या आधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७
सुमा
सुमा गावातले सुमा ऍक्वेटिक पार्क आणि तेथील डॉलफिन शो आम्हाला कधीपासून खुणावत होता.शेवटी एका रविवारी तो योग आला.सुमा स्टेशनातून बाहेर पडले की आपण थेट पुळणीवरच उतरतो.समोरच दिसतो मंद गाजा देत असलेला प्रशांत महासागर!माडपोफळीऐवजी सायकस,पाईनची बनं!उन्हाळ्यातल्या उबदार शनिवार,रविवारी बरेच जण सायकली घेऊन किवा गाड्यात तंबू आणि कुत्र्यामांजरांसकट सारे कुटुंब भरून येथे येतात,डिंग्या,होड्या घेऊन पाण्याच्या लाटांवर स्वार होतात,समुद्राच्या कुशीत पोहायला जातात,बार्बेक्यू लावतात, चटया पसरून पहुडतात नाहीतर चक्क कागद आणि रंग घेऊन किनार्यावर वाळूत चित्र काढत रमतात.
एरवी शांत असणार्या त्या किनार्यावर तर उन्हाळ्यात जत्राच भरते. सगळ्या किनाराभर पालं ठोकली जातात,प्रत्येक स्टॉलवर ढिंच्याक संगीत चालू असतं, होड्या,वॉटर स्कूटर्स ,तंबू,चटया,बार्बेक्यू करायला ग्रील्स सुध्दा भाड्याने मिळतात.वाळूत फुटबॉल,व्हॉलीबॉल पासून कुस्त्यांपर्यंत खेळ चालू असतात.खानपानाचे स्टॉल लावलेले असतात.चक्क बुढढीके बाल आणि बर्फाचे गोळे सुध्दा मिळतात.घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.
पायाला गुदगुल्या करणार्या त्या पुळणीतून चालत आम्ही ऍक्वेटिक पार्क गाठले.सी ऑटर्स,पांढरे शार्क्स,महाकाय कासवं आणि खेकडे,जेलिफिश,ऑक्टोपस आणि परमेश्वराच्या पहिल्या अवताराची अनंत रुपं पाहताना भान हरपतं.ऍमेझॉनचं खोरंच तिथे उभं केलं आहे.झाडापानातून,जंगलातून वाट काढत आपण एका पाण्याच्या बोगद्यात येतो.काचेचा बोगदा तो!खाली,वर,डाव्या,उजव्या सर्व बाजूना पाणीच पाणी आणि त्या पाण्यात सळसळणारे मासे!काचेपलिकडून एखादा अवाढव्य मस्यराज अगदी आपल्या जवळ येऊन विचारपूस करतो तेव्हा आपल्यात आणि त्याच्यात फक्त एका काचेचं अंतर असतं! येथील 'फिश लाइव शो ' अशा पाटीने फार कुतुहल निर्माण केलं होतं मनात म्हणून तो शो पहायला थांबलो.एका ललनेने एका फिशटँकची एक कळ फिरवली त्याबरोब्बर एक बोर्ड टँकमध्ये लटकायला लागला.गटागटाने तेथे मग मासे आले.त्यांनी तोंडात पाणी घेऊन त्या बोर्डावर पिचकार्या मारल्या त्याबरोबर त्यावर लावलेले 'खाणे' खाली पडले ,ते मटकावून मासे सळसळत निघून गेले.थोड्या वेळाने दुसरा गट आला त्यांनीही तसेच केले. असे ३,४ गटांच्या पिचकार्या पाहून आम्ही पुढच्या टँककडे वळलो.त्यामध्ये सी इलची जोडी आळसावून पहुडलेली होती. टँकच्या तळाशी असलेल्या वाळूवर नुसते पसरलेले इलद्वय पाहण्यात आम्हाला काही विशेष स्वारस्य वाटले नाही आणि आम्ही पुढच्या टँककडे जाणार तेवढ्यात त्या मघाचच्याच ललनेने ह्या टँकमध्ये काही लहान,लहान जिवंत मासे सोडले. पाण्यात मासे सळसळू लागले आणि इलच्या जोडीच्या नजरेला पडले.त्यांच्यात शिवाशिवी सुरू झाली.इलना लहानगे चुकवण्याचा प्रयत्न करू लागले.पण लक्षात आले की तो खेळ नव्हता.जीव वाचवण्याची धडपड होती ती! इलची शिकार होती ती.जीवो जीवस्य जीवनम्।थोडेसे उदास होतच आम्ही पुढे निघालो.समुद्री सॄष्टीतले सारे जलचर ,उभयचर पाहत पाहत आम्ही डॉलफिनशोच्या जागेकडे निघालो. डॉलफिनसानना भेटण्याची ओढ असल्याने जरा लगबगीनेच आम्ही अगदी मोक्याची जागा पकडून बसलो.मंद संगीत सुरू होतं आणि समोरील पाण्यात डॉलफिनस् ची सळसळ सुरू होती. "कोन्निचिवा!"(हॅलो!) म्हणत एका जपानी बालेने संवाद साधायला सुरुवात केली.तिने आधी बोलावले सीलना! महाकाय,अवजड आणि जरा कुरुपच म्हणावेत असे ते सील आले आणि त्यांनी थोडावेळ डोंबार्याचा खेळ केला.मग आले पेंग्वीन सान!दुडुदुडु धावत ते दुसर्या टोकाला गेले आणि पटकन पाण्यात उड्या मारून सुळ्ळकन नाहीसे झाले.आम्ही मुख्य नायकांची वाट पाहत होतो एवढ्यात दोघी ललना आल्या ,एक मोठ्ठे "कोन्निचिव्हा"! आणि संगीताच्या तालावर त्यादोघींच्या गिरक्या सुरू झाल्या आणि पाण्यात एकदम हालचाल जाणवली.आत डॉलफिन्सच्याही गिरक्या सुरू झाल्या होत्या.ते गिरक्या घेतघेत उलटी उडी मारून,शेपटी वर करून ऐटीत उभे रहायचे.एकजण पाण्यात रिंग उंच धरुन उभा राहिला आणि डॉलफिनसानने एखाद्या कसरतपटूसारखी त्या रिंग मधून उडी मारली .. सिंपली मार्वलस!!!
संगीताच्या वेगाबरोबर डॉलफिन्सच्या गिरक्यांचा आणि उड्यांचाही वेग वाढला.पाणी बाजूला सारत,उंच उसळी घेत,आम्ही तुमच्याशी मैत्री करत आहोत असे सांगणार्या त्या हालचाली,त्यातली नजाकत,तो डौल केवळ अप्रतिम!पुढे अनेक ठिकाणचे डॉलफिनशो पाहिले पण सुमामधला तो खेळ मात्र त्यासम तोच!त्यांना सायोनारा करून जड पावलांनी तेथून पुळणीवरून चालत निघालो.परतीच्या वाटेवर तो तेजोमयी सूर्यही आम्हाला निरोप देत होता.
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 7:26 am | प्रमोद देव
स्वाती हाही लेख त्यांच्या उत्कट छायाचित्रांसकट उत्तम झालाय.पण.......... खूपच छोटा झालाय असे वाटते.
25 Feb 2008 - 8:13 am | विसोबा खेचर
घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.
क्या बात है..!
सर्वच चित्रं सुंदर! ५ डॉल्फिन असलेलं चित्रंही क्लासच...
परतीच्या वाटेवर तो तेजोमयी सूर्यही आम्हाला निरोप देत होता.
वा! सुंदर लेख..
तात्या.
25 Feb 2008 - 8:15 am | ऋषिकेश
छायाचित्रे नेहेमीप्रमाणे आवडली :).. त्यातही रिंगमधून उडी मारणार्या डॉलफिनचे (याला म्हणतात टायमिंग). लेख मात्र ओके ओके झालाय. थोडा चित्रबंबाळ वाटतोय :) म्हणजे चित्रे जस्त आणि लेख कमी :)असो असे होतं कधी कधी.. एखादी जागा मनाला खूप आवडते आणि लोकांनाहि त्या जागेबद्दल सांगावसं वाटतं पण ती जागा वर्णन करण्यापेक्षा अनुभवण्याची असते. तुमच्या चित्रांमधून तिथे जावेसे वाटते आहेच. पुढच्या तुमच्या खास चित्रदर्शी शब्दांनी नटलेल्या लेखाच्या प्रतीक्षेत :)
(आगाऊ चिकित्सक) ऋषिकेश
25 Feb 2008 - 9:22 am | प्राजु
स्वाती,
तुझ्या या छायाचित्रांमुळे लेखाला एक वेगळाच साज चढतो. खूपच छान झाला आहे हा सुद्धा लेख. - (सर्वव्यापी)प्राजु
25 Feb 2008 - 12:40 pm | सहज
सर्व चित्रे छान आहेत. गजबलेल्या थीम पार्क, बीच असे एकदम "टुरीस्ट प्लेसचे" चित्र उभे केले. :-)
हाही भाग आवडला.
अवांतर - जमल्यास जपानचा एक नकाशा काढुन आजवरच्या ८ भागातील वर्णीलेली ठीकाणे एका रेषेने जोडली तर आम्हा वाचकांना जपान मधुन कुठून कुठून फिरवून आणले आहे हे कळेल. :-)
25 Feb 2008 - 5:40 pm | वडापाव
छान फोटो आहेत. अजून पाठवा, आपला नम्र,
वडापाव
25 Feb 2008 - 9:15 pm | चतुरंग
रिंगमधून उडी मारणारा डॉल्फिन आणि सूर्यास्त केवळ!
घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.
काय मजेचं असतं हो हे काही वेळ तरी लहान होता येणं!
वाट पहातोय कधी हवा छान होते आहे आणि मी समुद्रावर जातोय पोहायला आणि पतंग उडवायला!
चतुरंग
25 Feb 2008 - 9:30 pm | सुधीर कांदळकर
दुस-याच परिच्छेदात छान वेग पकडला. तो लयीतच वाढत गेला आणि पाचवा तर लयकारी. मैफिल मस्त जमली. कधी कधी एखाद्या जमलेल्या मैफिलीत देखील एखादी दृत गत बाजी मारून जाते तसे झाले.
झकास. वाहवा.
पु भा च्या प्रतीक्षेत, शुभेच्छा.
25 Feb 2008 - 11:19 pm | सर्वसाक्षी
चित्रे आणि वर्णन - दोन्ही.
26 Feb 2008 - 1:02 am | विकास
छान लेख आणि छायाचित्रे स्वाती!
घसा बसेपर्यंत बर्फाचे गोळे खात,वाळूचे किल्ले करत,पाण्यात परत परत जात कितीतरी वेळ अगदी लहान होऊन बागडलो.
हे बोलके वर्णन वाचून आणि लहानमुलांची चित्रे पाहून, जगजीत-चित्राच्या एकदम खालील ओळी आठवल्या:
कभी रेत के उंचे झिलो पे जाना
घरोंदे बनाना, बनाके मिटाना
वो मासूम चाहत की तसवीर अपनी
वो ख्वाबो खिलौनोंकी जागीर अपनी
न दुनीया का गम था न रिश्तोके बंधन
बडी खुबसुरत थी वो जिंदगानी,
ये दौलत भी लेलो ये शहोरत भी लेलो भले छिनलो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटादो बचपन का सावन,
वो कागज की कश्टी वो बारीश का पानी
26 Feb 2008 - 1:43 pm | बेसनलाडू
लेखन आणि त्याहूनही मस्त छायाचित्रे. मजा आली स्वातीसान.
(आस्वादक)बेसनलाडू
27 Feb 2008 - 12:55 pm | स्वाती दिनेश
प्रमोदकाका,तात्या,ऋषिकेश,प्राजु,सहजराव,वडापाव,चतुरंग,सुधीरजी,सर्वसाक्षी,विकास,बे.ला सर्वांनाच मनापासून धन्यवाद.
मिपाचे रुपडे बदलत असताना नेमका मी हा लेख टाकला आणि थोडी गडबडच झाली.फोटो डिलोकेट होत होते त्यामुळे 'एच टी एम एल' मध्ये जाऊन ते डकवले पण लेख उघडायला त्रास होत होता,त्यामुळे तो पुनःप्रकाशित करावा लागला. नंतर फोटोंनी परत जागा सोडली आणि आकार फुगवला.त्याने लेख फोटोबंबाळ झाला,असो. अशा अडचणी येतच राहतात त्याचा जास्त बाऊ न करता पुढे जाणे महत्त्वाचे.पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
स्वाती