अक्षरलेखन - काही टिप्स

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
7 Feb 2011 - 12:50 pm

माझ्या मागच्या एका धाग्यात बर्‍याच जणांनी माझ्या अक्षराचे कौतूक केले होते अन मी 'अक्षर लेखन कसे सुधारावे' याबाबत लेखही लिहीणार होतो. बर्‍याच दिवसांपासून लिहीन लिहीन म्हणत होतो पण वेळ नसल्याने हा लेख लिहीला नव्हता.

आता माझे अक्षर फारच छान आहे अशातला भाग नाही. कदाचीत हा लेख माझ्या जुन्या स्मृतींना उजाळा असूही शकतो.

लहाणपणाचे माझे अक्षर कसे होते याबाबत मला आठवत नाही. माझ्या लक्षात माझी इयत्ता ५ वी पुढील वर्षे आहेत. इयत्ता ४ थी पर्यंत माझ्या वेळी पाटी अन पेन्सील असायची. म्हणजे वह्यावैगेरे होत्या असे आठवते, पण माझे अक्षर नक्की कसे होते अन लिहीतांना मी लेडपेन्सीलचा किती वापर करायचो ते नक्की आठवत नाही. नाही म्हणायला चित्रवैगेरे काढायचो. माझे १० वी पर्यंत शिक्षणाचे मराठी माध्यम होते. ५ वी नंतर शाळेचा कॅनव्हास मोठा झाला. माझे अक्षर तेव्हा फार वळणदार होते असे नाही. जाणूनबुजून, अक्षर सुधारणा होण्यासाठी पानेच्या पाने शुद्धलेखन कर असा काही प्रकार मी केला नाही. शाळेतल्या शिक्षकांनीही तसे प्रयत्न केले नाही. गृहपाठ त्यांनी तपासला पण कधी अक्षरावरून मार खाल्ला नाही. म्हणजेच माझे अक्षर इतरांनी वाचण्यायोग्य निश्चीतच होते.

त्यावेळी आत्ताच्यासारखे बॉलपेन, जेलपेन यांचे प्रस्थ नव्हते. जे काही मिळायचे ते शाई भरून वापरायचे फौंटनपेन मिळायचे. बॉलपेन वापरणे म्हणजे काहीतरी गैर करणे असे वातावरण होते. शिक्षकसुद्धा बॉलपेनने लिहीलेले असले की शिक्षा करायचे असे आठवते. शाईचा फौंटन पेन वापरला तर अक्षर सुधारते असा प्रवाद असायचा. त्या काळी Waterman व कॅम्लीन असले ब्रांडेड फौंटनपेन प्रसिद्ध होते. शाळेत काही वेळेस फिरते विक्रेते त्यांच्याकडचे शाईपेन विकायला यायचे. त्या पेनांवर बॉलपेनही मोफत असायचा. मी कधीच तसले पेन विकत घेतले नाहीत. त्याकाळी एकतर खिशात आता आपण देतो तसला पॉकेटमनी मुलांना द्यायची पद्धत नव्हती. माझ्या वडलांच्या ओळखीचे एक 'दिपक स्टोअर्स' म्हणून स्टेशनरीचे दुकान होते. तेथूनच आम्ही आमचे पेन, पेन्सीली, कागद आदी वस्तू घेत असू. फौंटनपेन विकत घेणे ही एक चैन असायची. फौंटनपेनची निब ही पुर्ण लांबीची असायची. बर्‍याचवेळा ही निब घासली जायची किंवा वाकडी व्हायची. मग २५-३० पैशात नविन निब टाकावी लागायची. निबच्याखाली असलेली जिभ ही कधी बदलावी लागायची नाही. त्या निब अन जिभ ची सेटींग करून (योग्य अंतर ठेवून) शाईचा फ्लो कमी जास्त करता यायचा. असल्या फौंटनपेनमध्ये शाई भरावी लागत असे. शाईची मोठी दौत घरी भरलेलीच असायची. ती कॅम्लीन कंपनीची होती असे आठवते. दुकानात शाई भरणे हाही प्रकार असायचा. अमुक दुकानातली शाई फिकी असते अशा गोष्टीही मित्रांमध्ये होत असत. शाई भरण्यास ५ पैसे लागत. एकदा दुकानदाराने आग्रह करून एक हाफ निबचा चायना पेन (त्याकाळीही असलेला!) घ्यायला आग्रह केला होता. त्यात शाई भरणे फार सोपे होते. पेन उघडला की त्याच्या आतमध्ये एक प्लास्टीकचे ड्रॉपर असे. ते दाबून पेन दौतीत बुडवला अन ड्रॉपर दाबणे सोडले की निबेद्वारे तो पेन शाई शोषून घेत असे. पण त्या हाफ निबच्या चायना पेनमध्ये शाई कमी बसत असे. माझा ५ वीत पहिला क्रमांक आला होता. वार्षिक स्नेहसंमेलनात मला शाळेने एक फौंटनपेन बक्षिस दिला होता. तो गळका निघाला.

ह्या फौंटनपेनला आठवड्यातून धुण्याचाही कार्यक्रम असे. नंतर तो वाळवणे शाई भरणे असले उपकार्यक्रमही होत असत. एखाद्या भांड्यात पेन बुडवायचा तेव्हा ते पाणी निळे होई. तो निळा रंग आपण कपड्याला निळ देतो तसा असे. सगळ्या मुलांच्या कंपासमध्ये २/३ तरी शाईपेन असतच असत.

सहावीत असतांना माझ्या एक इंग्रजीच्या शिक्षकांकडे शिकवणी लावली होती. शिकवणी दुपारची असायची. शिकवणी सुरू होण्याच्या आधी अर्धा तास आम्ही मुले त्यांच्या घराबाहेर जमत असू. त्यात एक जनार्दन नावाचा माझा मित्रही होता. त्याने एकदा तेथील फरशीवर फौंटनपेन घासला. त्याला त्याबद्दल विचारले असता 'त्याने पेन चांगला चालतो अन अक्षर चांगले येते' असे सांगितले. मीही माझा पेन तेथे घासून घेतला. थोडक्यात निबचे टोक जाड करण्यासारखा तो प्रकार होता. त्या वेळी कधी जाणूनबुजून इतर कोणाचे अक्षर बघणे, वही मागणे आदी प्रकार केले नाहीत. नंतर त्याच की पुढल्या वर्षी माहीत नाही, पण माझ्या वर्गात दत्तात्र्येय नावाचा मुलगा आला. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीतच तो राहत असे. त्याचे अक्षर मोठे ढबू पण गोलसर होते. ते बघितल्यावर नकळत मी माझे अक्षर ताडून बघितले. माझे अक्षर त्यामानाने छोटे होते. माझेही अक्षर त्याच्यासारखे टपोरे आले पाहिजे हे माझ्या मनात आले. मी ही मग तसा प्रयत्न केला. पण दत्ता म्हणत असे की तुझेच अक्षर छान आहे. एकुणच त्याला माझे अन मला त्याचे अक्षर चांगले वाटत असे. एकदोन वेळा मी त्याच्या वह्या घरी आणून ते वळण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. मी तसलेच मोठे अक्षर काढण्याचा प्रयत्न करत असे. नंतर माझ्या वर्गात विवेक नावाचा हुशार मुलगा आला. (पुढे तो डॉक्टर झाला.) तो माझ्याच शेजारी बसायला लागला. त्याचेही अक्षर मोठे सुरेख अन जवळपास माझ्याच वळणाचे होते. आता तो शेजारीच बसत असल्यामुळे नकळत त्याच्याचसारखे अक्षर काढण्याचा छंद लागला. पुढल्यावर्षी आमच्या तिघांच्या तुकड्या विभागल्या गेल्या.

एक मात्र समजले की पेन विशिष्ट कोनात चालवला की अक्षर चांगले येते अन तोच कोन लिहीतांना सांभाळला पाहिजे. आपले अक्षर चांगले आले पाहिजे असा मनातून ध्यास घेतला गेला. मी वर्तमानपत्राच्या फाँन्टचा बारीक नजरेने अभ्यास करत असे. त्यातील अक्षरांचे वळण कसे असते, कोठे बारीक होणे, सरळ रेषा कशा मारणे आदी मी निरीक्षण करत असे. घरी पाटीवर तसली वळणे काढणे, अक्षरे काढणे आदी करत असे. नकळत पेन अन पेन्सिलीचा कोन साधत गेला अन माझे अक्षर होते त्या पेक्षा वळणदार बनले. ७ वी ८ वीत वर्गशिक्षक माझ्याकडून दर महिन्याचे कॅटलॉग लिहून घ्यायचे. अर्थात माझे अक्षर फारच चांगले आहे असा त्यात अभिमान, गर्व नव्हता. उलट कुणाचे अक्षर माझ्यापेक्षा चांगले असले की त्या मुलाचा हेवा वाटायचा. ८ नंतर योगेश नावाच्या हुशार मुलाच्या शेजारी मी बसत असे. त्याचे अक्षर तर पुर्ण शाळेत एक नंबरचे होते. अशाप्रकारे इतरांचे पाहून आपलेही अक्षर चांगले असावे असे वाटत असे.

नंतर मी पाटीवर वेगवेगळ्या कोनातून अक्षरे काढून पाहत असे. त्यात तिरपी अक्षरे असलेली स्टाईल (आता समजले की ती स्टाईल इटॅलीक असते!) मला फार आवडली अन मी त्याच प्रकारे लिहू लागलो. पेन कसा धरायचा, किती दाब द्यायचा असला विचार मी नेहमी करत असे. दहावीच्या परीक्षाचे पेपरही फौंटनपेननेच लिहीले. पण एक मोठी चुक मी तेव्हा केली. परीक्षेसाठी नविन पेन घेतला. नविन पेनची निब अजून रुळलेली नव्हती. अर्थातच त्यामुळे माझे परीक्षेतील अक्षर खराब आले.

नंतर अकरावीपासून मी बॉलपेन वापरणे चालू केले. अक्षर चांगले होतेच आता बॉलपेनमुळे शाई एकसारखी येत असे. त्यामुळे वेगात लिहीणे जमत असे. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मी रेनॉल्ड्सचे दोन पेन अन चारपाच रिफिल्स आधीच आणून ठेवले होते. ते थोडे वापरले अन त्यांच्या रिफीलचा बॉल 'सेट' झाला. त्याच पेनने मग मी पेपर लिहीले. कॉलेजमध्ये वेगाने लिहीण्याची सवय लागावी म्हणुन अक्षरावर विचार करणे सोडून दिले. नोकरीला लागल्यानंतर मात्र लिहीण्याचा फारसा संबंध राहीला नाही. तरीही काही लिहायचे असेल तर पुर्वीसारखेच चांगले अक्षर यावे याचा प्रयत्न करतो. देवनागरी लिपीतले माझे अक्षर बरे आहे परंतु अजूनही इंग्रजी कर्सीव्ह योग्यरीत्या जमत नाही. कदाचीत माझे शिक्षण मराठीत झाल्याचा तो परिणाम असावा.


छायाचित्र १

अक्षर लेखन सुधारण्यासाठी काही टिप्सः
१) मराठी / देवनागरी लिपीचे वळण कसे आहे ते काळजीपुर्वक बघा. आपली लिपी वाटोळी आहे. ती वळणदारपणेच काढता आली तर बघतांना चांगले वाटते. त्यामुळे वळणदार अक्षरच येईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.


छायाचित्र २

२) अगदीच लहान मुलांना "अक्षराकडे लक्ष दे, निट लिही, शुद्धलेखन लिही पाच पाने" असे नेहमी म्हणू नये. ते त्यांच्या पद्धतीनेच शिकतील. फक्त ती मुले थोडी समजदार झाली (५वी ६ वी च्या पुढे) तरच त्यांना अक्षरवळण समजेल. तेव्हा चांगल्या अक्षराचा आग्रह करावा.


छायाचित्र ३

३) सुरूवातीला तुम्ही पाटीवर लेखन केले तर उत्तमच. (सुरूवात म्हणजे: जेव्हा तुमची इच्छा 'चांगले अक्षर यावे' अशी असेल तेव्हा.) पाटीवरची पेन्सील मात्र बारीक खडूसारखी येते तीच वापरावी.

४) एखादे मुळाक्षर सुरूवातीला लिहावे. त्याचे वळण छापलेल्या अक्षरासारखे येवू देण्याचा सराव करावा. नंतर इतर मुळाक्षरे घ्या.

५) पेन्सीलचे टोक थोडे तिरपे केले तर योग्य वळणाचे अक्षर येते हा अनुभव आहे. असलाच सराव लेड पेन्सिलीने एखाद्या वहीवरही करता येतो.

६) फौंटनपेन वापरायचे असेल तर नविन निब रूळू द्यावी लागते. त्यामुळे नविन निबने एखाद्या कच्या कागदावर गोल गोल रेघोट्या मारत रहा. ते गोल दोन्ही बाजूने काढा. (म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेनेसुद्धा.) त्याने नविन निबचे टोक योग्य घासल्या जाईल. हिच पद्धत नविन बॉलपेन आणल्यास करावी. आजकाल बोरूच्या आकाराच्या वेगवेगळ्या निबचा संच मिळतो. तो उपयोगी ठरावा. (मी कधी तो वापरला नाही.)


छायाचित्र ४

७) जेलपेनने योग्य आकार, दाब देवून येत नाही. त्यासाठी बॉलपेन वापरावा.

८) ईटॅलीक अक्षरे चांगली दिसतात. पण ती फारच तिरपी नसावीत.

९) परीक्षेसाठी नवीन पेन कधीच वापरू नये. परीक्षेसाठी तुमच्या नेहमीच्या पेनचे ३/४ संच तयार करून ठेवावेत. टिप क्रमांक ६ वाचा व ती अवलंबवा. मी तर ६ पेपरासाठी ६ रिफील्स तयार करून ठेवायचो. रिफिल्स जसजशा संपत जाताता तसतशा त्या बॉलमधून जास्त शाई सोडत जातात. त्याने अक्षर खराब येते.

१०) लिहीण्यासाठीचा कागद गुळगुळीत कधीच नसावा. एकाच प्रकारच्या खरखरीत कागदावर (जसे कॅनव्हास आदी ) अक्षर छान येते.

११) मराठीचे लेखन करतांना उर्ध्वरेषा द्याव्यातच. आजकाल लिखाणात उर्ध्वरेषा न देण्याचा प्रघात पडलाय. ते योग्य नाही. अर्थात उर्ध्वरेषादेण्यामुळे काही वेळ लागतोच तो वेळ मराठी (देवनागरी) लिपी लिहीणार्‍यांसाठी लक्षात घेतला जावा.

- पाषाणभेद उर्फ सचिन
०६/०२/२०११

शुद्धलेखनतंत्रशिक्षणविचारलेखशिफारससल्लाअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

धन्यवाद....

अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण लेख...

प्रचेतस's picture

7 Feb 2011 - 1:38 pm | प्रचेतस

सुरेख लेख.
फौंटन पेनमुळे पुण्यातील दगडूशेठ शेजारचे 'काळे ब्रदर्स'चे दुकान आठवले. बॉलपेन्स, जेलपेन्सच्या आजच्या जमान्यातही ते दुकान टिकून आहे. त्यांच्या दुकानात फौंटन पेन पाच वर्षांची ग्यारंटी मिळत असे व तिचा वापर करण्याची वेळ सहसा कधी येत नसे. इतके ते पेन चांगले असत.

मनराव's picture

7 Feb 2011 - 2:59 pm | मनराव

मस्त लेख..... आमच्या अक्षरलेखना बाद्द्लच्या पाषाणरूपी मनाला तूम्हि भेदलत.......

अरुण मनोहर's picture

7 Feb 2011 - 3:37 pm | अरुण मनोहर

उत्तम लेख.
चांगले अक्षर असावे ह्याविषयीची कळकळ लेखनात दिसून येते. कळफलक बडविण्याच्या काळात लेखी अक्षराविषयी येवढे प्रेम असणारा माणूस विरळाच.

कळफलकाची सवय लागल्यापासून माझे अक्षर देखील पार बिघडले आहे. कधी एकेकाळी खूप चांगले होते, ह्याची फक्त धूसर आठवण मनात राहीली आहे. त्यामुळे हा लेख फारच भावला.

इ. ९वी मध्ये माझ्या शक्य होईल तेवढ्या सुंदर अक्षरात एका मुलीला पत्र लिहिलं होतं , ते तिनं २ मिनिटात '' छे काही वाचताच येत नाही '', म्हणुन परत दिलं होतं. - पाभे तुम्ही या आधी एक महिना तरी भेटायला हवं होतं.

आता माझं अक्षर पुण्या-सोलापुरात्ल्या केमिस्ट्ना वाचता येईल एवढं सुधारलं आहे.

हर्षद.

डावखुरा's picture

7 Feb 2011 - 3:41 pm | डावखुरा

छान माहीती....

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2011 - 3:44 pm | बिपिन कार्यकर्ते

अक्षर आणि लेख, दोन्हीही आवडले. मस्तच!

लेख आवडला. छायाचित्रे दिसत नाहीत, घरुन पाहीन.
ह्या अगोदरही अक्षरासंबंधी लेख लिहिलेला आहेत? लिंक द्याल का?

अरुण वडुलेकर's picture

7 Feb 2011 - 4:48 pm | अरुण वडुलेकर

दोन्हीही आवडले.
माझे मतः
हस्ताक्षराचे वळण आणि सुरेखता बरेचदा लिहितेवेळीच्या तुमच्या मनःस्थितीवरही अवलंबून असते.
माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, ज्या वेळी मनःस्थिती ठीक नसते त्यावेळी हस्ताक्षर हमखास
बिघडते. घाईने लिहिले तर ते बिघडतेच बिघडते. हस्ताक्षर सुरेख जमले नसले तरी ते सुवाच्य असावे
एवढी मात्र खबरदारी घेण्याचा प्रयत्न करावा.

कच्ची कैरी's picture

8 Feb 2011 - 10:37 am | कच्ची कैरी

मस्त लेख !
खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी असते असे कुणीतरी म्हटले आहे

मी ऋचा's picture

8 Feb 2011 - 12:12 pm | मी ऋचा

>>खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी असते असे कुणीतरी म्हटले आहे

ये कण्ट्री के बापूने बोलेला हय।

बाकी लेख आणि लिखाण अतिशय सुंदर.

गणेशा's picture

8 Feb 2011 - 3:04 pm | गणेशा

मस्त लिहिले आहे सचिन.. आवडले..

छायाचित्र दिसत नाहियेत नंतर नक्की पाहिन ..

व्वा पाभे!
जे अक्षर आपण क्षणोक्षणी वापरतो त्याबद्दल क्वचितच कुणी एवढं सुंदर सांगू शकतं.
थँक्यू धाग्यावर लिंक दिल्याबद्दल.
अक्षरलेखनाबद्दल एवढा विस्तृत आणि छायाचित्रांसोबतचा लेख वाचायचा सुटला होता ना.
अक्षरलेखनाच्या (सुलेखन नव्हे) करामती मी पण करुन बघतो, त्यांचे फोटो टाकीन कधीतरी.

वपाडाव's picture

26 Jan 2012 - 3:44 am | वपाडाव

थँक्यू धाग्यावर लिंक दिल्याबद्दल.

माझ्या घरातील सदस्यांचे अक्षरलेखन व सुबकता :: (उतरत्या क्रमाने) बाबा, आइ, मी व बहिण.
आम्हा चौघांचेही अक्षर वाचनीय व सुरेख-१ असे आहे.

तुमच्या या धाग्यामुळे एक किस्सा आठौला....

माझ्या तृतीय वर्षातील गोष्ट आहे. आम्ही आमच्या सी.आर. च्या खोलीवर कुठली तरी असाइनमेंट पुर्ण करत बसलो होतो. त्या वेळी कशावरुन तरी असा मुद्दा निघाला की कुणाची कुणाविषयी इर्ष्येची भावना आहे का? मग बरीच मंडळी एकमेकांच्या अभ्यास विषयातील ज्ञानाबद्दल बोलत होती, कुणी खेळातील पुढाकाराबद्दल, कुणी काही अन कुणी काही. तेव्हा मी त्या सी. आर. ला म्हणालो "मी तुझ्या अक्षरावर खुप जळतो." तो म्हणाला "का? इतर काही नाही का जळण्यासारखे?" मी म्हणालो, "बाकी कशातही थोड्याफार परिश्रमाने पुढे सरकता येइल, पण या वयात तुझ्यासारखे अक्षर काढणे मला होणार नाही." अन आजही मला त्याचे अक्षर अन त्यांचे वळण लक्षात आहे. वर्गातील अर्धी अधिक मुलं त्याच्याकडुन जर्नल घेउन जायची अन त्याहुन कमी माझ्याकडुन. सध्या तो मित्र माझ्या काँटॅक्ट मध्ये नाही. पन जर हे त्याला कळाले तर त्याला आनंदच होइल......

मोहनराव's picture

26 Jan 2012 - 8:30 pm | मोहनराव

पाभे, लेख व अक्षर दोन्हीहि आवडले.

माझे ४थी पर्यंत अक्षर अतिशय खराब होते. पण खरी गोष्ट सांगतो ५ वी पासुन ते अतिशय सुधारले, इतके की शुद्धलेखनाचे बक्षीस मिळण्यापर्यंत!! नंतर इंग्रजी अक्षरसुद्धा छान होते. माझे जर्नल्स नंतरच्या बॅचसाठी राखुन ठेवले गेले. त्या आठवणींना आज तुमच्या लेखामुळे उजाळा मिळाला.
आजच्या बॉलपेनपेक्षा फौंटन पेनने लिहीण्याची मजा काही औरच होती.

धनंजय's picture

26 Jan 2012 - 9:22 pm | धनंजय

चांगल्या टिप्स, आणि अक्षरही.

दादा कोंडके's picture

26 Jan 2012 - 9:31 pm | दादा कोंडके

माझा ५ वीत पहिला क्रमांक आला होता. वार्षिक स्नेहसंमेलनात मला शाळेने एक फौंटनपेन बक्षिस दिला होता. तो गळका निघाला.

अश्या छोट्या वाक्यांमुळे वाचायला मजा आली. :)

माझ्याही लहानपणी शाईपेन वापरत असू. नंतर बॉलपेननी, त्यातल्यात्यात रेनॉल्ड्सनी धुमाकूळ घातला होता! त्याचा शाईचा एक वेगळाच (हिरवा आणि निळा एकत्र केल्यावर होतो तसा) रंग छान वाटायचा. पण खूपच फि़क्कट उठायचा. शाळेत असताना पेनचा लिहिण्याबरोबरच बाकावर खेळ्ण्यासाठीही उपयोग केलाय. बाकावर पेन ठेउन कॅरम मध्ये मारतो तशी टिचकी मारून दुसर्‍याचं पेन बाकाबाहेर पाडायचं असा तो खेळ होता. त्यासाठी मुलं पेन मध्ये त्याचं "मोमेंटम" वाढवण्यासाठी रिफील बरोबरच छोटे नट-बोल्टस ही घालत असतं. त्यामुळे लिहायची आणि खेळायची पेन वेगळी असत. :)

शाईपेननी लिहिताना दाब द्यावा लागत नाही आणि बॉलपेननी लिहिताना लवकर हात दुखतो असं आईचं म्हणणं असायचं. पण वर्गात पहिला येणार्‍या मुलाच बघून मी सेलो ग्रिपर पेन घेतलं आणि गेले १५ वर्षे मी तेच पेन वापरतोय. इतकं की घरीच ४-५ पेन आणि १०-१२ रिफील घेउन वर्षभराची बेगमी करून ठेवतो.

वपाडाव's picture

27 Jan 2012 - 12:10 am | वपाडाव

कोंडके सायेब, मस्त उजाळा देताय आठवणींना....

मी ५वी पासुन ते १०वी पास होइस्तोवर रेनॉल्ड्स ०४५ फाइन कार्ब्युअर वाला पेन वापरत असे.....
अन हो, त्यावर I N D I A ही अक्षरे कोरता येत असत... अन पुन्हा त्यातुन आपलं पेन ओळखु यावं म्हणुन रिफिल भोवती आपल्या नावाची एक चिठ्ठीही जोडत असु... याच पेनामुळे माझं अक्षर वळणदार झालं असावं असं माझं मत आहे.... हे बघा ते पेन...

पण मग १०वी नंतर सेलो पेन्सने (२००० सालानंतर) खुप धुमाकुळ घातला... व रेनॉल्ड्सचं सगळं मार्केट काबीज केलं....
मी सुद्धा आजघडीला सेलो ग्रिपरच (जुना) वापरतो... त्याचा फ्लो कंट्रोल सुरेख आहे.....

दादा कोंडके's picture

27 Jan 2012 - 12:39 am | दादा कोंडके

हे विसरलोच होतो. आम्ही पण हे कोरत असू. :)
रेनॉल्ड्स खूपजणं वापरायची पण "जेटर" जरा श्रिमंत प्रकरण होतं. मी पण एकदा बिदरमधून घेतलेलं चार वेगवेगळ्या रंगाच्या रिफील असलेलं पेन वर्गात दाखवून भाव खाल्ला होता.

अजून एक, काही जणांची पेन तोंडात घालायची सवय असायची. पेनचं झाकण अक्षरशः चघळत असत.
झाकण दातांच्या व्रणांनी चेपून गेलेलं असायचं. अगदी निकडीच्या वेळी अशा मुलांचं पेन घेतलंकी कळायच की झाकण थुंकीनी भरलय! :)

च्यायला खरच जुन्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलय आज. गळकं शाईचं पेन टिपायला कंपासात खडू ठेवत असू, आज त्यानीच डोळे टिपले असते! :)

वपाडाव's picture

27 Jan 2012 - 2:08 am | वपाडाव

गळकं शाईचं पेन टिपायला कंपासात खडू ठेवत असू, आज त्यानीच डोळे टिपले असते!

मनापासुन भावलं हे वाक्य, भिडलं सुद्धा....

पाषाणभेद's picture

27 Jan 2012 - 8:51 pm | पाषाणभेद

अहो हे तर काहीच नाही, आम्ही त्या रेनॉल्डच्या पेनवर काही वरील REYNOLDS FINE CARBURE या अक्षरातील काही अक्षरे खोडून I LOVE U असे लिहीत असू अन पुढे.....हॅ हॅ हॅ

गरजूंनी खाली दर्शविल्याप्रमाणे प्रयत्न करावा:
REYNOLDS FINE CARBURE as I LOVE U

(टिप: R पासून I आणि पहिल्या E पासून L)

:-)

शाळेत असताना हेवा वाटायचा तो आठवीपासून संस्कृत शिकवणार्‍या मॅडमच्या वक्तृत्त्वाचा आणि नववीला असताना इतिहास शिकवणार्‍या सरांच्या अक्षराचा. दोघांच्या या गोष्टी आपल्यात उतरवण्याच्या नादात बर्‍यापैकी प्रगती झाली. सरांनी शिकवलेली समास सोडण्याची पद्धत, लिखाणाची शिस्त यामुळे लिखाण नेटकं व्हायला फार मदत झाली.