नमस्कार मंडळी,
आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm
या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे. कालानुरुप कसे बदल झाले ते जाणवेल.
लेखात पुढे ते सार्वजनिक उत्सावाच्या भूमिकेबद्द्ल थोडे लिहितात आणि सर्व जातीच्या लोकांनी त्यात भाग घेउन एकोपा वाढावा ही त्यांची अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहे असे सुद्धा नमूद करतात.
गणपतीउत्सवाचे थोडे इतिहासातले दाखले देत, हे काही नवेच खुळ नाही असेही सांगतात.
या लेखामध्ये ब्राह्मण-मराठा जातींच्या एकोप्याबद्दल आणि त्यांच्यात फुट पाडायच्या प्रयत्नांबद्दल सुद्धा त्यांनी लिहिले आहे.
नुकतेच मिपावर एका चर्चेच्या शीर्षकात अनर्गल हा शब्द वापरला गेला होता. या लेखात टिळकांनी निरर्गल असाही शब्द वापरलेला आहे. मला दोनही शब्द नवेच असल्याने मनात नोंद झाली इतकेच.
या लेखात गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतल्या क्रमामध्ये ते म्हणतात पहिला गणपती कसब्याचा आणि शेवटचा श्रीबाबासाहेब महाराज यांचा. तर हा श्रीबाबासाहेब महारज यांचा गणपती म्हणजे नक्की कोणता?
लेखाबद्दल आपली मते सुद्धा जरुर येथे नोंदवावीत ही विनंती.
आपला,
--लिखाळ.
प्रतिक्रिया
4 Sep 2008 - 8:17 pm | विकास
तर हा श्रीबाबासाहेब महारज यांचा गणपती म्हणजे नक्की कोणता?
मला वाटते बाबासाहेब महाराज म्हणजे टिळकांचे एक स्नेही. ते कोल्हापूर दरबारात होते, पण ते नंतर पुण्यात रहायचे. ज्यांनी टिळकांना त्यांच्या इस्टेटीचा एक ट्रस्टी म्हणून नेमले. त्यांच्याच पश्चात ब्रिटीशांशी मिळते घेऊन ताईमहाराज (बाबासाहेबांच्या पत्नी) यांनी अवैध दत्तक विधान केले म्हणून टिळकांनी आक्षेप केला. त्यात त्यांच्या विरुद्ध दिवाणी खटला झाला जो त्यांच्या विरोधकांना देखील ब्रिटीशांची चाल वाटली... दुर्दैवाने हा प्रसंग त्यांना १५-२० वर्षे आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत पुरला. शेवटी त्यात ते जिंकले. पण त्यांनी मित्राला दिलेले वचन मात्र शेवटपर्यंत मोडले नव्हते...
आजही टिळक स्मारक मंदीराच्या आवारात जे घर दिसते त्यावर या बाळमहाराजांचे (बाबा महाराजांचे दत्तक पूत्र) नाव आहे. कदाचीत ती जमिन त्यांनीच नंतर स्मारक आणि सभागृहासाठी दिली असेल.
अग्रलेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद!
5 Sep 2008 - 1:41 am | मैत्र
आपण जो संदर्भ दिला आहे त्यांचे नाव सरदार जगन्नाथ महाराज पंडित. ताईमहाराज दत्तक विधान खटला, आणि टिळक स्मारक मंदिराबद्दलही माहिती बरोबर आहे. त्या घरावर भाऊमहाराज निकेतन असं नाव आहे. बाळमहाराज म्हणजेच प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक समालोचक बाळ ज. पंडित आणि ते तिथेच राहतात.
एस पी कॉलेजची बरीचशी जागा आणि पूर्ण टिळक स्मारक मंदिराची जागा जगन्नाथ महाराजांनी दिली होती.
मला वाटतं एस पी च्या आवारात त्यांचा एक अर्ध पुतळाही आहे ग्रंथालयाजवळ.
परंतु बाबामहाराज म्हणजेच जगन्नाथ महाराज याबद्दल खात्रीने सांगणे अवघड आहे.
5 Sep 2008 - 7:23 pm | विकास
मला जगन्नाथ महाराजच म्हणायचे होते अनावधानाने बाळ महाराज म्हणले. मात्र बाळ ज. पंडीत म्हणजे बाळ महाराज हे मात्र आत्ताच समजले.
माहीती आणि दुरुस्तीबद्दल धन्यवाद!
4 Sep 2008 - 8:24 pm | लिखाळ
विकासराव,
शंकानिरसनाबद्दल आभार.
या कोर्टकेसबद्दल कुठेतरी वाचलेले स्मरते.
--लिखाळ.
4 Sep 2008 - 8:34 pm | स्वाती दिनेश
दुव्याबद्दल धन्यवाद,लोकमान्यांचा लेख वाचतेच आता..
स्वाती
4 Sep 2008 - 11:59 pm | विसोबा खेचर
लिखाळशेठ,
दुव्याबद्दल अनेक धन्यवाद!
अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो...!
तात्या.
5 Sep 2008 - 5:45 pm | लिखाळ
प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार.
--लिखाळ.
5 Sep 2008 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिखाळ,
अग्रलेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे