एक होता राजा....

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
13 Mar 2012 - 3:15 pm

"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान.

"पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी.

"तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत"

" अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले?

"सौरव गांगुली. अजुन कोण?" त्रासिक उत्तर आले.

त्याला बाउंसर खेळता येत नाहीत, त्याला (पायतले) यॉर्कर्स खेळता येत नाहीत, त्याला एकुणच जलदगती गोलंदाजीच खेळता येत नाही. अर्रे मग फुकणीच्यांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजारी मनसबदारात तो काय फक्त फिरकीच्या चिंधड्या उडवुन सामील झालाय का?

प्रॉब्लेम असा आहे की सौरव गांगुलीच्या कारकीर्दीवर टिप्पणी करणार्‍यांत पायातले यॉर्कर्स या शब्दरचनेतली विसंगती ओळखु न येणारी जनता मोठा प्रमाणावर होती. स्वत: पॅड घालुन आयुष्यात सोसायटीच्या आवाराला एक फेरी न मारलेली लोकं ही, "सौरव गांगुली??? हॅ हॅ हॅ. तो पळतो त्याला रनिंग बिटवीन द विकेट थोडीच म्हणता येइल? त्याला फारतर गोगलगायीचा मॉर्निंग वॉक म्हणता येइल. " असे म्हणतात तिथे त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत हे पण चालवुनच घ्यायला लागेल म्हणा.

८ जुलै १९७२ म्हणजे बरोबर ४० वर्षांपुर्वीच्या जुलै महिन्यात सौरव चंडीदास गांगुली या झंझावाताचा जन्म कलकत्त्याच्या गर्भरेशमी घराण्यात झाला. त्या आधी आणि त्यानंतर (अर्थात त्यानंतर अजुन फारसा काळ लोटलेला नाही) भारतीय क्रिकेट संघाला इतका इम्पल्सिव कर्णधार लाभलेला नाही. त्याच्या कारकीर्दीत त्याने जितके चढउतार पाहिले आणि त्याच्यातला फलंदाज संपला आहे याच्या जितक्या गप्पा ऐकल्या तितक्या राजकीय कोट्या तर साक्षात दिग्विजय सिंगानी देखील केलेल्या नाहीत.

अर्थात या सगळ्या फुकाच्या गप्पांना फाट्यावर मारत सौरव चंडिदास गांगुलीने ज्या शानसे भारतीय, नव्हे एकुणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवला आहे ते बघता त्याची महाराजा ही पदवी सार्थच ठरते म्हणा. कोणी म्हणते त्याच्या सांपत्तिक स्थितीमुळे त्याला महाराजा म्हणतात तर कोणी म्हणते त्याच्या मैदानावरील वावरामुळे. कोणी म्हणते त्याच्या महाराजासारख्या इतरांना तुच्छा ठरवण्याच्या वृत्तीमुळे तर कोणी म्हणते त्याच्या क्रि़केटमधील लालित्यामुळे. काही का असेना तो महाराजा होता हे खरे.

पण महाराजा असला म्हणुन काय झाले? त्याच्या त्या राजेशाही वृत्तीमुळेच त्याला बर्‍याचदा टीकेचे धनी देखील व्हावे लागले. आपल्या पहिल्याच दौर्‍यावर सर्व सिनियर्सशी तोर्‍यात वागणार्‍या, दोन आकडी धावसंख्या पुर्ण करण्याची देखील कुवत न दाखवता पाणी घेउन जाण्यास नकार देण्याचे औद्धत्य दाखवणार्‍या गांगुलीला बोर्डाने सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. नंतरही त्याच्या या स्वाभावाचे फटके त्याला वारंवार बसले. कौंटीत खेळताना एकदा त्याने अर्धशतक ठोकले. नंतर प्रथेप्रमाणे पॅव्हिलियन कडे बॅट दाखवली तर तिथे त्याचे कौतुक करण्यासाठी कोणीही थांबले नव्हते. अर्थात यात त्याच्यापेक्षा गोर्‍यांचीच जास्त चुक वाटते. गोर्‍यांना त्यांची जागा दाखवुन देण्याचे महानतम कार्य करणारा सौरव गांगुली पहिला भारतीय कप्तान होता. इतिहासात प्रथमच एक भारतीय खेळाडु तु शेर तर मी सव्वाशेर म्हणुन त्यांच्या समोर उभारहिला होता. त्यामुळेच त्यांना तो आवडत नसावा बहुधा.

इतर भारतीय दिग्ग्जांप्रमाणे सौरव गांगुली काही वरण भात मॉडेल नव्हता. त्याच्या डोळ्यात विखार होता आणि शब्दात फुत्कार. तलवारीच्या पात्याप्रमाणे सटासट जीभ चालवायला आणि जमेल त्यावेळेस एखाद्याला अनुल्लेखाने मारायला, दोन्हीलाही त्याचा कधीच विरोध नव्हता. पाकिस्तानी फलंदाज जेव्हा लागले असल्याच्या नावाखाली वेळ काढत होते तेव्हा "तेरे को जितना टाइम लेना है ले ले. मगर तु टाइम नोट कर ले. वरना बाद मे मरुंगा मै ही." असे निर्धोकपण अंपायरला आणि युसुफ योहाना (खान) ला सांगण्याची हिंमत आणि सडेतोडपणा त्याच्याकडे होता. त्यामुळे सौरव गांगुली मिडीयाचा आणी क्रिटिक्सचा लेस फेवर्ड बॉय होता. त्यामुळेच त्याला बाउंसर्स खेळणे जमत नाही, शोएब अख्तर समोर तो नाचतो वगैरे टीका त्याच्यावर लगेच झाली. त्याच शोएब अख्तरने सचिनच्याही तिन्ही यष्ट्या पहिल्याच चेंडुवर उडवल्या होत्या. सचिनवर टीका नाही झाली. पण नंतर शोएब, अक्रम, वकार या त्रिकुटाच्या मार्‍यासमोर एडलेड मध्ये गांगुलीने शतक टोकुन देखील त्याच्यावरचा कलंक मात्र पुसला गेला नाही. या सामन्यात ऑफला ७ क्षेत्ररक्षक लावुन अक्रमने गोलंदाजी केली आणि त्या सात जणांमध्ये गॅप्स शोधुन शोधुन गांगुलीने चेंडु सीमेपार धाडले. त्याला गोलंदाजी करताना अक्रमच्या चेहर्‍यावरचे असहाय्य भाव लपत नव्हते. त्यांची तुलना शिंहाच्या कचाट्यात सापडलेल्या हरिणाशीच होउ शकते. पण तरीही.................. तरीही.............. गांगुलीला जलदगती गोलंदाजी खेळता येत नाही हा आरोप कायम राहिला.

मी आकड्यांमध्ये शिरत नाही. कारण ते निरस असतात. त्याने टेस्ट मध्ये ७००० + धावा केल्या आणी एकदिवसीय सामन्यांत ११०००+ हे आकडे ऐकायला छानच वाटतात. पण आकड्यांमध्ये भारदस्तपणा असतो पण भावना नसतात. त्यांच्यात जोर असतो पण जोश नसतो. सौरव चंडीदास गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० + धावा काढल्या किंवा सव्वाशेहुन आधिक बळी मिळवले यापेक्षा त्याची कारकीर्द मोठी आहे आणि त्याच्या कारकीर्दीचे मोलही मोठे आहे. १८००० धावा तर त्याने स्वत:ने काढल्या हो. त्याने कप्तान बनुन ज्यांची कारकीर्द फुलवली त्यांच्या धावांचे श्रेय गांगुलीला नाही तर कोणाला द्यायचे? आणि मुख्य म्हणजे धावांचे कागदी घोडे नाचवण्याच्यी पुढे जाउन त्याने जे त्याच्या संघाल जिंकायला शिकवले त्याचे मुल्यमापन कसे आणि कशात करायचे? अझरुद्दीन लाच खाउन बाहेर पडलेला, कप्तानपदाचे ओझे न पेलवल्याने सचिन ने नकार दिलेला अश्या अवस्थेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी एखाद्या वाघाचीच गरज होती. कलकत्त्याच्या राजकुमाराने ती गरज पुर्ण केली.

खेळाडु घडवता येतात पण कप्तान स्वतःहुनच घडतो. त्याला घडवता येत नाही. गांगुली हा जन्मजात कप्तान होता. त्याचा स्वभाव त्या पदासाठी अतिशय पूरक होता. त्याच्या त्या स्वभावाच्या बळावरच त्याने भारत दौर्‍यावर साक्षात स्टीव्ह वॉला जेरीस आणले. पट्ठ्या नाणेफेकीसाठी जाणूनबुजुन उशिरा जायचा. वॉ कडे लक्षच नाही द्यायचा. माइंड गेम खेळण्यात वॉशी बरोबरी करायचा. त्याच्या हा मूळच्या मुजोर आणि खुनशी वृत्तीमुळेच त्याने २००१ च्या नॅटवेस्ट ट्रोफीच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर लॉर्डसच्या बाल्कनीत अंगातला टी शर्ट काढुन फडकावला. अहो तुमचा फडतूस फ्लिंटॉफ येउन जर आमच्या एडन गार्डन्स वर फक्त सिरीज ड्रॉ केली म्हणुन शर्ट काढु शकतो तर आम्ही जिंकल्यावर का काढु नये. गांगुलीचा त्या काढलेला टी शर्टमागे तमाम भारतीयांची हीच भावना होती. आणि गांगुलीच्या यशाचे नेमके हेच मर्म आहे. जशास तसे , अरे ला कारे करायला भारतीयांना त्यानेच शिकवले, मी जिंकु शकतो हे त्याच्या संघाला त्यानेच सांगितले. समोरच्याने स्लेजिंग केले तर त्याला फक्त बॅटने उत्तर देउन भागत नाही तर तिथल्या तिथे एक घाव दोन तुकडे करुन त्याला त्याची लायकी दाखवुन देणेही कधीकधी गरजेचे असते हे त्याच्या संघाला त्यानेच शिकवले. कधीकधी समोरच्याला त्याच्याच भाषेत प्रत्त्य्तर द्यावे, कधीतरी आपण केवळ दुसर्‍याच्या खोड्यांपासुन स्वतःचा फक्त बचाव करु नये तर त्याने खोडी काढायच्या आधी आपणच काढावी, गोर्‍या कातडीसमोर मान तुकवण्यापेक्षा "भाड मे जाये तु और तेरी टीम" हा अ‍ॅटिट्युड दाखवुन समोरच्याच्या नाकावर टिच्चुन स्वतःचे म्हणने खरे करुन दाखवावे हे त्याच्या संघाला त्यानेच शिकवले.

सौरव चंडीदास गांगुलीच्या यशाचे मापदंड त्याच्या धावा किंवा त्याचे बळी नाहीत. त्याच्या यशाचे मापदंड त्याने एक कप्तान म्हणुन जिंकवुन दिलेले सामनेही नाहीत, त्याच्या यशाचे मापदंड बंगालमधली त्याची लार्जर दॅन लाइफ प्रतिमाही नाही. त्याच्या यशाचा मापदंड आहे त्याने घडवलेला संघ. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या, विश्वास गमावलेल्या, दिशा हरवलेल्या काही अलौकिक प्रतिभेच्या खेळाडुंना एकत्र आणुन , त्यांच्यात विजयाचे स्फुल्लिंग पेटवुन, त्यांच्यात दुर्दम्य आशावाद जागवुन, त्यांच्यावर विश्वास दाखवुन आणि त्यांना स्वतःवर विश्वास दाखवण्यास प्रवृत्त करुन त्याने एक संघ घडवला. भलेही तो संघ २००३ चा विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरलेला असो. पण त्या संघात जी कमालीची विजिगुषु वृत्ती होती, जो एकसंधपणा होता, जो एकोपा होता, जो प्रखर अभिमान होता त्याचे सगळे श्रेय या बंगालच्या महाराजाला जाते.

त्याच्या टीकाकारांचे म्हणणे मान्य करायचे झालेच तर फक्त ऑफ ला धावा काढुन आणि ते सुद्धा फक्त फिरकी गोलंदाजांची धुलाई करत तो आधुनिक क्रिकेटमधल्या महान फलंदाजाच्या मांदियाळीत उठुन दिसला. सहारा कप मध्ये सलग पाच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मध्ये करामत करुन सामनावीराचा पुरस्कार मिळवण्याचा जागतिक विक्रम केल्यानंतर अझरुद्दीनने त्याचा "Man with the Golden Arm" म्हणुन गौरव केला तर त्याची ऑफची सहजता बघुन राहुल द्रविड म्हणाला "On the off side, first there is God, then there is Ganguly." मी थोडी सुधारणा करु इच्छितो. "Sourav Ganguly is the God of Offside." त्याच्या या सहजतेमुळेच असेल कदाचित पण लोकांचा असा गैरसमज झाला असावा की त्याला लेगल खेळता येत नाही. मधुबालाचे देखील थोडेफार असेच व्हायचे. तिच्या सौंदर्यामुळे तिचा अभिनय झाकोळुन जायचा.

कप्तानपदाच्या काळात त्याच्या संघमित्रांसाठी तो मुख्य आधारस्तंभ होता. त्याच्या पाठिब्यानेच सेहवाग, हरभजन, युवराज, धोनी इत्यांदींचे भागोदय झाले. आजघडील सेहवाग आणि हरभजन त्याला सर्वोत्कृष्ट कप्तान मानतात तर युवराज म्हणतो मी त्याच्यासाठी जीवदेखील द्यायला तयार आहे. एका फलंदाजाची फलंदाजी बघुन दादा म्हणाला "इसे देखो. एक दिन ये बडा नाम कमायेगा. मुझे इसे खिलाना है." तो महेंद्रसिंग धोनी होता आणि वर्षभरात तो भारतासाठी खेळला. गांगुलीकडे जौहरीची नजर होती. हिरे तो बरोबर टिपायचा. आणि असे एक एक करत त्याने मोहरे टिपले, त्याच्या लष्करात जमा केले आणि मग तो जग जिंकत गेला. सचिन / अझरच्या काळात पंकज धर्माणी, अजय रात्रा, नोएल डेविड, निलेश कुलकर्णी, अ‍ॅबी कुरुविला, समीर दिघे असे जे काही भयाण प्रयोग झाले त्या पार्श्वभूमीवर सेहवाग, धोनी, हरभजन, युवराज, जहीर हे त्याने टिपलेले मोहरे बघितले की एक कप्तान म्हणुन त्याचे महानपण अधोरेखि होते. एका मुलाखतीदरम्यान तो निर्णयक्षमतेबद्दल बोलताना म्हणाला होता "The best captains get it right seven times out of ten. I think I get it right five times out of ten. But I know, even when I get it wrong, that my team believes I was wrong in trying to be right." त्याच्यावरचा त्याच्या टीममेट्सचा हा विश्वासच त्याच्या यशाची खरी पावती आहे.

या संघ घडवण्याच्या काळात त्याच्यातल्या फलंदाजाकडे त्याचे थोडे दुर्लक्ष झाले खरे. पणा म्हणुन त्याने कधी हत्यार नाही टाकले. २००७ मध्ये सक्तीच्या वनवासापर्यंत त्याने ते शिवधनुष्य समर्थपणे पेलले. त्याच्यावर लादलेला हा वनवास एक क्रिकेटच्या हितासाठी घेतलेला निर्णय होता असे खचित नाही म्हणता येणार. यात राजकारण नव्हते, वैयक्तिक हिशेब चुकवण्याचे प्रयत्न नव्हते असे शेंबडे पोर सुद्धा म्हणणार नाही. पण या सगळ्यांना पुरुन उरुन गांगुली संघात परतला. २००८ मध्ये तो हमखास अयशस्वी ठरेल असे वाटत असताना उसळत्या खेळपट्ट्या, दक्षिण अफ्रिकेचे तीव्रगती गोलंदाज, एकामागोमाग एक येउन थडकणारे बाउंसर्स, त्याच्या अपयशाकडे डोळे लावुन बसलेले त्याचे हितशत्रु, हमारे प्रिय ग्रेग चप्पल आणि त्याचे स्वतःचे त्याच्यावर रुसलेले नशीब या सगळ्यांच्या नाकावर टिच्चुन त्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला.

अनपेक्षित गोष्टी साध्य करण्याची कला गांगुलीला साध्य झाली होती. जे होउच शकणार नाही असे इतर म्हणत ते त्याने करुन दाखवले. १९९२ मध्ये डच्चु मिळाल्यावर १९९६ मध्ये पदार्पणातच लॉर्डस वर शानदार शतक ठोकुन झोकात पुनरागमन केले. २००७ मध्ये संघातुन गच्छंती झाल्यावर २००८ मध्ये पुनरागमन करुन मालिकावीर झाला. २०११ च्या आयपीएल मधुन सगळ्यांनी नाकरल्यानंतर सुद्धा आशचर्यकारकरीत्या संघात सामील झाला. त्याने पुनरागमन केले हे विशेष आहेच. पण त्याच्या प्रत्येक पुनरागमनाच्याआधी क्रिकेट पंडितांनी अशी शक्यता मुळातुन खोडुन काढलेली असताना त्याने हे शक्य करुन दाखवले हे जास्त विशेष. त्याच्या या हार न मानण्याच्या वृत्तीमुळे, त्याच्या चिकाटीमुळे, चिवटपणामुळे, क्रिकेटवरच्या समर्पणामुळेच तो एक महान खेळाडु म्हणुन ओळखला जातो.

गांगुलीच्या नेतृत्व गुणाबद्दल जगभरातले महान खेळाडु काय म्हणतात बघा:

"Sourav Ganguly was the best India captain who made a major turnaround in Indian cricket in bad times. Current captain M S Dhoni has improved it further to yield highest dividend," - मोहम्मद अझरुद्दीन.

“Sourav was a truly wonderful captain and donned the role of an intermediary between the players and the selectors to near perfection,” - जवागल श्रीनाथ

"Sourav Ganguly is the best Captain I have played under. He had a knack of selecting people and understanding their game" - सचिन तेंडुलकर

पण खर्‍या अर्थाने गांगुलीच्या महानतेची ग्वाही देतात खालील दोघांची मते. शत्रुकडुनदेखील वाहवा मिळवणारा खेळाडु नि:संशयपणे सर्वोत्कृष्ट समजावा

Sourav injected a sense of a self-confidence inside the team, a never say die-attitude, under him the team never gave up. They team had an attitude made of hard steel; they would just not be intimidated by the Australian conditions. Dhoni on the other hand, is a bit cool, I can’t term it bad, but certainly in Australia, to beat the home side, you need to like Sourav, a bit more aggressive. The team should have an attacking mentality at all times; this is what Sourav used to do very well. - स्टीव्ह वॉ.

“Mohammed Azharuddin was a smart skipper, while Tendulkar always led by example. Sourav Ganguly was by far the best Indian skipper and his positive leadership made a huge difference in the 2001 tour and later when Indians toured here in 2003-04. Captaincy is always not just about winning matches, but also about how you approach a game and manage the team. Ganguly did that pretty well.” - मार्क वॉ.

भारतीय क्रिकेटच्या राजकारणात यथावकाश गांगुलीचा बळी दिला गेलाच. पण कोणी सांगावे तो प्रिंस ऑफ कोलकता आहे महाराज आहे, दादा आहे, अनहोनी को होनी करणारा आहे. त्याने मनात आणले तर कदाचित तो परत एकदा भारतातर्फे खेळताना दिसेल. अडचण अशी आहे की आता त्यालाच अशी इच्छा नाही.

सचिन निवृत्त होइल तेव्हा भारतीय क्रिकेटमधील एक पर्व संपेल. पण गांगुलीच्या निवृत्तीमुळे त्या पर्वाचा इंटर्व्हल नक्की झाला आहे.

*************************************************************
टीपः सर्व छायाचित्रे जालावरुन साभार

क्रीडामौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखमतमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

तपशीलवार सुंदर परिचय, रोचक आणि ओघवत्या भाषेत... जियो...

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 3:47 pm | श्रावण मोडक

गुड वन...!

गणपा's picture

13 Mar 2012 - 4:06 pm | गणपा

छान ओघवत लिहिलयस रे मृत्युंजया.

छोटा डॉन's picture

13 Mar 2012 - 4:06 pm | छोटा डॉन

गांगुलीवरचा लेख आवडला.
अ‍ॅक्युचली गांगुली साईडलाईन झाल्यावरच क्रिकेट बघण्याची इच्छा संपली, नंतर उरला तो पोरखेळ.
लेख मात्र एकदम झक्कास ...

- छोटा डॉन

सोत्रि's picture

14 Mar 2012 - 10:42 am | सोत्रि

अ‍ॅक्युचली गांगुली साईडलाईन झाल्यावरच क्रिकेट बघण्याची इच्छा संपली, नंतर उरला तो पोरखेळ.

खी खी खी, हे जरा अतिच झाले बरं का डॉन्राव :D

- (क्रिकेट बघण्याची इच्छा संपलेला) सोकाजी

कर्ण's picture

14 Mar 2012 - 1:44 pm | कर्ण

अ‍ॅक्युचली गांगुली साईडलाईन झाल्यावरच क्रिकेट बघण्याची इच्छा संपली, नंतर उरला तो पोरखेळ.

मी तर world - cup ची आपली फायनल म्याच सुद्धा बघीतली नाही

छोटा डॉन's picture

14 Mar 2012 - 2:41 pm | छोटा डॉन

>> हे जरा अतिच झाले बरं का डॉन्राव
?
ह्यात काय अति झालं ?
आधी गांगुली गेला, आता द्रविड, लक्ष्मण आहेच वाटेवर, तेंडल्याही जाईल काही दिवसांनी ... मग उरलं काय बाकी ?
कशाला बघायचं क्रिकेट आता ह्यापुढे ?
असो, आम्ही सध्याही अगदी औषधाही क्रिकेट पहात नाही.
आमच्या आवडत्या गांगुलीवर लेख आला म्हणुन ४ ओळी लिहल्या, इति लेखनसीमा.

- - (क्रिकेट बंद व्हावे अशी इच्छा असलेला) छोटा डॉन

sneharani's picture

13 Mar 2012 - 4:20 pm | sneharani

मस्त लेख!!

सुहास झेले's picture

13 Mar 2012 - 4:27 pm | सुहास झेले

मस्त लेख... मज्जा आली वाचताना. एकदम सुरेख माहिती दिलीत :) :)

अमितसांगली's picture

13 Mar 2012 - 4:41 pm | अमितसांगली

छान लिहिलंय....वाचनखुण साठवत आहे...

मी-सौरभ's picture

14 Mar 2012 - 4:24 am | मी-सौरभ

सहमत

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 5:27 pm | चौकटराजा

पार्श्वभूमीवर सेहवाग, धोनी, हरभजन, युवराज, जहीर हे त्याने टिपलेले मोहरे बघितले की एक कप्तान म्हणुन त्याचे महानपण अधोरेखित होते.
निवडसमिती ही नावालाच असते असे म्हणायचे का ?
याबाबत एक जुना किस्सा, एकदा निवड याविषयी माजी खेळाडू हेमंत कानिटकर यांच्याशी उभ्या उभ्या बातचित झाली. निवड नि वशीला या त्याना विचारल्यावरून त्या संबंधी ते बोलले होते की " संघातले ९० टक्क्के खेळाडू गुणावरच निवडले जातात. त्यात नोंद झालेली कामगिरी व एकूण खेळाडूचे पोटेन्शियल याचा समावेश असतो. काही खेळाडू हे प्रयोग म्हणून खेळविले जातात व क्लिकही होतात किंवा होत नाहीत व काही वशिल्याने . त्यात मी स्वत: क्लिक झालो नाही. "
दोनात कोण हवा या संबंधी कप्तान आपले मत नोंदवू शकत असेल उदा. हरभजन((कामगिरीची नोंद चांगली) की अश्विन ( क्लिक झालेला ) .
पण संघ निवडीत तोच फार प्रभाव पाडतो हे मला तरी पटत नाही.

मृत्युन्जय's picture

13 Mar 2012 - 6:02 pm | मृत्युन्जय

कप्तान कोण आहे यावर निवडसमिती आणि कोच चा रोल अवलंबुन असतो. कप्ता जर राहुल द्रविड असेल तर बिचारा जी टीम मिळेल ती निमूटपणे स्वीकारुन खेळतो आणि अपयशी ठरतो. तेच सचिनचे. पण कप्तान जर गांगुली सारखा असेल तर तो स्वतःच्या मागण्यांबद्दल, टीमबद्दल आग्रही असतो. पाहिजे तशी टीम मिळवतो आणि ती टिकवतो, त्यांना पाठिंबा देतो, त्यांना प्रोत्साहन देतो.

गांगुलीचे वक्तव्य होते की तो धोनीला खेळवेल आणि त्याने त्याला संघात आणवले. त्याला सेहवाग आणि हरभजन हवे होते त्यासाठी त्याने प्रसंगी इतर काही तडजोडी केल्या पण त्या दोघांना संघात आणले. युवराजच्या पाठीमागे तोच उभा राहिला. निवडसमिती समोर त्याने आग्रहाने स्वतःचे मत मांडले आणि त्यामुळेच तो प्लेयर्स कॅप्टन ठरला.

बाकी चुकीचे कप्तान मिळाले की निवडसमिती काय करते हे आपण सर्वांनीच बघितले आहे.

अनुप ढेरे's picture

14 Mar 2012 - 11:23 am | अनुप ढेरे

इयान चपेल म्हणाला होता एकदा की तो कप्तान असताना निवड समिति त्याला स्वत:ला जो संघ अपेक्षित आहे तो ठरवून बैठकीला यायला सांगायची. मग बैठकी मध्ये ज्या नावांवर मतभेद असतील त्यावर चर्चा व्हायची. गांगुलीनी सुद्धा अनेक लोकांबद्दल असाच आग्रही असायचा. आणि जर पराभवाबद्दल कप्तान जबाबदार असेल तर निवडीमध्ये पण त्याला अधिकार असलाच पाहिजे.

राहुल द्रविड बद्द्ल पण लिहा .....

जे.पी.मॉर्गन यांनी राहुल द्रविड वर लिहलेला हा लेख छान आहे http://www.misalpav.com/node/18782

मृत्युन्जय's picture

13 Mar 2012 - 6:42 pm | मृत्युन्जय

आमचे मिपावरचे स्वयंघोषित (म्हणजे ते गुरु आहेत असे आम्हीच घोषित केले आहे. एकलव्याने गुरु द्रोणांना गुरु मानले होते तसे. अर्थात जेपींनी आम्हाला अंगठा अथवा कळफलक मागितल्यास तो मात्र आम्ही त्यांना देणार नाही) गुरु श्री जे पी मॉर्गन यांनी आधीच लेख लिहिलेला असल्याने (दुवा धूमकेतूंनी दिलाच आहे) ते औध्दत्य दाखवू शकलो नाही. मात्र खालीलपैकी कोणाच्या लिंका (अथवा लेख) हव्या असल्यास जरुर सांगावे:

१. अनिल कुंबळे
२. व्हिवियन रिचर्ड्स
३. इम्रान खान
४. ग्लेन मॅक्ग्रा
५. सचिन तेंडुलकर
६. रिकी पॉण्टिंग

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 5:51 pm | प्रचेतस

झकास.
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.

मोदक's picture

13 Mar 2012 - 6:03 pm | मोदक

गांगुली म्हणजे...

किंचीत वाकून घेतलेला स्टान्स..
बॉल टाकल्यानंतर बॅटची मोठ्या बॅकलिफ्टसह झालेली हालचाल..
आणि तुफान वेगाने ४ - ५ फील्डरमधून सरपटत गेलेला ऑफ ड्राईव्ह. बॉलर आणि फील्डरच नाही तर बर्‍याचदा आपणही अविश्वासाने पाहत राहतो. :-)

1999 विश्वचषक स्पर्धेत टाँटन येथे द्रवीड आणि गांगुल्याने लंकेची केलेली धुलाई तर अविस्मरणीय.. ते मैदान पण विचित्रच. सरळ बौंड्रीलाईन जवळ होती आणि बाजूला तुलनेने लांब, त्यामुळे गांगुली आणि पुस्तकात बघून खेळणारा द्रवीड हिट्ट झाले आणि आडवी हाणामारी करणारे लंकन बाराच्या भावात गेले. :-)

अमोल केळकर's picture

13 Mar 2012 - 6:26 pm | अमोल केळकर

मस्त लेख

अमोल केळकर
( अवांतर : सचिनवरचा लेख लिहून तयार आहे ना ? :) )

मृत्युन्जय's picture

13 Mar 2012 - 6:38 pm | मृत्युन्जय

एका वेगळ्या दृष्टिकोनातुन सचिनवर लिहिलेल्या लेखाचा दुवा खाली देत आहे. आशा आहे तो ही आवडेल :)

http://misalpav.com/node/16844

५० फक्त's picture

13 Mar 2012 - 6:53 pm | ५० फक्त

धन्यवाद, जसं कधी कधी खाली गेलेले चांगले लेख वर आणावे लागतात तसंच गांगुलीबद्दल केलंत. मजा आली वाचताना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2012 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वॉव.....! जबरा लिहिलंय......आवडला लेख.

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

13 Mar 2012 - 7:15 pm | मालोजीराव

अतिशय सुंदर !
सौरव गांगुली महानतम कप्तान होताच....टीम च्या बांधणीत त्याचा वाटा सिंहाचा आहे, संघाला जिंकण्याची खुमखुमी,आक्रमकपणा,जशास तसे प्रत्युत्तर देण्याची सवय त्यानेच लावली !
सौरव ला सलाम

- मालोजी

गणेशा's picture

13 Mar 2012 - 8:50 pm | गणेशा

अप्रतिम .. नेहमी प्रमाणे सुंदर.
कालच तुमच्या अश्या लेखांची आठवण झाली आणि आज हा लेख वाचायला मिळाला.
खुप छान वाटले..

बाकी गांगुली खुपच मस्त कॅपटन होता.. एकदम सडेतोड.

अझरुद्दीन लाच खाउन बाहेर पडलेला, कप्तानपदाचे ओझे न पेलवल्याने सचिन ने नकार दिलेला अश्या अवस्थेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी एखाद्या वाघाचीच गरज होती. कलकत्त्याच्या राजकुमाराने ती गरज पुर्ण केली.

१०० % बरोबर.

इष्टुर फाकडा's picture

13 Mar 2012 - 9:01 pm | इष्टुर फाकडा

मस्त लेख...आवडेश एकदम :)

प्रास's picture

13 Mar 2012 - 10:11 pm | प्रास

सौरव गांगुलीवरच्या एका अत्यंत मुद्देसूद आणि समतोल लेखाबद्दल तुमचं प्रथमतः अभिनंदन!

गांगुलीने खरोखर चांगल्या खेळाडूंना वेचून वेचून भारतीय संघात निवडलंय आणि त्यातले कित्येकांनी संघाच्या आधारस्तंभाची भूमिका निभावलेली आहे.

सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून गांगुलीच्या नावाची जोरदार चर्चा ऐकू येतेय. तो ही जवाबदारी स्विकारेल की नाही याची कल्पना नाही पण असा हा खमका खेळाडू भारतीय संघाचा प्रशिक्षक बनल्यास नुकतेच ऑसी दौर्‍यावर मिळालेले अपयश धुवून काढता येईल असं वाटतं.

एरवीही भारतीय संघाचा प्रशिक्षक भारतीयच असावा असं वाटतं.

लेख आवडला.

पैसा's picture

13 Mar 2012 - 10:11 pm | पैसा

काही म्हणा महाराजा म्हणजे महाराजा, आणि लेख अगदी त्याला साजेसा झालाय!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Mar 2012 - 10:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लेख मनापासून आवडला.
तसा मी गांगुलीचा पंखा नाही, पण त्याच्या नेतृत्वाबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे.

सुंदर लेख.

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2012 - 12:56 am | सर्वसाक्षी

गांगुलीच्या कामगिरीचा आणि कारकिर्दीचा आढावा घेणारा चांगला लेख.

फारएन्ड's picture

14 Mar 2012 - 9:22 am | फारएन्ड

यावर आज दिवसभर लिहीत राहून प्रतिक्रिया देत राहाव्यात असे वाटले :) मस्त लेख. वेळ मिळेल तसा अजून लिहीनच पण सध्या हे:

दादा म्हणजे आपला सचिन खालोखाल सर्वात आवडता खेळाडू. तो कप्तान असताना जी पॅशन आपल्या टीममधे दिसायची ती आजकाल एकदम गेली आहे, विशेषतः या सीझन मधे. नाहीतर एक मॅच हरली की लगेच पुढच्या मॅच मधे दोन तीन जण तरी आपण किती भारी आहोत हे दाखवून द्यायचेच.

साहेबांनी परवाच बंगालच्या टीमला मुंबईविरूद्ध विजय हजारे कप मिळवून दिला. हा काय शाळकरी कप असे वाटले तर मुंबईचा लाईन अप बघा: अजिंक्य रहाणे, वासिम जाफर, आगरकर आणि बरीच तरबेज गँग होती.

आता आयपीएल मधे पुण्याकडून कोच म्हणून काय करतो पाहू.

अजून लिहीतो जमेल तसे.

सोत्रि's picture

14 Mar 2012 - 10:40 am | सोत्रि

मी गांगुलीचा १००% फॅन कधीच नव्हतो. कुठेतरी एका कोपर्‍यात एक अढी होती.
आज ह्या लेखाने ती नाहीशी झाली.
मृत्युन्जय, मस्तच लेख!

- (सध्या क्रि़केट न बघणारा) सोकाजी

मृत्युन्जय's picture

14 Mar 2012 - 10:51 am | मृत्युन्जय

कुठेतरी एका कोपर्‍यात एक अढी होती.
आज ह्या लेखाने ती नाहीशी झाली.

लेखाचे सार्थक झाले म्हणायचे मग. गांगुली आमचा सर्वात लाडका खेळाडु.

जाई.'s picture

14 Mar 2012 - 1:50 pm | जाई.

छान लेखन

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2012 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

अगणित धन्यवाद रे.

गांगुली रिटायर्ड झाला आणि आमच्यासाठी क्रिकेट संपले. गांगुली म्हणजे आपला देव. अतिशय माजोरडा आणि म्हणूनच अतिशय आवडता.

काही खेळाडूंचा माज बघून आश्चर्य वाटते, उदा. कामरान अक्मल. तर काही खेळाडूंचा माज बघून हसायला येते, उदा. श्रीसंत. पण ज्यानी माज करावा आणि त्याला शोभुन दिसावा असा खेळाडू म्हणजे एक व्हिवियन आणि दूसरा सौरव. गांगुलीला संघातुन वगळले तेंव्हा आणि आयपीएल मध्ये सिलेक्ट केले नाही तेंव्हा, अशा दोन्ही वेळेला इडन गार्डनवरती झालेली तिकिट विक्री पाहून मंडळाला देखील घाम फुटला होता. अक्षरशः तिकिटाचे गठ्ठे पडून राहिलेले होते. ज्याला संघात न निवडण्यावरुन संसदेत प्रश्न उपस्थीत केला गेला असा तो बहूदा एकमेव खेळाडू असावा.

कैफ, हरभजन , युवराज, गौतम, सेहवाग ह्यांची कारकिर्द घडवण्यात त्याचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. ३/३ पेस बॉलर घेऊन भारतीय संघ मैदानात उतरवण्याचे धाडस करणारा गांगुली हा खरच धाडसी कप्तान होता.

प्रमोद्_पुणे's picture

14 Mar 2012 - 2:33 pm | प्रमोद्_पुणे

छान.. मस्त लिहिलय..

स्वातीविशु's picture

14 Mar 2012 - 3:10 pm | स्वातीविशु

अतिशय अप्रतिम लेख. गांगुलीचे पुर्ण व्यक्तिमत्व समोर उभे केलेत. :)

गांगुली मैदानावर फलंदाजीसाठी उतरला की, त्याचे डोळे मिचमिच करत बघणे आठवते. आणि असेच डोळे मिचकावत तो अशी काही फलंदाजी करायचा, की प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटायचे. त्याचे ४ आणि ६ तर बघण्यासारखे असायचे.

द्रविड आणि गांगुली जवळपास एकाच वेळी संघात आले. पण मला द्रविडपेक्षा गांगुली आवडायचा, कारण लेखात लिहिल्याप्रमाणे त्याचा एक माज होता.....कॅप्टनला शोभणारा.

त्याच्या यशाचा मापदंड आहे त्याने घडवलेला संघ. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या, विश्वास गमावलेल्या, दिशा हरवलेल्या काही अलौकिक प्रतिभेच्या खेळाडुंना एकत्र आणुन , त्यांच्यात विजयाचे स्फुल्लिंग पेटवुन, त्यांच्यात दुर्दम्य आशावाद जागवुन, त्यांच्यावर विश्वास दाखवुन आणि त्यांना स्वतःवर विश्वास दाखवण्यास प्रवृत्त करुन त्याने एक संघ घडवला. भलेही तो संघ २००३ चा विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरलेला असो. पण त्या संघात जी कमालीची विजिगुषु वृत्ती होती, जो एकसंधपणा होता, जो एकोपा होता, जो प्रखर अभिमान होता त्याचे सगळे श्रेय या बंगालच्या महाराजाला जाते.

आणि

गांगुली हा जन्मजात कप्तान होता. त्याचा स्वभाव त्या पदासाठी अतिशय पूरक होता. त्याच्या त्या स्वभावाच्या बळावरच त्याने भारत दौर्‍यावर साक्षात स्टीव्ह वॉला जेरीस आणले. पट्ठ्या नाणेफेकीसाठी जाणूनबुजुन उशिरा जायचा. वॉ कडे लक्षच नाही द्यायचा. माइंड गेम खेळण्यात वॉशी बरोबरी करायचा. त्याच्या हा मूळच्या मुजोर आणि खुनशी वृत्तीमुळेच त्याने २००१ च्या नॅटवेस्ट ट्रोफीच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर लॉर्डसच्या बाल्कनीत अंगातला टी शर्ट काढुन फडकावला. अहो तुमचा फडतूस फ्लिंटॉफ येउन जर आमच्या एडन गार्डन्स वर फक्त सिरीज ड्रॉ केली म्हणुन शर्ट काढु शकतो तर आम्ही जिंकल्यावर का काढु नये. गांगुलीचा त्या काढलेला टी शर्टमागे तमाम भारतीयांची हीच भावना होती.

हे अगदी खरे. परंतु ह्याच स्वभावामुळे त्याला संघातील राजकारणाने बाहेर काढले.

आता क्रिकेट्चा पोरखेळ चालू आहे हेही एकदम पटेश. त्यामुळे आधीसारखी सामने बघायची इच्छा होत नाही. :(

क्रिकेट हा खेळ, त्यातले खेळाडू आणि खाचाखोचा कळणारे आणि एवढं रसाळपणारे लिहिणारे लेखक आणि हिरीरीने चर्चा करणारे पब्लिक खरोखर महान आहे.
असे लेखन वारंवार झाले तर आमच्यासारख्या करंट्यांनाही हा खेळ, खेळाडू आणि त्यातल्या घडामोडींबद्दल गम्य निर्माण होईल.. होतेच आहे.
सुंदर लेखनाबद्दल धन्यवाद.

"त्याच्या डोळ्यात विखार होता आणि शब्दात फुत्कार. तलवारीच्या पात्याप्रमाणे सटासट जीभ चालवायला आणि जमेल त्यावेळेस एखाद्याला अनुल्लेखाने मारायला, दोन्हीलाही त्याचा कधीच विरोध नव्हता"

फार सुरेख आढावा,

मृत्युन्जय's picture

8 Jul 2012 - 10:31 pm | मृत्युन्जय

आज आमच्या लाडक्या गांगुलीचा वाढदिवस म्हणुन हा धागा वर काढतो आहे.

दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझाच धागा वर आणतो आहे त्याबद्दल क्षमस्व.

मृत्युन्जय's picture

3 Jan 2013 - 1:50 pm | मृत्युन्जय

हा धागा परत कोणीतरी दृष्य करेल काय? कॉपी पेस्ट करायचा आहे. आणि मलाच दिसत नाही आहे :(

प्रचेतस's picture

3 Jan 2013 - 2:04 pm | प्रचेतस

केला आहे.

सन्दीप's picture

3 Jan 2013 - 2:22 pm | सन्दीप

अतिशय सुंदर !

चावटमेला's picture

4 Jan 2013 - 5:35 pm | चावटमेला

सुंदर लेख. यापूर्वी कसा काय मिस झाला माझ्याकडून काय माहीत. दादा जेव्हा लेफ्ट आर्म स्पिनर ला पुढे येवून लाँग ऑन किंवा लाँग ऑफ वरुन सिक्सर मारायचा ना तेव्हा वा,शब्द सुचत नाहीत वर्णन करायला. २००० सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतली निकी बोएची धुलाई आठवा. दादा केव्हाच रिटायर झाला, सरल्या वर्षात तर द्रविड, लक्ष्मण आणि खुद्द सचिन सारख्या दिग्गजांनीसुद्धा निवृत्तीची घोषणा केली. आता निदान माझ्यासाठी आणि माझ्या पिढीतल्या बर्‍याच जणांसाठी क्रिकेट पाहण्याचं कारण उरलंच नाही :(

सुचिकांत's picture

8 Jul 2016 - 1:42 pm | सुचिकांत

आज गांगुलीचा वाढदिवस म्हणून त्याच्यावर लिहिलेले लेख शोधत असताना हा लेख हाती लागला. मस्तच लिहिलं आहे.

कपिलमुनी's picture

30 Dec 2016 - 4:52 pm | कपिलमुनी

आजकाल क्रिकेटच्या लेखांची मेजवानी असताना 'दादा'ची आठवण आली म्हणून लेख वर काढल

रातराणी's picture

31 Dec 2016 - 2:48 pm | रातराणी

मस्त लेख ! मजा आली वाचताना!