बालकालस्य कथा रम्या - भाग तीन

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
28 Mar 2011 - 8:09 pm

आधीचा भाग ... http://www.misalpav.com/node/17416

आजीअक्का

मोठं झाल्यावर अक्कल येते असं म्हणतात. त्याच अकलेतून आपण भोवतालचा अर्थ-अन्वयार्थ लावतो आणि एखादी गोष्ट आयुष्याचं अंतिम सत्य मानून चालतो. माझ्या जीवनाचं एकच सत्य होतं की मला कितीही अक्कल आली तरी मी आजन्म आजीअक्का पुढे बाळ होतो.

आजीअक्काने मला लहानपणापासून सांभाळले. तेही अर्थातच आईच्या सोबत. म्हणजे त्यात सांभाळायला माझे वडीलही होतेच. त्याशिवाय माहिमची आजी, गणपतीपुळ्याची आजी अन आजोबा, ताई आणि पप्पांचे मोठे भाऊ महादेवकाका व इतर मंडळी (ही लिष्ट मी ताईच्या लग्नपत्रिकेतून थेट उचलली आहे). तरी आजीअक्का स्पेशलच. मी बारा तेरा वर्षाचा असेपर्यंत तिने अन आईने माझं पालन केलं. आता मला सांभाळायला दोघी जणी लागल्या हे वाचून मी लहानपणी बराच टारगट होतो असं समजायचं काही कारण नाही. ते सगळेच असतात. पण माझ्या ह्या स्सो कॉल्ड टारगटपणाला लगाम घालायचे काम मात्र आजीअक्का ने चोख बजावले.

तिला आजी म्हणायचं तसं काही कारण नव्हतं. आई तिला अक्काच म्हणायची. अक्का बेळगावची म्हणून ‘अक्का’. पण ती काही टिपिकल कानडी नव्हती. बेळगाव सिल्कच्या एकदोन साड्या असाव्यात तिच्याकडे. तेवढं काय ते कानडी सूत. थोडं कानडी बोलता यायचं. आपण जसे "अरे देवा!!" म्हणून किंचाळतो तसं आजीअक्का "अय्यो व्यंकटेश्वरा!!!" म्हणून किंचाळायची. तिथे तिची कर्नाटकी मुळं दिसायची. पण मात्र मुंबईत बरीच वर्षं मराठी कुटुंबात काम केल्याने तिचं मराठी बरंच चांगलं होतं. कधीकधी तर तिचं मराठी ऎकून, फक्कड मटण करणारी अक्का, ब्राह्मणगोत्रातली म्हणून सहज खपून जावी. तिच्या डोक्यावरचे केस मला ‘ब्लॅक ऍण्ड व्हाईट’ ह्यातला फरक कळायच्या आधीच पांढरलेले. माहिमच्या आजीचेही केस त्यासुमारास पांढरे झालेले अन दात पडले होते. त्याच मिश्र आयडेन्डिटी मुळे मी गोंधळून ‘केस पांढरलेली बाई म्हणजे आजी!’ असं समजून तिला आजीअक्का म्हणू लागलो होतो.

ह्या आजीअक्का सोबतचा प्रत्येक क्षण माझ्या स्मृतीपटलावर जणू कायमचा कोरला गेलाय. तिनं मला पहिल्यावहिल्यांदा मालाडच्या सोमवार बाजारात नेल्याचे अगदी पक्के आठवते. मी प्रथमच एवढी गर्दी पाहून तिचा हात अगदी गच्च पकडून ठेवलेला. तसा तो सुटून जाऊ नये म्हणून तीही पुरेपुर काळजी घेत होती. मालाडच्या गर्दीत अगदी सराईतपणे चालणाऱ्या आजीअक्कात बझार-वुमन-शिप केव्हाच आली होती. मी तिच्या सोबत आपला तिच्या चालण्याचा मागोवा घेत फरपटत चालत होतो.

"हिरवा केळा कितनेका दिया?", तिनं केळेवाल्याला विचारलं.
"दझनका छे।", केळेवाल्याने आधीच केळी मोजायला सुरूवात केली.
"अरे ठैरो ठैरो. इतना महाग? तीनमें दो।"
"ऎसा कैसा बहन? तीनमें कैसे? जलगावके केले है।", मुंबईतल्या भैयांना महाराष्ट्राचा फलोत्पादन इतिहास मराठी माणसांपेक्षा जास्त माहित!
"जलगाव का है या मलगावका ... मुझे शिकावो मत।"
"चलो बहन साडेतीन मे लेलो।"
"नाही. तीनच फक्त", तिनं तिच्या पर्समधून एक रुपयाची गंजलेली भिक्कार दिसणारी तीन नाणी काढली.
"नही तीनमें नही", केळेवाला स्थितप्रज्ञ होता. तसा ह्या संभाषणात हिंदी फक्त केळेवालाच बोलत होता.
"ठिक है", असं म्हणून आजी आजीअक्काने पुढचा रस्ता धरला.
"रूको बहनजी, चलो लेलो तीनमे", केळेवाल्याने हार पत्करली. केळी पिशवीत भरून तो दिलेल्या नाण्यांकडे बघत म्हणाला, "ये क्या बहन, तीनमे केले लिये तो अच्छे सिक्के देने थे।"
"केलेको देखके पैसा दिया है।", आजी अक्काने सिक्सर ठोकला. केळेवालाचा चेहेरा पिशवीत ठासून भरलेल्या काळ्या केळ्यांसारखा काळवंडला.

पुढचा स्टॉप होता लुंगीवाला नारळपाणीवाला. दोन शहाळी घरी न्यायची होती. तसं मला शहाळी आवडतात. पण ती प्यायची म्हणजे काळ्याकुट्ट नारळापाणीवाल्यांकडे जायचं. इथे मात्र सगळी हौस भीतीने फिटायची. त्यांचा तो रुंदाड भेसूर चेहेरा, काळे दाट केस, विरप्पनछाप मिशी अन त्यावर दगड तासून गोटे बनवेल अशा शक्तीचा धारीष्ट कोयता. कित्येक पौराणिक चित्रपटात आपण यम ही ह्याच रूपाचा बघतो. (नारळ्पाणीवाल्यांचाही असा काही ड्रेस कोड असतो का हो? .... तसा नसावा. कारण टाय बांधलेला नारळपाणीवाला आहे गेट वे ऑफ इंडियाला....)

ह्याच्याकडे बघताना मला हळूहळू त्याचे सुळे तोंडातून बाहेर येत असल्याचंही जाणवलेलं म्हणून मी घाबरून आजीअक्काच्या मागे लपलो. तेवढ्यात त्या नारळपाणीवाल्या असूराने दोन शहाळी सोलून तासून आजीअक्काच्या हाती धरली. अक्काला त्याची विशेष भीती वाटत नसावी. तिने आरामात ती शहाळी पिशवीत भरली. पण तोच पिशवीला गळती सुरू झाली. एक शहाळं गळत होतं. झालं! आजीअक्का त्याच्याशी जुंपली.

"नारीयल सोलनेको आता नही तो इधर काम क्यू करत है? मेरे पिशवीमे आटा भी था. वो ओला हो जाता तो मेरा २ रूपया फुकट जाता ना? इस्से अच्छा नारीयल तो मै सोलती हूं।"

दुकानदारांशी भांडताना आजीअक्का मागच्या जन्मीचा कुठलातरी सूड ऊगारायची. बोलून बोलून दुकानदाराला एवढं विटून टाकायची कि चूक कुणाचीही असली तरी शेवटी दुकानदारच माफी मागून वस्तू बदलून द्यायचा. पण ह्याखेपेस नारळपाणीवाल्याच्या चेहेऱ्यावरची माशीही हलली नव्हती. उलट तो मंद हास्य फुलवत होता. आजीअक्कासाठी हा मोठा धक्का होता. तो हसताना त्याच्या तोंडातले ते सुळे आणखीच ओठांबाहेर आले होते. मी आजीअक्काला मागे खेचलं.

"कमाल आहे ह्या माणसाची! मेरा इतना नुकसान किया, पण माफी मागणं तर सोडाच पण उलट हा हसतोय. हलकट मेला!"

तेवढ्यात आजूबाजूला बघ्यांची पुरेशी गर्दी जमली होती. त्यात तो मघाचचा केळेवाला ही होता. तो पुढे आला अन हळूच आजीअक्काला म्हणाला, "अरे बहन इसको बोलके कुछ फायदा नही. इसको समझेगा नही."

"क्यूं. समझता नही है तो फिर ऎसे आदमीको काम पे रखनेका क्यूं? भैरा है क्या?", आजीअक्काच्या कपाळावर घाम अन आठ्यांचं मोझॅक जमलं. इथे नारळासूराचे हास्य आणखीच भेदक होत चालले होते.

"अरे ये बहेरा वेहेरा कुछ नही है. ये साऊथसे आया है. इसको हिंदी नही आती!!"

"काय हिंदी नही आती? अय्यय्यो!!!". आजीअक्काला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. आता योग्य भाषेशिवाय भांडणार कसं? पण ती सहजासहजी हार मानणार्‍यांपैकी नव्हती. तिनं नीट न्याहाळलं तसं तिला दिसलं की त्याच्या दुकानावर व्यंकटेशस्तोत्रम कोरलेलं होतं. व्यंकटेशस्तोत्र ब्रह्मदेवाने वेदांमध्ये लिहिलेले आहे असे म्हणतात. पण दर सकाळी, "आता ऎकूया कर्नाटकी गायिका सुब्बालक्ष्मी यांचं व्यंकटेशस्तोत्रम" असं म्हणणाऱ्या रेडीयोवरील निवेदिकेने मला पुरेपुर पटवून दिलेलं कि हे स्तोत्र नक्कीच ब्रह्मदेवाने सुब्बालक्ष्मींकडून चोरलेले असणार. त्यामुळे हा आपलाच गाववाला हे आजीअक्काने त्वरित ताडलं. मग काय? बेळगावची अक्का आणि कानडी अण्णा यांत खडाजंगी सुरू झाली. मी घाबरून एकीकडे हातांचं छातीशी कोंडाळं करून उभा होतो.

"...नीवु दुडियल्लु फटिंगा \!", भांडणाची सांगता आजी अक्कने कानडीत "हलकट कामचोर" म्हणून केली अन अण्णाने उभय कर्णी हस्त ठेवून तिला नुकसानीच्या बदल्यात तीन नारळ दिले.

घरी आल्यावर आजीअक्काने मला झोपताना दुर्गेची कथा सांगितली. तिला पौराणिक कथांचं वेड फार. टिव्हीवर महाभारत तर अशा तल्लीनतेने बघायची की मीरेची कृष्णसाधना त्यापुढे फिकी पडावी!

ती कथा ऎकताना मी झोपी गेलो. रात्री अक्का, नारळापाणीवाला अण्णा आणि केळेवाला स्वप्नात आलेले. अक्का दुर्गा होती अन अण्णा महिषासुर बनून तिच्या त्रिशूळाखाली आलेला धाय मोलकून तिला तीन नारळ देत होता.

आजी अक्का जिंकली होती.

आता केळेवाला काय करत होता? काय माहित ......

अलिकडे भैये कुठेही अतिक्रमण करतात हो..... अगदी स्वप्नातही!

-- विनीत संखे.

कथाबालकथाविनोदलेखअनुभव

प्रतिक्रिया

इरसाल's picture

28 Mar 2011 - 9:28 pm | इरसाल

सहि रे हहपुवा

विनीत संखे's picture

29 Mar 2011 - 8:55 am | विनीत संखे

हहपुवा म्हणजे?

प्रास's picture

29 Mar 2011 - 10:27 am | प्रास

हसून हसून पुरे वाट.....

विनीत संखे's picture

29 Mar 2011 - 11:50 am | विनीत संखे

आता कळलं :)

धन्यवाद.

लई भारी झालाय आजिअक्काचा भाग, येउ द्या येउ द्या, तुम्ही लिहित रहा आम्ही वाचत राहु.

गणेशा's picture

28 Mar 2011 - 11:07 pm | गणेशा

मस्त चालले आहे लिखान ..
मनापासुन आवडले .. एकदम छान ..
व्यक्तीरेखा आवडल्या सगळ्या ..
विशेष करुन भाग -२ जास्तच .. एकदम जवळीक वाटली त्या भागाशी ..

लिहित रहा .. वाचत आहे ..

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 6:32 am | नगरीनिरंजन

मस्त! केळेवाल्याशी आजीआक्काचा संवाद वाचून कणेकरांच्या "ये कवडीचुंबक का घर हय" या संवादाची आठवण झाली. लेख मस्त मजेदार झाला आहे.

भारी !! शेवटच्या स्वप्नाचा टच तर मस्तच! अगदी खमंग फोडणी जणु.

sneharani's picture

29 Mar 2011 - 10:21 am | sneharani

मस्त लिहलय! येऊ दे पुढचे भाग!

प्रास's picture

29 Mar 2011 - 10:28 am | प्रास

हेच म्हणतो मी....

शिल्पा ब's picture

29 Mar 2011 - 10:32 am | शिल्पा ब

तिनही भाग छान आहेत. पु.ले.शु.

हरिप्रिया_'s picture

29 Mar 2011 - 10:33 am | हरिप्रिया_

मस्त लिहलय...
आवडल... :)

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 10:51 am | नन्दादीप

मस्त जमलाय हा भाग.. ह. ह. पु. वा.

लय भारी...

मुलूखावेगळी's picture

29 Mar 2011 - 11:04 am | मुलूखावेगळी

अलिकडे भैये कुठेही अतिक्रमण करतात हो..... अगदी स्वप्नातही

हाहाहाहा
मस्त हो
छान लिहित अहात.

कच्ची कैरी's picture

29 Mar 2011 - 12:09 pm | कच्ची कैरी

मस्त कथा आहे !तुमच्या आजीअक्का आणि केळेवाल्याचा संवाद एकुन माझी आजी आठवली मला .

वपाडाव's picture

29 Mar 2011 - 1:16 pm | वपाडाव

येउ द्या...
पण पराने सांगितल्याप्रमाणे थोडं अंतर ठेवा लिखाणात...
निदान क्रमश:चे भाग टाकताना तरी....

अहो वडपाव भाऊ सांगा तरी किती अंतर?

मुलूखावेगळी's picture

29 Mar 2011 - 6:29 pm | मुलूखावेगळी

सांगा तरी किती अंतर?

१ला आनि २रा यात किती अंतर असावे हा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हो.
टाकत रहा हो लेख तुमच्या इच्छेप्रमाणे ;)

सूड's picture

29 Mar 2011 - 1:43 pm | सूड

छान लिहिलंय !!

प्रीत-मोहर's picture

29 Mar 2011 - 5:54 pm | प्रीत-मोहर

छान हो!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Mar 2011 - 7:34 pm | निनाद मुक्काम प...

आपले एवढे अप्रतिम लिखाण पाहून एकच सांगावेसे वाटते
''जो पर्यत असे लिहित जाल तो पर्यत अगदी रोज एक ह्या प्रमाणे लेख लिहिले तरी मिपाकर तुमच्यावर प्रेम करतील .( तुम्हाला आलेल्या असंख्य प्रतिसादावरून हे सिद्ध होते )
कथा अर्धवट सोडणाऱ्या अर्धवट रावांच्या विनंती नुसार वागाल तर, आम्ही ह्या दर्जेदार लेखनाला मुकु'' ..
तेव्हा'' लिहित जा .ही आग्रही विनंती'' .

अवांतर - तुमच्या अश्या सकस लिहिण्यामुळे आमचे नाव मागे पडते .मग सैदेव तिरकस प्रतिसाद देऊन आम्हाला नाईलाजाने प्रकाश झोकात रहावे लागते .

पिंगू's picture

29 Mar 2011 - 10:02 pm | पिंगू

>>> रात्री अक्का, नारळापाणीवाला अण्णा आणि केळेवाला स्वप्नात आलेले. अक्का दुर्गा होती अन अण्णा महिषासुर बनून तिच्या त्रिशूळाखाली आलेला धाय मोलकून तिला तीन नारळ देत होता.

हाहाहा.. फुटलो तिच्यायला.

तिनही भाग वाचले. छान लिहितो आहेस भाऊ. लिहित रहा. :)