देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं.
आता पद्म पुरस्कारांवरुन पुन्हा चर्चा सुरु आहे. पुरस्कार मिळालेले दिग्गज पद्मरत्न, या पुरस्कारांसाठी आपल्या घरच्यांचीच कशी शिफारस करतात वगैरे बातम्या सुरु झाल्या. त्यातचं सचिन आणि सीएनआर राव यांना भारतरत्न जाहीर झाला, राव यांनी राजकारण्यांनाच ‘इडियट’ वगैरे म्हंटलं, वाद सुरु झाले. तेव्हा म्हटलं पूर्ण करावा ब्लॉग.
साधारण वर्षभरापूर्वी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं Beyond The Lines हे पुस्तक आलं, माणिककडून घेतलं आणि वाचलं. फाळणीपूर्वीपासूनचा सियालकोट पाकिस्तान ते दिल्ली भारत असा १९९० पर्यंतचा नय्यर यांचा प्रवास खूप प्रभावीपणे समोर येतो. कलकत्ता दंगलीत आपल्या लहान मुलाला गमावावं लागलेल्या शिख पित्याला गांधीजींनी दिलेला सल्ला असेल किंवा यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान बनण्याची संधी कशी आहे याबाबत लालबहादूर शास्त्रींचा अंदाज असेल, कितीतरी गोष्टी भावल्या. आपला देश नेमका चालतो कसा, हे सत्ताकेंद्राच्या अगदी जवळून नय्यर यांनी पाहिले आहे. ते अनेक प्रसंगावरुन आपल्यापर्यंत पोचतं. असंच एक प्रकरण म्हणजे पद्म पुरस्कार. ( त्यांच्या पुस्तकातील हा मजकूर माझ्या ब्लॉगवर लिहिण्यासाठी कुलदीप नय्यर यांनी मोठ्या मनानं परवानगी दिली त्याला वर्ष झालं… असो.)
देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार कसे दिले जातात हे कुलदीप नय्यर यांच्या इतकं चांगलं कोणालाच माहिती नसेल. कारण १९५८ ते ६४ या ६ वर्षाच्या काळात गोविंद वल्लभ (GB) पंत गृहमंत्री असताना, श्री.नय्यर गृहमंत्रालयात माहिती अधिकारी होते.
देशातल्या नागरिकांना असे पुरस्कार दिले जावेत अशी खरंतर पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंची कल्पना. देश स्वतंत्र झाल्यापासून नेहरुंच्या मनात हा विचार होता पण त्याच्या अंमलबजावणीसाठी १९५४ साल उजाडावं लागलं. ब्रिटिश काळात आपल्या खुशमस्कऱ्यांना रावसाहेब, सर, रायबहादूर, खानसाहेब अशा उपाध्या देण्याची प्रथा होती. देश स्वतंत्र झाल्यावर हा प्रकार बंद झाला कारण सगळे नागरीक समान असं घटनेनं सांगितलं. मग पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न ही उपाधी किंवा पदवी नसून पुरस्कार / बक्षीस आहे असं विशेष कारण देत या पुरस्कारांना अपवाद केलं गेलं. आणि शासकीय-राजकीय खैरातींना नवा राजमार्ग मोकळा झाला. या पुरस्कारांना पदवी सारखं नावामागे किंवा पुढे लावू नये किंवा लेटरहेडवर, व्हिजिटिंग कार्ड्सवर तसं लिहू नये असा नियम आहे मात्र तो नियमच आहे. ‘पद्मश्री अवार्डी’ काचेवर लिहिलेली एक गाडी तर आमच्या ऑफिसच्या मागच्या गल्लीत नेहेमी पाहायला मिळते.
नय्यर सांगतात, गृहमंत्रालयाकडे काँग्रेस पार्टीच्या जवळच्या व्यक्तींकडून किंवा संस्थेकडून पुरस्कारासाठी शिफारस यायची. केंद्र आणि राज्यातील मंत्रीही त्यांच्या जवळच्या / आवडत्या / फेव्हरेट लोकांचे नाव पुरस्कारासाठी रेटण्यात पुढं असायचे.
गृहमंत्रालयातील एक उपसचिव आणि नय्यर, आलेल्या नावांची आद्याक्षरावरुन म्हणजे Alphabetically एक यादी बनवायचे, या लोकांचा संक्षिप्त बायो डाटा तयार करायचे. हा सगळा प्रकार प्रचंड बोअरींग, त्यामुळे लहरीवर चालायचा, यादी फायनल करण्यासाठी कोणतीही ठराविक पद्धत किंवा निकष, नियमावली वगैरे नव्हतेच. जे या दोघांच्या मनाला येईल तेच फायनल. कधी कधी तर एखादं नाव यांच्या कानाला किंवा उच्चारायला चांगलं वाटलं नाही तरी यादीतून वगळलं जायचं.
जेव्हा गृहमंत्री जी. बी. पंत यांनाच भारतरत्न जाहीर झालं तेव्हा तर जाम मजा आली. नय्यर यांनी भारतरत्नसाठी CITATION म्हणजे मानपत्राचा मजकूर लिहिला, पण तो काही गृहमंत्र्यांना आवडला नाही, मग गृहसचिवानं लिहिलं ते ही पंत यांच्या पसंतीला उतरलं नाही, मग गृहमंत्रालयाचा झाडून सगळा स्टाफ आपापली बुद्धी लावत, नवं citation लिहायला बसला, पण गृहमंत्र्यांना काही केल्या ते आवडेना. काय करावं कोणालाच सुचत नव्हतं, शेवटी नय्यर पुढे झाले आणि त्यांनी गृहमंत्र्यांचं मन वळवलं, कसं माहितीय? “भारतरत्न हा पुरस्कार शब्दापलिकडचा आहे आणि तुमचं काम एवढं मोठं आहे की ते शब्दात व्यक्त करणंही अवघड आहे” हे त्यांनी पंत यांना पटवून दिलं. त्यावर्षीचं भारतरत्न हे बिना मानपत्राचं म्हणजे बिना CITATION चं म्हणजे कोरं होतं हे वेगळं सांगायला नको.
भारतरत्नची शिफारस थेट पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात, पण पद्म पुरस्काराची सगळी जबाबदारी असते गृहमंत्रालयावर. पंतप्रधानकार्यालय आणि गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची नावं निश्चित झाली की ती यादी राष्ट्रपतींकडे पाठवली जायची. मग राष्ट्रपती ओ.के. करायचे, हा पायंडा.
एकदा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे यादी गेली, त्यांनी मात्र ती परत पाठवली, त्यावर Miss Lazarus from south असा शेरा होता, म्हणजे श्रीमती लॅझारुस यांचं नाव पद्म पुरस्काराच्या यादीत टाका असा त्याचा अर्थ होता. ( Lazarus हा उच्चार कसा करायचा ते मलाही माहिती नाहीये, मी असतो तर हे नाव यादीतून वगळलं असतं, असो) झालं, कोण या बाई? सगळे कर्मचारी-अधिकारी शोधकामाला लागले, अथक परिश्रमानंतर चेन्नईत शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या, त्या नावाच्या एक बाई सापडल्या. त्यांचं नाव पद्म पुरस्काराच्या यादीत टाकलं, त्या Lazarus बाईंनाही कळवलं की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. ती यादी राष्ट्रपतींकडे पुन्हा पाठवली.
सगळ्यांना वाटलं झालं काम पण काम तर खरं पुढे सुरु झालं. राष्ट्रपतींनी यादी परत पाठवून दिली कारण… राष्ट्रपतींना हव्या असलेल्या मिस लॅझारुस या नव्हत्याच. यादीवर राष्ट्रपतींनी मिस लझारुस या एक नर्स आहेत असं लिहिलेलं. नंतर राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्याने माहिती पुरवली की, आंध्र प्रदेशात विजयवाडा ते हैदराबाद प्रवासात एकदा राष्ट्रपतींची तब्येत ठिक नव्हती तेव्हा एका मिस लॅझारुसनी राष्ट्रपतींची काळजी घेतली, उपचार केले वगैरे. त्यांना शोधा. अखेर गृहमंत्रालयानं या लझारुस बाईंना सुद्धा शोधून काढलं आणि त्यांनाही कळवलं, तुम्हाला पद्मश्री पुरस्कार देणारैत, या दिल्लीला… त्या वर्षी म्हणजे १९६१ साली, डॉ. हिल्डा आणि इव्हेंजलीन, अशा दोन, ‘मिस लॅझारुस’ बाईंनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारले.
मध्यंतरी केंद्रात जनता पार्टीचं सरकार आलं (१९७७ नंतर) तेव्हा दोन वर्ष हे पुरस्कार बंद केले गेले. मात्र जनता पक्षाची सत्ता गेली, काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तेव्हा पुन्हा पद्म पुरस्कार देणं सुरु झालं ते आजतागायत (१९९३ ते ९७ वगळता) सुरु आहे, आणि निवडीवरुन होणारे वादविवादही सुरु आहेत.
मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न देण्याचा घाट सुरु होता तेव्हा त्यांनी हा पुरस्कार घेण्याचं नाकारलं होतं हे विशेष. आपला पक्ष सत्तेत, आपणचं पुरस्कार द्यायचा आणि आपणच घ्यायचा हे मान्य नसल्याचं त्यांनी पंडीत नेहरुंना स्पष्ट सांगितलं. मात्र दैव म्हणा की राजकारणाचा खेळ, १९९२ साली म्हणजे मौलाना आझाद यांच्या मृत्यूनंतर जवळपास ३५ वर्षांनी, त्यांना मरणोपरान्त भारतरत्न दिलं गेलं, त्यांच्या विचारांची एक प्रकारे खिल्लीच उडवण्याचा हा प्रकार होता.
अगदी खऱ्या अर्थाने अपवादात्मक परिस्थिती वगळता मरणोपरान्त भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार देण्यात काहीही अर्थ नाहीय असं मला वाटतं. यात लवकरात लवकर बदल केला नाही तर भारतरत्नसाठी खूप मागे मागे, अगदी इसपूर्व वगैरे इतिहासातही जाऊ आपण एके दिवशी.
कारणं वेगवेगळी होती पण हे पुरस्कार नाकारणारेही आहेत, ज्यात निखिल चक्रबर्ती, के. सुब्रमण्यम, रजिंदर सच्चर, दत्तोपंत ठेंगडी, सिद्धराज धडा वगैरे बरीच मंडळी आहेत. २००९ साली पी. साईनाथ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा “पत्रकारांनी सरकारी पुरस्कार घेणं चुकीचं आहे” असं सांगत त्यांनी तो नाकारला. सितारा देवींनी तर “माझ्यापेक्षा वय आणि कर्तृत्वानं लहान असणाऱ्यांनाही पद्मविभूषण आधी मिळाला, त्यामुळे पद्मभूषण हा माझा सन्मान नाही तर अपमान आहे”, असं म्हणत त्यांनी पुरस्कार नाकारला होता. काहीशा अशाच कारणांसाठी उस्ताद विलायत खां यांनी १९६४ साली पद्मश्री, १९६८ साली पद्मभूषण आणि २००० साली पद्मविभूषण हे तिन्ही पुरस्कार नाकारले. कदाचित याच कारणासाठी उद्या ध्यानचंद यांचे कुटुंबिय किंवा विश्वनाथन आनंद यांनी भारतरत्न किंवा इतर मोठ्या खेळाडुंनी पद्म पुरस्कार नाकारला तर नवल वाटायला नको.
सर्वोच्च न्यायालयानं कान पिळल्यानंतर छाननी समिती वगैरे आली, पण या समितीत पंतप्रधानाचेच सचिव आणि सरकारनेच नेमलेली माणसं. यातला फोलपणा लपून राहिला नाहीय. जो पक्ष सत्तेत भागीदार असेल त्याच्या जवळची माणसं; लायकी असो नसो पुरस्काराच्या यादीत घुसडली जातात. त्यामुळेच तर कधी अगदी क दर्जाचं कामंही नसलेल्यां लोकांची नावं पद्म पुरस्कारांच्या यादीत दिसतात, तर कधी तद्दन गल्लाभरु बॉलिवूड स्टार्सचा भरणा पद्मच्या यादीत नित्यनेमानं दिसतो. भाजप सत्तेत असताना तर संघ प्रचारकांनाही पद्मची खैरात वाटली गेली असं नय्यर सांगतात.
मला वाटलं मी माझ्या नर्सला पद्म दिला त्याला वाटलं त्यानं त्याच्या डॉक्टरला दिला असा प्रकार आजतागायत सुरुच आहे. आणि पुरस्कार द्यायचे किती याला काही मर्यादा नाही. गेल्या वर्षी ७७ जणांना पद्मश्री, २७ जणांना पद्मभूषण आणि ५ जणांना पद्मविभूषण असे एकूण जवळपास १०९ लोकांना पद्म पुरस्कार वाटले. त्याआधीच्या वर्षात म्हणजे २०११ ला १२८ जणांना पद्म दिले. असे गेल्या पाच वर्षात ६०० ते ७०० लोकांना पद्म पुरस्कार दिलेत. पुरस्कार आहेत की खिरापत? लोकांना मिंदे करण्याच्या नादात आपण कुठल्या थराला जातोय हे राजकारण्यांनी तपासायला हवं.
सध्या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आहेत त्यामुळे यंदाही पद्मच्या बाबतीत फार काही वेगळं वगैरे होईल अशी आशा नाहीये. या वर्षातल्या म्हणजे २०१३ साठीच्या पद्म पुरस्कारासाठी तब्बल १३५६ लोकांच्या शिफारसी म्हणा किंवा नॉमिनेशन्स म्हणा गृहमंत्रालयाकडे आलेल्या आहेत. या यादीत, पहिले ऑलंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचंही नाव आहे. सचिन आणि राव यांना भारतरत्न देऊन झालाय मग आता खाशाबांना कोणता पुरस्कार देणार? कि सचिनची रिटायरमेंट सुखद झाली नसती तर खाशाबांनाच भारतरत्न द्यायच्या तयारीत होतं सरकार?
ज्यांचं कशातच काही योगदान नाही अशा अत्यंत फोकलट लोकांनाही पद्म दिले जातात, मग कृषीप्रधान वगैरे असलेल्या देशात शेतकऱ्याला पद्म पुरस्कारांपासून वंचित का ठेवले जाते हाही आणखी एक न कळणारा प्रकार. पुरस्कार सुरु होऊन ६६ वर्ष झाली पण एकाही शेतकऱ्याला पद्म द्यावा असं एकाही सरकारला वाटलं नसेल तर काय कामाचे असले पुरस्कार? सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळावा म्हणून जसा नियमात बदल केला गेला तसा बदल करुन शेतीक्षेत्रात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यालाही पद्मचा मार्ग मोकळा करायला काय हरकत आहे? सध्या सचिनच्या गरम तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याच्या नादात हे सरकार आहे पण जातपातभाषाभेदपंथ विसरुन शेतकरी जर एकगठ्ठा व्होटबँक बनला तर, या सरकारला आणि यापुढे येणाऱ्या सरकारांना शेतकऱ्याची आठवण ठेवावीच लागेल.
हा सगळा प्रकार किळसवाणा आहे, आणि सरकार कोणाचंही असलं तरी तो सुरु आहे गेली सहा दशकं.
आपण मोठे मानतो ते जगभरातले पुरस्कार, मॅगससे, बुकर, नोबेल असो किंवा ऑस्कर अॅवार्ड असोत, जगातला कोणताही पुरस्कार वादातीत नाहीय, पण तिथे निदान किमान निकषांची तरी काळजी घेतली जातेच जाते, काही गोष्टीत तडजोड केली जात नाही म्हणजे नाही. त्यांच्या निवड पद्धतीतलं जे चांगलं आहे ते आपण घ्यायला काय हरकत आहे.
पद्मश्री देशातला चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण तिसऱ्या, तर पद्मविभूषण दुसरा सर्वात मोठा नागरी पुरस्कार मानला जातो. भारत रत्न देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार. त्यांचा मान राखणं आपल्याच हाती आहे. आपल्या आयुष्यात पुरस्काराला खूप महत्व आहे. त्यामुळे निश्चितच काम पुढं न्यायला मदत होते वगैरे…
पुरस्कार नाकारणं किंवा तो बंद करणं हा या सगळ्या अनागोंदीवरचा उपाय नक्कीच नाहीय, आणि हल्लीच्या काळात तो नाकारणं हे सगळ्या मर्त्य मानवांना शक्यही नसेल. त्यापेक्षा शिफारस कल्चर बंद केलं, पुरस्काराचे निकष जास्त कठोरपणे राबवले, सगळी प्रक्रिया आणखी पारदर्शक केली आणि किमान याततरी राजकारण आणलं नाही तरी पुरस्कारांचा खरा हेतू थोडातरी साध्य होईल, नसता देशाच्या सर्वोच्च वगैरे नागरी पुरस्कारांची शान आणखी कमी होतच राहील आणि सोबत देशाचीही.
प्रतिक्रिया
20 Nov 2013 - 1:14 pm | शिल्पा ब
लेख आवडला.
20 Nov 2013 - 1:31 pm | vrushali n
सुंदर लेख
20 Nov 2013 - 1:31 pm | गजानन५९
अतिशय माहितीपूर्ण आणि संतुलित लेख,
अमुल्य माहितीसाठी धन्यवाद
20 Nov 2013 - 1:51 pm | जे.पी.मॉर्गन
खरंच किळसवाणा प्रकार आहे हा. लांगूलचालनाची प्रथा आपल्याकडे तशी जुनीच. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चोख निकषांवर आधारित पुरस्कार आपल्याकडे असतात तरी कुठे?
तळमळीने लिहीलेला लेख आवडला.
जे.पी.
20 Nov 2013 - 1:59 pm | तिरकीट
एक गोष्ट खटकली.....वर जी पद्म पुरस्कारांच्या नामांकनाची यादी आहे.....त्यात खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच नाव आहे (जर ते तेच असेल तर....)
हे कसे काय? त्यांची शिफारस कुणी केली असेल?
20 Nov 2013 - 2:54 pm | रामबाण
तसं त्यांना आधीच पद्मविभूषण मिळालंय, आता फक्त भारतरत्नच बाकीय... त्यांची शिफारस कोणी केली माहिती नाही पण त्यांनी यंदाच्या पद्मसाठी प्रितीश नंदींची शिफारस केली आहे
20 Nov 2013 - 2:07 pm | उद्दाम
१९९२ साली म्हणजे मौलाना आझाद यांच्या मृत्यूनंतर जवळपास ३५ वर्षांनी, त्यांना मरणोपरान्त भारतरत्न दिलं गेलं, त्यांच्या विचारांची एक प्रकारे खिल्लीच उडवण्याचा हा प्रकार होता.
यात खिल्ली काय आहे? स्वतः सत्तेत असताना स्वतःलाच पुरस्कार देऊ नये इतकेच त्यांचे मत होते. ते सत्तेत नसताना दुसर्यांनी दिलेला पुरस्कार घ्यायला त्यांची नकार नव्हता. त्याप्रमाणे त्याना नंतर पुरस्कार दिला तर त्यात गैर काही नाही.
सध्या सचिनच्या गरम तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याच्या नादात हे सरकार आहे
:) सचिनला कुणीही कधीही कसलाही पुरस्कार दिला तरी तो त्याला लायकच आहे. कुणी पोळी भाजुन घ्यायचा प्रश्न येतोच कुठे?
आणि सचिनला काँग्रेसने नसता पुरस्कार दिला, म्हणून तो काही भाजपात गेला नसता . :) सचिनने भ्रमवृंदी भाजपाची डाळ शिजू दिली नाही , हे वास्तव ज्याना स्वीकारता येत नाही, ते लोक काँग्रेसच्या पोळीकडे बघत बसतात. :)
-------..................
डाळ पोळी चापून हाणणारा उद्दामरत्न
20 Nov 2013 - 2:20 pm | कपिलमुनी
ग्रेट पिंकर अजून कसे आले नाहीत ?
20 Nov 2013 - 5:53 pm | इरसाल
एकावेळी एकच येवु शकतो.
20 Nov 2013 - 3:07 pm | रामबाण
तुमचं बरोबर आहे, बाकी कुलदीप नय्यर यांनी ते लिहिलंय ,त्यांना पण मौलाना आझादांना तेवढंच अभिप्रेत असेल असं वाटत नाही. आपणच म्हणजे राजकारण्यांनी, राजकीय पक्षांने पुरस्कार सुरु करायचे आणि आपणच म्हणजे राजकारण्यांनीच, आपल्याच पक्षातील लोकांनी वगैरे घ्यायचे याला त्यांचा तात्विक विरोध असावा. अर्थात हा माझा अंदाज.
तवा गरम आहे म्हटल्यावर पक्ष कोणताही असो कोणीतरी पोळी भाजणारच, त्याला इलाज नाही :-)
20 Nov 2013 - 2:07 pm | ऋषिकेश
लेख मोठा आहे.. पण नेहमीचीच टिका आहे.
१०० कोटींच्या देशात १३००+ नामांकने ही "खैरात" म्हणण्याएवढी संख्या आहे असे वाटले नाही.
20 Nov 2013 - 3:10 pm | रामबाण
आधी फक्त नय्यर यांनी सांगितलेले किस्सेच लिहिणार होतो पण थोडंथोडं अॅड करता करता लेख मोठा झाला. लोकसंख्येच्या तुलनेत विचार नाही केला तर?
20 Nov 2013 - 3:54 pm | ऋषिकेश
'खैरात' म्हणताना तुलनात्मक प्रमाण हवं असं मला वाटतं. जर एखादा पुरस्कार एकूण अॅप्लिकेबल जनतेच्या (अओयीसाठी १०० कोटींपैकी फक्त १/१० म्हंजे १० कोटीच घेतोय, उर्वरीत ९०%वयाने लहान, कमी शिक्षण/कलेचा अभाव वगैरे म्हणून सोडून देऊ) ०.००१३% लोकांना दिला जातोय (एकूण जनतेच्या तर ०.००००१३% लोकांना) तर त्याला खैरात म्हणता येणार नाही इतकेच.
बाकी या पुरस्कारासाठी योग्य कोण अयोग्य कोण यावर भाष्य करण्याइतके मला समजत नसल्याने पास!
20 Nov 2013 - 9:03 pm | प्रभाकर पेठकर
'खैरात' म्हणजे 'संख्येने अनेकांना दिलेले पुरस्कार' असा अर्थ नसून 'पात्रतेचे कुठलेही निकष न वापरता दिलेले पुरस्कार' असा अभिप्रेत असावा.
21 Nov 2013 - 9:11 am | रामबाण
तसाच
21 Nov 2013 - 11:25 am | ऋषिकेश
पात्रतेचे निकष आहेत असे वाटते.
या दुव्यावर पद्म पुरस्कारासाठी निवड कशी होते ते दिले आहे.
मला या पद्धतीत फार मोठे दोष दिसले नाहीत. (काही सजेशन्स करेनही पण ती 'सजेशन्स' इतपतच, आग्रही मागणी करण्यासरखे वैगुण्य दिसले नाही).
20 Nov 2013 - 2:18 pm | जेपी
या पुरस्काराचे काही फायदे मिळतात का?
उदा: फुकट विमानप्रवास ,रेल्वेप्रवास , केंद्र -राज्य सरकार कडुन काही सवलती ?
कदाचीत सवलत मिळण्यासाठी काहिजण पुरस्कार मिळवण्याच प्रयत्न करत असतील असे वाटते .
20 Nov 2013 - 3:16 pm | मी_आहे_ना
ह्या माहितीवरून तरी कुठली सवलत मिळत नाही असं दिसतंय.
21 Nov 2013 - 9:45 am | रामबाण
प्रतेयक देशातील पदांचा अग्रकम-मान ठरलेला असतो, तसं आपल्याकडे ज्याला Warrant Of Precedence म्हणतात, त्यानुसार
देशात 1.राष्ट्रपती, 2.उपराष्ट्रपती, 3.पंतप्रधान 4.राज्यपाल, 5. माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, 6.लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश यांच्याखालोखाल भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींचा नंबर येतो.
प्रोटोकॉलमधे माजी पंतप्रधान / मुख्यमंत्री/ नियोजन विभागाचे उपाध्यक्ष / राज्यसभा आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते यांच्या बरोबरीचा दर्जा भारतरत्नला असतो
भारतरत्नसाठी The Award does not carry any monetary grant असं लिहिलं असलं तरी काही विशेषाधिकार free air travel वगैरे आहेत असं वर्तमानपत्रात वाचण्यात ऐकण्यात आलंय.
पद्म पुरस्कारासाठी तरी काही फायदे नाहीत म्हणजे तसं गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवर लिहिलं आहे...
फक्त सर्टिफिकेट आणि मेडल घ्यायचं राष्ट्रपतींच्या हस्ते
20 Nov 2013 - 2:31 pm | पूनम शर्मा
२०१० मध्ये चक्क ! ! ! सैफ अली खान ह्याला पद्म श्री देण्यात आला
20 Nov 2013 - 8:34 pm | ग्रेटथिन्कर
एक लाख नेत्र शस्त्रक्रिया करणारे आणि टीनपॉट एक्टींग करणारे दोघेही 'पद्मश्री'.
स्वताचे पैसे खर्चून हजारो कुश्ठरोगी बरे करणारा फक्त 'पद्मविभूषण' आणि हजारो धावा करुन अब्जावधी कमावणारा आणि वर सरकारकडून टॅक्स माफीची अपेक्षा करणारा 'भारतरत्न.'
.
.
.
वेटरऽऽऽऽ...एक भारतरत्न आण रे..
(हॉटेल भारत अनलिमीटेड- पैसे देणार्याला खायला मिळणार नाही ,चकटफूंना लाईपटाईम खादाडपास मिळेल-हुकुमावरुन..)
20 Nov 2013 - 2:45 pm | बॅटमॅन
लेखाशी सहमतच आहे. पण नोबेल इ. मध्येदेखील गडबड होतेच- उदा. ओबामाला शांततेसाठीचे नोबेल मिळणे. काय कर्तृत्व होते म्हणून त्याला मिळाले? असो. पण आपल्याकडची खैरात बाकी मज्जाच मज्जा आहे. नै म्हणजे सर्व पद्मपुरस्कारप्राप्त लोकांत निम्मे तरी जेन्युइन असतील असे समजले तरी उरलेल्या निम्म्यांचे काय =)) वायझेडपणा आहे.
20 Nov 2013 - 3:14 pm | अवतार
ज्यांना मोठेपण मिळवता येत नाही तेच पुरस्कारांसाठी अडून बसतात. केवळ पुरस्कार मिळाला म्हणून एखादी व्यक्ती जनतेच्या स्मरणात दीर्घकाळ राहिली आहे असे उदाहरण अजून तरी पाहिलेले नाही. खऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना प्रतिष्ठेची भीक मागावी लागत नाही.
सचिनच्या पुरस्काराबद्दल एवढेच वाटते की पुरस्कार स्वीकारून आपली किंमत वाढणार आहे की कमी होणार आहे याचा अंदाज येण्याइतके शहाणपण त्याच्याकडून अपेक्षित आहे.
20 Nov 2013 - 3:17 pm | प्यारे१
सुंदर माहितीपूर्ण लेख. (लेखक रामबाण नि मूळ लेखक नय्यर साहेब दोघांचेही आभार)
सगळ्याच क्षेत्रांची राजकारण्यांनी वाट लावलीये. ...
20 Nov 2013 - 3:23 pm | उद्दाम
वाजपेयींची गाणी म्हटल्यावर पद्मजा फेणाणीबाईंनाही पुरस्कार मिळाला होता ना?
20 Nov 2013 - 3:45 pm | चौकटराजा
१९७८ च्या दरम्यान श्री लंकेचे पूर्व राष्ट्रपती आर प्रेमदासा हे पाचगणी येथे ( त्या वेळी तेच बहुदा उप राष्ट्रपती होते ) भारत सरकारचे पाहुणे म्हणून आले होते.त्यावेळी मी टेलीफोन ऑपरेटरच्या नोकरीवर होतो. त्याकाळी चटकन बाहेर गावी फोन लावून मिळणे दुरापास्त होते. ते ज्या हॉटेल मधे उतरले होते तेथील माणसाने जरा लवकर प्रयत्न करा एवढीच विनंति केली होती. माझ्या मनात आपण एक व्ही व्ही आय पी ला काही मदत करीत आहोत याची कल्पनाही नव्हती. फोन झाल्यावर खुद्द प्रेमदास यानीच मला फोन केला आभारासाठी. भारतात हिंडलो पण इतकी कामात तत्परता आपल्यातच दिसली.असे ते म्हणाले.
हे पुराण सांगायचे कारण जर नय्यर मला अगोदर भेटते व पद्मश्री चा " अजब" निकष त्यानी ऐकवला असता तर मी प्रेमदास यांच्या वशिल्याने " पद्मश्री" नसतो का झालो. आता आडनाव नावाचे साम्य असून तो पुरस्कार दुसर्यालाच गेला
असता तर दुर्दैव.
बाकी आपला लेख वाचून मला पद्मजा फेणाणी हिला पदमश्री कशी मिळाली याचे कोडे सुटले. अटलजी दाउ टू ?
20 Nov 2013 - 4:27 pm | प्यारे१
त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करणारे डॉ..... त्यांना पद्मभूषण का पद्मश्री मिळाली होती.
कुमार सानूनं प्रणवदांना गाणं ऐकवायची धमकी देऊन पद्मश्री मिळवली तर शेफालीखानला ('ते'लाच काही लोक सैफअली खान म्हणतत) मातोश्री सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष असल्याचा 'योगायोग' कारणीभूत होता.
20 Nov 2013 - 7:15 pm | रमेश आठवले
नुयोर्क मधील डॉ.राणावत यांनी वाजपेयी यांच्या एका गुढ्ग्याचे ऑपरेशन केल्यानंतर त्याना पद्मश्री मिळाली. त्यानंतर वर्षाने त्यांनी वाजपेयी यांच्या दुसर्या गुढ्ग्याचे ऑपरेशन केल्यानंतर त्यांना पद्म भूषण मिळाली. राणावत याना भारत रत्न मिळवण्यासाठी काय करावे लागले असते याची कल्पनाही करवत नाही.
20 Nov 2013 - 8:08 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
धन्य _/\_
20 Nov 2013 - 6:00 pm | इष्टुर फाकडा
सोप्पय :)
20 Nov 2013 - 6:25 pm | देशपांडे विनायक
''खैरात' म्हणताना तुलनात्मक प्रमाण हवं असं मला वाटतं.''
बरोबर
हि तुलना लायकीच्या संबंधातील असते
एखाद्याची लायकी नसताना बक्षीस इत्यादी प्राप्त झाल्यास त्या बक्षिसाची खैरात झाली असे म्हणतात असे मला वाटते .
20 Nov 2013 - 7:27 pm | अधिराज
समर्पक लेख!
20 Nov 2013 - 8:32 pm | बाबा पाटील
आवडेश...
20 Nov 2013 - 8:54 pm | पैसा
खैरात म्हणजे खूपजणांना दिले जाते केवळ एवढेच नव्हे तर कसेही, कोणत्याही निकषाशिवाय, केवळ देणार्याला वाटले म्हणून खिरापतीसारखे वाटलेले पुरस्कार असा अर्थ आहे. खैरात म्हणजे दयाबुद्धीने दिलेले दान.
20 Nov 2013 - 9:03 pm | वाटाड्या...
बाकी लेख विचारकरायला लावणारा आहे. म्हणजे ह्यात विचार करण्यासारखं काही नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. ज्याची सत्ता त्याच्या हाती दोरी. म्हणजे पुढे पुढे चेपुवर जास्त लाईक करणार्यांना किंवा मिळणार्यांना सुद्धा एखादा ह्या कॅटॅगिरीतला पुरस्कार मिळावयास हरकत नाही...
मेरा भारत महान (का लहान?)
- वाट्या....
20 Nov 2013 - 10:18 pm | अर्धवटराव
अशा ष्टोर्या वाचुन थोडा खेद व्हायचा पुर्वी... आता ना खेद ना आश्चर्य. ये ऐसाच होता हय.
21 Nov 2013 - 12:09 am | मैत्र
पूर्वी अनेकदा पद्म पुरस्कारांची विकी यादी काढून त्यातले चित्र विचित्र "योगायोग" आणि टायमिंगचा उहापोह केला होता. पण तो स्वतःच्या समजूतीसाठी रविवारच्या चहा पोह्यांबरोबर.
असा थेट from horse's mouth लेख (नय्यर) तरीही अतिशय संयतपणे मांडलेला प्रथमच वाचला.
खूपच नवीन इतिहास समजला पुरस्कारांचा आणि उडदामाजी काळे गोरे असेच वाटले राजेंद्रप्रसाद - लाझारूस, अटलजी - पद्मजा अशी उदाहरणे समजल्यावर. तरी हे पद्मश्री आहेत.
पण भारतरत्न च्या यादीतली काही रत्ने मला अजून काही झेपली नाहीयेत --
१. झाकीर हुसेन (तबलानवाज नाही माजी राष्ट्रपती)
२. व्ही व्ही गिरी (अजून एक काँग्रेसी राष्ट्रपती)
३. गुलझारीलाल नंदा (एक औट घटकेचे पंतप्रधान)
४. एम जी रामचंद्रन (फिल्म अभिनेते, तमिळनाडूचे मुख्यमंत्री)
आधी आणि नंतर कोणाला भारत रत्न दिले गेले हे तर पार वैताग आणणारे प्रकरण आहे
१. एम जी आर यांना १९८८ मध्ये आणि डॉ. आंबेडकरांना १९९० मध्ये -- काही थोडा तरी ज्येष्ठता, मान्यता, पात्रता याचा विचार ?
२. सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि राजीव गांधी या तिघांना एकाच वर्षी - १९९१ मध्ये
पूर्ण वेगळ्या काळातले तीन नेते - पुन्हा तोच प्रकार
३. झाकीर हुसेन आणि गिरी यांना १९६३ आणि १९७५ मध्ये तर सरदार पटेल, आंबेडकर, मौलाना आझाद यांना ९० च्य दशकात
व्यक्तिगत मला कसलाही आकस नसला आणि त्यांनी बरीच चांगली कामे केली हे पूर्ण मान्य केलं तरी राजीव गांधी यांना भारत रत्न मिळण्यासारखं काय काम होतं हे मला कधीच समजलेलं नाही.
भारत रत्न अशा सर्वोच्च आणि मोजक्या व्यक्तींना देण्यात आलेल्या पुरस्कारात ही स्थिती आहे तर पद्मश्री ची सत्ताधार्यांनी खैरात केली यात नवल नाही. त्यात अशा उदाहरणांचाच एक भला मोठा लेख होईल इतके मटेरिअल आहे.
अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, धोनी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर व अमीन सायानी या सर्वांना २००९ या एकाच वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला हे वानगीदाखल पुरेसे व्हावे.
21 Nov 2013 - 12:17 am | विद्युत् बालक
अहो हे काहीच नाही !
नटरंग मधील "अप्सरे" वर खुश होऊन आपल्या मा . मुख्यमंत्र्यांनी एक मुंबईत नवा कोरा फ्ल्याट दिल्याचे घोषित केलेले !
21 Nov 2013 - 1:11 am | प्यारे१
अहो, मुद्दा का सोडताय?
विषय गळ्यात घालण्याच्या पुरस्कारांबद्दल सुरु आहे ना आत्ता?
'अशोक'चक्र, नि इतर चक्कर नंतरसाठी ठेवा की! ;)
21 Nov 2013 - 8:21 pm | विद्युत् बालक
मी पण आधी गळ्यात पडून नंतर पदरी पाडून घेतलेल्या बक्षीसा बद्दलच बोलतोय
तुम्ही काय ह्या विषयावर पुढे मागे कुटायला घेणार आहत कि काय?
21 Nov 2013 - 8:41 pm | प्यारे१
मुदलात फरक आहे हो. असो.
बाकी कुटायला काय काहीही चालतं. तुम्ही मदत कराल ना?
21 Nov 2013 - 8:46 pm | विद्युत् बालक
सध्या वेळच वेळ आहे बघा …
कुटायला च काय दळायला पण मदत करेन :P
22 Nov 2013 - 11:22 am | vrushali n
अप्सरेचा दावा होता की ती म्हाडाची लॉटरी जिंकली..तरीही काही लोक असे आरोप करतात ह्याचे तिला फार वाईट वाटले म्हणे;)
22 Nov 2013 - 12:45 pm | उद्दाम
आता जाऊ द्या ना घरी .. या वाक्याचा मुख्यमंत्र्यानी असा अर्थ लावला . :)
22 Nov 2013 - 1:05 pm | ग्रेटथिन्कर
मुख्यमंत्र्याला कशाचाही अर्थ लावायचा परमीट हाय काय?...
24 Nov 2013 - 6:01 pm | टवाळ कार्टा
तर काय...मोठे साहेब कसे ...अळीमिळी गुपचीळी
21 Nov 2013 - 1:14 am | खटपट्या
राजकारण
राजकारण फक्त पद्म पुरस्कारांच्या बाबतीत होत अस नाही तर खालचे पुरस्कार जसे "राष्ट्रपती शौर्य पुरस्काराच्या" बाबतीत हि होते.
माझ्या वडिलांनी १९७१ च्या भिवंडीच्या जातीय दंगलीत अग्निशमन दला तर्फे जीव धोक्यात घालून ८ स्त्रियांचे प्राण वाचवले. यात ते स्वत: हल्लेखोरांच्या हल्यात जबर जखमी झाले होते.
त्यावेळची हि बातमी वर्तमान पत्रात आली होती. १९७२ साली ठाणे महानगर पालिकेने त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली. पण वडिलांच्या वरिष्ठांना हि बाब काही पचनी पडली नाही व त्यांनी हे प्रकरण पुढे जावूनच दिले नाही.
१० वर्षानंतर जेव्हा वरिष्ठांनी स्वत: ची शिफारस याच पुरस्कारासाठी केली, तेव्हा वडिलांचे प्रकरण परत बाहेर आले. शेवटी नाईलाजास्तव वरिष्ठांना दोघांची शिफारस करावी लागली आणि दोघांना पुरस्कार जाहीर झाला.
जर वरिष्ठांना पुरस्कार जाहीर झाला नसता तर तेव्हाही त्यांनी वडिलांना पुरस्कार मिळून दिला नसता.
21 Nov 2013 - 5:55 am | स्पंदना
:(
वरिष्ठ!!
21 Nov 2013 - 11:46 am | खटपट्या
वरिष्ठ म्हणजे मराठीत सिनियर !!!
21 Nov 2013 - 5:08 pm | बॅटमॅन
त्यांना अर्थ माहिती नै असे वाटत नै हो.
21 Nov 2013 - 10:48 am | चिप्लुन्कर
आवडला लेख
22 Nov 2013 - 1:44 pm | arunjoshi123
उत्तम लेख