बालकालस्य कथा रम्या ! - भाग दोन

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
27 Mar 2011 - 5:51 pm

आधीचा भाग ... http://www.misalpav.com/node/17414

माझं शालेय जीवन

शाळा किंवा विद्यार्थी ह्याला 'विद्यार्थीदशा' असा एक पु.ल. पुरस्कृत चपखल शब्द आहे. कारण खरोखरच ती एक दशा असते. माझं शिक्षण 'उत्कर्ष मंदिर' ह्या मराठी शाळेत झालं ते झालंच. माझ्या शाळेत शिकवायला 'बाई' आणि 'सर' अशी दोन टाईपची लोकं असायची. त्यांच्या सोबतीस मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिपाई, कारकून आणि पी.टी. टीचर अशी फडतूस लोकंही असतात. त्यांना भाव न देणे.

माझ्या शाळेत मराठीचा तास सुरू व्हायचा तो राणे बाईंनी. त्या आमच्या वर्गशिक्षिका असत. आजचा शालेय दिवस कसा जाईल ह्या विवंचनेत मुलं तर ७० मुलांची नावं तासाच्या ४० मिनिटात कशी उच्चारायची ह्या विवंचनेत राणे बाई असायच्या. त्यामुळे दोघंही ऍब्सेन्ट माईंडेड. राणे बाईंच्या सुदैवाने वा मुलांच्या दुर्दैवाने, एकदा प्रेजेन्टी संपली की मग 'कृष्णामाई' (हे राणे बाईंचं टोपण नाव) संथ शिकवणी सुरू करीत.'संथ वाहते कृष्णामाई' हे एकच गाणं आमच्या डोक्यात तेव्हा वळवळत असे. (म्हणूनच ते टोपणनाव). त्यांनी दोन वाक्यात घेतलेल्या वेळाची आम्ही नोंद करून ठेवत असू व मागल्या आठवड्यातली रेकॉर्ड वेळ पब्लिश करत असू. सातवीत त्यांनी 'अरे खोप्यामंधी खोपा'' ह्या बहिणाबाईंच्या ओव्यात घेतलेल्या तीन मिनिटांच्या पॉज़ला प्रथम क्रमांक मिळाला होता. आमच्या नंतरच्या बॅचच्या मुलांनी त्यात भर घालून पाच मिनिटांची नोंद केलेलीही मला लख्ख आठवतेय.

आता मराठी ही मातृभाषा. ती शिकणे हे अपरिहार्य. पण त्यात गद्य आणि पद्य हे अमराठी राक्षस होते. गद्यात ज्ञानेश्वरीन मराठी धडा असे. ह्यातली भाषा ज्ञानेश्वरालाच ठाऊक. मग संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या असाही एक प्रश्न असे. 'नलाची प्रतीक्षातीव करूनी दमयंतीसंगे शुभ्रहंसाने बिजतंतूं अन नीरक्षीर नाकारले' ह्याचं स्पष्टीकरण 'दमयंती ऍण्ड हर स्वान ऑन हंगर ष्ट्राईक'' असं एका वाक्यात आटपायला हव. पण नावाने राजापेक्षा प्लंबर वाटणारा तो 'नळ' आणि भारतीय पौराणिक कथांनुसार राजहंसाची लाळ दुधाचे (आणि आमच्या डोक्याचे) दही करते असं लिहावसं वाटणं स्वाभाविक होतं. पण महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डाने मराठीच्या पेपरात विचारस्वातंत्र्य बॅन केल्याचे आम्हाला सांगण्यात आल्याने, आम्ही ती नल दमयंती आणि राजहंसाची ट्रॅजिडी वीस ओळीत लिहत असू.

पद्यात मोरोपंत नावाचा कवी होता. तो पाच वर्ष सतत आमचा क्लास मेट असे. पाच वर्ष राहूनही त्याची भाषा बोलायची मराठी होती हे आम्हाला शेवटपर्यंत कळले नव्हते.

मराठीच्या पाठोपाठ असायचा गणिताचा तास. त्याच्या शिक्षिका असायच्या दीक्षित बाई. ह्या म्हणजे हिटलर आणि आईन्स्टाईन ह्याचे चुकलेले रासायनिक समीकरण. खरं तर ह्या रासायनिक प्रक्रियेत जमलेला नकोसा रेशेड्यु समजा. तासाच्या सुरुवतीला अस्खलित को.ब्रा. लहजेत 'संखे मी बघतंय! आता वही उघडायला निमंत्रण द्यायचं की ह्या जोशीभटजींकडून मुहूर्त शोधू?' अशी जळकी कुजकी बोलून त्या मुलांना जेरीस आणत. पुढ्यात बसलेला जोशी बिचारा कासवासारखा अपल्या मानेत आकसून जाई. अगदीच कधी कधी मग 'पट्टी मारो बालक सुधारो' चळवळ असायची. त्यात बॅकबेन्चर 'आयरे' आणि 'घावरे' हे नेहेमीचे सक्रिय कार्यकर्ते असायचे. त्यांनी पाच वर्षं हे समस्त वर्गातर्फे पट्टी खायचं कार्य अगदी लीलया सांभाळलेलं. त्यासाठी दहावीत 'थँक्सगिवींग' म्हणून आम्ही त्या दोघांना दीक्षित बाईंचा फोटो छापलेली एक पट्टी भेट दिली होती. एरवी पट्टी खाताना कधी न रडलेला 'घावरे' तेव्हा भावूक होऊन मुळूमुळू रडलेला.

हे सांगताना माझ्याही डोळ्यात पाणी आलेय.

बरं तर दीक्षित बाई शिकवायच्या बीजगणित व भूमिती, 'सेमीइंग्लिश' भाषेत, अल्जेब्रा आणि ज्योमेट्री. दीक्षित बाईंचा अल्जेब्रा आम्हा मुलांत एवढा टेरर आणायचा की मला हा अल्जेब्रा, अल-कायदा किंवा अल-जझिरा नावशी साम्य असलेल्य अल-ज़ेब्रा नावाच्या कुण्या टेररीस्ट ग्रुपनी दीक्षित बाईंशी संधान बांधून बनवला असावा असेल वाटे. त्यातली अगम्य प्रमेये जणू 'खबरदार! प्रश्न विचारशील तर मुंडकं उडवीन' असे ठणकावून म्हणायची. त्यात ज्योमेट्री हे कधी न कळलेलं रेषांतले गणितही असे. साईन, कोसाइन आणि टॅन ह्या त्रिकोणी तिकडमांनी आमचे आयुष्य दणाणून टाकले होते. एवढं त्रिकोणी आयुष्य असूनही असूनही गणिताच्या पेपरात मात्र दीक्षित बाईंनी आखलेली लाल वर्तुळंच आमच्या सोबतीस येत.

त्यात असायची कॅमल कंपास पेटी. पु.लं. च्या व्याख्यानुसार ही शालेय जीवनातली एक छत्रीलायक निरुपयोगी अन हरवण्यालयक वस्तू. त्यातला तो कंपास. आखताना सुरूवातीस सगळं ठिक. पण परत पोहोचेस्तोवर वर्तुळाचं कडबोळं होणं निश्चीत. त्यात दोन टोकांचा तो डिव्ह्याडर. हा कुणाच्या बापाने तरी कधी शाळेत वापरला आहे का? उलट त्याला बघताच मला धडकी भरायची. वाटायचे की कॅमल कंपनीने ह्याला नक्कीच दीक्षित बाई आणि अलजेब्रा-ग्रुपशी कॉन्ट्रॅक्ट करून अखिल विद्यार्थी विश्वात टेररीज़मची पाळेमुळे रुजवण्यात वापरण्याचे शस्त्र म्हणून अंतर्भूत केले असावे. कॅमलवरचा तो उंट तर टेररीस्ट राहत असलेल्या अरबस्तानातल्या वाळवंटातलं प्रतीक. त्यामुळे ही शंका खात्रीत बदलणे खूप अशक्य नव्हते. हा दरारा एवढा होता की मला तर दीक्षित बाई डिव्ह्याडर हाती घेऊन त्याच्या टोकांच्या धाकाने माझ्याकडून अल-जेब्रातली त्यांनी शिकवलेली सगळी प्रमेयं फळ्यावर उतरवून घेत आहे असं स्वप्नही दहावीत पडलं होतं.

खोटं वाटतंय? ज्या कुण्या बायकांचे नवरे उत्कर्ष मंदिरात दीक्षित बाईंकडे गणित शिकलेत त्यांनी त्यांच्या नवऱ्याना विचारावं. आई जशी न झोपणाऱ्या बाळाला पलंगाखालील बुवाचा धाक दाखवते तसं दीक्षित बाईंचं नाव काढताच कसे शिस्तीत वागतील बघा !

गणित निभावला तर पुढच्या वाटेवर भूगोलाच्या काचा. त्यात देवांग सरांचा ४० मिनीटांचा ज्ञानोपदेश. इन्सोम्नियावर जालीम उपाय. त्यांच्या तासात लवंदे आडनावाचा माझा वर्गमित्र कधीकधी झोपा काढी. एकदा त्याला देवांग सरांनी "लवंदे मतलई वारे कधी वाहतात सांग बघू?" असे विचारताच "मॉन्सून मध्ये" असे खडबडून जागे होणाऱ्या लवंद्याने म्हटलेले.

आता तुम्ही म्हणाल, 'मराठीच्या तासात झोपला नाहीत ते!'

मराठीच्या तासात आमच्यात कोण एक्झॅक्ट वेळ नोंद करतोय ह्याची स्पर्धा चालायची. त्यामुळे झोप यायची नाही. शिवाय पहिल्याच तासाला झोपून कसं चालेल? झोपा काढायचेही विशिष्ट तास असतात.

इंग्रजी म्हटलं की आमचा वर्ग गार्डन-गार्डन होई (आनंदाने नव्हे.) 'ती फुलराणी' ऊर्फ वढवेकर बाई आम्हाला इंग्लिश शिकवत. त्यांना फुलराणी म्हणायचे एकच कारण की त्या रोज आंबाड्यात विविध फुलं सजवून येत. गुलाब, मोगरा, जाई किंवा अस्टर ह्या डोमेस्टीक फुलांची आरास तर सोडाच पण गुलमोहोर, जास्वंद किंवा क्वचितच केवड्यासारख्या अपरिचित फुलांचा बुकेट डोक्यावर दिसे. कधी कधी तर फक्त पानंच दिसायची. आता फुलराणी तास सुरू करायच्या त्या 'कीड्स'' ह्या संबोधनाने. आता सांगा दहावीतली मुलं हि टीनेजर असतात. त्यांना कीड्स म्हणून कसं चालेल? त्यात स्पेलिंग विचारणं म्हणजे जणू ह्या बालमनाची कत्तलच. एकदा अशाच कुणी कमनशीबी मुलाने डिफीकल्टी शब्दाची स्पेलिंग चुकीची लिहिली म्हणून कींडरगार्डनच्या मुलांना ऎकवतात तसे त्यांनी आम्हाला एक ऱ्हाईम ऎकवले, "सिक्स मॅरीड विमेन ऑलवेज ग्रीट हाय! मिसेस डी, मिसेस आय, मिसेस एफ.एफ.आय, मिसेस सी, मिसेस यु, मिसेस एल.टी.वाय!". आम्ही मात्र किंडरगार्डन मध्ये पाठवल्यागत अवघडलेला चेहेरा करून हे बोबडगीत गिरवले. आता ह्या बायकांना 'हाय' बोलण्याशशिवाय बाकी कुठलं काम नाहीये किंवा त्या सगळ्याच मॅरीड का? ह्याचे आकलन आमच्या कीडीश मनाच्या पलिकडचे होते. एवढं इंग्रजी शिकूनही 'आज माझ्या आईने केलेली मसूरची चटकदार आमटी आणि खमंग बांगड्याचा रश्श्यावर मी चापून ताव मारला' ह्याचे भाषांतर मी अजून करू शकलेलो नाही.

त्यानंतर असायचा इतिहास. आता हा विषय म्हणजे त्या सगळ्या मेलेल्या माणसांच्या कर्माची फळं आम्ही भोगत होतो असं समजा. ते शिकवायच्या 'डंके' बाई. केस भरपूर पिकलेले, एक दोन दात गायब, वेहेऱ्यावर सुरकुत्या, गळ्यात कधी कधी स्पॉंडिलायसिसचा पट्टा असं इसविसनापूर्वीचं ऎतिहासिक वय आणि नेपथ्य त्यांना लाभलेलं होतं. म्हणून इतिहास शिकवायचं काम त्याना मिळलं असावं. त्यानी आम्हाला दुसरं महायुद्ध शिकवलं होतं. जर्मनीची ब्लिट्स क्रीग तंत्राची लढाई त्या अशा प्रकारे हातवारे करून दाखवत की वाटे आत्ताच अतिश्रमाने गळून पडतील.

इतिहास व सनक्रम वारी हे नशीबातलं नेहेमीचं चुकलेलं गणित. चार मार्काच्या ह्या प्रश्नामुळे पेपर ५० मार्काचा नसून ४६ मार्काचा आहे अशी नाईलाजास्तव समजूत आम्ही मनाला शेवटीशेवटी घातलेली होती. त्याला जोडून २५ मार्काचा नागरिकशास्त्र हहा'रीन के साथ बाल्टी फ्री !' असा दीड दमडीचा विषय होता. त्यात तुमच्या विभागातील नगरसेवकाचे नाव व कार्ये लिहा असा प्रश्न आला की पोलिसातल्या यादीतले काही वर्षांपूर्वीचे खरे नाव "बाबू चप्पू ब्रॉयलर" लिहावेसे वाटे, पण अवसान गाळून आम्ही 'बाबूराव चंपकराव शेट्टी' असे लिहित असू. अन त्यामागे कार्ये लिहिताना 'खोटे बोलू नये' ह्या गांधीवचनाला आम्ही कंपास पेटीत गुंडाळत असू.

ती कंपास पेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.

मग इतरही सीजनल विषय असत. जसे संस्कृत. हा विषय जो शेवटची तीन वर्षे ब्रह्मराक्षसाप्रमाणे मागे पडला तो पडलाच. त्यातही दिवसरात्र 'देव: देवौ देवा: प्रथमा" असा अनेक रूपातला देव दिसे. अन त्यात 'अहम' ची रूपं आठवावीत तर आपल्या चांगल्या स्मरणशक्तीचा झालेला मिथ्या अहम गळून पडत असे.

विज्ञान म्हणजे विकृत ज्ञान असावे असे कधीकधी वाटे. जीवाशास्त्रात झुरळे कापण्याचे कंत्राट पाचवीच्या वर्गाला दिलेले असल्याने त्याचे पोस्ट मार्टम करताना, शरीराचा कुठलाही हिस्सा, अगदी डोकं काढूनही झुरळ तीन दिवस जगते हे माहित असल्याने, पोस्ट मार्टम केलेलं झुरळ दुसऱ्या दिवशी उठून जिवंत होईल व आपल्या मागे सुडाने पळायला लागेल अशी भीती आम्हाला सतत वाटायची. त्यासाठी आम्ही स्वसंरक्षणार्थ झुरळाचे सगळे पाय आधीच कापून ठेवत असू. शौतिक शास्त्रात नेहेमीचे बिनीचे शिलेदार न्यूटन, आर्किमिडीज भेटत. एकाच्या डोक्यावर सफरचंद पडूनही त्याने ते न खाता गरुत्त्वाकर्षणाचे सिद्धांत का मांडले व दुसऱ्याने विवस्त्र अवस्थेत पाण्यात गोष्टी तरंगतात हे अगदी शेंबड्या पोरालाही ठाऊक असलेले तत्त्वज्ञान पाजळून काय साध्य केले ते आम्हाला कळत नसे. इकडे रसायनशास्त्राने त्याच्या समीकरणांनी आम्हाच्या डोळ्यात एचटुओ आणलेले होतेच.

हिंदी भाषा चांगल्या भारतीय नागरिकासारखी दुकानातल्या वाण्याशी बोलतायेण्याइतपत शिकलो.

ड्रॉईंग मध्ये स्मरणचित्रात आम्हाला नेहेमीचा चोथा झालेला अपघाताचा विषय मिळे. अपघाताचे चित्र काढून लाल कलरने रंगवून स्मरणचित्रांऐवजी आम्ही मरणचित्रे साकारत असू. त्यात एकीकडे अपघातात माणूस मेलेला असूनही फोटो काढताना माणसं जशी अटेंशन स्माईल देत असतात तशी इतर माणासांची चित्रे आणि एकीकडे अपघाताची तमा न बाळगता फुगे विकणारा फुगेवाला, भाजीवाली असे. आकाशात सूर्य असे, पक्षी असत, पाऊस पडेल की काय इतकी शंका येई इतपत ढग असत. डोंगर असत. एकीकडे मोटार असे. त्यात नेहेमी मारुती ८०० दिसे. रोल्स रोईस किंवा मर्सिडीज ची चित्र काढण्याची सोडा पण त्या सुचण्याचीही आमची लायकी नसे. भरीस भर म्हणून मेलेला माणून रस्त्यावर झोपल्यासारखा असे अन ट्रॅजेडी दाखवायची म्हणून बाजूची लोकं न रडता मेलेल्याच्याच डोळ्यात आम्ही अश्रू दाखवत असू!

पीटीच्या वेळेत पीटीचे सर चित्रकलेच्या बाईंशी गप्पा मारत असत म्हणून तेव्हा आम्ही हवा गेलेले फुटबॉल पॅण्ट खराब होऊ नये म्हणून पसरून त्यावर बसत असू.

तर अशी गेली ती विद्यार्थीअवस्था. उत्कर्षमधली. ही शाळा नावाची पार्टटाईम जेल सोसल्यावर आपलं रूपांतर एव्हाना राकट गुंडात झालेलं असतं. त्यात दहावी नावाची सक्त मजुरीची शिक्षा असते. ती एकदा सोसली की आपल्याला राज्य करण्यासाठी कॉलेज नावाचा आपला एक इलाका मिळतोच. पण काहीही म्हणा तिकडे अन पुढच्या आयुष्यातल्या संकटांशी राडा करण्यासाठी हे शाळेतलं शिक्षणच मग कामी येतं.

क्या बीडू लोग. सही बोला ना?

[क्रमश:]

पुढील भाग ... http://www.misalpav.com/node/17431

कथाविनोदमौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

27 Mar 2011 - 6:06 pm | रामदास

आमच्या नशिबानी बर्‍याचशा मॅडम बर्‍याच बर्‍या होत्या.

पिवळा डांबिस's picture

27 Mar 2011 - 11:03 pm | पिवळा डांबिस

नशीबवान आहांत तुम्ही, रामदास!
आम्हाला शाळेत "म्याडम" (हा शब्द मराठी शाळेत असाच लिहितात!!) नव्हत्या. होत्या त्या सगळ्या "बाई"!
आणि त्या सगळ्या "बाई" या वर्णनाला शोभेश्याच होत्या!!:(

म्हणून आम्ही आमचा अभिप्राय विनीत कॉलेजात जाईपर्यंत राखून ठेवत आहोत!!!:)
-एक्स झेवियराईट

नन्दादीप's picture

27 Mar 2011 - 6:18 pm | नन्दादीप

मस्त....पहिला भाग पण भारी होता...
खतरी.

"संखे मी वाचतंय! आता या वेळच्या 'क्रमशः' पुढलं लिहायला निमंत्रण द्यायचं की त्या जोशीभटजींकडून मुहूर्त शोधू?"

हेच म्हणतो......

पुलेप्र.....

:-)

छान हाही भाग अतिशय उत्तम जमलाय.शाळा, कॉलेजची आठवण झाली.

विनीत, शाळेची आठवणं झालीच, पण एक खटकलं सगळ्याच आठवणी ह्या पुलंच्या विद्यार्थीदशा, हा भाग पुढं ओढण्यासाठी लिहिलेल्या वाटल्या. म्हणजे थोड्या एकसुरी, थोडंसं ओढुन ताणुन केलेलं वाटलं. कदाचित माझे वडिल शिक्षक असल्यानं असेल तसं. कारण शिक्षक पेशाची जी दुसरी बाजु असते ती मी फार जवळुन पाहिली आहे..

शिक्षकांवरच पुलंनी लिहिलेले चितळे मास्तर, जे मुलांना घरी बोलावुन फुकट शिकवणी घ्यायचे, ते जास्त भावतं मनाला. असं जर सगळेच शिक्षक आणि विषय न आवडणारे असते, तर आपण शिकलोच नसतो, नाही का ?

विनीत संखे's picture

28 Mar 2011 - 8:48 am | विनीत संखे

खरं सांगू? ह्या सगळ्या बाई आणि सर अजूनही स्मरणात तसेच लख्ख आहेत, हेच त्यांचं माझ्या शैक्षणिक स्मृतींमध्ये किती अढळ स्थान आहे हे दर्शवण्यास पुरेसं आहे.

फक्त व्यक्तिरेखाचित्रण करणे हा ह्या लेखनाचा हेतू नव्हता. म्हणूनच केवळ 'दीक्षित बाईं' विषयी लिहिलं नाही कारण त्याच खरंतर (चितळे मास्तरांसारख्या) सर्वात आठवणीतल्या बाई आहेत.

लेखन उपहासात्मक आहे हे गृहीत धरावे.

:)

येस्स! विनोदी लिहिण्या साठी पात्र शोधुन शोधुन लिहाव लागत हे मात्र खर.

दोन्ही भाग आवडले विनीत. चल लवकर लवकर शाळा संपव पाहु ! शहाणा बाळ तो!

कच्ची कैरी's picture

28 Mar 2011 - 2:02 pm | कच्ची कैरी

मस्त लेख ,शाळेतले दिवस आठवले ,आमच्या इंग्रजीच्या खानकरी म्याडम काही मुल उपहासाने त्यांना घाणकरी म्याडम असही म्हणायचे ,बावळट कुठले ! त्या म्याडम मला फार आवडायच्या आणि त्यांना मी आवडायचे कारंण त्यांच्या तासाला माझ्याशिवाय कुणीच त्यांच्याकडे फारस लक्ष देत नसे ,आणि त्यांनाही मुलांना फारस रागवण जमत नसे .पण मजा यायची त्यांच्या तासाला :)