष्णूपुराण काय म्हणते किंवा रोमन साम्राज्याचा इतिहास काय म्हणतो यावर आजच्या जगाच्या राष्ट्रांची नावे किंवा सीमा ठरत नसून आजच्या जागतिक राजकीय परिस्थितीत आजच्या घडीला ज्या सीमा मान्य आहेत त्यावरून त्या ठरतात. पूर्णविराम.
21 Feb 2016 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
देशांत सद्य सीमा मान्य नसलेले त्या बदलायचे प्रयत्न करत आले आहेत, भविष्यातही करत राहतील. त्याचप्रमाणे, त्या सीमांचा अभिमान असणार्यांना त्या सीमांचे रक्षण करण्याचा हक्क आहे आणि तो भविष्यातही असणार आहे.
सर्वसाधारणपणे, देशाच्या सीमांचे आणि सन्मानाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करणे हा देशभक्तीचा एक भाग समजला जातो. तर, कोणते खरे अथवा काल्पनिक कारण पुढे करून देशाचे तुकडे करण्याची भाषा करणे, देशाला बरबाद करण्याची भाषा करणे आणि / किंवा तसे उघड अथवा गुप्त प्रयत्न करणे हा देशद्रोह समजला जातो.
22 Feb 2016 - 2:38 am | डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे ज्या विष्णूपुराणाने लेखाची सुरुवात केली गेली आहे त्यातला एक शब्दही वाचला नसलेलेच लोक भारतात अतीबहुसंख्येने आहेत व त्यांना विष्णूपुराणात काय लिहिले आहे याबाबत फार काही आस्था आहे असेही नाही... याबाबत कोणाच्या मनात नक्की संशय आहे काय ???! :)
22 Feb 2016 - 6:09 pm | चौकटराजा
माझ्या मते देश म्ह्॑णजे चलन अर्थव्यवस्था संस्कृति एक असलेला समूह नव्हे तर तो समूह ज्या भू भागावर रहातो त्या भागाचे अस्तिव लोक व शासनासह जपणारी एक व्यवस्था. अर्थात दुसर्या महायुद्धात एकत्र पणे लढलेल्या दोस्तांच्या फौजा त्यावेळी एका प्रशासनाखाली लढल्या असतील तर युरोपातील प्रमुख शासने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होतेच. म्हन्जे मिलिटरी म्हणजे देश असेही नव्हे. तर देश म्ह॑न्जे शास्ता. त्याच्या विरूद्ध कारवाईत सक्रिय भाग म्हणजे देशद्रोह. नुसती घोषणा म्हन्जे देशद्रोह नव्हे. मग ती डाव्यानी केलेली असो की स्वामिनी.
24 Feb 2016 - 10:00 am | आनन्दा
थोडासा फरक मला करावासा वाटतो..
१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्यापैकी बदलतो माझ्या मते.
21 Feb 2016 - 9:56 pm | माहितगार
१) उपरोक्त धागा लेखात भारताची सांस्कृतीक एकात्मता सॉलीड अंडर प्ले होते आहे. वस्तुतः राजे लोक वरच्यावर आपापसात लढत राज्यांच्या सीमा बदलत त्याच्याशी सामान्य जनतेचे देणे घेणे प्रत्येक वेळी असेच असे नव्हे, पण राजकारणेतर भारतीय संस्कृती हि एकसंघ होती.
२) मी सांस्कृतिक म्हणतो काही जण धार्मिक म्हणतील, कुंभमेळे, यात्रा, आणि काशी यात्रेचे विशेष महत्व होते ज्यातून सांस्कृतिक देवाण घेवाणीचा एक भाग होत होता.
३) अध्यात्मिक विचारांचे पुरस्करते अखंड भारतात कुठून कुठे भ्रमण करतील याचा नेम नसे पण पूर्ण भारतीय उपमहाद्वीप वेगवेगळे विचारप्रणाली घेऊन पिंजून काढला जात असे त्यात अध्यात्मिक वैचारीक आणि सांस्कृतीक प्रभाव अखंड भारतावर पडत.
४) भारतातील अनेकानेक आदीवासी जमातींचे स्वरुप भटक्या जमातींचे होते ज्यात मुंडा ते धनगर ते बंजारा ते डोंबारी सांगण्याचा उद्देश आजच्या भाषेत मनोरंजन आणि कलापथकांचेही भारतभर भ्रमण असे. व्यापारी वर्गांचेही भारतभर भ्रमण असे.
५) असंख्य सांस्कृतिक गोष्टी, विश्वास आणि मिथके अखंड भारताच्या या टोकापासून त्या टोका पर्यंत पसरलेली आढळतात मग त्यात कुंकू,बांगड्या,मेंदी,रांगोळी,दिवे लावणे,सण,उत्स्व,संगित,नृत्य, शाक्त शैव असोत अथवा जैन अथवा बौद्ध अनेकानेक मिथके देशाच्या एका टोका पासून दुसर्या टोका पर्यंत दिसतात. गुढीसारख्या काठीपूजा आणि बगाड परंपरा मुलतः वैदीक पूर्व असाव्यात, आई हा शब्द एकदम आसामी आणि मग मराठी भाषेत एकाच अर्थाने येतो हे सांस्कृतीक एकतेच्या दीर्घ परंपरे शिवाय घडले असेल का ? उत्तर आणि पुर्व भारतात काली म्हणतात महाराष्ट्रात काळूबाई म्हणतात, वैदीकांनी मुर्तीपूजा हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भाग नसतानाही सामावून घेतल्या मुळे अनेक परंपरा वैदीकांच्या वाटतात पण त्या मुलतः वैदीक पुर्व काळापासून समस्त भारतात चालत असाव्यात मग त्यात शितला देवी उत्तर ते दक्षीण सर्वत्र दिसते. दत्तसंप्रदाय नाथ संप्रदाय किती म्हणून संप्रदायांचे अनुयायी भारतभर वावरले आहेत, गुरुनानकांनी अर्धा भारत पालथा घातला त्यांचे शेवटचे गुरु महाराष्ट्र कर्नाटक आदी भागात पोहोचले, महानुभाव पंथ पंजाबातही आहे हे आम्ही विसरूनच जातो, नामदेव महाराष्ट्रातून पंजाबात गेले सांस्कृतिक देवाण घेवाणीची किती म्हणून उदाहरणे देता येतील
४) उपरोक्त धागा लेख परकीयांच्या आणि भारतास एकसंघ बघु इच्छित नसलेल्यांच्या भारताचे केवळ राजकीय तुकडे बघु इच्छिणार्यांच्या थेअरीने प्रभावित नाहीना अशी प्राथमिक साशंकता वाटते.
21 Feb 2016 - 11:25 pm | माहितगार
१) शुचिता, पावित्र्य, पातिव्रत्य इत्यादी संकल्पनातील मिथके आजच्या घडीला कुणाला आवडोत अथवा न आवडओत त्यांचे प्रभाव संपूर्ण भारतीय उपखंडात एकसारखे होते सती सारखी प्रथा वाइट होती हे खरे पण राजस्थान ते पश्चिम बंगाल आधुनिक दळणवळणाच्या साधन नसलेल्या काळासाठी केवढे मोठे अंतर आहे ते ! तसेच जातीयता आणि वर्णवाद म्हणजे प्रथा परंपरा चांगल्या असोत अथवा वाइट असोत पण सांस्कृतिक एकसंघतेच्या परिचायक नव्हत्या असे कसे म्हणता येईल ?
२) उदाहरणार्थ वर्मा हे क्षत्रिय आडनाव पश्चिमेच्या उत्तरेच्या मध्यभारत्तातल्या ते केरळपर्यंतच्या राजांच्या आडनावात आढळते -आणि राजपरिवारांच्या एक्स्टेंडेड फॅमिलीज बद्दल मी आधी ही लिहिले आहे- महाराष्ट्रातील मराठा समाजातील असंख्य आडनावात कुठे राजस्थानी कुठे दाक्षिणात्य कुठे पुर्वेच्या आडनावांशी सरमिसळ दिसते. चांभार ते ब्राह्मण अशा अनेक तत्कालीन व्यावसायीक जाती भारतभर पसरलेल्या होत्या. तथाकथीत डाव्यांनी स्वतकडेच पाहीलेतर कम्युनीस्ट आयडीऑलॉजी येण्याच्या आधी पासून केरळ ते बंगाली कितीतरी सांस्कृतिक संबंध आणि आंतरभाषिक विवाहांची बर्यापैकी उदाहरणे असावित.
३) अज्ञात इतिहासाचा अंदाजा जसा भाषांवरून येतो तो गावांच्या नावांवरून येतो कारण बहुतांश गावांची नावे गाव/वसती पहिल्यांदा वसताना पडत असतात, मी स्वतः भारतातील महाराष्ट्रातील असंख्य गावांची नावे आसाम ते सिंध काश्मिर ते कन्याकुमारी अनेक राज्यांच्या याद्यातून तपासली आहेत आणि बहुतांश गावांची नावे भारताच्या या टोका पासून त्या टोका पर्यंत आढळतात
४) अगदी देवयानी खोब्रागडेला आमेरीकेतल्या वागणूक खटकते तेव्हा तामिळनाडू ते काश्मिर नव्हे पुर्व ते पश्चिम भारतच नव्हे पाकीस्तानी लोकांची सुद्धा एकसारखी भावना असते त्या मागे केवळ आमेरीकेचा विरोध नसतो आम्हा सर्वांची मुळ विचार प्रवृत्ती एकसारखी आहे हे कारण असते.
५) पाकीस्तानातील अँंथ्रॉपॉलॉजीस्ट सुद्धा धर्म बदलला तरी विवीध सांस्कृतिक प्रभाव कसे टिकून राहीले याचे साद्यंत वर्णन करतात.
अशी किती म्हणून सांस्कृतिक एकसंघतेची उदाहर
22 Feb 2016 - 12:21 am | माहितगार
१) राष्ट्र म्हणजे समाजमन हि या धागा लेखकाची व्याख्या असेल आणि सामान्य भारतीय उपमहाद्वीपातील समाजमनाची संस्कृती वर विवीध प्रतिसादातून मांडल्या प्रमाणे एकसंघ असेल तर भारतीय समाजमनाची राष्ट्रीयता आधी पासूनच अस्तीत्वात होती असा त्याचा अर्थ होतो किंवा कसे ?
२) पाकीस्तानी इतिहासकारपण पेशव्यांनी दिल्लीचे तख्त उलथवण्याचा विचार केला नाही, १८५७ उठावा मध्ये दिल्लीच्या बादशहास पुन्हा नेऊन बसवले याची सकारात्मक दखल घेतात आणि धागालेखक समाजमनात एकराष्ट्रीयता १९४७ पुर्वी नव्हती ? नवा शोध कमाल आहे !!
३) लाल बाल पाल देशाच्या तीन टोकाला स्वदेशीचा आग्रह धरत होते जनता त्यात सहभागी होत होती तेव्हा स्वदेशीचा अर्थ पंजाबात वेगळा, महाराष्ट्रात वेगळा बंगालात वेगळा होता का काय ?
४) भारतातले वेगवेगळे क्रांतीकारी फाशीवर जाताना केवळ त्यांच्या त्यांच्या भौगोलीक भागासाथी फाशीवर जात होते का काय ? सुभाषचंद्राची आझाद हिंद सेना तुकड्या तुकड्यांच्या भारतासाठी परकीयांशी लढली नसावी.
५) विवेकानंदांनी स्वतःचे कार्य चालु करण्यापुर्वी अखंड भारत प्रवासकरत केवळ मी संन्यासी आहे हे सांगून स्वतःचे नावही न सांगता समजावून घेतला
६) महात्मा गांधींना भारतात वापस आल्यावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी (नावाबाबत चुभूदेघे) राजकारण हा उद्देश डोक्यात न ठेवता संपुर्ण भारत फिरून समजून घेण्यास सांगितला आणि त्यांनी तसे केले.
७) -स्वातंत्र्य पुर्व काँग्रेस विषयी सध्याचे आकस बाजूला ठेऊन समजून घेतले तर -महात्मा गांधींचा राष्ट्रवाद स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य मागणारा नव्हता, सामान्य जनतेसाठी स्वातंत्र्य मागणारा होता त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना खेड्यापाड्यात जाण्यासाठी सांगितले त्यांचे कार्यकर्ते खरोखर खेड्यापाड्यात जात होते स्वातंत्र्य मिळाल्या नंतर अगदी डाऊन ट्रोडन साठी त्यात काय असेल नव्या राज्याचे स्वरुप कसे असेल हे जनतेस समजावून सांगितले जात होते हे तेव्हाचा इतिहास बारकाईने अभ्यासल्यास लक्षात येईल आणि धागा लेखक म्हणताहेत कि समाज मनात राष्ट्र ही भावना स्वातंत्र्यापुर्वी जागृत करण्यासाठी काहीच केले गेले नाही. -आताच्या काळातली माध्यमे शिक्षण त्याकाळातली समाजमन घडवण्यातली मेहनत सांगण्यात कमी पडत असेल - किंवा तुमच्या अपेक्षेला प्रमाणे परिणाम तुम्हाला जाणवत नसतील त्याची कारणे इतरत्रही असू शकतात - पण समाजमन घडवण्याचे कष्ट घेतले नव्हते स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जनतेला काय मिळणार आहे हे जनतेला माहित नव्हते असे नसावे.
८) गांधी-नेहरुंचा आणि काँग्रेसच्या राजकीय राष्ट्रवादाचा आधार निश्चितपणे सांस्कृतिक होता, आसेतू हिमाचल एवढाच मर्यादीत होता. या राष्ट्रवादाची मर्यादा इतकी सुस्पष्ट होती कि कॉंग्रेसच काय तत्कालीन संघानेही श्रीलंकासुद्धा भारतास जोडून घेण्याचा स्वप्नातही विचार केला नसावा -उलटपक्षी न्याय्य तत्वावर वसुधैवकुटूंबकम ची जी काही रचना अस्तीतात येईल त्यात सर्व -राष्ट्रवाद बाजूला ठेऊन भारत मानसिक दृष्ट्या नेहमीच तयार राहीला आहे- आपल्या सांस्कृतिक एकसंघ राष्ट्रातील लोकांच्या हिताची बाजू घेणे गुन्हा कसा काय होऊ शकतो ? महात्मा गांधी भारतीय राष्ट्रवादाबद्दल म्हणतात माझ्या संस्कृतीसाठी लोकांच्या हित आणि विकासासाठी आम्हाला राष्ट्रवादाच्या भितींची गरज आहे पण आमच्या घराच्या खिडक्या देवाण घेवाणीसाठी उघड्या असतील- संघीय धर्माधिष्ठीत राष्ट्रवादाचा मी समर्थक आहे असे नाही, त्यांनी हिटलर आणि इझ्राएलचे प्रतिक्रीयावादातून क्तीही गुण गायले तरीही हिंदू त्याला धर्मही म्हणता येतनाही त्याचे तत्वज्ञानच इतपत व्यापक नक्कीच आहे की तुम्ही उपासना कोणत्याही पद्धतीने करा त्यावर कसलेच बंधन नाही म्हणजे उपासकांनी कितीही नॅरोमाईंडेडाणा केला तरिही मुळातच तत्वज्ञात बर्यापैकी उदार आहे त्यात समस्या नव्हत्या असे नाही कुठलेही परंपरावादी सहज बदलत नाहीत पण पुरोगामी चळाळींना कुरकुरत का होईना स्वतःस परंपरावादीही भारतात स्वतःसातत्याने बदलत पुरोगामीत्वाचे एकेकपाऊल अल्पशा उशीराने का होईना स्विकारताना दिसतात, अरबस्ताना प्रमाणे तुम्ही इथे अचानक काळाच्या मागे जाल असा कितीही बागुलबुवा उभ केला तरीही तसे होणे सहज शक्य नसावे - तरीही भारतीय राष्ट्रवादाला हिरहिरीने आक्रमक स्वरुप नकारात्मक रंगात रंगवण्याचा सातत्याने प्रय्तन का केले जातात तेव्हा त्यातील अंतस्थ हेतु शंकास्पद होतात.
22 Feb 2016 - 12:32 pm | गॅरी ट्रुमन
भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक होता याविषयी (बहुतांश) दुमत असू नये.प्रश्न आहे की भारत हा राजकीय दृष्ट्या एक होता का हा. सांस्कृतिकदृष्ट्या एक असणे आणि राजकीय दृष्ट्या एक असणे या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. बिस्मार्कने जर्मन एकीकरणासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर जर्मनी हा राजकीय दृष्ट्या एक देश झाला.जर्मनीतून फुटून निघावे वगैरे मागणी एखाद्या प्रांतातून आजही होताना दिसत नाही (जी स्पेनमध्ये कॅटालोनिया किंवा युके मध्ये आर्यलंडमध्ये झाली). १९४५ नंतर जर्मनीचे कृत्रिमरित्या दोन तुकडे पाडले गेले त्यानंतरही आपण एकत्र यावे ही भावना जर्मन लोकांमध्ये प्रबळ होतीच. तेव्हा जर्मनी सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे असे म्हणता येईल असे म्हणायला हरकत नसावी. पण जर्मन एकीकरण झाले त्यापूर्वी जर्मनी राजकीयदृष्ट्या एक नव्हता.हीच गोष्ट इटालियन एकीकरणापूर्वीच्या इटलीविषयी. तेव्हा भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या एक होता असे म्हटले तरी ब्रिटिशपूर्व काळात राजकीय दृष्ट्या भारत एक होता असे कसे म्हणता येईल? वरील आणि इतर प्रतिसादात तुम्ही एक तर सांस्कृतिक एकतेची उदाहरणे दिली आहेत किंवा ब्रिटिश आल्यानंतरच्या काळाची उदाहरणे दिली आहेत.
ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा अगदी १८५७ मध्ये आपल्याकडे जी काही परिस्थिती होती ती राजकीयदृष्ट्या एकतेची नक्कीच नव्हती.काही उदाहरणे---
१. पानिपतचे युध्द हे भारतीय विरूध्द अफगाण होते असे म्हटले जाते.ते तसे खरोखरच होते का? का ते मराठे विरूध्द इतर सगळे (सूरजमल जाटाचा अपवाद वगळता) असे होते? अहमदशहा अब्दालीला बोलावले कोणी? नजीबखानाने, जो सांस्कृतिकदृष्ट्या एक होता त्याच भौगोलिक भागातील एकाने. अब्दालीबरोबर अयोध्येचा शुजाउद्दौला होताच. त्याच्या सैन्यात असलेले हिंदू गोसावी पण अब्दालीच्याच बाजूने होते असेही वाचले आहे.
२. नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचे आरमार बुडवले. म्हणजे पेशवे आणि आंग्रे यांची संस्कृती फार वेगळी होती अशातला भाग नाही.पण त्यांच्यात राजकीय वर्चस्वावरून खटके होते हे कसे नाकारता येईल?त्यातही पेशव्यांनी त्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली यावरून या लढाईसाठी राजकीय कारण अधिक महत्वाचे होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?
३. राणी लक्ष्मीबाईनेही ब्रिटिशांनी दत्तकविधान नाकारायचा निर्णय मागे घेतल्यास बंडवाल्यांपासून ब्रिटिशांपासून सुरक्षित ठेऊ अशी ऑफर दिली होती (संदर्भ: बिपीन चंद्रा यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स पान ३). म्हणजे भारत देश राजकीयदृष्ट्या एक करावा वगैरे गोष्टी राणी लक्ष्मीबाईलाही महत्वाच्या नव्हत्याच आणि तिची पण लॉयल्टी तिच्या संस्थानाविषयी होती असे म्हटले तर काय चुकले? तिची घोषणाही 'मेरी झाशी नही दूंगी' अशी होती तर 'मेरा भारत नही दूंगी' अशी नव्हती.
अशी इतरही उदाहरणे देता येतील.
भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक वगैरे आपण म्हणत असलो तरी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची कुठे संस्कृती एक होती? किंबहुना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्याला राजकीय स्वरूप आले त्याचे मूळ कारण हेच सांस्कृतिक फरक होते असे म्हटले तर काय चुकले? म्हणजे शिवाजी महाराजांनी जी मूल्ये अभिप्रेत होती ती जर आदिलशहा आणि मोंगल अंगीकारत असते तर स्वराज्यासाठी लढायची गरजच शिवाजी महाराजांना पडली नसती.पण या सांस्कृतिक मूल्यांमध्ये इतकी तफावत होती म्हणूनच महाराजांचा लढा उभा राहिला.समजा औरंगजेबाऐवजी दारा शुकोह सत्तेत आला असता तर कदाचित महाराजांचा लढा मोंगलांविरूध्द नसताही.
तीच गोष्ट शीख आणि मोंगलांची.शीख पंथाची स्थापना झाल्यापासून पिढ्यानपिढ्या शीख आणि मोंगल यांच्यात हाडवैर होते.शीख आणि हिंदूंमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या बरेच साम्य होतेच--किंबहुना हिंदू कुटुंबांमधील सर्वात मोठा मुलगा शीख होण्याची परंपरा अगदी अलीकडल्या काळापर्यंत चालू होती (माझ्या पंजाबी मित्राच्या आजोबांचा मोठा भाऊ शीख झाला होता). पण मोंगल आणि शीख यांच्यात कसलेच सांस्कृतिक साम्य नव्हते.१८५७ मध्ये शीख ब्रिटिशांच्या बाजूने का उभे राहिले? कारण मोंगल बाहशहा बंडवाल्यांच्या बाजूने म्हटल्यावर मोंगल आणि शीख यांच्यातील पिढ्यानपिढ्यांचे हाडवैर लक्षात घेता हे होणे स्वाभाविक नाही का? तेव्हा भारत सांस्कृतिकदृष्ट्याही १००% एक होता असे म्हणता येणार नाही.
अर्थातच आताच्या काळातील राष्ट्रवादाचे मूळ (बहुतांश असलेल्या) सांस्कृतिक एकतेत होते ही गोष्ट जशी नाकारण्यात अर्थ नाही त्याप्रमाणेच ब्रिटिश राज्यामुळे भारतीयांमध्ये आपण राजकीयदृष्ट्याही एक होऊ ही भावना वाढीस लागली हे पण नाकारण्यात अर्थ नाही असे मला वाटते. अनेकदा दोनपैकी एका टोकाचे मत मांडणारे लोक दिसतात.मला वाटते या बाबतीत दोन्ही टोके टाळून अधिक न्युअन्स्ड मत ठेवणे श्रेयस्कर.
22 Feb 2016 - 12:43 pm | तर्राट जोकर
प्रतिसाद खूप आवडला आणि पटला. भारत राजकिय दृष्ट्या एक नव्हता हे सत्य लपवण्यासाठी संस्कृतीचे दुबळे कारण पुढे केले जाते.
22 Feb 2016 - 1:44 pm | माहितगार
आपण मी आधी केलेल्या विश्लेषणाच्या बर्याच भागाची दखल घेतली नसावी.
१) एक मुस्लीम लिगच्या अपवाद सोडून दिला -त्यांनीही अत्यल्पकाळ का होईना दिल्लीत कॉंंग्रेस सोबत प्रयोग करुन पाहीला- भारतीय समाजमनाची एक राष्ट्र म्हणून घडन केली होती का एकसंघ राष्ट्रासाठीची इच्छा शक्ती जागृत होती का होय, तत्कालीन कॉंग्रेसचा प्रभाव भारतव्यापी होता - हे आकडेवारीनेही सिद्ध होते- त्यांनी एकसंघराष्ट्राचेच रुप जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन राजकीय जागृती व्यवस्थीतपणे घडवलेली होती, तसे नसते तर महात्मा गांधी उपोषण करताहेत अखंडभारत हलतो आहे असे चित्र दिसले नसते.
२) भारतातील स्वातंत्र्य लढ्याचे स्वरुप आम्ही ब्रिटीशांच्या एकछत्री अमंलाकाही रहायचे नाही म्हणुन स्वांत्र्य लढा असे नव्हते,
३) तुम्ही बिस्मार्कोत्तर एकत्रित जर्मनीचे उदाहरण देताय पण ते १८६० ते १८७१ या काळात झाले त्यापुर्विच बहुतांश भारत ब्रिटिशांकडून एक करून झाला होता - भारत लिखीत इतिहासात ब्रिटीशांपुर्वी सम्राट चंद्रगुप्त ते अशोक तीन पिढ्यांचा काळ, मोगलांचा काळ बर्याच पिढ्या आणि औरंगजेबाच्या काळात सर्वाधिक भूभाग - याचे आपण क्रेडीट कुठेच देत नाही आपल्या पेक्षा जर्मनीचा एकत्र राहिल्याचा एकुण काळ आपल्या पेक्षा कितीतरी कमी भरतो तरी भारताच्या एकत्रिकरणाचा इतिहास कमी भरतो म्हणायचे ?
३) पौराणिक इतिहासांना अधिकृत इतिहास म्हणून स्विकारणे जड जाते म्हणून त्यावर मी भर देत नाही परंतु अश्वमेध यज्ञांचे (खखोदेजा पण एक राजकीय संस्कृतीचा अंशाची शक्यता म्हणून पाहता येईल -परशुरामाचे पृथ्वी जिंकणे, राम,अगस्त्याचे दक्षिणेत का काय येणे इत्यादी कथा कथा म्हणून बाजूस ठेवल्या तरी त्या मिथ्सचा मानसिक प्रभावही नाकारता येत नाही) अधिक उल्लेख असावेत ज्यात घोडा वर्षभरासाठी का काय सोडला जाई (जाणकारांनी दुरुस्त्या सुचवाव्यात) तो वर्षाभरात जिकडे जाईल तेवढा भूभाग जिंकला जाई. या अश्वमेध प्रकारात कितीही वर्णन केले तरी त्या काळात पूर्ण भारतभराची भूमी जिंकली गेली असे म्हणणे कठीण असावे पण यशस्वी राजाचा अश्वमेधाचा घोडा ज्या कोणत्या दिशेने गेला तेवढी एकसंघता येत असणार आणि बर्या पैकी फ्रीक्वेन्सीने बदलत असणार. म्हणजे वेगवेगळ्या भारतातीलच वेगवेगळ्या टोकाच्या राजांच्या खाली जगण्याचे जमवून घेण्याचे कौशल्य आणि संस्कृती राजघराणी आणि भारतीय समाजात वसत असावी असे म्हणता येईल का ?
३) हस्तिनापूर अथवा दिल्लीचे पूर्ण भारतावर प्रत्येकवेळी राज्य नसले तरी मुख्य प्रभाव अगदी पौराणिक काळापासून हस्तिनापूर अथवा दिल्लीचा होता हे खूपही डाऊनप्ले करता येत नाही.
राजकन्यांच्या भारतभरच्या राजकुमारांना बोलावून अथवा ठरवून स्वयंवरे हॉण्याची आणि राजा राजांचे भारतभरात परस्पर नाते संबंध चालत आले असावेत असे म्हणता येते.
४) बर्याच वेळा एकाच राजाचा एकछत्रि अंमल नसलातरीही इमिडीएट अथवा एक्सटेंडेड परिवार राजघराण्यांचे राज्य अॅड केले तर राजपरिवारांचा प्रभाव अधिक मोठा दिसू शकतो.
- आपण लोक विवीधतेला विसंगती म्हणुन दाखवून भारत एकसंघ नव्हता म्हणून एकसंघ राहू शकत नाही अशा तर्कावर येऊ इच्छित आहात का ? लोकमान्य टिळक शिवाजी जयंती साजरी करताना राष्ट्रपुरुष कोणत्या धर्मातून आला ते महत्वाचे नाही असे सांगत होते, उद्याचा राष्ट्रपुरुष कदाचित मुस्लिमही असू शकेल म्हणजे विवीधतेमुळे सांस्कृतिक फरक असतील पण राष्ट्र उभारणीची वेळ येते तेव्हा सास्कृतिक फरक दुय्यम होतात आणि एकात्मता महत्वाची होते.
आणि कुठे कमी पडत असेल तर शक्यतोवर गांधीजींच्या मार्गाने अखंड भारत एक ठेवावा -पण तोच एकमेव मार्ग नव्हे- ते जमले नाही तर अगदी बिस्मार्कचा सशस्त्र मार्ग वापरुन विरोधकांना साम दाम दंड भेदाने नेस्त नाबूत करुनही भारत एक ठेवावा. भारताची विना अट अक्षुण्ण एकसंघता आणि अगदी कोणत्याहि किमतीवर कारण तुम्हीच जे सांगू इच्छिता आहात की जग म्हणजे तुम्ही किती वेळ एकत्र होता हे मोजते आणि एकत्र राहील्याचा अधिकाधिक काळ मोजला जाण्याचा एकमेव मार्ग अधिकाधिक काळ एकत्र रहाणे होय त्याला तरणोपाय नाही. एकत्र न राहणे म्हणजे भविष्यातील भारतीय संस्कृती बाहेरच्या पारतंत्र्यांना आमंत्रण देणे होय.
अर्थात मागे काही चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फोडा आणि झोडा नितीस सहानुभूती देणर्या विश्लेषणांना कोणत्याही माझ्या सारख्या देशप्रेमी व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती असणार नाही.
22 Feb 2016 - 2:16 pm | गॅरी ट्रुमन
माझीही नाही.
सहमत आहे.
मुद्दा एवढाच की पूर्वी भारत हा राजकीय दृष्ट्या एक होता हे म्हणण्यासारखी परिस्थिती होती असे मला तरी वाटत नाही. आणि मी असे म्हणत आहे याचा अर्थ सद्यकालीन भारत हा देशच नाही किंवा तत्सम कुठचेतरी गुडघ्यातले डावे विचार मला मान्य आहेत असे अजिबात नाही.
काँग्रेसचा प्रभाव सर्वत्र होता हे कोणीच नाकारत नाही.पण परत एकदा-- काँग्रेसची स्थापना कधी झाली? १८८५ मध्ये. म्हणजे भारतात ब्रिटिश राज्य स्थिरावल्यानंतर. माझा मुद्दा भारतात ब्रिटिश येण्यापूर्वीचा आहे.
तोच तर माझा मुद्दा आहे. भारताला राजकीय स्वरूपात एकत्र आणण्यात ब्रिटिशांची भूमिका नक्कीच आहे. अर्थात ते त्यांचे ध्येयही नव्हते.पण सर्वत्र ब्रिटिश अंमल आल्यामुळे या घटनेचा तो एक भले अनइंटेंटेड परिणाम होता. तेव्हा सध्याच्या भारतीय राष्ट्रवादात आपल्या बहुतांश सांस्कृतिक एकतेचे योगदान आहे तसेच ब्रिटिश अंमलामुळे झालेल्या या अनइंटेंडेड परिणामाचेही आहे.
सम्राट चंद्रगुप्त ते अशोक म्हणजे २२००-२३०० वर्षांपूर्वीचा काळ होता.त्या काळात भारत राजकीय दृष्ट्या एक होता याचे महत्व कोणीच नाकारत नाही. पण मोंगलांचा काळ किंवा औरंगजेबाचा काळ??? सॉरी. मोंगल किंवा औरंगजेब हे मला कोणत्याही अॅन्गलने आपले वाटत नाहीत.असल्या गणंगांच्या नेतृत्वाखाली भारत एक असण्यापेक्षा ब्रिटिशांच्या अंमलाखाली एक असलेला कधीही परवडला (माझ्या दृष्टीने-- इतरांचे माहित नाही आणि याबद्दल कोणतीही चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही).
हेच युरोपविषयीही बोलता येईल. ब्रिटिश राजपुत्रांचीही लग्ने इतर--फ्रेंच, जर्मन वगैरे देशांमधील राजकन्यांशी होत होती. रॉबर्ट वॉलपोलला इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणतात तो पंतप्रधान म्हणून कसा पुढे आला? त्यावेळी राजाचेही मंत्रीमंडळ असे.पहिला जॉर्ज राजाचा जन्म जर्मनीतील हॅनोव्हरचा होता आणि त्याला इंग्लिश भाषाही व्यवस्थित बोलता येत नसे. अशा परिस्थितीत मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून रॉबर्ट वॉलपोलच्या हातात सुत्रे गेली आणि तो इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणून प्रसिध्द झाला. याच पहिल्या जॉर्जची पत्नी सोफिया ही जर्मन होती.असे इतर अनेक राजांविषयी लिहिता येईल. मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून दिले होते ही गोष्ट तर प्रसिध्दच आहे. म्हणजे परस्परांबरोबर लग्नसंबंध असणे एवढ्याच कारणावरून राजकीय ऐक्य होते असे म्हणता येणार नाही.
असो. मी जे काही लिहिले आहे त्याचा अर्थ पूर्वी भारत एक नव्हता म्हणून आताही असू नये वगैरे कोणी काढू नका. असल्या फालतू विचारांना मी फाट्यावर मारतो. रेसिडेंट नॉन-इंडिअन म्हणतात की भारताला राजकीय ऐक्य केवळ ब्रिटिशांमुळेच मिळाले तर त्याचवेळी अगदी कट्टर भारतीय संस्कृतीवाले म्हणतात की ते केवळ भारतीय संस्कृतीच्या एकत्मतेमुळे मिळाले. मला वाटते की सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. एवढाह माझा मुद्दा आहे.
22 Feb 2016 - 2:33 pm | माहितगार
अल्प मतांतरे अद्याप आहेत पण काळाच्या ओघात चर्चा होत राहिल, तुमच्या प्रतिसादामुळे माझे मेगाबायटी प्रतिसाद कुणीतरी वाचले याची खात्री होऊन बरे वाटले. :) प्रतिसादासाठी धन्यवाद
24 Feb 2016 - 11:47 am | असंका
सुंदर लिहिलं आहेत. माझी खात्री आहे की अनेकांनी आपले प्रतिसाद वाचून मनातल्या मनात त्याला दाद दिली आहे.
24 Feb 2016 - 12:23 pm | आनन्दा
असं का!
ह. घ्या.
22 Feb 2016 - 10:33 pm | बोका-ए-आझम
यावर एक मतप्रवाह असा आहे की रेल्वे आणि सनदी सेवा या गोष्टी भारतात एका राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरल्या. याबद्दल तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
23 Feb 2016 - 11:46 am | गॅरी ट्रुमन
रेल्वे किंवा सनदी सेवा किंवा अमुक एका गोष्टीच्या प्रभावापेक्षा मी ब्रिटिश राज्याविषयी लिहितो.
मला वाटते की पूर्ण भारतात ब्रिटिशांचा अंमल असल्यामुळे एक गोष्ट नक्कीच झाली-- आपण कुठल्या लहान राज्याचे नागरिक असण्यापेक्षा भारताचे (भले ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या) नागरिक आहोत ही भावना प्रबळ झाली. काँग्रेस स्थापन व्हायच्या अगोदर दक्षिणेत मद्रास महाजन सभा, कलकत्याला (तशाच स्वरूपाची एक संस्था--नाव विसरलो) वगैरे संस्था स्थापन झाल्या होत्या.त्यांचा उद्देश 'नेटिव्हांचे' (पक्षी सर्व भारतीयांचे-- अमुक एका राज्याच्या नागरिकांचे नाही) हितरक्षण करणे हा होता. याच संस्थांचे लोक काँग्रेसमध्ये एकत्र आले.पूर्वी सांस्कृतिक पातळीवर जरी भारतीय एक असले तरी राजकीय पातळीवर एक यायला ज्या कॅटॅलिस्टची गरज होती ती गरज ब्रिटिश राज्याने पूर्ण केली असे मला वाटते. ब्रिटिश राज्य नसते तर ही भावना पूर्ण देशात कधीच आली नसती असे नक्कीच नाही पण त्याला किती वेळ लागला असता हे मात्र सांगता येणार नाही. आणि भारतात तसे काही व्हावे असा ब्रिटिशांचा उद्देश होता असेही नक्कीच नाही. पण अनेकदा होते असे की एखादी गोष्ट त्या उद्देशाने केली नसली तरी त्याचा अनइंटेंडेड परिणाम म्हणून दुसरी एखादी चांगली गोष्ट होते.
माझा हे लिहिण्याचा उद्देश इतकाच की आपण भारतीय राष्ट्रवादी असलो तरी सध्या ज्या स्वरूपात भारतीय राष्ट्रवाद आहे त्या स्वरूपात येण्यासाठी मुळातील (बहुतांश) सांस्कृतिक ऐक्याबरोबरच ब्रिटिश राज्याचा हा अनइंटेंडेड परिणामसुध्दा कारणीभूत आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली (कॅटॅलिस्ट) असे मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याकाळातील भारतातील परिस्थिती लक्षात घेता कोणीतरी बाहेरचे येऊन हातपाय पसरणार हे होणे अगदी क्रमप्राप्त होते.अशा प्रसंगी पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोक येण्यापेक्षा ब्रिटिश आले हे त्यातल्या त्यात बरे झाले असेच मला वाटते.
अर्थात हे लिहिल्यामुळे मला काळा इंग्रज वगैरे म्हणणारे लोक आहेतच. अशांना फाट्यावर मारत आहे. असो.
ट्रुमन
23 Feb 2016 - 2:39 pm | होबासराव
.
23 Feb 2016 - 3:00 pm | Anand More
हे क्लिंटन आणि गॅरी ट्रुमन एकंच का?
23 Feb 2016 - 3:30 pm | गॅरी ट्रुमन
हो :)
23 Feb 2016 - 9:24 pm | कपिलमुनी
क्लिंटन भौंसाठी ओबामा हे सदस्य नाम राखून ठेवावी ही विनंती ! ;)
( हलके घ्या )
22 Feb 2016 - 12:44 am | माहितगार
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते रिपब्लिक म्हणजे गणराज्यच असणार आहे, समतेच तत्व त्यात अध्यार्हुत असणार आहे कारण गांधीअन स्वातंत्र्य लढ्याची संकल्पनाच स्वातंत्र्य विथ अ परपज अँड परपज इज बेनीफीट ऑफ द कॉमन मॅन हे अत्यंत सष्ट होते काँग्रेसी असोत वा काँग्रेसेतर बहुसंख्य राजकीय पक्षांची राजेशाही पुन्हा आणणे नाही या बाबत सहमती होती, या विषयाची फारशी साशंकता कल्पनेच्या राज्यात रमलेल्या दोनचार राजांच्या पलिकडे कुणाच्याही मनात त्याही काळात राहण्याचे काहीही कारण नव्हते. अगदी मुस्लिम लिगलाही गणराज्यच अभिप्रेत होते त्यांनी पाकीस्तानातही संस्थानिकांचे विलिनीकरणच केले. बहुतांश संस्थानिकांनी विलिनीकरणच्या वेळी फारशी खळखळही केली नाही सैनिकी दृष्ट्या त्यांना ते शक्यही असणार नव्हते, आणि संस्थानी जनतेचाही ओढा स्वच्छपणे लोकशाही राज्यव्यवस्थांकडे होता. तसे नसते तर १८५७ प्रमाणे उठाव दिसले असते दोन-चार अतीशहाण्या संस्थानिका शिवाय इतर कुणी प्रयत्नही केले नाहीत आणि दोनचा अती शहाणे भारतात असो का पाकीस्तानात त्यांची विलिनीकरणे करवली गेली तत्कालीन संस्थनीय जनतेस लोकशाहीचीच आकांक्षा होती.
भारतीय राज्यघटने रुसवे फुगवे काढण्यापुरते काही राज्यांना कधी मधी अधिक माप मिळते पन सर्व घटक राज्यांना सर्वसाधारन पणे राज्यघटनेच्या माध्यमातून विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत. परकीय गुप्तहेरसंस्थांच्या आहारी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि राज्यघटना नीट न शिकलेल्या लोकांना फितवले जाते आहे हे दुर्दैवी आहे.
22 Feb 2016 - 10:10 am | आनन्दा
एव्हढेच लिहायला आलो होतो. सध्या लोक्सत्तामध्ये सदानंद मोरे यांचे एक सदर चालू आहे, त्यात परवाच त्यांनी फाळणी आणि त्यापेक्षा संस्थाने विलीनीकरणाची गोष्ट सांगितली. ती गोष्ट या वाक्याला छेद देणारी आहे. ब्रिटिशांनी जर लोकनियुक्त सरकारशीच करार केले असते तर ही विलीनीकरणाची समस्याच निर्माण झाली नसती.
जाताजाता - लेखकाला सल्ला
तुम्ही एका फार मोठ्या संवेदनशील विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे लिहिताना खूप विचार करून आणि अभ्यास करून लिहा. तुमचा मिपावरच्या लेखनाचा इतिहास एका संवेदनशील लेखकाचा आहे म्हणून किमान चर्चा तरी होतेय, नाहीतर एव्हाना या धाग्यावर प्रतिसादांची राळ उडाली असती.
बाकी तोच तुमचा हेतू असेल तर चालूद्या.
22 Feb 2016 - 10:12 am | आनन्दा
सॉरी, मला शेषराव मोरे म्हणायचे होते.
ये मोरे मोरे बहोत कन्फ्युजन हो गया. लेखक पण मोरे, ते पण मोरे.
कृ. ह.घ्या.
22 Feb 2016 - 12:50 am | माहितगार
अलेक्झांडर असो इराण असो अफगाण असो अथवा ब्रिटीश, भारतातील अनेक छोट्या छोट्या राज्यांमुळे परकीय आक्रमणांना तोंड देणे कठीण गेले हा इतिहास सर्व राजकीय दृष्टीकोणांच्या नेत्यांपुढे स्पष्ट होता - त्यामूळे मुस्लिम लिगचा आगाऊपणा सोडला तर - सर्वसाधारण पणे सर्व नेत्यांचे देशाच्या भावी एकसंघतेच्या गरजे बाबत आणि एकात्मतेच्या गरजे बाबत सर्व साधारण सहमती राहिलेली होती.
22 Feb 2016 - 12:54 am | माहितगार
मी वर नमुद केलेल्या बर्याच बाजु धागा लेखकाच्या विश्लेषणातून निसटल्या असाव्यात म्हणून त्यांचे लेखन तथ्य आणि तर्कसुसंगतेच्या निकषावर कितपत टिकते या बाबत दाट शंका आहेत आणि म्हणून धागा लेखाशी आमची असहमती
22 Feb 2016 - 1:25 am | Anand More
अहो... हा माझ्या लेखमालेचा पहिला भाग होता.... थोडे थांबला असतात तरकदाचित काही मुद्दे लिहावे लागले नसते तुम्हाला... पण, इतक्या सविस्तर प्रतिसादांसाठी धन्यवाद...
22 Feb 2016 - 11:20 am | माहितगार
सरजी, आपल्या मुद्याचा पाया कुठेतरी कच्चा राहीला असे आम्हाला जाणवले ते आम्ही एळीच मांडण्याचा अल्पसा प्रयास केला. प्रतिसादांची मनमोकळे पणाने नोंद घेतलीत छान वाटले
22 Feb 2016 - 2:01 am | तर्राट जोकर
माहितगारजी, जम्पिंग ऑन द कन्क्लुजन म्हणतात ते हेच. अजून मोरेंनी त्यांना काय म्हणायचे आहे हे पुर्ण मांडलेही नाही त्याआधीच आपण त्यांना काय म्हणायचे आहे हे सांगुन मोकळे झालात, त्यावर आपले प्रति-विचार मांडून टाकलेत. अतिघाई संकटात नेई.
22 Feb 2016 - 11:06 am | माहितगार
तजो, मुळीच नाही उलटपक्षी पुढे चालून माझ्या विचारांच्या बाजूने लिहिणार आहेत का विरुद्ध हे माहित नसताना धागा लेखातील तथ्य आणि तर्क विषयक उणीवा मांडल्या आहेत.
22 Feb 2016 - 12:28 pm | तर्राट जोकर
तसे असेल.
22 Feb 2016 - 2:36 am | अगम्य
शेषराव मोरे साहेबांचे हे चारही लेख अतिशय उत्कृष्ट आहेत. अभिनिवेश रहित, तथ्याधारित लेखन.
http://www.loksatta.com/sampadkiya-category/sanskrutsanwad/
दोन्ही मोऱ्यांच्या पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.
22 Feb 2016 - 9:26 am | अजया
माहितगारांचे टायर दुरूस्तीचे दुकान असावे असा संशय येतोय :)
धागा खिळे टाकून पंक्चर केलात की!!आता दुरुस्तीला लेखकाला तुमच्याकडे येणे आले :)
22 Feb 2016 - 10:14 am | आनन्दा
आक्षी सहमत.. माहीतगार म्हणजे माहिती देऊन समोरच्याला गार करतात ते.
22 Feb 2016 - 10:40 am | डॉ सुहास म्हात्रे
कश्या काय सुचतात अश्या उपमा-उत्प्रेक्षा ?! =)) =)) =))
22 Feb 2016 - 11:13 am | माहितगार
धागा लेखकाची गाडी इतर कुणी पसरलेल्या खिळ्यांना न खिळे न चुकवता चालली होती, मागच्या गाड्यांनाही खिळ्यांवरुन नेऊ होती, टायर-ट्यूबला मुळचीच बरीच मोठ मोठी भोकं आहेत आणि गाडी पुढे जाण्याच्या आधी पंक्चर काढून दिले तर धागा लेखकाचा नैतर नै किमान काही वाचकांचा प्रवास अधिक सुखरुअ होईल म्हणून आम्ही टायर-ट्यूबला तर्क आणि तथ्याच्या पाण्यात घालून बुडबुडे आणि भोके दाखवून दिली नैतर खिळेवाल्या रस्त्यावरुन जाताना समद्या वाचकांच्या गाड्या पंक्चर झाल्या असत्या नै का
22 Feb 2016 - 12:39 pm | अजया
अता लेखकांना प्रवासाला निघण्याआधी टायरची स्थिती चेक करणे आले ;)
22 Feb 2016 - 10:50 am | पगला गजोधर
मोरेसर, अतिशय छान लिहिलंय…
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत…
आणि इतिहासात नेहमी पाहतो, राज्ये / राजेशाही / सामंतशाही, ह्या धर्माला हाताशी धरून, स्वतःचा कंट्रोल जनतेवर ठेवतात. (उदा. राजा हा देवाचा अवतार आहे, अश्या समजुतीना बळ देणे ), राजेशाही / सामंतशाही यांना स्वतःचा उदो उदो व्हावा म्हणून धर्ममार्तंडाना स्पॉन्सर करत असतात. (युरोपातील राजेशाह्या चर्चला स्पॉन्सर करायचे ते अश्याच साठी)
म्हणजेच राजे /सामंतशाही लोकांच्या, मानसिकते नुसार, महात्मा गांधीजींमुळे राजसत्तेचा कंट्रोल जनतेच्या हाती गेला, त्यामुळे सामंतशाही लोकांना महात्मा, त्यांचे शत्रू वाटले गेले असतील, तर आश्चर्य वाटायला नको.
याबाबतीत तुषार गांधी यांनी केलेले वक्तव्य पहा.
22 Feb 2016 - 1:22 pm | अभ्या..
धागा आणि लेखक सुस्थळी पडले असे म्हणायला आता काही हरकत नाही. :)
शुभेच्छा. आवडेल आता वाचायला.
23 Feb 2016 - 6:47 am | निनाद मुक्काम प...
भारतात इंग्लड मध्ये शिकेल्या भारतीय पुढार्यांनी भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढली , तेव्हा एक देश म्हणून भारत कसा असावा ह्या बद्दल च्या अनके संकल्पना ह्या त्या लोकांनी परदेशातून घेल्त्या
सेकुल्यार ते लोकशाही भाषा स्वातंत्र्य ते भारतीय कायदे जे बहुसंख्य जुनाट असून बदलले पाहिजे
दुर्दैवाची गोष्ट अशी कि स्वतंत्र भारतात लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला अनेक दशके प्रबळ विरोधी पक्ष नव्हता ह्याचे त्यांना फावले.
स्वातंत्र्य मिळालेल्या दिवशी भारतात ठिकठिकाणी धार्मिक दंगे चाली होते तर आतच्या पाकिस्तान व बांगला देश मध्ये हिंदूचा सरसकट नरसंहार चालला होता त्यावेळी आम्ही धर्म निरपेक्ष आहोत पाकिस्तान संकल्पना आम्हाला मान्य नाही हे
गांधी नेहरू ह्यांनी ठर्वेलेले धोरण पुढे जिन्हा ह्यांच्या हिंसेच्या धोरणापुढे फिके पढून पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिली
ही मान्यता दिली तेव्हा खरे तर आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वांना त्यांनी तिलांजली दिली.अशावेळी उरलेल्या भारताला परत धर्म निरपेक्ष च्या खुंटीला बांधण्याचे पातक ह्या लोकांच्या हातून घडले
त्यावेळी लोकांच्या ह्या विषयावर मतदान करण्याचा अधिकार असता तर त्यांनी धर्मनिरपेक्ष ह्या तत्व्याला मान्यता दिली नसती
कारण त्यावेळी सुद्धा व आजही ह्या संकल्पनेशी पुरेशी माहिती खेड्यातील व शहरातील लोकांना माहिती नाही
अनेकांना माहिती आहे पण मान्य माही
ह्यातून धर्मनिरपेक्ष आपण नावापुरेते
आहोत व राष्ट्रावाद्द त्यावर प्रतिसाद दुसर्या भागात जर तो आला तर ,,,
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
23 Feb 2016 - 3:58 pm | llपुण्याचे पेशवेll
भारत सांस्कृतिक दृष्ट्या एक नव्हता ना तो राजकीय दृष्ट्याही एक नव्हता. तस्मात भारतीय गणराज्याचे तुकडे करावे आणि आमचे पुण्याचे राज्य आम्हाला परत द्यावे.
:)
23 Feb 2016 - 4:13 pm | तर्राट जोकर
तुम्ही देशद्रोही आहात ;-)
23 Feb 2016 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत :) पण आमचा पाठिंबा एका तडजोडशून्य अटीवर... आम्ही राहतो ते पुण्याचे उपनगर पुणे राष्ट्रातले आमचे स्वायत्त संस्थान व्हाय्ला पायजेल ;) =))
29 Feb 2016 - 2:47 pm | अनिरुद्ध.वैद्य
वाचतोय. उत्तम लेख अन प्रतिसाद.