बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ?
बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही..
आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले...
एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल
प्रतिक्रिया
10 Jun 2015 - 4:09 pm | गणेशा
आज १० जून. १० -१२ दिवस ह्या थ्रेड वर पहिले लिहायचे असे ठरवले होते...
मस्त झाला हा थ्रेड .. विशेषकरुन पैजारबुवांचे रिप्लाय जास्त भावले...
नविनच काही सदस्य येथे लिहिलेले पाहिलेले.. खुप छान लिहिले त्यांनी एकदम आवडले... विशेषकरुन बाबुदादा आणि भाग्यश्री यांचे लिखान मस्त झाले..
इतर ही सर्वांनी खुप छान लिहिले आहे... सर्वांचे आभार
या धाग्यावर आनखिन लिहावे असे वाटत आहे.. परंतु कदाचीत थांबावे लागेल.. बघु.. आज तर लिहिल मात्र..
10 Jun 2015 - 4:27 pm | गणेशा
मी सुख आणि समाधान वेगळे माणतो ...
सुख हे स्वःमर्यादीत असते... समाधान मात्र सार्वभौम असते...
सुख म्हणजे माणासाने स्वतासाठी... स्वताच्या आनंदासाठी केलेल्या गोष्टी... समाधान म्हणजे फक्त स्वताचेच नाही तर इतरांचा ही आनंद जाणुन त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो ...
माणुस समाधानी असेल तर तो सुखी असतोच .. परंतु तो सुखी असेल तर तो समाधानी असेलच असे नाही...
संत महात्मे हे समाधानी होते... अनेक राजे सुखी होते....
रानात दिवसभर राबणारा..हिरवं जीवन फुलवणारा... दिवसात भाकरी-तुकडा जो मिळेल त्यात पोट भर खाणारा शेतकरी सुखी नसला तरी समाधानी असु शकतो ... आणि एसी मध्ये गलेलट्ठ पगार घेणारा माणुस.. चारचाकी.. ऐशोआरामात आयुष्य काढणारा माणुस सुखी असेल पण समाधानी असेलच का हे सांगता येत नाही...
सुख हे कधीच संपत नाही.. प्रत्येक सुखाच्या शेवटी दूसर्या सुखाचा माग दडलेला असतो ... आणि मग माणुस आपसुकच त्यावरुन चालत राहतो.. कदाचीत त्याचे ध्येयच त्या मार्गावरुन मार्गक्रमण करत असते...
समाधान तसे मनाला संतुष्ट करुन जाते... ते मनाला कधीच सुखाच्या मागावर धाडत नाही..
शेवटी माणासाने सुखी आणि समाधानी हे दोन्ही व्हायचे ठरवले तर त्याने समाधानी आधी व्हावे... नाही तर सुखाचे अनेक प्रवास करुन ही त्याला समाधाचा अर्थ काही सापडत नाही असे वाटते.
10 Jun 2015 - 5:42 pm | नाखु
पूर्ततेचे निकष अपेक्षा म्हणजे समाधान म्हणजे लाहान मुलानी बर्फाचा गोळा मागीतला किंवा फुगा मागीतला आणि त्याला तो मिळताच रडणे बंद झाले तर आपण उस्फुर्तपणे म्हणतो "झाले ना समाधान" म्हणून सूख हे सापेक्ष आहे.
परीस्थीती,मनुष्यस्वभाव्,सामाजीक्,आर्थीक स्थिती.म्हणजे ज्याला दोन वेळेच्या खाण्याची मारामार त्याला निवासी वॉचमनची नोकरी मिळाली अगदी खाऊन्-पिऊन तर तो समाधानी असेल पण सुखी असेलच असे नाही कारण पुर्वीची रिकाम्टेकडी उनाडकी आता करता येत नसेल. अश्या वेळेला वाटणारी खंत्/असमाधान हे आधिच्या परिस्थीतीशी तुलना केल्याने आलेली असते.
ज्यानी वारंवार नोकरी बदलली त्यांना याचा नक्कीच अनुभव असेल.
समाधानी असलेच पाहिजे पण समाधानी वृत्तीचा अतिरेकापोटी आणि "ठैविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान" याचा चुकीचा (सोयीस्कर) अर्थ लावून आळशीपणा+आपले सामर्थ्य न तपासण्याचा धोका वाढतो. समाधान हे कशाशी तुलना करणारे नसेल तर ते जास्त उपकारक निर्भेळ अस्ते. आनंदाचा पाया समाधान असेल तर त्याच्याप्रती तटस्थता येणे हे सुखाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. हा सर्वात निसरडा आहे. कारण यातच सुख मिळते असा भ्रम झाला की मन पुनःपुन्हा तेच मागते. अगदी आवडीचे जेवण-सिनेमा आपण सतत दोन्-तीन दिवस खाऊ-बघू शकत नाही म्हणजेच समाधान्+आनंद हा त्या क्षणापुरता असतो त्या सुखद क्षणांची उजळणी आठवण येणे म्हणजे तो क्षण जगणे.
गणेशा जेव्हा कॅमेर्याचा शोध लागला नव्हता किंवा तो जास्तच महागडा होता तेव्हा आपण लग्न्+सहल्+वाढदिवस साजरे करीत नव्हतो का ?करीत होतो पण ते क्षण टिपण्याच्या नादात समारंभाला आलेल्या लोकांशी धड नीट बोलता येत नसेल तर नक्की सोय की गैरसोय हे ठरविण्याची वेळ आली आहे.
म्हणून सुख-समाधान आणि आनंद याबाब्त कुणाचेही लगेचच एक्मत होणार नाही.
10 Jun 2015 - 4:45 pm | गणेशा
आज १० जून, आयुष्याची नविन सुरुवात ... आज ३३ पुर्ण झाले... विश्वास बसत नाहिये ... दिवस किती फास्ट चालले आहेत ना.. आयुष्यात काही भरीव करुन मागे आपले नाव ठेवुन जावे असे काही मनात नाहिये... पण सहज मिळुन गेलेले आयुष्य सुखा समाधाना ने जगुन जेव्हडे क्षण मिळाले ते निट उपभोक्ता/जगता आले पाहिजे असे सामान्य माणसा प्रमाणे मला वाटते... पण हा वेळ असाच इतका पटकन निघुन गेला तर आयुष्य जगायचेच राहिले अशी बोच आयुष्याच्या शेवटी वाटत राहिल काय असे सहज वाटुन ही वाईट वाटले...
आयुष्यात माणसाने आपल्याला सर्वात जे आवडते ते तरी मनसोक्त करावे असे वाटते... मला फिरायला आवडते.. निदान निटसे .. निरोगी आयुष्य आहे तोपर्यंत मनसोक्त फिरुन घ्यायचे ठरवत आहे..... काय माहीत उद्या चाळीसी नंतरच उडेल बल्प झालो तर .... ?
असो... आज आनंदाचा दिवस आहे.. चांगलेच विचार करु या... पुढच्या वर्षी लेह - लडाख ट्रीप मनाशीच फिक्स करतोय .. निसर्ग माणसाने निसर्गात जावून अनुभवावा असे मला नेहमीच वाटते... निसर्ग कागदावर--शब्दातुन कधीच अनुभवता येत नाही... माणुस फक्त वाचुन --चित्रात पाहुन फक्त मनाची कल्पना करुन घेतो की आपण तो अनुभवला ..आणि आनंदी होतो.. निसर्ग जोपर्यंत डोळ्यातुन आत उतरत नाही तोपर्यंत त्याची नशा कळत नाही असे वाटते...
आज बुधवार , सुट्टी नाहीच... त्यामुळे शनिवार/रविवारी बायको बरोबर लवासाला जावूया म्हणतोय .... नोव्हें-डिसेंबर मधील ट्रीप सुद्धा राजस्थान/सिंधुदुर्ग हे फायनल केले पाहिजे... बहुतेक कोकणच करावे.. म्हणजे लेह साठी पैसे पुरतील ....
असो.. प्रत्येक १० जून ला असेच अनेक प्लॅन फायनल होत राहतात.. काही पुर्ण होतात.. काही तसेच मनात घर राहुन राहतात...
10 Jun 2015 - 6:12 pm | गणेशा
@ नाद ..
कॅमेर्याचा शोध.. मोबाईलचा शोध ही क्रांती आहे.. पण त्याचा अतिरेक वाईट ... जुन्या स्मृती जपुन ठेवाव्यात म्हणुन कॅमेराचा उपयोग योग्यच.. पण माणुस आजकाल हे विसरत चालला आहे हे मान्य...अतिरेक वाईटच.. समारंभ माणसे महत्वाची.. त्यांच्याशी बोलणे महत्वाचे की वेगवेगळ्या अॅंगल ने फोटो काढत बसुन वेळ घालविने महत्वाचे हे ज्याने त्याने ठरविले पाहिजे... पण याचा अर्थ कॅमेरा - मोबाईल वाईट नाही तर तो हाताळण्याची आपली पद्धत चुकीची आहे हे मान्य करावे लागेल...
" ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान..." याचा चुकीचा अर्थ लावुच नये.. मुळात आळशी रहा असे हे वाक्य सांगत नाहिये ... ते सांगते आहे.. जसे आहे तसे आनंदी रहा.. सुखाच्या मागे न लागता निरपेक्ष आयुष्य जगताना समाधानी रहा...
सापेक्ष आवडीनिवडी म्हणजे सुख ही नाही.. समाधान ही नाही...
आनंदाचा पाया समाधान असावा.. हे अगदी योग्य.. असे असेल तरच तो माणुस समाधानी होतो .. कुठल्याही व्यक्तीसापेक्ष आवडीनिवडीतुन समाधान मिळत नसते.. कदाचीत ते सुख असु शकेल पण ते क्षणिक असते..
लहानपणी.. अगदी पिवळ्या धम्मक गवतातुन फुलपाखरांचा वेध घेणे पण मनाला समाधान देत असे.. तेंव्हा आनंद -समाधान या गोष्टी म्हणजे नक्की काय हे माहित ही नसत .. पण मनाचा एक निर्लोभ पणा.. इनोसंट पणा तेंव्हा होता.. तश्याच निर्लोप पणाने गोष्टींचा आनंद मिळवत गेले की समाधान मिळते..
त्या निर्लोभ मनाला लोभाचा .. अट्टाहासाचा... अहंकाराचा स्पर्श झाला की त्या मिळणार्या आनंदाला ही अर्थ रहात नाही.. आणि समाधान हे लोभाच्या कक्षेत कधीच येत नाही....
आनंद कदाचीत क्षणिक त्या घटकेपुरताच मर्यादित असु शकतो ... पण त्यातुन मिळणारे समाधान हे चिरतरुन असु शकते...
कोणाच्या आयुष्यात उपयोगी पडण्याचा आनंद त्या क्षणांमध्ये मिळत असेल.. पण त्या आनंदी क्षणांमुळे आपण कोणाच्या तरी आयुष्यात आनंद दिला हे समाधान चिरतरुण असेल....
शेवटी आनंद-सुख - समाधान-- ह्या बाबत प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असेल नाही असे नाही.. पण आयुष्यात माणुसकीने जगणे तर आपल्या हातात आहे.. त्यातुन काही नाही निदान थोडेसे समाधान मिळतेच
11 Jun 2015 - 1:07 am | किसन शिंदे
अतिशय सुरेख आहे हा धागा!
पैजारबुवा, मिका, गणेशा, रातराणी, जकुसर सगळ्यांचे प्रतिसाद सुंदर आहेत फार..
11 Jun 2015 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिसुंदर धागा... वारंवार परत उघडून एकाहून एक सरस कलाकृतींचा रस घ्यायला लावणारा...
12 Jun 2015 - 12:16 am | प्रसाद गोडबोले
खिडकित उभा राहीलोय । बाहेर मस्त ओलसर मातीचा अन त्यावरून येणार्या अलगद वारयाच्या झुळुकेचा आस्वाद घेत । निव्वळ रातकिड्याञ्च्या आवाज सोडले तर बाकी काही नाही । बस फ़क्त आपण 'एक' आहोत ही एक जाणीव । बस :)
12 Jun 2015 - 12:17 pm | गणेशा
@ प्रगो....
आपण 'एक' आहोत ही जाणीवच खुप आनंददायक असते ना.. मग भले आपण हे निसर्गा ला उद्देशुन म्हंटलो असेल... मित्रांना उद्देशुन म्हंटले असेल किंवा लाडक्या प्रेमिकेला म्हंटले असेल... ही जाणीव जीवनाला एक पुर्णत्व प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करते...
कधी कधी मात्र एकांतात ... रात्री रातकिड्यांच्या अवाजात.. अंधारात .. मन त्या अनामिक पोकळीला... त्या अल्हाददायक पण एकट्या असणार्या वातावरणाला उगाच छेद देत जाते... आणि मग ती अल्हाददायक पोकळी, मनाची जागा कधी व्यापते कळतच नाही .... मग आपल्याला विसर पडतो .. बाजुच्या जगाचा.. आणि एक गुढता निर्माण होते मनामध्ये.. आपण त्या मध्ये कधी खेचले जातो कळतच नाही....
12 Jun 2015 - 12:42 pm | गणेशा
पाउसाची रिमझिम मध्ये मध्ये चालू झाली आहे, मान्सुन उशीरा येणार असे पेपर मध्ये आले असले तरी ७ जून ला नेहमी प्रमाणे पावसाने हजेरी लावली होती... आराध्या झाल्यापासुन चा हा दूसरा पावसाळा... गेल्या पावसाळ्यात मात्र बाहेर फिरता आले नव्हते... यावेळेस ती कसर भरुन काढायची आहे... ६ जूनलाच तीला लोहगड ला घेवून गेलो होतो..दुडूदुडू पळत होती खुप... पवना डॅमला जायला ७ वाजले होते पण ...धावती भेट दिली होती... पवना डॅम च्या पाण्यात पाय बुडवून खेळण्यात आराध्याला मजा वाटली होती... ती अलगद पोहत आलेली बदके पण मस्त वाटली...
आज १२ जून आणि पुन्हा शुक्रवार आहे, उद्या पुन्हा मावळात फिरायलो जातो आहे.. बहुतेक 'लवासा' ला पण जाईल... लवासाला जातानाचा रोड मला खुप आवडतो.. जाताना खाली आलेले ढग.. .. बाजुला वाहणारी मुठा... शेतात काम करत असणारे शेतकरी.. मस्त वाटते खुप... लवासाला ४ वर्षापुर्वी गेलो होतो ... त्या नंतर ही पहिलीच वेळ ...
मन निसर्गाशी एकरुप झाले की मस्त वाटते... तो हिरवाजर्द थंड आल्हाद स्पर्श मनाला मोहहुन टाकतो .. एक नविन टवटवी घेवुन मन पुन्हा आनंदाने बागडू लागते...
12 Jun 2015 - 8:19 pm | प्रचेतस
साताठ वर्षांपूर्वीची गोष्ट, ग्रीष्मातले दिवस, ताम्हिणी घाटात गेलो होतो. निव्यापासून पुढे लोणावळा मार्गावर वळलो. कुठलासा आश्रम पार करताच आपला प्रवेश घनगर्द झाडीतल्या रस्त्यावर होतो. नितांतसुंदर रस्ता. झाडांच्या कमानीतून बाहेर येताच सर्वबाजूंनी भले उच्च पहाड सामोरे येतात. डावीकडे कुंडलिका दरी. दरीच्या पलीकडे नाव सार्थ करणारं अंधारबनचं घनदाट जंगल. कुंडलिका नदीचा उगम ह्या दरीतून. ही दरी सांधली गेलीय ती ह्या नदीच्या उगमाशी. सिनेर खिंडीत. ह्या दरीलाच लागून एक लहानसा तलाव. पिंपरी तलाव. पावसाळ्यात तर हा परिसर अक्षरशः स्वर्गच असतो. अनाघ्रात सौंदर्य.
तलावापाशी थोडा वेळ थांबून पुढे निघालो. भोवताली भले उंच कडे, उजवीकडे अधूनमधून चमकणारं मुळशीचं पाणी, उंच सखल, सतत चढउतार असणारा अतिशय खराब रस्ता. उन्ह अगदी रणरणत होतं. वाटेत करवदांची जाळी. करवंद खात खात जीवाभावाच्या मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो. . उकाडा मात्र अगदी प्रचंड होता. अचानक मळभ दाटून यायला लागलं. सोसाट्याचा वारा सुटायला लागला. सभोवतलाच्या डोंगररांगांना ढगांची सावली अगदी वेगाने पुढे पुढे सरकून व्यापून टाकू लागली. पावसाची लक्षणं दिसायला लागली. ह्यावर्षीचा पहिलाच वळीव. भांबर्ड्याचे सुळके ओलांडून ढगांच्या लाटा वेगाने गिरिशिखरे आक्रमू लागल्या. आभाळ गर्जू लागलं, विजा कडाडू लागल्या. पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. ओल्या मातीचा वास घमघमू लागला, पक्ष्यांची पळापळ होऊ लागली, गुरं हंबरू लागली. थोड्याच वेळात थेंबांचं रूपांतर कोसळत्या जलधारांत झालं. अशा पावसात झाडाखाली उभं राहणं फार धोक्याचं. ते टाळून आम्ही पावसात भिजू लागलो. ह्या वर्षीचा चिंब करणारा पहिलाच वळीव.
पाऊस नुसता धुव्वाधार कोसळतोय. आजूबाजूच्या डोंगरांतून पाण्याचे ओघळ वाहू लागलेत. गाराही टपटपू लागल्यात. वास्तविक गारपीट तशी ऐन सह्याद्रीत दुर्मिळ. ती शक्यतो मोकळवणात होते. पण ते आज इकडील दर्याखोर्यांतही अनुभवायला मिळतंय. आता तापलेली धरती थंड होतेय. सुखद वारा वाहू लागलाय. वातावरणात मस्तसा गारवा पसरलाय. धूळभरलं वातावरण स्वच्छ होतंय. सालतर ओल्यांडल्यावर दिसणारा कोरीगड नुकत्याच पडलेल्या पावसामुळे चमकून उठलाय. ग्रीष्म संपत आलाय. लवकरच आता मृग सुरु होईल. वळवाचे दिवस जाऊन खर्या अर्थाने पावसाला सुरुवात होईल. चोहोंकडे हिरवं हिरवं होईल...
13 Jun 2015 - 4:13 pm | यशोधरा
सुर्रेख!
13 Jun 2015 - 4:48 pm | पैसा
कातरवेळी किनार्यावर
फिकट वाळू अन
स्तब्ध माड उभे
स्तब्ध गढूळ सागर
अन आभाळही भरलेले
पाखरे घरट्यात परतलेली
आणि थांबलेला वारा
अवघे अस्तित्व
जणू वाट पहाणारे
अधीर, अपेक्षेत कसल्या
अन अचानक
अवघे चैतन्य
सळसळून येते झावळ्यांतून
कुंद आभाळातून
मेघांना दूर सारीत येते
एक लवलवती वीज
वार्याला सापडतो त्याचा वेग
आणि थेंब येतात नाचत
वार्याचे बोट धरून
तापलेली वाळू थंडावते
मायेने स्वागत करते
त्या पहिल्या वहिल्या थेंबांचे
14 Jun 2015 - 10:28 am | प्रचेतस
अफाट सुंदर.
13 Jun 2015 - 9:30 pm | किसन शिंदे
सुंदर लिहीलेय रे वल्ल्या!:)
15 Jun 2015 - 3:37 pm | गणेशा
कीती सुरेख वल्ली... मला माहीती होते तु खुप सुंदर लिहिशील... शब्दन शब्द चित्र डोळ्यासमोर उभा करतोय..
(एकोळी रिप्लाय देणार नव्हतो पण रहावले नाही... तरी ही प्रेरणा घेवून परवा फिरुन आलो त्याबद्दल थोडेशे लिहितो... )
13 Jun 2015 - 4:15 pm | यशोधरा
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
निसटल्या काही क्षणांचे
उरी विंधणारे शर..
**
आयुष्याची अनवट धून
सुरेल कधी अन कधी बेसूर
सप्तस्वरांचे हिंदोळे अन
पडे जीवा प्राणांतिक भूल
**
नात उमलाव अस,
घेऊन समर्पणाची जोड,
मनी रुजावी कृष्णाच्याही,
सखी राधेची ओढ
14 Jun 2015 - 10:28 am | अत्रुप्त आत्मा
गणेशा झिंदाबाद.
आज वाचला संपूर्ण धागा.
15 Jun 2015 - 3:54 pm | गणेशा
१३ जून, मान्सुन पुण्यात दाखल झाला... आणि आम्ही त्याला घ्यायलाच जणू मावळात वेशीवर गेलो होतो ....
जातानाच पावसाच्या प्रतिक्षेत असलेला मोर दिसला आणि मन आनंदून गेले... ढग रस्त्यावर आले होते.... सगळीकडे पांढर्या धुसर रंगाची पाखरण होती... मध्येच हलकेशी हवेची सुखद गार मिठी बसत आणि अंग रोमांचित होत होते.. सगळा निसर्गच जणू त्याच्या प्रतिक्षेत दंग झाला होता.. आणि आम्हा दोन मित्रांच्या लेकी त्या सुंदर वातावरणात काय निरागस पणे बोलत होत्या माहित नाही... निसर्ग माणसाला निरागसपणाचे ही लेण देत असावा असे वाटते... आणि थोड्या वेळाने आम्ही लवासा ला गेलो ... पोहचताच पाऊस ओ देवून धावून आला... मी आणि आराध्या येथ्थेच पावसात भिजलो... आराध्या बरोबर पावसात भिजण्याची ही पहिलीच वेळ.. पहिलाच पावसाळा... खरेच मन खुप प्रसन्न झाले... माणसाने निसर्गाचे स्वामित्व पत्करावे आणि त्याच्या सावलीत खुशाल वेळ घालवावा.. कसलीही चिंता न करता..
मित्रांना नर्गिस-राजकपुर सारखा फोटो हवा होता.. तो काढुन दिला... आम्ही मग ठिक आहे.. काढ बाबा आमचाही फोटो असे म्हंटले... खरे तर निसर्ग अनुभवताना फोटोचे ते असे काय अप्रुप.. पण बाळाबरोबरचे आठवण ....
परत येताना वाटेतील स्थानिक लोकांशी बोलत होतो.. काय तो गोडवा भाषेचा... एका आज्जींकडील सगळे गोड आंबे त्यामुळे विकत घेतले... काय अविट गोडी आंब्यांना पण आणि त्या बोलण्याला... निसर्गात मानुस ही असाच त्याच्या सारखा निर्लेप .. निकोप असतो असे माझे म्हणणे झाले आहे, निसर्गात कुठे ही जा.. ही गोडी.. ही माणुसकी अनुभवण्यास मिळतेच...
सईशा - आराध्या.. एक निरागस ठेवा
15 Jun 2015 - 4:01 pm | गणेशा
16 Jun 2015 - 12:10 pm | गणेशा
प्रत्येक वीकएंड ला फिरायला जायचेच असे बर्याच मान्सुन मध्ये ठरवत असतो... पण बर्याच वेळा ते शक्य झाले नाही.. या वेळेस मात्र पुन्हा तसा प्रयत्न करत आहे.. बघु कितपत यश येईल... प्रोजेक्ट चे टेंशन वेगळे आहे ते आहेच...
कधी कधी वाटते... आपल्याकडे भरपूर पैसा असता तर ही नोकरी केलीच नसती.. मस्त मनमुरादपणे आयुष्य जगण्यात पण वेगळीच मजा असेल नाही ? पण मग दूसरे मन विचार करते, मग आपल्याला संघर्षाची जाणिव राहिली असती का ?
असो .. काहीही असो.. याक्षणी तरी मला भरपुर फिरायला मिळत जावो बाकीचे काहीच नको अशीच भावना आहे...
बाहेर डोंगराने हिरवी वस्त्रे परिधान करायला सुरुवात केली आहे... सूर्याचा मेघांबरोबर लपंडाव खेळण्याची सुरुवात झालेली आहे... शाळेला रेनकोटमध्ये जाणारे ती इवलीशी पोरे आता पुन्हा रस्त्यावरती दिसत आहेत.. पाऊस कीती छान असतो ना सुंदर सुंदर आठवणी घेवून येणारा.. सुंदर आठवणी मागे ठेवून जाणारा...
17 Jun 2015 - 6:44 pm | गणेशा
आज कशातच मन नव्हते.. सगळ्या चिंता आ वासुन पुढे उभ्या राहिल्या होत्या..
होम लोन सोडुन बाकी सर्व देणे.. EMI.. बंद करण्याच्या खटपटीत ही खुप हाल झाले... नव्हे अजुन चालु आहेत.. कधी एकदा सुटतोय असे झाले.. प्रोजेक्ट सोडलाय पण पुण्यातली ट्रान्सफर कुठे रखडली आहे काहीच कळेना...
कधी कधी असे होते... पहिल्यांदा वाटत होते.. लोन घेतल्याशिवाय .. थोडी रीस्क घेतल्याशिवाय आयुष्यात पुढे कसे जाता येइल... थोडी रीस्क तो लेना पडेगा... आणि हळु हळु त्या पाशामध्ये कधी अडकलो ते कळलेच नाही.. ते पाश सोडवताना नाकीनऊ येत आहेत.. पण नक्कीच यातुन बाहेर पडेल...
मध्यमवर्गीय माणसाचे असेच असते... थोडेसे ठीक झाले की त्याला पुढच्याची हाव सुटु लागते.. आता विचार पक्का केलाय बस्स.. काही ही घेतले तरी नो EMI. अगदी 0 % व्याजावर पण कर्ज नकोच... गाडी घ्यायचे चालले होते.. डायरेक्ट २ वर्षे पुढे ढकलले आहे, जेंव्हा सगळी कॅश असेल हातात तेंव्हाच गाडी..
सुखी राहण्याचा आताशा हा एकमेव मार्ग वाटत आहे.. नाहीतर पगार हातात पडला ना पडला की लगेच कुठल्या EMI चे कीती पैसे हा हिशोब सुरु होतोय...आता या हिशिबाचाच हिशोब करुन टाकणार आहे एकदाचा.. खुप झाले...
घराची खालची रुम पण भाड्याने दिली... मित्रच आहे.. घरघुती डबा पण चालु केला.. तितकेच महिन्याला ६००० मिळतात... आता जमेचाच व्यवहार करायचा.. बस्स.. आणि जे असेल त्यात जगायचे.. कर्जावर तोरा मिरवण्यात काहीच अर्थ नाही... घर ही आतुन कर्जावर भरायचे नाही... तुर्तास कोणाचे तरी एक वाक्य मला खुप आवडले होते तेच आता खरे वाटत आहे...
" beauty lies in the emptiness"
19 Jun 2015 - 1:52 am | रातराणी
हल्ली मला काही सुचतच नाही,
किती वेळ पाहत राहते मी कोर्या वहीकडे,
समासाची लाल रेष काही केल्या ओलांडता येत नाही,
म्हणून मला हल्ली काही सुचतच नाही!
मला असते गुंफायची सुंदर आठवणींची शृंखला,
कितीदा ठरवते नाही पाशात अडकू द्यायचे मन वेडे,
पण धागा तुटू न देता हा गुंता काही सुटत नाही,
म्हणून मला हल्ली काही सुचतच नाही!
उधाणलेला समुद्र मी लपवते माझ्याच आत,
किती टाळणार हा अपूर्णतेचा प्रवास पूर्णत्वाकडे?
किनार्यावर सापडलेला शिंपला मला टाकताही येत नाही,
म्हणून मला हल्ली काही सुचतच नाही!
19 Jun 2015 - 3:01 pm | गणेशा
कोरी वही पण आज काल अशीच बाजुला पडलेली पाहिली की मन विषिन्न होते नाही...
नाही मनात खुप असते.. लिहावे.. वाचावे.. पण आजकाल वहीवरती स्वता काही मराठीत लिहिलेल्याही किती काळ लोटला आहे नाही...
दुरेघी वरुन एकेरीत आलो... नंतर हाफ स्केप वरुन फुल स्केप वरती आलो... त्या नोट्स.. त्या रेफरंन्स बुक मधुन काढलेले संदर्भ... त्यांची देवानघेवान ... आणि त्या देवानघेवानीत लपलेला एक लाजरा कटाक्ष...
आज अशी वही पाहिली की कॉलेजमधील तेसुंडर क्षण मनात तरळून जातात.. मन हळुच कोठे तरी हरवले जाते.. आणि सेजारील वही मात्र अजुन ही तशीच प्रतिक्षेत राहते.. आज काल हे असेच होते...
21 Jun 2015 - 5:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
तेच घड्याळ आणि तीच लगबग
तेच शेजारी आणि तीच बकबक
तोच युनिफॉर्म आणि तेच बुट
तेच प्रश्र्ण आणि तोच काथ्याकुट
तीच बाईक आणि तीच गर्दी
तोच धुर आणि तीच सर्दी,
तीच शटल आणि तेच टेबल
तेच सहकारी आणि तेच लेबल
तीच बाटली आणि तेच पाणी
तोच हेडफोन आणि तीच गाणी
तेच डेबीट आणि तेच क्रेडीट
तेच साहेब आणि तीच किटकीट
तोच संगणक आणि तीच इमेल
तेच रिप्लाय आणि तेच एक्सेल
तोच फोन आणि तोच मोबाईल
तोच पेन आणि त्याच फाईल
तेच डबे आणि तेच जेवण
तेच गॉसीप आणि तेच भांडण
तेच व्हिजिटर आणि तेच ऑडीटर
तीच सिक्युरीटी आणि तेच कॉंट्रॅक्टर
त्याच नोटीस आणि त्यांची तीच उत्तरे
तेच (कळकट) सरकारी ऑफिस आणि)तीच (त्यांची कळकट) दप्तरे
त्याच मागण्या आणि तोच रुबाब
तीच दारु आणि तेच तंगडी कबाब
तीच लसलस आणि तीच बकबक
तीच पाकीटे आणि तीच वखवख
तोच टिव्ही आणि त्याच मालिका
त्याच बातम्या आणि (बातम्या देणार्या) त्याच बालिका
तेच अंथरुण आणि तेच पांघरुण
तीच उशी आणि तेच ढेकुण
रोज रोज दिवस रात्र सारेच कसे तेच ते आणि तेच ते
काही बदल करावासा वाटला तरी मन प्रचंड घाबरते
त्या पेक्षा जे चालु आहे ते ठीक आहे असे मन ठरवते
आणि मग पुन्हा सुरु होते तेच ते आणि तेच ते
पैजारबुवा,
22 Jun 2015 - 4:28 pm | गणेशा
आमचे नशिब साला साथ देत नाही असेच म्हणावे लागेल.. ट्रान्सफर रीक्वेस्ट अजुन पेंडिंग दाखवत आहे... २६ ला प्रोजेक्ट संपेन.. मग ट्रान्स्फर बोंबलीच .... पुन्हा मुंबापुरी.. ऑन बेंच.... पुण्यासाठी प्रोजेक्ट सोडला.. पण पुन्हा मुंबईचा चांगला प्रोजेक्ट मिळायचा योग आला तर मॅनेजर चे पुन्हा मुंबई हवी होती तर आपल्याच प्रोजेक्ट्ला ये.,..
पण बदल झाला पाहिजे असे वाटते.. त्या साठी रीस्क घेत आहे.. आठ वर्षे झाली तेच ते काम करुन अगदी वीट आलाय.. मागुन शिकुन पुढे गेलेले पोट्टे पाहिले की वाटते.. आपले चुक्याच ... सगळे येत असताना, फक्त आराम आणि तेच ते करत बसल्याने आज आपण अजुनही येथेच आहे..
मनात मात्र थोडी ( जास्तच) भीती आहे, नाहीच मिळाला प्रोजेक्ट तर करायचे काय ?
असो तुर्तास तरी बदल हवाय याच गोष्टीवर ठाम आहे.. बघु आयुष्य कुठल्या वळणावर घेवून जाते ते...
बाकी आयुष्य तेच आहे...
19 Jul 2015 - 11:23 am | ज्ञानोबाचे पैजार
समुद्राच्या वाळूमधे फतकल मारुन बसलो होतो एकटाच,
दूरच्या, सतत रंग बदलणाऱ्या क्षितीजाकडे बघत,
कधी आशळभूत पणे, तर कडी दिनवाणे पणाने
मी त्या क्षितिजापर्यंत कधी पोचेन याचा विचार करत,
त्या क्षितिजाच्या मागे धावता धावता मी इथे पोचलो होतो,
पण या समुद्राने माझी वाट अडवून धरली होती,
माझ्या आणि माझ्या क्षितिजाच्या मध्ये उभा असलेला तो,
मला एखाद्या सैतानासारखा कृर आणि दुष्ट वाटत होता,
आपल्या मार्गातल्या या समुद्राचा अडथळा कसा दूर करावा?
पोहत पोहत क्षितीज गाठावे? कि एखादे होडके बांधावे ?
या विचारात मी गढ्लेलो असताना ,माझ्या पायाशी काहीतरी हुळहुळले
मी पाय जोरात झटकला, आणि खालच्या वाळूत बघितले,
माझ्या धक्याने एका शिंपला मोडून पडला होता,
आणि त्यातून एक मोती घरंगळाला होता,
मी तो मोती हातात घेउन निरखून पाहिला,
आणि आनंदाने बेभान होउन नाचू लागलो.
ज्या समुद्राला मी आतापर्यंत सैतान समजत होतो
त्यानेच माझे क्षितीज माझ्या मुठीत आणून ठेवले होते
त्या मोत्या मध्ये मला माझ्या क्षितिजाचे सर्व रंग दिसत होते,
आणि ते क्षितीज माझ्या खिशात सहज पणे मावत होते
चारचार वेळा समुद्राचे मनापासून आभार मानत,
मी समुद्राकडे पाठ फिरवून परत चाललो होतो,
मोठ्या निगूतिने आपले क्षितीज सांभाळत,
ते हरवले तर पुन्हा मिळणारा नाही याचे भान ठेवत,
चालता चालता मी सहजच समुद्राकडे म्हणून
मागे वळून पाहिले, पहातो तर काय?
ज्या क्षितीजाचा पाठलाग करत मी इतकावेळ वाया घालवला होता
ते क्षितीजच आता माझ्या मागे मागे येत होते
पैजारबुवा,
19 Jul 2015 - 4:36 pm | पैसा
सुपर्ब!
23 Jul 2015 - 7:47 pm | रातराणी
+१
मस्त!
19 Jul 2015 - 4:18 pm | पद्मावति
अगदी खरंय. कधी कधी आपण एखाद्या स्वप्नाच्या मागे धाव धाव धावतो. ते पूर्ण का होत नाहीये म्हणून जगावर चिडतो, दैवाला बोल लावतो. तेव्हा हे लक्षात येतं का की आपलं हे स्वप्न पूर्ण होणारच नाहीये....कारण त्याहूनही कितीतरी सुंदर, काहीतरी खास आपली वाट बघतय. म्हणतात ना की sometimes god's greatest gifts are unanswered prayers.
26 Mar 2016 - 12:54 am | शब्दबम्बाळ
दुनिया जिसे केहते है जादू का खिलोना है
मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है... :)
23 Jul 2015 - 9:21 am | गणेशा
पैजार बुवा ग्र८..
तुमच्या या लिखानामुळॅ पुन्हा लिहावेशे वाटत आहे... तुमचे विचार खुप छान असतात.. I like it
23 Jul 2015 - 9:28 am | गणेशा
आपल्या नशिबाला नावे ठेवण्यात अर्थ नाही... सर्व काही मिळते आहे.. फक्त जिद्ध हवी...
मध्यंतरी पुन्हा पहिल्या सारखे निर्मळ पाहिजेल तसे आयुष्य जगावे म्हंटले आणि तसा पर्यत्न केला..
पाहिजेल तशे फिरलो... न कशाची चिंता.. बॅचलर लाईफ जनु काही.. गावाला भेट दिली.. लहानपणीच्या मित्रांनाही..
त्या गल्ल्या.. त्या पेठा अजुनही ओळखीच्या खाना खुना जपुन आहेत... मैत्रीचा तो ओलावा.. तो गंध अजुनही तिथेच आहे...
मग बदलले काय आहे... बहुतेक बदललोय आपण... आपण पळतोय कशाच्या तरी पाठीमागे.. आणि हे असेच चालत राहिले तर काय माहीत माझा देश पण कधी तरी मला असाच अनोळखी झाल्यासारखा वाटेल अगदी माझ्या गावासारखा...
काही तरी केले पाहिजे हे नक्की
आणि एक ग्रेट न्युज ... रीस्क घेतल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही असे ऐकले होते.. आज तो आनंद होत आहे... बदल हवा म्हणुन प्रोजेक्ट सोडला.. मुंबई सोडुन पुणे हवे पण मिळत नव्हते... आयुष्य आपल्याला कुठे न्हेत राहिल असे वाटत होते... पण सर्व ठिक झाले... आणि पुण्यात प्रोजेक्ट मिळाला.. आता बाळाबरोबर मनसोक्त दिवस घालवता येतील
23 Jul 2015 - 1:53 pm | प्रसाद गोडबोले
काहीकाही खुप छान आहे पण अता दवणीय वाटायला लागलं आहे .
ह्या भावना बिवनांन्ना काही अर्थ नाही ... निव्वळ निरथक अत्मरंजन आहे ...पण मजा येते काही काही वेळेला पण एरव्ही ...
व्यर्थ हे सारेच टाहो | एक हे ध्यानात राहो | मुठ पौलादी जयांची | ही धरा दासी तयांची !!
23 Jul 2015 - 3:14 pm | नाखु
मुठ पौलादी जयांची | ही धरा दासी तयांची !!
असेलही पण मुठ म्हणजे मनगट आणि त्यात मन आहे तस्मात जोपर्येंत मन आहे तोपर्येंत हे सारे मनोव्यापार आहेत.सगळेच विरक्त होऊ शकत नाहीत आणि जे झालेले त्यांना कशाचीही तमा-खंत-खेद-लोभ-आनंद नस्ते!!!
बोला सच्चीदानंद विरक्तीप्रभू प्रगो महाराज की जय!
23 Jul 2015 - 3:49 pm | प्रसाद गोडबोले
काहीही अवघड नसते त्यात ओ नाखुकाका !
इच्छा असेल तर सगळे जमते , लोकं फक्त मानसिक दृष्ट्या त्या अवस्थे करिता तयार नसतात इतकेच !!
Its a choice everyone has to make for himself ...
This is your last chance. After this, there is no turning back. You take the blue pill—the story ends, you wake up in your bed and believe whatever you want to believe. You take the red pill—you stay in Wonderland, and I show you how deep the rabbit hole goes. Remember: all I'm offering is the truth. Nothing more.
कधी तरी निवांत बोलु ह्या विषयावर
18 Jan 2016 - 10:10 pm | मोहनराव
धागा वर काढतोय.... नविन वर्षात नव्या शब्दमोतींसाठी...
18 Jan 2016 - 10:55 pm | मित्रहो
हे वाचल
आन गावची याद आली. आमच्या गावातबी नागोबुढा व्हता पण त्याले सारे नागोबाजीच म्हणे त्याचा नागोबुढा नंतर झाला. त्याच्या आंगात देवी ये म्हणे. उदबत्त्या फुके, अंगारा दे. म्या कदी तेथे गेलो नाही. आजीन जाउच देल नाही. तसा आमच्या गावात जागो बुढा बी व्हता. त्याले बंदा गाव जागो बुढा म्हणे आजीच एकली जागोबाजी म्हणे. तो टाक्यात पाणी भरे, ढोर बांधून दे. त्याची बुढी साळूबुढी आजी तिले साळूबाई म्हणे. साळूबाइ आजीची समदी काम करे. आजीले कणचबी काम अडल का आजी साळूबाइकडच जाय मंग काम घरातल राहू दे नायतर वावरातल. पाव्हणे आले भांडे घासाले साळूबाइ, पऱ्हाटी टोबाले साळूबाइ, जात्यावर दळाच साळूबाइ, निंदनाले बाया पायजे साळूबाइ, कापूस येचाचा हाय साळूबाइ. जागोबुढा त आता कवाच मेला, आम्ही गाव सोडायच्या आधीच तो मेला. मांग मी आजीले घेउन गावात गेलतो तवा साळूबाइची भेट झाली. तशीच व्हती, लुगड्यात, तिच्या आंगावर झांपर कधी नव्हतच. तिच्या डोयान आता कायीबी दिसत नाही. आमी गेलो तवा तुराटीच कड विणत बसली व्हती. डोये गेले तरी हात थांबत नाही बुढीचा. आजीचा आवाजच वळखला तिन "कोन बाइ व्हय का जी. किती दिसान आल्या बाप्पा" मंग मायाकडे पाहून म्हणली "मोठ्या बापूच पोरग व्हय का?" गाव तर कवाच सोडला. आता त आजी बी नाय रायली, मांगच्या मयन्यात साळूबाइ बी गेली. आमाले तसबी पऱ्हाटी आन तुरीतल काय समजत नाय मंग माया गाव म्हणत जायच तर कोठ आन कशापायी?
20 Jan 2016 - 12:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
निळी गोळी का लाल गोळी? माझ्या पुढे प्रश्र्ण् आहे
लाल गोळी घेतल्यावर म्हणे मला सत्य दिसणार आहे
माझे शरीर, माझी माणसे, माझे जग, हे काही सत्य नाही
हा तर केवळ भास आहे, बुध्दी आणि विचार सुध्दा माझे नाही,
मला जे दिसते, समजते, वाटते त्याही पलिकडे एक जग आहे,
जे जाणीवा नेणीवा, मन आणि काळ, यांच्याही कक्षे बाहेरचे आहे,
एकदा वाटले कशाला पहायचे असले जग, मी इकडेच सुखी आहे
भासमान असली तरी या दुनियेत, मी सुरक्षीत पणे जगत आहे
उगाच जोखिम उचलून, भलते काही झाले तर?
पण गोळी घेण्याआधी, मिळणार नव्हते याचे उत्तर
एकदा वाटल की लाल गोळी घ्यावी आणि निळी खिशात ठेवावी
पण निळी गोळी खरीच असेल, याची तरी खात्री कशी वाटावी?
कितिही नाही म्हटले तरी, मन याच विचारात गुरफटून् बसते
कधि लाल, तर कधी निळी गोळी घेउन टाकाविशी वाटते
आता ठरवलय् डोळे बंदकरुन, कोणतीही एक गोळी घेउन, एकदाचा, या व्दिधा स्थितीचा अंत करावा
पण त्याआधि “तुम्हाला संधी दिली तर कोणती गोळी घ्याल? हा प्रश्र्ण तुम्हालाही विचारुन बघावा
बघा जमल तर उत्तर द्या….
पैजारबुवा,
2 Mar 2016 - 12:27 pm | गणेशा
लाल गोळी तरी काय करते.. ती पुसुन टाकते..'मी' पणाला ..
पुसते आवर्तने विचारांची .. भावनांची.
जाणिवांच्या सांधलेल्या पुलाला ती उडवुन लावते... आणि अस्तित्वाच्या गहन समुद्रात लोटुन देते आपल्याला.
पण खरेच जाणिवांचे बंध इतक्या लेगच झुगारुन द्यायचे का हा प्रश्न उरतोच ..
खरे तर जाणिवांच्या पलिकडील अस्तित्व जाणुन ही जगण्याचा अर्थ सापडेल असे नाही.
'मी'..'माझा'.. हा भावच परकेपणाची बीजे आपल्या मनात खोल रुतवुन ठेवत असतो..
आणि त्यामुळे आपल्याला दिसणारे जग हे आपल्या भावनांच्या .. विचारांच्या गर्तेत आपल्या भोवती वक्राकार फिरते आहे असे वाटत राहते.
मी पणाला पुसुन .. मना मनांचे बांध सांधणे ह्या जगण्याला ही अर्थ आहेच ..
भले संधर्भ नसतील पण म्हणुन हा अर्थ खरा नाहीच हा विचारच लाल गोळी घेण्याचा उद्गम बनतो. पण ही विचारांची स्थित्यंतरे लाल गोळी घेताच लोप पावतील.. आणि सुरु होयील प्रवास सत्याचा ..
म्हणुन मला वाटते .. घ्यावी निळी गोळी आणि जगावे जगणे मुक्त .. स्वैर.. स्वछंद..
3 Mar 2016 - 3:41 pm | गणेशा
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी
बेभान स्वैर वारा पाचोळा सैरा वैरा
पानास आठवांच्या तोडीत चाललो मी
निस्तेज देह माझा भावनांचा पसारा
दाहक आसवांच्या आगीत पोळलो मी
ओल्या अधीर राती झाकोळला आसमंत
नागव्या स्वप्नांना जाळीत चाललो मी
(नोट : मतला माझ्याच जून्या कवितेतुन सहज आठवला म्हणुन लिहावे का वाटले)
5 Mar 2016 - 1:45 pm | गणेशा
आज पुन्हा सर्व घागा वाचला... छान वाटले.
खरे तर आजकाल वेळ मिळत नाही म्हणुन खंत आहेच.. त्यात ८० % मी रिप्लाय द्यायचो आनि १०-२० % लिखान असे माझे मिपावरील धोरण होते.. त्यामुळे खुप छान वाटत होते..
पन आज काल वेळ कमी आहे.. त्यामुळे रिप्लाय तर कोठे नाही पण येथे लिहिणे योग्य वाटत नाही.
कधी एकदा वेळ मिळेल आणि सगळ्यांचे लिखान वाचेल असे वाटते.. तरी तोपर्यंत फक्त येथेच मध्ये आधे लिहिल असे वाटते त्याबद्दल दिल्गीरी आहेच
24 Mar 2016 - 5:53 pm | गणेशा
सहज संध्याकाळी तळ्याच्या काठावर बसलो होतो.. पुढे हिरवी झाडे मिरवीत टेकडी उभी होती. सूर्य, प्रकाशाचे दोर समेटुन घेत होता, वारा लाडीक स्वताशीच गात होता.. अंधाराची चाहुल लागुन पाखरे घरट्यात परतत होती.. आणि मला तुझी आठवण आली आई.. आता कीती बदललेत संधर्भ.. अर्थांसहित.. तु तिकडे दूर.. अन मी ?
मी गुरफटलोय ह्या जगात, पुर्णता:. अजुनही श्वासांच्या फडफडीमध्ये जगतो आहे संकोचुन. तरीही प्रत्येक गोष्टीमध्ये अजुनही मी माझाच विचार करतोय का ? काय माहीत.
पण आई तु तुझ्याशिवाय माझा विचार करत असेच आयुष्य घालवले .. मला का कळाले नाही.. आज तू दूर, तुझी आठवण येते , माझ्याशिवाय तुला कधी सनाला पोळीचा एक घास गोड लागत नव्हता.. माझ्या फोनवरील २ शब्दांसाठी तुझे कान आतुरलेले असायचे.. आणी मी ? मी काय विचार करायचो...
शेजारील झाडाच्या उंच फांदीवर .. घरट्यात.. चिमनी तिच्या पाखरांना बिलगत असल्याचे दिसले.. आतुर पिल्ले बेंबीच्या देठापासुन जनु किलकिल करत होती .. माझे ही तसेच झाले आहे .. विचारांच्या गर्तेत मी ओढला जातोय ..
सूर्य आता क्षितिजापाशी शेवटच्या घटका मोजत आहे, रंगांची उधळण करुन जाता जाता काळोखाशी आज होळी खेळण्याचा तर त्याचा माणस नसेल ना ? पण काय उपयोग काळोखाच्या खोल गर्भात हे रंग स्वताचे अस्तित्वच विसरुन जातील. अन क्षितिज साम्राज्यावर रातीच्या काळोखाचा झेंडा फडकेल.
पण असा विचार माझ्या मनात आज आता का येतो आहे.. ? निसर्गाच्या कुशीत रमनारा मी.. त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर जीव ओवाळुन टाकणारा मी .. पण.. मी तुझी कुस ही नाही विसरलो आई.. हा, वाटा अस्पष्टश्या झाल्यात पण त्या वाटेवरुन मी पुन्हा तुझ्याकडे येतो आहे.. तुझ्याकडे..
आनंदाचे कारंजे मनात थुई थुई नाचत आहे.. बगळ्यांची अर्धगोलाकार रांग क्षितिजालाही छेद देवून दूर चालली आहे..
समोरील टेकडी शांत आहे. झाडावरील चिमणीच्या पिल्लांची पण किलबील थांबली आहे. आणि त्या निरव शांततेत माझ्या पावलांचाच तो काय फक्त आवाज आहे
25 Mar 2016 - 12:34 am | रातराणी
वा काय मनस्वी लिहिलय!
25 Mar 2016 - 1:07 am | बहुगुणी
सुरेख धागा आहे, पुन:पुन्हा आवर्तून परत वर येतो आहे, आणि प्रत्येक वेळी संपूर्ण वाचावासा वाटतो आहे. सर्वांचे प्रतिसाद वाचनीय आहेत, विशेषतः पैजारबुवांच्या अनेक प्रतिसादांनी बहार आणलीय, हा एक वानगीदाखल... (प्रतिसादांना वाचनखूण देता येईल तो सुदिन!)
25 Mar 2016 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार
खरतर हे कविता मी गणेशाच्या आई या कवितेला प्रतिसाद म्हणुन बर्याचा दिवसांपूर्वी लिहिले होते आणि गणेशाला व्यनी वरुन पाठवले होते . तेच इकडे तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायचा मोह आवरता येत नाहीये....
आई... आई... आई...
आई तु फक्त माझीच आई आहेस ना?
आई तो पिंट्या मला वेडा म्हणतो
आई आज मला आइस्क्रीम हवेच मी आज आइस्क्रीम खाणारच किती दिवसात तु मला आइस्क्रीम दिलेच नाहीस माझे सगळे मित्र रोज खातात.
आई आजचा दिवस मी तुझ्या जवळ झोपु? एकट्याला फार भीती वाटते ग.
आई मला खुप भुक लागली आहे काहीतरी खायला दे पटकन
आई हे गणित कसे सोडवायचे गं सांगना घरचा अभ्यास केला नाही तर दहा पट्ट्या मिळतात हातावर
आई एअहा पैसे दे ना, सगळे जण मधल्या सुट्टीत पेरु खातात
आई प्रगतीपुस्तकावर बाबांची सही घेउन दे ना बाईंनी त्यांचीच सही आणायला सांगीतले आहे, तुझी चालणार नाही असं म्हणाल्या.
आई रोज रोज पोळी भाजी काय देतेसगं डब्यात, सगळ्या मुलांच्या आया बघ कसे वेगळे वेगळे पदार्थ देतात
आई राजुने मला बॅट मारली म्हणुन मी स्टंप त्याच्या डोक्यात मारला, त्याने आधि खोडी काढली होती माझी.
आई आज शिरा करशील? किती दिवसात केल नाहीस.
आई सायकल मधे हवा भरायची आहे पैसे दे ना
आई शाळेतन येताना पडलो, रक्त थांबत नाहीये, खुप दुखतय ग आई
आई परिक्षेचे वेळापत्रक आले आहे, अभ्यास पुर्ण होईल ना माझा?
आई लवकर जेवायला वाढ उद्या इंग्रजीचा पेपर आहे माझे काहीच वाचुन झाले नाही.
आई कोणत्या कॉलेज मधे जाउगं मी काही समजतच नाही.
आई कॅन्टीन मधेच खाईन काहीतरी, उगाच सकाळी धडपडत उठुन डबा करु नकोस.
आई बाहेरुनच जेउन आलो आहे आज. अग मित्रांनी सोडलच नाही.
आई मला ८५% मार्क मिळाले. बाबांना सांग ना पेमेंट सीटची फी भरायला नाहीतर लांबच्या कॉलेज मधे हॉस्टेल मधे रहायला लागेल.
आई मला कॉलेजला जायला बाईक हवी. बाकी सगळ्या मित्रांकडे आहे. रोज त्यांच्या कडे लिप्ट मागायची लाज वाटते.
आई आज पार्टीला जणार आहे रात्री दार उघडेच ठेव ना. बेल वाजवली की बाबा लगेच उठुन बाहेर येतात.
आई कँपस इंटरव्ह्यु मधे माझे सिलेक्षन झाले आहे आता रिझल्ट चांगला लागला पाहिजे.
आई कशाला रोज पहाटे ५ वाजता उठुन चहा करतेस. मला झोप नाही येत अभ्यास करताना. आणि झोप आली तर माझा मी करुन घेत जाईन.
आई माझा रिझल्ट लागला. मार्क चांगले आहेत. मला लगेचच जॉइन करावे लागेल.
आई मी पार्ट टाईम एम. बी. ए. करणार आहे. रोज संध्याकाळी ऑफिस सुटले की लेक्चर असतात. जरा जास्त डबा देत जा.
आई ही मुलगी बरी वाटतेय ना? स्वभाव चांगला वाटला मला, चांगली शिकलेली तर आहेच आणि नोकरी पण करते. पण तुला पसंत असेल तरच मी हो म्हणेन.
आई तुला आवडेल ती साडी घे, किम्मत बघु नकोस आणि बाबांना सुध्दा सुट शिवायला सांगना. लग्न काय रोज होते का?
आई हिच्या आईचा फोन आला होता, आज त्यांच्याच घरी जेवणार आहे, तिची आई मासे फार मस्त करते.
आई आम्ही दोघे आज पिक्चरला जाणार आहोत आणि नंतर सिनेमाला. सिनेमा सुटल्यावर तिला तिच्या घरी सोडून मग मी येईन रात्री उशीर होईल यायला.
आई तिच्या बाबांनी मॉरीशसची तिकीटे काढली आहेत आमच्या साठी. तिकडून आलो की जाउयाना मग सगळे जण मिळून देवीला.
आई आज ती ऑफिस मधुन पसस्पर तिकडे गेली आहे. तिच्या भावाला मुलगी बघायला जाणार आहेत ते सगळे जण.
आई आपल्या कडे गुडन्युज आहे. तु आजी होणार आहेस.
आई तिच्या बरोबर दवाखान्यात जा ना मला ऑफिस मधून यायला उशीर होणार आहे नेमका आज.
आई मला फार आनंद झाला आपल्या बाळाला पाहिल्यांदा कुशीत घेतल्यावर. कसल गोड दिसतो तो इवलासा जीव.
आई डॉक्टरांनी सांगीतलय बाळाच्या डोळ्यात काजळ घालायचे नाही, आणि बाळगुटी सुध्दा नको त्यांनी टॉनीक लिहुन दिलय तेच देत जा.
आई बाबा गेले तरी आम्ही आहोत ना तुला, अजून तुला तुझ्या नातवाचे लग्न बघायचे आहे.
आई बाळ अता मोठा झालाय त्याला उगाच भरवत जाउ नकोस हाताने जेवु दे त्याला.
आई आज घरी पार्टी आहे, बरेच लोक येणार आहेत, तु उगाच बोअर होशील, त्या पेक्षा तु तुझ्या कुठल्या तरी मैत्रीणी कडे जाउन बस ना थोडा वेळ
आई तुला किती वेळा सांगीतल दादा ला फोन करु नकोस म्हणुन. साधी माणुसकी नाही त्याच्यात. आईवडिलांचे करायला नको म्हणुन तिकडे अमेरीकेत जाउन बसला आहे. महिन्यातुन एक फोन केला की झाली यांची कर्तव्यपूर्ती. इकडे आम्ही मात्र अडकलो आहोत आणि ते तिकडे मजा करत आहेत. उगाच त्याचे कौतुक मला सांगत जाउ नकोस.
आई तुला होत नसेल तर नकोना काम करत जाउस त्या बाई ठेवल्या आहेत ना त्यांना सांगत जा.
आई मला माहित आहे चार दिवस झालेत तुझा चश्मा फुटलाय तो, मला वेळ झाला की टाकीन दुरुस्त करायला, पण त्या शिवाय तुझे काय अडले आहे?
आई एवढा भारीतला टचस्क्रीन मोबाईल घेउन दिला आहेना तुला, हेडफोन लावुन गाणी ऐकत जा ना, तरी तो भिकार ट्रांझीस्टर एवढ्या मोठ्यांदा कशाला लाउन बसतेस, आम्हाला बाहेर टिव्ही सुध्दा निट ऐकु येत नाही.
आई किती वेळा सांगीतल तुला आपल्या कडे कोणी आल की लगेच बाहेर येत जाउ नकोस, उगाच आलेल्या पाहुण्यांना बोअर करतेस, ज्यांना तुला भेटायच असेल ते तुझ्या खोलीत येउन तुला भेटत जातील.
आई त्या बाईंना सांगत जा ना तुला बेड पॅन द्यायला, डॉ़क्टरांनी काय सांगीतले आहे बेडवरुन खाली उतरायचे सुद्धा नाही.
आई मी तुला जरी बघायला तुझ्या खोलीत आलो नाही तरी तुझे सगळे अपडेट्स माझ्या कडे असतात. दर एक दिवसा आड मी डॉक्टरांशी बोलतो.
आई समजावुन घे ना, घरात कोणालाच इतका वेळ नाही तुझ्या बरोबर चोवीस तास बसुन रहायला, त्या साठीच बाई ठेवली आहे ना आपण. सारखे त्या बाई बरोबर भांडत नको जाउस. एकही बाई टिकत नाहि तुझ्या ह्या हट्टी स्वभावामुळे.
आई तुझ्या वर्ष श्राध्दाच्या दिवशी मोठी देणगी दिली आहे मी अनाथ आश्रमाला आणि तुझ्या नावाने एक स्कॉलरशीप सुध्दा सुरु करणार आहे.
आई मी आज निवृत्त झालो. आता मी मस्त मजा करणार आहे.
आई आजच चारधाम यात्रा करुन आलो. तिकडुन आणलेला चंदनाचा हारच तुझ्या फोटोला घातला आहे.
आई आजकाल मी एकटाच असतो ग एवढ्या मोठ्या घरात. ही पण आता नाहीये आणि बाळ परदेशात नोकरी करतोय. तुझी खुप आठवण येते ग आई.
आई बर झाल मी तुझा फोटो जपुन ठेवला ते. निदान गप्पा मारायच्या म्हटले तर फोटों बरोबर तरी बोलता तरी येते. नाहीतर नुसत्या भिंती बघत बसायचा कंटाळा येतो.
पैजारबुवा,
25 Mar 2016 - 1:24 pm | नीलमोहर
__/\__
25 Mar 2016 - 5:37 pm | अभ्या..
माऊली काय ओ हे.
दंडवत घ्या देवा.
25 Mar 2016 - 11:50 pm | रातराणी
:(
कशाला हे काळजाला घरं पाडणार लिहिता पैजारबुवा.
4 Apr 2016 - 3:22 pm | तर्राट जोकर
बोअरींग लिखाण.
अगदी हळू हळू जमीनीच्या पोटात शिरुन दगड फोडनार्या बोअरिंग ड्रीलसारखं. शेवटाला भडभड पाणी येतं, आतून.
दंडवत __/\__
26 Mar 2016 - 10:56 am | भरत्_पलुसकर
हा तर खजिनाच सापडला. एक नुकतीच केलेली आणि धागा काढू काढू म्हणत राहून गेलेली कविता आता इथेच लिहतो. तशीही तिला कविता म्हणावी का नाही हा प्रश्न आहे.
तुझ्या कवितेला माझी ओळख देऊ म्हणतेस?
देऊया की..
पण आधी समजू तर दे थोडीशी...
तुझी कविता म्हणजे शब्द तोलूनमापून
मी म्हणजे शब्दांचा पसारा
या पसार्यात कुठे तरी हरवेल तुझी कविता
हरवू दे म्हणतेस?
पण आधी सापडू तर दे थोडीशी...
तुझी कविता म्हणजे लय, सूर तालाच भान
मी म्हणजे मैफीलीतला चुकलेला ठेका
त्यानं विस्कळीत होईल तुझी रचना
होऊ दे म्हणतेस?
पण आधी तुझी लय भिनू तर दे थोडीशी...
तुझी कविता म्हणजे खोल खोल घाव सहन करण
मी म्हणजे शब्दांच्या बुड्बुड्यात वेदनेच बीज पेरत राहणं
कधी न कधी फुटून ते तुझी जखम उघडी पाड
तील
पाडू दे म्हणतेस?
पण आधी तिला जरा खपली तर धरू दे ग...
तुझी कविताही तुझ्याचसारखी गूढ न अलिप्त
मी म्हणजे सगळ्यात गुंतून जाणारा
तुझ्या सुटसुटीत कविताही गुंतून जातील माझ्याजवळ
गुंतू दे म्हणतेस?
पण आधी तुझं रहस्य कळू तर दे जरा..
26 Mar 2016 - 6:28 pm | बहुगुणी
मुक्तकातला शब्दखेळ आवडला! छान कल्पना.
31 Mar 2016 - 10:12 am | गणेशा
घरी बरीच झाडे लावली आहेत मी आताशा.. त्यात फुलांचीच जास्त.. हो पांढर्या फुलांचीच जास्त.. मला आवडतात पांढरी फुले.. मनाला प्रसन्न करणारी, पारिजात..काकडा..रातराणी..अनंत.. कुंदा...चाफा.. कितीतरी.
तुला पांढरी फुले आवडत नसत.. तुला लाल गुलाब आवडायचा.. त्यामुळे लाल गुलाबाची पण एक दोन झाडे लावली
आहेत.. परवा त्या गुलाबाला छोटीशी कळी आली होती.. हलकेच हिरव्या आवरणाला बाजुला सारुन बाहेर डोकावण्याची पाकळ्यांची घाई चालली होती.. तो अस्पष्टसा लालसर रंग मोहवुन टाकत होता .. तुला आठवते का जया मी तुला लाल गुलाब पहिल्यांदा भीत भीत दिला होता ते.. तू घेतलेलास पण. आणि त्या नंतर गुलाबी दिवस सुरु झाले .. ते मंतरलेले दिवस .. तासन तास गप्पा .. ते भटाचे कँटीन .. कॉलेज च्या प्रॅक्टीकल साठी असलेला आपला दोघांचा एक काँप्युटर... बरेच काही
पण काळ कधीच थांबत नाही.. आपल्या साठी पण तो नाहीच थांबला .. कधी कधी वाटत होते काळाच्या काट्याला घट्ट पकडुन ठेवावे, त्याला पुढे जावुच देवु नये.. आपल्या जगात.. इवल्याशा.. मस्त जगत रहावे .. आनंदात .. कैफात ..
पण तो दिवस आलाच, तू दूर जाई पर्यंत मी तुझ्याकडे पहात होतो. अश्रूंनी डोळ्याचा बांध कधीच ओलांडला होता.. बोलायचे बरेच काही होते पण शब्द ओढांआड अडकुन पडले होते..हलकेच वळुन पाहताना रिकामे हात तेव्हडे हालत होते..
गुलाब आता पुर्ण फुलला होता.. मस्तच दिसत होता.. मोहवुन टाकत होता .. आणि तुझ्या डायरीतील त्या शेवटच्या पानावर मी लिहिलेल्या ओळी मला पुन्हा आठवल्या ..
"तू अशीच हसत रहा.. सर्वांचे मन मोहत रहा..
माझी नसताना पुन्हा .. माझीच होत रहा ..."
20 Apr 2016 - 5:55 pm | गणेशा
आज संध्याकाळी खिडकीतुन दिसणार्या माझ्या ईवल्याशा आभाळात ढग दाटुन आलेत, लवकर अंधार दाटल्याने आज पक्षी लवकरच घराकडे वळलेले दिसत आहेत.. आज पाउस पडेल असेच वाटत आहे. आभाळ असे भरुन आले आणि पाउस आला की मात्र माझे मन इथे रहात नाही, ते फिरुन येते माझ्या माहेराला..आणि मग आठवणींच्या सरी बरसतच राहतात ..
माझ्या माहेराचे ते कौलारु घर..पावसात त्याचा तो लक्ख केसरी रंग दुरुनही अगदी आमच्या शेताच्या हिरव्या बांधावरुन ही उठुन दिसत असे.. त्यासमोर असलेली ती ओलेती पायवाट आणि तीच्यावरती ठिकठिकाणी साठलेले पावसाचे पाणी.. चालताना हळुच पाय दिला तरी मातीचा लाल रंग त्या पाण्यात मिसळत असे.. समोरील अंब्याच्या झाडाचे पाड लागलेले आंबे ही आता पर्यंत उतरवुन झालेले असत.. तरीही कुठल्यातरी पाणांच्या झुबक्यातुन एक- दोन आंब्यांचे दर्शन व्हायचेच.. अन मग ते नक्की कोणाच्या वाट्याला येतील या साठी चढाओढ लागायची.
पावसाळा आला की तो शाळा सुरु होण्याची वार्ता घेवून यायचा.. त्यावेळेस अगदी नक्को वाटायचे शाळेत जायला
पण आता कळते कीती सुंदर दिवस होते ते.
शाळा तशी मोठी नव्हतीच .. दगडी बांधकाम असलेली ६-७ वर्ग असलेलीच शाळा वस्ती वरती होती .. शाळेच्या बाजुला निलगीरीची.. कडूलिंबाची खुप झाडे होती.. सुविचारासाठी मध्येच एक फळा होता .. माझ्या मैत्रीणेचे..माधवी चे अक्षर खुप सुंदर असल्याने गुरुजींनी सुविचार लिहिण्याचे काम तिच्याकडे दिलेले होते .
शेताच्या बांधा बांधा वरुन चालत शाळेत जावे लागे.. भाताच्या रोपांची लावणी चाललेली असायची शेतामध्ये.. ती हिरविगार रोपटी .. शेतात घुडग्यापर्यंत रुतलेले ते सर्वांचे पाय .. ते घडूळ पाणी .. बाजुलाच खळखळ वाहणारा झरा .. आणि त्या मैत्रीनीं सोबतच्या गप्पा..
आणि जोराचा पाउस खिडकीतुन आत यायला लागला आणि खिडकी बंद करावी लागली..
छे .. मन खुपच लहानपणींच्या आठवणीतच आधी का जाते तेच कळत नाही...
पुढच्या वेळेस पाऊस आला की मी मनाला सांगणार आहे फिरुन यायचेच असेल तर कॉलेजच्या दिवसात फिरुन ये.. त्या अल्लड .. लाजर्या भावनांशी गळाभेट घेवून ये.. थोडेसे आईच्या कुशीत आणि बापाच्या डोळ्यातील स्वप्नांच्या दुनियेत फिरुन ये ..
"बरसली सर अशी
पानात रंग ओले
गंधाळता जराशी
गंधही चिंब झाले "
------------- गणेशा, २० एप्रिल २०१६
16 May 2016 - 3:53 pm | गणेशा
समोरचे झाड आता पार वाळले आहे.. त्याचे एक एक वाळलेले पान अलगद खाली पडताना ही माझ्या मनाला आताशा काहीच वाटत नाही...सुन्नपणे मी सगळे पहात आहे. उन्हाची रखरख आता वाढतच चालली आहे, छतावर लटकणारा पंखा उगाच कुरकुरत फिरतो आहे.. खिडकीतुनही उष्ण हवा आत येत आहे ...
मे महीना खरेच खुप बोअर वाटत आहे... मे महीना एव्हडा बोअर वाटेल असे लहानपणी कोणी सांगितले असते तर खरे वाटले नसते ..
महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळुन निघाला आहे... लातुर तर पाण्यावाचुन तडफडत आहे.. १९९३ च्या भुकंपा नंतरचे सर्वात भिषण चित्र लातुरकर सध्या अनुभवत आहेत. चिमण्या कबुतरे पक्षी प्राणी पाण्यावाचुन मरत आहेत..
राजकारणी बांधावर आणि शेतकरी फांदीवर असे चित्र रोज गावोगाव दिसत आहे.. पाण्यासाठी मारामारी चालली आहे. आणि टीव्हीवरील लाईव्ह गदारोळामध्ये, राजकारणी.. मेडीया विचारांचे ग्रिष्मार्पण करताना पाणी पाणी करस्तोपर्यंत उगाचच घसा कोरडा करत आहेत..
आणि मी फक्त सगळे शांतपणे पाहुन पुन्हा आपल्या कामाला लागत आहे.. कदाचीत मी मध्यमवर्गीय .. शहरी.. आत्ममग्न.. माणसिकतेचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्या स्वार्थी पणातच पुन्हा दरवर्षी प्रमाणे माझ्या मनाला पावसाची ओढ लागली आहे.. पाउस वारा .. झिम्मड धारा .. हिरव्या कंच टेकड्या .. पांढरे ओव्हळ.. पाणीमय रस्ते .. मन आता चातक बनले आहे.. पावसाच्या एका थेंबा साठी ते खुप आतुर झाले आहे...
18 May 2016 - 9:51 pm | शब्दबम्बाळ
आकाशात मळभ दाटुन येत असताना, मनातही तुझ्या आठवणींचे ढग दाटी करु लागतात...
आणि बाहेर वाढत चाललेला अंधार मनात देखील परावर्तित होऊ लागतो!
पावसासाठी धरेच्या ठायी असणारी व्याकुळता जणु मलाही व्याकुळ करते, आज तरी पावसाशी गाठ पडणार का ही तीची हुरहुर मलाही जाणवू लागते. ईतक्या लांबुन येणारा हा पाऊस जर तीला भेटलाच नाही तर? या विचाराने तो अंधार अजुनच गडद होऊ लागतो... गम्मतच आहे ना! अंधार परावर्तन! विज्ञानाला नाही जमायचे सिद्ध करायला हे!
आणि मग अचानक ते बाहेरचे ढग गडगडाट करतात आणि मग कोसळु लागतात जलधारा...
सगळी सृष्टी न्हाऊन निघत असताना मी मात्र कोरडाच राहतो त्या वाढणार्या पावसाकडे पाहात!
वाट पाहात मनातल्या ढगांनी बरसण्याची, त्या पावसात भिजण्याची, वाट पाहात तु भेटण्याची...
1 Aug 2016 - 4:12 pm | गणेशा
मैत्रीण ...
माझ्या घराच्या खिडकीमध्ये उभे राहुन मी आकाशाचा तो इवलासा तुकडा रोज पहात असतो... प्रत्येक वेळेस पाहिले की त्याचे रंग बदललेले असतात.. कधी केशरी.. कधी शुभ्र मखमली .. कधी लोभस निळा ...कधी गर्द पिवळा .. अश्या असंख्य रंगानी तो तुकडा न्हावुन जात असतो.. जणु माझ्याच मनाचे प्रतिबिंब त्यावर पडले आहे काय असे वाटत असते .. कधी सोनेरी झालर लेवून एखादा मेघ हलकाच स्पर्श करुन जातो.. तर कधी काजळासम मेघांनी इवल्याश्या आकाशाचे सुरमई अस्तित्व भरुन आले आहे असा भास होतो.
रोज ते समोरील लोभस आकाश पहाताना का कोणास ठावुक त्या इवल्याशा तुकडयावर जणू माझाच हक्क आहे असे मला वाटत राहते.
सखे तू ही अगदी तशीच आहे.. त्या इवल्याशा आकाशाच्या तुकड्या सारखी ... तुझे अस्तित्व ..तुझे आमच्या सोबत असणे ..तुझे हसणे .. तसेच तर आहे .. माझ्या सर्व मैत्रीचा परिघ जणू तु व्यापलेला आहे असेच वाटते.
आज १ ऑगस्ट, पावसाची बरसात होत आहे.. तू माझ्या खिडकीतून आज दिसत नाहिये, पण पावसाच्या या असंख्य थेंबाची आरती मी स्तब्ध होउन ऐकत आहे.. आणि तुझे ते शुभ्र रुप पाहण्यासाठी मी पुन्हा तुझीच वाट पाहत आहे.. फक्त तुझ्यासाठी.
---------------
ही तार्यांची आरास.. फक्त तुझ्यासाठी
किरणांची बरसात.. फक्त तुझ्यासाठी
हास्यमण्यांची तव, माळ सुरेख शोभती
प्रित चांदण्यांची वाट.. फक्त तुझ्यासाठी ||
पाणांची अल्लड पालखी..थेंबांची आरती
मृद्गंध दरवळलेला.. फक्त तुझ्यासाठी
सुरमई नयनांची, नक्षीदार सुरेल बंदिश
क्षितिजापल्याडची आस..फक्त तुझ्यासाठी ||
'पल्लवी'त वसुंधरा, हिरवळ दाटलेली
श्रावणफुलांची सुरुवात.. फक्त तुझ्यासाठी
फुलली रातराणी, प्राजक्तसडा अंगणी
सुगंधाची उधळण.. फक्त तुझ्यासाठी ||
------- गणेशा.
1 Aug 2016 - 4:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
मागचा महिना दिड महिना सुर्य दिसलाच नाही. सारख आभाळ आलेल असत आणि पावसाची पिरपिर चालु असते. मुंबई सारखा धडाधडा कोसळत पण नाही. डास वाढले आहेत. फक्त मुलच नाही घरातले सगळेच आजारी पडले आहेत. पाउस नाही असे वाटून बिना छत्रीचे बाहेर पडले की हमखास भिजवून जातो आणि छत्री असेल तर ती मात्र कोरडीच घरी येते. भाज्या महाग फळं महाग त्यात आता दुधाचे भाव देखिल वाढले आहेत. त्यात त्या बाईक वाल्यांपासुन जपूनच चालावे लागते. बाईकच्या मागच्या चाकातून चिखलाचे कारंजे उडवत चालवत असतात. जरा दुर्लक्ष झाल की उठलीच खडीची नक्षी कपड्यांवर. पावसाळा म्हणजे नुसती चिकचिक आणि रबरबाट.
पण तरी सुध्दा पाउस पडायला पाहिजे. धरणं भरली पाहिजेत तरच वर्षभराच्या पाण्याची सोय होईल. नाहीतर मग आहेच दिवसाआड पाणी.
पैजारबुवा,
30 Jul 2017 - 10:11 am | ज्ञानोबाचे पैजार
माझ्या खांद्यावर माझेच मढे घेउन मी गुमान चाललो होतो,
पायाखाली पडलेल्या मढ्यांना मी कधी उद्दाम पणे तुडवत होतो,
तर कधि कधि मनातल्या मनात मी त्यांच्या साठी रडत होतो,
ते निश्र्चल होते आणि माझा भार मी समर्थ पणे वहात होतो,
शंढा सारखे जगणारे शंढासारखेच मरतात, त्यांचा अंत असाच होतो,
मी शंढ नाही हे सिध्द करण्या साठी मी मात्र जीव तोडून चालत होतो,
माझा खांदा दुखत होता, घसा कोरडा होता आणि पायही थरथर कापायला लागले होते,
कोणास ठाउक माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी मला अजून किती चालावे लागणार होते,
माझा संयम संपला आणि धिरही सुटतो आहे हे माझ्या मढ्याने अचूक ओळखले होते,
म्हणुनच खोटी सहानुभूती दाखवत आता माझे मढे माझ्याशी गप्पा मारु लागले होते,
अरे शरण जा तो परम दयाळू आहे, तुला नक्की माफ करेल, माझे मढे मला सांगत होते,
ज्याला आयुष्यभर नाकारले त्याच्या कडे मदत मागण्यासाठी माझे मन मात्र कचरत होते,
पायाखालची वाट अंतहीन वाटत होती, ताकदही फार थोडी शिल्लक होती,
नजरेच्या प्रत्येक टप्यावर जिकडे तिकडे पडलेली मुडद्यांचीच रास होती,
पाठीला प्रचंड रग लागली होती , पण तरी सुद्धा मान माझी ताठ होती,
जे जन्मभर बोललो, जसा वागलो ते सिध्द करयची हीच ती वेळ होती,
माघार घ्यायच्या सर्व जागांवर माझ्या हाताने मीच पाचर मारली होती,
पाचर ओढून काढली तर त्या जागेवर माझीच शेपटी घट्ट अडकणार होती,
निराशेच्या गर्तेच्या सीमेवर असतानाच माझ्या खांद्यावर एक हात पडला,
खांद्यावरचे मढे सारखे करुन त्याने पाण्याचा प्याला माझ्या पुढे धरला,
पुढचा रस्ता अजूनच खडतर, खाचखळग्यांचा आहे, तो मला म्हणाला,
चल माझ्या मागे मागे ये, असे म्हणुन तो भराभरा पुढे चालू लागला,
भला दिसतोय, पण आहे तरी कोण? असा विचार माझ्या मनात आला,
माझ्या मनातले समजल्या सारखा मागे वळून तो निर्व्याजपणे हसला,
एक क्षण फक्त एक क्षण वाटून गेले.... हा बहुतेक देवच आहे,
मग आठवले, देव नाही, हे तर आपणच सिध्द केलेले आहे,
तो हसून म्हणाला, सगळे समजेल, धिर सोडू नकोस, थोडेसेच अंतर उरले आहे,
थोड्यावेळासाठी तरी तू मला तुझा मित्र समजायला काहीच हरकत नाही आहे,
आणि तुला म्हणुन सांगतो, मी पण तुझ्यासारखा एक नास्तिक आहे,
तुझ्या सारख्यांच्या बरोबर चार घटका घालवणे हा माझा एकमेव विरंगुळा आहे ,
पैजारबुवा,
26 Sep 2019 - 3:30 pm | ज्ञानोबाचे पैजार
गणेशोत्सव संपल्यावर गणेशा प्रगटला म्हणून त्याच्या स्वागता साठी...
माझी प्रेमकथा... अर्थात एकतर्फी प्रेमाची गोष्ट
तिज कवेत घेण्या साठी, उतावळा मी दिनभर
ती कुन्तल झटकून गेली, गुंतवळ उडती गावभर
गावात जाहली चर्चा, आमच्या अनामिक नात्याची
कोणी लोचट म्हटले मला, सय येई कुणा गाढवाची
लग्नात तिच्या मी जेव्हा, वाढत होतो मट्ठा
तिने हसून पाहिले मजला, अन केली थोडी थट्टा
पण मी धीर सोडला नाही, नाउमेद झालो नाही
पहात स्वप्ने तिची, मी इमले बांधत राही
एके दिनी मला ती, एकटा घरी ये म्हटली
बर्याच विरहा नंतर, तुझी फारच आठवण आली
मज घरात घेउन तिने, दार लावले सत्वर
शर्ट काढ म्हणाली अन, पँट काढ ती लवकर
मी फेडताच वसनांते, ती मुलास ओरडून म्हणते,
दुध नाही प्यायले तर, बघ कसली काया होते
पैजारबुवा,
26 Sep 2019 - 3:52 pm | गणेशा
हा हा हा
31 Dec 2019 - 2:14 pm | गणेशा
या धाग्याला जरी सुरुवात मी केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी .. आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले..
तसेच इतर जनांनी ही यात मजा आनली..
धागा २०१५ चा आहे, पण २०२० मध्ये पुन्हा यात लिहिण्याचा माणस आहे. पाहुया..