ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१६

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
23 Jun 2009 - 12:15 am

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१५

फुजीसान!

आपल्याकडे कसं म्हणतात ना," काशीस जावे नित्य वदावे.." तसे जपानी म्हणत असावेत "फुजीस जावे नित्य वदावे.."
अशा ह्या समग्र जपानच्या लाडक्या फुजीसानला भेटायचेच हे मनोमनी ठरलेलंच होतं आणि त्या दृष्टीने तयारी सुरु केली. त्यात जून महिन्यात हा निद्रिस्त ज्वालामुखी जागा होऊन लाव्हा वाहू लागल्याच्या बातम्या ऐकल्यावर तेथे एकदा तरी जाण्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली. "फुजी चा ट्रेक अगदी साधा सोपा आहे ,तुम्ही जाऊन याच, खूप आवडेल तुम्हाला,जुलै नंतर फुजीसान पर्यटकांसाठी खुला होतो.", इति फुजितासान! आणि तिने एका जपानी केसरी/ सचिन/ चितारी बरोबर गाठ घालून दिली आणि आमच्या वतीने नावनोंदणीही करुन टाकली. इंग्रजी येणारे वाटाड्ये आहेत त्यांच्या सहलीत, ही माहितीही पुरवली. आम्ही राहत होतो कोबे मध्ये, तेथून बसने फुजीयामाला जायचे तर ६ ,७ तास सहजच लागतात. ही काही रमतगमत करायची सहल नव्हती तर शनिवारी सकाळी ७वाजता ओऽसाकाहून निघायचे होते आणि रविवारी रात्री परत. जपानमध्ये कुठेही हिंडायचे की आपली डबाबाटली सोबत हवीच. बाहेर जेवायचे झाले तर कोरडा भात, त्यावर कच्च्या माशाचा तुकडा, बांबूचे तुकडे,मशरुम्स ,समुद्री भाज्या असले काहीतरी घातलेल्या, उग्र वासाच्या न्यूडल्स कसल्या तरी सॉसांबरोबर खायच्या ही कल्पनाच सहन न होऊन दोन दिवसांचे जेवण आणि इतर खाणे आदल्या दिवशी रांधायला सुरुवात केली. २,३ प्रकारचे पराठे,पुलाव,ब्रेड,केक,बिस्किटं,फळं,पाण्याच्या ,लिंबूपाणी,कोकच्या बाटल्या , चॉकलेट्स असं सगळं पोतडीत भरुन 'इसापचं बोचकं' तयार केलं. घरातून पहाटे ५.४५ लाच निघालो. ओऽसाका स्टेशनच्या बाहेरच आमची फुजीयामाला जाणार्‍या सहलीची बस उभी होती. एकूण ४५ जणांच्या आमच्या ग्रुपमध्ये आम्ही ४ भारतीय, ३ ब्रिटीश बाया आणि २ जर्मन बाप्ये एवढेच गायकोकुजिन म्हणजे परदेशी होतो, बाकी सगळे जपानी चेहरेच होते. त्यात एक साधारण साठीच्या आजी आजोबांचा १०/१२ जणांचा एक ग्रुप होता. दंगा,गाणी करत सहलीचा पुरेपुर आनंद घेत बस पुढे चालली होती. मोडक्यातोडक्या जपानी/इंग्रजी आणि हातवार्‍यांनी एकमेकांशी बोलत आम्ही ओळखी करुन घेतल्या.

फुजीसान चढण्यासाठी साधारण १० टप्पे केले आहेत आणि पाचव्या टप्प्यापर्यंत बस जाते,ते बेस स्टेशन ! साधारण चारच्या सुमाराला आम्ही तेथपर्यंत पोहोचलो. ससाकी सान आणि सुझुकीसान ह्या आमच्या २ उत्साही म्होरक्यांशी ओळख करुन दिली आणि आम्हाला बसमधून उतरवून दोन हॉल्स मध्ये नेण्यात आले आणि गरम कपडे घालून चढायला तयार होण्यास सांगितले . एकात बाया आणि दुसर्‍यात पुरुषमंडळी गेली आणि साधारण अर्ध्या तासात सगळे तयार होऊन तेथेच असलेल्या भोजनगृहात जपानी जेवणाची सोय केलेली होती तेथे जमले. आमची डबाबाटली जरी बरोबर असली तरी बशीमध्ये ओळख झालेल्या ह्या आमच्या नव्या मित्रांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या पंगतीला बसलो.

एकदाचा तो सोपस्कार पार पाडून बाहेरच्या मोकळ्या अंगणात सर्वांची वाट पाहत थांबलो. भन्नाट वारा वाहत होता, बारीक रेती मधूनच उडत होती. तापमापी ७ अंश से. दाखवत होता. एकटेदुकटे पुढे जाऊ नका, खूप मागेही कोणी रेंगाळू नका, ग्रुप मध्ये रहा.. इ. ढोबळ सूचना ससाकीसान आणि सुझुकीसानने दिल्या आणि राखीसदृश्य रेशमी धागे प्रत्येकाला दिले.आता ह्यांचं काय करायचं? असा आमच्या डोळ्यातला प्रश्न आकीसानने वाचला आणि आम्हाला त्या राख्या हाताला बांधायला सांगितले. पुढे सुझुकीसान म्हणजे इंजिनडबा आणि ससाकीसान गार्डाचा डबा आणि मध्ये आम्ही सगळे असे चढायला लागलो.

सुरुवातीला वळणावळणांचा, मातीचा आणि रेतीचा कच्चा रस्ता आहे. हळूहळू चढ कठिण होत जातो आणि वाळूवरुन पाय घसरतो. बारीक बारीक खडे,दगडगोटे चालताना मध्ये येतात आणि त्यावरुनही पाय घसरतो आहे असे लक्षात यायला लागले तरी खिदळत,गप्पा मारत आम्ही चढत होतो. आकीसान आणि योशिकोसान ह्या दोन जपानी मुलीही आमच्याबरोबरच चढत होत्या त्यातली आकीसान भारतात दोनदा येऊन गेली होती आणि जुहूबीचवर भेळ आणि पानपट्टीही तिने खाल्ली होती , अशा गप्पा मारत आमचे चढणे चालले होते.

सहाव्या टप्प्यापर्यंत गेलो असू,नसू आणि जोरात वारा सुरू झाला. वाळूचे बारीकबारीक कण उडायला लागले आणि चेहर्‍यावर बसू लागले., डोळ्यात जाऊ लागले. गॉगल बिगलचा , काही उपयोग नव्हता. बोलायला तोंड उघडलं तरी वाळू तोंडात जाऊ लागली , वारा तर इतका जोरात वाहू लागला की त्याच्या जोराने ढकलले जाऊ लागलो.जणू वाळूचे वादळच सुरु झाले. सगळा असाच निसरडा रस्ता आणि कठिण चढ.. एका बाजूला फुजीचे उंचउंच कडे तर दुसर्‍या बाजूला खोऽल दरी ! चढताना मला श्वासाला त्रास व्हायला लागला, दम लागायला लागला.आकीसानने तोंडात चॉकलेट ठेवायला सांगितले. "उंचावर हवा विरळ होते.." विज्ञानाच्या पुस्तकातलं वाक्य आठवणीतून तरंगत वर आलं आणि मी अजून एक गोळी तोंडात ठेवून पुढचं एक वळण पार केलं. जसे जसे वर चढत होतो तसतसा मला अधिक दम लागू लागला. चार पावले चालले की मी थांबू लागले. अजून बरेच वर चढायचे होते. सातवा टप्पा अजून दृष्टिक्षेपातही आला नव्हता. माझी अवस्था पाहून ससाकीसानने आम्हाला खालती बेसवर परत जायचा सल्ला दिला जो अर्थातच आम्ही मानला नाही. जन्माच्या कर्मी एकदा फुजीसानला भेटायला आलो आहोत , चढतो आहोत आणि ही संधी अशी अर्ध्यात सोडून मला तर जायचे नव्हतेच आणि माझ्यामुळे बाकीच्या तिघांची संधीही घालवायची नव्हती. मला जाणवत होतं की विरळ हवेमुळेच मला(आणि त्या ४५ जणांमध्ये फक्त मलाच, :( ) श्वासाला त्रास होतो आहे, जर सावकाश चालत चढले तर आपण पुढे जाऊ शकू ह्या विचाराने मी दिनेशला म्हटले ,"चल, जायचे आपण वरपर्यंत, फक्त मी भरभर नाही येऊ शकत. सावकाश चढले की दम कमी लागतो आहे,बाकी काळजी नको करु." पण ससाकीसानला मात्र काळजी वाटायला लागली आणि तो आमच्या बरोबरच चढू लागला. त्याच्याजवळ जुजबी औषधं, प्रथमोपचार पेटीही होती. सुदैवाने त्याची गरज पडली नाही, कोणालाच..

सातव्या टप्प्याशी पोहोचेपर्यंत कच्चा रस्ताही बंद झाला होता. आता फक्त खडकांवरुन माकडांसारखं चढून जायचं होतं. ह्या खडकांना साखळदंड बांधलेले होते पण त्यातले कितीतरी खडक जरा हात लागला तरी डगडगत होते. कधी गडगडून साखळदंडासकट खाली येतील याचा नेम वाटत नव्हता.अंधारही पडल्यामुळे टॉर्चच्या अपुर्‍या प्रकाशात पुढची चढण पार करायची होती. चढ आणखीच कठिण झाला होता. एका हातात बॅटरी, पाठीवर बोचके आणि गळ्यात क्यामेरा अशी ध्यानं फुजी चढत होती. अधून मधून रोवलेल्या लोखंडी शिगा आणि साखळदंड सोडले तर आधाराला काहीच नाही, एखादे झुडुपही नाही. ज्वालामुखी पर्वत असल्याने जांभळट रंगाचे ठिसूळ दगड, खडक आणि रेती फक्त! वारा 'मी' म्हणत होता, अंधारामुळे पुढचं काही दिसेनासं झालं . एकमेकांना ओरडून सांगत, चाचपडत आम्ही वर चढत होतो. सिंहगड, लोहगड, पन्हाळा इ. किल्ले पालथे घातल्याने आणि फुजीचा साधासोपा ट्रेक आहे अशी माहिती मिळाल्याने आम्हाला वाटले होते की आपण आरामात,मजेत चढू फुजी पण कसलं काय.. आमच्या ग्रुपमधले इतर मात्र फुजी चे नेहमीचे वारकरी असल्याने सराईतपणे पुढे निघून गेले होते अगदी आजीआजोबांच्या ग्रुपसकट! आम्ही जरा चेव येऊन भरभर चढायला लागलो तर ससाकीसानने थोपवले. तुम्ही तुमच्या वेगानेच चढा. अंधार आहे, कठिण चढ आहे, एकाचा जरी पाय सटकला तर सरळ दरीत जाल.. झाले , आम्ही आपले परत 'गो स्लो..' वारा थांबायचं नाव घेत नव्हता आणि त्यात आता पाऊस सुरु झाला . वाट निसरडी होऊ लागली. कधी एकदा आपण आठव्या टप्प्यावर पोहोचतो असं झालं होतं पण .. ससाकीसानचे 'गो स्लो' ! खाली दरीत पाहिलं की दूरवर चाललेला 'हनाबीचा सण' ,शोभेचे दारुकाम, ती आतशबाजी उंचावरुन पाहताना काही वेगळीच दिसते. एकीकडे निसर्गाचे हे रौद्ररुप तर दुसरीकडे ही प्रकाशशोभा! पण ती शोभा निवांतपणे पाहत थांबायची ती वेळ नव्हती. तिथे तेवढी जागाही नव्हती. पावसाचा जोरही वाढला. ढग गडगडू लागले आणि विजा चमकायला सुरुवात झाली. आता तिथे असं प्रकाशशोभा पाहत थांबणं धोक्याचं होतं.आता जरा भीतीही वाटायला लागली, ससाकीसानने तर आता हाताला धरुनच चालवायला सुरुवात केली.

आकाशात विजा चमकताना आपण अनेकदा पाहतो. विमानात असताना आमोरासमोर चमकून जाणारी सौदामिनीही कितीतरी जणांनी पाहिली असेल . खुल्या आकाशाखाली, उंच कड्यांवर उभे असताना आमच्यापासून दूर पण एकाच समपातळीवर ती चमकून गेली आणि त्या तेजाकडे पाहताना काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येत.. अजून थोडे वर गेल्यावर थोडी मोकळी जागा होती. ससाकीसानने आम्हाला तिथे उभे राहून खाली पहायला सांगितले. खालच्या दरीत विजांचा पाठशिवणीचा खेळ रंगला होता, तो पाहताना तर अंगावर काटा आला. आता शेवटचा चढ बाकी होता. वारा इतका ढकलत होता की ओणवे होऊन आणि जवळजवळ रांगतच आम्ही शेवटचा चढ पार केला. आम्ही पोहोचल्याबरोबर तेथे असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि गरमगरम ओचाचा कप पुढे केला. आजीआजोबांच्या ग्रुपचा म्होरक्या पुढे आला आणि त्या सर्वांतर्फे एक छोटोशी भेट त्यांनी मला दिली. परत सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.माझी दम लागलेली अवस्था पाहून हे लोकं काही वर येत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला होता आणि आम्ही तेथे पोहोचलेले पाहून त्यांना कौतुक वाटले होते. त्यांचे हे कौतुक आनंदाचा शिडकावा करून गेले. आधीचा ग्रुप आमच्या १० च मिनिटे आधी तेथे पोहोचला होता हे समजल्यावर तर फुजीच्या शिखरावर आमचा आनंद पोहोचला.

आठवा टप्पा ११,००० फूट उंचीवर आहे आणि अजून १००० फूट वर चढले की शिखर! आत्तापेक्षाही कठिण ,अतिशय कठिण असा पुढचा १००० फूटांचा रस्ता आहे आणि तो पार करायचे अजून दोन टप्पे आहेत. पण आता इथवर आलो आहोत तर शिखर गाठायचेच, आमचा वज्रनिर्धार होता. ह्या आठव्या टप्प्यावर एक घर बांधले आहे आणि तेथे एका हॉलमध्ये चरासारखे गोलाकार खणून बादलीपेक्षाही मोठ्या अशा दोन केटल्स मध्ये ओचा उकळत ठेवलेला होता. तिथल्या कट्ट्यावर उबेपाशी बसून ओचा पित आमच्या नव्या मित्रांशी गप्पा मारत आम्ही पुढच्या सूचनांची वाट पाहत बसलो. गम्मत म्हणजे ह्या उंचीवर मोबाइल नेटवर्क चालत होते. वैद्यकिय सेवा उपलब्ध होती आणि जरुर पडली तर रुग्णवाहिकेची सोयही होती. हॉलच्या चारही बाजूंनी असलेल्या दालनात रेल्वेच्या टू टियर सारखी बंकरबेडची गाद्या, उशा, पांघरुणांसकट सोय केलेली होती. येथे ३ तास विश्रांती घेऊन रात्री १२ च्या सुमाराला शिखराकडे कूच करण्याचे ठरले .

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

चित्रा's picture

23 Jun 2009 - 5:39 am | चित्रा

त्रास होऊनही एक टप्पा गाठण्याबद्दल अभिनंदन. पुढचे वाचण्याची उत्सुकता आहे.

केवळ ऐकूनच आहे पण तुम्ही स्वतः चढाई करुन आलेले आहात! वा वा.
एक जबरदस्त अनुभव वाचायला उत्सुक आहे.
(अतिविरळ हवामानात अल्टिट्यूड सिकनेसला तोंड देऊन पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन!)

(हनुमानतिब्बा)चतुरंग

रेवती's picture

23 Jun 2009 - 6:24 am | रेवती

अगं पुढं काय झालं?
मस्त लिहिलय्.......जणू मीच चढतीये असं वाटत होतं.
लिहि बाई लवकर......:)

रेवती

नंदन's picture

23 Jun 2009 - 6:45 am | नंदन

लेख आवडला. १२,००० फूट म्हणजे माऊंट एव्हरेस्टच्या जवळजवळ निम्मा पल्ला की.
फुजीसान सर केल्याबद्दल अभिनंदन. पुढच्या दोन टप्प्यांच्या वर्णनाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

23 Jun 2009 - 7:09 am | सहज

मधे कधीतरी डिस्कवरी चॅनेलवर असेच एव्हरेस्टवरील मोहीमेवर आधारीत मालीका पाहीली होती व आज हा अनुभव वाचताना गिर्यारोहक व विशेषता त्यांना मार्गदर्शन करणारे लोक / शेर्पा / हे वरचे ससाकी सान आणि सुझुकीसान यांच्याबद्दल आदर अजुनच वाढला.

फुजीसानच्या मुशाफीरीला तुम्ही आम्हाला घेउन गेल्याबद्दल धन्यु स्वातीसान. :-)

अवांतर - असेच माचुपिचु करायचे आहे पण त्याकरता आपण फार लेचेपेचे आहोत असे वाटते म्हणुन तुर्तास टांगणीवर :-)

क्रान्ति's picture

23 Jun 2009 - 7:48 am | क्रान्ति

डिस्कवरी चॅनल पहात असल्यासारखं वाटलं लेख वाचताना! मस्त वर्णन केलंय! अडचणींवर मात करून यशस्वी चढाई केल्याबद्दल अभिनंदन!
[पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत]क्रान्ति

ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

23 Jun 2009 - 5:39 pm | विसोबा खेचर

सु रे ख व सं ग्रा ह्य ले ख मा ला..!

डिस्कवरी चॅनल पहात असल्यासारखं वाटलं लेख वाचताना! मस्त वर्णन केलंय!

क्रान्तीशी सहमत.. फोटूही क्लास!

स्वाती, जियो...

तुझा,
(शाळूसोबती) तात्या.

टारझन's picture

23 Jun 2009 - 8:40 am | टारझन

स्वाती ताई इज बॅक आफ्टर लिटील ब्रेक !!!
यार !!! झकास !!! लेखनाचं सोडाच .. पण कसली धमाल केलीये राव !!!
फोटोज तर एकदम क्लास :) पहिला फोटो , प्रत्यक्षात किती भव्य वाटत असेल ?
स्वाती ताई ... और चाहिये :)

(स्वातीतैंचा पंखा) टार्यारोहक

दशानन's picture

23 Jun 2009 - 9:08 am | दशानन

मस्त लिहले आहे... छानच !

थोडेसं नवीन !

ऋषिकेश's picture

23 Jun 2009 - 9:30 am | ऋषिकेश

अहाहा! स्वातीताय इज ब्याक! :)
मस्त वर्णन... वाचताना अक्षरशः आपणही चढतोय वाटत होते..
फूजीसानचा जपानच्या प्रत्येक वर्णनांमधे फोटु असणे गरजेचे असतेच.. मात्र तो पायी ट्रेकने (तांत्रिक चढाईविना) चढताही येतो हे माहीत नव्हते.. आणि हे कळल्यावर तर आयुष्यात करायच्या ट्रेक्समधे फूजीसानची भर पडली आहे :)

आता कधी एकदा दोन टप्पे पार पडून लाव्हाशी दृष्टीभेट होतेय यासाठी आतूर आहे

बाकी पहिल्या फोटोतला फूजीसान मस्त आला आहे.. नेहेमी फोटोसाठी हिमाची टोपी घालून बसतो बिचारा.. तुम्हाला मात्र त्या फूजीसानने घरचे भेटायले गेल्यावर अगदी घरचांसाठी घरच्या कपड्यात पोझ दिल्यासारखं वाटलं ;)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

स्मिता श्रीपाद's picture

23 Jun 2009 - 4:04 pm | स्मिता श्रीपाद

फारच मस्त लिहिले आहेस गं..
रेवतीशी मी पण सहमत...
मलापण असे वाटले की मी पण पोचले आहे ८ व्या टप्प्यावर..

आता शिखरापर्यंत कधी नेतेस?

श्रावण मोडक's picture

23 Jun 2009 - 5:05 pm | श्रावण मोडक

वा. छान लेख. वर्णनात्मक. चित्रदर्शी...

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2009 - 5:53 pm | बिपिन कार्यकर्ते

छान फिरवते आहेस आम्हाला तुझ्या बरोबर. स्वतः तिथे असल्यासारखं डोळ्यासमोर येतं सगळं. मस्त. चढणीवर केलेल्या वेगवेगळ्या सुविधांबद्दल वाचून मस्त वाटले. वारसा जपावा, फुलवावा कसा हे शिकावं या जपान्यांकडून.

आता पुढचा भाग लवकर टाक. फुजीसानच्या पुढच्या स्फोटाची वाट नको बघू. ;)

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

24 Jun 2009 - 6:47 pm | शाल्मली

बापरे स्वातीताई, कमालच आहेस तू!!
रेवतीताई म्हणते तसं मलाही तुझ्याबरोबर चढत असल्यासारखं वाटत होतं.
पुढे काय झालं ते लवकर सांग. :)

मला हे वाचताना तुला आपण आल्प्स मध्ये वेर्फेनला हिमगुंफेत जाताना थोडा दम लागत होता ते आठवले.

--शाल्मली.

स्वाती दिनेश's picture

26 Jun 2009 - 1:39 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद,
स्वाती