याआधी : ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १
योदोबाशी आणि दाई याई
बाहेर पडल्यावर समोरच दिसली ए/सी लिमोसिन बस!गुबगुबीत ऐसपैस खुर्च्या, झुळझुळीत पडदे असलेली गुलाबी रंगाची देखणी ,प्रशस्त बस!अतिशय नम्रपणे सुटाबुटातला एक जपानी चेहरा अभिवादन करून तिकिटे देत होता.तोच होता आमच्या बसचा चालक.गुळगुळीत रस्त्यावरुन,उड्डाणपुलावरून बस धावू लागली १०० किमी च्या ही जास्त वेगाने.अतिशय शिस्तीत जाणारीवाहने,सिग्नल न तोडणारे वाहन चालक,बसबरोबरच एका बाजूने धावणारा समुद्र,उजवीकडेच असलेले अतिभव्य टेंपोझान (जायंट व्हील्),युएसजे स्टुडिओ.. दिनेश एकेक गोष्टी दाखवत होता आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी मी ते सारे दृश्य मनात साठवून घेत होते.
प्रवासाचा शीण काही नव्हताच,तासाभरातच आम्ही घरी पोहोचलो.जपानमध्ये जागेची आत्यंतिक टंचाई असल्याने अति लहान लहान सदनिका आहेत, १२* १२ च्या जागेत आख्खे घर! म्हणजे एक किचन कोपरा,लहानसे न्हाणीघर आणि झोपण्याची जागा! अशा खोल्यांतून तीन/चार महिने राहून शेवटी दिनेश आणि त्याच्या २ सहकार्यांनी मोठी सदनिका घेऊन एकत्र राहण्याचे ठरवले,त्यादॄष्टीने प्रयत्न करून घर मिळवले आणि आता त्या नवीन घरात येणारी मीच शेवटची मेंबर होते.बाकीची मंडळी आधीच येऊन पोहोचली होती.
दुसर्याच दिवशी सकाळी आम्ही नांबाला जायचे ठरवले.आम्ही म्हणजे इतरांनी ठरवले,मला तिथे पोहोचून २४ तासही झाले नसल्याने नांबा हे गावाचे नाव आहे एवढीच माहिती मला बाकीच्यांच्या बोलण्यातून समजली. जपानची एलेक्ट्रॉनिक गुड्स मधली प्रगती तर सार्या जगाला माहित आहे पण प्रत्यक्ष पाहताना अक्षरशः चकित व्हायला होतं.रस्तेच्या रस्ते दुतर्फा मोठमोठया शो रुम्स्,मजलेच्या मजले नुसते कॅमेरे,डिजिटल कॅमेरे,विडीओ कॅमेरे वॉकमन्स आणि कितीतरी अशा वस्तू की ज्यांची नावंही माहित नसतील.अक्षरशः अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखी स्थिती झाली. 'योदोबाशी' ही ७ मजली इमारत फक्त कॅमेर्यांची शो रुम! मी स्वत:लाच एक चिमटा काढून स्वप्नात नसल्याची खात्री केली.
इथे येऊन ३,४ दिवस झाल्यावर सुप्रिया आणि मी दोघींनीच 'दाई याई ' या प्रसिध्द सुपरमार्केटात जाऊन रोजच्या लागणार्या वस्तू आणण्याचा बेत केला.बेत केला म्हटले अशाकरता, की ते दुकान आमच्या घरापासून साधारण ३ किमी दूर,रस्ता सरळ नाही,एकदा उजवीकडे वळा मग डावीकडे जा,परत डावीकडे वळा...असला आणि त्यात माझे दिव्य दिशाज्ञान!तो मार्ग लक्षात ठेवूनच तिथे जाणे भाग होते कारण भाषेचा प्रश्न!एकदाचे तिथे पोहोचलो.एवढ्या प्रचंड दुकानाला ५,६ दारं! आता कोणत्या दारातून आत शिरलो हे लक्षात ठेवणे आवश्यक ,नाहीतर जत्रेत हरवल्यासारखी स्थिती होणार आपली! स्वतःलाच बजावत होते.आजूबाजूला असलेल्या पाट्यांवरचे एक अक्षर समजेल तर शपथ! शेवटी 'खुणा' लक्षात ठेवल्या.बाहेर असलेले मोठ्ठे आइस्क्रीम पार्लर( आता आम्हाला अशाच खुणा लक्षात राहतात!),समोरच असलेल्या चौकातली बेकरी आणि 'वॉशिंग्टन' अशी रोमन लिपीत पाटी असलेलं एक दुकान ,जी एकमेव पाटी आम्हाला वाचता आली.असं सगळं डोक्यात ठेवून आम्ही दोघी सरकत्या जिन्यावरून धडधडत्या मनाने आत शिरलो,हव्या असलेल्या वस्तू आधी शोधल्या ,मग घेतल्या आणि काऊंटर पाशी आलो.'येन' मध्ये यशस्वी रीत्या बिल देऊन बाहेर आल्यावर काहीतरी मोठ्ठेच काम केल्याच्या थाटात बाहेरच्या लाऊंजमध्ये बसलो.लहानपणी एकट्याने दुकानात जाऊन केलेल्या खरेदीचा जो आनंद असतो ना,तसंच काहीसं वाटत होतं. नंतरच्या काही दिवसातच हे दाई याई, तिथले लोक,तो परिसरच आमचे दोस्त बनून जातील,याची त्या दिवशी आम्हाला काहीसुध्दा कल्पना नव्हती.
प्रतिक्रिया
25 Sep 2007 - 10:07 pm | प्रमोद देव
पण खूपच त्रोटक लिहिलेत ह्यावेळी.पुढच्या वेळी जरा मोठे लिहा.
26 Sep 2007 - 5:20 am | गुंडोपंत
वा! मजा येते आहे. अजून मोठा चालेले लेख.
शिवाय प्रकाश्चित्रे द्या ना?
आवडतील!
शिवाय रुपया/येन विनिमय दर वगैरे गोष्टीही चालतील ;)
हे चलन कसे दिसते याची पण चित्रे द्या.
आपला
गुंडोपंत
27 Sep 2007 - 8:21 pm | लिखाळ
गुंडोपंतांशी सहमत,
प्रकाशचित्रे, येन चे चित्रं वगैरे सुद्धा द्या .
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
26 Sep 2007 - 7:22 am | सहज
पण जरा विस्तार करून, म्हणजे ते छोटे घर पाहून कसे वाटले...घर स्वतंत्र हवे की शेअर करून....
छायाचित्र (ते काम आता माझ्यावर तर नाही ना :-)) असती तर अजून मजा. 'योदोबाशी' उमेडा कि आकीबा कळ्ले नाही म्हणून लावले नाही. ;-)
सरकता जिना अर्थात एस्केलेटरचा सराव व्हायला लागलेले २ दिवस. किंवा मॉलमधे दिसणारे इतर भारतीय, त्यातील कोणा जेष्ठ महीलेची साडी, पर्स, पिशवी एका हातात किंवा काखोटिला धरून व दुसर्या हातने सरकत्या जिन्याच्या कठड्याचा आधार घेत पार केलाला प्रवास व शेवटच्या टोकाला पोहचल्यावर "हुश्य केला बाई गड सर"सुटलेला हासरा चेहरा...
>>बाहेर असलेले मोठ्ठे आइस्क्रीम पार्लर( आता आम्हाला अशाच खुणा लक्षात राहतात!),
आवडले :-)
26 Sep 2007 - 8:47 am | बेसनलाडू
दोन्ही भाग वाचले. छोटेखानी, परंतु सहज आणि ओघवते वर्णन केले असल्याने खूप आवडले. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे.
(वाचक)बेसनलाडू
29 Sep 2007 - 12:55 pm | स्वाती दिनेश
अत्यानंद,गुंडोपंत,लिखाळ,सहज,बेसनलाडू
सर्वांना मनापासून धन्यवाद, लेख लहान झाला आहे याची जाणीव आहे,किंबहुना भाग १ व २ एकत्र केले असते तरी चालले असते असे वाटते.(पण एका वेळी टंकायचा कंटाळा आणि इथे मनोगतासारखी थोडे थोडे टंकून नंतर प्रकाशित करायची सोय नाही असे वाटते.म्हणजे दुसरीकडे कुठेतरी टंकून नंतर कॉपी/पेस्ट करावे लागेल! त्याचाही आळस!)
चित्रे देणार आहे( सहज राव, तुम्ही दिलीत तरी चालेल हो:)) फक्त जपान वारीला अनेक वर्षे (सुमारे ५) लोटल्याने आणि मध्यंतरी संगणक बदलल्याने चित्रे जरा शोधावी लागतील(तेच करतेय!).येन ची सुध्दा तीच स्थिती आहे,येन मी बरोबर आणले आहेत आणि 'अत्यंत व्यवस्थित' ठेवले आहेत त्यामुळे त्यांच्याही शोधात आहे.
जपानी चलन फक्त येन च आहे.म्हणजे रु/पैसे, डॉलर्/सेंट, युरो/सेंट असे काही नाही.
१,२ ,५,१०,२०,२५,५०,१००,२०० येनची नाणी असतात आणि
५००,१०००,१०००० येनच्या नोटा असतात.
१०० येन= ४० रु. हा विनिमय दर तेव्हा होता,आताही त्याच्याच आसपास असावा.
स्वाती
29 Sep 2007 - 10:09 am | विसोबा खेचर
लेख छोटेखानी, परंतु छान झाला आहे. चित्रेही टाक..
पुढचा लेख येऊ दे...
दिनेशला नमस्कार सांग. म्हणावं, 'तात्या आठवण काढत होता!' :)
तात्या.
30 Sep 2007 - 7:27 pm | स्वाती दिनेश
तात्या,
सांगितले हो दिनेशला तू आठवण काढत होतास ते,त्याने तुला पोस्टकार्ड धाडले आहे म्हणे,
चित्रे ही टाकणार आहे,पुढचा लेख लवकरच टाकते.
स्वाती