चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
7 Mar 2015 - 6:44 pm

चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत
चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स
चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस)
चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन

मागच्या भागात चौर्य प्रतिबंधक उपाय कसे आणि किती प्रकारचे असतात ते आपण पाहिले. आता सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा विषय पाहूयात. तसा अपघात हा शब्दही धडकी भरवणारा आहे. अनपेक्षितरित्या कुणाचाही कधीही अन कसाही होऊ शकणारा!

''आरशात दिसणारी प्रतिमा वाटते त्याहून अधिक जवळ असू शकते'' रिअर-व्ह्यू मिरर वर लिहिलेली ही सूचना अपघातालाही तंतोतंत लागू पडते! अपघात आपल्या कल्पनेहून अधिक जवळ वावरत असू शकतो. आपण कधीतरी थोडक्यात वाचलेले असलो तर त्या आठवणीही आपल्याला नकोश्या वाटतात.

आपल्या देशात अपघातांत इतके नुकसान होते की त्यांचे परिणाम एखाद्या युद्धाहूनही भयंकर आहेत .
आकडेवारीनुसार भारतात २००६ मध्ये अपघातात एक लाख मृत्यू झाले आणि वीस लाख जखमी झाले. पुढील सहा वर्षात २०१२ मध्ये हा आकडा एक लाख चाळीस हजारांवर पोहोचला होता. २००३ ते २०१३ पर्यंत ५४% अपमृत्यू वाढले आहेत . मागील एका भागात आपण पाहिलेच होते, की या काळात वाहने जवळ जवळ दुप्पट झाली होती. आपला देश तीन टक्के GDP फक्त अपघातांत गमावतो !
अपघाताने माणूस गेला किंवा जायबंदी झाला- तरी दोन्ही तितकंच भयानक असते. वाचलेला व्यक्ती आयुष्यभर दुखणे घेऊन जगतो. अपघाताच्या बातम्या नेहमी वाचून आपली मनं बोथट झालेली असतात. बातमी वाचून आधी कुठे - मग किती गेले -मग ओळखीचं नाव तर नाही ना? नसेल तर चला पुढे- अशी साधारणपणे धारणा असते. सुरक्षित गाडी घेण्याकडे त्यामुळेच सगळ्या ग्राहकांचा कल असायला हवा. थोडी किंमत जास्त असेल तरीही.

नुकतीच एका मित्राला गाडी घ्यायची होती. एकाच मॉडेलचे तीन प्रकार होते, त्यातला मध्यम फीचर्स असलेला प्रकार त्याने निवडला होता. उत्सुकता म्हणून त्याला म्हणलं हा मधला पर्यायच का? तर म्हणाला, ''या मॉडेलची किंमत ऐंशी हजारने कमी पडते''. या ऐंशी हजारांत त्याला काय कमी मिळत होतं? तर एयरबॅग्ज, ए बी एस प्रणाली आणि अलॉय व्हील्स! ( हे सगळंच महत्वाचं) म्हणजे दहाबारा टक्के किंमत वाचवून तो कायमची जोखीम घेत होता. सुरक्षित गाडी असण्याची भावना गाडी चालवण्याचा आनंद द्विगुणीत करते. आपल्या देशांत वाहनकर्जाचे व्याजदर अजून बरेच कमी व्हायला हवेत ते याचसाठी!

गाडी सुरक्षित असणे म्हणजे आतले चालक, सहप्रवासी आणि बाहेरच्या जगातले इतर सजीव आणि मालमत्ता हे सगळे सुरक्षित असणे होय! मुख्य जबाबदारी आहे चालवणाऱ्याची आणि अपघात झालाच तर कमीत कमी नुकसान होत जीव वाचवणे ही उत्पादकाची जबाबदारी. त्यामुळे सरकारने कायदे दुरुस्त करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, रस्ते किमान बरे ठेवणे आणि आपण सर्वांनी नियम पाळून सुरक्षित गाडी चालवणे हे सगळंच आवश्यक आहे. . . (म्हणजे हे सगळं जमून येणं अद्याप दूरच आहे!)

गेल्या वर्षी बी बी सी ने एक बातमी दिली, की भारतातल्या बहुतांश लोकप्रिय गाड्या ग्लोबल एनक्याप च्या धडक चाचणीत नापास झाल्या. भारतीय ऑटो उद्योग कसा वीस वर्षे मागे आहे वगैरे …. त्याची ब्रिटनमध्ये बरीच चर्चा झाली होती. रोख मुख्यतः ''भारतीय बनावटीवर'' होता कारण या लोकप्रिय कार्स मध्ये अल्टो न्यानो सह, फोर्ड फिगो / फोक्सवागन पोलो, ह्युन्दै पण होत्याच. चर्चा करणारे तपशिलात न जाता नुसते बोलत होते. या सर्व कार्स एअरबॅग नसलेल्या होत्या. स्थानिक बाजारासाठी स्पर्धेतून त्यांनी स्वस्त मॉडेल्स आणण्यासाठी त्यांनी तडजोड केली होती. भारतीय उद्योगात मात्र या बातमीचा सकारात्मक परिणाम झाला. फोक्सव्यागन ने एअरबॅगविरहित मॉडेल मागे घेऊन अंशतः किंमत वाढवली अन सगळ्या गाड्यांत एअरबॅग आणली. इतरांनी स्थानिकीकरण करताना किंमत कमी करण्यासाठी केलेल्या तडजोडींवर फेरविचार केला. येत्या काळातली मॉडेल्स सुरक्षिततेशी तडजोडी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आपला ग्राहकांचा हट्ट माफक किमतीत उच्च सुरक्षितता मिळण्याचा असायला हवा.

वाहन अपघातांची कारणं असंख्य असतात पण प्रमुख कारणांची यादी करून पाहू:
१. अतिवेग
२. धोक्याकडे दुर्लक्ष्य- चालकाच्या विचारांमुळे किंवा मन:स्थितीमुळे
३. वाहतुकीचे नियम न पाळणे
४. वाहनाच्या डिझाईनने घातलेल्या मर्यादा न पाळणे.
५. ''आपण सुरक्षिततेची कितीही काळजी घेतली तरी दुसरे घेतीलच असे नाही'' याची जाणीव नसणे.
६. योग्य अंतराने थोडी विश्रांती न घेण्यामुळे
७. व्यसनामुळे- स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या
८. गाडीची देखभाल झाली नसल्याने
९. खराब रस्ते - गायब झालेली किंवा पोस्टरमागे गेलेली मार्गदर्शक चिन्हे
१०. अचानक अवतरलेल्या प्राणी, पक्षी आणि मनुष्यांना वाचवणे
११. फोनवर बोलत किंवा गप्पा मारत- खात पीत गाडी चालवणे
१२. राग येणे, लक्ष विचलित होणे- इ. .
….

ही यादी न संपणारी आहे. प्रत्येक क्षणी जागरूक असणं हाच अपघात टाळण्याचा मंत्र.
विविध सरकारी आणि अन्य संस्था अपघात कमी करण्याचे प्रयत्न म्हणून आधी विदा/ माहिती गोळा करतात. त्यात अपघाताची अनेक कारणं समोर येतात. त्यांचा अभ्यास करून नवे नियम बनवले जातात. वाहन उत्पादकाना नवे मानक दिले जातात आणि ते लवकरात लवकर कार्यान्वित करायला कायद्याने भाग पाडले जाते. इतकं असूनही अपघात होताच रहातात.

सुरक्षिततेचे प्रामुख्याने दोन प्रकार समजले जातात - प्राथमिक ( Active)आणि दुय्यम (Passive) सुरक्षितता. प्राथमिक सुरक्षिततेमध्ये स्टीयारिंग चाक, सुरक्षित/सक्षम ब्रेक्स प्रणाली (एबीएस ) यावर भर असतो. गाडीची रस्त्यावर पकड, स्थिरता, वळणावरची सुरक्षितता, कार चालवताना इंजिन किंवा अन्य खडखडाट विचलित करणार नाहीत, हे निकष प्रामुख्याने सांभाळले जातात.

मात्र तेवढ्यावर अवलंबून न रहाता 'सदैव प्रतिकूल तेच घडेल' हे लक्षात घेऊन दुय्यम सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असते. यामध्ये मुख्यत्वे येतात ते सीटबेल्ट, आणि धक्क्याच्या वेळी उघडणाऱ्या हवेच्या उशीपिशव्या (Airbags ). याशिवाय एकूणच संरचनेमध्ये काळजी घेतलेली असते - जसे अपघात कशा प्रकारे होऊ शकतात, त्यामुळे कुठला भाग चेपून आतल्या प्रवाशाला कशी इजा होऊ शकते? या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला जातो. तसेच डोक्याला मागून आधार देणारे हेड रीस्ट्रेनट्स चालकाच्या उंचीप्रमाणे जुळवून घेणे, सीटबेल्ट योग्य प्रकारे लावलेत का, दारं लागलीत का? हे आपण प्रत्येक प्रवासावेळी पहाणे आवश्यक आहे.

एअरबॅग हा प्रकार अगदी अलीकडे पंचवीस वर्षांत रूढ झाला. तत्पूर्वी सीटबेल्ट आणि सुरक्षित कांचा वगैरेवर बरंच अवलंबून राहावं लागायचं. एका अमेरिकी सर्वेक्षणानुसार सीटचा पट्टा लावण्यामुळे एकट्या अमेरिकेत पन्नास वर्षांत दहा लाख जीव वाचले.

''रस्ता प्रथम पादचाऱ्यासाठी' हे सर्व प्रगत देशांचे धोरण असल्याने पायी चालणारे आणि सायकलस्वार यांच्यासाठी बाह्य एयरबॅग्ज सक्तीच्या होऊ घातल्या आहेत. आता हे फीचर ऐकल्यावर हास्यास्पद वाटू शकते पण इथे वोल्वो ची एक कार पहा - चालणाऱ्या व्यक्तीला धक्का लागल्यावर तो सुरक्षित रहातो हे महत्वाचे ! संख्याशास्त्राच्या आधारे ह्या धोक्याची निश्चिती केली असणार हे उघड आहे. २०१६ पासून हे फीचर नसल्यास नव्या गाड्या युरोपात विकता येणार नाहीत .

धडक संवेदकाच्या इशाऱ्यावर सोडियम अझाइड आणि पोट्याशियम नायट्रेट (किंवा अन्य ) यांची अतिजलद रासायनिक प्रक्रिया होऊन गरम नायट्रोजनचा झोत एअरबॅग उघडतो. हे अवघ्या शंभर मिलीसेकंदांत घडते, तोपर्यंत धडकलेला पादचारी समोरील काचेवर पोहोचलेलाही नसतो ! साहजिकच हे सगळे अतिशय अचूक असावे लागते. धडक झाल्यास अंतर्गत एअरबॅग उघडताना सीटवर लहान मूल असेल तर त्याला मानसिक धक्का बसू शकतो. त्यासाठी तिथली एअरबॅग अर्ध्यापर्यंतच उघडण्याची सुविधा असते. पण त्यासाठी सीटमध्ये एक वजन-मापक सेन्सर वापरलेला असावा लागतो ज्यामुळे बसलेला व्यक्ती प्रौढ आहे की बालक हे त्या यंत्रणेला समजते.

गाडीतली सगळी उपकरणे ठीक चालू असणे, त्यांनी धोक्याची सूचना वेळेत देणे हे दुय्यम सुरक्षितता प्रकारात अपेक्षित आहे. जसे - पाचही टायर्समध्ये हवेचा दाब बरोबर आहे हे सतत तपासून डिस्प्लेवर दाखवले जाते. त्यायोगे धोका असल्यास पूर्वसुचना मिळते. गाडी चालवताना सर्व इंडिकेटर्सवर लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे.

ही सुरक्षितता देण्यासाठी मोठा खर्च येतो. यात सेन्सर्स, हार्डवेअर आणि सोफ्टवेअर आणि चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढतात. ते वाढल्यामुळे वायरींग, गुंतागुंत वाढते. जितके सुटे भाग जास्त, तितके बिघाड होण्याची शक्यता वाढते. तसे होऊ नये म्हणून उपाय शोधण्यासाठी सुरक्षा विशेष तज्ञ सतत काम करत असतात. ही मोड्यूल्स आणि त्यातले नाविन्य हा खूप मोठा विषय आहे. जिज्ञासूनां या तंत्रज्ञानातल्या मोठ्या कंपन्या- बॉश, डेल्फी, कौंटीनेनटल, टी आर डब्ल्यू वगैरेंच्या संकेतस्थळांवर याविषयी भरपूर माहिती वाचायला मिळेल.

फेल्युअर मोड व इफेक्ट अनालिसिस (FMEA) ही प्रक्रिया वाहन आणि सुटे भाग यांच्या डिझाईनच्या वेळी केली जाते. ही एक संख्याशास्त्रीय पद्धत आहे . गेल्या शतकांत शोधलेले अपयश विश्लेषणासाठी वापरले जाणारे हे एक पद्धतशीर तंत्र आहे. गाडीतील बहुतांश सुटे भाग केव्हातरी योग्य प्रकारे चालणार नाहीत किंवा खराब होणार ही शक्यता गृहीत धरली जाते. एकेका फीचरची नादुरुस्तीची सर्व कारणे आणि त्यांच्या शक्यता यांचे कोष्टक करून त्याआधारे विविध भाग आणि फीचर्सना गुण देण्यात येतात. त्यावर आधारित गाडीमध्ये केव्हा ना केव्हा येऊ शकणाऱ्या दोषांचे कोष्टक तयार होते. त्यानुसार हार्डवेअर आणि सोफ्टवेअर मध्ये करावयाच्या उपाययोजना ठरवल्या जातात. यासाठी अनेक अनुभवी मंडळी सहभागी होत असल्याने त्यांनी पूर्वीच्या वाहनांत पाहिलेले दोष, त्यासाठी केलेले उपाय यांचा समग्र विचार होत असतो. अभियंत्यांचं परंपरागत शहाणपण भरपूर उपयोगी पडतं. यासाठी अद्ययावत सोफ्टवेअर प्रणाली उपलब्ध आहेत. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाने बिघाडांवर कशी मात करता येईल यावर आधारित निर्णय केले जातात. याचा आणखी एक फायदा होतो म्हणजे हमीकाळात येणाऱ्या मोफत दुरुस्त्या / भाग बदलणे आपोआप कमी होते. आपली गाडी सुरक्षित असावी यासाठी हजारो लोक रोज काम करत आहेत ही कल्पना आपल्याला कुठेतरी सुखावून जाते आणि निश्चिंतता येते.

बहुतांश वाहने जगात सर्वत्र विकली जात असल्याने त्यांचे सुरक्षा निकष ठरले आहेत. मुख्यत्वे अमेरिका , युरोप आणि जपानमध्ये आधी नियम/ मानके बनली. साहजिकच ज्यांनी आधी सुरुवात केली ते अधिक विकसित झाले आणि इतर देशातल्या कंपन्याना ते पाळणे बंधन कारक झाले. भारतात 'ए आर ए आय' ही नियामक संस्था सुरक्षितता / प्रदूषण इ. चे निकष ठरवते. हे आंतरराष्ट्रीय नियमाना अनुसरून असतात. त्यात स्थानिक गरजेनुसार काही जास्तीचे नियम केले जातात. उत्पादक कंपन्या ते सहज अंमलात आणू शकतात. भारतात परदेशी बनावटीच्या गाड्या मोठ्या संख्येने चालतात. म्हणून त्यांचे अपघात होत नाहीत का? तर असेही नाही. म्हणजे रस्ते आणि चालकच मुख्यत्वे जबाबदार असतात.

योगायोगाने हा आठवडा ( ४-१० मार्च ) राष्ट्रीय सुरक्षा जागरूकता सप्ताह म्हणून पाळला जातो. त्याची जाणीव चालकांना आणि दुचाकीस्वारांना असल्याचं दिसत नाही. खरं तर वर्षभर सुरक्षा दिवस पाळायची आपल्याला आवश्यकता आहे. कित्येकजण तणावाखाली गाडी चालवतात. त्यामुळे मनोविकार, हृदयविकार होऊ शकतात. यावर उपाय एकच- सतर्कता. वाहन डिझाईन करताना कंपनी जास्तीजास्त सुरक्षा उपाय करतच असते . त्याचा समजून वापर करणे तितकेच महत्वाचे! आणि बाह्य परिस्थितीवर सतत नजर ठेवणे त्याहूनही महत्वाचे !

सध्या बऱ्यापैकी चांगली गाडी घेणं आणि चालवताना सर्वतोपरी काळजी घेणं इतकंच आपण करू शकतो.
असं म्हणतात, की सर्वात सुरक्षित गाडी असते ती पार्किंग मध्ये उभी असताना! पण मग रस्त्यावर नाही आणली तर तिला गाडी कशी म्हणायची ? तेव्हां चला. काढा गाडी- निघूया सुरक्षिततेच्या सफरीवर !!

संदर्भ:

ग्लोबल एनक्याप
राष्‍ट्रीय सुरक्षा संस्थान
राष्‍ट्रीय अपराध रिकार्ड ब्‍यूरो
http://www.nhtsa.gov/

( क्रमश:)

मांडणीसमाजजीवनमानप्रकटनविचारआस्वादमत

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Mar 2015 - 7:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय उत्तम लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2015 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

खूप उपयोगी माहिती !

पॉइंट ब्लँक's picture

7 Mar 2015 - 8:33 pm | पॉइंट ब्लँक

+१

अत्रन्गि पाउस's picture

7 Mar 2015 - 8:05 pm | अत्रन्गि पाउस

आपली विषयातील तज्ञता जाणवली. लिखाणातली कळकळ केवळ प्रशंसनीय.
तथापि निव्वळ भारतीय रस्ते वाहतूक बाबत बोलायचे तर
१ कोणताही नियम मुळी पाळायचाच नाही हि मानसिकता ...
२ चार आणे वाचवण्यासाठी काहीही तडजोडी...(यु टर्न टाळण्यासाठी ..रॉंग साईड ने चालवणे)
३ रस्त्यावरील रिकामी जागा हि प्राणपणाने कब्जात (चाकाखाली) घेण्यासाठी अतर्क्य गाडी चालवणे
४ अतिवेगात गाडी चालवणे म्हणजेच उत्तम सारथ्य हि अत्यंत मागासलेली कल्पना उरात बाळगणे ...
५ कट मारणे हि काहीतरी उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद मानणे ..
६ फडतूस रस्ते आणि पार्किंगची योग्य सोय कधीच कुठेच पुरेशी नसणे

हे आणि असे अजून काही मुद्दे आहेत ...

इथे कितीही आधुनिक वाहने / तंत्रज्ञान आणले तरी इथल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आणि सामाजिक भान हे बैलगाडी/घोडेस्वारी वापरण्याच्या पेक्षा जास्त नसल्याने आपले प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात सुटण्याची शक्यता नाही
...

एक एकटा एकटाच's picture

7 Mar 2015 - 9:05 pm | एक एकटा एकटाच

अनुमोदन

अन्या दातार's picture

8 Mar 2015 - 11:04 am | अन्या दातार

अतिशय सहमत.

उपयुक्त माहिती. अत्रंगि पाऊस यांच्या प्रतिसादाशी सहमत.

एक एकटा एकटाच's picture

7 Mar 2015 - 9:07 pm | एक एकटा एकटाच

लेख आवडला

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2015 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती व विवेचन.

अमेरिकेत आणखी एक नियम लागू झालाय किंवा होणार आहे. तो म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणार्‍या प्रत्येक कारला बॅक अप (रिअर व्ह्यू) कॅमेरा असायलाच हवा. अमेरिकेत गाडी रिव्हर्स घेण्याला बॅकींग अप असे म्हंटले जाते. अनेकदा गराज किंवा पार्किंग मधून गाडी बाहेर काढताना गाडीमागचे जमिनीच्या स्तरावरचे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. रिव्हर्स गिअर टाकला की या कॅमेर्‍याचे थेट प्रक्षेपण डॅशबोर्डवरील स्क्रीनवर दिसू लागते. तसेच गाडीच्या मार्गात एखादी वस्तू असल्यास बीपद्वारे इशारा दिल्या जातो.

आम्ही घेतलेल्या नव्या गाडीमध्ये हे फिचर आहे. पॅरलल पार्कींग अन अनोळखी जागेत रिव्हर्स घेताना याची उपयुक्तता पदोपदी जाणावते. तसेच रस्त्यावर उजव्या लेनमध्ये जाताना किंवा उजवे वळण घेताना उजवीकडच्या आरशाखाली असलेला कॅमेरा सुरू होऊन त्याचे थेट प्रक्षेपण डॅशकॅमवरील स्क्रीनवर सुरू होते.

याखेरीज मला खूप आवडलेले फिचर म्हणजे Adaptive Cruise Control. यामध्ये आपल्या पुढे असणार्‍या गाडीने वेग कमी केल्यास आपल्या गाडीचाही वेग त्याप्रमाणात कमी केला जातो.

तसेच लेन डिपार्टर वॉर्निंग सिस्टम हे फिचरसुद्धा जवळजवळ सगळ्या नव्या कार्समध्ये आढळते.

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Mar 2015 - 11:50 pm | लॉरी टांगटूंगकर

प्रचंड आवडला

आदूबाळ's picture

8 Mar 2015 - 3:53 am | आदूबाळ

छान लेख!

एअर बॅगमुळे गुदमरायला होत नाही का?

खेडूत's picture

8 Mar 2015 - 7:44 am | खेडूत

नाही होत.
धडकेनंतर दोनतीन सेकंदात नायट्रोजन काहीसा थंड होतो. मूळ impact संपल्यावर धोका कमी झालेला असतो. त्यामुळे हालचालीला थोडी जागा करून देण्यासाठी एअरबॅग वीस ते तीस टक्के लहान होते.

कसे ते इथे पहाता येईल.

पण पूर्ण लहान होऊन चालत नाही, कारण पुढे रोलिंग ची शक्यता असतेच!

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Mar 2015 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला.
पुभाप्र.

पैजारबुवा,

माझीही शॅम्पेन's picture

8 Mar 2015 - 9:41 am | माझीही शॅम्पेन

अतिशय उत्तम माहिती आणि ती हि सोप्प्या आणि परिणाम कारक रित्या मांडल्या बद्दल आभार ,
मी हि थोडासा द्विधा होतो … पण air bag शिवाय कार घ्यायची नाही हे ठरवलं आहे

एक प्रश्न जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात ) (?

@श्रीगिरुजी भारतात जवळपास सर्व टॉपं एंड मोडेल मध्ये रएर view कॅमेरा येतो , नसला तरी फार खर्च नाही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2015 - 9:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक प्रश्न जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात ) (?

नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Mar 2015 - 9:48 am | ज्ञानोबाचे पैजार

श्रीरंग_जोशी आणि श्रीगुरुजी हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत.

हा गौप्यस्फोट केल्याबद्दल माझी शॅम्पेन यांना माझ्या तर्फे एक शॅम्पेन सप्रेमभेट

पैजारबुवा,

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2015 - 9:56 am | श्रीरंग_जोशी

पैजारबुवा - कदाचित चश्मा लावायला विसरलात किंवा नंबर वाढला असेल किंवा प्रथमच चश्मा लागणार असेल =)) .

शॅम्पेन साहेबांनी मला प्रेमाने श्रीगिरुजी असे म्हंटले आहे श्रीगुरुजी नाही.

माझीही शॅम्पेन's picture

8 Mar 2015 - 8:16 pm | माझीही शॅम्पेन

@श्रीरंग_जोशी
अरे हो खरच तुम्ही वेगळे आहात , स्वारी बर्का आधी लक्षात नाही आल , खिलाडू वृतीने घेतल्या बद्दल धन्यवाद :)

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2015 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

अहो नावात एवढं काय आहे.

मागे प्रीमो मला मिपावरचा प्रसिद्ध चित्रपटपरिक्षक समजली होती :-).

खेडूत's picture

8 Mar 2015 - 6:38 pm | खेडूत

धन्यवाद!

@ जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात )?
नाही.

असं ऐकलंय की, सीटबेल्ट लावला नसल्यास एअरबॅग उघड़त नाहीत. हे खरे आहे का?

असल्यास असा येडेपणा का करतात कंपन्या?

नेत्रेश's picture

8 Mar 2015 - 2:20 pm | नेत्रेश

समोरच्या सीट्वर लहान मुल बसले असेल तर ती उघडणारी एअरबॅग त्याच्या मृत्युला कारणीभुत होते. जर सीट्बेल्ट लाबला नसेल तर
सीटवर बसलेला माणुस त्या अतीवेगाने उघडणार्‍या एअरबॅगवर आपटुन जास्त जखमी होउ नये म्हणुन कदाचित सीटबेल्ट लावला नसल्यास एअरबॅग उघड़त नसाव्यात.

असल्यास असा येडेपणा का करतात कंपन्या ?
अहो आपली जबाबदारी ओळखणाऱ्या अभारतीय कंपन्या "येडेपणा" करत नाहीत .
एखादी गोष्ट / एखादे फिचर जर दिलेले असेल तर त्यामागे सखोल संशोधन / प्रयोग आणि गुणवत्तेशी कसलीही तडजोड केलेली नसेल असा विश्वास ह्या कम्पन्यांनी वर्षानुवर्षे कमवलेला असतो ...तो विचारला तर समजावूनही सांगतील ..
..एखादी चूक लक्षात आली तर कितीही नुकसान झाले तरी गाड्या परत बोलावण्याची मानसिकता बाळगून असतात ह्या कंपन्या ...त्यामुळे "येडेपणा" का करतात हि आततायी कॉमेंट आहे ...

यसवायजी's picture

8 Mar 2015 - 4:58 pm | यसवायजी

आधी हे खरे आहे का नाही ते सांगा. मग खरे असल्यास कारण सांगा. मग आपण पुन्हा एकदा येडेपणाचा विचार करू.

खेडूत's picture

8 Mar 2015 - 6:35 pm | खेडूत

याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं.
सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या कारची माहितीपुस्तिका वाचणे - जे बरेच लोक करत नाहीत.
याचे दोन्ही प्रकार असू शकतात.
१. सीटबेल्ट लावले नसल्यास एअरबॅग न उघडण्याचं कारण म्हणजे एक एअरबॅग एकदाच चालते.
कुणीही बसलेले नसेल तर ती उघडणे अनावश्यक आहे. अपघातानंतर त्या उघडलेल्या एअरबॅग्ज नव्याच बसवाव्या लागतात. हे खूप खर्चिक आहे. प्रश्न असा आहे की सीट बेल्ट का नाही लावायचा?

२. ज्या कंपन्यांना गुंतागुंतीच्या महाग यंत्रणा घ्यायच्या नसतात ते सरसकट सगळ्या एअरबॅग्ज उघडतात. सीटबेल्ट शिवाय त्या उघडणे धोकादायक होऊ शकते. तसा उल्लेख माहितीपत्रकात करून ते नामनिराळे होऊ शकतात. पण गाडीत कुणीतरी एकाने सीटबेल्ट लावला नाही आणि धडकून गाडी रोल झाली तर एअरबॅग उघडूनही माणसे एकमेकांवर आपटून किंवा बाहेर फेकले जाउन जीव जाण्याची शक्यता असते.

३. लहान मूल असेल तिथे एअरबॅग अर्धीच उघडते, त्यासाठी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे सीटमध्ये सेन्सर असतो.

४. याशिवाय एअरबॅग निष्क्रीय करण्याचा पर्याय युजर स्क्रीनवर सोफ्टवेअर मधून दिलेला असतो. असे केल्यास स्पष्टपणे ते दाखवणारा दिवा लागतो. ( तो शोभेसाठी नसतो :))
त्याकडे दुर्लक्ष्य होण्याचा किंवा चुकून निष्क्रिय केले जाण्याचा धोका असतो. म्हणून बहुतांश कंपन्या त्यासाठी वेगळी किल्ली देतात. म्हणजे ''चुकून झालं'' म्हणायला वाव रहात नाही.

सीटबेल्ट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सर्वांनी लावले का हे पहाणे ही त्या-त्या चालकाची जबाबदारी आहे. कुणी न लावलेला दिसल्यास चालकाचा परवाना रद्द व्हायला हवा. इतका हा गंभीर मामला आहे.
सीट बेल्ट लावल्यास सत्तर टक्के अपघातांत एअरबॅग नसूनही जीव वाचतात असे पाश्चात्य सर्वेक्षणे म्हणतात.

अवांतर:
कित्येकदा 'समाजभूषण' वगैरे मंडळी मर्सिडीज घेऊनही धडकतात. मरतात आणि मारतात. माहितीपत्रक कशाला वाचायचं ? वर नशिबाला दोष देतात किंवा महागड्या गाड्यांचं पण काई खरं नाही म्हणतात. वरती प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न मानसिकतेचा आहे. तीस चाळीस लाखांची गाडी घेतली म्हणजे स्वर्ग दोन बोटं उरत असेल तर काय करणार ? पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

काळा पहाड's picture

8 Mar 2015 - 10:51 pm | काळा पहाड

कित्येकदा 'समाजभूषण' वगैरे मंडळी मर्सिडीज घेऊनही धडकतात. मरतात आणि मारतात.

नाही हो, लवकर मरत पण नाहीत.

सौन्दर्य's picture

8 Mar 2015 - 7:53 pm | सौन्दर्य

अत्यंत माहितीपूर्ण लेख आणि तितकेच उपयोगी प्रतिसाद.