शैशव:
आईच्या पोटातले नऊ महिन्यांचे सुखैनव जीवन घालवताना आपल्याला तशी कसलीच काळजी नसते. सुखाच्या सागरात तरंगत आईच्या वाटचे चमचमित जेवण हादाडत आरामात पहुडणे ह्याला तोड नाही. पुढल्या आयुष्यातले दुर्दैवाचे दशावतार आपल्या ध्यानीमनीही नसतात. पण भाड्याचं घर कित्तीही छान असलं तरी भाडेकरूचं नसतं तसंच ह्या घरातही आपली व्यवस्था निसर्ग नामक एजण्टने फक्त ९ महिन्यांपुरताच केलेली असते. काही जास्त महिने एक्स्टेंशन द्यावे म्हणून अर्ज करावा तर निसर्गाच्या हातात ब्रह्मदेवाचं निसर्गनियमांचं ऍफिडेविट. मग एके दिवशी आपण लाथ मारून बाहेर हाकलले जातो. तिथून मग खऱ्या दिव्याला सुरूवात होते. ते दिव्य म्हणजेच बालपण.
बालपण म्हणजे त्रास हा वाद मी वादंगभगिनी मोमता बॅनर्जीच्या समोर घालू शकतो कारण त्याला माझा १२ वर्षांचा तृणमूल बालानुभव गाठीशी आहे. ह्याची सुरूवात होतेच शैशवाशी.
आईच्या पोटातून बाहेर आल्यावर जरी रडायला येत नसतं तर लोकं पायाला टीचक्या मारून मारून रडवतात. रडत रडत डोळे किलकिले करून बघावं तर आजूबाजूला सगळे दात काढून हसत असतात. आपलं ट्यॅ ट्यॅ चालू असतं आणि त्यांचं ह्यॅ ह्यॅ!
आजूबाजूला बघायला लोकांचा एवढा गल्ला जमतो की जीव नुसता त्यांच्या गलबल्याने हैराण होऊन जातो. त्या मासळी बाजारात मग शेवटी एका ऊबदार ओंजळीत आपल्याला ठेवतात. तिथे कुणीतरी आपल्याशी बोलत असतं आपल्याला ऊराशी धरत असतं. हा स्पर्श, हा आवाज ओळखीचा असतो. मग आठवतं हा तर आपला घरमालक!! म्हणजे आईच ती!! तिच्याकडे असताना बरं वाटतं. वाटतं कदाचित पुन्हा पोटात घालेल आणि म्हणूनच त्या आशेवर आपण तिच्याकडे जास्त रडत नाही. पण ते सगळं खोटं असतं हो. म्हणजे शेवटी ह्याची जाणिव व्ह्ययला काही दिवस जावे लागतातच. ते शहाणपण पहिल्या दिवशी येत नाही. आता उघड्यावरच आपला संसार असतो.
मग घरी आणल्यावर जो तो मुलगा की मुलगी म्हणून आपली लंगोटी सारून पाहून आपल्या सार्वजनिक विनयभंगाचा हक्क सांगणारा. अस्सा राग येतो सांगू. पाहणाऱ्याच्या तोंडावर मूत्रधारेची अचूक पिचकारी मारावीशी वाटते. त्यात जो सर्वात वात्रट त्याला तर ह्या "तीर्था"सोबत "प्रसाद" ही द्यायचा असतो. बाळ ज्याच्यावर प्रथम मुततं तो बाळाला न आवडलेला पहिला माणूस होय. स्वानुभवाने सांगतोय.
मग आपल्याला पाळण्यात ठेवतात. हे ठिकाण म्हणजे झ्झाक्क हा! एकदम बेष्ट. छताला टांगलेला पंखा तेव्हा माझ्याशी लपंडाव खेळत असतो आणि प्रत्येक झोक्यासोबत येत जात असतो. हा पंखा माझ्या बालपणातला माझा पहिला मित्र होय.
पण पंखा आणि आई ह्या मित्रांची यादी इथेच संपते. आईच्या व्यतिरिक्त बाकी सगळे म्हणजे नुसताच त्रास. मालिश करणारी म्हातारी म्हणा की धुरी देणारी आजी म्हणा. त्यांत एक बाबा नावाचा माणूस असतो. नुसताच आईच्या आणि आपल्या कामात लुडबुड करत असतो. माझ्या हाती असतं तर मी माझ्या पाळण्यात "बाबा फ्री झोन" डिक्लेयर केला असता. त्यात मिशीवाला बाबा म्हणजे अजूनच कटकट. आईचा मुका म्हणजे गुलाबस्पर्श पण मिशीवाल्या बाबाचा मुका म्हणजे काटेरी निवडुंग. त्यात माझा तर बॅडलक अजून खराब. माझ्या घरातला बाबा तर दाढीवालाही निघाला!
वळणे, मान उचलणे, रांगणे आणि मग महतप्रयासाने उभे राहून चालणे हे सगळं आपणहून करायचं असतं. मनासारखं खेळावं, जरा घरातला कचरा चाटवा, मातीसारखा टेष्टी खाऊ खावा तर सगळे गर्दी करून येणार, आपल्या तोंडात त्यांची बोटं घुसडून तोंड साफ करणार आणि डोळे वटारणार. हे नेहेमीचंच. तरी आपण कधी कधी त्यांचा डोळा चुकवून पायपुसणी, चपला अन झाडू चाटून घेतोच. हे म्हणजे पुढे आईच्या नकळत डब्यातल्या गोळ्या, चॉकलेट, आईस्कीम खाता येण्याची प्रॅक्टीस असते ती.
"काका", हा माझा पहिला सुसंबद्ध शब्द. ह्याचा अर्थ काय देव जाणे! पण त्यानंतर मी आजी, वॉचमन आणि बाबाला ही काकाच म्हणायचो. "काका" (वरील सगळी मंडळी), बालपणातले दोस्त "चिऊ"-"काऊ" (दोस्त! साफ खोटंय ते! हे दोघे सदानकदा माझ्या जेवणावर टपून बसलेले. आई त्यांच्या नावाने सतत मला भिवयायाची. पण खरं सांगू त्यांना मी कधीही माझं खिमट खाताना प्रत्यक्ष पाहिलं नाहिये. कदाचित त्यांच्याकडे माझा मिकी माऊस चमचा नसावा. असो), "कबू" (पोपट आणि कबूतर दोघांना चालते), "मामा" (हे इंग्रजीत आई आणि मराठीत तिचा भाऊ असे दोघांना संबोधित) असे अनेक शब्द आपण बोलायला शिकतो. पण ते शिकल्यावर पुन्हा पुन्हा "काका" बोल, "मामा" बोल, "कबू" बोल अशा फर्माइशी चहू बाजूने येऊ लागतात. त्यात "आई कुठे आहे दाखव?" असं कुणी विचारता आई दाखवून आपण"ती आई" असं म्हणतो, तर सगळे एकदम खूश होतात. पण त्या कौतुकात "बाबा कुठे आहेत दाखव?" असं कुणी विचारता "तो बाबा" असं म्हणावं तर सगळे लाडावून रागावतात आणि म्हणतात, "तो नाही ... ते बाबा म्हण".
मी मात्र गोंधळून "ते" ह्या अनेकवचनी सर्वनामातले "ते" अनेक बाबा घरात शोधत राहतो!!!
ते अनेक बाबा शोधण्यातच माझं शैशव संपतं अन पुढचं शालेय जीवन सुरू होतं.
[क्रमशः]
पुढचा भाग ... http://www.misalpav.com/node/17416
प्रतिक्रिया
27 Mar 2011 - 2:34 pm | प्रास
विनीत भौ,
छान सुरुवात केलीय.
येऊ द्या पुढचे लौकरात लौकर......
27 Mar 2011 - 2:53 pm | प्रीत-मोहर
मस्त!!!
27 Mar 2011 - 3:03 pm | योगी९००
विनीत भाऊ ..एकदम मस्त..
नुकताच आमच्या घरी बाळ आलेय (आजच त्याचे बारसे आहे)..त्याचे विचार असेच असतील असे वाटते (बाबा विषयी)..कारण मी त्याला घेतले रे घेतले की तो थैमान घालतो..एकदा तीर्थप्रसाद सुद्धा देऊन झालाय..
पुढचा भाग लवकर टाका...
27 Mar 2011 - 3:05 pm | पैसा
मोठं व्हायचं म्हणजे किती त्रास हो!
27 Mar 2011 - 3:16 pm | पियुशा
मस्त जमलाय !
येउ देत पटापट :)
27 Mar 2011 - 3:34 pm | निनाद मुक्काम प...
एवढ्या विविध विषयांवर लिहिणे कसे जमते बुआ ?
आम्ही मात्र आमच्या रटाळ आख्यानात ( जाहिरातबाजी ) व राजनैतिक कुटनीती ह्याच्या पुढे जाऊच
शकत नाही .
पुढच्या वेळी पु ले शु लिहिणार नाही .
ते आता गृहीत धरावे .
27 Mar 2011 - 5:40 pm | निवेदिता-ताई
एकदम छान .............येउद्यात लवकर पुढ्चे लिखाण...
27 Mar 2011 - 6:08 pm | विनीत संखे
पुढचा भाग ... http://www.misalpav.com/node/17416
आभार! :)
27 Mar 2011 - 7:50 pm | इरसाल
छान.......अतिशय छान
28 Mar 2011 - 7:02 am | ५० फक्त
परकायाप्रवेश करुन एवढं छान लिहायला बराच वेळ लागला असेल ना तुला विनित. बाकी दाढीवाला अन मिशिवाला हे उल्लेख मजेचे वाटलं.
पण लहान बाळ जेवढं आईला ओळखु शकतं तेवढंच ते त्याच्या बाबाला पण ओळखु शकतं, त्याचा स्पर्श बाळाला लगेच ओळखु येतो, हा माझा अनुभव आहे.
28 Mar 2011 - 12:15 pm | पिंगू
झकास शैशव अगदी छान मांडले आहे.
- पिंगू
28 Mar 2011 - 10:56 pm | अंतु बर्वा
छान लेख..
जॉन ट्रोवोल्टा च्या Look Who Is Talking या सिनेमात अशाच प्रकारे एका लहानग्याच्या नजरेतुन सर्व घटना दाखवल्या आहेत.
http://www.youtube.com/watch?v=yOB_MqcaZHw