सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
पहिलं अर्धशतक
सायकल! एक साधी वस्तु. २००३ मध्ये आयुष्यातून सायकल निघून गेली. कॉलेजमध्ये शिकत असताना काही दिवस सायकलीचा वापर केला. पण मोठ्या शहरामधील गर्दीमध्ये सायकल चालवू शकलो नाही आणि २००३ मध्ये सायकल सुटली. पण त्याच आयुष्याने परत एकदा सायकलीला समोर आणलं- २०१३ मध्ये! आणि दहा वर्षांची ही गॅप खूप महत्त्वाची ठरली. जर ही गॅप नसती, तर कदाचित सायकलीसोबत इतकं काही करता येऊ शकतं, इतका आनंद घेता येऊ शकतो, हा अनुभवच मिळाला नसता. २०१३ मध्ये सायकल फिरण्यासाठी व ट्रेकिंगसाठी घेतली. आरोग्यासोबत पर्यटन ह्या उद्देशाने. इंटरनेटवर भेटलेल्या कित्येक सायकस्वारांनी ह्याची प्रेरणा दिली होती. अशी जीवनात दुस-यांदा सायकल आली. आणि सायकलीसोबत हळु हळु जीवनाचं असं अंतरंग उघड झालं जे सामान्यत: फार कमी अनुभवलं जातं. सायकलीशी जडलेल्या नात्याची ही एक वेगळीच कहाणी. . .
जुलै २०१३ मध्ये सायकल घेतली. आज ही सायकल मला जवळजवळ मुलांची खेळण्यातल्या सायकलीसारखी वाटते! ५५०० रूपयांना घेतलेली क्रॉस कंपनीची सायकल. गेअरची सगळ्यात स्वस्त मिळणारी सायकल. समोरचे तीन आणि मागचे सहा गेअर्स. घेताना दुकानात चालवली, तेव्हा पहिल्या प्रयत्नात बॅलन्स करणं अवघड गेलं. पण दहा वर्षांची गॅप असली तरी त्यापूर्वी किमान सात- आठ वर्षे (शाळेत आणि कॉलेजच्या दिवसांमध्ये) सायकल चालवली असल्यामुळे लगेचच चालवता आली. आता किती दूर जाऊ शकतो, किती चालवू शकतं, हे पाहायचं आहे. म्हणून पहिल्या दिवशी थोडंच अंतर चालवली- दुकानातून घरापर्यंत आणि घराजवळ. मग दोन दिवसांनी दहा किलोमीटर चालवता आली. उत्साह वाढला. मग दोन दिवसांनी पंचवीस किलोमीटर केले. पाय थोडे थकले; येताना वेग कमी झाला. पण तरी उत्साह वाढला. पंचवीस किलोमीटरनंतर चाळीस किलोमीटर केले. जाताना तर काहीच अडचण आली नाही, पण येताना शेवटचे दहा किलोमीटर फार अवघड वाटले. वारंवार थांबावं लागलं. जाताना तर दिड तासात वीस किलोमीटर गेलो होतो; पण येताना दोन- अडीच तास लागले. पण तरी मजा खूप आली- हळु गतीने रस्त्यावरून जायचं, झाडं- शेतं जवळून बघायची, रमत गमत जायचं. . .
आता हळु हळु कळालं की, सायकल चालवणं काय असतं. ह्या दोन- तीन सुरुवातीच्या राईडसमध्येच पूर्वी एकाच वेळी जितकी सायकल चालवली नव्हती, तितकी सायकल चालवली. शाळा- कॉलेजच्या दिवसांमध्ये कधीच एका दिवशी वीस किलोमीटरपेक्षा जास्त सायकल चालवली नव्हती. पण आता चालवू शकलो. कारण आता मी आनंद म्हणून चालवतो आहे. त्यामुळे मोठाच फरक पडतो. जर आपण ऑफिसला जात असू तर आपली चाल वेगळी असते. मॉर्निंग वॉकच्या वेळेस वेगळी असते. आत्ता मी जे एंजॉय करतोय, ते कामासाठी सायकल चालवणारे लोक एंजॉय करू शकणार नाहीत. कदाचित मध्ये दहा वर्षांची गॅप नसती, तर मलाही हे कधी कळलं नसतं. असो.
चाळीस किलोमीटरनंतरचं उद्दिष्ट पन्नास किलोमीटरहून अधिक चालवायची हे आहे. पहिलं अर्धशतक! त्यासाठी योजना आखली. घरापासून सुमारे बत्तीस किलोमीटर दूरवर गोदावरी नदी आहे. त्यामुळे तिथे जाऊन- येऊन चौसष्ठ किलोमीटर होतील. भरपूर मजा येईल. आणि क्षमतेचा अंदाजही येईल. त्यानुसार सकाळी सात वाजता निघालो. २० जुलै २०१३. पावसाळी वातावरण आहे आणि थोडा पाऊस पडतोय. त्यामुळे रेन कोट घालूनच निघालो. पण त्यामुळे खूप जास्त घाम आला. लवकरच थकल्यासारखंही वाटलं. गावाबाहेर पडलो आणि एका हॉटेलमध्ये चहा नाही पण कॉफी मिळाली. पाऊस आता थांबला आहे. आता रेन कोट काढला व कॅरिअरवर ठेवला. ही गेअरची अगदी साधी सायकल असल्यामुळेच त्यात कॅरिअर आहे. अन्यथा एडव्हान्स्ड गेअर सायकलींमध्ये कॅरिअर येत नाही.
पुढे निघालो, तसं फ्रेश वाटलं. थकवा गेला. पाऊसही बंद झाला. हळु हळु पुढे जात राहिलो. वाटेत लोक गेअरची सायकल बघून आश्चर्यचकित होत आहेत. मुलं तर निरखून बघत आहेत! आता पाय आरामात चालत आहेत. असं वाटतंय हे तर टेस्ट क्रिकेट बॅटिंगसारखं आहे. पहिल्या तासामध्ये चेंडू नवा असतो; स्विंग होतो; फिरतो. नंतर हळु हळु बॅटिंग करणं सोपं होत जातं. तसं आता सायकल चालवणं सोपं वाटत आहे. बहुतेक रात्रीच्या झोपेमुळे पाय व शरीर जड असणार; जे आता मोकळं होत आहे. त्यामुळे अडचण येत नाहीय. पुढे जात राहिलो. थोडा वेळाने परत एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. कोणाच्या तरी मोबाईलवर रिंग़ टोनवर गाणं लागलं- होशवालों को ख़बर क्या. . . एकदम वातावरण मस्त झालं. पुढे गेलो तरी ते गाणं मनात रेंगाळत राहिलं. अगदी विरळ गर्दीच्या रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद. अहा हा!
गोदावरी नदी
असं म्हणतात की, चालणा-यांना लक्ष्य नक्कीच मिळतं. गरज फक्त पुढे जात राहण्याची असते. लवकर नदीच्या किनारी पोहचलो. थोडा वेळ थांबलो आणि परत फिरलो. तिथे वाळूत सोनं शोधणारे मुलं भेटली. त्यांना आश्चर्य वाटलं- बत्तीस किलोमीटर सायकलीवर? परत जाताना सुरुवातीला अडचण आली नाही. हळु हळु जात राहिलो. लवकरच अर्धशतक पूर्ण झालं! पहिलं अर्धशतक! वेग अगदी कमी आहे आणि आता तर अजून कमी होत जाईल. पण तरीही खूप मस्त वाटत आहे. शेवटच्या पंधरा किलोमीटरमध्ये अनेक वेळेस थांबावं लागलं. कधी एकदा घर येतं असं वाटलं. थांबत- चालत- थांबत जात राहिलो. शेवटी घरी पोहचलो आणि ६४ किलोमीटर पूर्ण झाले. पहिलं अर्धशतक पूर्ण झालं. पाय बिलकुल जड होऊन गेले आहेत. लंगडल्यासारखं चालतोय. बहुतेक ही पहिली मोठी राईड असल्यामुळे शरीर जुळवून घेतं आहे. नंतर असा त्रास होणार नाही. ६४ किलोमीटर! साडेपाच तास नक्कीच लागले; कारण मी अजून अशा मोठ्या राईडला नवखा आहे. त्यामुळे वेग कमी असणं स्वाभाविक आहे. पण साडेपाच तास आणि ६४ किलोमीटर सायकल चालवू शकतो, हा विश्वास वाटतोय. ह्या हिशेबाने एका दिवसात शतकसुद्धा करता येऊ शकतं! बघूया.
३२ किमी अंतरामध्ये किरकोळ चढ- उतार. पण तेव्हा तेही कठिण वाटले!
ही तर फक्त सुरुवात!
पुढील भाग: सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक!
हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
13 Nov 2015 - 3:24 pm | सतिश पाटील
छान..सुरुवात...
13 Nov 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा
कॉलिंग मोदक... :)
13 Nov 2015 - 4:06 pm | एस
मस्त! ही लेखमाला वाचून माझ्यासारख्यांना प्रेरणा मिळावी अशी प्रार्थना करतो! :-)
13 Nov 2015 - 4:13 pm | मोदक
झक्कास..!!!!
अभिनंदन.
असेच सायकल प्रवास करत रहा.. आणि सर्वांना प्रेरणा देत रहा..!!!!!!
13 Nov 2015 - 5:43 pm | बोका-ए-आझम
पुभाप्र!
13 Nov 2015 - 9:45 pm | मधुरा देशपांडे
उत्तम सुरूवात. १२ वर्षांनंतर जेव्हा मी मागच्या वर्षी सायकल परत चालवली, तेव्हाची सुरुवातीला वाटलेली थोडी भिती, आणि मग सवयीने पुन्हा रोज सायकलवर ऑफिसला येणे जाणे हे आठवले, अर्थात तुमच्या या अर्धशतकापुढे ते काहीच नाही. आता हिवाळ्यामुळे बंद झालेय, पण अनेक लोक इथल्या कडक थंडीतही सायकल चालवतात त्यांचे कौतुक वाटते.
तुमचे लेख नेहमीच वाचनीय असतात, पुभाप्र.
13 Nov 2015 - 11:20 pm | बिपिन कार्यकर्ते
सुप्पर!
13 Nov 2015 - 11:47 pm | शिव कन्या
चलती है साइकल तो जलती है कॕलरी!
पुलेप्र.
15 Nov 2015 - 10:25 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! :)
15 Nov 2015 - 11:18 am | यशोधरा
अरे वा, अजून एक लेखमालिका तुमच्याकडून.
वाचते आहे.
15 Nov 2015 - 3:21 pm | पिंगू
वाह. सायकल प्रवास अखंड सुरु राहू दे.
सध्या माझा तरी थांबलाय. :(
15 Nov 2015 - 9:34 pm | मोदक
नमस्कार पिंगू सर,
ओळख असूद्या ;)
15 Nov 2015 - 9:54 pm | पिंगू
अरे सगळ्यांची आठवण येते. पण इथे व्यापात बुडालोय. पुण्यनगरीत येताना कळवेनच.
17 Nov 2015 - 11:07 pm | पैसा
मस्त सुरुवात!
17 Nov 2015 - 11:19 pm | चतुरंग
सायकल सफर आवडली! जातायेता छोट्या छोट्या नोंदी केल्यासारखी टिपणे देत जाताय तेही खूप छान वाटलं, तुमच्याबरोबर सफर केल्यासारखं वाटतंय! :)
पुढचे मोठे टप्पे पार करण्यासाठी शुभेच्छा!
अवांतर - मी देखील सध्या हाफिसात सायकलवरुन जातोय. ऑगस्ट महिन्यात उन्हाळ्यात सुरुवात केली जायला. फारच छान वाटतं. आता काही दिवसातच बर्फ सुरु होऊन तापमान शून्याच्या जवळपास गेले की सायकल चालवणे बंद होईल.
18 Nov 2015 - 12:55 am | बॅटमॅन
अरे एक नंबर सरजी. मीही सायकलप्रेमी. लय मस्त वाटलं वाचून.
18 Nov 2015 - 10:44 am | मित्रहो
आवडली. आता परत सायकल चालवायला सुरवात केलीय. बिना गिअरचीच सायकल. महीना झालाय. फक्त एकदाच अठरा किलोमीटर चालविली. लांब अंतर जायची हिम्मत होत नाही. काही काळजी घ्यावी,काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असेल तर तेही सांगावे.