पानिपत

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 10:45 pm

प्रिय अमोल,

काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.

पानिपतच्या युद्धस्मारकाचे दर्शन घेणे, हा असाच त्या लांबलचक यादीतला एक क्षण.

पानिपतात १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी जे काही घडून गेले, तो आता, म्हणलं तर, इतिहास आहे; म्हणलं तर, अजूनही भळभळणारी जखम आहे. त्यावर आजवर बरंच काही लिहिलं गेलंय. याही पुढे लिहिलं जाईल. (जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे!) कोणाचं चुकलं, काय चुकलं वगैरे चर्चा होतील. पण एक सत्य मात्र कधीही पुसलं जाणार नाही. आपल्या घरापासून दूर, परक्या अनोळखी मुलखात छातीत एखादा तीर घेऊन अथवा जिव्हारी लागलेला तरवारीचा घाव सहन करत, घरची आठवण डोळ्यात घेऊन असंख्य वीर मृत्यू पावले. चूक कोण होतं, बरोबर कोण होतं, कोण देशभक्त आणि कोण परके हल्लेखोर हे ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आणि विचरसरणीप्रमाणे ठरवावं. मरणारा कोणी सातार्‍याकडचा असेल तर कोणी जलालाबादचा असेल. पण तो मेला पानपतावर हे त्यांच्यातलं साम्य मात्र कधीच पुसलं जाणार नाही. मरायच्या आधी ते मराठे, गिलचे, रोहिले, बुंदेले, दुर्राणी, गारदी होते. मरताना मात्र ते सगळे केवळ असहाय, तडफडणारे, पाण्याच्या एका घोटाला मोताद झालेले मानव होते.

इतिहासाबद्दल पवित्रे असू शकतील माणसांचे, परंतु जे मेले त्यांच्या ’human story' बद्दल कोणाचंही दुमत असणं शक्य नाही.

जेव्हापासून पानिपतला जायचा विषय सुरू झाला तेव्हापासून ’काहीही झालं तरी यु्द्धस्मारक बघायचंच’, असा निश्चयच केला होता. अवांतर वाचन कायमच चालू असतं, त्यानुसार 'आता पानिपतावर काही आहे का?' यावर फार पूर्वीच नेटवर शोधलं होतं. त्यानुसार तिथे अगदी आत्ता आत्ता पर्यंत एक काळा पडलेला आंब्याचा वृक्ष होता हे समजलं होतं. असं म्हणतात की, युदधाच्या धामधुमीत हा आंबा काळा पडला होता. ही दंतकथाच असावी. पण, हा आंबा जिथे होता तिथेच, त्याच विस्तिर्ण मैदानात लढाई झाली होती हे मात्र सत्य आहे. याच झाडावरून, या स्थळाचे नाव ’काला आंब’ असे पडले. काही वर्षांपूर्वी हा ’काला आंब’ जमीनदोस्त झाला. नंतर सरकारने याच जागी एक विस्तिर्ण स्मारक बांधले. तेच हे युद्ध स्मारक.

हे स्मारक खुद्द पानिपतातच आहे की थोडे लांब आहे वगैरे काहीच माहिती नव्हती. इथे पोचलो तेव्हा हे ही लक्षात आले की, मी पानिपतपासून १८-२० किलोमीटरवर एका गावात असेन. शिवाय, स्वत:चे हक्काचे वाहनही नसणार होते. त्यामुळे, स्मारकाला भेट देता येईल की नाही याबद्दल धाकधुक वाटू लागली. कसे जमते ते बघू, असा विचार करून स्वस्थ बसलो. एक दोन दिवस गेल्यावर चाचपणी सुरू केली. आमची व्यवस्था ज्याच्या जिम्मे होती त्याच्याकडे हळूच विषय काढला.

’अरे, **जी, वो पानिपतमे एक युद्ध स्मारक है ना? काला आंब कहते है उसे. कितना दूर है?’

’अरे, सरजी, क्या करियेगा वहां जा के? कुछ नही है वहां. उससे अच्छा की आप कुरूक्षेत्र चले जाइयेगा. पुण्यभी कमा लेंगे! ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!’

’अरे ऐसा ना कहियेगा साबजी! मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!’

माझा फट्टकन आलेला जवाब ऐकून **जी चपापले. (माझ्याजागी तू असतास तर बहुधा पानिपतात अजून एक स्मारक बांधावं लागलं असतं... **जींचं! ;) ) त्यांनी त्यानंतर माझं बोलणं हसण्यावारी नेलं नाही. पहिल्याच रविवारी जावं असा बेत होता. पण गाडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो बेत बारगळला. मग दुसर्‍या रविवारी जमवलंच. मात्र, तडजोड म्हणून बरोबरच्या सहकार्‍यांच्या मताला मान देवून सकाळी कुरूक्षेत्र आणि दुपारी (भर उन्हात) काला आंब असं नियोजन करावं लागलं.

काला आंब खुद्द पानिपत गावापासून पाचेक किलोमीटरवर आहे. शेवटपर्यंत चांगली पक्की सडक आहे. स्मारकाच्या आजूबाजूला विरळ वस्ती आहे. स्मारकाची जमिन सोडल्यास शेती आहे सगळीकडे. स्मारक प्रशस्त आहे. सरकारने खरंच खूप उत्तम स्मारक बांधलं आहे आणि देखभालही उत्तम होत असावी असं जाणवलं. स्मारक म्हणजे खरं तर एक खूप मोठं उद्यान आहे. झाडं आहेत, हिरवळ आहे, पाण्याची कारंजी आणि छोटी तळीही आहेत. कारंजी आणि तळी सध्या कोरडी आहेत. पण अधून मधून वापरात असावीत.

स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत शिरतो. समोरच पानिपतच्या तिन्ही यु्द्धांबद्दल हिंदी व इंग्रजीत संक्षिप्त माहिती देणारे फलक लावले आहेत. जागा प्रशस्त असल्यामुळे गाड्या पार्क करायला काहीच अडचण नाही. ते फलक बघत आपण पुढे निघतो. ऊन भयानक असल्यामुळे त्रास होत होता. हिरवळ असली तरी, झाडं कमी आहेत आणि चालायच्या मार्गाच्या दुतर्फा नाहीत त्यामुळे स्वत:ला ऊन्हात भाजून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. गाईड किंवा पत्रक असे काही तिथे नाही त्यामुळे स्वत:च शोधत निघालो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर दूरवर एक चबुतरा आणि त्यावर एक स्तंभ दिसला. नेटवर हे दृश्य असंख्यवेळा पाहिल्यामुळे आपल्याला तिथेच जायचं आहे हे लगेच लक्षात आले. त्या रोखाने निघालो.

चबुतर्‍यासमोर जाऊन उभा राहिलो. युद्ध याच मैदानात झालं होतं हे नक्की. पण विश्वासराव अगदी याच स्पॉटवर गर्दीत हरवला, याच स्पॉटवर त्याचे पार्थिव मिळाले, या ठिकाणी ’भाऊ’ हत्तीवरून उतरला आणि स्वत: गर्दीत घुसला, नेमक्या याच स्पॉटवर इब्राहिमखान गारदी आपल्या प्राणप्रिय असलेल्या धन्यांचे, विश्वासराव व सदाशिवरावभाऊ यांचे, अंतिम संस्कार विधीपूर्वक स्वतः करत असताना अफगाण सैन्याच्या हाती इथे सापडला (आणि मुस्लिम असूनही मराठ्यांची बाजू घेतली म्हणून आधीच त्याच्यावर राग होता त्यांचा, त्यात परत हे असले धार्मिक कृत्य करत होता काफरांसाठी म्हणून त्याचे अतोनात हाल करून त्याला मारण्यात आले) व या स्पॉटवर त्याला मारण्यात आलं .... असले नेमके तपशील आता फक्त काळाकडेच आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी ते तपशील स्वत:पुरते बघायचे. आणि अमोल, नेमका इथेच तू हवा होतास. ते तपशील केवळ स्वत: बघायचेच नव्हे, तर इतरांनाही दाखवायचं कसब तुझ्याकडे आहे. मी माझ्यापरीने प्रयत्न केला आणि मला ते बरंचसं जमलं देखील.

कडक उन्हाळ्यातली भर माध्याह्नीची वेळ त्यामुळे तिथे आम्ही तिघे (त्यातला मी सोडता बाकीचे दोघे दूर एका झाडाखाली सावली धरून उभे होते), आमचा ड्रायव्हर (जो गाडीतच बसून होता), टाइमपास करत बसलेली गावातली काही चुकार पोरे आणि सावल्या व आडोसा धरून बसलेली दोन जोडपी सोडल्यास देहधारी सृष्टीतील एकही व्यक्ती नव्हती. कानभरून शांतता दाटलेली होती.

मी ही थोडा वेळ शांतपणे तिथे उभा राहिलो. माझ्या मोबाईलवर गोविंदाग्रजांनी लिहिलेला ’पानिपताचा फटका’ मुद्दाम कॉपी केला होता. तो एकदा वाचला. त्या सर्वच अनाम वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथून बाजूला झालो.

बाजूलाच काही ठिकाणी युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. पण ते एकंदरीतच तिन्ही युद्धांचे असावेत असे वाटले.

एव्हाना बाकीचे लोक बरेच कावले होते. माझ्या वेडगळपणापायी त्यांनी तरी किती सहन करावे? आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांना पानिपतमध्ये असलेले ’प्रसिद्ध’ बिगबाझार आम्हाला दखवायचे होते व त्याचीच घाई त्यांना झाली होती. (त्यांच्या मते या बिगबाझारमध्ये असलेली ’अपने आप चलनेवाली सीढी (आप बस खडे रहो, खुद आपको उपर या नीचे ले जाती है)’ बघणे अतिशय महत्त्वाचे होते!!!!) त्यामुळे, परत एकदा चबुतर्‍यासमोर उभा राहिलो आणि परत निघालो.

अमोल, आपण बरोबर तर जाऊ शकलो नाही पानिपत बघायला. पण परत एकदा जाऊ. यावेळी अजून काही गवसते आहे का ते बघू. जमल्यास ’रोड मराठा’ समाजाशी काही संपर्क करता येईल का ते पाहू. (मला खात्री आहे, सह्याद्रीच्या अनेक डोंगर दर्‍यांमध्ये तझी जशी हक्काची घरं आहेत, तशी पानिपत, करनाल परिसरातही तुझी घरं होतील!) जे मराठे तिथेच लपून राहिले आणि तिथलेच बनले त्यांच्या कथा ऐकायला मिळतात का ते पाहू. हे तरी एकत्रपणे अनुभवायला जमतेय का ते पाहुया!

तो पर्यंत हे काही फोटो काढलेत ते बघ.

तुझा,

बिपिनदा.

ता. क. : परतीच्या वाटेत रस्त्यात एक ’रोहिला टायर वर्क्स’ नावाचे दुकान दिसले. त्या ’रोहिल्या’ला या युद्धाबद्दल काय वाटत असेल? एकदा भेटून गप्पा मारल्या पाहिजेत त्याच्याबरोबर.

बिपिनदा.

***

संस्कृतीइतिहाससमाजप्रवासछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2015 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम लिहिलंय. या ठिकाणी गेल्यावर मनातल्या भावना शब्दांत उतरवणे हे आव्हान यशस्वीपणे झेललंय.

एकाच मैदानात काही तासांत एतक्या माणसांचे (बहुधा १ लक्षाहून अधिक) अनैसर्गिक मृत्यू होण्याचा हा दुर्दैवी विक्रम असावा असे मागे लोकप्रभेतील एका लेखात वाचले होते.

एस's picture

20 May 2015 - 11:14 pm | एस

नि:शब्द आहे!

मयुरा गुप्ते's picture

20 May 2015 - 11:15 pm | मयुरा गुप्ते

पानिपतची तगमग शब्दां-शब्दा तुन जाणवली.
अजुनही पानिपतच्या आठवणींचे कढ येतात,त्याबद्दल वाचवत नाही, खरं खोटं,चुक-बरोबर ह्याच्या परिसीमा ओलांडुन त्या ठीकाणाची सफर घडवुन आणल्याबद्दल बहुत धन्यवाद.

-मयुरा.

विकास's picture

20 May 2015 - 11:25 pm | विकास

याहून अधिक लिहू इच्छित नाही! :)

पैसा's picture

20 May 2015 - 11:30 pm | पैसा

कौरव-पांडव संगर-तांडव द्वापराकाली होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती.

मराठी माणसाच्या खर्‍या तीर्थक्षेत्राची यात्रा घडली तुला!

सस्नेह's picture

20 May 2015 - 11:36 pm | सस्नेह

पानिपताचा सल हलवून गेला..
पण बिका पुन्हा पूर्ण ताकदीने लिहिते झाले हा पळ सुखवून गेला !!

सानिकास्वप्निल's picture

20 May 2015 - 11:57 pm | सानिकास्वप्निल

काय अप्रतिम लिहिले आहे
___/\___

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 May 2015 - 12:18 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहीले आहे. एकदा भेट द्यायलाच पाहिजे असे ठिकाण.

आदूबाळ's picture

21 May 2015 - 12:55 am | आदूबाळ

काय छान लिहिलंय!

काला आंब स्मारकाचं श्रेय अजित जोशी या पानिपतमध्ये कार्यरत असलेल्या मराठी सनदी अधिकाऱ्याकडे जातं.

काही युद्धं टाळणंच योग्य...

चित्रगुप्त's picture

21 May 2015 - 1:06 am | चित्रगुप्त

पानिपत पासून अवघ्या अडीच तासांच्या अंतरावर गेली पंचवीस वर्षे रहात असूनही तिथे न जाण्यातली चूक आज हा लेख वाचून उमजली, आता नक्की जाणार, आणि जेही मिपाकर पुढे जेंव्हाही तिकडे जाणार असतील, त्या सर्वांना घरी येण्याचे कायमचे आमंत्रण देऊन ठेवतो.

आकाश खोत's picture

21 May 2015 - 10:09 am | आकाश खोत

धन्यवाद. आम्ही नक्की येणार आहोत. कधि ते माहित नाहि. पण नक्की. तेव्हा सम्पर्क साधतो.

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2015 - 1:40 am | अत्रुप्त आत्मा

__/\__

सुहास झेले's picture

21 May 2015 - 1:49 am | सुहास झेले

_/|\_ _/|\_ _/|\_

चांगलं काम केलंत ,भिडणारं लेखन.

दमामि's picture

21 May 2015 - 7:16 am | दमामि

अतिशय सुरेख लिहिलय!

जुइ's picture

21 May 2015 - 8:26 am | जुइ

पानिपतच्या लढाई बद्द्ल वाचवत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2015 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलंय.

-दिलीप बिरुटे

योगी९००'s picture

21 May 2015 - 8:45 am | योगी९००

तुमच्या लेखणीमुळे पानिपतला जाऊन आल्याचा अनुभव आला.

अप्रतिम लिहिलंय.स्मारक खरंच छान ठेवलेलं दिसतंय.नक्कीच जाऊन येणार पानिपताला.माझ्या या मनोरथाचे पानिपत होऊ नये ही इच्छा!

प्रचेतस's picture

21 May 2015 - 9:19 am | प्रचेतस

बिपिनदा...

_/\_

नाखु's picture

21 May 2015 - 12:41 pm | नाखु

एकदा अशी लांबची यात्रा काढा आता तुम्हीच.
साला जीवनात या दोन ठिकाणी भेट दिलीच पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले आहे.

एक पानीपत+ बाजीरावाची समाधी आणि दुसरे अंदमानची सावरकरांची खोली.(बाकी चारी धाम नाही झाले तरी बेहत्तर)

नतमस्तक नाखु

खटपट्या's picture

21 May 2015 - 9:27 am | खटपट्या

खूप छान लेख...

खंडेराव's picture

21 May 2015 - 9:37 am | खंडेराव

मस्त लिहिलेय! पानिपत दर्शन नक्की आता

आकाश खोत's picture

21 May 2015 - 10:07 am | आकाश खोत

नक्की जाउन नतमस्तक होणार इथे

विश्वास पाटील यान्च्या पानिपत पुस्तकातील ....द्रुश्ये समोर आली.

स्मारकाची माहिति मस्त
योग आला तर नक्की भेट देनार.

अनुप ढेरे's picture

21 May 2015 - 10:16 am | अनुप ढेरे

वाह!

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 10:32 am | उगा काहितरीच

पाणी आलं राव डोळ्यात ! अप्रतिम लेखन हेवेसांनलगे .

सौंदाळा's picture

21 May 2015 - 10:34 am | सौंदाळा

सुंदर लिहिलं आहे.
खरच मराठी माणसासाठी पानिपत तीर्थक्षेत्राहुन कमी नाही. एकदा तरी जायची इच्छा आहे.
या जमिनीला मानवी रक्ताची चटक लागली होती असे वाटते आणि तिन्ही युद्धात स्वकियांचा पराभव झाला त्यामुळे तर अजुनच अस्वस्थता येते.

जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे

ह्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल का?

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2015 - 12:56 pm | बिपिन कार्यकर्ते

नारळीकरांच्या ’यक्षांची देणगी’ मध्ये आहे ती कथा. पानपतावर मराठ्यांचा जय होतो. त्यामुळे ते अधिकाधिक बलवान होत जातात. इंग्रज कधीच शिरजोर होत नाहीत. विसाव्या शतकाच्या शेवटाचा पावशतकात ही कथा घडते. त्यावेळेसही मुंबई इंग्रजांची आणि बाकी सगळीकडे पेशव्यांचे राज्य. हिंदुस्तान अखंडच आहे. पुण्याहून मुंबईला जायला पासपोर्ट तर कराचीला वगैरे जायला थेट ट्रेन्स. असं सगळं आहे.

'गंगाधरपंतांचे पानिपत' असे या कथेचे नाव आहे

शेखर काळे's picture

21 May 2015 - 10:38 am | शेखर काळे

आपण भारतिय तसे इतिहासाबद्दल उदासीन असतो.
भारतिय सरकारने पानिपतच्या युद्धस्थळी स्मारक ऊभारल्याचे वाचून आनंद झाला.
तुम्ही त्या स्थळी गेलात, वाचून छान वाटले. कदाचित हे स्थळ कुठे युरोपात असते, तर तिथे भव्य स्मारक असते.
मराठे लढलेल्या पानिपताच्या युद्धाने भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या युद्धानंतर हिंदुस्थान परकियांच्या ताब्यात जाण्याची सुरुवात झाली.
छान लिहिलत.

भुमन्यु's picture

21 May 2015 - 10:39 am | भुमन्यु

अप्रतिम लिहिलंय. आजही पानिपताचा उल्लेख वाचला की मराठ्यांच्या कर्तुत्वाची प्रशंसा कराविशी वाटते कुठे पुणे आणि कुठे पानिपत. धन्य ते पेशवे आणि धन्य ते मराठा सैन्य.

वाचतांनाच उगिच ओळ आठवुन गेली "भिमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा"

गणेशा's picture

21 May 2015 - 10:49 am | गणेशा

छान लिहिले आहे..
अमोल कोण आहे पण ?

मोहनराव's picture

21 May 2015 - 4:46 pm | मोहनराव

अमोल कोण?

अत्रन्गि पाउस's picture

21 May 2015 - 10:57 am | अत्रन्गि पाउस

पानिपत हे मराठ्यांच्या पराभवाचे प्रतिक समजत ...
त्याचा कोणताही उल्लेख / उदात्तीकरण किंवा गवगवा त्यांना मान्य नव्हता ...
युद्धशास्त्रात केलेली घोडचूक समजत ते ...

चित्रगुप्त's picture

21 May 2015 - 11:42 am | चित्रगुप्त

सावरकरांचा पानिपत वरील लेख जालावर उपलब्ध आहे का ? असल्यास दुवा द्यावा. वेगळ्या दृष्टीकोनातून केलेली मीमासा पण वाचली पाहिजे.

अत्रन्गि पाउस's picture

21 May 2015 - 4:14 pm | अत्रन्गि पाउस

सावरकरांशी सुखसंवाद ह्या पुस्तकात त्यांचे हे भाष्य उधृत केलेले आहे ...

mbhosle's picture

21 May 2015 - 10:58 am | mbhosle

खूप छान लेख .

आनंद's picture

21 May 2015 - 11:52 am | आनंद

मस्त लेख!
पत्र स्वरुपात लिहल्या मुळे आणखिनच छान.
कित्येक वर्षात पत्र वाचल्याचे आठवत नाही.

जेपी's picture

21 May 2015 - 12:18 pm | जेपी

_/\__/\_

जगप्रवासी's picture

21 May 2015 - 12:37 pm | जगप्रवासी

छान लिहिलंय,

सौंदाळा
जयंत नारळीकर यांनी "यक्षाची देणगी" या पुस्तकात पानिपत युद्धावर कथा लिहिली आहे, छान वाचण्यासारखे पुस्तक आहे, शाळेत असतानाच वाचल होत तेव्हा आवडल म्हणून लगेच खरेदी केल पण काही मित्रांनी वाचायला घेतलं ते परत काही दिल नाही.

बॅटमॅन's picture

21 May 2015 - 1:04 pm | बॅटमॅन

१२ जानेवारी २०१३ रोजी इथे गेलो होतो त्याची आठवण झाली.

निओ's picture

21 May 2015 - 1:21 pm | निओ

पानिपत वर देह ठेवलेल्या बहाद्दर मराठ्यांना अनेक सलाम .
एक प्रश्न, मागे राहिलेल्या मराठ्यांना 'रोड मराठा' का म्हणत असावेत ?

मोदक's picture

21 May 2015 - 1:49 pm | मोदक

सुंदर लिखाण बिका...!!

पानिपताची सैर करवल्याबद्दल धन्यवाद!!

सिरुसेरि's picture

21 May 2015 - 2:04 pm | सिरुसेरि

श्रीवर्धनचे पेशवे स्मारक खुपच दुर्लक्षित , उपेक्षित राहिले आहे . त्याची हा लेख वाचुन आठवण आली . दत्ताजी शिंदे , जनकोजी शिंदे यांचे बलीदान , महादजी शिंदे यांच्या कारकिर्दीची सुरुवात , नानासाहेब पेशवे यांचे बंधुशोकाने निधन, व त्यामुळे माधवराव पेशवे यांच्यावर आलेली पेशवेपदाचे जबाबदारी अशा अनेक ईतिहासातील महत्वाच्या घटना पानिपत युद्धामुळे घडल्या आहेत .

श्रीवर्धनचे पेशवे स्मारक ? छे. ते तर तिथल्या मुलांचे क्रिकेट खेळण्याचे मैदान आहे. याच आठअवड्यात मोठ्या अपेक्षेने गेलो होतो, पण तिथला नजारा पाहुन आत पाऊल ठेवायची हिंमत झाली नाही.

जातीवंत भटका's picture

21 May 2015 - 2:32 pm | जातीवंत भटका

...

स्मिता.'s picture

21 May 2015 - 2:46 pm | स्मिता.

अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!!
बाकी लेख आणि त्यातल्या भावनांकरता _/\_

पानिपतच्या युद्धस्मारकाचे दर्शन घडविल्याबद्द्ल __/\__

विनोद१८'s picture

21 May 2015 - 3:42 pm | विनोद१८

...अतिशय सुरेख लिहीलय बिपिन कार्यकर्ते, एक मात्र खरे की 'पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 4:07 pm | टवाळ कार्टा

पानिपत म्हणजे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव '.

हे वाक्य आपणच बदलून पानिपत म्हणजे मराठ्यांची क्षमता असे करावे

"मराठ्यांची क्षमता" हे सार्थ ठरेल कारण शेवटच्या पानीपताच्या युध्दानंतर अब्दालीची भारतात पुन्हा यायची हींमत झाली नाही.

जयंत कुलकर्णी's picture

4 Jun 2015 - 7:46 pm | जयंत कुलकर्णी

अब्दाल्ली परत इकडे आला नाही याचे कारण मला वाटते शीखांनी जो लढा दिला तो... तो इतिहास आपल्याकडे विशेष माहिती नाही....पण मी लिहिन तो एकदा...
अबदाली एकदा म्हणाला होता "मी उभे केलेले साम्राज्य माझ्या डोळ्यादेखत हे शीख नष्ट करणार असे वाटते'.....

शिखांचा ईतीहास वाचायला आवडेल सर...
मला शीख लोकांचा नेहमीच अभीमान वाटत आला आहे. दोन तीन रुम पार्ट्नर शीख असल्यामुळे त्यांचे विशीष्ठ स्वभावविशेष चांगलेच लक्षात राहीले आहेत.

१८५७ च्या उठवत हे लोक इंग्र्झाच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. (Ref : The Last Mughal by William Dalrymple) ….
रझाकार जेंव्हा दंगे करत होते तेंव्हा हे लोक दंगे झालेल्या भागात truck ने यायचे आणि लुटायचे असे जुने लोक म्हणतात … माझ्या आजीने सांगितले होते कि एका शिखाने (द्या येउन) त्यांना सर्व वस्तू उकिरड्यात लपवण्यासाठी सांगितले होते ….

प्रचेतस's picture

5 Jun 2015 - 10:34 am | प्रचेतस

शिखांचा लढा हे एक काराण तर होतेच पण अफगाणात-अब्दालीच्या राज्यातही त्यावेळी बंडाळी माजली होती असे वाचल्याचे आठवतेय.

समस्त मराठ्यांच्या वेदनेला बोलते केलेत.

चिगो's picture

21 May 2015 - 5:03 pm | चिगो

अप्रतिम लेख, बिका.. स्मिताताईंनी लिहील्यसारखं "अतिदीर्घ विश्रांतीनंतर असं काही लिहिणार असाल तर चालेल तुम्ही तशी विश्रांती घेणं!!"

गेल्याच आठवड्यात तूनळीवर पाहिलेले 'रणांगण' नाटक आठवले

बाबा पाटील's picture

21 May 2015 - 8:11 pm | बाबा पाटील

सहन होत नाही,जे मनी दाटते. पराभवातुन विजयाचा इतिहास उभा करण्यार्‍या त्या लाखो अनाम विरांना मानाचा मुजरा.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 May 2015 - 10:29 am | बिपिन कार्यकर्ते

सर्वांना धन्यवाद!

अद्द्या's picture

22 May 2015 - 10:57 am | अद्द्या

सुन्दर लेख . .

:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 May 2015 - 10:35 am | ज्ञानोबाचे पैजार

मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!

अत्यंत सुरेख आवडले.
_/\_

पैजारबुवा,

दा विन्ची's picture

26 May 2015 - 12:17 pm | दा विन्ची

बिपिनजी अतिशय सुंदर लेख. मी पण गेले वर्षभर आणि आणखी किमान दोन वर्षे उत्तराखंड मध्ये आहे. पानिपत माझ्या ठिकाणापासून अवघे तीन चार तासावर आहे. बरेच दिवस पानिपतचे दर्शन घ्यायचे मनात आहे पण जमले नाही . पण आता ठरले , जाणार म्हणजे जाणारच.
असो . पानिपतच्या लढाईत वाचलेले काही मराठा सरदार आणि सैनिक याच भागात काही वर्षे लाऊन छपून रहिले. आता ते रोड मराठा म्हणून या भागात प्रसिध्द आहेत. पंजाबमधील जालंधर भाग तसेच उत्तराखंड व पर्वतीय भागात बरीच रोड मराठा वस्ती आहे. त्यांचे सणवार, घरांचे बांधकाम , व सर्व धार्मिक विधी मराठा पद्धतीने होतात . याविषयी एक छान लेख इंडिया टुडे मध्ये आला होता . माझ्याकडे लिंक नाही पण गुगल वर लगेच सापडेल . त्यांची आडनावेही जाधव , पवार, भोसले, अशी आहेत . इतकेच काय उत्तराखंड डोंगरी भागातील जोशी, पन्त कुटुंबे म्हणजे पेशव्या बरोबर असलेली ब्राह्मण कुटुंबे होत .
पुन्हा एकदा लेख खूप आवडला हे सांगतो

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2015 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

साहेब, माझे इथले वास्तव्य अगदीच थोडे आहे. संपलेच आहे म्हणा. पण तुम्ही तिथे आहात तर प्लीज रोड मराठांवर थोडा रीसर्च कराल का? इंडिया टुडेमधलं आर्टिकल मी वाचलं आहे. पण तुम्ही स्वत: काही माहिती जमा करू शकाल का? मी आत्ता जिथे आहे तो भाग रोड मराठा बहुल आहे. माझ्या आजूबाजूला हजारो रोड मराठा वावरत आहेत. पण मला जमलं नाही भेटायला किंवा माहिती करून घ्यायला.

गामा पैलवान's picture

26 May 2015 - 4:36 pm | गामा पैलवान

धन्यवाद दा विन्ची! इंटुमधला लेख इथे आहे : http://indiatoday.intoday.in/story/haryana-rods-trace-their-lineage-to-m...

आपला नम्र,
-गामा पैलवान

स्पंदना's picture

1 Jun 2015 - 6:10 am | स्पंदना

धागा वाचायला म्हणून शोधून शोधून थकले. शेवटी गूगल केला आणि मिळवला.वरच राहील ही अपेक्षा.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2015 - 9:03 am | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद, ताई. पूर्वी http://www.misalpav.com/user/322/authored या लिंकवर माझे सर्व लेखन असायचे. पण काल परवापासून लिंक बदलली आहे बहुतेक. :(

स्पंदना's picture

1 Jun 2015 - 9:55 am | स्पंदना

लेखाच्या सुरवातीच्या पॅरेग्राफशी पुर्णतः सहमत बिका!! काही क्षण, काही भावना आणि काही स्थळे अनुभवताना त्या त्या तोलाची साथ लागते. संभाजीराजांनी पन्हाळ्यावरुन खाली मारलेली उडी, रायगडाच्या पायथ्याशी उभे राहुन त्याच्या छायेतुन वर पहाताना उन्नत माथ्याचा एक पुरुष उभा दिसणे (गड जर माझ्या नजरेने पहाल, तर तो एक रुंद खांद्याचा पुरुष, हात कमरेवर ठेवुन उभा आहे)
जेथे दिडलाख बांगडी फुटली त्या स्थळाबद्दल तर काय वर्णाव? तरीही प्रत्यक्षात तेथे उभा राहिल्यावर मरणोन्मुखाला, धर्म, जात, वतन नसल्याची तुम्हाला झालेली जाणिव खोलवर हलवुन गेली. त्या परिसरात ओढे ओहळातुन लपून छपुन प़ळत सुटलेल्या आपल्या लोकांच्या हलाखीचे वर्णन कुठेतरी वाचलेले आठवतेय. युद्धाच्या गर्जनेत, त्या घनगोर गर्दीत उसळत्या रक्तानीशी तुटुन पडलेले भाऊ, त्यांच्या भोवताली कडे करुन प्राणपणाने त्यांचा बचाव करणारे स्वामीनिष्ठ मावळे, अन तरीही तुटलेला तो आभाळीचा तारा!! स्वामिनिष्ठेची इमानाची अन वतननिष्ठेची झालेली हार! नजरेसमोरुन नाहीसा झालेलं कुंकु पहात धाय्मोकलुन रडणार्‍या खाश्या स्वार्‍या अन तेथुन पुढे मरेपर्यंत वाट पहाणारी पार्वतीबाई! तोतया प्रकरण!! काय काय गुंफल नाही या युद्धाने ???
स्मारक म्हणजे निर्विकार बांधकाम ही भावना काहीशी पटली नाही, पण तरीही हे स्थळ राखण्यासाठी केला गेलेला प्रय्त्न समजला. बघू ! अशी आपल्यासारखी ज्वलंत भावना असणारी आण्खी दोनचार डोकी उठतीलही, आणि एखादं या भावनांना साजेसं स्मारक उभेही राहील या ठिकाणी.
लेखाच्या योगाने आम्हाला तुमच्या मनात डोकावण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद बिका.

तिमा's picture

1 Jun 2015 - 1:59 pm | तिमा

लहानपणी , वर्तमानपत्रांत अमुक ह्याचे पानिपत झाले, अशा बातम्या वाचायचो. पुढे इतिहास बारकाईने अभ्यासला तेंव्हा या अफाट साहसाची कल्पना आली आणि विश्वास पाटीलांचे पुस्तक वाचल्यावर तर जीव गलबलला. तुमच्या लेखातील नुसते फोटो पाहून एक अत्यंत उदासी आली. प्रत्यक्ष जर कधी तिथे गेलो तर मला रडू कोसळेल.
ज्या पुढच्या पिढ्यांसाठी त्या वीरांनी आपले जीव टाकले त्यांना त्याची काय पर्वा आहे ? इतिहास हा विषय न आवडणार्‍या आत्ताच्या पिढीविषयी माझ्या मनांत उद्वेग आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Jun 2015 - 5:51 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फारच हेलावुन जाणारे लेखन आहे.जियो बिकाशेठ हे वाचुन आमची रावेरखेडची भेट स्मरली.त्या स्मारकातली पहील्या बाजीरावाची छत्री व त्यावरचे लेखन वाचून डोळे घळाघळा वाहत होते...ते सारे झर्रकन सरकले डोळ्यापुढून हे वाचताना....

बिकांची लेखणी लिहू लागली ही अतिशय समाधानाची बाब आहे.
पानिपत हा मराठ्यांच्या हरण्याचा इतिहास आहे असं मानलें तरी तो फ़क्त एका लढाईमध्ये हरण्याचा इतिहास आहे.
1761 मध्ये मराठे हरले किंवा मारले गेले तरी त्यानंतर 10 च वर्षात पुन्हा पानपतावर चालून जाण्याची हिम्मत मराठ्यांनी दाखवलेली आहे.
बाकी युद्धात हार किंवा जीत रणांगण सोडून नक्की कुणाची होते हा संशोधनाचा विषय आहे हे मात्र नक्की!

एखादी गोष्ट मनाला भिडते हे बर्‍याच वेळेला होतं. पण ती भावना वाचकांपर्यंत तेवढ्याच तीव्रतेने पोहोचाविणे हे कठीण आहे. पण हे सुद्धा तुम्हाला शंभर टक्के जमलं आहे.

पानिपत हि येक संतापजनक आणि उद्विग्न करणारी पराभवाची कहाणी आहे.,

संताप येतो तो आपल्याच लोकांचा . एक शिवाजी महाराज होते ज्यांनी अत्यंत अपुर्या साधनसामग्री त ( resources - including human resource) युद्ध कसे जिंकावे याचा वस्तुपाठ घालून दिला , योग्य जागी माघार कशी घ्यावी ते शिकवले.

आणि त्यांचेच वंशज - युद्धावर हजारो बाजार बुणगे , बायका , वेश्या , नाच्या आणि trip मारणारे ब्राह्मण घेवून गेले. खरोखर या युद्धात योद्धे आणि बेकार लोक यांचे गुणोत्तर की होते ?
युधाआधीच आपण हरणार होतो - किंवा तीच आपली लायकी होती.

इथे कोठल्याही जातीवर टीका करायची नाही.... पण युद्ध करताना मुहूर्त कसले बघता ? आणि हे मुहूर्त तर पूर्णपणे फासले तरी लोकांचा मुहूर्तावरच विश्वास बसतो .

आणि नेत्यांना फाजील आत्मविश्वास होता म्हणून मुख्य नेता अंबारीत बसून होता .

आणि महाराजांच्या निर्वाणानंतर नेता नसताना लढणारे इथे नेता मारताच गर्भगळीत झाले !

आधुनिक युद्धात युद्धभूमीवर जवळपास सर्व जण युद्ध करू शकतात . खरेच पानिपात्वर हे प्रमाण काय होते ?

माझ्यामते हे दुखद नवे तर संतापजनक प्रकरण आहे ...

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 6:35 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या आशयाच्या विरुद्ध बाजूचे विचार चेपूवर कालच वाचले होते - दुवा.

हा लेख त्या युद्धाची मिमांसा करण्याकरिता प्रकाशित केला आहे असे वाटत नसल्याने या मुद्द्यावर अधिक काही लिहत नाही.

विनोद१८'s picture

4 Jun 2015 - 11:37 pm | विनोद१८

..त्या दुव्याबद्दल धन्यवाद, त्यामुळे 'अतिरीक्त संखेच्या बाजारबुणग्यांसंबंधीचे' गैरसमज दुर व्हायला मदतच झाली.

इथल्या प्रत्येकाने तो वाचावा असे वाटते.

विनोद१८'s picture

4 Jun 2015 - 11:25 pm | विनोद१८

..आप्ला अभिप्राय मला अतिशय आवडिला आहे, तो आत्ताच मी वाचिला. मी खात्रीने छातीठोकपणे असे सांगु शकतो की, आपण जर त्याकाळी जन्मला असता आणि पाणिपतावर 'सेनापती' म्हणुण गेला असता तर आपण ती पानिपतावरची लढाई आपल्या पराक्रमी नेत्रूत्वाखाली नक्कीच जिंकलो असतो. तुमच्याशि मि सहमत आहे.

किसन शिंदे's picture

5 Jun 2015 - 10:48 am | किसन शिंदे

बिपिनदा, लेख अतिशय आवडला.

सुधीर's picture

5 Jun 2015 - 11:17 am | सुधीर

__/\___

पानिपतानंतर घडलेले 'सदाशिवाचा तोतया' याबाबतीत काही माहिती मिळेल का ?

मन१'s picture

1 Feb 2016 - 3:53 pm | मन१

छान लिहिलय बिकाशेट

rahul ghate's picture

1 Feb 2016 - 7:12 pm | rahul ghate

बिपीनदा ,
सुंदर लेख लिहून 1 भलभाळती जखम उघडी केली।
लेख मनापासून आवडला

इतिहास प्रेमी राहुल

खूप छान!!

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2020 - 12:52 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम, उत्कट असं लिहिलंय.
स्मारकाला भेट देण्याचा अनुभव वाचून नि:शब्द झालो !
स्मारकाचे फोटो अप्रतिम !
मराठी शौर्याच्या या तीर्थक्षेत्राला भेट दिलीच पाहिजे असे वाटू लागलेय !

बिपिन कार्यकर्ते _/\_

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2020 - 1:17 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद! :)