स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १
"येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल, असा आकाशवाणीवर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे. एकदा तर "पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले - शेतकरी चिंताग्रस्त" असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.
आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.
कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो वगैरे. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधीक विश्वासाहार्य नक्कीच असतात.
हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.
पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.
मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:
१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
---------------------
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
---------------------
३) foreca
http://www.foreca.com
-------------------
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
------------------
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
-----------------------
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
-----------------------
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
-------------------------------
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
--------------------------------
यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असते. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.
या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास "शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस" असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. "पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे" हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशासाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत?
मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
(क्रमश:)
गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
23 Jul 2011 - 12:09 am | आनंदयात्री
अहो सॉफ्टवेअर लाख लिहिताल हो .. पण अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपुर्ण उपग्रह कुठुन आणनार ?
23 Jul 2011 - 2:41 am | खेडूत
मुटेजी,
याची कारणे अनेक आहेत. हवामान खाते हे फक्त एक उदाहरण. पण बहुतेक सरकारी खाती याच प्रकारे चालतात.
(दोन तीन तरी चांगली सरकारी खाती पटकन आठवतात?)
शेती आणि शिक्षण सर्वात दुर्लक्षित. केंद्र सरकारी, राज्य, जिल्हा आणि गाव या पातळ्यांवर दर्जा अजूनच खालावत जातो.
तुम्ही दिलेल्या हवामान खात्याच्या संकेत स्थळावरचे Tenders चे दुवे बरेच बोलके आहेत .
शिवाय Disclaimer मध्ये त्यांनी हात झटकले आहेत. मग विषयच संपला!
खेडूत
23 Jul 2011 - 3:34 am | धन्या
गंगाधरपंत,
लेखाचे शिर्षकात "स्वातंत्र्याचे हवामान" असे शब्द पाहून मोठया आशेने धागा उघडला. भ्रमनिरास झाला. स्वातंत्र्यानंतर एतद्देशिय राजकारण्यांनी देश कसा रसातळाला नेला, यापेक्षा ब्रिटीश राजवटच बरी होती असं काहीतरी गरमागरम वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण हे तर नेहमीचंच हवामान खात्याचं रडं निघालं. त्यात नविन काहीच नाही.
बेक्कार हसलो राव हे वाचून. शेताच्या मातीत लहानाचा मोठा झालो. स्वतःच्या अनुभवावरुन सांगतो. हवामान खात्याचा अंदाज नावाचं काही असतं हेसुद्धा शेतकर्यांच्या गावी नसतं.
विचार करतोय, हा पीजे आहे की अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण?
वृत्तपत्रे आणि टी व्ही चॅनलवाले योग्यच करतात नाही का? दुसर्याच्या चुकीमुळे आपल्या इज्जतीचा पंचनामा कशाला करुन घ्यायचा बरे?
नाही पटलं. माझ्या माहितीप्रमाणे शेतीच्या प्रत्येक कामाची वेळ ठरलेली असते. त्या त्यावेळेनुसार ती ती कामे केली जातात. जर हवामान बदलाचा अंदाज घेत शेतीची कामे केली गेली असती तर शेतकरी तोंडघशी नसता पडला. आता असे म्हणू नका की हे हवामान बदलाचे अंदाज "ढोबळ" असतात म्हणून शेतकरी तोंडघशी पडतो.
पावसाळ्यात सगळ्या नक्षत्रांची वाहने बेडूक, म्हैस, मोर वगैरे अशीच असतात. उन्हाळ्यातील नक्षत्रांची वाहने काय असतात यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?
मग झालं तर. कशाला उगाच आपल्या हवामान खात्याच्या नादी लागताय? तुम्ही स्वदेशीवाले आहात काय?
ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांशी शेयर करत असाल, या संकेतस्थळांवरची माहिती त्यांना समजावून सांगत असाल तरच या माहितीचा उपयोग आहे. पण जर ही माहिती केवळ आंतरजालीय लेखांमधुनच देत असाल तर टार्गेट ऑडीयन्स चुकला असे खेदाने म्हणावेसे वाटते.
फारच विनोदी स्वभाव बुवा तुमचा.
मालक, गडबड होतेय. सॉफ्टवेअर ही काही जादूची कांडी नाही. बनवलं सॉफ्टवेअर की समस्या सुटली असं नसतं. सॉफ्टवेअर ही संगणकाने एखादी गणिती किंवा तार्किक क्रिया कशी करावी याची आज्ञावली(set of instructions) असते. आणि ही आज्ञावली कागदावर मांडून (डिझाईन करुन) नंतर संगणकाच्या भाषेत कुणीतरी लिहावी लागते. आता जर हवामान खात्याला कागदावरच असे अचूक अंदाज बांधता आले नाहीत तर ते अचूक अंदाज वर्तवणारे सॉफ्टवेअर
बनविनार कसे?
- धनाजीराव वाकडे
25 Jul 2011 - 9:54 pm | गंगाधर मुटे
<<<< विचार करतोय, हा पीजे आहे की अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण? >>>
तुम्हाला पीजे किंवा अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण यापैकी एकतरी असल्याची शतप्रतिशत खात्री नाही, याचाच अर्थ ती वास्तविकतः असण्याचीच शक्यता आहे. :) :D
23 Jul 2011 - 1:30 pm | श्रावण मोडक
गंगाधरराव,
क्रमशः असल्याने पुढची वाट पाहतो.
मुख्य भर तुम्ही केलेले माहितीचे संकलन आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग, व त्याचा लाभ यावर असला तरच हे लेखन अधिक महत्त्वाचे आणि ते फक्त इथे येण्यापेक्षा इतर अधिक व्याप्ती असलेल्या माध्यमात यावे असे होईल. एरवी, हा तुमच्यातला नेहमीचा शेतकरी संघटक ठरेल. केलेले भरीव काम बाजूला राहील आणि फुटकळ गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.
25 Jul 2011 - 12:41 pm | अविनाशकुलकर्णी
धनाजी रावांचे प्रतिसाद वाचण्याची मजा काहि औरच असते...
शुभेछ्या....
15 Jun 2014 - 8:50 pm | गंगाधर मुटे
आज या लेखाची आठवण झाली. पुन्हा वाचला.
पुढील भाग लिहायचे राहून गेले आहे.
15 Jun 2014 - 8:55 pm | गंगाधर मुटे
नाही धनाजीराव. जून/जुलै हा पेरणीचा काळ असतो. पण केव्हा करायची याचा अंदाज घ्यावाच लागतो. असा अंदाज घेताना त्या-त्या व्यक्तीची अनुभवाची शिदोरी आणि आकलनशक्ती खर्ची पडतच असते.
15 Jun 2014 - 10:10 pm | आयुर्हित
१) राजस्थानात असतांना काही जाणकार लोकांची भेट घडली होती. वेशभुषा म्हणाल तर
पहेलि मधिल अमिताभ बच्चनच्या जवळ जाणारी.
मेंढि राखण करणारे, अगदिच अशिक्षित(शाळेत कधि न गेलेले)परंतु पावसाचा अंदाज सांगण्यात अगदी तरबेज होते.
यांची पद्धत म्हणजे फक्त मिशिला हात लावुन पिळ देणार आणि अंदाज सांगणार!
वेधशाळेतील हवेची आर्द्र्ता मोजणारे यंत्र कमीत कमी ३ ते ५ लाखात येत असेल!
२) सहदेव भाडळी यांचे लेखन देखिल पावसाचा अंदाज वर्तवण्यास वापरता येतो.
३)सर्व सामान्यांत असणारे भारतीय पारंपारिक पर्जन्यज्ञानः लहाणपणापासून ऐकत आलेलो "मघा(नक्षत्रांत), वर(आकाशात ढगांची वाट)बघा, नाहितर(बाहेर भयंकर पाउस पडत असल्याने) चुलीपाशी हागा!"
या सर्वांचा अभ्यास करणारे विद्यापीठात एखादे पर्जन्यअध्यासन असले पाहिजे असे वाटते.
४)पर्जन्यास्त्रः महाभारतात वर्णन असणारे हे अस्त्र नेमके काय आहे ह्याचे संशोधन आवश्यक आहे, जेणेकरुन कमीत कमी बारामतीत तरी पावुस पाडता येइलच की!
५)पर्जन्य रागः तानसेन दिपराग गाऊन दिवे लावायचे, तसा पाऊस पाडायला एखादा राग आहे का? जाणकार यांवर प्रकाश टांकतील काय?
15 Jun 2014 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
तानसेन दिपराग गाऊन दिवे लावायचे, तसा पाऊस पाडायला एखादा राग आहे का?
हो आहेना. मेघमल्हार !18 Jun 2014 - 1:06 pm | आयुर्हित
Dr R. R. Kelkar, former Director General of the India
Meteorological Department, New Delhi (1998-2003)
Prof R R Kelkar
Jun 18, 2014 @ 00:30:16
Dear Shri.....,
I suggest that you visit the Agricultural Meteorology Division of IMD at Pune. Or you can see their website at http://www.imdagrimet.gov.in/
Very useful advisories are framed by IMD in consultation with agricultural experts and these are given in 14 Indian languages twice a week. SMS messages are sent individually to lakhs of registered farmers to their individual cell phones. Farmers are actually using this information in their farming operations.
Citywise and districtwise forecasts are available on IMD’s web site at http://www.imd.gov.in
Thanks for your comment,
Sincerely,
R R Kelkar
------------------------------------------------------------------------------
Prof R R Kelkar
Jun 16, 2014 @ 00:46:32
Dear Shri.....,
I have recently written a Marathi article on the mysteries of the monsoon. It was published in Sakal Saptarang on 15 June 2014. You will find therein the answers to many of your questions and doubts.
Best wishes,
R R Kelkar
रहस्य मॉन्सूनचं ! (डॉ. रंजन केळकर)
20 Jun 2014 - 10:54 am | गंगाधर मुटे
रहस्य मॉन्सूनचं ! (डॉ. रंजन केळकर) हा लेख वाचला.
<<<< "हवामान आता कायमचं बदललं आहे...‘ "ऋतुचक्र बिघडलं आहे...‘ अशी विधानं करणं वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे आणि त्यांना काहीही आधार नाही. >>>
मॉन्सून आणि भारतीय शेती यांचा घनिष्ट संबंध असूनही हा लेख शेती कसणार्यांनी वाचावा असे काहीही नाही. या लेखात माहितीपर भरपूर बौद्धिक खाद्य असले तरी शेतकर्यांना या लेखाचा काहीही फ़ायदा नाही.
शेती आणि हवामान खाते यांची सोयरिक केव्हा जुळेल, देवच जाणे...!
18 Jun 2014 - 5:28 pm | प्रसाद१९७१
मुटे साहेब, आपले हवामान खाते जरा ढिसाळ आहेच पण
परदेशात पुढच्या काही तासाचा हवामान अंदाज देण्यावर जास्त भर असतो.
असा अंदाज देणे तसे जास्त सोपे असते आणि अंदाज बरोबर पण येतात. पण २६, ४८ तासाचे अंदाज देणे अवघड असते.
साहेबांच्या देशात पण हवामान अंदाजाची आपल्यासारखीच चेष्टा करण्यात येते. अगदी तुम्ही सांगीतली तशी उदाहरणे देवुन.
20 Jun 2014 - 1:05 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. गोर्या साहेबाने अशाच फजितीमुळे शिमल्यातली वेधशाळा पिटाळून लावली व ती पुण्यात आणली. म्हणून सदर कार्यालयास शिमला ऑफीस असे नाव दिल्याची एक वदंता देखील ऐकली होती. :-)
20 Jun 2014 - 1:08 pm | बॅटमॅन
पुण्यात असे काय आहे ज्यायोगे शिमल्यापेक्षा अचूक अंदाज येतात?
तसेच, स्थानमहात्म्य पाहता पुण्यात फजिती झालेली त्याला का बरे सलली नसावी? शिमल्यातले लोक खौचटपणात पुणेकरांना कधीपासून मात देऊ लागले?
20 Jun 2014 - 5:05 pm | प्रसाद१९७१
पुण्यात फजिती झाली तर ती पुणेकरांच्या खवचट पणा ला ब्लेम करता येइल ( शीमल्या ला तशी सोय नसावी ) म्हणुन पुण्यात आणली असेल.
20 Jun 2014 - 5:44 pm | बॅटमॅन
शक्यता नाकारता येत नाही.
18 Jun 2014 - 6:54 pm | धर्मराजमुटके
हं ! चालायचचं ! नाही मानवत एकेकाला. त्याला काही विलाज नाही.
20 Jun 2014 - 10:10 pm | गंगाधर मुटे
काही सेकंदापूर्वी माझ्या मोबाईलवर (Free SMS) खालीलप्रमाणे SMS आला. या SMS ची शेतीसाठी उपयोगिता काय? त्यांचे पगार सुनिश्चित होण्यापलिकडे काय अर्थ आहे या SMS ला?
शेतीसाठी आम्हाला पाऊस येणार किंवा नाही याविषयीची माहिती हवी असते. तापमान आणि आर्द्रतेच्या आकडेवारीचे काय करायचे?
---------------------
वर्धा जिल्हयामध्ये दि. २५ जून पर्यंत आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल तापमान ३६.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २९.० अंश सेल्सिअस राहील. हवेतील आर्द्रता सकाळी ७५ ते ८० टक्के आणि दुपारी ३८ ते ४२ टक्के राहील.
:: Director, Agriculture Meteorology, PUNE
----------------------
21 Jun 2014 - 12:54 pm | आयुर्हित
हवेतील आर्द्रता जेव्हा ८५ टक्केहुन अधिक असते तेव्हा पाऊस पडण्याची जास्त शक्यता असते!
आपल्या माहितीपूर्ण प्रतिपुष्टी(फीड्बॅक)बद्दल धन्यवाद.
21 Jun 2014 - 7:50 pm | गंगाधर मुटे
पावसाच्या गारव्यामुळे हवेतील आर्द्रता वाढते की हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे पाऊस येतो, हाही वादाचा मुद्दा आहेच. :)
21 Jun 2014 - 9:06 pm | आयुर्हित
यात वाद कसला?
आपल्याला याबाबत काहिही रास्त शंका असतील तर डॉ. रंजन केळ्कर यांच्या
Cloud and Sunshine या ब्लॉग वर विचारुन निरसन कराव्यात,त्यासोबतच आपला महत्त्वाचा अनुभव सांगुन आपल्या अपेक्षाही लिहाव्यात ही विनंति.
22 Jul 2014 - 3:54 pm | गंगाधर मुटे
गेल्या ४-५ दिवसापासून पावसाची कधी रिपरिप तर कधी सततधार सुरू आहे. हवा’मान’ खात्याचे सारे अंदाज खोटे ठरवीत पावसाने हवा'मान' खात्याला 'मान' खाली घालावयास भाग पाडलेले आहे. तशीही हवा’मान’ खात्याची ’मान’ फ़क्त ताप’मान’ वर्तवण्यापुरतीच ताठ असते. पर्जन्य’मान’ वर्तवताना त्यांचे अनु’मान’ नेहमीच ’मान’ पायाखाली दुमडून उताणे झोपत असते. त्यामुळे शेतकर्यांनी स्वत:च्या द’मानं’च घेतलेलं बरं! हवा’मान’ खात्यावर विसंबून आणि आपली ’मान’ हवा’मान’ खात्याच्या मांडीवर ठेवून शेतकर्यांनी आपला वर्त’मान’ बिघडवून घेण्यात काहीही अर्थ दिसत नाही.
बाहेर पाऊस पडत आहे आणि मी आतमध्ये बसून पेपर चाळत आहे. ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ या संबंधित एकही बातमी दिसत नाही. कुत्री केकाटण्याचे जसे उत्तरा नक्षत्र असते तसेच ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ सारखे शब्द उच्चारून केकाटणार्यांचे रोहिणी नक्षत्र असते. कधी-कधी पावसाचे आगमन लांबलेच तर ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ च्या नावाने केकाटणेही थोडेफ़ार लांबत असते. मात्र एकदाचा पाऊस कोसळला की गाढवाच्या सिंगाप्रमाणे हे केकाटणारेही प्रसिद्धीमाध्यमातून गायब होऊन जातात.
पावसाचे आगमन लांबले तर त्याला पर्यायी काही उपाय सांगता आलेत तर ते सांगणे उपयोगाचे ठरू शकते पण हे तज्ज्ञ पर्याय सांगण्याऐवजी पाऊस लांबण्याची कारणमिमांसा व्यक्त करण्यात धन्यता मानतात. ज्याचा शेतीला आणि शेतकर्याला कवडीचाही उपयोग नसतो.
पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, यावर शेतीचे पीकपाणी अवलंबून असते, हे साधेसुधे कोडे देखील आमच्या तज्ज्ञांना अजूनपर्यंत उमगलेले नाहीये. यांची भाषा अजूनही पावसाची वार्षिक सरासरी याभवतीच पिंगा घालत आहे. एखाद्या वर्षी पावसाची सरासरी काय होती, ती १००% होती, १५०% होती कि ५०% टक्केच होती यावर पीकपाण्याची-उत्पादनाची शक्यता ठरत नाही. एखादेवर्षी जर २०% किंवा ३०% च पाऊस पडला; पण तो जर थोडा-थोडा आणि नियमित कालावधीत पडत राहिला तरी कोरडवाहू शेतीमध्ये भरघोस उत्पादन येऊ शकते. याऊलट एखादेवर्षी १००% सरासरी पाऊस पडला पण कमी दिवसात/कमी कालावधीत मुसळधार पडला तर कोरडा किंवा ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येऊ शकते आणि नेमके एवढे साधे गमक सुद्धा अजूनपर्यंत हवामान तज्ज्ञांना गवसायचे बाकीच आहे. मुलभूत ज्ञानाचा पायाच जर अव्यवहार्यतेवर आधारला असेल तर कसले बोडक्याचे संशोधन करणार? अशा संशोधनाची आणि सल्याची उपयोगीता तरी काय असणार आहे?
आणि म्हणूनच
हवामान तज्ज्ञ शेतीच्या दृष्टीने शोकेसचे जिन्नस झाले आहे, असे वाक्य उच्चारले तर ते चुकीचे ठरणार नाही.
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------