याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १०
माझं जपानी रुटीन
आम्ही मैतरणी जवळ जवळ रोजच सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यानं बाहेर पडत असू.दोन तीन तास आसपासच्या रस्त्यांवरून भटकंती करत तिथल्या रस्त्यांची,दुकानांची आणि माणसांचीही ओळख करून घेत येताना भाजी,दूध ,अंडी इ. गोष्टी आणत असू.इथल्या टीव्ही वरती फक्त जपानी चॅनेले दिसायची.(आता इथेही तेच! फकस्त जर्मन चॅनेले! दुसर्या महायुध्दातल्या पराभूत देशात असा रुल आहे की काय? ;) )तर इथे फक्त जपानी कार्यक्रम दिसत. घरी इंटरनेट नव्हते. बाहेर नेट कॅफे असत पण सगळे जपानीतून ! इंग्रजी व्हर्जन ज्या नेट कॅफेमध्ये होते तो आमच्या घरापासून २ किमी लांब! सॉलिटेअर तरी किती खेळणार?आम्ही ३ कुटुंबे एकत्र राहत होतो. स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुम असल्या तरी आमचे स्वयंपाक घर आणि हॉल एकत्र होते. आमच्या मालकीण बाई श्रीमती लीला रेड्डी आम्हाला वेगवेगळ्या हिंदी सिनेमांच्या कॅसेटा देत असत.(हो, तेव्हा सीडी,डीव्हीडी इतक्या सहज मिळत नसत.)कधीतरी दुपारी आम्ही तिघीजणी एकत्र सिनेमा पहायचो पण जपानमधला वेळ हिंदी सिनेमात वाया घालवायला मला आणि सुप्रियाला जास्त आवडायचं नाही.लेखाला मात्र शिनूमात रस असायचा.मग आम्ही दोघी भटक्या परत बाहेर पडत असू आणि मोतोमाचीच्या शॉपिंग लेनमध्ये नाहीतर शिन कोबेच्या रस्त्यावर,बागांमध्ये भटकत असू.
आमच्या घराच्या कोपर्यावरच एक "को ऑप" नावाचं सहकारी भांडार होतं. तेथेही आम्ही जात असू.कोऑपच्या समोरच सुंदर कट्टा बांधलेला होता आणि काही बाकडीही टाकलेली होती.तिथे बसलं की वार्याच्या हलक्या झुळूका येत असत आणि समोरचे कोऑप आणि संपूर्ण रस्त्यावरच्या हालचाली दिसायच्या. पहारे करायला बसल्यासारख्या आम्ही दोघी तिथे बसत असू. आजूबाजूच्या बाकड्यांवरही कोणकोण बसलेले असायचे.ओळख देख नसताना सहज "कोन्निचिव्हा" (हॅलो,नमस्कार..)व्हायचे.आमची बिनाअस्तराची जपानी आणि त्यांची तितकीच बिनाअस्तराची इंग्रजी; दोन्हीची मोडतोड करत संवाद सुरू व्हायचा.आमचा वेळ मजेत जायचा. दुपारी साधारण प्रौढ आणि वृध्द स्रियांचाच वावर तिथे जास्त असायचा.त्या काय खरेदी करतात? त्यावरून त्यांच्या राहण्या खाण्याच्या सवयींचा अंदाज बांधायचा जणू छंदच आम्हा दोघींना लागला होता.
बर्याच जणी आपापले कुत्रे घेऊन खरेदीला येत. त्यांना बांधायला दुकानाच्या दाराशी स्वतंत्र स्टँड होता.तिथे बांधतानाही त्यांच्याशी लाडेलाडे बोलत.(बहुतेक ,"शहाणा मुग्गा ना तू? शांत बसायचं हं,मी लग्गेच येतेच.तुला चॉक्केट आणते हं. आणि काय हवं बाळाला?" असला काही संवाद जपानीतून होत असावा असा मला दाट संशय आहे.)त्यांचे लहान मुलांच्या वरताण लाड!त्यांच्या केसांना रिबिनी काय बांधतील,केस रंगवतीलच काय?त्यांना झबलेवजा फ्रॉक काय घालतील. पाऊस असला तर रेनकोट! आणि हद्द म्हणजे त्यांच्या पायात बूट!
त्याच गल्लीच्या दुसर्या टोकाला "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत. (त्या पेश्शल हाटेलाच्या बाहेर असलेल्या बाकड्यांवर बसून आमचे तेही निरिक्षण चाले.)पण एक मात्र होतं ,ह्यांच्या कुत्र्यांचा त्रास इतरांना होत नसे .प्रत्येक कुत्राधारिकेबरोबर एक पिशवी जरूर असायची.त्या पिशवीचं कोडं एक दिवस उलगडलं.एक श्वान माता आपल्या लेकराला बाहेर ठेवून खरेदीला गेली असता इकडे बाळाने कार्यक्रम करून ठेवला.ती ललना बाहेर आल्यावर ते दृश्य पाहून" अर्रे लबाडा,तरी सांगत होते जास्त खाऊ नकोस." असे भाव चेहर्यावर! पिशवीतून टिश्यु काढून तिने ती जागा आणि कुत्र्याचा पार्श्वभाग दोन्ही साफ केले.जवळच्या प्लास्टीक पिशवीत तो ऐवज परत ठेवला. समोरच मोठ्ठी कचराकुंडी असतानाही ती पिशवी घेऊन चालायला लागली.भोचकपणा करून आम्ही तिला (बिनाअस्तराच्या जपानीत)समोरच असलेली कचराकुंडी दाखवली.तिचं उत्तर मात्र बरच काही शिकवून गेलं." ही कुंडी कॅन्स आणि बाटल्यां,जुने कागद इ.साठी आहे.ते सारे रिसायकलिंगला जाते,त्यात ही घाण टाकून कसं चालेल?
त्या समोरच्या मोठ्या कचराकुंडी मध्ये कॅन्स,बाटल्या,ओला आणि सुका कचरा,कागद,दुधाचे खोके इ. साठी वेगवेगळे कंटेनर्स होते.(परदेशात बहुतेक सगळ्याच ठिकाणी असे असते हे तेव्हा माहित नव्हते.सगळ्याचीच नवलाई होती.)लोकं तिथे येऊन वर्गीकरण करून कचर्याची विल्हेवाट लावत असत. कोणीही एकदाही आपली कचर्याची पिशवी एकाच कंटेनरमध्ये टाकून गेलेले पाहिले नाही.दुधाचे खोके तर रिसायकलिंगला सोपे जावे म्हणून धुवून,चपटे करून,महिन्याभराचे साठवून त्यांचा गठ्ठा करून मगच टाकत. एकदा असेच तिथे कट्ट्यावर बसलो असताना एक स्त्री आणि तिची १०/१२ वर्षांची मुलगी कचरा टाकायला आल्या.बाई वेगवेगळ्या कुंड्यात वर्गवारी करत कचरा टाकत होत्या. मुलगी कंटाळली आणि तिने उरलेली पिशवी एकाच कुंडीत टाकली.बाईंनी पाहिलं आणि मुलीला ओरडा तर बसलाच पण बाईंनी ती पिशवी कुंडीतून उचलली आणि मुलीला वेगवेगळ्या कुंड्यात कचरा टाकायला लावला.
सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य नुसते सप्ताह पाळून होत नाहीत तर या आणि अशाच गोष्टीतून ते राखलं जातं ह्याचा तो एक वस्तुपाठच होता.
रस्ते तर इतके स्वच्छ की चक्क पान घेऊन पंगत मांडावी!(पंगत मांडण्याइतके स्वच्छ रस्ते मला युरोपातही क्वचितच पहायला मिळाले. )रस्त्यांमधल्या डीव्हायडर वर अनंताची,गुलाबाची झाडं,बोगनवेली लावलेल्या असतात.छत्रीच्या वाकड्या मुठीने किवा काठीने कोणीही रामभाऊ देवपूजेसाठी ती काढताना किवा कोणी रमाकाकू,ठमाकाकू वेणीत माळण्यासाठी ती खुडताना दिसत नाहीत.एकदा सूटाबूटातले हपिसर लोकं हातात मोजे घालून,लांब चिमट्यांनी वाटेतला कचरा म्हणजे फुलांच्या पाकळ्या,वार्याने गळलेली पानं,चुकून कुठे असलंच तर सिगरेटच थोटुक गोळा करून जवळ असलेल्या एका कचर्याच्या कुंडीत टाकत होते.कपड्यांवरून ते काही सफाई कामगार तर वाटत नव्हतेच. आम्ही परत एकदा भोचकपणा करून ह्याबाबत त्यांना विचारलं .उत्तर मिळालं,"आम्ही इथल्या जवळपासच्या इमारतीत कामाला येतो तर इथला रस्ता स्वच्छ ठेवणं ही आमची जबाबदारी आहे."(काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते.तेव्हा विचारणा केली असता मिळालेले उत्तर होते."कितने लोग यहा रोजाना आते है। कॉर्पोरेशन के सफाई करनेवाले भी रोज कौनसी तो गली साफ करतेही नही है।")
राखेतून नंदनवन उभं केलेल्या ह्या देशाचं रहस्य तेथलेच सुजाण लोकं आपल्या कृतीतून सांगत होते.
प्रतिक्रिया
22 Jun 2008 - 8:27 pm | ऋषिकेश
सुंदर वर्णन!.. एखाद्या स्थळाइतकीच मला व्यक्तींची सवयींची थोडक्यात त्या देशातील माणसांची वर्णनं वाचायला फार आवडतं आणि तुमच्या वर्णनात नुसते स्थळ नाही
तर तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता :)
या भागातील लोकांचा सोशल सेंस मनाला भावला. आणि
हे वाक्य प्रचंड छान! त्या फुला-फुलांनी सजलेल्या सुंदर रस्त्यावर पंगत आहे. आपले सगळे मिपाकर त्या मैफिलीचा आस्वाद घेत आहेत. (ती कुत्री समोरच्या स्टँडलाच बांधलेली बरी ;) ) असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले.
नेहेमी प्रमाणे मस्त भाग..
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
23 Jun 2008 - 12:39 am | नंदन
>>> तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता
-- असेच म्हणतो. हा भागही आवडला. रिसायकलिंगचा अनुभवही अतिशय बोलका.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Jun 2008 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता
हा भाग सुद्धा आवडला !!! लिहिण्याची शैली आणि भाषा नेहमीसारखीच जिवाभावाची !!!
अवांतर : अ.भा.मराठी साहित्य संमेलन चलो कॅलोफोर्निया !!! बोटावर मोजता येतील अशा पदाधिका-यांच्या हातात अ.भा.साहित्य महामंडळ असले की काय होते त्याचा हा उत्तम नमुना !!! चालु दे !!!
23 Jun 2008 - 9:46 am | विसोबा खेचर
अ.भा.साहित्य महामंडळ हा एक अत्यंत विनोदी प्रकार आहे! :)
23 Jun 2008 - 9:55 am | II राजे II (not verified)
१००% सहमत.
हेच म्हणतो !
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
22 Jun 2008 - 8:29 pm | यशोधरा
मस्तच लिहिलय गं स्वातीताई, अजून लिहायचय ना? लिही लवकर...
22 Jun 2008 - 8:37 pm | प्रमोद देव
स्वाती मस्तच लिहिलंयस!
बाकी ऋषिकेशशी सहमत!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
22 Jun 2008 - 9:23 pm | चित्रा
अगदी असेच..
23 Jun 2008 - 4:28 am | चतुरंग
तुम्ही केलेल्या निखळ वर्णनातून तुमचे अनुभव मनापासून घेतलेले आहेत असे जाणवते. चित्रेही एकदम सुरेख आणि नेटकी आहेत.
(अवांतर - "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत.
हे वाक्य वाचून माणसांच्या "हॉटेल कपिला" सारखं कुत्र्यांचं "हॉटेल पपिला" असेल का असा एक प्रश्न मनात आला! ;))
चतुरंग
23 Jun 2008 - 6:09 am | विसोबा खेचर
वा स्वाती!
फुलांची चित्रे फारच सुरेख..
जपानची लेखमाला अत्यंत देखणी व बोलकी होत आहे...! जियो..
तात्या.
अवांतर -
काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते.
इतर देशांचं कौतुक जरूर करावं पण ते करताना भारतातील शहरांना नावं ठेवण्याचं काय कारण? ती मंडळी असतील ग्रेट तर त्यांच्या घरची! सालं नाकारतंय कोण? आणि तुलनाच करायची असेल तर फक्त घाणीचीच तुलना का? बनारसमधील चांगल्या गोष्टींची तुलनाही जपानशी करा की!
बनारसच्या थाट बाजारात (चूभूदेघे) मिळणारी साजूक तुपातली जिलेबी, द्रोणातली सुरेख लालसर गुलाबी रबडी अन् अत्यंत रसिले गुलाबजामून तुमच्या जपानमध्ये जळ्ळे बघायला तरी मिळतात काय?
जीव ओवाळून टाकावा अश्या बनारसी ठुमरीतली एक जागा जपान्यांनी घेऊन दाखवावी! आमच्या सिद्धेश्वरीदेवीच्या ठुमरी-दादर्याची सर किंवा बनारसच्या उस्ताद बिस्मिल्लाखासहेबांच्या सनईची तुलना कुठल्या जपान्याशी होईल काय?
परदेशाचं कौतुक करताना येतजाता भारताला थपडा मारायची हल्ली ष्टाईलच झाली आहे. आणि मारे एवढाच जर पुळका असेल भारताबद्दल तर इथे येऊन रहा आणि सुधारा की भारताला! नाही कुणी म्हटलंय?
तात्या.
23 Jun 2008 - 11:57 am | स्वाती दिनेश
बनारसचे पहिले दर्शन खरोखरच " रस्त्यात घाण की घाणीत रस्ते " असे होते. भले नाही आमच्याकडे पैसा,असू आम्ही गरीब..पण स्वच्छ,नीटनेटके राहणे तर आहे ना आमच्या हातात. आपल्या अंगणातला कचरा दुसर्याच्या अंगणात सारायचा.खिडकीतून आमटीपासून काहीही खाली टाकून द्यायचं..मग भले खालून कोणी जात असेल.त्याचे कपडे खराब होतील.. हे पहायचं नाही की त्याचा विचार करायचा नाही.. 'सामाजिक शिस्त आणि स्वच्छता ' हे आपल्यासाठी जणू नाहीतच! अशाच समजुतीत रहायचं.
बनारसच नव्हे तर अनेक तीर्थक्षेत्रांची हीच अवस्था!
रसरशीत गुलाबजामून,द्रोणातील खरपूस रबडी,जीवघेणे बनारसी पान ह्याचं कौतुक आहेच,त्यासाठी जीव तरसतोही..पण ते कसे बनवतात हे जेव्हा पाहिलं,तेव्हा मात्र! खव्याने भरलेल्या खोल्याच्या खोल्या..पायांनी खवा मळणे चाललेले..घोंघावणार्या माशांनी खव्याला झाकलेले.. तिथेच पलिकडे 'सगळे' विधी चाललेले...
आपले एवढे १२ ज्योतिर्लिंगातले एक काशी विश्वेश्वराचे देऊळ,पण त्याचे पावित्र्य,स्वच्छता राखली जाते? पापनाशिनी गंगा बिचारी पापं आणि प्रेतं वाहून वाहून इतकी मलीन झाली आहे की खरच वाईट वाटतं.वाटतं का नाही आपला लोकांना ही सामाजिक जाणीव? जपानसारखा राखेतून उभा राहिलेला देश,जर्मनीसारखा गावेच्या गावे बेचिराख झालेला देश जर त्यातून पुन्हा नंदनवन उभारू शकतो तर आपण का नाही? नुसते मतांचे आणि जातींचे राजकारण करून आपल्या आणि पुढच्या ७/८ पिढ्यांचे कल्याण करून ठेवायचे एवढाच सिमित उद्योग बहुतांश राजकारणी करताना दिसतात.(सन्माननीय अपवाद आहेतही!)
परदेशात जेव्हा जेव्हा आपल्यासारखेच सामान्य लोकं देशाच्या प्रगतीला वैयक्तिक हातभार लावताना पाहिले की नकळत "आम्ही ह्यात कोठे बसतो?" हा विचार हटकून येतोच मनात..आणि तो फ्याशन म्हणून नव्हे तर भारताच्या प्रेमापोटीच असतो.आपल्याकडील लोकांच्यात असे काही ऐकून,वाचून तरी काही फरक पडावा,त्रुटी कमी व्हाव्यात असा उद्देश असतो.
बनारसवरची डॉक्युमेंटरी इथे जेव्हा दाखवतात तेव्हा ती मलिन गंगा,तिच्याकाठी जळणारी प्रेतं ,राख सावडून सोनं मिळतय का ते शोधणारे लोकं,मनकर्णिका घाट,महास्मशान.. हे दाखवतात.तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतात,त्या जर्मन /इंग्लिशमधे भाषांतरितही करतात,तेव्हा त्या 'राख सावडण्याचा 'अर्थही इथल्या लोकांना समजतो.आम्ही ते हताशपणे पाहतो. हे सगळं दूरदेशी पाहताना आपलीच लाज वेशीवर टांगली जाते आहे असे वाटते.
"भारतात येऊन राहणं आणि सुधारणं " हा त्यावर उपाय आहे? प्रत्येक सुजाण नागरिकाने किमान सामाजिक स्वास्थ्य, आरोग्यविषयक काही बंधनं पाळली ना तरी बरीच सुधारणा होईल..
स्वाती
23 Jun 2008 - 12:00 pm | II राजे II (not verified)
O:)
टाळ्या !
विचारांशी सहमत.
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
23 Jun 2008 - 12:59 pm | विसोबा खेचर
"भारतात येऊन राहणं आणि सुधारणं " हा त्यावर उपाय आहे?
का नाही? भारताबद्दल इतकी आच असेल तर रहावं इथे येऊन अन् करावीत समाज सुधारणेची कामं! गाडगेबाबांनी नाही केली? तिकडे परक्यांच्या देशात, जर्मनीत बसून भारताला नावं ठेवणं खूप सोप्पं आहे, त्याची वैगुण्ये दाखवणं खूप सोप्पं आहे..!
बनारसवरची डॉक्युमेंटरी इथे जेव्हा दाखवतात तेव्हा ती मलिन गंगा,तिच्याकाठी जळणारी प्रेतं ,राख सावडून सोनं मिळतय का ते शोधणारे लोकं,मनकर्णिका घाट,महास्मशान.. हे दाखवतात. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतात,त्या जर्मन /इंग्लिशमधे भाषांतरितही करतात,तेव्हा त्या 'राख सावडण्याचा 'अर्थही इथल्या लोकांना समजतो.
बरं मग? येणार आहेत का ती लोकं इथली घाण साफ करायला? भारत कसा आहे, काय आहे, स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे हे आमचं आम्ही पाहून घेऊ! इतर देशांनी मारे त्याच्या इंग्लिश भाषांतरीत डॉक्युमेन्टरीज दाखवल्या तर दाखवोत बापडे पण भारताचं मूल्यमापन करण्याचा अधिकार त्यांना भारताने दिलेला नाही!
शिवाय मी असंही विचारत होतो की भारतीय संगीत आणि भारतीय पाककला या विषयी त्या डॉक्युमेन्टरीजमध्ये काही दाखवतात की नाही? की फक्त भारताची वाईट बाजूच दाखवतात?
आणि भारत इतका वाईट असूनही हीच मंडळी इथे उद्योगधंदे करून दमड्या कमवायला झक्कत येतातच ना? :)
भारतात अस्वच्छता, बकालपणा नाही हे मी मुळीच नाकारत नाही. परंतु काही जमेच्या बाजूही अनेक आहेत ज्यांचा उल्लेख परदेशाची कवतिकं करताना केला जात नाही. नेहमी फक्त दोषांचाच उल्लेख केला जातो. म्हणूनच मी असं मुद्दामून विचारत होतो की जसा बनारसचा पुरब अंगाचा ठुमरीदादरा हा भारतीय संगीताला मोठं योगदान ठरला तसा जपानच्या कुठल्या भागाने कुठला गानप्रकार जपानी संगीताला देऊ केला ज्यावर लोकं डॉक्टरेट करत आहेत?
असो..
माझ्याकरता हा विषय संपलेला आहे. फक्त जपानपुरताच विचार करायचा म्हटला तर तुझी लेखमालिका निश्चितच चांगली व वाचनीय आहे.
पुलेशु....
आपला,
(अस्वच्छ व बकाल देशाचा नागरीक) तात्या.
23 Jun 2008 - 4:50 pm | स्वाती दिनेश
तात्या,
भारताला नावे ठेवणे,हिणवणे हा हेतू नाही. भारताबद्दलच्या प्रेमापोटीच,कळकळीपोटीच इतरांच्या चांगल्याशी तुलना केली जाते. भारताकडे इतके पोटेन्शियल असताना फक्त त्यातील उणीवाच जगापुढे मांडल्या जातात. ह्या डॉक्युमेंटरीज करताना जेव्हा लोकांच्या मुलाखती घेतात तेव्हा एक्काच्याही मनात आपलं दारिद्रय असं वेशीवर न टांगता चांगल्या गोष्टी जगापुढे मांडाव्यात असं येत नाही ,ह्याचं वाईट वाटतं.आपल्या इथल्या बकालतेला आपलेच लोकं जबाबदार आहेत आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही,ह्याचं वाईट वाटतं.राग येतो.
भारतीय खाद्यपदार्थ जगभर मशहूर आहेत पण जेव्हा कळकट आणि अस्वच्छ भटारखाने,उघड्यावरचे,माशा बसत असलेले खाद्यपदार्थ जेव्हा व्हीडीओत दाखवले जातात तेव्हा साहजिकच 'हायजीन'चा प्रश्न उभा राहतो.
संगीताबद्दल तुझ्या सारख्या अधिकारी व्यक्तिपुढे मी काय बोलणार? आणि अर्थातच मला त्यात गतीही नाही,फक्त चांगले संगीत ऐकायला आवडते एवढीच मजल आहे.
असो. माझ्याही कडून ह्या विषयाला पूर्णविराम.
स्वाती
23 Jun 2008 - 7:20 am | सहज
ले गयी दिल ही लेखमाला जपानकी!!
23 Jun 2008 - 9:53 am | प्राजु
सुंदर वर्णन आणि चित्रे.
इतकी स्वच्छता तर मी अमेरिकेतसुद्धा नाही पाहिली. बर्याचदा रस्त्यांवर बियरचे, कोकचे टिन्स, सिगरेटची थोटकं.. सर्रास दिसतात.
खूप दिवसांनी लिहिलास गं हा भाग..
मस्त एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jun 2008 - 12:25 pm | बेसनलाडू
चांगले चालू आहे. पुढचे येऊ देत.
(वाचक)बेसनलाडू
23 Jun 2008 - 5:12 pm | वरदा
छान वर्णन्...मी इथे आले तेव्हाचे दिवस आठवले...तुम्ही तर मैत्रीणी तरी असायचात्...मी तर एकटी अशा मॉल मधे रोज ३-४ तास भटकायचे.....आजूबाजूला असलेले गुजराथी अज्जिबात बोलायचे नाहीत्....बाकी सगळे अमेरिकन्..मग काय करणार्....
पंगत वाढण्याइतके स्वच्छ रस्ते इथेही नाही दिसले अजून्..पण कचरा टाकण्यातला काटेकोर पणा कॉलेज मधे अगदी सगळ्या लोकांमधे पाहिला...घरातही प्रत्येकाच्या ३ वेगळे ट्रॅश कॅन्स असतातच.....
नेहेमीप्रमाणे खूप मस्त लेख...
पुलेशु..
23 Jun 2008 - 8:46 pm | केशवसुमार
स्वातीताई,
नेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन..चालू दे.. वाचतो आहे
(वाचक)केशवसुमार
बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही..
(भारतीय)केशवसुमार
23 Jun 2008 - 8:56 pm | कुंदन
अगदी जर्मनी , अमेरीका यासारखी पाश्चात्य राष्ट्रेच कशाला ,
ईजिप्त,ट्युनिशिया मध्ये देखील मला भारतातील इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त स्वच्छता आणि शिस्त आढळली.
-- ( भटक्या) कुंदन
23 Jun 2008 - 9:48 pm | चतुरंग
चतुरंग
23 Jun 2008 - 10:35 pm | ऋषिकेश
लाख मोलाचं बोललात! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
23 Jun 2008 - 8:50 pm | स्वाती दिनेश
बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही..
अगदी खरे! माझा मुद्दा तुम्ही एका ओळीत स्पष्ट केलात.धन्यु.
स्वाती
23 Jun 2008 - 10:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही..
प्राथमिक गरजा जिथे पुर्ण होत नाही. तिथे अस्वच्छता, बेशिस्तीबद्दल बोलणं फार सोप्प आहे. हमे हमारे हाल पे छोड दो !!!
23 Jun 2008 - 11:21 pm | चतुरंग
हा प्रश्न 'स्वच्छ शहरांचा' नाहीये हा प्रश्न 'स्वच्छ मानसिकतेचा' आहे. आणि शेवटी स्वच्छ शहरं तरी कशी निर्माण होतात? प्रत्येक माणसाने स्वच्छ्तेने वागायची एक अंगभूत शिस्त लावून घेण्यानेच.
प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत अशा भागांबद्दल सोडून द्या - पण जिथे आलबेल आहे अशा भागात तरी किती शिस्त पाळली जाते? आपल्या फ्लॅट्/बंगल्यासमोरचा कचरा शेजारच्याच्या दारात ठेवणारे, नदीत निर्माल्य भिरकावून देणारे, कचराकुंडीची सोय असूनही कचरा बाहेर भिरकावून देणारे, कितीतरी आपल्या आसपासच आहेत त्यांच्या प्राथमिक गरजांबद्दल काय?
आम्ही देशाबाहेर राहून उपदेशाचे डोस पाजतोय असे वाटत असेल तर आपल्याकडे सुरत शहराने अशी स्वच्छता मोहीम हाती घेऊन इतर सर्व मोठ्या शहरांना एक उदाहरण घालून दिलंच होतं, त्याचं तरी अनुकरण किती शहरांनी केलं?
तेव्हा मूळ प्रश्न हा 'हमें हमारे हाल पे छोड दो' ही मानसिकता टाकून देण्याचा आहे असे मला प्रामाणिकपणे वागते. अहो बाहेर रहात असलो तरी आम्ही मूळ भारतीयच आहोत/राहू पण अशी 'तुम्ही-आम्ही' भाषेतली दरी दूर लोटायला कारणीभूत ठरते. वेदना देऊन जाते. भारताबद्दल कोणी काही तारे तोडले तर आम्ही त्यांच्या तंगड्या सव्याज गळ्यात घालायला मागे पुढे पहात नाही पण आपलेच नाणे खोटे असेल तर मग मान खाली जाते.
आपल्या देशाची उजळ प्रतिमा सगळीकडेच असावी ह्या तळमळीने लिहिले, काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी!
चतुरंग
24 Jun 2008 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न 'स्वच्छ शहरांचा' नाहीये हा प्रश्न 'स्वच्छ मानसिकतेचा' आहे. आणि शेवटी स्वच्छ शहरं तरी कशी निर्माण होतात? प्रत्येक माणसाने स्वच्छ्तेने वागायची एक अंगभूत शिस्त लावून घेण्यानेच.
मानसिकतेच्या इतकाच हा प्रश्न व्यवस्थेचा आहे, असे वाटते. शहरातील गर्दी हा काही नवीन विषय नाही. शहरातील औद्यागिकरणाने शहरे गजबजून गेली. ग्रामीण भागातील लोढ्यांनी त्याच्यात सतत भर टाकली रेल्वे, बस, रस्ते, वीज्,पाणी, शिक्षण, हे सर्व शहरात असल्यामुले शहरांकडे सतत गर्दी वाढतच आहे. गर्दीमुळे टंचाई,महागाई,दिरंगाई, आणि बेपर्वाई सतत वाढत असते.
वाढणा-या झोपडपट्या, त्यांच्या गैरसोयी, शहरातील सांडपाण्याची अपुरी व्यवस्था यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि हे प्रश्न सोडवायचे असेल तर शासनकर्ते आणि नागरिकात जागृतीची आवश्यकता असते. साधी गोष्ट आहे, गर्दी वाढली की समस्या निर्माण होतात, जागा,पाणी, संडास,कचरा, वाया गेलेले अन्न......आणि दुर्दैवाने अशाच गोष्टींचे भडक चित्रण केल्या जाते.
संडासात जाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात, लहान मुलांना संडासाऐवजी बाहेर बसवावे लागते, कचराकुंड्या गच्च भरुन जातात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी साधणे अपुरे पडतात, कच-याभोवती, कावळे, डुकरे,कुत्रे पोसली जातात तेच जास्त घाण पसरवतात. त्याचबरोबर गर्दीमुळे झोपण्यासाठी जागा नाही, उघड्यावर आंघोळी, अशा कितीतरी समस्या केवळ गर्दीने होते. आणि माझीच भावंडे चकचकीत शहरात राहुन स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे देतात त्याचे जरासे वाईटच वाटते.
शहरीकरणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे झोपडपट्यांची निर्मिती. ज्या शहरात नियोजन नाही, तिथे वाटेल तिथे झोपड्या पडतात. त्या ऐवजी त्यांना वसवण्यासाठी जागा दिली पाहिजे, त्यांच्यासाठी योग्य नियोजन झाले पाहिजे. पंचवार्षिक योजनेत प्रत्येक महानगरपालिकांना स्वछतेविषयी विविध योजना राबवायच्या होत्या, राबविल्याही पण नेहमीप्रमाणे नागरिकांचा सहभाग अल्प असाच राहिला आहे. गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्या,मजुरांच्या वस्त्या, रस्त्यावर फिरणारे भिकारी, आणि इथे जन्माला येणारी पुढील पिढीच्या सर्वांगीण विकासाची, कुटुंब शिक्षणाची, प्रशिक्षणाची, योजना राबविली पाहिजे हे काही राज्यकर्त्यांना, शासनास, आणि नागरिकांना कळत नाही का ? कळते पण करायचं कोणालाच नाही ?
झोपडपट्या चांगल्या ठिकाणी हलवल्या पाहिजे. त्याचबरोबर रोजगार दिला पाहिजे, संडास, पाण्याची व्यवस्था, वीज, दुकाने,दवाखाने, इत्यांदीची व्यवस्था असली पाहिजे. दारुबंदी, वेश्याववसाय बंदी, गुन्हेगारी मुलांसाठी शाळा, अशा मोहिमा घेवून झोपडपट्टीतील रहिवाश्यांना सर्वांगीण विकासकार्यक्रमात सामावून घेतले पाहिजे. त्यांच्यासाठी विकासाचे कार्यक्रम राबविले पाहिजे. स्वच्छता आणि शिस्त कोणाला आवडणार नाही, पण मुळ प्रश्न सोडविण्याची उदासिनता इथे आहे. म्हणुन प्राथमिक गरजा जिथे पुर्ण होत नाही. तिथे अस्वच्छता, बेशिस्तीबद्दल बोलणं फार सोप्प आहे. हमे हमारे हाल पे छोड दो असे आम्ही म्हणालो. ( जे आहे, ते बरं आहे, अशी भावना होती ) त्याच्यात देशाबाहेर राहणा-या भारतियांना दोष देण्याचा कुठेही हेतू नव्हता, नाहीच. मात्र येथील चांगल्या गोष्टींचेही आपण कौतुक केले पाहिजे, ज्या गोष्टींमुळे मान खाली जाते असे विषयांची चर्चा जरा त्रासदायकच ठरते. अशा प्रश्नांच्या उपायांसाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी जरी नाही करता आली तरी स्वप्नातील भारत रंगवतांना सकारात्मक विचार आपल्या लेखन/प्रतिसादातून दिसला तर आपणास भारतीय म्हणुन जो आनंद होईल तितकाच आनंद आम्हाला होईल इतकीच त्या मागची भावना आहे कारण आपल्या सर्वांचेच भारतावर खूप खूप प्रेम आहे.
आपल्या देशाची उजळ प्रतिमा सगळीकडेच असावी ह्या तळमळीने लिहिले, काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी!
आपल्या देशाची प्रतिमा उजळ होतांना मुळ प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष होते. ते होऊ नये या तळमळीनेच आम्हीही लिहिले. काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी.
24 Jun 2008 - 9:08 pm | चतुरंग
सध्या तरी माझ्याकडे ह्यावर अधिक बोलण्यासारखे काही नाही.
धन्यवाद डॉसाहेब, आपली भूमिका समजली.
चतुरंग
25 Jun 2008 - 7:47 pm | सुधीर कांदळकर
नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी, वाचनीय. एक गुण आणखी वाढला. विचारप्रवर्तक.
ऋषिकेशच्या प्रतिसादाशी सहमत.
पुढील भाग लौकर येऊ द्यात.
सुधीर कांदळकर.
25 Jun 2008 - 9:17 pm | स्वाती दिनेश
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद,
स्वाती