ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
9 Jan 2008 - 3:04 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..५(अ)

ओऽसाका

'ओसाका' नावाशी भारतात असल्यापासूनच ओळख झाली होती.जपानला कोठे जाणार आहात? या प्रश्नाचे उत्तर सान नो मिया-ओसाका असे देऊन देऊन कागदोपत्री ओळख झाली होतीच.जपानचे पहिले हवाई दर्शनही ओसाकाच होते,आणि 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला..' अशी अवस्था ओसाकाने केली होती की विमान जमिनीवर आले तरी अस्मादिकांना हवेतून खाली यायला अंमळ वेळच लागला होता.आल्याच्या दुसर्‍याच दिवशी नांबा ला गेलो होतो तेही ओसाकाहूनच,निहोंबाशीला गेलो तेही ओसाकाहूनच,नाराला जातानाही ओसाकाहूनच गाडी पकडली आणि माऊंट फुजीला जाणारी बसही ओसाकाहूनच सुटणार होती.थोडक्यात आपल्या दादर, चर्चगेट सारखे हे मोक्याचे स्टेशन आहे.

ओसाका मधील ओ थोडा लांबवून किंचित हेलकावा देऊन म्हणतात.'ओऽऽसाका देस्'अशी उद्घोषणा कानाला मोठी गोड वाटते. स्टेशनच्या बाहेरच योदोबाशी ही ७ मजली भव्य शो रुम आहे.जपानच्या सुपरटेक्नॉलॉजीचं प्रदर्शनच तिथे मांडले आहे जणू!कॅमेर्‍यांचे अनंत प्रकार,लॉपटॉप्स,काँप्युटर्स, टीव्ही,स्टीरीओ सिस्टीम्स्,सीडीप्लेअर्स,वॉकमन्स एक ना दोन...वेगवेगळ्या नामवंत कंपन्यांची उत्तमोत्तम मॉडेले.. काय नाही तिथे? डोळे अक्षरशः दिपतात. अलिबाबाला गुहेत शिरल्यावर असेच वाटले असेल नाही!

ओऽसाकामध्ये असलेले ३०० मी. उंच टेंपोझान म्हणजे जायंट व्हील पहिल्याच दिवशी बसमधून घरी जाताना दिसले होते. त्याची जगातील सर्वात मोठे जायंट व्हील अशी ख्याती आहे.(मोठे जायंट व्हील= द्विरुक्ती झाली ! पण खरचच ते अतिभव्य आहे.विएन्नाच्या जायंट व्हीलमध्ये बसल्यावर सारखे ओसाकाचे टेंपोझान आठवत होते.)त्यात बसून आजूबाजूचा परिसर पाहता येतो.अतिशय धीम्या गतीने ते आपल्याला आकाशात नेते.काचेने पूर्ण बंदिस्त पाळण्यात बसून आपण बाहेर पाहत,उंचीचा अंदाज घेत असतानाच उद्घोषणा होते.डाव्या बाजूला पहा- कानसाई विमानतळ,जपानचे ट्विन टॉवर्स पहा, पूर्वेकडे आवाजी आयलंड आहेत त्यांच्याकडे नजर टाका आणि नजारा पहा..अशा सूचनांनी आपण नक्की काय पाहतो आहोत ते समजतेच पण त्या पाळण्यांमध्ये चारही बाजूंना नकाशे,चित्र काढून नावेही लिहिलेली आहेत. ह्या टेंपोझानच्या पायथ्याशी आहे काययुकान,जपानमधील सर्वात मोठे आणि प्रसिध्द मत्स्यालय! काचेच्या ७ ते ९ मीटर खोल खोल्यांमध्ये मोठमोठे व्हेल्स,शार्क्स,डॉल्फिन्स आहेत.त्यांना विहार करायला मुक्त जागा असल्याने काचेच्या पेटीत बंदिस्त केलेले बापुडवाणे मासे नाही वाटत ते.एका ठिकाणी पाण्याची संततधार चालू होती आणि डॉलफिन्स तेथे जाऊन 'आ' करून पाणी पित होते.त्यांच्या शेजारीच पेंग्विन्स साठी खास शीतालय होते.भुरभुरणारे हिम पेंग्विन्सना 'घराचा फिल' आणत होते.पोहोताना पेंग्विन साधारण बदकासारखाच दिसतो तर पाण्याखालून पोहोताना त्याचा चक्क मासाच होतो.

अतिशय नैसर्गिक वातावरणाचा आभास निर्माण करून अनंत प्रकारचे जलचर येथे ठेवले आहेत.मोठमोठ्या व्हेल्स पासून अगदी पिटुकल्या माशांपर्यंत सारे येथे नांदतात.फुग्यांच्या आकाराचे मासे,केशरी,सोनेरी,जांभळे,झेब्र्यासारखे पट्टे असलेले मासे,तोंडात दोन्ही बाजूला रसगुल्ले ठेवून गाल टम्म फुगलेले असावेत असे खोडकर मुलासारखे मासे,कोंबड्यासारखा तुरा असणारे ऐटबाज मासे,ठिपक्याठिपक्यांचा फ्रॉकच जणू घातलेले मासे,जेलीफिशचे अनेक प्रकार्,ऑक्टोपस्,चिंबोर्‍यांपासून राक्षसी म्हणता येतील अशा खेकड्यांचे अनेक प्रकार,सी वॉलरस,सी उटर्स,इल मासे,पेंग्वीन्स,बदकं,अगदी चिमुकल्या कासवांपासून महाकाय कासवांपर्यंत अनेकविध कासवे..काय नव्हतं तिथे?सारी जलसृष्टी आपल्यापासून फक्त एका काचेच्या अंतरावर होती.

जपानमध्ये मुख्य ९ कॅसल्स आहेत,ओऽसाका ज्यू म्हणजे ओऽसाका कॅसल ह्या मुख्य ९ पैकी एक. इस. १४९६ मध्ये जोदो- शिनयु ह्या बौध्द धर्मगुरुने सध्या असलेल्या किल्ल्याजवळ एक मंदिर बांधले.सन १५८३ मध्ये हिदेयोशी तोयोगामी नावाच्या सरदाराने ओऽसाकावर कब्जा केला आणि ह्या मंदिराजवळच एक मोठा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि अत्यंत मजबूत आणि सुंदर असा ओसाका ज्यू उभा राहिला.परंतु इस १६१७ च्या एका लढाईत हा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्थ झाला,आगीचे भक्ष्य बनला.१६२० मध्ये शोगुन हिदेतादा तोकुगावाने ओसाका काबीज केले आणि हा किल्ला पुन्हा बांधायला सुरुवात केली.तो पूर्ण व्हायला ९ वर्षे लागली.पण ह्या किल्ल्याच्या मुख्य मनोर्‍यावर वीज पडली आणि तो जळून खाक झाला. नंतर १९३१ मध्ये ,इतक्या शतकांनतर तो पुन्हा बांधला आनि असा मजबूत की भूकंपाला टक्कर देत तो आजही उभा आहे.पण हा झाला सगळा पुस्तकी इतिहास! आपण आत शिरलो की वर्तमानाशी नातं तुटतं आणि आपण इतिहासातच शिरतो.भव्य दालनांमध्ये पुरातन वस्तू अतिशय कलात्मकतेने जपून ठेवल्या आहेत. एका दालनात पूर्ण भिंतभर पडद्यावर हा सारा इतिहास चित्ररुपात सतत दाखवला जातो.ती सांस्कृतिक जपणूक पहाताना किती वेळ गेला कळलंच नाही.

आम्ही तेथे गेलो त्या दिवशी हानाबी होता. हानाबी म्हणजे समर फेस्टिवल.उन्हाळ्यात संध्याकाळपासून उत्तररात्रीपर्यंत भरपूर आतशबाजी करतात.मनोरम,रंगीबेरंगी आतशबाजी खरोखरच पाहण्यासारखी असते.आकाशात रंगीत,लखलखती प्रकाशफुलं असतात तर जमिनीवरही आकर्षक रंगांचे पारंपरिक युकाता,किमोनो घातलेल्या ,पारंपरिक केशरचना केलेल्या पर्‍या चिवचिवत असतात.उन्हाळ्यामुळे हातातले ते प्रसिध्द जपानी पंखे,उचिवा आणि सेन्सु फडफडत असतात.मोकळ्या अंगणात आपल्या भेळपुरी,वडापावच्या गाड्यांसारख्या गाड्या लागलेल्या असतात. नूडल्स्,सूपं,मोमो,तेंपुरा( एक प्रकारची भजीच ही!) अशा पदार्थांचे ठेले असतात,इतकेच काय बर्फाचे गोळे आणि बुढ्ढीके बाल सुध्दा असतात.(बुढ्ढीके बाल जर्मन जत्रेतही असतात)अमाप उत्साहात गर्दी हानाबी पहाण्यासाठी जमते.त्याच उत्साहाचा एक थेंब बनून आम्हीही हानाबीची ती प्रकाशफुलं वेचत राहिलो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 6:46 pm | इनोबा म्हणे

तुझी वर्णनशैली खुप आवडली,पण सर्वात जास्त काही आवडले असेल तर जपानचे दर्शन घडवणारी ही सुंदर छायाचित्रे.तु एक उत्तम छायाचित्रकार आहेस.धन्यवाद!

सायोनारा...-इनोबा

मनीष पाठक's picture

9 Jan 2008 - 5:17 pm | मनीष पाठक

मी ही हेच म्हणतो. बाकी लेख सुन्दरच.

मनीष पाठक

ऋषिकेश's picture

10 Jan 2008 - 12:30 am | ऋषिकेश

वा! मस्त लेख!.. तुमची शैली वर्णनात्मक असल्याने मला ही ओळख रंजक वाटली. त्यातही काहि वर्णने अतिशय चित्रदर्शी आहेतजसे:
हानाबीची प्रकाशफुलं , चिवचिवणार्‍या पर्‍या , 'आ' करून पाणी पिणारे डॉलफिन :)
पु. ले. शु.

-ऋषिकेश

प्राजु's picture

10 Jan 2008 - 12:56 am | प्राजु

लेख खूप छन आणि चित्रदर्शि आहे.छायाचित्रेहि छान.

- प्राजु.

स्वाती राजेश's picture

10 Jan 2008 - 1:32 am | स्वाती राजेश

लेख खुपच छान लिहीला आहे.
सोबतची छायाचित्रे सुंदर आहेत.

सहज's picture

10 Jan 2008 - 7:58 am | सहज

चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!!

तुमच्या लेखातुन जपान मधे नवे तसेच जुने यांचे अतिशय चांगले मिश्रण आहे ते कळते. आपल्याकडे काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर जुन्या गोष्टिंकडे खूप दुर्लक्ष होते त्याचे वाईट वाटते.

परदेशात पर्यटनातील महत्वाच्या सोयी म्हणजे
१) जाण्या-येण्याचा मार्ग, बससुवीधा इ. अश्या की म्हातारी माणसे, लहान मुले, अपंग (व्हीलचेयर, अंध)माणसे देखील बर्‍याच ठीकाणी फार त्रास न होता जाउ येऊ शकतात.
२) परत तिथे गेल्यावर फक्त माहिती बोर्ड किंवा "राजू गाईड" इतकेच नाही तर स्वातीताईंनी वर सांगीतल्याप्रमाणे दृकश्राव्य फिती, हेड फोन्स, जे पर्यटक प्रामुख्याने ज्या भागातुन येतात त्यांच्या भाषेत माहीती देणारे असतात. स्विर्झलंडमधे काही ठिकाणी हिंदीमधे पाट्या आहेत. :-)
३) खाणे-पिणे व सर्वात महत्वाचे स्वच्छ्तागॄहाची सोय!

भारतात जिथे जिथे अश्या सोयी आहेत तिथे पर्यटन नक्किच वाढले आहे. आशी आशा आहे की (निदान यापुढे १० वर्षानी) ह्या सुंदर लेखमालेसारखेच बरेच परदेशी पर्यटक भारतातल्या वेगवेगळ्या (दर्जात्मक) सहलीबद्दल सातत्याने लिहतील.

विसोबा खेचर's picture

10 Jan 2008 - 10:09 am | विसोबा खेचर

चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!!

हेच म्हणतो...!

स्वाती, खरंच सुंदर लिहिलं आहेस..

'वाचताना प्रसन्न वाटले' या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत...

चित्रं क्लासच आहेत!

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jan 2008 - 8:06 am | llपुण्याचे पेशवेll

स्वाती,
आपले लेखन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. जपान सारख्या देशाबद्दल पुलं नन्तर आपले लिखाण आम्हास रुचले. धन्यवाद.
ध.अ.मिराशी

प्रमोद देव's picture

10 Jan 2008 - 8:39 am | प्रमोद देव

चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय.
वाचताना प्रसन्न वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2008 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय.
वाचताना प्रसन्न वाटते.

सहमत !!!
अशी लिहिण्याची शैली आम्हाला असती तर, आम्हीही फार मोठे साहित्यिक झालो असतो !
बाकी, बुढ्ढीके बाल तिकडेही मिळते हे वाचून बरे वाटले.....!!!
येऊ द्या पुढील भाग लवकर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

10 Jan 2008 - 9:52 am | बेसनलाडू

चित्रे आणि वर्णन दोन्ही!
(वाचक)बेसनलाडू

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jan 2008 - 8:33 pm | ब्रिटिश टिंग्या

फोटो फार अल्टी आलेत.....आणि लेखही तेवढाच सुरेख आहे.
तोत्तेमो योकात्ता......

आपला,
(थोडेफार जपानी येणारा) छोटी टिंगी

सुधीर कांदळकर's picture

10 Jan 2008 - 8:51 pm | सुधीर कांदळकर

खाल्ले की नाही? की खाल्ल्याचे लपवून ठेवले? की चोरून खाले? पाण्यातील प्राण्यांचे वर्णन खासच. बालसुलभ उत्साहाने आणि कुतुहलाने लिहिले आहे. म्हणून विचारले. मला सानियाच्या ओमियागे मध्ये क्योतोचे जे मनोवेधक वर्णन आहे. त्याची आठवण झाली.

पुलेशु.

नंदन's picture

12 Jan 2008 - 2:05 pm | नंदन

वर्णन, लेखनाची शैली आणि छायाचित्रे सुरेख. पूर्वरंग मध्ये ओसाकाचा उच्चार थोडा दाक्षिणात्य पद्धतीचा हेल देऊन करतात हे वाचल्याचं आठवत होतं. [ बाकी गाल फुगवलेल्या माशाचा फोटो छान आलाय. बराचसा निमो सारखा :)]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

स्वाती दिनेश's picture

14 Jan 2008 - 8:02 pm | स्वाती दिनेश

चित्रांचे कसब स्वातीचे नाही,दिनेशचे,:)
विनायक,मनिष,ऋषिकेश,प्राजु,स्वाती,सहजराव,तात्या,धनंजय,डॉ.साहेब,प्रमोदकाका,बे.ला,छोटी टिंगी,सुधीर,नंदन
सर्वांना मनापासून धन्यवाद,
स्वाती

इनोबा म्हणे's picture

15 Jan 2008 - 1:04 am | इनोबा म्हणे

दिनेशराव म्हणजे तुमचे 'अहो' का?

(नको तिथे 'नाक' खुपसणारा) -इनोबा

स्वाती दिनेश's picture

15 Jan 2008 - 12:30 pm | स्वाती दिनेश

दिनेशराव म्हणजे तुमचे 'अहो' का?
हो
मिपावरील 'दिनेश', 'दिनेश ५७' नाही :)
स्वाती