आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर..
४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:)
पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??"
अचानक एखादी वार्याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत... त्या वार्याशी खट्याळपणे हसत सहस्त्र रश्मीच्या आगमनासाठी तयार होऊ लागलं... हळूहळू सगळीच पाती जागी झाली. इतक्यात एक कोवळं सोनेरी किरण त्या हिरवळी गालिच्यावर पहुडलं आणि त्या चांदीच्या लखलखाटात सोन्याची भर पडली. संपूर्ण गालिच्यावर सुवर्णालंकार पसरले .
किती वेळ गेला कोणास ठाऊक्...तो रविकर आता संपूर्ण दर्शन देण्यासाठी तयार होता..
एक मोती अचानक त्या अलंकारातून खाली ठिबकला... एक गरम घोट माझ्याही घशातून खाली सरकला..
अरे!! थांब... मला हे तुमचं रूप टिपून घेऊदे..
मी उठले हातातला मग बाजूला केला..
कॅमेरा?? कुठे ठेवला... छ्या!! शोधा आता शोधा आता....
इतक्यात... घर्रर्रर्रर्र.. खड्ड्ड्ड्ड्ड्ड... घर्रर्रर्रर्र...
नको नको!!!!!!!
पळत पळत पुन्हा पॅटीओ मधे आले.
तो सुवर्णालंकार तसाच होता मात्र तो आता छिन्नविछिन्न झालेल्या त्या हिरव्या अवयवांवर होता..
आणि ती हिरवळ.. मोत्यांचे अशृ ढाळत त्या अवयवांकडे हताश पणे पहात होती..
नक्की माती ओली होती की त्या हिरव्या रक्तामुळे झाली होती??
'त्या' च्या एका फेरीने काम तमाम केलं होतं. पण 'तो' ही केवळ कामचं करत होता..
त्या शेंडे छाटलेल्या तृणांवर पसरलेली सूर्यकिरणं आता भकास दिसत होती.. त्यामध्ये एकप्रकारचा रखरखीतपणा आला होता.
कोण म्हणालं ,"चला, ८.३० वाजले.. निघायला हवं"...तर कुणी म्हणालं.."शाळेत जायची वेळ झाली"..
पण त्या हिरवळीकडे पहायला कोणालाच वेळ नव्हता..
आज सगळं विखरून गेलं.. तो चांदी मोत्याचा लखलखाट.. वार्याची फुंकर.. आणि ओघळणारा मोती..
पण उद्या..
उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन..
नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!!
उद्या 'तो'नक्कि नाही येणार... किमान आता चार्-पाच दिवसतरी 'तो' फिरकणार नाही..
आणि मग तो सगळा शृंगार केवळ त्या भास्कराच्या आगमनासाठी राखून ठेवलेला असेल.. आणि त्याचे आगमन होताच..
केलेल्या शृंगाराचं सार्थक होईल..
- प्राजु
* 'तो' = ग्रास मोवर.. ४-५ दिवसातून एकदा गवत छाटून जाणारा..
प्रतिक्रिया
1 Oct 2008 - 12:51 am | विसोबा खेचर
उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन..
नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!!
क्या बात है...!
एखादी कविताच वाचतो आहे असं वाटलं! :)
तात्या.
1 Oct 2008 - 1:01 am | बिपिन कार्यकर्ते
पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??"
सुंदर.
उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन..
नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!!
मागे एक फोटो बघितला होता तो आठवला. एका लाकूड कापण्याच्या कारखान्यात एक मोठा ओंडका कापला जात असतो मशिनवर आणि त्या ओंडक्याच्या दुसर्या टोकाला एक छोटासा अंकुर उगवलेला असतो.
बिपिन.
1 Oct 2008 - 1:06 am | प्रियाली
छोटेखानी लेख आवडला. थोडासा कवितेसारखा वाटला.
अवांतरः
आम्ही मध्यंतरी एक झाड लावलं होतं. त्याची पानं अचानक ऑगस्टमध्ये झडून गेली. ते मेलं म्हणून बरंच वाईट वाटलं तरी ते उपटलं नव्हतं. तसंच ठेवलं, आशेवर की झाड आहे तगलं तर आणि आता चक्क फॉलमध्ये त्याला नव्याने पालवी फुटली आहे. :)
1 Oct 2008 - 5:41 am | सहज
छोटेखानी लेख आवडला. थोडासा कवितेसारखा वाटला.
असेच म्हणतो.
हे असेच क्षण, अनुभव आयुष्य स्पेशल करत असते.
स्फुट आवडले.
1 Oct 2008 - 1:08 am | स्वाती राजेश
मस्त वर्णन....व्वा!!!!!
अचानक एखादी वार्याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत... त्या वार्याशी खट्याळपणे हसत सहस्त्र रश्मीच्या आगमनासाठी तयार होऊ लागलं... हळूहळू सगळीच पाती जागी झाली. इतक्यात एक कोवळं सोनेरी किरण त्या हिरवळी गालिच्यावर पहुडलं आणि त्या चांदीच्या लखलखाटात सोन्याची भर पडली. संपूर्ण गालिच्यावर सुवर्णालंकार पसरले .
सही$$$$$
1 Oct 2008 - 1:11 am | जयवी
प्राजु........क्या बात है ...... !! खूप खूप छान लिहिलं आहेस गं....!! खरंच एखादी सुंदर कविता वाचतोय असं वाटलं :)
1 Oct 2008 - 7:01 am | शितल
जयवी ताईच्या मताशी सहमत.
खुपच छान लिहिले आहेस. :)
1 Oct 2008 - 1:58 am | मुक्तसुनीत
नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला माहीत असते पण त्याकडे अतिपरिचयादवज्ञा झालेले , सृष्टीचे सृजनाचे आणि विलयाचे चक्र. स्फुट आवडले.
1 Oct 2008 - 2:57 am | नंदन
आहे, स्फुट आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 Oct 2008 - 2:57 am | घाटावरचे भट
'तो' कोण???? होजे, मारियो, कार्लोस की राओल?? :P
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
1 Oct 2008 - 11:40 am | ऋषिकेश
प्राजु, खूप छान! तजेलदार लेखन आवडले
रोजच्या पहाण्यातल्या गोष्टीकडे तजेलदारपणे पाहणे मस्त! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
1 Oct 2008 - 4:47 pm | बापु देवकर
खरचं ...एकादी कविता वाचतो आहे असे वाटले अन एक सुंदर सकाळ डोळ्यापुढे आली...
1 Oct 2008 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर
नितांत सुंदर भावनाचिंब प्रकटन. आवडलं.
1 Oct 2008 - 6:28 pm | प्राजु
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Oct 2008 - 6:57 pm | स्वाती दिनेश
वा प्राजु,तुझी ही गद्यकविता फार आवडली.
स्वाती
1 Oct 2008 - 10:02 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
पूसट वाच्ल्यानंतर पेट्ली आपली ट्युब. पहिल्यांदा वाट्ले क्रिप्टिक आहे की काय?
असले काही तरी आप्ल्याला लिहिता येत नाही. पण वाचायला आवड्ले.
1 Oct 2008 - 10:19 pm | प्रमोद देव
काय मस्त लिहीलंयस प्राजु!
अशीच लिहीती राहा. :)
2 Oct 2008 - 9:29 am | छोटुली
प्राजुताइ,लेख खुप आवडला.पण काही कल्पना समजल्या नाहीत.
3 Oct 2008 - 11:22 am | मनिष
खरच कशा जपता येता इतक्या हळूवार आणि तरल भावना????
याद नही कब आखरी बार शबनम देखी थी फुलों पर,
अब तो बस चंद आसुं है मेरे हैरान पलको पर!!!
या सुरेख गद्यकवितेबद्द्ल आणि ई-सकाळ मधे ती प्रसिध्द झाल्याबद्द्ल मनापासून अभिनंदन!
- मनिष