अल्बर्ट स्पिअर - सैतानाचा वास्तुविशारद. भाग - ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Aug 2011 - 8:58 am

अल्बर्ट स्पिअर - भाग १
अल्बर्ट स्पिअर - भाग २
अल्बर्ट स्पिअर - भाग ३
अल्बर्ट स्पिअर - भाग ४

बर्‍याचवेळा अल्बर्ट स्पिअर जनरल फ्रॉमबरोबर दुपारी जेवायला जायचा. अर्थात त्यावेळी या युद्धाशिवाय कुठल्या विषयावर गप्पा मारणार ते ? ( याच जनरल फ्रॉमला न्युरेंबर्गच्या खटल्यात फाशी देण्यात आली).

ज. फ्रॉम.

१९४२ च्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अशाच एका दुपारी जेवताना जनरल फ्रॉम म्हणाला
“अल्बर्ट, हे युद्ध आपल्याला जिंकायचे असल्यास मला वाटते आता एकच मार्ग उरला आहे. पारंपारिक शस्त्रास्त्रांनी हे युद्ध आता जिंकणे अशक्यच आहे. असे शस्त्र तयार केले पाहिजे की त्याने फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर विध्वंस होईल. माझे एका शास्त्रज्ञांच्या गटाशी बोलणे झाले आहे आणि त्यांच्या मते ते असे एक संशोधन करताएत ज्यायोगे आख्खे शहरच्या शहर नष्ट होऊ शकेल. त्यातील एक जण तर म्हणाला, आख्खे ब्रिटन त्याने नष्ट होऊ शकेल. खरे का खोटे हे माहीत नाही, पण आपण त्यांना एकदा भेट द्यायला काय हरकत आहे ?”

याच सुमारास, जर्मनीमधील सगळ्यात मोठ्या लोहाच्या कारखान्याचा मालक, डॉ. व्हॉलर यानेही अल्बर्ट स्पिअरच्या कानावर, अणू संशोधनाची अक्षम्य हेळसांड चालली आहे हे घातले होते. त्याने अशीही तक्रार केली होती की मुलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यासाठी निधीही उपलब्ध केला जात नाही. त्यावेळी युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे सहज शक्य होते. ६ मे १९४२ रोजी अल्बर्ट स्पिअरने हिटलरची गाठ घेऊन हे सगळे त्याच्या कानावर घातले आणि या संशोधनाचे महत्व त्याला पटवून दिले. त्याने अशीही सूचना केली की एक राइश रिसर्च काउन्सिल स्थापन करून त्याच्या प्रमुखपदी राईश मार्शल गोअरींगला नेमावे. ही सूचना मानण्यात येऊन तसे करण्यातही आले. त्याच सुमारास तीनही दलाचे प्रतिनिधी, मिल्च, फ्रॉम, विटजेल यांनी काही शास्त्रज्ञांना घेऊन अल्बर्ट स्पिअरबरोबर बैठक घेतली. विषय होता अर्थातच अणू संशोधन. या शास्त्रज्ञांमधे होते दोन नोबेलप्राईझ विजेते – डॉ. हाईझेनबर्ग आणि डॉ. हान. अणू विभाजन आणि सायक्लोट्रॉनबद्दल डॉ. हाईझेनबर्ग यांनी माहिती दिल्यावर त्यांनी सरकारवर त्यांच्या या विषयाकडे झालेल्या दुर्लक्षासाठी अत्यंत कडवट टीका केली. यावेळी अर्थातच अमेरिका या विषयात किती पुढे आहे यावर ही चर्चा करण्यात आली.

ही बैठक संपल्यावर अल्बर्ट स्पिअरने डॉ. हाईझेनबर्ग यांना स्पष्टच अणूबॉंब तयार करता येईल का ते विचारले. त्यांनी उत्तर दिले की ते शक्य आहे पण त्याला खूप वेळ लागेल. कितीही पैसे ओतले तरीही कमीतकमी दोन तरी वर्षे लागणार होती. एवढेच नाही तर त्यात अजून एक मुख्य अडचण होती ती म्हणजे त्याकाळी युरोपमधे एकच छोटा सायक्लोट्रॉन होता आणि तो होता पॅरिसमधे. सुरक्षेच्या व गोपनीयतेच्या कारणामुळे तो वापरता येणे शक्यच नव्हते. अल्बर्ट स्पिअरने अमेरिकेकडे असणार्‍या सायक्लोट्रॉनपेक्षा मोठा सायक्लोट्रॉन बांधण्याची तयारी दर्शविली पण तेवढे अधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे असे एकदम करता येणार नाही असे उत्तर डॉ. हाईझेनबर्गने दिले आणि तेही बरोबरच होते. या बैठकीचा फायदा असा झाला की त्या संशोधनाला सुरवात तर झाली आणि त्यांना लागेल ती मदत कबूल करण्यात आली.

अल्बर्ट स्पिअरला हिटलरला अपारंपारिक गोष्टी करण्याचा छंद होता हे माहीत असल्यामुळे त्याने त्याची मदत होईल या आशेने त्याला भेटून या सर्व योजनेची कल्पना दिली. त्याच काळात एस्‌ एस्‌ने पण एका शास्त्रज्ञाला गुपचुपपणे याच संशोधनावर कामाला लावले होते. त्याचे नाव होते मान्फ्रेड अरडेन. हा युवक स्वत:च अणूवर संशोधन करत होता. हा एका पोस्ट ऑफिसच्या मास्तरचा ओळखीचा होता आणि तो ही त्याला या कामात मदत करत होता. हिटलरने ना डॉ. हाईझेनबर्गला विचारले, ना अल्बर्ट स्पिअर ला, त्याने त्याच्या संशयी स्वभावाला अनुसरुन त्याच्या छायाचित्रकाराला या सगळ्याची बातमी काढायला पाठवले आणि त्यावर आपले मत बनवले की या संशोधनाचा काही विशेष फायदा नाही. (असेही म्हणतात की हिटलर अणूयुद्धाच्या विरूद्ध होता -त्याचे कारण त्याला पृथ्वीचा विनाश नको होता) हिटलर आणि अल्बर्ट स्पिअरने या विषयावर एकदा चर्चा केली पण अल्बर्ट स्पिअरच्या लगेचच लक्षात आले की हे सगळे समजणे हिटलरच्या बुद्धीच्या पलिकडचे आहे. केवळ त्याला समजत नव्हते म्हणून त्याने हे शास्त्र विशेष उपयोगाचे नाही असे ठरवून टाकले होते. पण होते ते भल्यासाठीच, कारण अल्बर्ट स्पिअरने लिहिले आहे “ मला खात्री आहे की हे अस्त्र जर त्याच्या हातात पडले असते तर त्याने ते पहिल्यांदा लंडनवर टाकले असते आणि जगात भयंकर विध्वंस झाला असता”

हिटलरचा पाठिंबा नसला तरीही अल्बर्ट स्पिअरने व त्याच्या इतर सहाध्यायांनी हे संशोधन चालूच ठेवले होते. साधारण १९४२ च्या शेवटी हा अणूबॉंब तयार होईल असे भाकित होते. फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर डॉ. हाईझेनबर्ग यांनी दिलेले नव्हते. तो प्रश्न असा होता की एकदा अणूचे विभाजन होऊन स्फोट झाल्यावर ती चेन रिएक्शन थांबवता येईल का ! शेवटी एक सायक्लोट्रॉन बांधूनही झाला. त्याला भेट द्यायला जेव्हा अल्बर्ट स्पिअर गेला तेव्हा त्याने त्या संशोधनावर काम करणार्‍या डॉ. बॉथे याला विचारले की आता त्यांना अणूबॉंब करता येईल का ? त्याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आले कारण तेवढे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हते. ते मिळवायला अजून ३/४ वर्षे सहज लागणार होती. ते ऐकल्यावर अल्बर्ट स्पिअरचा त्या संशोधनामधला रस कमी झाला. पण त्याने त्यांना अजून एक काम दिले ते म्हणजे ते तंत्रज्ञान वापरून मोठ्या युद्धनौकांसाठी इंजिन तयार करण्याचे. त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही.

या मंत्रालयात काम करताना अल्बर्ट स्पिअरला राज्यकारभार कसा चालला होता, संपत्तीचा वापर कसा होत होता, वरच्या स्तरावर घोडचुका कशा होत होत्या आणि त्याबद्दल कोणीही कसे बोलत नव्हते आणि अशाच अनेक बेशरम गोष्टींचा अनुभव आला. त्या काळात त्याच्या हिटलरबरोबरच्या बैठकीत हिटलर म्हणाला होता “जी बाजू जास्त चुका करेल ती बाजू हे युद्ध हरणार आहे.

हिटलरचा युद्धसामुग्री उत्पादनखात्याचा मंत्री म्हणून काम करताना त्याने आजुबाजूला ज्या घोडचुका घडताना बघितल्या त्यावरून हे युद्ध कोण हरणार आहे याचा अंदाज त्याला अगोदरच आला.

सुप्रिम कमांडर हिटलर, अल्बर्ट स्पिअर व त्यांच्या बैठका:
नवथर उत्साह हा हिटलरचा अजून एक गुण (?) होता. त्याची उत्तम उदाहरणे अल्बर्ट स्पिअरने लिहिली आहेत. त्याने स्वत: कुठल्याच विषयाचा खोलवर अभ्यास केला होता, ना त्याच्याकडे कुठल्याही विषयाचे विशेष ज्ञान होते. तो ज्ञान मिळवायचा पण लोकांची तोंडे बंद करण्यासाठी. अर्थात त्याला यात त्याच्या अधिकाराचा खूपच फायदा व्हायचा. अल्बर्ट स्पिअरला बर्लिनहून युक्रेनला दर शनिवारी जर्मन सेनेच्या सरसेनापती असलेल्या हिटलरच्या बैठकीला जावे लागायचे. हे पद त्याने नुकतेच स्वत:कडे घेतले होते. त्याला बंदुका, तोफा, आणि त्यात वापरल्या जाणार्‍या दारूगोळ्याची सगळी माहिती होती आणि या माहितीचे मोठमोठे दगड फेकून समोरच्यांची तोंडे बंद करायची युक्तीही त्याने साधली होती. ही माहिती त्याच्याकडे एक लालरंगाचे पुस्तक होते त्यातून तो पाठ करायचा. या ज्ञानाचे प्रदर्शन करायची एकही संधी तो सोडत नसे. या सगळ्या युक्त्या वापरून तो त्याच्या हाताखालच्या अधिकार्‍यांना येताजाता वाकवत असे पण त्याची पंचाईत व्हायची ती एखाद्या विशेषज्ञाची समोरासमोर गाठ पडल्यावर. हे जेव्हा अल्बर्ट स्पिअरच्या लक्षात आले तेव्हा तो या बैठकींना त्याचे त्या त्या विषयातील विशेषज्ञ घेऊन जायला लागला. अल्बर्ट स्पिअरला आकड्यांचे खेळ कधीच जमले नाहीत व ते त्याच्या लक्षातही रहायचे नाहीत. त्याच्या विरूद्ध हिटलरचे होते. तो त्याच्या संभाषणात आकड्यांचा भरपूर वापर करायचा. व समोरच्याला आकडे विचारून त्याचा आवाज बंद करायचा. गंमतीने सगळे अल्बर्ट स्पिअरच्या या संघाला “अल्बर्ट स्पिअर चे आक्रमण” असे म्हणायचे.

रणगाडा हलका पाहिजे की अभेद्य हा वाद कायम चालत आला आहे. अर्थात त्याचे उत्तर आहे ज्या भागात तो वापरायचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. किंवा ते शक्य नसल्यास या दोन्हीचा सुवर्णमध्य काढून त्याची रचना केली पाहिजे. रणगाड्याची अभेद्यता वाढवायची असेल तर त्याचे चिलखत अधिक जाड करायला लागते त्यामुळे त्याचे वजन वाढून त्याचा वेग कमी होतो. पण हिटलरचे युद्धविषयक ज्ञान हे पहिल्या महायुद्धाच्या अनुभवाभोवतीच फिरत असल्यामुळे अभेद्य रणगाडे करावेत असा त्याचा कायम आग्रह असे. उदा. पॅंथर नावाचा रणगाडा, जो त्याच्या वेगवान हालचालीसाठी प्रसिध्द होता, तो हिटलरच्या या आग्रहापोटी ४० टनी झाला.

पँथर -

म्हणजे त्याचे वजन जवळजवळ त्यांच्याच “टायगर” नावाच्या अभेद्य -जड प्रकारच्या रणगाड्याइतकेच झाले.

१९४२ च्या उन्हाळ्यात अखेरीस टायगर रणगाड्यांची परिक्षा घ्यायची ठरली. हिटलरने स्वत: त्यासाठी आज्ञा दिली आणि जागाही ठरवली. ही जागा होती रशियन आघाडीवर. हिटलरने रशियाच्या ७.७ सें.मी. च्या रणगाडाविरोधी तोफांची आता मजा बघा, त्यांचा एकही गोळा टायगरचे काहीही वाकडे करू शकणार नाही अशा बढाया मारल्या. प्रत्येक नवीन अस्त्र किंवा शस्त्र हे आता युद्धाचे पारडे जर्मनीच्या बाजूला झुकवणार याची त्याला खात्रीच असे. त्याच्या सहाय्यकांनी ज्या भूमीवर ही परिक्षा व्हायची होती त्याठिकाणी टायगर काय कुठलेच रणगाडे उतरवणे हे धोक्याचे आहे हे स्पष्ट बजावूनसुद्धा हिटलरने ६ रणगाडे त्या रस्त्यावर सोडले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दलदल होती. रशियन रणगाडाविरोधी तोफखान्याने शांतपणे ही सहा रणगाड्यांची रांग आत येऊ दिली. आता त्यांची चाके तोफांच्या समोर आली. त्यांनी पहिला आणि शेवटचा रणगाडा निकामी केला आणि ते त्यांची गंमत बघत बसले. त्यांना बाजूनेही जाता येईना कारण बाजूला दलदल होती. थोड्याच वेळात त्यांनी सहाही रणगाडे नष्ट केले. या सगळ्याचा अहवाल बिनतारी यंत्रणेवरून मुख्यालयात येत होता. वातावरण गंभीर होते. रणगाड्यांचा शेवट झाल्यावर हिटलर तेथून निघून गेला.

जळणारे टायगर -

त्यानंतर ना त्याने या प्रकाराची कोठेही वाच्यता केली ना रणगाड्याचा विषय काढला. जणू काही असे काही घडलेच नव्हते. याच काळात हिटलरभोवती जी माणसे जमा झाली होती त्यांनी हिटलरला खूष ठेवणे हे एकच ध्येय ठेवले होते. उदा. राईश मार्शल गोअरींग हा त्या बैठकांना स्वत: कधीच उपस्थित नसायचा पण त्याचा एक वरिष्ठ मंत्री असायचा. तो मधेच गायब व्हायचा. बरोबर १५/२० मिनिटांनी गोअरींग बैठकीला यायचा आणि हिटलरचाच मुद्दा आग्रहाने उचलून धरायचा. हिटलर म्हणायचा “ बघा राईश मार्शललाही माझ्यासारखेच वाटत आहे. हेच बरोबर आहे”. हे सगळे असे चालले होते.

रशियाच्या आघाडीवर तर हिटलरला माघार घ्यायची ही कल्पना देखील सहन व्हायची नाही. नोव्हेंबरच्या १९ तारखेला रशियन फौजांनी रुमानियन सैन्याची फळी तोडून त्या खिंडारातून आक्रमण जारी केले. ही बातमी येताच हिटलरने नेहमीप्रमाणे रुमानियन सैनिकांच्या लढवय्येपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. “आपल्या सैन्याशी गाठ पडपर्यंत वाट बघा” त्याने त्याच्या जनरल्सना सांगितले. थोड्याच तासात रशियन सैन्याने जर्मन सैन्यालाही मागे ढकलायला सुरवात केली तेव्हा हिटलरने एक भाषण ठोकले.
“ ही माझ्या सेनाधिकार्‍यांची नेहमीचीच चूक आहे. ते नहेमीच शत्रूच्या ताकदीला अवास्तव, अतिरंजित महत्व देतात. विशेषत: रशियन सैन्याच्या. माझ्याकडे आलेल्या अहवालानुसार त्यांचे संख्याबळ नगण्य आहे. झालेल्या रक्तपाताने त्यांची लढायची इच्छाशक्ती क्षीण झाली आहे. पण तुम्हाला कोणालाच या अहवालांवर विश्वास ठेवायचा नसतो. एवढेच नाही तर रशियन अधिकार्‍यांचे युद्धविषयक व रणनीतीविषयी ज्ञान किती हास्यास्पद आहे हे तुम्हाला माहिती आहेच. ते काय आक्रमण करणार ? एक दोन दिवसात त्यांचे हे तथाकथित आक्रमण थंड पडेल याची खात्री बाळगा. तोपर्यंत मी एक दोन डिव्हिजन सैन्य तिकडे हलवणारच आहे. त्याने त्या आघाडीवर सगळे सुरळीत होईल”.

बिचार्‍याला हे माहीत नव्हते की रणनीती इत्यादि हे फार पुढचे झाले. जे सैनिक मातृभूमीच्या संरक्षणासाठी लढत असतात तेव्हा बाकी सर्व गोष्टी दुय्यम असतात. हे आपण इंडोचायनामधेही बघितलेच. जेव्हा जर्मन सेनेच्या पराभवाच्या बातम्या जलद गतीने येवू लागल्या तेव्हा हिटलरने तत्परतेने युक्रेन सोडले व प्रशियात आपले मुख्यालय हलवले. आपल्या अवतीभोवती (आपल्या कामाच्या ठिकाणी तर नक्कीच) असे लोक आपण बघतोच. या लोकांना कसलीही कटकट नको असते. (त्यानंतर लगेचच त्याने सहाव्या आर्मीची उभारणी केली. हे सैन्य धुळीस मिळालेली इभ्रत परत आणणार होती. दुर्दैवाने रशियन सैन्याने या सैन्यालाही भारी रणनीती आखून वेढले व नष्ट केले)

मृत्यूमुखी पडलेले जर्मन सैनिक-

हा सैनिक जिवंत नाही गोठलेला आहे -

वॉररूममधे भिंतींवर टांगलेल्या स्टालिनग्राडच्या नकाशावर आता काही ठिकाणीच जर्मन सैन्याच्या ठिकाणांचे निळे ठिपके दिसत होते. त्यांच्या चहुबाजूला लाल रंगाचा सागर उसळलेला दिसत होता.

याच सुमारास अल्बर्ट स्पिअर हिटलरच्या या मुख्यालयात गेला होता तेथे त्याने एक विलक्षण दृष्य पाहिले. ज. झाईटलर, ज. कायटेल समोर अक्षरश: भीक मागत होता की उरलेल्या सैन्याला माघारीचा आदेश त्वरित द्यावा म्हणजे त्या सैनिकांचे प्राण वाचतील. कायटेलने होकार दिला खरा पण बैठकीत हिटलरसमोर त्याने हिटलरचीच बाजू उचलून धरली आणि “जर रसद वेळेवेर पुरवली तर जर्मनीचे शूर सैनिक रशियन सेनेला निश्चितच थोपवतील” याला मान्यता दिली. पुरवठा कोण करणार तर गोअरींगची विमाने. सगळेच बेभरवशाचे शिलेदार !

जर्मन युद्धकैदी-

दोनच दिवसात वॉररूममधे भिंतींवर टांगलेल्या स्टॅलिनग्राडच्या नकाशावर चहुबाजूला फक्त लाल रंगाचाच सागर दिसत होता....................आणि निळी बेटे अदृष्य झाली होती.

हिटलरच्या भोवताली असणार्‍या राजकारण्यांची कारस्थाने............
काय होती ती? हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर आपल्याला पुढच्या भागात डोकवावे लागेल....
म्हणून क्रमश:..........................

जयंत कुलकर्णी.

अवशेष

इतिहासकथासमाजलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

सुनील's picture

11 Aug 2011 - 9:42 am | सुनील

लेखात आता छान रंग भरू लागला आहे!

किसन शिंदे's picture

11 Aug 2011 - 9:43 am | किसन शिंदे

अतिशय रोचक माहीती.

पु.भा.प्र.

प्रचेतस's picture

11 Aug 2011 - 9:52 am | प्रचेतस

हा भाग पण आधीसारखाच रोचक.
पुढचा भाग येउ द्यात लवकर.

भीषण नक्कीच आहे हा भाग. हा वाचुन तत्कालिन जर्मनीचा सर्वेसर्वा हा जरा डोक्याने अर्धवट होता की काय असे वाटु लागले आहे.(वि स वाळिंबे व वि ग कानिटकर ह्यांची अनुक्रमे "नाझी भस्मासूराचा उदयास्त" आणि "व्हर्साय ते हिरोशिमा" वाचुन मात्र काहिशी वेगळी प्रतिमा होती. काही वेळेला अतिसाहसी असणारा हिटलर पूर्ण भ्रमिष्ट कधीच वाटला नाही. इथे मात्र एआच वेळी डोक्याने अर्धवट तर कधी कमालीचा स्वार्थी/धूर्त असा काहिसा वाटतो. )

असो. आतापर्यंतचे सर्वच भाग उत्तम जमलेत. दर वेळेसच प्रतिक्रिया देणे जमते असे नाही. हीच पोच समजावी.

जयंत कुलकर्णी's picture

11 Aug 2011 - 2:52 pm | जयंत कुलकर्णी

माझ्या इतर लेखातील काही वाक्ये -
१ माणूस लहानपणी निरागस असतो, तरूणपणी कम्युनिस्ट होतो, आणि पैसे मिळायला लागले की तो कॅपिटॅलिस्ट होतो.
२ असली युद्धे झाली की सगळ्यांनाच गांधी व बुद्ध आठवतात.
३ History is a dangerous Past.

काय बरोबर आहे ना ? :-)

. (असेही म्हणतात की हिटलर अणूयुद्धाच्या विरूद्ध होता -त्याचे कारण त्याला पृथ्वीचा विनाश नको होता)

हॅ हॅ हॅ

महानायक (विश्वास पाटील ) मध्ये सुभाष बाबूंनी हिटलरला या भेटीत बुध्दाची मूर्ती भेट दिल्याचा प्रसंग रंगवला आहे.

अवांतरः हिटलर टू गांधी चे परिक्षण टाका की राव कुणीतरी.

जयंत कुलकर्णी's picture

11 Aug 2011 - 2:08 pm | जयंत कुलकर्णी

ज्यात तो नाही असे जग कदाचित त्याला अभिप्रेत नसावे !
:-)

आचारी's picture

11 Aug 2011 - 12:23 pm | आचारी

१ नम्बर !!

प्रास's picture

11 Aug 2011 - 6:25 pm | प्रास

..... म्हणतो.

फ्याण :-)

अतिशय रोचक माहीती.

पु.भा.प्र.

स्वाती दिनेश's picture

11 Aug 2011 - 2:40 pm | स्वाती दिनेश

लेखमाला रंगत चालली आहेच, पण ते भीषण सत्य, तो विध्वंस.. इतिहासाची ती पाने उलगडताना त्रास होतो.
बर्लिन, म्युनशन, डाकाव,अ‍ॅमस्टरडॅम सारख्या ठिकाणी मग सारखे तेच आठवत राहते.
स्वाती

पल्लवी's picture

11 Aug 2011 - 3:46 pm | पल्लवी

------->हे सगळे समजणे हिटलरच्या बुद्धीच्या पलिकडचे आहे......

तांत्रिक बाबी कळ्त नसतील, तरी "मोठा विध्वंस करण्यास सक्षम" ही 'उपयुक्तता' हिट्लरला कळू नये ?! आश्चर्य वाटले.
तसेच, एवढा धूर्त वगैरे असताना, आजुबाजुची हांजी हांजी करणारी मंडळी त्याला दिसलीच नसावी का ?
त्याच्या जर्मन सैन्याला त्याच्याच हट्टापाई निष्ठूररित्या मृत्युमुखी पडावे लागले हे त्याचा ध्यानी कधीच आले नसावे का ?

(ले़ख उत्तम. पुढचा भाग कधी ? )

जयंत कुलकर्णी's picture

11 Aug 2011 - 4:01 pm | जयंत कुलकर्णी

पल्लवी तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हे मानसशास्त्रज्ञच काढू शकतील. त्यासाठी लागणारा पुरेसा डाटा आता उपलब्ध आहे. कदाचित ते प्रयत्न चालूही असतील. पण पिरॅमिडच्या वरती एकच माणूस असा असला की आख्खा पिरॅमिड डगमगतो हेच खरे.

शाळेत असताना हिटलरबददल कुतुहल होते
ते त्याच्या क्रूर मनोवृत्तीबद्दल. या एका माणसाच्या अट्टाहासापायी लक्षावधी माणसांचा नाश झाला.
काका मला जितपत ही लेखमाला समजलीय त्याप्रमाणे हे सगळे भाग न्यूरेँबर्ग खटल्याशी संबंधित असलेल्या आरोपीवर आहे.
पण FINAL SOLUTION ला जबाबदार असणारा एक आरोपीला मात्र या खटल्यामुळे शिक्षा होउ शकली नाही.
त्यावेळी तो निसटला.
पुढे मोसादने अर्ज्रटिनामध्ये घडवलेल्या आँपरेशनमुळे तो पकडला गेला.
त्यावर इस्त्राईलमध्ये फाशी देण्यात आली.
तो म्हणजे अँडाँल्फ आईषमान.
त्यावरही एक लेख यावा ही नम्र विनंती.

( मी ईतिहासाची विद्यार्थिनी नाही.त्यामुळे काही चुकले असल्यास माफ करा)

जयंत कुलकर्णी's picture

11 Aug 2011 - 4:09 pm | जयंत कुलकर्णी

जाई,

खरे तर ही लेखमाला मी हिटलरच्या जनरल्स आणि मंत्र्यांवर लिहायचे म्हणून चालू केली. पण या सगळ्यांनी मला सविस्तर लिहा म्हणून गळ घातली म्हणून अजून स्पिअरच चालू आहे. आता ही लेखमाला केव्हा पूर्ण होणार देवाला माहिती.
बहूदा १००० एक पाने होतील असा प्राथमिक अंदाज आहे. :-) :-) :-)

आपण म्हणताय त्या आसामीबद्दलही एक मोठा लेख होणारच आहे. त्यात मोसादची कारवाई बद्दलही माहिती येईलच. केव्हा ते सांगता येत नाही.......

सुनील's picture

11 Aug 2011 - 4:12 pm | सुनील

लेखमाला अशीच चालू राहू दे!

पल्लवी's picture

11 Aug 2011 - 4:17 pm | पल्लवी

तुम्मी लिवा म्हन्जे झालं.
(गुडेरिअन आणि ब्लिट्झ्क्रीगची पण वाट पाहते आहेच, पण तूर्तास स्पिअरने गुंतवून ठेवले आहे ! :) )

जयंत कुलकर्णी's picture

11 Aug 2011 - 6:12 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !
अगोदर स्पिअर संपवतो मग बघू !

चिंतातुर जंतू's picture

12 Aug 2011 - 4:39 am | चिंतातुर जंतू

हायजेनबर्ग आणि नील्स बोर या दोन प्रख्यात शास्त्रज्ञांची झालेली ऐतिहासिक भेट आणि तेव्हा झालेली अणुबाँबविषयीची चर्चा यावर 'कोपनहागन' नावाचं एक रोचक नाटक आलं होतं. लोक आपल्या आयुष्यात काय वागतात; त्यामागे नक्की कारणमीमांसा काय असते, हे सांगणं दुरापास्त असतं. खुद्द हायजेनबर्गनं भौतिक वस्तूंच्याविषयी अनिश्चिततेचा सिद्धांत मांडला; तसंच काहीसं मनुष्यस्वभावाविषयी मांडण्याचा प्रयत्न नाटककारानं त्यात केला होता. हिटलर किंवा त्याच्या आजूबाजूच्या माणसांच्या निर्णयां-वर्तनांमागचे कार्यकारणभाव तपासतानाही असा विचार करणं रोचक ठरेल आणि म्हणून कदाचित या संदर्भात काहींना ते नाटक वाचायला आवडेल.

जयंत कुलकर्णी's picture

12 Aug 2011 - 4:26 pm | जयंत कुलकर्णी

चांगलेच आहे ते. नीट वाचायलाच पाहिजे. इ-बूक आहे का जालावर ? असल्यास लिंक देता का ?

चिंतातुर जंतू's picture

12 Aug 2011 - 11:19 pm | चिंतातुर जंतू

इ-बूक आहे का जालावर ? असल्यास लिंक देता का ?

फुकटात तरी दिसत नाही. गूगल बुक्सवर तुकड्या-तुकड्यात आहे:
http://books.google.com/books?id=egoGavonIF0C&printsec=frontcover

जयंत कुलकर्णी's picture

13 Aug 2011 - 2:50 pm | जयंत कुलकर्णी

कालच विकत घेतले. अजून यायचय . विषय फार भारी वाटला म्हणून. भाषांतर करायचाही विचार डोकावलाय. बघूया ! भाषांतर म्हणजे स्वैर भाषांतर.

शिल्पा ब's picture

15 Aug 2011 - 6:51 am | शिल्पा ब

अगदी रोचक एक लंबर लेखमाला. हिटलर हा अतिशय हुशार माणुस होता असं माझं मत होतं पण मग त्याला आजुबाजुला काय चाललंय, अप्पलपोटी लोकं वगैरे कसे दिसले नाहीत हा एक प्रश्नच आहे.

पुढचे भाग येउ द्या.