२६ जानेवारी १९८७!
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो. मग सीबीआयचे चार अधिकारी त्या इन्स्पेक्टरला आणि त्याच्यासोबत असलेल्या ३-४ कॉन्स्टेबल आणि एका महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन मंत्र्याच्या
घरावर छापा टाकतात. मंत्र्याच्या घरावर मारलेल्या त्या छाप्यात साहजिकच सीबीआयला अमर्याद काळा पैसा सापडतो. इन्स्पेक्टरला तिथेच वाट बघायला सांगून सीबीआय अधिकारी जप्त केलेला तो सगळा पैसा आपल्या सोबत घेऊन जातात आणि मग इन्स्पेक्टरच्या लक्षात येतं कि छापा टाकलेले ते सगळे सीबीआय अधिकारी नकली होते आणि पोलिसांना मुर्ख बनवून ते त्यांच्याच मदतीने मंत्र्याला लुबाडून पसार झाले आहेत.:D
हि आहे नीरज पांडे दिग्दर्शित स्पेशल २६ या चित्रपटाची सुरूवात! अलिकडच्या काही सुमार चित्रपटातल्या अतिसुमार अभिनयामुळे अक्षय कुमारच्या चित्रपटांपासून मी जरा चार हात लांबच असतो पण फक्त आणि फक्त नीरज पांडेसाठी अक्षय कुमारचा टुकार अभिनय झेलायचा ह्या विचाराने सिनेमागृहात पाऊल ठेवलं. पाहतो तर तिथे फक्त एकच इसम शेवटच्या रांगेत आता फक्त आपल्याला एकट्याला चित्रपट बघावा लागतोय कि काय अशा चेहर्याने बसला होता. :O त्याची किव येऊन मग मग मी त्याच्या बाजूच्या सीटवर जावून बसलो. पण थोड्या वेळाने कोणास ठाऊक, कुठून कसं पब्लिक जमलं नि जवळ जवळ अर्ध्याच्या वर सिनेमागृह भरलं. इथे मग बाजूच्या त्या इसमाऐवजी मीच सुटकेचा निश्वास टाकला.;)
चित्रपट सुरू होतानाच त्यातल्या एका पाठोपाठ घडणार्या जलद घडामोडींमुळे प्रेक्षकांच लक्ष त्यात गुंतायला सुरूवात होते. नकली सीबीआयला मदत केल्यामुळे सिनियर इन्स्पेक्टर रणवीर सिंग्(जिम्मी शेरगिल) आणि लेडी कॉन्स्टेबल शांती(दिव्या दत्ता) ह्यांना पोलिस खात्यातून तात्पूरतं निलंबित केलं जातं. आणि इकडे आपापल्या शहरात रोजचं दैनंदिन आयुष्य जगत असलेले नकली सीबीआय ऑफिसर अजय सिंग(अक्षय कुमार) आणि त्याचे तीन साथीदार पी.के.मिश्रा(अनुपम खेर), जोगिंदर(राजेश शर्मा) आणि इक्बाल(किशोर कदम) हे कलकत्त्यातल्या एका व्यापार्यावर धाड टाकण्याच्या प्लॅन बनवतात आणि यशस्वीरित्या तो पारही पाडतात. त्याच दरम्यान नकली सीबीआयच्या या वाढत्या त्रासदायक प्रकरणांमुळे हि केस खर्याखूर्या सीबीआय ऑफिसर असलेल्या वासिम खान्(मनोज वाजपेयी) याच्याकडे येते. इज्जतीचा पंचनामा झालेला सि.इन्स्पेक्टर रणवीर सिंग त्याला ह्या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्यासाठी हजर होतो.
एकदाच खुप मोठ्ठा डल्ला मारायचा आणि हे सगळं सोडून द्यायचं ह्या विचाराने मग अजय सिंग आणि त्याचे साथीदार मुंबईतल्या ऑपेरा हाऊस विभागातील एका मोठ्ठ्या ज्वेलर्सची निवड करतात आणि इथून पुढे सिनेमाच्या थराराक क्लायमॅक्सला सुरूवात होते. आता हा क्लायमॅक्स इथे सांगण्यासारखा मुळीच नाहीये, क्लायमॅक्समधला तो थरार तुम्हाला अनुभवयाचा असेल तर सिनेमागृहाची वाट पकडण्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. सुरूवातीपासूनच प्रेक्षकांवर घेतलेली पकड हा चित्रपट शेवटापर्यंत हमखास टिकवून ठेवतो. त्यातल्या त्यात फक्त काही ठिकाणी काजल अगरवाल आणि अक्षयमधल्या काही दृश्यांमुळे चित्रपट थोडासा रटाळ होतो पण तो रटाळपणा त्या क्षणापुरताच असतो. पुढच्याच क्षणी चित्रपट आपल्याला त्याच्या वेगवान लाटेत पुन्हा खेचतो. चित्रपटातली दृश्य एकापाठोपाठ जशी सरकत जातात तसं लगेचंच आपण त्या दृश्यांसोबतच शेवटाकडे काय घडेल ह्याचा विचार करू लागतो. जसं जसं आपल्याला हवा असणारा चित्रपटाचा शेवट आपण गृहीत धरत जातो तसं तसं शेवटाकडे चित्रपट आपल्याला धक्के देत जातो. आणि याचमुळे चित्रपटाचा शेवट एकदम धक्कादायक असा झाला आहे कि ज्याचा आपल्या मेंदूने विचारच केलेला नसतो. चित्रपट पाहून सिनेमागृहातून बाहेर पडल्यानंतर एक वेगळा चित्रपट पाहील्याचं समाधान आपल्याला नक्कीच मिळतं.
२००८ साली आलेल्या थरारक आणि वेगवान अश्या वेन्सडेसारख्या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला नीरज पांडे ह्या गुणी दिग्दर्शकाची दखल घ्यावीच लागली आणि नीरजच्या या चित्रपटाने त्या वर्षीचा स्टारचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि कथानकाचा असे दोन पुरस्कार पदार्पणातच पटवले. वर सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट मी फक्त ह्या गुणी दिग्दर्शकासाठीच बघायचा ठरवला होता. दिग्दर्शकीय कौशल्यासोबत त्याने ह्या चित्रपटाची कथासुध्दा लिहली आहे.
अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अक्षय कुमारने माझा संपुर्ण अंदाज चुकवला. त्याने सर्वोत्तम अभिनय केलेल्या काही चित्रपटामध्ये या चित्रपटाचाही नक्कीच समावेश होऊ शकेल इतपत चांगला अभिनय त्याने या चित्रपटात केला आहे. नायकासाठी एखादी तरी नायिका असावीच या हिशोबाने विचार करूनच काजल अगरवाल या अभिनेत्रीला चित्रपटात घेतलं असावं असं वाटून जातं. तीच्या अभिनयाबद्दल म्या पामर काय बोलणार? सिनेमात काजल अगरवाल आणि अक्षय कुमारची छोटीसी लव स्टोरी दाखवण्यात मात्र दिग्दर्शक थोडासा कमीच पडतो. चित्रपटातल्या पी.के. मिश्राच्या भुमिकेत अनुपम खेरचा इतक्या वर्षांचा अनुभव नक्कीच दिसून येतो. राजेश शर्मा आणि आपल्या मराठमोळ्या किशोर कदमने बाकीच्या सीबीआय ऑफिसरची कामं छान केली आहेत. जिम्मी शेरगिलच्या लुक मध्ये साहिब, बिवी.. मधला जामिनदार डोकावतो तर अभिनयात वेन्सडे चित्रपटातल्या आरिफ खान या एटीएस ऑफिसरची थोडीशी झाक पाहायला मिळते. त्याच्यासोबतच्या दिव्या दत्तानेही ठिकठाक काम केलंय. तीचा 'असली काम तो यहीं कर रहें है सर, हम तो सिर्फ...' हा डायलॉग मस्तंय जो चित्रपटाच्या शेवटाकडे एकदम उलट होतो. खर्याखूर्या सीबीआय ऑफिसरच्या भुमिकेत मनोज वाजपेयी एकदम फिट्ट बसतो.
सिनेमातल्या गाण्याबद्दल आणि संगीताबद्दल लिहण्यात मला काडीमात्रही इंट्रेस्ट नाहीये पण आपल्या पहिल्याच चित्रपटात ८० च्या दशकातला लुक दाखवण्यात कला दिग्दर्शक वैष्णवी रेड्डी नक्कीच यशस्वी झाले आहेत. अगदी लहान लहान दृश्यातही याची काळजी घ्यायला ते विसरत नाही. सिनेमात दिसणार्या पद्मिनी मोटर पासून ते रोटरी डायल टेलिफोनपर्यंत आणि सरकारी ऑफिसातल्या टाईप रायटरवाल्या टेबलपासून ते फोटो काढणार्या कॅमेर्यापर्यंत सगळं सगळं आपल्याला ८०च्या दशकाची आठवण करून देतं.
एकूणात काय तर, सत्य घटनेवर आधारीत असलेल्या ह्या थरारक सिनेमात चोरावर मोर कोण ठरतं हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जायला हरकत नसावी. :)
४/५
प्रतिक्रिया
13 Feb 2013 - 4:21 am | स्पंदना
खट्याळ मोड ऑन- पोस्टर्वर बाकी सार्यांबरोबर त्या स्त्री पार्टीलासुद्धा "मिश्या" लावल्या असत्या तरी चालल असत- खट्याळ मोड ऑफ!
साळसुद अपर्णा.. नाही हो खर खर्..पिक्चर पहावासा वाट्ला. छान परिक्षण. आवडल. तसाही अक्की कॉमेडी करत नसेल तर सुसह्य असतो असा माझा अंदाज आहे.
13 Feb 2013 - 4:26 am | किसन शिंदे
=)) =))
हे काम स्पावड्याला द्यावं कि अभ्याला ह्याचा विचार करतोय. ;)
13 Feb 2013 - 9:32 am | स्पा
13 Feb 2013 - 9:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी
:D :P
13 Feb 2013 - 9:43 am | किसन शिंदे
=))
मला वाटलं तू काजल अगरवाललाही मिश्या चिटकवशील.
13 Feb 2013 - 9:47 am | शुचि
हा फोटो नाही रे स्पा. दुसर्या नंबरचा फोटो म्हणते अपर्णा. सगळे मुच्छड आहेत बघ त्यात.
13 Feb 2013 - 11:55 am | अभ्या..
स्पावड्या मस्त लावल्यास रे मिशा. माझे काम वाचवलास. धन्यवाद.
पण का कोण जाणे हे फोटो बघून मला मुंबई कट्ट्याचा पोलीस गाडीचा फोटो आठवतोय.;)
सेम तोच अॅटिट्यूड ;)
किसनदेवा आता त्या फोटोत मिशा लावू का सर्वांना? ;)
13 Feb 2013 - 5:25 pm | उगा काहितरीच
:) :) :)
13 Feb 2013 - 4:44 am | फारएन्ड
धन्यवाद. नक्कीच पाहणार चित्रपट!
13 Feb 2013 - 5:27 am | अत्रुप्त आत्मा
शिनुमा बघणार तर होतोच,आणी आता तर निश्चित बघणार... क्यों की हम भी पांडे जी के फ्यान है||
बाकी परिक्षणा बद्दल म्हणाल तर>>> किसनदेव झिंदाबाद...!
13 Feb 2013 - 5:59 am | रेवती
हे परिक्षण वाचून चित्रपट पहावासा वाटतोय. धन्यवाद.
13 Feb 2013 - 7:31 am | यशोधरा
झक्कास लिहिलं आहे. हा सिनेमा बघायचा आहे पण अक्षय कुमार पहावत नाही म्हणून बघावा की नाही ह्या दुविधेत होते खरं तर पण हे परीक्षण वाचून पाहीन आता सिनेमा.
13 Feb 2013 - 8:39 am | प्रचेतस
परिक्षण खूप सुरेख रे.
चित्रपट नक्कीच बघणार.
13 Feb 2013 - 8:49 am | पैसा
चित्रपट नक्की बघणार! कोणी काही म्हणा अक्षयकुमार आपल्याला आवडतो. जुन्या धर्मेंद्राची आठवण करून देणारा. त्याचे सिनेमे सीरियसली बघायला जायचे असतात कधी? डोकं बाजूला ठेवून फुल्लटू करमणूक.
सत्य घटनेवर आधारित म्हणजे कोणती घटना होती ही?
13 Feb 2013 - 9:16 am | तिमा
परीक्षण चांगले लिहिल्याबद्दल तुम्हाला कट्ट्याच्या दिवशी पळून गेल्याबद्दल,वैयक्तिक स्तरावर माफ करण्यात येत आहे.
सिनेमा बघण्यात येईल.
13 Feb 2013 - 9:30 am | स्पा
कालच छान डीवीडी प्रिंट उतरवली आणि पहिला :D
झकास चित्रपट आहे
किसान द्येव भारी परीक्षण :)
13 Feb 2013 - 9:44 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आता पहाणे आले. किसनद्येवांनी शिफारस केली म्हणून.. नाहीतर त्या अक्षयकुमारला विचारतो कोण?
13 Feb 2013 - 9:47 am | शुचि
परीक्षण खासच!
13 Feb 2013 - 9:52 am | सोत्रि
नीरज पांडे म्हणजे आपला 'अ वेन्स डे' वाला ना?
मग त्याच्यावर मी पैसे लावायला यतार आहे.
- (सध्या चित्रपटांपासून दूर गेलेला) सोकाजी
13 Feb 2013 - 9:53 am | तुमचा अभिषेक
उद्या वॅलेंटाईन डे, सुटी टाकलीय, बायकोबरोबर फिरायला जायचा बेत आखलाय, त्यात हा सिनेमा बघायचाही प्लॅन घुसडलाय, कारण स्टोरीलाईन आवडली होती, तरीही किंचित साशंक होतो, पण आता मात्र तुमचे परीक्षण वाचून टेंशन गुल्ल.. :)
13 Feb 2013 - 10:17 am | नानबा
किसनने सांगितलंय म्हणजे नक्की बघणार... :)
13 Feb 2013 - 11:06 am | मृत्युन्जय
स्पेशल २६ हा पहावाच असा एक माइलस्टोन चित्रपट आहे.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे:
१. अनुपम खेर आणि मनोज बाजपेयीचा फाडू अभिनय. त्या दोघांनीही त्यांचे कसब पुर्ण पणाला लावले आहे. अनुपम खेरचा प्रसंगी करारी आणि प्रसंगी घाबरट अभिनय. एका प्रसंगातील लाळघोट्या विनम्र अभिनयानंतर त्याच प्रसंगात दुसर्या फ्रम मध्ये त्याचा आत्मविशवासाने भरलेल्या आणि दुसर्याला येडा बनवुन पेढा खाल्ल्याबद्दल चेहर्यावर कुत्सित भाव आणण्याचा अभिनय अप्रतिम.
मनोज बाजपेयीस देखील पैकीच्या पैकी मार्क. प्रमोशन मिळत नाही म्हणुन वैतागलेला असताना जेव्हा तो त्याच्या सिनीयरला आठवण करुन देतो आणी म्हणतो " की साहब अभी मेरा प्रमोशन और इन्क्रीमेंट नही हुआ. इतनेसे पैसे मे घर नही चलता. रिश्वत खाना शुरु कर दु क्या? " तेव्हाचा त्याचा अभिनय आणि संवादफेक लाजवाब. किंवा त्याचे सहकार्याला "हेल्लो बोल उसको" (म्हणजे फोन टॅप कर) असे सहजपणे म्हणणेदेखील लाजवाब किंवा स्वतःच्या कर्तुत्वाचा आणि अक्कलहुसारीचा सार्थ अभिमान असल्याने फसलेल्या जिम्मी शेरगिलाला त्याच्या तोंडावर " रणवीर साहब फुद्दु बना गये वोह लोग आपको" असे म्हणतानाचा त्याचा अभिनय देखील १०० गुणांस पात्र.
२. अक्षयकुमारचा चांगला अभिनय आणि त्याचा सहज वावर. शिवाय त्याचा स्टाइल कोशंटही पाहण्यास्सारखा. दिग्दर्शकाने योग्य उपयोग करुन घेतला आहे त्याच्या स्टाइलचा.
३. कथा एकदम चोख. १०० नंबरी सोने. उत्तम आणि वेगवान कथानक आणि दमदार संवाद. जोडीला उत्तम अभिनय. म्हणजे यशाची खात्री
आता काही टाकाऊ गोष्टी:
१. काजल अगरवाल केवळ प्रेक्षकांची मानसिक गरज भागवण्यासाठी आहे. की बाबा पिक्चरमध्ये एक हिरोइन आहे. जीए अधुन मधुन गाण्ञात दिसते. ती गाणी प्रोमोज मध्ये दिसतात. हिरोइन शिवायह्चा पिक्चर मारधाड असाणार किंवा बोर असणार असे समजुन पब्लिक येणार नाही. हा हिशोब लक्षात घेउन केवळ हिरोइन्चे पात्र आहे. ते अक्षरशः वाया गेलेले आहे. काजल अगरवाल अगदी सोवळी दाखवली आहे. गेलाबाजार सनी लिओन घेउन तिचे आणी अक्षयचे एक गरमागरम गाणे तरी टाकायचे.
२. गाणी निव्वळ टाकाऊ. शेवटचे जरा बरे आहे. पण केवळ बरे आहे. चांगले नाही.
३. पिटातल्या प्रेक्षकांसाठी काही गोष्टी तपशीलवारपणे सांगणे गरजेचे होते. चित्रपटातल्या १-२ गोष्टी कळल्याच नाहित असे बरेच जण म्हणु शकतात. त्या १-२ गोष्टी काय ते इथे सांगत नाही. रसभंग होइल.
मला विचाराल तर चित्रपट बघाच. गाणी भिक्कार आहेत. त्याकडे काय लक्ष देता. त्या वेळात पॉपकॉर्न, सामोसे, कोककोला प्या आणि मज्जा करा.
13 Feb 2013 - 11:52 am | किसन शिंदे
धन्यवाद! :D
13 Feb 2013 - 11:10 am | संजय क्षीरसागर
काल रात्री १०.३० ला जाताजाता वाचलो! या परिक्षणामुळे थिम कळली.
13 Feb 2013 - 11:32 am | अक्षया
चित्रपट पाहिला..किसनजींशी सहमत.. :)
तीसमार खान पाहिल्या पासुन अक्षय च्या चित्रपटाची धास्ती बसली होती. पण ह्या चित्रपटामुळे ती दुर झाली.
स्पीड आणि वेगळेपणामुळे प्रभावी झालेला चित्रपट.
13 Feb 2013 - 11:52 am | अभ्या..
मस्त रे किसना. अक्कीच्या चित्रपटाचे रसग्रहण टाकल्याबद्दल. बघणार तर आहेच निश्चित. :)
13 Feb 2013 - 12:05 pm | बॅटमॅन
बगिटलो बे पिच्चर परवाच. लै भारी जमलाय. युगायुगांनंतर अक्षयने भारी भूमिका केलीय.
13 Feb 2013 - 12:19 pm | मालोजीराव
स्पेशल २६ म्हणजे विशेष आवडलेल्या चित्रपटांपैकी एक !
मनोज वाजपेई च्या अभिनयाला १०० पैकी १०० मार्क , आणि या सुंदर चेहर्याला पण माझ्याकडून १०० पैकी १००
13 Feb 2013 - 12:41 pm | संजय क्षीरसागर
कशात काय बघायच!
13 Feb 2013 - 2:24 pm | दिपक.कुवेत
बघायची उत्सुकता वाढलीय...तु नळिवर आहे का? नवीनच आहे म्हटल्यावर शक्यता फार कमी वाटतेय
13 Feb 2013 - 8:47 pm | यसवायजी
special 26
13 Feb 2013 - 2:59 pm | हरेश मोरे
सिनेमा बघायची उत्सुकता वाढलीय . आज डाउनलोड केल आहेच . पाह्तो आज.
13 Feb 2013 - 3:06 pm | पिंगू
मस्तच चित्रपट आहे. पाहिल्यास वेळ फुकट जाणार नाही, याची गॅरंटी..
- पिंगू
13 Feb 2013 - 4:35 pm | अग्निकोल्हा
पन सुरुवातिला वाँटेड म्हणुन पॅनकार्ड कोनाचं दावलं त्येच नाव कळलं नाय .
अतिशय धमाकेदार सुरुवात झाल्यानंतर चित्रपट मध्यंतरापर्यंत अक्षरशः रेंगाळतो (यश डोक्यात गेल्याचं लक्षण समजायचं का ?) पण मध्यंतरानंतर पुन्हा सॉलिड ग्रिप येते. बाकि अभिनय वगैरे गोष्टि ओ की ठो कळत नसल्याने पास. नेहमीचा मसाला नसल्यानं पिटातलं पब्लिक काहीस कंटाळु शकतं विषेशतः सनि लिओने ची उणिव जाणवतेच. पण एकुणच चित्रपट वेगळा व अतिशय करमणुक प्रधान.
13 Feb 2013 - 5:15 pm | प्यारे१
मस्त परिक्षण रे किस्ना...!
बाकी एकट्या माणसाची एवढी कीव करुन बाजूला जाऊन बसण्याचं कारण कळेना! 'विशिष्ट आवडी' आहेत का काय? ;) ह घ्या. :)
13 Feb 2013 - 5:21 pm | अभ्या..
=)) =))
+१ स्पेशल प्यारे१
13 Feb 2013 - 6:38 pm | किसन शिंदे
:D
नाय त्या सवयी आपल्याला नायत रे प्यारे. दुर्दैवाने आमचा आसन क्रमांक त्याच्या बाजूलाच होता आणि हो माझ्या सोबत बारका भाऊही होता.
14 Feb 2013 - 5:38 am | स्पंदना
का वो खाया प्याया देवा की जरा! मग बारका कसा र्हाइल म्हणती म्या!
14 Feb 2013 - 6:24 am | किसन शिंदे
अय्यो
बारका म्हणजे तसा बारका नाय हो, लहान भाऊ लहान.
13 Feb 2013 - 8:23 pm | सस्नेह
चित्रपट अवश्य बघणार !
14 Feb 2013 - 6:35 am | श्रीरंग_जोशी
किशोर कदम यांना हिंदी चित्रपटात पाहून सुखद धक्का बसला.
14 Feb 2013 - 9:34 pm | तुमचा अभिषेक
पाहिला आज स्पेशल छब्बीस.
चांगला वाटला.
बुद्धीजीवी लोकांसाठी तरी अधूनमधून असे सिनेमे निघत राहायला हवेत.
छोटेसेच कथाबीज, बोले तो वन लाईन स्टोरी, मात्र कुठेही न रेंगाळवता छान खुलवली.
सिनेमातील गाणी खास नसली तरी बॅकग्राऊंड म्युजिक आवडली. इतर तांत्रिक बाबीत ही सिनेमा सरस वाटला.
काही दृष्यात अक्षयकुमारकडे पाहून अन सोबतीला ऐंशीच्या दशकाला साजेसे पार्श्वसंगीत ऐकून मला उगाचच अमिताभच्या डॉनची आठवण येत होती.
कोणाला बघायचे असल्यास एकच सांगेन की पैसा वसूल फिल्म आहे.
अवांतर - अनुपम खेरचाच एक अशीच भुमिका असलेला "सी कंपनी" सिनेमा आठवला ज्यात असेच गॅंगस्टरभाई असल्याची खोटी बतावणी करून खंडणी उकळन्याचा प्रकार दाखवला होता. तो चित्रपट काय बोलतात ते मासेस साठी बनवला होता. सोबतीला तुषार कपूर वगैरे होता, फार कमी लोकांना आवडणारा मिथुनदा होता, म्हणून लुडकला. मात्र मला तो देखील आवडला होता.
18 Feb 2013 - 10:20 am | रेवती
आत्ताच शिनेमा पाहून येतीये. किस्ना, वेळेवर कळवल्याबद्दल धन्यवाद. तलाशप्रमाणे हाही शिनेमा चुकवला असता तर फार वाईट वाटलं असतं. अगदी भारी म्हणजे पूर्ण मनोरंजन करताना दिग्दर्शकाने कथा मस्त दाखलीये. शेवटपर्यंत कहानीमे ट्विस्ट आहे. चित्रपटाच्या शेवटाबद्दलचे माझे सगळे अंदाज चुकले. माझे पॉपकॉर्नस् संपले नाहीत. लक्ष कुठेही दुसरीकडे गेलेच नाही.
18 Feb 2013 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपट पाहीन. धन्स.
18 Feb 2013 - 11:41 am | छोटा डॉन
चित्रपट ओके ओके वाटला.
पिक्चरची स्टोरी बर्यापैकी माहित होती तरीही सादरीकरणात अक्षय, जिम्मीची थोडीफार अॅक्टिंग आणि अनुपम खेर, मनोज वाजपेयीची नेहमीप्रमाणे मापात अॅक्टिंग सोडले तर इतर काही नाही.
ह्या चौकडीचे कारनामे म्हणाल तर जे काही दाखवले आहे त्यात पहिला मंत्र्याचा सीनच जमला आहे, बाकी सर्व रुटिन आणि स्टेरिओटाईप वाटले.
चित्रपट संपायच्या आधीच शेवट काय असेल हे कळुन चुकले.
जी कोण सौथंडियन अॅक्ट्रेस आहे तिला का घेतले किंबहुना त्या कॅरॅक्टरची गरजच काय असा प्रश्न पडला.
किशोर कदमच्या रुपाने मराठी माणुस दिसला ह्याचे सुख वाटायचे कारण मला दिसले नाही, त्यांची भुमिका अगदीच चिल्लर होती, त्यांचे जे काही स्किल्स होते ते दाखवायचा चान्सस मिळाला नाही.
अवांतर : असल्या गोलमाल कल्पनेवरचा 'बंटी-बबली'ह्यापेक्षा कित्येकपटीने चांगला होता. त्यात दाखवलेली लव्हस्टोरीही अनवाँटेड वाटली नव्हती.
माझी शिफारस :
१. फुकट मिळाला तर वन टाईम वॉच म्हणुन पहा.
२. जास्त अपेक्षा ठेऊ नका.
३. काही काळाने टिव्हीवर येईलच, तिकडेच पाहिल्यास उत्तम.
- छोटा डॉन
19 Feb 2013 - 12:49 am | सासुरवाडीकर
मग...!जाऊ म्हंता सिनेमा बघायला?
जातोच.
ए दोन तिकीटं काढुन आण रे.
19 Feb 2013 - 3:28 am | उपास
आवडला.. चित्रपटाला वेग छानच आहे. ऑपेराहाऊसला खूप पूर्वी त्रिभुवनदासजीवर घातलेल्या दरोड्याची आठवण झाली..एकदा बघायला हवाच!
19 Feb 2013 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किस्ना, चित्रपट नेटावरुन डाऊनलोड करुन इंटरवेल पर्यंत पाहिला. दुसरा भाग थेट्रात पाहू की घरीच पाहू, असा कन्फ्यूज आहे. एकापाठोपाठ दृश्य पुढे वेगाने सरकत असल्यामुळे चित्रपट पाहतांना मजा आली.
अवांतर : नेटावर लोक चित्रपट अपलोड करतात तर क्वॉलिटी एचडी टाकलं तर काय बिघडेल म्हणतो मी ?
-दिलीप बिरुटे
[फूकटा चित्रपट रसिक]
-दिलीप बिरुटे