नवरात्र जल जागर : माळ सातवी

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 9:14 am

==================================================================

नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...

==================================================================

थेट राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळावरून साभार. नक्की कशी योजना आहे याचा अंदाज येण्यासाठी

राज्य सरकार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शाश्वत सिंचन आणि पाणी टंचाईसाठी जलसंधारणाच्या 28 निरनिराळ्या योजना एकत्रित करुन राबवीत आहे. यात प्रामुख्याने अण्णा हजारे यांचा राळेगण पॅटर्न, शिरपूर पॅटर्न, हिवरेबाजार पॅटर्न आदिचा समावेश केलेला. यावर्षी राज्यात 6202 गावांची निवड करुन जलसंधारणाची 64234 विविध कामे केली जात आहेत. जलयुक्त शिवारासाठी शासन एक हजार कोटी खर्च करीत आहे. या अभियानाची उपयुक्तता पाहून लोकसहभाग मिळत असून अनेक गावे पुढाकार घेत आहेत. शाश्वत पाण्याच्या लोकचळवळीत ज्या गावात या अभियानाची कामे झाली, तेथे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीला 10 टक्के निधी राखून ठेवण्याच्या सूचना केल्याने प्रत्येक जिल्ह्यात जलसंधारणाची आणखी कामे होतील. या अभियानांतर्गत गाव निवडीच्या निकषात पाणलोट, कोरडवाहू शेती अभियान, टॅंकरग्रस्त गावे, अतिशोषिक गावे याचा समावेश करण्याचे निर्देश असले तरी कांही कामे लोकानुनयास्तव लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव घेतल्याचेही दिसून येते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात निकषानुसार कामे झाली तर अभियानाची उपयुक्तता अधिक प्रभावीपणे दिसून येईल. नाल्याचे सरळीकरण आणि खोलीकरण करुन बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी जलस्वराज्य कार्यक्रमांतर्गत सिमेंट बंधाऱ्यासह जलसंधारणाची अनेक कामे झाली असून जलसाठे निर्माण झाले आहेत. यातील पाणीसाठा कोरडवाहू शेतकरी भूमिपुत्राला उभारी देणारा, शाश्वत करणारा आणि शेतीला संजीवनी देणारा आहे.

-पुंजाजी खडसे
नागपूर (9423628707)

आजच्या माळेतील श्री सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा, 8275391382 यांच्याशी झालेला दूरध्वनी वार्तालापाचा गोषवारा:

श्री शिंदे अगदी तरूण वयाचे असून (२७) तडफदार व धडाडीने काम करण्याची जिद्द असलेले कृषी अधिकारी आहेत.
रांजणगाव (ता. नेवासा) येथील जलयुक्त शिवार या महत्त्वाकांशी योजनेचा त्यांच्याच शब्दात अनुभवः

"मुळात रांजणगाव हे क्षेत्र धरण कमान क्षेत्रात येते (सुमारे १२५ गावे) त्या मुळे १९७० पसून ते २०१० पर्यंत पाणी टंचाईचे भयाण वास्तव या परिसराला फारसे जाणवले नाही.परंतु त्यांनतर म्हणजेच २०१० नंतर पावसाची अनियमीतता आणि अनिश्चीतता याचा एकत्रीत परिणाम पाणी टंचाई तीव्रतीने वाढून खरिपातील पिकेही मिळण्याची मारामार होऊ लागली.
याच पार्श्वभूमीवर डिसेंबर ५ २०१४ ला शासनाचा जी आर निघाला जलयुक्त शिवार या योजनेचा.आपल्याला माहीतेच आहे की ग्रामीण भागात शेतीसंबंधी आणि पाण लोट कामासाठी वेगवेगळे विभाग त्यांच्या योजनांमार्फत काम करीत असतात. त्यात प्रामुख्याने लघुसिंचन विभाग्,सामाजीक वनीकरण विभाग्,लघु पाटबंधारे विभाग्,जिल्हापरिषद,इत्यादी यंत्राअचा समावेश आहे. पण त्यांच्या योजनांचे सुसूत्रीकरण आणि योग्य नियोजन जलयुक्त शिवार अभियानानात केले गेले आहे.
रांजणगाव (ता. नेवासा) ला लाभलेल्या सुमारी सुमारे ४० एकर क्षेत्रामध्ये केलेल्या पाणी अडविणे आणि तिथेच जिरविणे याचे फार चांगले परिणाम दिसत आहेत. वनक्षेत्रातील झाडे तग धरू लागली आहेत आणि जमीनीची धूप थांबून लगतच्या बंधार्यातील गाळ येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.परिसरात पाऊस अत्यल्प आणि तोही शेवटच्या टप्प्यात (सप्टेंबर शेवटचा आठवडा व आक्टो पहिला आठवड्यातील काही दिवस) पडून ही पाणी आडवू शकलो.
या पूर्वी पाऊस पडणारा पाउस आणि आत्ता गेल्या ४-५ वर्षात पडणार्या पावसाचे प्रमाण (सरासरी) ५०० ते ५३५ असले तरी पाणी टंचाई का याचे उत्तर शोधायचे झाले तर एक उदाहरण देतो. जसे दिवसभरात वापराला लागणारे पाणी जर चार बादली असेल आणि ते एकदम तुम्हाला मिळाले पण तुमची साठवण क्षमता फक्त एक बादलीची असेल तर उर्वरीत ३ तीन बादली पाणी मोरीवाटे निघून जाईल.
त्याच प्रकारे पूर्वी पाऊस सुमारे ४५ (पंचेचाळीस दिवसांत टप्प्या टप्प्यात) पडत असे सध्या तेइतकाच पाऊस १५ दिवसांत पडतो पण साठवण क्षमता तोकडी असल्याने जास्तीचे पाणी वाया जाते जे आता लोकांना समजू लागले आहे.लोकांना पाणी बचतीचे महत्व समजू लागले आहे. एक एकर हरबरा पीकाला जर एक सेमी (एक लाख लीटर०) पाणी पारंपारीक पद्धातीने लागत असेल तर तेव्हढ्याच पीकाला ठिबक सिंचन द्वारे फक्त ३००००-३५००० लीटर पाणे पुरेसे असते.

जलयुक्त शिवार उपक्रमातून रांजणगाव निघाले टॅंकरमुक्तीकडे

नगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. नेवासा) या गावात लोकसहभागातून "जलयुक्त शिवार'ची कामे करण्यात आली. आता ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसानंतर गावाच्या परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाल्याचे आढळले. त्यामुळे या वर्षी हे गाव "टॅंकरमुक्त' होऊ घातले आहे. चाऱ्यांची उपलब्धता वाढल्याने दुग्धव्यवसायाच्या आशा वाढल्या आहेत.
संदीप नवले

रांजणगाव (ता. नेवासा, जि. नगर) हे नगर-औरंगाबाद महमार्गापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या गावात बहुतांशी जिरायती शेती होते. खरिपातील पिकांवरच त्यांचा भर. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून खरिपातील पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणीची स्थिती उभी राहिली होती. या गावाची निवड जलयुक्त शिवार या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाच्या वतीने झाल्यानंतर मात्र चित्र बदलले.

गावाची परिस्थिती :
रांजणगावचे क्षेत्रफळ साधारणपणे दोन हजार हेक्‍टर आहे. परिसरातील पर्जन्यमान सरासरी 414 मिलिमीटर एवढे असले तरी प्रत्यक्षात गावामध्ये त्यापेक्षाही कमी पाऊस पडतो. आधीच बहुतांश विहीर बागायत असलेल्या गावात बागायती क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. केवळ 270 हेक्‍टर क्षेत्र बागायतीखाली राहिले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना खरिपातील एकाच पिकांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यातही पावसाची अनियमितता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणते. ही दूर्दशा कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने पुढाकार घेतला. त्याला गावातील नागरिकांनीही साथ दिल्याने पाणलोटाची कामे सुरू झाली.

"जलयुक्त शिवार'च्या कामास सुरवात :
गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी कृषी विभागाने रांजणगावची जलयुक्त शिवार अभियानातून निवड केली. त्यानंतर गावातील माजी सरपंच सोपान चौधरी, सरपंच रावसाहेब पेहरे, चेअरमन आबासाहेब पेहरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांसह कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक सी. एस. सुरडे, कृषी सहायक भाऊसाहेब ठुबे यांनी पाणलोटाच्या कामांना सुरवात केली. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान जमिनीवर माती नाला बांध, कंपार्टमेन्ट बंडिंग, शेततळे, विहीर पुनर्भरण, सलग समतल चर अशी विविध कामे करण्यात आली. यातील सुमारे 377 हेक्‍टरवर कंपार्टमेन्ट बंडिंगचे कामे केली, तर वीस हेक्‍टर क्षेत्रावर सलग समतल चराची कामे केली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या सर्व बंधाऱ्यामध्ये पाणी अडवले व साठवले गेले. त्याचा लाभ परिसरातील सुमारे 350 विहिरी आणि 250 बोअरवेलला झाला. त्यातून सुमारे 400 ते 500 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

लोकसहभागातून गाळ उपसला :
कृषी विभागाच्या माध्यमातून झालेल्या कामाचा चांगला परिणाम लोकांच्या लक्षात आल्याने पुढील कामांना हुरूप आला. त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीनही माती नाला बांधातील गाळ उपसण्याचा निर्णय घेतला. तीन ते चार महिने गावकऱ्यांनी गाळ उपसण्याचे काम केले. तिन्ही नाला बांधातील सुमारे 2690 घनमीटर एवढा गाळ उपसण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्याने सुपिकतेमध्येही वाढ झाली. त्याचाही पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅंकरमुक्तीकडे सुरू आहे गावाची वाटचाल :
गावात सलग तीन वर्षांपासून टॅंकरने नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होता. परंतु यंदा झालेल्या सर्व कामांमुळे गावात सुमारे 414 टीसीएम पाणीसाठा होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या वर्षी गावामध्ये पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे सर्वांचेच मत पडले आहे. थोडक्‍यात, गावाची टॅंकरमुक्ततेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

चाऱ्याचा प्रश्न सुटला :
गावामध्ये सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्र पडीक असे. पाण्याच्या कमतरतेमुळे तिथे गवतही नसे. मात्र, या वर्षी झालेल्या पाणलोटाच्या कामांमुळे पाणी अडले असून, ओलाव्यामुळे गवतही चांगले वाढू लागले आहे. सध्या गावात दीड हजार जनावरे आणि एक हजार शेळ्या, मेंढ्या आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्‍न काही अंशी सुटला आहे. त्याचप्रमाणे जनावरांसाठी म्हणून अनेक शेतकऱ्यांनी चारा पिकेही घेतली आहेत. पूर्वी जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता हीच प्रमुख समस्या असल्याने दुग्धव्यवसायाकडे आर्थिक साधन म्हणून फारसे पाहिले जात नसे. मात्र, या वर्षी कृषी विभागाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना चारा पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आले. त्यांनी चाऱ्यासाठी योग्य अशा बाजरी, मका, ज्वारी यांचे बियाणे दिले आहे. त्यामुळे चाऱ्याच्या क्षेत्रातही वाढ होत आहे.

गावात दरवर्षीच पाणीटंचाई भासत होती. ती कमी करण्यासाठी कृषी विभाग आणि लोकसहभागाच्या माध्यमातून विविध कामे हाती घेतली. त्याचा परिणाम पहिल्याच पावसानंतर दिसून आला. आता गावातील शेतकऱ्यांना रब्बीचे पिके घेता येऊ शकेल.
- रावसाहेब पेहरे, सरपंच, 9921209690

दरवर्षी पाऊस झाला की पावसाचे पाणी वाहून जायचे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवायची. परंतु यंदा झालेल्या कामामुळे वाहून जाणारे मोठ्या प्रमाणातील पाणी अडवले जाईल. त्याचा फायदा विहिरींना होणार आहे.
- आबासाहेब पेहरे, चेअरमन.

"नगरेचि रचावी। जलाशये निर्मावी ।
महावने लावावी । नानाविध ।।' या ज्ञानेश्‍वरांच्या ओवीप्रमाणे गावाचे पाणी गावानेच जमवले पाहिजे. जलाशये निर्माण करावी, पाऊस पडण्यासाठी वेगवेगळी झाडे लावावीत. या उपदेशाचे अनुकरण गावातील नागरिकांनी केले आहे.
- ह.भ.प. रामभाऊ पेहरे महाराज, ज्ञानेश्वर संस्थान, नेवासा, 9975979818

रांजणगावात राबवलेल्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांशी योजनेचा दृष्य परिणाम या वर्षी ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर दिसून आला. सध्या जलसंधारणाच्या कामामध्ये पाणी जिरले असून, विहिरीच्या पाणी पातळीत वाढ दिसत आहे. त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा, 8275391382

जलयुक्त शिवार अभियानाने हे साधले
- पीक पद्धती बदलली : चारापिके, कपाशी, भाजीपाल्याखालील क्षेत्रात वाढ झाली.
- विहिरीची पाणीपातळी वाढली
- गाळाचा वापर केल्याने जमिनीमध्ये सुधारणा झाली. पडीक जमीन सुपीक झाली
- शेतीपूरक दूग्धव्यवसायांना चालना.
- सूक्ष्म सिंचनाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल.

मिपा परिवारचे वतीने मी सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा, अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेतच तुम्हीही द्या ही आग्रहाची विनंती. संपर्क क्रमांक 8275391382

समाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

नगर जिल्ह्यातही जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या उत्साहात सुरू आहेत हे पाहून आनंद झाला.

ही लेखमाला केवळ नवरात्रीपुरतीच न ठेवता नंतरही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात या योजनेने कसा बदल घडवला ह्यावर शक्य असेल तर लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2015 - 1:50 am | डॉ सुहास म्हात्रे

नाखुसाहेब,

या लेखमालेच्या निमित्ताने तुम्ही गाव पातळीवर चाललेले बरेच काम मिपाकरांसमोर आणत आहात. हे केवळ स्पृहणिय आहेच. यावर अजून वाचायला आवडेल.

पुढची पायरी म्हणून, या सर्व लेखांचा गोषवारा करून एखाद्या मोठ्या वाचकसंख्या असलेल्या नियतकालिकात प्रसिद्ध केल्यास ते अजून खूप मोठ्या लोकसंख्यपर्यंत पोहोचू शकेल. कारण सर्वसाधारणपणे अश्या पायाभूत कामाला पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही असेच दिसते.

पैसा's picture

20 Oct 2015 - 4:55 pm | पैसा

मस्त अगदी नियमित चांगल्या बातम्या देताय!