एक दहीहंडी उंच टांगलेली असते. सध्याच्या काळात ही मलई हंडी म्हणूनही ओळखली जायला हरकत नाही. साध्या दह्यासाठी कोण एवढा खटाटोप करतो? ही हंडी फोडली तर खूप काही मिळतं. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. हे अनेकांनी एकमेकांच्या `सहकारा'ने करण्याचे काम आहे. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदापासून ते पंतप्रधान-राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक हंड्या या देशात लटकत आहेत आणि अनेक गोविंदा टोप्या पडेपर्यंत मान उंचावून या हंड्यांकडे आशेने पहात आहेत. एखादी हंडी फोडायला खूप मोठा गट लागतो. (आणि गट्स ही लागतात.) गट जितका मोठा तितकी त्यांची अधिक उंचीवरची हंडी फोडण्याची कुवत असते. दिल्ली हंडीवर हे नजर ठेवू शकतात. लहानसहान गट हे कमी उंचीवरच्या म्हणजे गावपातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळीवरच्या हंड्या फोडू शकतात. त्याशिवाय जिल्हा बँक, साखर कारखाने, डेअर्या अशा लहानमोठ्या हंड्या असतातच.
सर्वात खाली जो थर असतो, तो तळातला थर असतो. हा बहुतेक गाळातच रुतलेला असतो. त्यावर मग आणखी एक थर. त्यावर आणखी थर. हे सगळे थर घट्ट उभे राहून भक्कम मनोरा झाला की गोविंदा वर चढू शकतो. गोविंदा वर जाऊन हंडी फोडतो. तो वरच्यावर काहीतरी थोडे मटकावतो. मग हंडी वाटून घेतली जाते. हंडी फोडताना मनोर्यावर थोडा शिडकावा होतोच. ते समाधान ही वेगळेच.
खालच्या थरांना कधीतरी थोडे वरच्या थरात जावे, आपणही गोविंदा व्हावे, हंडी फोडण्याचा मान आपल्याला मिळावा असे वाटते. पण मूळ गोविंदाला ते मान्य नसते. मग हंडीच्या आधी गटच फुटतो. दोन गट आणि दोन गोविंदा तयार होतात. मग हंडी फोडण्यासाठी इर्षा चालू होते. पाणी मारायला अनेक जण तयारच असतात. अगदी वरच्या थरातल्या एखाद्या कार्यकर्त्याला पुढच्या दहीहंडीच्यावेळी आपण गोविंदा व्हावेसे वाटते. पण मूळ गोविंदा आपल्या मुलाला (किंवा मुलीलाही. हल्ली गोविंदांच्या जोडीने गोपिकाही मस्त हंड्या फोडतात.) पुढचा गोविंदा म्हणून दह्याचा अभिषेक करतो. मग पुन्हा नवा गट, नवा गोविंदा. हंडी लटकलेलीच. खालच्या थरांना आता हे पक्कं माहित झालंय की आपण गोविंदा होऊ शकत नाही. गोविंदाचा मुलगाच गोविंदा होणार. आणि आपला मुलगा आपल्या थरातील आपली जागा घेणार. पण त्यांना हे ही माहित आहे की गोविंदाला आपण पाडू शकतो. तो वर चढल्यावर पाडू शकतो, वर चढतांना पाडू शकतो. हंडीपर्यंत त्यानं पोचायचं की नाही हे आपण ठरवू शकतो. मग मोठी हंडी तू खा, पण बदल्यात आम्हाला छोट्या हंड्या फोडू दे अशी वाटणी होते. सारे हिशोब जमले तर मनोरे छान जमतात. हंड्या फुटत राहतात. नाही जमले हिशोब तर मनोरे कोसळतात. हंड्या लटकत राहतात. या देशातल्या काही हुषार गोविंदानी खालून वर चढण्याचा त्रासच घेतला नाही. त्यांनी खूप हाय-फाय तंत्रज्ञान वापरले. ते सरळ विमानातून आले आणि वरच्यावर हंडी फोडून लुटून नेली. तुम्ही बसा पाणी मारत.
हल्ली हल्ली तर लोकांना मानवी मनोरे रचणे, त्यासाठी कष्ट करणे, सराव करणे, मेहनत करणे ही दगदगसुद्धा नकोशी वाटू लागली आहे. हॉटेलात जसे व्हेज हंडी, चिकन हंडी वगैरे पदार्थ टेबलावर आयते मिळतात तशी दहीहंडीही आयती, बिनकष्टाची मिळावी असे वाटू लागले आहे. त्या सिनेमातल्या गोविंदाला नाही आरामात आयती हंडी मिळाली? त्यामुळे हल्ली जो तो कष्ट करणारा गोविंदा व्हायच्या ऐवजी सिनेमातला गोविंदा होऊ बघतोय. गोविंदा ऽऽऽ गोविंदा...!
-बाजीराव
(दै. तरुण भारत, बेळगाव मध्ये १७.८.२००६ रोजी पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
23 Aug 2008 - 8:15 pm | चतुरंग
वेगळ्या दहीहंडीच्या काल्याचा शिडकावा छान झाला! :)
चतुरंग
23 Aug 2008 - 11:06 pm | चंबा मुतनाळ
छान विवेचन केले आहे. दहीहंडीचे रुपक अगदि फिट्ट बसले आहे राजकारण्यांना