एका तलवारबाजाची कहाणी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
11 Apr 2012 - 2:55 pm

पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता. दुर्योधनाला सोडुन तो जाणार तरी कुठे? आणि गेलाच तर भीमाच्या तावडीतुन त्याला वाचवणार कोण?

भीम म्हटले की दुर्योधनाला राहुन राहुन त्याची १०० कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा आठवायची. तो स्वतःशीच विचार करायचा "माथेफिरुच आहे म्हणा तो भीम तसा. जेवढा खातो त्याचा दहावा भाग जरी अक्कल वापरली तरी पांडवांचे बरेच प्रश्न सुटतील. पण हे ही खरे म्हणा की आज ना उद्या पांडव जर समोर उभे टाकले तर ते त्या मस्तवाल भीमाच्या बळावरच उभे टाकणार. अन्यथा अर्जुनाचा प्रतिकार करण्यासाठी एकटा कर्ण पुरेसा आहे. पण भीमाचे तसे नाही. खुनशी आहे आणी अविचारी आहे. प्रतिज्ञा केल्याप्रमाणे माझी मांडी फोडायला आणि दु:शासनाचे रक्त प्यायला कमी करणार नाही तो राक्षस" हे आठवुन दुर्योधन अजुन जोमाने गदेचा अभ्यास करायचा. त्याने भीमाचा पुतळाच बनवुन घेतला होता ना. त्याच्यावर तो रोज गदेचे घाव घालुन अंगातली रग जिरवायचा. पण प्रश्न जेव्हा युद्धाचा येइल तेव्हा प्रथमदर्शनी दुर्योधनाला अंगावर घ्यायला भीमदेखील वाटतो तितका मुर्ख नाही हे तो जाणुन होता. अश्यावेळेस त्याला त्याच्या ९९ भावांची काळजी वाटायची. दुर्योधन समोर नसताना भीम गदेने एकेकाचा चेंदामेंदा करेल हे दुर्योधन जाणुन होता आणि त्याच्या आणि भीमाच्या या वैरात भीम कदाचित त्याच्या पोरांचाही घास घ्यायला कमी करणार नाही हे ही तो जाणुन होता.

अज्ञातवासाचे वर्ष सुरु झाले तसे तर तो अजुनच काळजीत पडला. गुप्तहेरांवरचा त्याचा विश्वास जणु उडुन गेला. वेष बदलुन तो स्वतःच आडबाजुच्या गावात जाउ लागला. असाच एका उत्सवात जत्रा भरलेली असताना त्याला तलवारीचे आणि पट्ट्याचे खेळ करणारा चक्रधर दिसला. पट्ठ्या निष्णात तलवारबाज होता. हवेत उडवलेल्या फणसाचे चक्रधराने निमिषार्धात १६ तुकडे केलेले बघुन तर तो स्तिमित झाला. फणस हवेत उडाला आणि चक्रधराने अश्या काही कौशल्याने तलवार फिरवली की एरवी जो फणस कापण्यासाठी नितांत परिश्रम घ्यावे लागतात तो १६ तुकडे होउन जमिनीवर पडला. दुर्योधनाने ओळखले हाच तो वीर जो भीमरुपी चिंतेवरचा रामबाण उपाय आहे. त्याने मोठ्या मानाने चक्रधराला हस्तिनापुरच्या चतुरंगी सेनेत मानाचे स्थान दिले. अर्थात त्याच्या अंगचे गुण मात्र त्याने लपवुन ठेवले. चक्रधर एवढा पट्टीचा तलवार बाज आहे हे तो वगळता कोणालाही माहिती नव्हते अगदी शकुनीमामाला आणि कर्णाला देखील. हा त्याने हे गुपित लक्ष्मण आणि दौशासनीला मात्र सांगितले. त्या दोघांनी चक्रधराकडुन तलवारबाजी शिकुन घ्यावी असे मात्र त्याला मनापासुन वाटत होते.

यथावकाश दुर्योधनाच्या मनातली भिती खरी ठरली पांडवांनी कपट केलेच. त्याने मनात विचार केला "मागच्यावेळेस १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात त्यांना पाठवले तेव्हा त्यांचा सल्लागार तो कपटी कृष्ण दूर बसला होता यावेळेस मात्र त्याने डाव साधला. विराटनगरीत अर्जुनाला ओळखलेले असतानाही त्याने यावेळेस पांडवांना बरोबर पढवले होते. त्यांनी उलटा कावा केला की म्हणे अज्ञातवास खुप आधीच संपला होता. वा रे वा म्हणे आधी संपला होता. आधीच संपला असता तर हे लबाड लोक आधीच नसते का प्रकट झाले? आम्ही ओळखले म्हणुन आता अजुन एक वनवास आणि अज्ञातवासाचे चक्र चुकवण्यासाठी लबाडी करताहेत झाले. पांडवांच्या वतीने कृष्णाने ५ गावांचे दान मागितले. त्यातली ४ गावे तर अशी की व्युहात्मक दृष्ट्या कौरवांची कौंडीच करणार आणि वर हा मखलाशी करतो आहे की पाचवे गाव म्हणे तुम्ही द्याल ते आम्हाला मान्य आहे. आता ही ४ गावे मागितल्यावर काय मग पाचवे गाव म्हणुन हस्तिनापुरपण देउ काय? वा रे वा? सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन नाही देणार हे ठणकावुन सांगितले हे बरेच झाले."

कृष्ण परतल्यावर मात्र दुर्योधनाची घाई सुरु झाली. युद्धाचा बार उडणारच होता. अर्जुनाची त्याला भिती नव्हतीच कर्ण सक्षम होता. इतर सैन्यासाठी भीष्म द्रोण पुरेसे होते. भीमाला स्वतःच सामोरे जायचे त्याने ठरवले. या सगळ्या धामधूमीत त्याने चक्रधराला मातर तलवारीचा कसून सराव करायला सांगितले. युद्धाचा पहिला दिवस उजाडला आणि मावळला देखील. युद्धात पांडवांच्या पहिल्या सेनापतीची स्वेताची आहुती पडली याव्यतिरिक्ता फारसे काही घडले नाही. भीष्मांनी आपले काम चोख बजावले. पहिल्याच दिवशी शत्रुचा सेनापती मारला. अपेक्षेप्रमाणे पांडवांनी दृष्ट्यद्युम्नाकडे कमान सोपवली. पण दुर्योधनाला आता चिंता नव्हती. त्याने चक्रधराला खुषाल हस्तिनापुरी धाडुन दिले. ३-४ दिवसात युद्ध असेही संपेलच. त्याचे गुप्त हत्यार गुप्तच राहिलेले बरे. परंतु नंतर मात्र फासे उलटे पडत गेले. रणांगण होते ते. तिथे शकुनीने फासे टाकले आणि दान आपल्या बाजुने पडले असे होणार नव्हते. इथे नियतीच फासे टाकत होती. १५ दिवस सरले आणि भीष्म द्रोण दोघेही धारातीर्थी पडले. कर्णाने अपरंपार पराक्रम गाजवला अगदी भीमालादेखील निरस्त्र करुन अगदी अपमानित करुन हरवले. पण त्या भीम - कर्ण युद्धात ३१ कौरवांची आहुती पडली त्याचे काय? आणि एवढे करुन भीमाला कर्णाने जीवदान दिले? अजुनच मोकाट सुटलेला तो भीम रणांगणावर वेचुन वेचुन कौरवांना मारत सुटला. तसा दुर्योधन खडबडुन जागा झाला. आता स्वतःहुन भीमाला सामोरे जाणे हे इष्ट हे त्याला जाणवले पण तो तरी काय करणार त्याचा प्रत्येक सेनापती सर्वप्रथम त्याच्या रक्षणावर भर द्यायचा आणि त्याला शक्यतो भीमापासून दूर ठेवायचा. दुर्योधनाने त्यामुळे तातडीने चक्रधराला पाचारण केले.

चक्रधर आला तसा त्याला हायसे वाटले. आपल्या उरल्यासुरल्या भावंडांच्या रक्षणार्थ प्रमुख म्हणुन त्याने चक्रधराची नेमणूक केली आणि तो निश्चिंत झाला. त्याने चक्रधराला आज्ञाच दिली होती की भर रणांगणात जसा भीम दिसेल तसे त्याच्या अंगावर धाउन जायचे आणि तलवारीने भीमाचे शीर कापून आणुन द्यायचे. दुर्योधन त्याला म्हणाला " चक्रधरा जत्रेत जसा फणस कापला होता तसेच आज भीमाचे शीर घेउन ये. तुला जन्मभर कुठल्याही गोष्टीची ददात भासणार नाही याचा काळजी मी घेइन हे माझे वचन. " दुर्योधनाला वंदन करुन चक्रधर कौरवांच्या रक्षणार्थ बाहेर पडला. भीम सहजी नजरेस पडावा म्हणुन त्याने एका हत्तीची निवड केली. थोड्याच वेळात भीमाच्या आक्रमणाची वर्दी मिळाली तसा तो हत्तीवरुन खाली उतरला आणि भीमाची प्रतिक्षा करु लागला. कौरव लढत असलेल्या बाजूला भीम येणारच हे त्याला माहिती होते. आणि थोड्याच वेळात कुरुसैन्यातल्या हत्तींचे चित्कार त्याच्या कानी येउ लागले. थोड्या अंतरावरील रण धुमाळीवरुन जाणवले की भीम चालुन येत आहे. हत्ती आणि घोड्यांची कलेवरे हवेत उडत होती, डोकी फुटलेल्या यौद्द्यांचे विव्हळणे कानी पडत होते आख्खेच्या आख्खे रथ इतस्तत: उसळत होते आणि तेवढ्यात त्याला दिसले की एक धिप्पाड यौद्धा मैरेयकाचे घडेच्या घडे पचवुन लाल झालेल्या डोळ्यांनी प्रचंड आरोळ्या ठोकत, युद्धाचा मद अंगात भिनवुन प्रचंड रणकंदन माजवत त्याच्याच दिशेने येतो आहे. तो भीमच होता. वाटेत येणार्‍या प्रत्येक यौद्ध्याला, मग तो पांडवांच्या बाजूने लढाणारा असो की कौरवांकडुन लढणारा, गदेच्या एका फटकार्‍यासरशी हवेत उसळवुन देउन प्रचंड वेगाने भीम पुढे सरकत होता. त्याचा तो आवेश बघुनच चक्रधर स्तब्ध झाला, थिजल्यागत जागीच उभा राहिला. तलवार उगारण्याचेही सामर्थ्य त्याच्यात उरले नाही आणि पापणी लवायच्या आत त्याचे कलेवर उधळुन देउन भीम पुढे निघुनही गेला होता.

त्या रणभूमीवर जत्रेतले कसब असुन चालत नाही तर रणातला आवेश महत्वाचा असतो, केवळ लालित्य असुन चालत नाही तर शौर्य असावे लागते आणि फणस कापण्याचे कौशल्य असुन चालत नाही तर डोकी उडवण्याचे धैर्य लागते, हातात शस्त्र असुन उपयोग नसतो तर डोक्यात रणाचा मद चढलेला असणे आणि डोळ्यात अंगार आणि अंगात जोश आणि विखार असणेच अखेर उपयोगी पडते हे त्याला कळण्यापुर्वीच बिचारा चक्रधर त्या युद्धभूमीपासुन फार दूर निघुन गेला होता. त्याच्यापाठोपाठ भीमाने दुर्योधनाचे दु:शासनादि १२ इतर भाऊदेखील पाठवुन दिले आणि दुर्योधन मात्र मोठ्या आशेने चक्रधर भीमाचे शीर घेउन येण्याची प्रतिक्षा करत राहिला. सुर्य अस्ताला गेला. भीम जिवंतच होता, दुर्योधन त्याच्या १२ भावांच्या कलेवरांवर अश्रु ढाळत होता आणि एक कसबी कलाकार रणावेश आणि कला यातील फरक न ओळखु शकल्याने कायमचा विस्मृतीत टाकला गेला होता.

कथासंस्कृतीधर्मइतिहाससाहित्यिकलेखशिफारस

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 2:55 pm | मृत्युन्जय

ही कथा मी फार पुर्वी कुठेतरी वाचली होती. कुठे ते आठवत नाही. कोणी लिहिली ते ही आठवत नाही. कथा माझी नाही आणि मिपाच्या नियमात बसत नसेल तर ती कृपया उडवुन टाकावी. सध्या महाभारताचा ज्वर चढला असल्याने ही कथा टंकली. यातील शब्द माझे आहेत, तपशीलही माझे आहेत पण कथाबीज (किंवा वाटल्यास पुर्ण कथाच) माझी नाही. मला आवडली होती आणि इतरांना आवडेल अश्या शुद्ध हेतुन ती इथे टाकतो आहे. हे चौर्यकर्म नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. मूळ लेखकाची परवानगी घेतलेली नाही कारण मूळात ही कोणी लिहिली आहे हेच आठवत नाही. कथा आवडल्यास श्रेय मूळ लेखकाचे, न आवडल्यास माझ्या भाषा आणि लेखन दारिद्र्याला दोष देउ शकता. :)

स्वाती दिनेश's picture

11 Apr 2012 - 3:06 pm | स्वाती दिनेश

कथा आवडली.
महाभारतातल्या अप्रसिध्द/ कमी प्रसिध्द पात्रांविषयीच्या अशा काही कथा अजून येऊ देत,
स्वाती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2012 - 3:30 pm | निनाद मुक्काम प...

अनु मोदन

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 3:13 pm | प्रचेतस

कथा आवडली.

कथा सुंदरच लिहिली आहे.
उलट इथे दिल्याबद्दल आभार.
मी तर म्हणेन कौरव-पांडवांच्या युद्धावर अवधान ठेऊन युद्ध चालले त्या पूर्ण घटनाक्रमावर एक लेखमाला लिहा. हा आग्रह आहे. कदाचित पानीपतच्या तोडीचंही काही लिहून होईल.

मन१'s picture

11 Apr 2012 - 6:28 pm | मन१

मालिकाच होउन जाउद्यात.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2012 - 6:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्रचंड अनुमोदन!

चित्रगुप्त's picture

11 Apr 2012 - 3:21 pm | चित्रगुप्त

लेखन आवडले.
स्वाति दिनेश यांच्या सूचनेशी सहमत. अजून येउ द्या अश्या कथा.

स्मिता.'s picture

11 Apr 2012 - 3:30 pm | स्मिता.

आधी कधीही ऐकिवात नसलेली वेगळीच कथा आवडली.

एवढ्या मोठ्या युद्धात इतिहास (महाभारत इतिहास नसले तर पहिले/दुसरे महायुद्ध लक्षात घ्यावे) लिहिला जातो तो फक्त राजपुरुषांचा आणि त्यांचा भोवतालच्या घटनांचा. पण एकेका सामान्य माणसावर त्याचे काय पडसाद उमटत असतील हे कधीच प्रकाशात येत नाही. ही कथा वाचून महाभारतात हस्तिनापूरातल्या सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून काही असावे का हा प्रश्न मनात चमकून गेला.

Maharani's picture

11 Apr 2012 - 3:32 pm | Maharani

खुपच सुंदर कथा!!आणखी लिहा!!

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 3:33 pm | प्यारे१

दुर्योधन एवढा 'माठ' होता?

पियुशा's picture

11 Apr 2012 - 3:38 pm | पियुशा

व्वा कथा आवडली :)

५० फक्त's picture

11 Apr 2012 - 4:18 pm | ५० फक्त

कथा छान, अर्थात संशयी बुद्धीमुळे प्यारेंना पडला तो प्रश्न पडलाच आहे. असो.

कोणाकडे ती पाच गावे अन हस्तिनापुर असा नकाशा आहे का ? की जी गावे दिल्याने हस्तिनापुरची कोंडी होउन जाईल अशी भिती प्रत्यक्ष दुर्योधनाला वाटली होती.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 4:39 pm | मृत्युन्जय

नकाशा नाही माझ्याकडे.

एकचक्रा, वारणावत, इंद्रप्रस्थ, अ़जुन एक गाव (नाव आठवत नाही) आणि कौरवांना योग्य वाटेल ते कुठलेही अशी ५ गावे त्यांना हवी होती. यावरची एक चर्चा फार पुर्वी वाचली होती त्या अनुषंगाने लिहितो आहे. संदर्भ सापडले किंवा चर्चा सापडली तर देतोच. :)

वृकस्थली आणि माकंदी अशी ती पाच गावे.
एकचक्रा कदाचित नसावे.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 4:48 pm | मृत्युन्जय

बरोबर. कुशस्थला, वृकस्थला, माकंदी, वारणावत आणि अजुन एक कौरवांना आवडेल ते. इंद्रप्रस्थ देखील त्यात नाही

कुशस्थल पण नाही. ते अविस्थल.
उरलेले एक दुर्योधनला वाटेल ते.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 4:54 pm | मृत्युन्जय

Give us even Kusasthala, Vrikasthala, Makandi, Varanavata, and for the fifth any other that thou likest. Even this will end the quarrel. O Suyodhana, give unto thy five brothers at least five villages,

नाही हो मालक. कुशस्थलच. यावेळेस खात्री करुन लिहिले आहे :)

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 4:57 pm | प्रचेतस

भांडारकर प्रतीत अविस्थल असाच उल्लेख आहे. :)

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 4:57 pm | प्रचेतस

भांडारकर प्रतीत अविस्थल असाच उल्लेख आहे. :)

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 4:57 pm | प्रचेतस

भांडारकर प्रतीत अविस्थल असाच उल्लेख आहे. :)

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 5:03 pm | मृत्युन्जय

हे बघ ३ वेळा सांगितलेस म्हणुन मी तुझे म्हणणे मान्य करेन असे अजिबात नाही ;)

बादवे तुझ्याकडे ती बोरीची प्रत असेल तर दे ना.

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 5:28 pm | प्रचेतस

अरे मोबाईलवरून टाईप करत असल्याने चुकून तीनदा टंकले गेले.

ती भांडारकरी प्रत संस्कृतात आहे. माझ्या ओळखीच्या एकाकडे आहे. त्याला विचारून बघतो. (भांडारकर प्रतीलाच बोरीची प्रत म्हणतात काय?)

माझ्याकडे विदर्भ मराठवाडा बुक कंपनीचे खंड आहेत. त्यात तपासून सांगतो नंतर.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2012 - 5:31 pm | मृत्युन्जय

होय

Bhandarkar Oriental Research Institute = BORI

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 5:34 pm | प्रचेतस

धन्स.

तुमचे एकमत झाले की सांगा.

प्रचेतस's picture

12 Apr 2012 - 12:34 am | प्रचेतस

मूळ श्लोक मिळाला रे. :)

अविस्थलंवृकस्थलं माकन्दीं वारणावतम् |
अवसानं भवत्वत्र किंचिदेकं च पंचमम् ||

अमोल केळकर's picture

11 Apr 2012 - 4:28 pm | अमोल केळकर

मस्त कथा. यापुर्वी चक्रधराबद्दल माहिती नव्हती

अमोल केळकर

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 4:34 pm | प्रचेतस

माहिती नसणारच .
काल्पनिक कथा आहे हो ही.

अमोल केळकर's picture

11 Apr 2012 - 5:49 pm | अमोल केळकर

काय म्हणता ?

किसन शिंदे's picture

11 Apr 2012 - 4:31 pm | किसन शिंदे

कथा आवडली.

महाभारतातील अशा कथा आणखी येऊ द्यात.

अज्ञात कथा सांगितल्याबद्दल आभार. कथा आवडली आहे हे सांगणे नलगे.

- पिंगू

प्राध्यापक's picture

11 Apr 2012 - 4:42 pm | प्राध्यापक

एखादी कथा चांगली होण्यासाठी कथाबीज तर चांगले असावेच लागते ,मात्र त्याच बरोबर कथेला अलंक्रुत करणारे शब्दही तीतकेच महत्वाचे असतात,आणी या कथेत ते जाणवतात.

मुळात महाभारतातील कथेतच एवढे नाट्य आहे ,की कोणत्याही अंगाने त्याचा विचार केला तरी ते नाट्य दिसते.

कथेचा शेवटचा परीच्छेद आवड्ला.

टिवटिव's picture

11 Apr 2012 - 5:16 pm | टिवटिव

"एखादी कथा चांगली होण्यासाठी कथाबीज तर चांगले असावेच लागते ,मात्र त्याच बरोबर कथेला अलंक्रुत करणारे शब्दही तीतकेच महत्वाचे असतात,आणी या कथेत ते जाणवतात." अनुमोदन

कपिलमुनी's picture

11 Apr 2012 - 5:03 pm | कपिलमुनी

आवडली

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2012 - 5:43 pm | टवाळ कार्टा

त्याने धनुश्यबाण का नाही वापरला?

चावटमेला's picture

12 Apr 2012 - 11:44 am | चावटमेला

त्याने धनुश्यबाण का नाही वापरला?

त्यो त्याचा प्रायमरी स्किल सेट नव्हता ;)

बाकी, उत्कृष्ट लेख. बादवे, एकलव्याचे पुढे काय झाले यावर एक लेख येवूद्याच..

इष्टुर फाकडा's picture

11 Apr 2012 - 6:08 pm | इष्टुर फाकडा

भीमाची एन्ट्री आणि एक्झिट तर लहीच लहीच भारी.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2012 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

कथा एकदम आवडेश.
खरी का काल्पनीक हा वाद न धरता कथेचे तात्पर्य समजून घेणे जास्ती महत्वाचे.

शक्य झाल्यास कौरवांकडून कुरुक्षेत्रात लढलेल्या एकमेव भिल्ल राणीची कथा देता येईल का ? मी खूप शोधतो आहे त्या कथेला. तसेच एकलव्याची कथा, त्याचे जरासंधासाठीचे महत्व ह्यावरती पण लिहा जरा.

खरी का काल्पनीक हा वाद न धरता कथेचे तात्पर्य समजून घेणे जास्ती महत्वाचे.

कथा काल्पनिक आहे असेच वाटते. पण ती का लिहिली गेली असावी हे शेवटच्या परिच्छेदातून कळते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, या कथेचे तात्पर्य जास्त महत्वाचे आहे.

मृत्युंजय, झक्कास फुलवलं आहेस कथाबीज. मस्तच !!!

प्रचेतस's picture

12 Apr 2012 - 12:06 am | प्रचेतस

शक्य झाल्यास कौरवांकडून कुरुक्षेत्रात लढलेल्या एकमेव भिल्ल राणीची कथा देता येईल का

युद्धात स्त्रीया लढल्या नाहीत. अपवाद क्लिब समजल्या गेलेल्या शिखंडीचा पण तोही नंतर पुरुष झाला. मागच्या जन्मी तो अंबेच्या रूपात होता. द्रुपदाच्या पोटी शिखंडीनी या स्त्रीरूपात जन्म घेऊन नंतर स्थूणाकर्ण यक्षाला त्याने स्त्रीत्व देऊन पुरुषत्व घेतले.
भिल्ल राणीची कथाही रूपकात्मकच आहे काय?

एकलव्याचा महाभारतीय युद्धाच्या आधीच कृष्णाने वध केला असे वाचल्याचे आठवतेय.

>>>एकलव्याचा महाभारतीय युद्धाच्या आधीच कृष्णाने वध केला

अधिक माहिती सांग ना... मला इतकेच माहिती आहे की अंगठा मागून घेतल्यानंतर त्याने तर्जनी आणि मध्यमा (मधले बोट) याने धनुष्यबाण चालवायला सुरूवात केली.

कांही भिल्ल जमाती (एकलव्यामुळे) अंगठ्याशिवाय धनुष्यबाण वापरतात.

कितपत खरे आहे..?

मृत्युन्जय's picture

12 Apr 2012 - 12:29 am | मृत्युन्जय

भिल्ल राणीची कथा मला वाटते अश्वमेधात आहे. महाभारताच्या युद्धात नाही. शोधुन सांगतो तुला २- ३ दिवसात

मन१'s picture

11 Apr 2012 - 6:28 pm | मन१

पण काल्पनिक असण्याची खात्री वाटते आहे. महाभारत केवळ platform म्हणून वापरलय, शेवटचा संदेश द्यायला.
हे स्पष्टपणे सांगावं लागेलसं वाटतं.

भीम गदायुद्धात दुर्योधनापेक्षा कमी दर्जाचा होता. त्याची सगळी दांडगाई ही त्याच्या शारीरिक बळावर आणि धिप्पाडपणावर होती. दोघेही एकाच गुरुकडे म्हणजे बलरामांकडे उच्च पातळीचे गदायुद्ध शिकले आणि त्यात नैपुण्य संपादन केलेला दुर्योधन हा बलरामांचा लाडका शिष्य होता. त्यांची अखेरची लढाईही गुरु बलरामांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी भीमाला दुर्योधन आटपेनासा झाल्यावर श्रीकृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार करण्याचा इशारा केला. गदायुद्धात कमरेच्या खाली प्रहार करायचा नसतो. त्यामुळे बलराम प्रचंड संतापला आणि त्याचे नेहमी खांद्यावर असलेले नांगर हे शस्त्र उगारुन भीमावर चालून गेला.

(सुसंस्कृत भाषेत जास्त वेळ बोलणे जड पडत असल्याने पुढील वर्णन लोकभाषेत)

...मंग चिडलेला बळीराम भीम्याला म्हनला, 'भाड्या! येवड्यासाटीच शिकिवलं का रं तुला? नियम मोडून ख्येळतोस व्हय रं नामर्दा? दम ह्यो नांगरच घालतु तुज्या टकुर्‍यात.' तसा भीम घाबरला. बळीभाऊचा नांगर पडला असता तर भीम्या काय जित्ता वाचत नव्हता. मंग त्यानं आधारासाटी किसनदेवाकडं बघिटलं. किसनद्येवाला पयल्यापासून पांडवांचा लय पुळका. तवा त्यो फुडं झाला आन् भावाची समजूत काडली,का 'दादा! जौं दे. ह्ये कौरव पांडवांच्यातलं भांडान हाय. आपन यादव हावोत. आपन कशाला पडायचं लफड्यात? माज्याकडं बगा. येवडं युद्ध झालं, पर म्या लडलो का? रथ चालविला, उपदेश केला, शंख वाजिवला पन हत्यार न्हाय उगारलं. तुमी तरी डोक्याला कशाला हेडेक करुन घेताव? मरु दे दोगंबी. तुमी आपलं तुमची घोषयात्रा कम्प्लिट करायचं बगा.' आसं काईबाई सांगून भोळ्याभाबड्या बळीभाऊला साफ गुंडाळलं किसनद्येवानं.

चिगो's picture

11 Apr 2012 - 10:36 pm | चिगो

प्रभू, धन्य आहात ! लैच भारी प्रतिसाद..

मृत्युंजय, कथा आणि संदेश दोन्ही आवडलेत.. कुणाची का असेना, तुम्ही सुंदर फुलवली आहे.

स्पंदना's picture

12 Apr 2012 - 6:43 am | स्पंदना

ह्येला म्हणत्यात बाजार उठवला

तुमास्नी चांगला गुढग्यापासुन दंडवत. आसच लिव्हीत र्‍हावा.

रमताराम's picture

12 Apr 2012 - 12:17 pm | रमताराम

ह्ये कौरव पांडवांच्यातलं भांडान हाय. आपन यादव हावोत. आपन कशाला पडायचं लफड्यात?
ह्ये श्यानपन जवा 'एकतर मी मिलंन नायतर जल्ला आमची यादव शेना' आसं सांगून यादवशेनेला लडायला लोटलं व्हतं तवा का इसरला व्हता कोन जानं. ह्ये मजी आज तळ्यात उद्या मळ्यात आसं जाह्लं न्हवं का.

कौशी's picture

11 Apr 2012 - 9:30 pm | कौशी

अजुन येऊ द्यात अशा कथा...

पैसा's picture

11 Apr 2012 - 9:41 pm | पैसा

महाभारताच्या चौकटीत खरी असू शकेल असं वाटणारी कथा आवडली. भीमाचं थोडक्या शब्दात आलेलं चित्रं छान जमलं आहे. तसाच 'औरंगजेबाची' आठवण करून देणारा संशयी दुर्योधन पण एक व्यक्तिचित्र म्हणून आवडला.

योगप्रभूची "मायमराठीतली" गोष्ट पण फर्मासच!

चाफा's picture

11 Apr 2012 - 10:46 pm | चाफा

कथा पुर्णपणे आवडली, आणि प्रामाणिकपणे ती स्व:तची नाही हे सांगितलंत तेही आवडलं. महाभारतातल्या कथा मग त्या काल्पनीक का असेनात असतील तर येऊ द्या :)

स्पंदना's picture

12 Apr 2012 - 6:45 am | स्पंदना

अतिशय आवडली कथा. अन ती काल्पनिक असुच शकत नाही, कारण १०० कौरव त्यांच्या शंभर कथा असणारच.

तुम्ही लिहित रहा मृत्युंजय .

प्रमोद्_पुणे's picture

12 Apr 2012 - 11:42 am | प्रमोद्_पुणे

कथा आवडली..छान आहे.

रमताराम's picture

12 Apr 2012 - 12:39 pm | रमताराम

'अंगणातला गुण परसात गुण असेलच असं म्हणता येत नाही' अशी एक म्हण आहे त्याची आठवण झाली. कथा ऐसपैस फुलवली असली तर बोधकथेचाच बाज आहे नि त्यातून येणारा बाळबोधपणा. निव्वळ फणसाचे तुकडे करणार्‍या या तलवारबाजाला एरवी कधीही कुठल्याही कसोटीवर घासून न पाहता दुर्योधन थेट शेवटच्या युद्धावर आणतो हे न पटण्याजोगे आहे. शिवाय भीमाशी लढायला एका तलवारबाजाची नियुक्ती तो करेल हे शक्यच दिसत नाही. भीमाची शरीरयष्टी पाहता त्याची तलवारीने हत्या करणे हा सर्वात अवघड मार्ग होता. लहानपणापासून भीमाची दांडगाई सहन केलेल्या दुर्योधानाला हे समजत नसेल असे मानणे भाबडेपणाचे आहे.

पांडव-कौरवांचे भांडण बाजूला ठेवले तरी दुर्योधन हा कुशल राज्यकर्ता होता. पांडव वनवासातून परत येईतो त्याने राज्याची घडी उत्तम बसवली होती. त्यामुळे पांडवप्रेमी कितीही पांडवांच्याबद्दल हस्तिनापूर नगरीतील नागरिकांच्या मनात असलेल्या तथाकथित सहानुभूती अथवा पक्षपाताबद्दल बोलले तरी प्रत्यक्ष संघर्षाची वेळ आली तेव्हा हस्तिनापूरचे नागरिक कुठेही पांडवांच्या बाजूने उभे राहिले नाहीत, दुर्योधनाबद्दल कोणताही असंतोष निर्माण झालेला दिसत नाही. तसेच सैन्यबल नि अन्य राजांकडून मिळालेला पाठिंबा पाहता त्याने अनेक अन्य राजांशी योग्य ते राजनैतिक संबंध प्रस्थापित केले असावेत असे समजण्यास वाव आहे. इथे 'भीष्म म्हणतात ते योग्य असेलच म्हणून ते कौरवांच्या बाजूला आले' हा तर्क हास्यास्पद तर आहेच, राजकारणाचे अथवा युद्धाचे निर्णय असे कुणाच्या शब्दाखातर होत नसतात. पण जर खरा मानला तर दुसर्‍या बाजूला असाच तर्क कृष्णाबाबत देता येतो. तो कदाचित अधिक विश्वासार्ह, कारण तेरा वर्षांच्या वनवासातून परतलेले पांडव 'आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड' या न्यायाने फारसे कोणत्याही राजांच्या संपर्कात नसावेत. त्यामुळे जी काही संपर्क यंत्रणा, राजनैतिक संबंध असतील ते कृष्णाचे होते. 'आपला तो बाब्या...' हे खरं असलं तरी 'दुसर्‍याचं ते कार्ट' असतंच असं काही नाही.

युद्धात पांडवांच्या पहिल्या सेनापतीची स्वेताची आहुती पडली याव्यतिरिक्ता फारसे काही घडले नाही. भीष्मांनी आपले काम चोख बजावले. पहिल्याच दिवशी शत्रुचा सेनापती मारला.
प्रामाणिकपणे सांगायचं तर ही बातमी मला नवीन आहे. अगदी पहिल्या दिवसापासून दृष्टद्युम्नच (की धृष्टद्युम्न?) पांडव-सेनापती होता असा आमचा समज आहे. याच कारणाने हे युद्ध म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या कुरु-पांचालांचे युद्ध (पांडव केवळ निमित्त) असाहि एक दृष्टिकोन आहे. शिवाय दृष्टद्युम्नाने पांडवसेनेची केलेली रचना, त्याचे डावपेच इ. बाबतची चर्चा युद्ध सुरू होण्यापूर्वीच आलेली आहे. किंबहुना कौरवांचे एकामागून एक सेनापती धराशायी होत असताना पांडवांचा पहिलाच सेनापती शेवटपर्यंत युद्धभूमीवर होता हे त्यांच्या यशाचे, युद्धकौशल्याचे आणखी एक मोजमाप मानले जाते.

मृत्युन्जय's picture

12 Apr 2012 - 12:59 pm | मृत्युन्जय

'अंगणातला गुण परसात गुण असेलच असं म्हणता येत नाही' अशी एक म्हण आहे त्याची आठवण झाली. कथा ऐसपैस फुलवली असली तर बोधकथेचाच बाज आहे नि त्यातून येणारा बाळबोधपणा. निव्वळ फणसाचे तुकडे करणार्‍या या तलवारबाजाला एरवी कधीही कुठल्याही कसोटीवर घासून न पाहता दुर्योधन थेट शेवटच्या युद्धावर आणतो हे न पटण्याजोगे आहे. शिवाय भीमाशी लढायला एका तलवारबाजाची नियुक्ती तो करेल हे शक्यच दिसत नाही. भीमाची शरीरयष्टी पाहता त्याची तलवारीने हत्या करणे हा सर्वात अवघड मार्ग होता. लहानपणापासून भीमाची दांडगाई सहन केलेल्या दुर्योधानाला हे समजत नसेल असे मानणे भाबडेपणाचे आहे.

:)

तसेच सैन्यबल नि अन्य राजांकडून मिळालेला पाठिंबा पाहता त्याने अनेक अन्य राजांशी योग्य ते राजनैतिक संबंध प्रस्थापित केले असावेत असे समजण्यास वाव आहे. इथे 'भीष्म म्हणतात ते योग्य असेलच म्हणून ते कौरवांच्या बाजूला आले' हा तर्क हास्यास्पद तर आहेच,

असे कथेत कुठे म्हटल्याचे सापडत नाही. की मी काही चुकीचे वाचतो / लिहितो आहे? तसा काही माझाही युक्तिवाद नाही :)

प्रामाणिकपणे सांगायचं तर ही बातमी मला नवीन आहे. अगदी पहिल्या दिवसापासून दृष्टद्युम्नच (की धृष्टद्युम्न?) पांडव-सेनापती होता असा आमचा समज आहे. याच कारणाने हे युद्ध म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या कुरु-पांचालांचे युद्ध (पांडव केवळ निमित्त) असाहि एक दृष्टिकोन आहे. शिवाय दृष्टद्युम्नाने पांडवसेनेची केलेली रचना, त्याचे डावपेच इ. बाबतची चर्चा युद्ध सुरू होण्यापूर्वीच आलेली आहे. किंबहुना कौरवांचे एकामागून एक सेनापती धराशायी होत असताना पांडवांचा पहिलाच सेनापती शेवटपर्यंत युद्धभूमीवर होता हे त्यांच्या यशाचे, युद्धकौशल्याचे आणखी एक मोजमाप मानले जाते.

पहिल्यांदा वाचले तेव्हा मलाही आश्चर्य वाटले होते. पण मी महाभारतातले संदर्भ नीट तपासले आणि मगच असे विधान केले. ज्या मूळ कथेवरुन मी ही कथा लिहिली आहे त्यात असे काही लिहिलेले नव्हते. संदर्भ खाली देत आहे:

Then taking up six other (arrows) adorned with gold, the mighty-armed Sweta cut off the standard-tops of his six
adversaries. And that chastiser of foes then, piercing their steeds and charioteers also, and covering those six warriors themselves with ceaseless shafts, proceeded towards the car of Salya. And beholding that generalissimo of the (Pandava) forces proceeding quickly towards Salya's car, a loud uproar of oh and alas arose in thy army, O Bharata.

generalissimo हे विशेषण कौरवांपैकी फक्त त्या त्या सेनापतीसाठी वापरले गेले आहे., पहिल्या दिवशीच्या युद्धात केवळ भीष्म आणि स्वेत याच दोघांना generalissimo असे म्हटले गेले आहे. नंतर सर्व ठिकाणी, म्हणजे स्वेत मेल्यावर दुसर्‍या दिवसापासुनच्या युद्धाच्या वर्णनात दृष्ट्यद्युम्नाला generalissimo असे म्हटले गेले आहे. हे generalissimo विशेषण नंतर स्वेतासाठी बर्‍याच वेळा आले आहे. मी केवळ एक परिच्छेद इथे दिला.

दुसर्‍या दिवसापासुन दॄष्ट्यद्युम्ना बद्दल हे विशेषण वापरले गेले आहे:

And Dhrishtaketu and the Rakshasa Ghatotkacha, both invincible in battle, proceeded against the car-division of thy sons. And that mighty car-warrior Dhrishtadyumna, that generalissimo (of the Pandava forces) of immeasurable soul, engaged in battle, O king, with Drona of fierce achievements.

विकिप्रमाणे Generalissimo and Generalissimus are military ranks of the highest degree.

thefreedictionary.com प्रमाणे Generalissimo म्हणजे The commander in chief of all the armed forces in certain countries

वरील दोन सायटी आणि अजुन एक दोन डिक्शनर्‍या ग्राह्य मानून आणि महाभारतातले ते वर्णन ग्राह्य मानून आणि त्या शब्दाचे युद्धाच्या वर्णनातले बाकीचे संदर्भ तपासूनच मग मी या निष्कर्षाप्रत पोचलो की स्वेत हाच पांडवांचा पहिला सेनापती होता.

चू.भू.द्या.घ्या.

अन्या दातार's picture

12 Apr 2012 - 1:33 pm | अन्या दातार

गीतेतील हा एक श्लोक बघा बर जरा.

पशैतां पाडूपुत्राणाम आचार्य महतीं चमूम|
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता||

या श्लोकातून तरी स्वेता हा पांडवांचा सेनापती होता असे दिसत नाही. उलट द्रुपदपुत्र (= दृष्टद्युम्न) हाच सेनापती असल्याचे सांगितले आहे. (खरेखोटे संजयालाच जाऊन विचारावे का? बाबारे नजरचूक वगैरे नाही ना झाली? कारण मिपाकर मृत्युंजय तर आम्हास वेगळेच सांगत आहेत)

मृत्युन्जय's picture

12 Apr 2012 - 1:53 pm | मृत्युन्जय

बाबा रे मी महाभारतातले दाखले दिले आहेत. आता याहुन जास्त काय करु शकतो? महाभारताप्रमाणे तरी स्वेत हाच पांडव सेनेचा पहिला सेनापती होता.

बादवे या श्लोकाचा शब्दशः अर्थ सांगतोस काय?

पशैतां पांडूपुत्राणाम आचार्य महतीं चमूम|
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता||

आचार्य, आपल्या बुद्दिमान शिष्याने-द्रुपदपुत्राने जिची व्युहरचना केली आहे अशी पांडवांची ही प्रचंड सेना पहा.
हा भगवदगीतेला तिसराच श्लोक आहे.

दृष्टद्युम्न हाच पांडवांचा पहिला आणि अखेरपर्यंतचा सेनापती होता.
श्वेताचा उल्लेख फक्त पहिल्या दिवसाच्या युद्धातच येतो त्याआधी महाभारतात कुठेही त्याचा उल्लेख नाहीये. नीळकंठी टीकेत श्वेताचे नाव 'शंख' असे दिले आहे. बर्‍यच संशोधकांच्या मते श्वेताचा भाग प्रक्षिप्त आहे. उत्तरगोग्रहणप्रसंगी हा श्वेत कुठे होता?

उद्योगपर्वातील अध्याय १५७ मधील काही भागः
द्रुपद, विराट, सात्यकी, धृष्टकेतू, शिखंडी, जरासंधपुत्र सहदेव आणि दृष्टद्युम्न या वीरांना युधिष्ठिराने सेनानायक म्हणून अभिषेक केला. द्रोणवधासाठी प्रदिप्त अग्नीतून उत्पन्न झालेल्या दृष्ट्द्युम्नालाच त्याने महासेनापती केले. त्या एकत्र जमलेल्या समस्त सेनापतींचा अधिपती म्हणून अर्जुनाची त्याने योजकता केली आणि कृष्ण सारथी झाला.

तू जी प्रत प्रमाण म्हणून वापरतोस(किसारी मोहन गांगुली) त्यातलेच हे काही दाखले बघ-

उद्योगपर्व-सैन्यनिर्याणउपपर्व:

यात पांडवांपक्षाचा सेनापती निवडतानाचे काही दाखले.

अर्जुनाचे सेनापतीविषयीचे मतः

After the two sons of Madri had thus expressed their individual opinions, Vasava‟s son, Savyasachin, who was equal to Vasava himself, said these words, „This celestial person of the hue of fire and endued with mighty arms, who sprang into life through the power of ascetic penances and the gratification of sages; who issued from the sacrificial fire-hole armed with bow and sword, accoutred in armour of steel, mounted on a car unto which were yoked excellent steeds of the best breed, and the clatter of whose car-wheels was as deep as the roar of mighty masses of clouds; this hero endued with that energy and strength and resembling the very lion in his frame of body and prowess, and possessed of leonine shoulders, arms, chest, and voice like the lion‟s roar; this hero of great effulgence;

this warrior of handsome brows, fine teeth, round cheeks, long arms, of stout make, excellent thighs, large expansive eyes, excellent legs, and strong frame; this prince who is incapable of being penetrated by weapons of any kind, and who looks like an elephant with rent temples; this Dhrishtadyumna, truthful in speech, and with passions under control, was born for the destruction of Drona. It is this Dhrishtadyumna, I think, that will be able to bear Bhishma‟s arrows which strike with the vehemence of the thunderbolt and look like snakes with blazing mouths, which resemble the messengers of Yama in speed, and fall like flames of fire (consuming everything they touch), and which were borne before by Rama alone in battle. I do not, O king, see the man except Dhrishtadyumna, who is able to withstand Bhishma of great vows. This is just what I think. Endued with great lightness of hand and conversant with all the modes of warfare, accoutred in coat of mail that is incapable of being penetrated by weapons, this handsome hero, resembling the leader of a herd of elephants, is according to my opinion, fit to be our generalissimo.

हे कृष्णाचे सेनापती निवडतानाचे संभाषण

“Vaisampayana continued, „Hearing these words of the intelligent king, Yudhishthira the Just, the lotus-eyed Krishna said, eyeing Dhananjaya, the white, O king, I fully approve of all those powerful warriors whom ye have named for becoming the leaders of thy troops. All of them are competent to withstand thy foes. Indeed, they can frighten Indra himself in great battle, let alone the covetous and wicked-minded sons of Dhritarashtra. O thou of mighty arms, for thy good I made great efforts to prevent the battle by bringing about peace. By that we have been freed from the debt we owed to virtue. Fault-finding persons will not be able to reproach us for anything. Foolish Duryodhana, destitute of understanding, regardeth himself as skilled in weapons, and though really weak thinketh himself to be possessed of strength. Array thy troops soon, for slaughter is the only means by which they can be made to yield to our demands. Indeed, the sons of Dhritarashtra will never be able to keep their ground when they will behold Dhananjaya with Yuyudhana as his second, and Abhimanyu, and the five sons of Draupadi, and Virata, and Drupada, and the other kings of fierce prowess,--all lords of Akshauhinis. Our army is possessed of great strength, and is invincible and incapable of being withstood. Without doubt, it will slay the Dhartarashtra host. As regards our leader, I would name that chastiser of foes, Dhrishtadyumna.‟”

आतातरी होय म्हण रे मृत्युन्जया. महासेनापतीचे श्रेय ज्याचे आहे त्यालाच मिळू दे. कुणा उपर्‍या श्वेताला ते देवू नकोस. :)

मृत्युन्जय's picture

12 Apr 2012 - 10:17 pm | मृत्युन्जय

श्वेताचा उल्लेख फक्त पहिल्या दिवसाच्या युद्धातच येतो त्याआधी महाभारतात कुठेही त्याचा उल्लेख नाहीये.

बरोबर. पण जिथे येतो तिथे दहा वेळा सेनापती म्हणुन येतो त्याचे काय?

नीळकंठी टीकेत श्वेताचे नाव 'शंख' असे दिले आहे. बर्‍यच संशोधकांच्या मते श्वेताचा भाग प्रक्षिप्त आहे. उत्तरगोग्रहणप्रसंगी हा श्वेत कुठे होता?

स्वेत वेगळा शंख वेगळा. स्वेत आधी गेला मग संख त्याच मार्गाने गेला भीष्म, द्रोण किंवा शल्याच्या हातुन

तू जी प्रत प्रमाण म्हणून वापरतोस(किसारी मोहन गांगुली) त्यातलेच हे काही दाखले बघ-

सगळे मान्य रे पण त्याच पुस्तकातुन दाखले दिले की नाही मी तिथे तर स्वेताला सेनापती केले आहे.

आतातरी होय म्हण रे मृत्युन्जया. महासेनापतीचे श्रेय ज्याचे आहे त्यालाच मिळू दे. कुणा उपर्‍या श्वेताला ते देवू नकोस.

मरायला त्यात कसले आले श्रेय. देउन टाक तुझ्या दृ ला . पण मला अजुन स्वेताच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्याचे काय. ठिकठिकाणी पहिल्या दिवशी त्याचाच सेनापती म्हणुन उल्लेख आहे. दृष्ट्यद्युम्नाचा तसा उल्लेख दुसर्‍या दिवसापासुन. कारण काय असावे? त्याचे उत्तर दिलेस की आपणा पुढचा वाद घालायला मोकळे. ;)

प्रचेतस's picture

12 Apr 2012 - 11:51 pm | प्रचेतस

बरोबर. पण जिथे येतो तिथे दहा वेळा सेनापती म्हणुन येतो त्याचे काय?

म्हणूनच म्हणतोय तो भाग प्रक्षिप्त असावा.

स्वेत वेगळा शंख वेगळा. स्वेत आधी गेला मग संख त्याच मार्गाने गेला भीष्म, द्रोण किंवा शल्याच्या हातुन

मान्य. मी फक्त नीलकंठी टीकेबद्दल सांगितले.

सगळे मान्य रे पण त्याच पुस्तकातुन दाखले दिले की नाही मी तिथे तर स्वेताला सेनापती केले आहे.

सगळे मान्य. पण हा भाग प्रक्षिप्तच.

मरायला त्यात कसले आले श्रेय. देउन टाक तुझ्या दृ ला

खी खी खी.
धन्यवाद.
दृष्ट्यद्युम्नाचा उल्लेख सेनापती म्हणून पहिल्या दिवसात आहेच की.
पहिल्या दिवसाची वज्रव्युहाची रचना त्यानेच केली. त्यावेळी तुझा हा श्वेत कुठे होता कुणास ठाऊक. ;)

त्याचे उत्तर दिलेस की आपण पुढचा वाद घालायला मोकळे

वाद काहीच नाही रे. पण महाभारतावर चर्चा करायला जाम मजा येतेय हे मात्र खरे. :)

मृत्युन्जय's picture

13 Apr 2012 - 10:59 am | मृत्युन्जय

तुझे महाभारताचे ज्ञान बघुन खरेच बरे वाटले.

स्वेताचा भाग प्रक्षिप्तच आहे. त्यावर ओर्कूट मधल्या महाभारताच्या कम्युनिटीवर आम्ही दीर्घ चर्चादेखील केली होती. निष्कर्ष असा निघाला होता की पहिली खोडी कौरवांनी काढली असे भासवण्यासाठी नंतर स्वेताचा भाग घुसडला गेला आहे.

दूसरा निष्कर्ष असाही होता की हा भाग प्रक्षिप्त नाही आहे तर दृ सेनापती पहिल्या दिबसापासुन आहे हे दाखवण्यासाठी स्वेताचा उल्लेख मुद्दाम गाळण्यात आला. असे भासवण्यासाठी की पांडव आणि त्यांचा सेनापती अजिंक्यच होता. शिवाय असाही मुद्दा मांडण्यात आला होता की मूळ महाभारत जे देव लोकांत ज्ञात आहे त्यात असल्याल्या श्लोकांची संख्या मनुष्यलोकात ज्ञात असलेल्या महाभारतातल्या श्लोकांपेक्षा खुप जास्त आहे त्यात स्वेताच्या सेनापतीपदाचा भाग असावा.

काही का असेना आम्हे या स्वेत प्रकरणाचा उपयोग महाभारत कसे करप्ट आहे (प्रक्षिप्त भागामुळे) हे ठासुन सांगण्यासाठी पुरेपुर करुन घेतला.

मला स्वतःला स्वेत प्रकरणात थोडेफार तथ्य वाटते. नाहितर असे उल्लेख जागोजागी येणे शक्य नाही. जसे काही भाग महाभारतात नंतर घुसडण्यात आले तसे काही भाग गाळण्यात आले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. खासकरुन महाभारत खरोखर घडले असेल तर. तसे करण्यात जेत्यांचा स्वतःचा स्वार्थ तर असणारच शिवाय सध्या प्रचलित असलेले महाभारत हे काही मूळ महाभारत नक्की नाही.

मूळ महाभारत व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले. त्यानंतर व्यासांनी ते त्यांच्या पाच शिष्यांना सांगितले त्यात त्यांचा स्वत:चा मुलगा शुक, वैशंपायन, जैमिनी आणि इतर दोन शिष्य होते. शुकाच महाभारत पुर्णपणे गायब झाले आहे तसेच इतर दोघांचे. जैमिनीभारतातील केवळ अश्वमेध पर्व शिल्लक आहे बाकी सगळे कालौघात नष्ट झाले किंवा केले गेले. हे जैमिनी भारत वैशंपायन भारतापेक्षा खुप वेगळे आहे. जैमिनी भारतानुसार अश्वमेधादरम्यान अर्जुन कैकवेळा हरला आनि २-३ वेळा तर कृष्ण बरोबर असुनही.

वैशंपायनांनी स्वतः लिहिले महाभारतही अस्तित्वात नाहीच. पण त्यांनी महाभारताची कथा जन्मेंजयाला सर्पसत्रादरम्यान सांगितली. ती कथा त्या वेळेस सौतीने ऐकली. सौतीने ती कथा इतर काही ब्राह्मणांना अरण्यात सांगितली. त्या ब्राह्मणांनी ती इतरांना सांगितली आणी त्यापैकी कोणीतरी हे सध्याची प्रचलित प्रत लिहिली किंवा त्या ब्राह्मणांपैकीच कोणीतरी लिहिली. या सर्व प्रकारात बरेच भाग घुसडले गेले असावेत काही गाळले गेले असावेत. कानगोष्टी खेळलेल्या लोकांना याची पुरेपुर कल्पना येइल की कसे कर्णोपकर्णी गोष्टी होताना मूळ मजकूर बदलत जातो.

असो. मी या कथेत स्वेताचा उल्लेख जाणुनबुजुन केला. मूळ कथा मला नीटशी आठवत नसली तरी हे नक्की होते की त्यात स्वेताचा उल्लेख नव्हता. आपण जेव्हा एखादे महाकाव्य वाचतो तेव्हा त्यातले बरेच बारकावे नजरेतुन सुटतात असे माझे मत आहे. ते लोकांसमोर मांडण्याच्या उद्देशानेच हे लिहिले. स्वेत सेनापती असल्याचे उल्लेख महाभारतात आहेत आणि दृष्ट्यद्युम्नच पहिल्या दिवसापासुन सेनापती असल्याचेही उल्लेख आहेत. काय आणि किती ग्राह्य धरायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

असो. माझ्यामते इतपत स्पष्टीकरण संपुर्ण मुद्द्यासाठी पुरेसे आहे. माझ्यामते दोन्ही दावे बरोबर आहेत (उपलब्ध स्त्रोतांनुसार) पण अगदी प्रामाणिकपणे विचाराल तर स्वेताच्या कथेत थोडे तथ्य आहे असे वाटत असले तरीही दृष्ट्यद्युम्न सेनापती होणे तार्किक आणि सामरिक दृष्ट्या जास्त पटण्यासारखे आहे. धन्यवाद.

प्रचेतस's picture

13 Apr 2012 - 11:29 am | प्रचेतस

ज्ञान कसले रे. दोन तीन वेळाच तर वाचून झालंय आतापर्यंत. :)

पण एक मात्र खरे वाचताना व्यासांची रसाळ भाषा आणि इतरांची प्रक्षिप्त भाषा यातील फरक कटाक्षाने जाणवतो. वैशंपायन आणि सौतीची भाषाही बर्‍यापैकी रसाळ आहेच.
महाभारतात अगदी इ.स. ५/६ व्या शतकापर्यंत भर घालणे चालूच होते. शक, यवन, चीन, हूण इत्यादींचे उल्लेख हे अलीकडच्या काळातलेच असावेत.
अर्धांग सोनेरी झालेल्या मुंगसाची गोष्ट तर जैन, बौद्ध धर्माच्या अहिंसेच्या प्रसारानंतर लोकांना परत हिंदू धर्माकडे वळवण्याकडे प्रक्षिप्त केलेली असावी

मृत्युन्जय's picture

13 Apr 2012 - 11:32 am | मृत्युन्जय

अर्धांग सोनेरी झालेल्या मुंगसाची गोष्ट

महाभारतावर जर मी कधी चुकुनमाकुन लेखमाला लिहिली तर त्यामधला एक लेख यावर नक्की असंणार आहे :)

नक्कीच लिही.
तशीही ही लेखमाला तू सुरु केली आहेसच तरी ती आता थांबवू नकोस. :)

रमताराम's picture

12 Apr 2012 - 2:52 pm | रमताराम

असे कथेत कुठे म्हटल्याचे सापडत नाही.
स्वारी हां. खरं आहे, कथेत नाहीये. पण मूळ महाभारतावरील कथा असल्याने हे लिहिले. अर्थात 'कथा, प्रसंग पात्रे.... योगायोग समजावा' अशा ढुश्क्लेमर टाकला असता तर आमची अशी गल्लत झाली नसती.

स्वातीविशु's picture

12 Apr 2012 - 12:46 pm | स्वातीविशु

नाट्यमय अन अज्ञात कथा आवडली. वाचताना सर्व घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. :)

भीमाचा प्रवेश तर खुपच सुंदर रंगवला आहे. फक्त मैरेयक म्हणजे काय कोणी सांगेल का?

मृत्युन्जय's picture

12 Apr 2012 - 1:07 pm | मृत्युन्जय

नीटसे आठवत नाही पण फार पुर्वी वाचले होते की मैरेयक मद्य उसापासुन बनवतात किंवा बनवायचे.

मैरेयकाचा उल्लेख महाभारतात ठायीठायी आहे. माझ्या मते मैरेयकाचे भाषांतर इंग्रजीत सरसकट Wine असे केले आहे. वल्ली कडे संस्कृत प्रत आहे त्यात बघता येइल. खांडव वन दाहनाच्या आधी सुभद्रा आणि द्रौपदीने Wine प्याली असे इंग्रजी भाषांतरात म्हटले आहे. ते संस्कृतमध्ये कदाचित मैरेयकच असावे.

रामायणात देखील रामाच्या हातुन सीतेने मैरेयकाचे सेवन केले असे उल्लेख आहेत. सीतेला मैरेयक आवडायचे असा उल्लेखही आहे. मैरेयकात मुरवलेले मोराचे मांस सीतेला आवडायचे असाही उल्लेख त्यात आहे.

भीमालाही मैरेयक आवडायचे असा उल्लेख महाभारतात आहे आणि त्याने मैरेयक रिचवुन युद्ध केल्याचा उल्लेख देखील आहे. तोच संदर्भ पकडुन मी ते वाक्य टाकले :)

सुहास झेले's picture

12 Apr 2012 - 5:36 pm | सुहास झेले

अप्रतिम कथा आहे.... खूप खूप आभार!!

सध्या मिपा महाभारतमय झालंय ;)

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2013 - 6:53 pm | प्रसाद गोडबोले

ही कथा आजपर्यंत ऐकण्यात आली नव्हती !!