सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
21 Dec 2015 - 2:37 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

नव्या रस्त्यांवरील राईडस

२०१४ च्या फेब्रुवारीमध्ये फक्त दोनच राईडस झाल्या- ११२ आणि ९३ किलोमीटरच्या. पण आता हळु हळु जाणीव झाली की, नियमित सायकल चालवायला हवी. मार्चमध्ये काही दिवस चाकणला राहणं झालं. तिथे सायकल घेऊनच गेलो. त्या दिवसांमध्ये बरीच सायकल चालवली आणि नवीन रस्ते चाकांखाली घातले. पुण्यातून डिएसके विश्वमधून निघण्याआधी दोनदा डिएसके चढ केला. आता अशा चढाची चांगली सवय झाली आहे. त्याच दिवशी पुण्यातून चाकणला गेलो. रस्ता एका घाटातून जाणारा होता- विश्रांतवाडी- आळंदी- चाकण. विश्रांतवाडीजवळ मिलिटरीचे अनेक युनिटस आहेत- बाँबे सॅपिअर्स, मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज आणि इतर. मिलिटरीच्या परिसरातून जाताना वेगळीच प्रेरणा मिळते! लवकरच लदाख़मध्ये सायकल चालवण्याचा विचार करतोय. मिलिटरीचे जवान बघून उत्साह वाढतो! आळंदीनंतरचा घाट छोटाच पण अगदी रमणीय आहे. जेमतेम अडीच किलोमीटर लांब आणि हलका चढ आहे. पण परिसर अगदी सुंदर आणि विशेष म्हणाजे ह्या रोडवर वाहतुक कमीच असते. सायकल चालवणा-यांसाठी ट्रॅफिकची अडचण मोठी. हायवेजवर रस्ता चांगला असला तरी ट्रॅफिकचं दडपण असतं. पण अशा शांत रस्त्यांवर खूप मजा येते. अगदी सहज पन्नास किलोमीटर झाले आणि चाकणला पोहचलो.

आता शक्यतो रोज सायकल चालवायची आहे. चाकणच्या जवळ सायकलवर बघण्यासारखं खूप आहे. इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. आज ट्रेकिंग आणि सायकलिंगची अगदी सुंदर माहिती इंटरनेटवर मिळते. त्यामुळे कुठे जायचं, हा मुद्दाच नाहीय. दुस-या दिवशी ३ मार्चला चाकणचा किल्ला, चक्रेश्वर मंदीर आणि एक गुरुद्वारा बघितला. ही राईड छोटीच झाली- ११ किलोमीटर. पण त्यामध्ये बरंच बघायला मिळालं. इतिहासात वाचलेल्या चाकणच्या किल्ल्याच्या लढाईमधले फिरंगोजी नरसाळे! हा भुईकोट किल्ला आहे. आज जेमतेम थोडे अवशेष शिल्लक आहेत. . . पूर्वी हे स्थान महत्त्वाचं होतं. नक्कीच चक्रेश्वर मंदीरामुळेच ह्याला 'चाकण' नाव मिळालं असणार. आज इथे इंडस्ट्रियल व नव्या रेसिडंशिअल एरियाजचं मोठं सेंटर आहे. असो.


चक्रेश्वर मंदीर


चाकणचा किल्ला


फिरंगोजी नरसाळेंच्या पराक्रमाचा साक्षीदार. .

ह्या ब्लॉगवर थोडी माहिती घेतली तेव्हा भंडारा डोंगराची माहिती मिळाली. दुस-या दिवशी भंडारा डोंगर आणि इंदुरी गावाची योजना बनवली. कॉलेजच्या दिवसांमध्ये इंदुरी गावाजवळ फिल्ड वर्कला यायचो. ती आठवण ताजी झाली. भंडारा डोंगरावर संत तुकारामांनी त्यांची गाथा लिहिली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात निघालो. माझ्या ठिकाणापासून जेमतेम चौदा किलोमीटरवर भंडारा डोंगर आहे. दहा किलोमीटरनंतर चढ सुरू झाला. आज हे मान्यताप्राप्त तीर्थस्थान असल्यामुळे रस्ता अगदी सुंदर बनवला आहे. सायकलस्वारांसाठी हे सरावाचं आदर्श ठिकाण आहे. सुमारे तीन किलोमीटरचा छोटा घाट आहे. सरावाला एकदम छान आहे. अगदी निर्जन रस्ता आणि सुंदर नजारे! हा चार ग्रेडचा म्हणजे लहान ते मध्यम दर्जाचा घाट आहे. चढताना अजिबात अडचण आली नाही. फक्त मध्ये मध्ये श्वास घेण्यासाठी क्षणभर विश्रांती घ्यावी लागली! वर चढतानाच सुंदर दृश्ये दिसू लागतात! वर पोहचल्यावर मागे जाधववाडी डॅम दिसतो. थोडा वेळ मंदीराचं दर्शन घेतलं आणि परत निघालो.


मागे वळून बघितल्यानंतर

आता इंदुरीचा किल्ला बघायचा आहे. इंदुरी भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून जेमतेम पाच किलोमीटर असेल. हासुद्धा भुईकोट किल्ला आहे आणि आज त्याचीसुद्धा दशा बरी नाही. आपल्या सिस्टीममध्ये ऐतिहासिक ठिकाणांना आज 'स्थान' कुठे आहे? किती लोक अशा जागांमध्ये रस घेतात? आणि सरकारलाही अशा स्थानांची देखभाल करून काय मिळेल? पण जर थोडं आजूबाजूला बघितलं तर फ्रान्ससारख्या देशामध्ये तिथल्या नागरिकांना त्यांच्या प्रत्येक वास्तुची खडान् खडा माहिती असते. असो. . . परतीचा प्रवास आरामात झाला. आता अशा तीस- चाळीस किलोमीटरच्या राईडची शरीराला चांगलीच सवय झाली आहे. ऊन वाढण्याआधी परतलो. आता अशा आणखी रस्त्यांवर राईड करायची आहे.


शाहू महाराजांचे सेनापती- खंडेराव दाभाडेंचा इंदुरी किल्ला


खंडेराव दाभाडेंना देण्यात आलेलं वतन- तळी असलेलं गाव- आजचं तळेगांव दाभाडे!


इंद्रायणी नदी आणि मागे दूर तळेगांव


भंडारा डोंगराचं एलेव्हेशन


भंडारा डोंगराचा रूट मॅप

पुढील भाग १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासक्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

21 Dec 2015 - 3:29 pm | एस

मस्त!

बाबा योगिराज's picture

21 Dec 2015 - 11:35 pm | बाबा योगिराज

क्या बात, क्या बात, क्या बात.
वाह मस्त लेख. फ़ोटू पण आवडले.
आता खरच सायकल घ्याविशि वाटायला लागलै.

सध्या सायकल स्वारीचे काय प्रयोग सुरु आहेत ते सुद्धा येऊ द्या नंतर.
पुलेशु. पुभाप्र.

योगी बाबा.

बोका-ए-आझम's picture

22 Dec 2015 - 1:06 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

मित्रहो's picture

22 Dec 2015 - 10:03 pm | मित्रहो

सुंदर लेखमाला