ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१०

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
6 May 2008 - 1:10 pm

या आधी :ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९
ओकायामा ज्यू

ओकायामा कॅसल पाहण्यासाठी कागीयामासान बरोबर जाण्याचे ठरले.बरोब्बर ९ वाजता आम्ही सुमा गावात पोहोचलो,तो गाडी घेऊन तयारच होता.ढगाळ पण कुंद नाही अशी सुखद गारवा असलेली हवा,वार्‍याच्या मध्येच येणार्‍या झुळूका आणि डेकमध्ये लावलेल्या मंद संगीताची जोड!त्यात आणि जातानाचा रस्ता इतका सुंदर होता.दोबाजूला हिरवी मखमल पसरली होती.भाताची इवली रोप डोलत होती.एका डौलदार वळणानंतर मात्र एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला आणि समोर दूरवर डोंगर दिसू लागले.सार्‍या हिरव्या रंगछटांची उधळणच होती तिथे. हळूहळू डोंगरांवरची हिरवाई कमी होऊ लागली.आणि नुसते काळे,तपकिरी कातळ दिसायला लागले. "इथे दगडांच्या खाणी आहेत."कागीयामाने जणू आमच्या मनातला हिरवा प्रश्न ओळखून लगेचच उत्तर दिले.डोंगरांच्या कुशीतून मोठमोठे बोगदे खोदले आहेत आणि माया टनेल,निशीवाकी टनेल अशी नावाची पाटी, बोगद्याची लांबी आणि तो बोगदा कधी खोदला ते साल अशा माहितीच्या पाट्या बोगद्यात शिरतानाच खोदलेल्या दिसतात.लांबच लांब बोगदे,दोन्ही बाजूंनी घातलेले रेलिंग, अंतरा अंतरावरचे संकटकाळासाठीचे टेलिफोन या सार्‍याची त्यावेळी नवलाई वाटत होती कारण आपला मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे सुध्दा तेव्हा पूर्ण झाला नव्हता.

१५९७मध्ये बांधलेला हा पुरातन कॅसल, ओकायामाज्यू !त्याच्या काळ्या बाह्यांगामुळे त्याला क्रोज्यू/ क्रोकॅसल असेही म्हणतात.दुसर्‍या महायुध्दात विमानातून केलेल्या बंबार्डिंगमुळे उध्द्वस्थ झाला होता. परंतु १९६०च्या सुमाराला तो परत पहिल्यासारखा उभा केला. भारतासारखीच इथेही लहान लहान राज्ये होती आणि सरदार,उमराव,राजे ती चालवित असत. पुढे कित्येक वर्षांनी एकसंध राजवट चालू झाली.जपानमधील ९ मुख्य कॅसल पैकी हा एक महत्त्वाचा कॅसल !

असाही नदीच्या तीरी कोराकुवेनबगिचाला खेटून उभा असलेल्या ओकायामाज्यूचा काळा रंग त्या हिरवाईत मोठा उठून दिसतो. क्रोज्यूच्या सभोवताली बगिचा,पाण्याचे लहान लहान हौद,पुष्करणी ,कारंजी आहेत.त्यात सुंदर,रंगीत मोठमोठे मासेही आहेत. हे सारे हौद,पुष्करणी एका मोठ्या तलावाला आतून जोडले आहेत.बगिच्यात निरनिराळी फुलझाडे,शोभेची झाडे अतिशय रेखीवपणे वाढवून त्यांची निगा राखलेली दिसते.ठिकठिकाणी बसण्यासाठी दगडी वा लाकडी बाकं आहेत पण ती बांधीव नाहीत तर नैसर्गिक आकारातून तयार झालेल्या ओबडधोबड पायर्‍या,बाकडी सुंदरतेत अधिकच भर घालतात.बागेमधल्या त्या दगडी पायर्‍यांवरून जाताना मला उगाचच लेण्याद्रीच्या डोंगराच्या ओबडधोबड पायर्‍या आठवत होत्या. त्या पुरातन वास्तूला आणि तिथल्या परिसराला न शोभणारं असं कोणतंच बांधकाम तिथे नाही.पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न अगदी त्या कॅसलच्या परिसरात असणार्‍या उपाहारगृहातही दिसतो.पारंपरिक जपानी बैठकीवर वज्रासनात बसून वाडग्यातून हाशीने(चॉप स्टिक्स)जेवायचे.
ह्या सहा मजली ज्यू मध्ये ४थ्या मजल्यापर्यंत लिफ्टने जायचे आणि गतवैभवाच्या खुणा पाहत खाली उतरायचे अशी आधुनिक सोय मात्र आहे.एकेका मजल्यावर जुन्या कालातल्या गतखुणा जपून ठेवल्या आहेत. स्वयंपाकाच्या जुन्या चुली,भांडी,ताटल्या,वाडगे त जुनी शस्त्रास्त्रे, कपडे, खेळणी,पारंपरिक किमोनो ,सावकाराची पेढी,जुने तराजू ,वजने अशा अनेक गोष्टी मांडून ठेवल्या आहेत. त्या पाहत अस्ताना जपानीत रेकॉर्ड केलेली त्या किल्ल्याची माहिती ठराविक वेळाने लावतात.
एका मजल्यावर जुनी खेळणी ठेवली आहेत.सागरगोटे आणि लगोरीशी साधर्म्य असणारे खेळ तिथे होते.त्यांची जपानी नावे आठवत नाहीत पण आम्ही त्यांचे सागरगोटे आणि लगोरी असेच बारसे केले. महत्त्वाचं म्हणजे ते बंद काचेआड नव्हते तर लोकांना खेळण्यासाठी खुले होते.सानथोर सारे जण तिथे खेळत होते आणि आपले खेळून झाल्यावर खेळ जागेवर ठेवून पसारा आवरून जात होते.तिथे कोणीही रखवालदार नव्हता पण लगोरीतली चकती किवा सागरगोट्यातला एखादा सागरगोटा तिथून हरवला नव्हता.आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये हरवलो.कागीयामासानने जेव्हा भानावर आणले तेव्हा पुढचे पहायला निघालो.
एका ठिकाणी पारंपरिक राजघराण्यातील किमोनो होते.असे किमोनो 'दाई मारु' सारख्या अत्यंत महागड्या दुकानाच्या काचेआडच फक्त पाहिले होते आणि त्याच्या किमतीत एक दोन पैठण्या येतील असा सूज्ञ विचार करून किमोनो घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवला होता आणि पैठणी घेण्यासाठी भारतात जाणे आणि तसे काही कारण असणे असे दोन्ही इतक्यात शक्य नसल्यामुळे माझ्या किमतींच्या तुलनेपासून दिनेशला तूर्त तरी धोका नव्हता.
हे किमोनो विशिष्ट पध्दतीने बांधायचे असतात,ते बांधून द्यायला एक ललना तिथे होतीच आणि ते तसे बांधून फोटो काढू शकतो ही माहिती कागीयामाने पुरवली,मग काय ?आम्ही सर्वांनी किमोनोची औटघटकेची हौस 'सुगोई' सुगोई' (सुगोई- ग्रेट!,मस्त!)करत भागवली. आमच्या सुगोई मुळे तिची जपानी शिनकानसेन भरधाव सुटली.मग मात्र कागीयामाला पुढे करावे लागले.कारण तेवढ्या चारदोन शब्दांच्यापुढे आमचं जपानीज्ञान संपत होतं.
एका मजल्यावर मोठमोठे कोच ठेवले आहेत आणि समोर भिंतभर पडदा!ओकायामाचे चित्र पडद्यावर दिसते आणि सुरू होते ओकायामाची कहाणी! हा एक विलक्षण अनुभव आहे,पुलंच्या मिस्टर सानफ्रांसिस्कोमधला 'घिराडेलीचा सिनेमा' सारखा आठवायला लागला.त्याच तंद्रीत परतीच्या प्रवासाला लागलो.
इप्पोनमात्सु व्ह्यु पाँईट ला कागीयामाने गाडी थांबवली तेव्हा इतिहासाच्या तंद्रीतून बाहेर आलो.त्याने न बोलता फक्त समोर बोट दाखवले. दूरवर दिसणार्‍या टेकड्या,त्यांच्या अंगाखांद्यावरच्या असंख्य इमारती,मोठ्या दिमाखात उभा असलेला तो आकाशी कायकोयो पूल आणि त्या बेटाला वेढून टाकणारा अथांग सागर, एखादा नावेचा ठिपका,सागराच्या क्षितिजाला टेकलेले आकाशातले ढग आणि नीरव शांतता! त्या नि:शब्दतेला छेद न देता किती वेळ तसेच पाहत राहिलो.

आजचा दिस गोड झाला होता!

प्रवासलेख

प्रतिक्रिया

अन्जलि's picture

6 May 2008 - 1:38 pm | अन्जलि

मस्त फोतो खुप अवद्ले लेख पन मस्त आहे

धमाल मुलगा's picture

6 May 2008 - 1:40 pm | धमाल मुलगा

आईशप्पथ...
काय चिकणा आहे जपान....
स्वातीताई, मस्तच!

वर्णनही नेहमीप्रमाणे ओघवतं...

आवडलं! फोटो पाहून ह्यापेक्षा फार काही बोलूच शकत नाही!

आनंदयात्री's picture

6 May 2008 - 2:13 pm | आनंदयात्री

म्हणतो, या मालिकेतला हा अजुन एक सुंदर लेख !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2008 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओकायामा कॅसल ,हिरव्या रंगछटांची उधळण,गतवैभवाच्या खुणा, सागरगोटे आणि लिंगोरच्या, आकाशी कायकोयो पूल या सर्वांचेच सुंदर वर्णन आणि कळस म्हणजे लेखावर पांघरलेली सुंदर छायाचित्रे !!!

धमाल मुलगा's picture

6 May 2008 - 2:47 pm | धमाल मुलगा

लेखावर पांघरलेली सुंदर छायाचित्रे !!!

मस्त शब्दप्रयोग....पटकन आवडून गेला.

सहज's picture

6 May 2008 - 4:30 pm | सहज

ओकामाया कॅसल, ती बाग, कोई मासे असलेले जलाशय, ते वर्णन, फोटो ..सगळेच अप्रतिम

अतिशय सुंदर सहल!!

नंदन's picture

6 May 2008 - 11:06 pm | नंदन

म्हणतो. हा भागही आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शितल's picture

6 May 2008 - 6:17 pm | शितल

एका मजल्यावर जुनी खेळणी ठेवली आहेत.सागरगोटे आणि लगोरीशी साधर्म्य असणारे खेळ तिथे होते.त्यांची जपानी नावे आठवत नाहीत पण आम्ही त्यांचे सागरगोटे आणि लगोरी असेच बारसे केले. महत्त्वाचं म्हणजे ते बंद काचेआड नव्हते तर लोकांना खेळण्यासाठी खुले होते.सानथोर सारे जण तिथे खेळत होते आणि आपले खेळून झाल्यावर खेळ जागेवर ठेवून पसारा आवरून जात होते.तिथे कोणीही रखवालदार नव्हता पण लगोरीतली चकती किवा सागरगोट्यातला एखादा सागरगोटा तिथून हरवला नव्हता.आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये हरवलो .

छान वर्णन आहे, आणि फोटो ही छान आहेत.

बेसनलाडू's picture

6 May 2008 - 9:42 pm | बेसनलाडू

नेहमीप्रमाणेच सुंदर वर्णन व छायाचित्रे. शेवटचे चित्र पाहून सॅन फ्रान्सिस्कोचे गोल्डन गेट व बे ब्रिज डोळ्यांसमोर आले.
(कॅलिफोर्नियन)बेसनलाडू

चतुरंग's picture

6 May 2008 - 9:51 pm | चतुरंग

(स्वगत - गोल्डन गेट बघून ४ वर्षे झालीत पुन्हा बघायला हवा! )

चतुरंग

यशोधरा's picture

6 May 2008 - 10:00 pm | यशोधरा

सुरेख फोटोग्राफ्स आणि लेख!

मदनबाण's picture

6 May 2008 - 10:09 pm | मदनबाण

सुंदर सचित्र लेखन.....

त्या नि:शब्दतेला छेद न देता किती वेळ तसेच पाहत राहिलो.
खरच..... सागराच्या क्षितिजाला टेकलेले आकाशातले ढग पाहताना असेच वाटते.

(नि:शब्द झालेला)
मदनबाण.....

विजुभाऊ's picture

6 May 2008 - 10:54 pm | विजुभाऊ

मस्त वर्णनः आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये हरवलो
तुमच्या वर्णानात हरवलेला विजुभाऊ

वरदा's picture

6 May 2008 - 11:12 pm | वरदा

वर्णन...दरवेळी वाट्टं वाचल्यावर एकदातरी यावच तिथे..पाहू योग येतो का...

विसोबा खेचर's picture

6 May 2008 - 11:54 pm | विसोबा खेचर

लेखमाला अतिशय छान, नेटकी होत असून संग्रही ठेवावी अशीच आहे. जपानला जाऊ इच्छिणार्‍या एखाद्या नवख्याला या लेखमालिकेवाचून अधिक दुसरे काही उपयोगी पडेल असे वाटत नाही!

शेवटचा फोटू क्लासच आहे!

अभिनंदन स्वाती. जियो..!

पुढचे भागही येऊ देत...

आपला,
(जपानी) तात्या.

चित्रा's picture

7 May 2008 - 4:05 am | चित्रा

जपानची सहल चांगली होते आहे. मस्त झाला आहे लेख.

ईश्वरी's picture

7 May 2008 - 1:08 pm | ईश्वरी

छान वाटले. शीर्षक आवडले. समर्पक आहे. ले गई दिल 'दुनिया' जापानकी त्या हिन्दी गाण्याच्या ओळी बरोबर सुचल्या तुम्हाला. मूळ गाण्यातील गुडीया च्या जागी दुनिया शब्द एकदम फिट बसला आहे.

ईश्वरी

स्वाती दिनेश's picture

9 May 2008 - 11:54 am | स्वाती दिनेश

बे.ला,आकाशी कायकोयो ब्रिज गोल्डन गेट बे ब्रिज वरूनच बेतलेला आहे.
अंजली,धमाल,आंनदयात्री,प्रा.डॉ.,नंदन,सहजराव,शीतल,बे.ला,चतुरंग,यशोधरा,मदनबाण,विजुभाऊ,वरदा,तात्या,चित्रा,ईश्वरी..
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद!
स्वाती

प्रमोद देव's picture

9 May 2008 - 12:08 pm | प्रमोद देव

नेहमीप्रमाणेच सहजसुंदर लेखन आणि त्याची खुमारी वाढवणारी उत्कृष्ठ छायाचित्रे असा योग पुन्हा एकदा जुळून आलाय.
आता खरे तर स्वाती च्या लेखनाला पर्यायी शब्द म्हणून सहजसुंदर हा शब्दच वापरावा म्हणतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

स्वाती राजेश's picture

9 May 2008 - 9:17 pm | स्वाती राजेश

नेहमीप्रमाणे लेख खासच..सोबतचे फोटोही छान आलेत..
कॅसलचा फोटो मस्तच...कॅसलच्या आतील फोटो काढायला परवानगी नाही का?...

स्वाती दिनेश's picture

10 May 2008 - 7:22 pm | स्वाती दिनेश

प्रमोदकाका,स्वाती
अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद,
स्वाती

शिंगाड्या's picture

11 May 2008 - 6:59 pm | शिंगाड्या

स्वातीसान,
उगवत्या सुर्याच्या देशाला नमस्कार...
सुरेख श्याशिन आणि वर्णन

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 4:53 pm | स्वाती दिनेश

शिंगाड्यासान,अरिगातो गोझायमास!
स्वाती

सुधीर कांदळकर's picture

12 May 2008 - 5:50 pm | सुधीर कांदळकर

स्वर्गच दिसतोय.
चित्रात व लेखनात देखील. नेहमीप्रमाणेच प्रसन्न ओघवत्या शैलीतील वर्णन वाचायला मजा आली.
ते जपानी सौंदर्योपासक आपली सौंदर्यासक्त शैली.
बहोत खूब.

माझा परवाचा प्रतिसाद दिसत नाही. म्हणून पुन्हा दिला.
सुधीर कांदळकर.

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 6:56 pm | स्वाती दिनेश

माझा परवाचा प्रतिसाद दिसत नाही. म्हणून पुन्हा दिला.
धन्यवाद,सुधीरसान.

वा!!
तुमचे लेखन म्हणण्यापेक्षा शब्दयोजना मला फार म्हणजे फारच आवडते. इतके चपखल आणि चित्रदर्शी शब्दां-विशेषणांनी सजलेले वर्णन वाचणे म्हणजे पर्वणीच!
याहि लेखात 'हिरवा प्रश्न', 'दोबाजूने' आदी शब्दांबरोबरच "....त्या नि:शब्दतेला छेद न देता किती वेळ तसेच पाहत राहिलो" हे वाक्य फार आवडले. बाकी लेखही आधी म्हटल्याप्रमाणे सुंदर!

फोटो मात्र टिपिकल पर्यटक इस्टाईल वाटले. तुमची नेहेमीची कमाल मला जाणवली नाही. (यात फोटोपेक्षा माझे अज्ञान कारणीभूत असु शकते :) )

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

20 May 2008 - 12:47 pm | स्वाती दिनेश

ऋषिकेश,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
स्वाती