आवडलेले काही... २

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
1 Aug 2011 - 4:54 pm

आवडलेले काही... १

***

सआदत हसन मंटो

गेल्या शतकातील एक विलक्षण प्रतिभावान लेखक. 'शुभ्र काही जीवघेणे' या लेखसंग्रहात अंबरीश मिश्र यांनी या असामान्य कलावंतावर एक भन्नाट लेख लिहिला आहे. हा शापित जीव जितका प्रतिभावान तितकाच लौकिक जीवनातले दशावतार भोगणारा. त्याच्यावरच्या लेखाचे 'चंद्रग्रहण' हे नाव अगदी यथार्थ!

मंटो मूळचा लाहोरचा. मुंबईत येऊन चित्रपटसृष्टीत धडपडत राहिला. पुढे फाळणीत पाकिस्तानात स्थलांतरित झाला. या जगात वावरताना लागणारा तथाकथित शहाणपणा नसल्यानेच वेडा ठरला. आयुष्याच्या शेवटी दोनदा मानसिक विकार बळावल्याने चक्क मनोरुग्णालयात भरती करावं लागलेलं. शेवटही अगदी हलाखीत आणि दुर्दैवी.

हे सगळं वाचताना खालील प्रसंग चटका लावून गेला. असं वागणार्‍या माणसाला वेडा कसं म्हणायचं हा प्रश्न खूप वेळ सतावत राहिला.

***

मंटोचा श्यामवर जीव. याला वाटे की श्यामचं आयुष्य म्हणजे समुद्रकाठची प्रफुल्ल पहाट. श्यामचं जगणं आवाक्यापलीकडचं, भन्नाट. तूफान. बायका म्हणजे श्यामचा 'वीकपॉईंट'. बयकांत सदा गुंतलेला. कधी निगार सुल्तान, तर कधी रमोला, तर कधी कुलदीप कौर. मंटो हे सगळं पाहत होता. फार जवळून.

श्याम आणि कुलदीप कौरचे लागेबांधे तसे जुनेच. लाहोरपासूनचे. पुढे श्याम मुंबईला आला. कुलदीपही आली. बरोबर प्राणला घेऊन. श्याम जुने धागे जुळवू लागला. मंटोला घेऊन तो कुलदीपच्या चौपाटीवरच्या होटेलावर, नेमाने चक्कर टाकी. ती श्यामला भाव देत नव्हती.

एकदा श्याम अन मंटो कुलदीपच्या हॉटेलवर गेले. तिथे प्राण होताच. संध्याकाळ भाकड होती. फ्लश खेळण्याचा प्रस्ताव आला. पत्ते खेळण्यात प्राण वाकबगार. मंटो प्रत्येक बाजी हरत होता. कुलदीपसमोर नोटांची चवड लागली होती. श्याम चरफडला. पण तो काय करतो? मंटो शर्थीने खेळत होता. पैसे हरत होता. खेळ संपल्यावर प्राणने कुलदीपला मंटोचे सगळे पैसे परत करायला सांगितलं. हातचलाखीने आपण खेळलो म्हणाला. पण पैसे परत करायला कुलदीप कबूल नव्हती. प्राण निघून गेला. श्यामने कुलदीपला छेडायला सुरूवात केली. यात काही वेळ गेला. नंतर टॅक्सीत बसून तिघे मंटोच्या भायखळ्याच्या घरी आले. वाटेत कुलदीपने 'यार्डले' अत्तराची बाटली विकत घेतली. हे पैसे मंटोचेच. जुगारात हरला होता ते. हे पाहून श्याम पुन्हा जळफळला. मंटोच्या घरी श्याम कुलदीपला पुन्हा छेडू लागला. तीही खमकी. सगळं हसण्यावारी नेत होती.

रात्री श्याम कुलदीपला तिच्या हॉटेलवर सोडायला गेला. तासाभरात परतला तो रक्तबंबाळ हात घेऊन. दोघात खूप खडाजंगी झाली. श्यामच्या प्रत्येक प्रश्नाला कुलदीपचं उत्तर कुर्रेबाज. संतापून श्यामने मूठ उगारली. कुलदीपने नेम चुकवून पोबारा केला. श्यामचा हात मागच्या दगडी भिंतीवर आपटला. या सगळ्या झटापटीत श्यामने कुलदीपकडून 'यार्डले'ची बाटली शिताफीने हस्तगत केली. मंटोला बाटली परत देताना म्हणाला: "जुगारात हरलेले पैसे परत वसूल करता आले नाहीत. तुझ्या पैशाने तिनी घेतलेली ही बाटली मात्र मिळवली."

पुढे खूप दिवस 'यार्डले' मंटोकडे होतं. अत्तर संपल्यावर खाली बाटलीही तशीच राहिली. घोड्यावरून पडून श्याम वारला तेव्हा मंटो लाहोरला वेड्यांच्या इस्पितळात होता. याला बातमी कळली. हा उठला अन अत्तराची बाटली शोधू लागला.

डॉक्टर म्हणाले: या वेड्याचे चाळे काही औरच.

- 'चंद्रग्रहण', शुभ्र काही जीवघेणे, अंबरीश मिश्र, राजहंस प्रकाशन.

संस्कृतीइतिहासप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

ढब्बू पैसा's picture

1 Aug 2011 - 8:53 pm | ढब्बू पैसा

हा तुकडा वाचून , "शुभ्र काही जीवघेणे" वाचण्याची प्रबळ इच्छा झाली आहे. बघुयात कधी योग येतो ते! बाकी मंटो बद्दल विकीवर वाचलं! त्याचा शेवट पण चटका लावणारा आहे. अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला! कलंदर होता तो एक..

मस्त कलंदर's picture

1 Aug 2011 - 10:17 pm | मस्त कलंदर

त्यादिवशी तुमच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारा आला होता. आता पुन्हाही तसेच झाले. ढब्बू म्हणते तसं 'शुभ्र काही..' वाचावंसं वाटतंय.

एवीतेवी तुम्ही लोकांना सह्या करून पुस्तक वाटत फिरताच म्हणे. पुढच्या वेळेस येताना घेऊन या. बदल्यात पुस्तकाला व्यवस्थित प्लास्टिकचे पाणीप्रूफ कव्हर घालू दिल्या जाईल.

सदाअत हसन मंटो...................... ह्यांच्या बद्दल लिहिल्या बद्दल धन्यवाद.

खुपच प्रामाणीक लेखक.
माझे तर खुपच आवडते.
पुन्हा एकदा धन्यवाद.

प्रियाली's picture

1 Aug 2011 - 10:29 pm | प्रियाली

चांगला किस्सा.

अवांतरः श्याम, प्राण, कुलदीप कौर आणि मंटो यांच्यात सर्वात शहाणा प्राण म्हणायला हवा. डाव किती आणि कसे लावायचे आणि उठून कधी चालायला लागायचे हे शहाण्याला माहित असते.

सहज's picture

2 Aug 2011 - 5:30 am | सहज

मंटोचे कट्टा वर्णन आवडले. प्राण जाणता होता हे नक्की! ड्वोळे पाण्वले!

चित्रगुप्त's picture

2 Aug 2011 - 10:23 am | चित्रगुप्त

हा प्राण म्हणजे हिंदी सिनेमातील खलनायक तोच का ?
माफ करा, याबद्दल काहीच माहित नाही, म्हणून विचारले.

किसन शिंदे's picture

2 Aug 2011 - 11:34 am | किसन शिंदे

सहमत, मलाही तसच वाटतयं.
तुम्ही दिलेल्या या छोट्याश्या वर्णनामूळे 'शुभ्र काही' वाचण्यासाठी खुप अधीर झालोय.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2011 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

प्रसंग वाचुन पुस्तक वाचण्याची प्रचंड उत्कंठा लागली आहे. जुन्या जमान्यातल्या आणि काहीशा उपेक्षीत कलाकारंविषयी भरभरुन लिहिलेले तसेही कमीच वाचायला मिळते. (अपवाद कणेकर गुर्जींचा)

अवांतर :- हे सगळे लेखन लोकाचे आहे, बिका तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून बरेच दिवस काही झरलेले नाही.

< काडीसारु मोड > साला मराठी अभिव्यक्तिसाठी उघडलेल्या संस्थळावर कायम इतर भाषीकांचीच कौतुक आणि व्यथा काय वाचायला मिळतात? मराठी कलाकार अथवा गुन्हेगारांवर, पिडीतांवर लिहिणे हे हुच्चभ्रुपणाच्या कक्षेत येत नाही काय? < / काडीसारु मोड >

राही's picture

2 Aug 2011 - 8:09 pm | राही

अंबरीश मिश्रांचं 'सुंदर ती दुसरी दुनिया' हे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं पुस्तकही तितकंच उत्कट आणि माहितीपूर्ण आहे.देविकाराणी,दादामणी (अशोक कुमार)यांच्यावरचे लेख अवश्य वाचनीय.दादामणींच्या लेखाचा शेवट सआदत हसन मंटोच्या आठवणींनी केला आहे. अत्यंत हृद्य.
चौथी भिंत हेही असंच एक माहितीपूर्ण पुस्तक. उत्कट नसलं तरी रसाळ आहे.स्टूडिओच्या तीन भिंती आणि त्यांमध्ये समोरून डोकावणारा कॅमेरा ही चौथी भिंत. इसाक मुजावर यांनीही जुन्या सिनेमाबद्दल बरंच लिहिलं आहे. हरीभाऊ मोटेंच्या एक सर्वमंगल क्षिप्रा मध्ये त्यांच्या चित्रपटक्षेत्रातल्या धडपडीविषयी एक प्रकरण आहे. त्यातून त्याकाळच्या चित्रपटसृष्टीविषयी बरीच इनसाइट मिळते. एके ठिकाणी 'फिल्म इंडिया' चे अंक वाचायला मिळाले. त्या काळची माहिती आणि गॉसिप चा खजिनाच आहे त्यात.

रामदास's picture

2 Aug 2011 - 8:37 pm | रामदास

अंबरीष मिश्रना बोलावू या.
(मिपावर 'इगतपूरीचा पाऊस ' लिहीणारे प्रकाश बाळ जोशी यांचे ते सहकारी आहेत. ते माझे चुलत मित्र आहेत. बघा जमवू या काहीतरी)

भडकमकर मास्तर's picture

2 Aug 2011 - 9:04 pm | भडकमकर मास्तर

चांगल्या कलाकाराने...
( दारू प्याला .. किती भारी, जुगार खेळला किती भारी, वेडा झाला किती भारी) केलेल्या अशा गोष्टेंचं कौतुक करायची पद्धत असते...
त्य पद्धतीप्रमाणे कौतुक वाटले..

सआदर हलवीन म्हंटो.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Aug 2011 - 10:18 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, (नेहमीप्रमाणे?) यु हॅव मिस्ड द पॉइंट, असे वाटते.

हे पुस्तक वाचताना मला तरी कोणत्याच कलाकाराबद्दल उगाचच कौतुक केले आहे, त्याच्या / तिच्या दुर्गुणांचंही कौतुक केलं आहे असं जाणवलं नाहीये. भारावून केलेलं वगैरे वाटलं नाहीये. पार्श्वनाथ आळतेकर असोत की ओ पी नय्यर असो... किंवा सज्जाद हुसेन, बेगम अख्तर असोत, ते जसे जगले ते तसेच मांडायचा प्रयत्न आहे. सलग वाचताना जाणवत राहते की हे एक सलग असे कथन आहे. जसे आले तसे. कुठेही मुद्दाम चमकदार वाक्ये अथवा तत्सम प्रकार केलेले नाहीत.

हा परिच्छेद मी पुस्तकात वाचत असताना असं कुठेही जाणवलं नाही. हा परिच्छेद लिहायचं कारण आहे त्यातला शेवटचा पंच. आधी लिहिलेलं सगळं केवळ इथल्या वाचकांना पार्श्वभूमी कळावी एवढ्याच हेतूने.

तरीही, आपण हे पुस्तक वाचले असल्यास आपल्या नजरेतून या पुस्तकाबद्दल काय वाटले ते ऐकायला आवडेल. :)

ऋषिकेश's picture

3 Aug 2011 - 9:11 am | ऋषिकेश

मंटोच्या चटका लावणार्‍या आयुष्यावरचा एक लेख मागे कुठल्याशा मासिकात वाचला होता!
मात्र वर दिलेल्या तुकड्यात एक वेगळीच शैली जाणवते आहे. ही शैली विचारांवर - वेदनांवर - थेट हल्लाबोल करते. पुस्तक मिळवून वाचतोच आता.

बिका, आभार!

मनिष's picture

3 Aug 2011 - 10:09 am | मनिष

कोणाला हवे असल्यास माझ्याकडे एक जास्तीची प्रत आहे, अदलाबदल (bartering)?

किसन शिंदे's picture

3 Aug 2011 - 10:39 am | किसन शिंदे

करताय का?

"जुगारात हरलेले पैसे परत वसूल करता आले नाहीत. तुझ्या पैशाने तिनी घेतलेली ही बाटली मात्र मिळवली."
भारी (y)

निवांत पोपट's picture

22 Jul 2013 - 2:54 pm | निवांत पोपट

जबरदस्त पुस्तक आहे.'सज्जाद हुसेन' आणि 'शोभा गुर्टू' ह्यांच्यावरचे लेख ही सुंदर आहेत.'शोभा गुर्टू' ह्यांच्यावरच्या लेखाचा समारोप तर अगदी बेहद्द!