✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका तलवारबाजाची कहाणी

म
मृत्युन्जय यांनी
Wed, 04/11/2012 - 14:55  ·  लेख
लेख
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता. दुर्योधनाला सोडुन तो जाणार तरी कुठे? आणि गेलाच तर भीमाच्या तावडीतुन त्याला वाचवणार कोण? भीम म्हटले की दुर्योधनाला राहुन राहुन त्याची १०० कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा आठवायची. तो स्वतःशीच विचार करायचा "माथेफिरुच आहे म्हणा तो भीम तसा. जेवढा खातो त्याचा दहावा भाग जरी अक्कल वापरली तरी पांडवांचे बरेच प्रश्न सुटतील. पण हे ही खरे म्हणा की आज ना उद्या पांडव जर समोर उभे टाकले तर ते त्या मस्तवाल भीमाच्या बळावरच उभे टाकणार. अन्यथा अर्जुनाचा प्रतिकार करण्यासाठी एकटा कर्ण पुरेसा आहे. पण भीमाचे तसे नाही. खुनशी आहे आणी अविचारी आहे. प्रतिज्ञा केल्याप्रमाणे माझी मांडी फोडायला आणि दु:शासनाचे रक्त प्यायला कमी करणार नाही तो राक्षस" हे आठवुन दुर्योधन अजुन जोमाने गदेचा अभ्यास करायचा. त्याने भीमाचा पुतळाच बनवुन घेतला होता ना. त्याच्यावर तो रोज गदेचे घाव घालुन अंगातली रग जिरवायचा. पण प्रश्न जेव्हा युद्धाचा येइल तेव्हा प्रथमदर्शनी दुर्योधनाला अंगावर घ्यायला भीमदेखील वाटतो तितका मुर्ख नाही हे तो जाणुन होता. अश्यावेळेस त्याला त्याच्या ९९ भावांची काळजी वाटायची. दुर्योधन समोर नसताना भीम गदेने एकेकाचा चेंदामेंदा करेल हे दुर्योधन जाणुन होता आणि त्याच्या आणि भीमाच्या या वैरात भीम कदाचित त्याच्या पोरांचाही घास घ्यायला कमी करणार नाही हे ही तो जाणुन होता. अज्ञातवासाचे वर्ष सुरु झाले तसे तर तो अजुनच काळजीत पडला. गुप्तहेरांवरचा त्याचा विश्वास जणु उडुन गेला. वेष बदलुन तो स्वतःच आडबाजुच्या गावात जाउ लागला. असाच एका उत्सवात जत्रा भरलेली असताना त्याला तलवारीचे आणि पट्ट्याचे खेळ करणारा चक्रधर दिसला. पट्ठ्या निष्णात तलवारबाज होता. हवेत उडवलेल्या फणसाचे चक्रधराने निमिषार्धात १६ तुकडे केलेले बघुन तर तो स्तिमित झाला. फणस हवेत उडाला आणि चक्रधराने अश्या काही कौशल्याने तलवार फिरवली की एरवी जो फणस कापण्यासाठी नितांत परिश्रम घ्यावे लागतात तो १६ तुकडे होउन जमिनीवर पडला. दुर्योधनाने ओळखले हाच तो वीर जो भीमरुपी चिंतेवरचा रामबाण उपाय आहे. त्याने मोठ्या मानाने चक्रधराला हस्तिनापुरच्या चतुरंगी सेनेत मानाचे स्थान दिले. अर्थात त्याच्या अंगचे गुण मात्र त्याने लपवुन ठेवले. चक्रधर एवढा पट्टीचा तलवार बाज आहे हे तो वगळता कोणालाही माहिती नव्हते अगदी शकुनीमामाला आणि कर्णाला देखील. हा त्याने हे गुपित लक्ष्मण आणि दौशासनीला मात्र सांगितले. त्या दोघांनी चक्रधराकडुन तलवारबाजी शिकुन घ्यावी असे मात्र त्याला मनापासुन वाटत होते. यथावकाश दुर्योधनाच्या मनातली भिती खरी ठरली पांडवांनी कपट केलेच. त्याने मनात विचार केला "मागच्यावेळेस १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात त्यांना पाठवले तेव्हा त्यांचा सल्लागार तो कपटी कृष्ण दूर बसला होता यावेळेस मात्र त्याने डाव साधला. विराटनगरीत अर्जुनाला ओळखलेले असतानाही त्याने यावेळेस पांडवांना बरोबर पढवले होते. त्यांनी उलटा कावा केला की म्हणे अज्ञातवास खुप आधीच संपला होता. वा रे वा म्हणे आधी संपला होता. आधीच संपला असता तर हे लबाड लोक आधीच नसते का प्रकट झाले? आम्ही ओळखले म्हणुन आता अजुन एक वनवास आणि अज्ञातवासाचे चक्र चुकवण्यासाठी लबाडी करताहेत झाले. पांडवांच्या वतीने कृष्णाने ५ गावांचे दान मागितले. त्यातली ४ गावे तर अशी की व्युहात्मक दृष्ट्या कौरवांची कौंडीच करणार आणि वर हा मखलाशी करतो आहे की पाचवे गाव म्हणे तुम्ही द्याल ते आम्हाला मान्य आहे. आता ही ४ गावे मागितल्यावर काय मग पाचवे गाव म्हणुन हस्तिनापुरपण देउ काय? वा रे वा? सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन नाही देणार हे ठणकावुन सांगितले हे बरेच झाले." कृष्ण परतल्यावर मात्र दुर्योधनाची घाई सुरु झाली. युद्धाचा बार उडणारच होता. अर्जुनाची त्याला भिती नव्हतीच कर्ण सक्षम होता. इतर सैन्यासाठी भीष्म द्रोण पुरेसे होते. भीमाला स्वतःच सामोरे जायचे त्याने ठरवले. या सगळ्या धामधूमीत त्याने चक्रधराला मातर तलवारीचा कसून सराव करायला सांगितले. युद्धाचा पहिला दिवस उजाडला आणि मावळला देखील. युद्धात पांडवांच्या पहिल्या सेनापतीची स्वेताची आहुती पडली याव्यतिरिक्ता फारसे काही घडले नाही. भीष्मांनी आपले काम चोख बजावले. पहिल्याच दिवशी शत्रुचा सेनापती मारला. अपेक्षेप्रमाणे पांडवांनी दृष्ट्यद्युम्नाकडे कमान सोपवली. पण दुर्योधनाला आता चिंता नव्हती. त्याने चक्रधराला खुषाल हस्तिनापुरी धाडुन दिले. ३-४ दिवसात युद्ध असेही संपेलच. त्याचे गुप्त हत्यार गुप्तच राहिलेले बरे. परंतु नंतर मात्र फासे उलटे पडत गेले. रणांगण होते ते. तिथे शकुनीने फासे टाकले आणि दान आपल्या बाजुने पडले असे होणार नव्हते. इथे नियतीच फासे टाकत होती. १५ दिवस सरले आणि भीष्म द्रोण दोघेही धारातीर्थी पडले. कर्णाने अपरंपार पराक्रम गाजवला अगदी भीमालादेखील निरस्त्र करुन अगदी अपमानित करुन हरवले. पण त्या भीम - कर्ण युद्धात ३१ कौरवांची आहुती पडली त्याचे काय? आणि एवढे करुन भीमाला कर्णाने जीवदान दिले? अजुनच मोकाट सुटलेला तो भीम रणांगणावर वेचुन वेचुन कौरवांना मारत सुटला. तसा दुर्योधन खडबडुन जागा झाला. आता स्वतःहुन भीमाला सामोरे जाणे हे इष्ट हे त्याला जाणवले पण तो तरी काय करणार त्याचा प्रत्येक सेनापती सर्वप्रथम त्याच्या रक्षणावर भर द्यायचा आणि त्याला शक्यतो भीमापासून दूर ठेवायचा. दुर्योधनाने त्यामुळे तातडीने चक्रधराला पाचारण केले. चक्रधर आला तसा त्याला हायसे वाटले. आपल्या उरल्यासुरल्या भावंडांच्या रक्षणार्थ प्रमुख म्हणुन त्याने चक्रधराची नेमणूक केली आणि तो निश्चिंत झाला. त्याने चक्रधराला आज्ञाच दिली होती की भर रणांगणात जसा भीम दिसेल तसे त्याच्या अंगावर धाउन जायचे आणि तलवारीने भीमाचे शीर कापून आणुन द्यायचे. दुर्योधन त्याला म्हणाला " चक्रधरा जत्रेत जसा फणस कापला होता तसेच आज भीमाचे शीर घेउन ये. तुला जन्मभर कुठल्याही गोष्टीची ददात भासणार नाही याचा काळजी मी घेइन हे माझे वचन. " दुर्योधनाला वंदन करुन चक्रधर कौरवांच्या रक्षणार्थ बाहेर पडला. भीम सहजी नजरेस पडावा म्हणुन त्याने एका हत्तीची निवड केली. थोड्याच वेळात भीमाच्या आक्रमणाची वर्दी मिळाली तसा तो हत्तीवरुन खाली उतरला आणि भीमाची प्रतिक्षा करु लागला. कौरव लढत असलेल्या बाजूला भीम येणारच हे त्याला माहिती होते. आणि थोड्याच वेळात कुरुसैन्यातल्या हत्तींचे चित्कार त्याच्या कानी येउ लागले. थोड्या अंतरावरील रण धुमाळीवरुन जाणवले की भीम चालुन येत आहे. हत्ती आणि घोड्यांची कलेवरे हवेत उडत होती, डोकी फुटलेल्या यौद्द्यांचे विव्हळणे कानी पडत होते आख्खेच्या आख्खे रथ इतस्तत: उसळत होते आणि तेवढ्यात त्याला दिसले की एक धिप्पाड यौद्धा मैरेयकाचे घडेच्या घडे पचवुन लाल झालेल्या डोळ्यांनी प्रचंड आरोळ्या ठोकत, युद्धाचा मद अंगात भिनवुन प्रचंड रणकंदन माजवत त्याच्याच दिशेने येतो आहे. तो भीमच होता. वाटेत येणार्‍या प्रत्येक यौद्ध्याला, मग तो पांडवांच्या बाजूने लढाणारा असो की कौरवांकडुन लढणारा, गदेच्या एका फटकार्‍यासरशी हवेत उसळवुन देउन प्रचंड वेगाने भीम पुढे सरकत होता. त्याचा तो आवेश बघुनच चक्रधर स्तब्ध झाला, थिजल्यागत जागीच उभा राहिला. तलवार उगारण्याचेही सामर्थ्य त्याच्यात उरले नाही आणि पापणी लवायच्या आत त्याचे कलेवर उधळुन देउन भीम पुढे निघुनही गेला होता. त्या रणभूमीवर जत्रेतले कसब असुन चालत नाही तर रणातला आवेश महत्वाचा असतो, केवळ लालित्य असुन चालत नाही तर शौर्य असावे लागते आणि फणस कापण्याचे कौशल्य असुन चालत नाही तर डोकी उडवण्याचे धैर्य लागते, हातात शस्त्र असुन उपयोग नसतो तर डोक्यात रणाचा मद चढलेला असणे आणि डोळ्यात अंगार आणि अंगात जोश आणि विखार असणेच अखेर उपयोगी पडते हे त्याला कळण्यापुर्वीच बिचारा चक्रधर त्या युद्धभूमीपासुन फार दूर निघुन गेला होता. त्याच्यापाठोपाठ भीमाने दुर्योधनाचे दु:शासनादि १२ इतर भाऊदेखील पाठवुन दिले आणि दुर्योधन मात्र मोठ्या आशेने चक्रधर भीमाचे शीर घेउन येण्याची प्रतिक्षा करत राहिला. सुर्य अस्ताला गेला. भीम जिवंतच होता, दुर्योधन त्याच्या १२ भावांच्या कलेवरांवर अश्रु ढाळत होता आणि एक कसबी कलाकार रणावेश आणि कला यातील फरक न ओळखु शकल्याने कायमचा विस्मृतीत टाकला गेला होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
संस्कृती
धर्म
इतिहास
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
शिफारस

प्रतिक्रिया द्या
14981 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

ही कथा मी फार पुर्वी कुठेतरी

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 14:55 नवीन
ही कथा मी फार पुर्वी कुठेतरी वाचली होती. कुठे ते आठवत नाही. कोणी लिहिली ते ही आठवत नाही. कथा माझी नाही आणि मिपाच्या नियमात बसत नसेल तर ती कृपया उडवुन टाकावी. सध्या महाभारताचा ज्वर चढला असल्याने ही कथा टंकली. यातील शब्द माझे आहेत, तपशीलही माझे आहेत पण कथाबीज (किंवा वाटल्यास पुर्ण कथाच) माझी नाही. मला आवडली होती आणि इतरांना आवडेल अश्या शुद्ध हेतुन ती इथे टाकतो आहे. हे चौर्यकर्म नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. मूळ लेखकाची परवानगी घेतलेली नाही कारण मूळात ही कोणी लिहिली आहे हेच आठवत नाही. कथा आवडल्यास श्रेय मूळ लेखकाचे, न आवडल्यास माझ्या भाषा आणि लेखन दारिद्र्याला दोष देउ शकता. :)
  • Log in or register to post comments

चक्रधर

स्वाती दिनेश
Wed, 04/11/2012 - 15:06 नवीन
कथा आवडली. महाभारतातल्या अप्रसिध्द/ कमी प्रसिध्द पात्रांविषयीच्या अशा काही कथा अजून येऊ देत, स्वाती
  • Log in or register to post comments

अनु मोदन

निनाद मुक्काम …
Wed, 04/11/2012 - 15:30 नवीन
अनु मोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

कथा आवडली.

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 15:13 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

कथा सुंदरच लिहिली आहे. उलट

यकु
Wed, 04/11/2012 - 15:16 नवीन
कथा सुंदरच लिहिली आहे. उलट इथे दिल्याबद्दल आभार. मी तर म्हणेन कौरव-पांडवांच्या युद्धावर अवधान ठेऊन युद्ध चालले त्या पूर्ण घटनाक्रमावर एक लेखमाला लिहा. हा आग्रह आहे. कदाचित पानीपतच्या तोडीचंही काही लिहून होईल.
  • Log in or register to post comments

+१

मन१
Wed, 04/11/2012 - 18:28 नवीन
मालिकाच होउन जाउद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+१०००००००००००१११११११११

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/11/2012 - 18:46 नवीन
प्रचंड अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अजून येउ द्या अश्या कथा

चित्रगुप्त
Wed, 04/11/2012 - 15:21 नवीन
लेखन आवडले. स्वाति दिनेश यांच्या सूचनेशी सहमत. अजून येउ द्या अश्या कथा.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

स्मिता.
Wed, 04/11/2012 - 15:30 नवीन
आधी कधीही ऐकिवात नसलेली वेगळीच कथा आवडली. एवढ्या मोठ्या युद्धात इतिहास (महाभारत इतिहास नसले तर पहिले/दुसरे महायुद्ध लक्षात घ्यावे) लिहिला जातो तो फक्त राजपुरुषांचा आणि त्यांचा भोवतालच्या घटनांचा. पण एकेका सामान्य माणसावर त्याचे काय पडसाद उमटत असतील हे कधीच प्रकाशात येत नाही. ही कथा वाचून महाभारतात हस्तिनापूरातल्या सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून काही असावे का हा प्रश्न मनात चमकून गेला.
  • Log in or register to post comments

छान !

Maharani
Wed, 04/11/2012 - 15:32 नवीन
खुपच सुंदर कथा!!आणखी लिहा!!
  • Log in or register to post comments

दुर्योधन एवढा 'माठ' होता?

प्यारे१
Wed, 04/11/2012 - 15:33 नवीन
दुर्योधन एवढा 'माठ' होता?
  • Log in or register to post comments

व्वा कथा आवडली

पियुशा
Wed, 04/11/2012 - 15:38 नवीन
व्वा कथा आवडली :)
  • Log in or register to post comments

कथा छान, अर्थात संशयी

५० फक्त
Wed, 04/11/2012 - 16:18 नवीन
कथा छान, अर्थात संशयी बुद्धीमुळे प्यारेंना पडला तो प्रश्न पडलाच आहे. असो. कोणाकडे ती पाच गावे अन हस्तिनापुर असा नकाशा आहे का ? की जी गावे दिल्याने हस्तिनापुरची कोंडी होउन जाईल अशी भिती प्रत्यक्ष दुर्योधनाला वाटली होती.
  • Log in or register to post comments

नकाशा नाही माझ्याकडे.

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 16:39 नवीन
नकाशा नाही माझ्याकडे. एकचक्रा, वारणावत, इंद्रप्रस्थ, अ़जुन एक गाव (नाव आठवत नाही) आणि कौरवांना योग्य वाटेल ते कुठलेही अशी ५ गावे त्यांना हवी होती. यावरची एक चर्चा फार पुर्वी वाचली होती त्या अनुषंगाने लिहितो आहे. संदर्भ सापडले किंवा चर्चा सापडली तर देतोच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वृकस्थली आणि माकंदी अशी ती

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 16:43 नवीन
वृकस्थली आणि माकंदी अशी ती पाच गावे. एकचक्रा कदाचित नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बरोबर. कुशस्थला, वृकस्थला,

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 16:48 नवीन
बरोबर. कुशस्थला, वृकस्थला, माकंदी, वारणावत आणि अजुन एक कौरवांना आवडेल ते. इंद्रप्रस्थ देखील त्यात नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुशस्थल पण नाही. ते अविस्थल.

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 16:51 नवीन
कुशस्थल पण नाही. ते अविस्थल. उरलेले एक दुर्योधनला वाटेल ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

Give us even Kusasthala,

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 16:54 नवीन
Give us even Kusasthala, Vrikasthala, Makandi, Varanavata, and for the fifth any other that thou likest. Even this will end the quarrel. O Suyodhana, give unto thy five brothers at least five villages, नाही हो मालक. कुशस्थलच. यावेळेस खात्री करुन लिहिले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भांडारकर प्रतीत अविस्थल

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 16:57 नवीन
भांडारकर प्रतीत अविस्थल असाच उल्लेख आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भांडारकर प्रतीत अविस्थल

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 16:57 नवीन
भांडारकर प्रतीत अविस्थल असाच उल्लेख आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भांडारकर प्रतीत अविस्थल

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 16:57 नवीन
भांडारकर प्रतीत अविस्थल असाच उल्लेख आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे बघ ३ वेळा सांगितलेस म्हणुन

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 17:03 नवीन
हे बघ ३ वेळा सांगितलेस म्हणुन मी तुझे म्हणणे मान्य करेन असे अजिबात नाही ;) बादवे तुझ्याकडे ती बोरीची प्रत असेल तर दे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे मोबाईलवरून टाईप करत

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 17:28 नवीन
अरे मोबाईलवरून टाईप करत असल्याने चुकून तीनदा टंकले गेले. ती भांडारकरी प्रत संस्कृतात आहे. माझ्या ओळखीच्या एकाकडे आहे. त्याला विचारून बघतो. (भांडारकर प्रतीलाच बोरीची प्रत म्हणतात काय?) माझ्याकडे विदर्भ मराठवाडा बुक कंपनीचे खंड आहेत. त्यात तपासून सांगतो नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

होय Bhandarkar Oriental

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 17:31 नवीन
होय Bhandarkar Oriental Research Institute = BORI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्स.

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 17:34 नवीन
धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुमचे एकमत झाले की सांगा.

धन्या
Wed, 04/11/2012 - 20:25 नवीन
तुमचे एकमत झाले की सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मूळ श्लोक मिळाला रे.

प्रचेतस
गुरुवार, 04/12/2012 - 00:34 नवीन
मूळ श्लोक मिळाला रे. :) अविस्थलंवृकस्थलं माकन्दीं वारणावतम् | अवसानं भवत्वत्र किंचिदेकं च पंचमम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

-

अमोल केळकर
Wed, 04/11/2012 - 16:28 नवीन
मस्त कथा. यापुर्वी चक्रधराबद्दल माहिती नव्हती अमोल केळकर
  • Log in or register to post comments

माहिती नसणारच . काल्पनिक

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 16:34 नवीन
माहिती नसणारच . काल्पनिक कथा आहे हो ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

काय म्हणता ?

अमोल केळकर
Wed, 04/11/2012 - 17:49 नवीन
काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कथा आवडली. महाभारतातील अशा

किसन शिंदे
Wed, 04/11/2012 - 16:31 नवीन
कथा आवडली. महाभारतातील अशा कथा आणखी येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

अज्ञात कथा सांगितल्याबद्दल

पिंगू
Wed, 04/11/2012 - 16:39 नवीन
अज्ञात कथा सांगितल्याबद्दल आभार. कथा आवडली आहे हे सांगणे नलगे. - पिंगू
  • Log in or register to post comments

सुंदर कथा

प्राध्यापक
Wed, 04/11/2012 - 16:42 नवीन
एखादी कथा चांगली होण्यासाठी कथाबीज तर चांगले असावेच लागते ,मात्र त्याच बरोबर कथेला अलंक्रुत करणारे शब्दही तीतकेच महत्वाचे असतात,आणी या कथेत ते जाणवतात. मुळात महाभारतातील कथेतच एवढे नाट्य आहे ,की कोणत्याही अंगाने त्याचा विचार केला तरी ते नाट्य दिसते. कथेचा शेवटचा परीच्छेद आवड्ला.
  • Log in or register to post comments

+११

टिवटिव
Wed, 04/11/2012 - 17:16 नवीन
"एखादी कथा चांगली होण्यासाठी कथाबीज तर चांगले असावेच लागते ,मात्र त्याच बरोबर कथेला अलंक्रुत करणारे शब्दही तीतकेच महत्वाचे असतात,आणी या कथेत ते जाणवतात." अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

छान कथा

कपिलमुनी
Wed, 04/11/2012 - 17:03 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

त्याने धनुश्यबाण का नाही

टवाळ कार्टा
Wed, 04/11/2012 - 17:43 नवीन
त्याने धनुश्यबाण का नाही वापरला?
  • Log in or register to post comments

त्याने धनुश्यबाण का नाही

चावटमेला
गुरुवार, 04/12/2012 - 11:44 नवीन
त्याने धनुश्यबाण का नाही वापरला? त्यो त्याचा प्रायमरी स्किल सेट नव्हता ;) बाकी, उत्कृष्ट लेख. बादवे, एकलव्याचे पुढे काय झाले यावर एक लेख येवूद्याच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कथा आवडेश !

इष्टुर फाकडा
Wed, 04/11/2012 - 18:08 नवीन
भीमाची एन्ट्री आणि एक्झिट तर लहीच लहीच भारी.
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 18:21 नवीन
कथा एकदम आवडेश. खरी का काल्पनीक हा वाद न धरता कथेचे तात्पर्य समजून घेणे जास्ती महत्वाचे. शक्य झाल्यास कौरवांकडून कुरुक्षेत्रात लढलेल्या एकमेव भिल्ल राणीची कथा देता येईल का ? मी खूप शोधतो आहे त्या कथेला. तसेच एकलव्याची कथा, त्याचे जरासंधासाठीचे महत्व ह्यावरती पण लिहा जरा.
  • Log in or register to post comments

खरी का काल्पनीक हा वाद न धरता

धन्या
Wed, 04/11/2012 - 20:31 नवीन
खरी का काल्पनीक हा वाद न धरता कथेचे तात्पर्य समजून घेणे जास्ती महत्वाचे.
कथा काल्पनिक आहे असेच वाटते. पण ती का लिहिली गेली असावी हे शेवटच्या परिच्छेदातून कळते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, या कथेचे तात्पर्य जास्त महत्वाचे आहे. मृत्युंजय, झक्कास फुलवलं आहेस कथाबीज. मस्तच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शक्य झाल्यास कौरवांकडून

प्रचेतस
गुरुवार, 04/12/2012 - 00:06 नवीन
शक्य झाल्यास कौरवांकडून कुरुक्षेत्रात लढलेल्या एकमेव भिल्ल राणीची कथा देता येईल का
युद्धात स्त्रीया लढल्या नाहीत. अपवाद क्लिब समजल्या गेलेल्या शिखंडीचा पण तोही नंतर पुरुष झाला. मागच्या जन्मी तो अंबेच्या रूपात होता. द्रुपदाच्या पोटी शिखंडीनी या स्त्रीरूपात जन्म घेऊन नंतर स्थूणाकर्ण यक्षाला त्याने स्त्रीत्व देऊन पुरुषत्व घेतले. भिल्ल राणीची कथाही रूपकात्मकच आहे काय? एकलव्याचा महाभारतीय युद्धाच्या आधीच कृष्णाने वध केला असे वाचल्याचे आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एकलव्याचा महाभारतीय युद्धाच्या आधीच कृष्णाने वध केला

मोदक
गुरुवार, 04/12/2012 - 08:45 नवीन
>>>एकलव्याचा महाभारतीय युद्धाच्या आधीच कृष्णाने वध केला अधिक माहिती सांग ना... मला इतकेच माहिती आहे की अंगठा मागून घेतल्यानंतर त्याने तर्जनी आणि मध्यमा (मधले बोट) याने धनुष्यबाण चालवायला सुरूवात केली. कांही भिल्ल जमाती (एकलव्यामुळे) अंगठ्याशिवाय धनुष्यबाण वापरतात. कितपत खरे आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भिल्ल राणीची कथा मला वाटते

मृत्युन्जय
गुरुवार, 04/12/2012 - 00:29 नवीन
भिल्ल राणीची कथा मला वाटते अश्वमेधात आहे. महाभारताच्या युद्धात नाही. शोधुन सांगतो तुला २- ३ दिवसात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कथा छान...

मन१
Wed, 04/11/2012 - 18:28 नवीन
पण काल्पनिक असण्याची खात्री वाटते आहे. महाभारत केवळ platform म्हणून वापरलय, शेवटचा संदेश द्यायला. हे स्पष्टपणे सांगावं लागेलसं वाटतं.
  • Log in or register to post comments

दुर्योधन भीमाला घाबरत नव्हता...

योगप्रभू
Wed, 04/11/2012 - 18:48 नवीन
भीम गदायुद्धात दुर्योधनापेक्षा कमी दर्जाचा होता. त्याची सगळी दांडगाई ही त्याच्या शारीरिक बळावर आणि धिप्पाडपणावर होती. दोघेही एकाच गुरुकडे म्हणजे बलरामांकडे उच्च पातळीचे गदायुद्ध शिकले आणि त्यात नैपुण्य संपादन केलेला दुर्योधन हा बलरामांचा लाडका शिष्य होता. त्यांची अखेरची लढाईही गुरु बलरामांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी भीमाला दुर्योधन आटपेनासा झाल्यावर श्रीकृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार करण्याचा इशारा केला. गदायुद्धात कमरेच्या खाली प्रहार करायचा नसतो. त्यामुळे बलराम प्रचंड संतापला आणि त्याचे नेहमी खांद्यावर असलेले नांगर हे शस्त्र उगारुन भीमावर चालून गेला. (सुसंस्कृत भाषेत जास्त वेळ बोलणे जड पडत असल्याने पुढील वर्णन लोकभाषेत) ...मंग चिडलेला बळीराम भीम्याला म्हनला, 'भाड्या! येवड्यासाटीच शिकिवलं का रं तुला? नियम मोडून ख्येळतोस व्हय रं नामर्दा? दम ह्यो नांगरच घालतु तुज्या टकुर्‍यात.' तसा भीम घाबरला. बळीभाऊचा नांगर पडला असता तर भीम्या काय जित्ता वाचत नव्हता. मंग त्यानं आधारासाटी किसनदेवाकडं बघिटलं. किसनद्येवाला पयल्यापासून पांडवांचा लय पुळका. तवा त्यो फुडं झाला आन् भावाची समजूत काडली,का 'दादा! जौं दे. ह्ये कौरव पांडवांच्यातलं भांडान हाय. आपन यादव हावोत. आपन कशाला पडायचं लफड्यात? माज्याकडं बगा. येवडं युद्ध झालं, पर म्या लडलो का? रथ चालविला, उपदेश केला, शंख वाजिवला पन हत्यार न्हाय उगारलं. तुमी तरी डोक्याला कशाला हेडेक करुन घेताव? मरु दे दोगंबी. तुमी आपलं तुमची घोषयात्रा कम्प्लिट करायचं बगा.' आसं काईबाई सांगून भोळ्याभाबड्या बळीभाऊला साफ गुंडाळलं किसनद्येवानं.
  • Log in or register to post comments

द्येवा..

चिगो
Wed, 04/11/2012 - 22:36 नवीन
प्रभू, धन्य आहात ! लैच भारी प्रतिसाद.. मृत्युंजय, कथा आणि संदेश दोन्ही आवडलेत.. कुणाची का असेना, तुम्ही सुंदर फुलवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

ह्येला म्हणत्यात बाजार

स्पंदना
गुरुवार, 04/12/2012 - 06:43 नवीन
ह्येला म्हणत्यात बाजार उठवला तुमास्नी चांगला गुढग्यापासुन दंडवत. आसच लिव्हीत र्‍हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

आरं एज्या

रमताराम
गुरुवार, 04/12/2012 - 12:17 नवीन
ह्ये कौरव पांडवांच्यातलं भांडान हाय. आपन यादव हावोत. आपन कशाला पडायचं लफड्यात? ह्ये श्यानपन जवा 'एकतर मी मिलंन नायतर जल्ला आमची यादव शेना' आसं सांगून यादवशेनेला लडायला लोटलं व्हतं तवा का इसरला व्हता कोन जानं. ह्ये मजी आज तळ्यात उद्या मळ्यात आसं जाह्लं न्हवं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

कथा आवडली..

कौशी
Wed, 04/11/2012 - 21:30 नवीन
अजुन येऊ द्यात अशा कथा...
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

पैसा
Wed, 04/11/2012 - 21:41 नवीन
महाभारताच्या चौकटीत खरी असू शकेल असं वाटणारी कथा आवडली. भीमाचं थोडक्या शब्दात आलेलं चित्रं छान जमलं आहे. तसाच 'औरंगजेबाची' आठवण करून देणारा संशयी दुर्योधन पण एक व्यक्तिचित्र म्हणून आवडला. योगप्रभूची "मायमराठीतली" गोष्ट पण फर्मासच!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा