नर्मदा परिक्रमा विषयावरचे यशवंताचे रसाळ लेखन वाचले.
मग थोडी शोधा शोध केली तर ही माहिती हाती लागली. आशा आहे कुणाला तरी उपयोग होईल.
नर्मदा परिक्रमा- इतिहास
सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर सुरू होते.
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे.
स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आले आहे असे म्हणतात.
पायी केल्यास ही यात्रा 3 वर्षे 3 महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे.
ही यात्रा अतिशय खडतर आहे.
नर्मदा परिक्रमा नियम
ओंकारेश्वर येथून सुरुवात.
वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही.
सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते.
रोज त्रिकाल नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन, नित्यपाठ, सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.
नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत लागणारी गावे -
ओंकारेश्वर
राजघाट
प्रकाशा
गोरागाँव
भालोद
अंकलेश्वरमाग्रे
कठपोर
मिठीतलई
भरुच
मोटी करोल
नारेश्वर
तिलकवाडा
तिलकवाडा
कोटेश्वर
गरुडेश्वर
माण्डू
सहस्रधारा
महेश्वर
मण्डलेश्वर
बडम्वाह
नेमावर
बरेलीमाग्रे
बरमनघाट
जबलपूरचा गौरी घाट
अमरकंटक
होशंगाबाद
ओंकारेश्वर
नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके
- कुणा एकाची भ्रमणगाथा- गो. नी. दाण्डेकर
- माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोलकर
- नर्मदे हर हर जगन्नाथ कुंटे
- नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, नाशिक - गौतमी प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २००
- बसने नर्मदा परिक्रमा वामन गणेश खासगीवाले
- नर्मदे हर हर नर्मदे सुहास लिमये
- श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग - श्री नर्मदाप्रसाद
- चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
- नर्मदा मैय्येच्या कडेवर - शैलजा चितळे
- माझी नर्मदा परिक्रमा - सांब सदाशिव अनंत
- नर्मदा परिक्रमा - जोगळेकर दा.वि.
- नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - Sunil Aakivate
- भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - बोरीकर अरुण
- नर्मदा परिक्रमा - लेले शैलजा
- तत्वमसि - लेखक ध्रुव भट्ट अनुवाद अंजनी नरवणे - केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी
विकिपिडिया मराठी दुवा - http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%...
कृपया या माहितीत अजून भर घालावी. चुका असल्यास त्या ही कळवाव्यात.
प्रतिक्रिया
16 Jan 2012 - 5:57 am | मराठमोळा
ही परीक्रमा कधी करेन की नाही याबद्दल साशंक आहे पण अधिकधिक माहिती आणि अनुभव वाचायला मिळत आहेत.. परीक्रमेची प्रचिती बरीच आहे असं एकंदरीत दिसतयं.
बाकी मी त्र्यंबकेश्वरची श्रावणी सोमवारची फेरी अनवाणी बर्याचदा केली आहे, वेगळाच अनुभव आणि आनंद देऊन जाते ही फेरी. आधी फारच अवघड होती, पण आता मात्र बरीच सोपी केली गेली आहे. :)
16 Jan 2012 - 6:22 am | पाषाणभेद
>>> पण आता मात्र बरीच सोपी केली गेली आहे
सोपी?? सोपी म्हणजे तेथील मार्गावर काही सोई सुविधा केल्या, चढ कमी केले गेले, सोपे मार्ग काढले असे म्हणायचे आहे काय तुम्हाला?
अन आता तर मुळीच करू नका. मी देखील दोन फेर्या केल्या आहेत. अगदी वेड्यांचा बाजार असतो त्या वेळी. सगळी तरूणाईतील मुले धांगडधींगा घालत रस्त्याने जात असतात. रस्त्यातली शेते उध्वस्त करतात. व्यसन करत जातात. पोरीबाळी तर अजीबात नेवू नये असली परिस्थिती. गर्दी म्हणाल तर रस्त्याने चालताही येत नाही. एकदा रस्त्यात काठ्या विकणार्या आदिवासीच्या काठ्याच पळवल्यानं गुंड पोरांनी!
येथेही हेच लिहीले होते.
हां श्रावणात त्रंबकला निसर्ग भरभरून दान देत असतो. त्याचा आनंद घ्यायचा झाल्यास ही फेरी तिसर्या सोमवारी न करता पहिल्या, दुसर्या सोमवारी करावी. भक्तिभाव मनात असेल तर ठिकच पण असाही निसर्गाचा भरभरून आनंद जरूर मिळतो.
16 Jan 2012 - 7:21 am | निनाद
परिक्रमेवर इतकी पुस्तके असतील असे मलाही वाटले नव्हते. :)
16 Jan 2012 - 9:10 am | मन१
आपण नामोल्लेख केलेल्या लेखिकांनी खरोखर गोनिदांसारखा पूर्ण पायी प्रवास केला आहे काय? एकट्या स्त्रीयांनी तो केलेला आसणे कठीण वाटते. ह्यातून पुढची शंका :-
परिक्रमा एकट्यानेच करायची असते काय? तसे नसेल तरः -
तुमच्या सोबत पती/पत्नी असेल तरीही संपूर्ण ब्रह्मचर्याचे पालन अपेक्षित आहे काय?(धार्मिक कार्यात सहसा असते म्हणून विचारतो आहे) शिवाय : -
परिक्रमेदरम्यान एखाद्याला जीवनसाथी सापडल्यास परिक्रमा पूर्ण होइस्तोवर त्याने कळ काढावी व नंतरच विधिवत विवाह करावा असा नियम आहे काय?
हे प्रश्न मला खरोखर पडले आहेत. टिंगलीचा अजिबात हेतू नाही.
16 Jan 2012 - 9:48 am | यशोधरा
>> एकट्या स्त्रीयांनी तो केलेला आसणे कठीण वाटते. >> भारती ठा़कूर आणि त्यांच्या २ मैत्रिणी अशा तिघींनीच एकमेकींबरोबर ही परिक्रमा केलेली आहे. नर्मदा परिक्रमेला जाणार्या यात्रेकरुंना त्रास होत नाही असे सार्यांनीच नोंदवलेले आहे, स्त्री यात्रेकरुंना नर्मदामातेचेच रुप मानतात त्यामुळे आणि त्या भागांतील सश्रद्ध समाजमनामुळे त्रास होत नाही असे असावे.
>> गोनिदांसारखा पूर्ण पायी प्रवास केला आहे काय? >> गोनिदांनी पूर्ण प्रवास केलेला नाही, त्यांनीच हे नोंदवलेले आहे. कुंटे, भारती ठाकूर आणि इतरांनी केलेला आहे. गोनिदांचे पुस्तक हे परिक्रमेवरचे पुस्तक म्हणता येणार नाही, तर एक - मानवी भावनांचे चित्रण करणारी कादंबरी - परिक्रमेची पार्श्वभूमी वापरली आहे, ज्यामुळे भावनिक विरोधाभास उठून दिसतो - म्हणता येईल, हे वैयक्तिक मत. :) कादंबरी सुरेख आहे ह्याबद्दल दुमत नाही.
16 Jan 2012 - 12:01 pm | सागर
गोनिदांनी पूर्ण प्रवास केलेला नाही, त्यांनीच हे नोंदवलेले आहे. कुंटे, भारती ठाकूर आणि इतरांनी केलेला आहे. गोनिदांचे पुस्तक हे परिक्रमेवरचे पुस्तक म्हणता येणार नाही, तर एक - मानवी भावनांचे चित्रण करणारी कादंबरी - परिक्रमेची पार्श्वभूमी वापरली आहे, ज्यामुळे भावनिक विरोधाभास उठून दिसतो - म्हणता येईल, हे वैयक्तिक मत. कादंबरी सुरेख आहे ह्याबद्दल दुमत नाही.
बाकी कुंटेबुवांनी साधनामस्त, नित्यनिरंजन आणि धुनी ही पुस्तकेदेखील लिहिलेली आहेत.
पण परिक्रमांपेक्षा साधना मार्गावर त्यात जास्त लेखन आहे.
जगन्नाथ कुंटे नर्मदे हर हर साठीच जास्त प्रसिद्ध आहेत. त्यातील तपशील अचंभित करुन टाकतो.
16 Jan 2012 - 12:32 pm | स्वाती दिनेश
संकलित, एकत्रित माहिती आवडली.
स्वाती
16 Jan 2012 - 2:58 pm | अभिज्ञ
पुस्तकांचे संकलन आवडले.
सर्वच पुस्तकांमध्ये मला सुहास लिमयेंचे पुस्तक जास्त आवडले.
कुंटेचे पुस्तक वाचून जाम कंटाळा आला होता. सारखे सिगारेट व चहा पिला ह्याचाच उल्लेख जास्त आहे.
वर उल्लेख केल्या प्रमाणे
•माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोलकर
ह्या पुस्तकाचा नर्मदा परिक्रमेशी काहीहि संबंध नाही.
इतरत्र नर्मदा धरण्-सरदार सरोवर-लोकांचे विस्थापन वगैरे बद्द्ल बरेच नकारात्मक वाचायला मिळते.
ह्या पुस्तकात मात्र ह्या सर्व मुद्यांचा सखोल समाचार घेतलेला आहे. नर्मदा धरण कसे उपयुक्त आहे ह्याबद्दल ह्या पुस्तकात बराच उहापोह केलेला आहे. अर्थात वाचनीय व संग्राह्य पुस्तक आहे.
ह्या पुस्तकाबद्दल श्रामों कडून वाचायला जास्त आवडेल. (अर्थात निगेटिव्ह/पॉसिटिव्ह ) ;)
अभिज्ञ.
16 Jan 2012 - 7:16 pm | श्रावण मोडक
हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते. तेव्हा ते नवीनच होते. या पुस्तकाविषयी आता काहीही सकारात्मक, नकारात्मक लिहिणे मुश्कील आहे. कारण पुस्तक काळाच्या एका संदर्भात बंदिस्त आहे. आज पुस्तकाविषयी काही लिहिण्याऐवजी त्यातील युक्तिवाद आणि वास्तव असे विश्लेषण पुस्तकास्वतंत्र होणे महत्त्वाचे. ते पुस्तकाचा संदर्भ न घेता होतेच आहे.
16 Jan 2012 - 5:54 pm | उदय के'सागर
ह्या सप्ताहाच्या लोकप्रभा मधे देखिल "नर्मदा परिक्रमा" बद्दल लेख आला आहे, जरुर वाचा :
http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm
16 Jan 2012 - 6:12 pm | मन१
दुसर्या धाग्यावर आधीच दिलेली प्रतिक्रिया इथे पुन्हा देतोयः-
आत्ताच लोकप्रभावर ही लिंक मिळाली नर्मदापरिक्रमेवर.
http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm
पहिल्या एक्-दोन परिच्छेदात उगाच जाउन आलेल्यांना सरसकट दुगाण्या झाडलेल्या आहेत.
साहेब स्वतः फुल्ल टू बसने जाउन आलेत, जाता-येता भक्तिभावाने यज्ञ वगैरे केलेत आणि इतरांना "च्छ्या कसले अंधश्रद्ध" म्हणून हिणवताहेत. to the top of that लेखाच्या शेवटच्या भागात अजून दोन वाक्ये सापडली:-
नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल!
ह्यातल्या दुसर्या वाक्याचा नक्की अर्थ काय? सहज होणार्या गोष्टीला दुर्दम्य इच्छा कशाला हवी? मुळात "दुर्दम्य इच्छा" ह्यापेक्षा "दुर्दम्य इच्छाशक्ती" हा शब्द वापरावा काय?
अर्थातच असल्या बस आणि कारने जाणार्यांची भरमसाट गर्दी वाढून हा टुरिस्ट स्पॉट झाला तर नर्मदेची गंगा व ओंकारेश्वराचे व एकूणच शांत प्रसन्न नर्मदेचे सध्याचे काशी-प्रयाग बनणे अवघड नाही.
इतरांनीही बरच काही लिहिलय, ते http://www.misalpav.com/node/20415 ह्या धाग्यावर पाहता येइल.
16 Jan 2012 - 6:35 pm | llपुण्याचे पेशवेll
मनरावाशी सहमत आहे.
16 Jan 2012 - 7:19 pm | उदय के'सागर
अगदी सहमत.
मी "एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ४" वाचलाच नव्हता आणि म्हणुन हि प्रतिकिया हि वाचली गेली नाहि. पण निदर्शनास आणुन दिल्याबद्दल व अधिक प्रकाश टाकल्या बद्दल मनापासुन धन्यवाद!
17 Jan 2012 - 3:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिनीवालेंच्या लेखाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. भ्रमंती करत नवीन काही शिकून त्याबद्दल रोचक लिहीणारे लोकं कमीच आहेत, बिनीवाले त्यांच्यापैकी एक. आणखी कोणीतरी भक्ती, अध्यात्माच्या पुरात वाहून गेलेला नाही हे वाचून आनंद झाला.
साफ असहमत. सहजसाध्य गोष्टीचा उगाच बाऊ करणार्यांवर, चमत्कार वगैरे अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्यांची मापं काढली आहेत. मी सदर पुस्तकं वाचली नसल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं शक्य नाही.
चांगलं नियोजन करून हे टाळता येईलच.
एकूणच एकेकाळाच्या श्रद्धा आता अंधश्रद्धा आहेत का यावर मी केलेला थोडा विचार. हे विस्कळीत विचार लिहून काढायला कारण तुझा हा प्रतिसाद.
'नर्मदा परिक्रमा' संदर्भात माहिती विकीपिडीयावर गोळा करण्याबद्दल निनादचे आभार. आमच्यासारखे हौसे-नवसे अशाच माहितीमुळे निसर्गसौंदर्याचा आणि मॉडर्न मार्व्हल्सचाही आनंद घेऊ शकतात.
16 Jan 2012 - 7:25 pm | पुष्करिणी
अजून एक पुस्तक वरच्या यादीत अॅड करता येइल का?
तत्वमसि मूळ लेखक ध्रुव भट्ट , अनुवाद अंजनी नरवणे. या कादंबरीला केंद्रिय साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे
16 Jan 2012 - 7:32 pm | स्वानन्द
लाय्ब्ररीत शोधत होतो हे पुस्तक. मिळाले नाही.
आणि ही कादंबरी आहे की पुस्तक?
16 Jan 2012 - 8:58 pm | पुष्करिणी
पुस्तकावर तरी कादंबरी असा उल्लेख आहे...
' कादंबरीचं कथान्क सर्वसामान्य कादंबर्यांपेक्षा अगदी वेगळं आहे. विषयाचं संपूर्ण नावीन्य हे लेखकाचं मोठ वैशिष्ट्य आहे. प्रेमकथा नाही, प्रेमाचे त्रिकोण, चौकोन वगैरे नाहीत , हे ओघानच आलं ! कुठल्याही एखाद्या कुटुंबाचीही ही कथा नाही. खरं तर कथानायकाचं नावही शेवटपर्यंत आपल्याला समजत नाही! कारण ही कथा अमुक एका व्यक्तीची नाहीच, ती तुमची, माझी, प्रत्येकाची आहे! '
.......... असं अनुवादकार अंजनी नरवणे लिहितात
17 Jan 2012 - 12:10 pm | स्वानन्द
धन्यवाद पुष्करिणी. भ्रमणगाथेसारखे नसावे असे वाटतंय. एकंदरीत मला जे कंटेंट हवे आहे असे पुस्तक दिसतेय. एकदा वाचून बघायलाच पाहिजे.
बाकी अध्यात्म किंवा अध्यात्मिकता यावर भरभरून बोलणारे असोत किंवा त्याचे वावडे असणारे असोत, प्रत्येकाच्या मनात या शब्दांबद्दल एक प्रतीमा / अर्थ तयार असतो, त्याअनुषंगाने त्यांचे बोलणे चालू असते. तेव्हा स्वतः पुस्तक वाचून बघणे हाच माझ्यापुरता योग्य पर्याय होय.
17 Jan 2012 - 3:08 am | मेघवेडा
भ्रमणगाथेप्रमाणेच हेही पुस्तक परिक्रमेविषयी नाही. पण त्या परिसरात घडणारं कथानक असल्याकारणाने तेथल्या समाजातल्या चालीरीती, माणसांचा श्रद्धाळूपणा, त्यांचं एकूणच वागणं, परिसर, भूगोल इ. शी निगडित बरीच माहिती मिळते. मुळात नर्मदा परिक्रमा हा विषय एक श्रद्धा म्हणून न बघता एक अनुभव म्हणून बघणार्यांसाठी फार उपयोगाचं पुस्तक आहे. म्हणजे त्यामागची आध्यात्मिकता बाजूला ठेवून जर आयुष्य बदलणारा अनुभव म्हणून तीकडे बघत असाल तर तत्त्वमसि जगता येतं. पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी त्यातला मला सर्वात महत्त्वाचा वाटणारा उतारा पुढे देतो आहे :
आनंद. केवळ आनंद. :)
17 Jan 2012 - 7:36 pm | यशोधरा
तत्वमसि माझंही खूप आवडतं पुस्तक आहे. तत्वमसिचा उल्लेख इथे पाहून एकदम भारी वाटलं.
परत एकदा वाचते आता हातातली पुस्तकं वाचून संपली की :)
17 Jan 2012 - 6:10 am | निनाद
पुष्करिणी,
पुस्तक सुचवल्या बद्दल धन्यवाद.
मला लेख संपादित करता येत नाहीये. संपादकांनी मदत करावी.
* तत्वमसि - लेखक ध्रुव भट्ट अनुवाद अंजनी नरवणे - केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी
धन्यवाद!
16 Jan 2012 - 9:52 pm | पैसा
पुस्तकांची माहिती आणि मार्गातील गावं यांचं उत्तम संकलन! परिक्रमेला जायचं असो, नसो, वेगळ्या विषयावरची म्हणून ही पुस्तकं एकदातरी वाचायलाच हवीत.
17 Jan 2012 - 1:01 am | रेवती
बरीच माहिती दिल्याबद्दल आभार.
ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर बराच मोठा प्रवास दिसतोय.
पहिल्या (आणि शेवटच्या) गावाच्या नावाशिवाय एकही गाव माहित नाही.
17 Jan 2012 - 6:57 am | विकास
संकलन खूपच आवडले... धन्यवाद.