लुई आर्मस्ट्राँग

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
3 Feb 2011 - 6:24 pm

संगीताला कोणत्याही राष्ट्रीय सीमा नसतात आणि ते कोणत्याही एका वंशाची जहागीर नाही. ध्वनीमध्ये 'तो' भाव आला की त्याचं संगीत बनतं आणि कानाला गोड लागणारं गीत-संगीत स्थळ-काळाच्या पलीकडे जाऊन एक फार प्रसन्न भावना मनात उत्पन्न करतं....

हे सगळ आठवलं "लुई आर्मस्ट्राँग" च्या गाण्यावरून....

तीन-चारशे वर्षांपूर्वी, अमेरिकेमध्ये गुलामगिरी प्रथा सर्वमान्य असताना, ब्रिटिशांकडून मोठ्या प्रमाणात आफ्रिकेतून कृष्णवर्णीयांना तिथे गुलाम म्हणून विकण्याचा व्यवसाय जोरात होता. लाखो आफ्रिकन गुलाम म्हणून अमेरिकेत वसले आणि दिवसाच्या १८-२० तासांच्या काबाडकष्टाच्या आयुष्याला सामोरे गेले. अशा आयुष्यात 'स्ट्रेस बस्टर' म्हणून त्यांनी त्यांच्या मूळ आफ्रिकन स्रोताच्या संगीताचा वापर केला. आपल्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खे त्यांनी या संगीताच्या मार्गाने व्यक्त करण्यास सुरुवात केली.

पुढे साठच्या दशकात अमेरिकेत नि युरोपात प्रस्थापितांच्या विरोधात तरुणांची लाट उसळली. त्या काऊन्टर कल्चर वा हिप्पी संस्कृतीतील तरुणांच्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी याच प्रकारच्या संगीताचा मार्ग चोखाळला गेला.

याच आफ्रिकन स्रोत असलेल्या संगीताला नाव मिळालं "ब्लूज म्युझिक".

"लुई आर्मस्ट्राँग" हे जाझ आणि ब्लूज संगीतामधलं एक अग्रणी नाव! गायक संगीतकार आणि वादक असलेल्या लुईचा वैशिष्ठ्य पूर्ण आवाज जेव्हा गाण्यातला गोडवा व्यक्त करू लागतो तेव्हा ब्लूजची शक्ती मूर्तिमंतरीत्या आपल्या पुढे उभी राहाते.

http://www.youtube.com/watch?v=_M-6VCnf5oE&feature=related

जाझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गमही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात. याच जाझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting). या संगीताच्या गायनामध्ये कोणत्याही प्रकारचे सार्थक शब्द नसतात तर केवळ काही निरर्थक शब्दांच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणा~या नादाने कर्णमधुर संगीत निर्मिती केली जाते. हे निरर्थक शब्दही काही वाद्यांच्या आवाजासारखे असतात.

या 'स्कॅटिंग'लाही लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं 'लुई आर्मस्ट्राँग' याला. १९२५ साली त्याचं गाणं आलं, "Heebie Jeebies." या गाण्याच्या ओळी अशा काही होत्या की त्यांना काहीच अर्थ नव्हता पण त्या निरर्थक शब्दांतून 'लुई'ने असं काही झकास संगीत निर्माण केलं की ही चाल देणा~या 'बोएड एटकिन्स'नेही याची कल्पना केली नसेल.

http://www.youtube.com/watch?v=ksmGt2U-xTE

'लुई आर्मस्ट्राँग'चा जन्म १९०१ साली न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना या प्रामुख्याने आफ्रिकन-अमेरिकन लोकवस्तीच्या शहरात झाला. लुईला संयुक्त कुटुंबांचं भाग्य लाभलंच नाही. लहानपणापासून कष्टाच्या जीवनाला सरावलेल्या लुईला पैशांसाठी अनेक प्रकारची कामं करावी लागली. अकराव्या वर्षीच त्याने शाळेला राम राम ठोकला आणि सुरुवातीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पेपर लाईन टाकणे आणि रस्त्यावर नाच-गाणी करून पैसे मिळवणे असे उद्योग त्याने करून बघितले, पण ते पुरेसे नव्हते. या काळात त्याला 'न्यू ऑर्लिन्स'च्या 'कार्नोव्स्की' या स्थलांतरीत लिथुअनियन श्वेतवर्णीय ज्यू कुटुंबाने खूप मदत केली. रस्त्यावर राहून तिथल्या वातावरणात बिघडण्याची शक्यता असलेल्या या बापाविना पोर लुईला कार्नोव्स्की कुटुंबाने आपल्यातच सामावून घेतलं. त्यांच्या भंगाराच्या व्यवसायात लुई मदत करू लागला आणि जीवनात प्रथमच त्याला एक कौटुंबिक आयुष्य लाभलं. इथे मिळालेल्या प्रेमाला आणि आपुलकीला लुई आयुष्यात कधी विसरला नाही. त्या कृतज्ञतेपायी पुढे आयुष्यभर 'स्टार ऑफ डेव्हिड'चे लॉकेट त्याने परिधान केले. या आठवणी लुईने "Louis Armstrong + the Jewish Family in New Orleans, La., the Year of 1907" या त्याच्या चरित्रात लिहिल्या आहेत. इथेच त्याला श्वेत वर्णीयांमध्येही इतर ज्यू इ. धर्मीय श्वेत वर्णीयांविषयी असलेल्या वांशिक-धार्मिक भेदाचा प्रत्यय आला. त्यातूनच पुढे तो मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या खंद्या पुरस्कर्त्यांपैकी एक बनला.

लुईने आपल्या सांगीतिक शिक्षणाची सुरुवात 'पीटर डेव्हीस' यांच्याकडून केली. अपराधासाठी सुधारगृहात डांबलेल्या मुलांना ते संगीत शिकवायचे आणि लुईही तेव्हा आपल्या सावत्र वडिलांच्या पिस्तुलीतून हवेत फैरी झाडल्याच्या आरोपावरून तिथेच काही दिवस मुक्कामाला होता. संगीताची आवड असलेल्या लुईला यामुळे स्वत:ला व्यक्त करायचा एक मार्ग गवसला आणि त्याने त्या मार्गावर वाटचालीला आरंभ केला. इतर कलाकारांना बघत बघत लुई आपलं वादन, गायन आणि संगीत फुलवत गेला. दरम्यान प्रसिद्ध जाझ म्युझिशियन आणि कोर्नेट वादक 'जो किंग ऑलिव्हर'ने लुईला आपल्या पंखाखाली घेतलं. त्यांच्याकडे लुईने कोर्नेट वादनावर प्रयत्नपूर्वक इतकं कौशल्य मिळवलं की जेव्हा 'जो किंग'नं करिअरसाठी लुइझियाना सोडलं तेव्हा त्याच्या जागी वादक म्हणून लुईचीच वर्णी लागली.

२०व्या दशकापासून लुई निरनिराळ्या जाझ संगीत मंडळींबरोबर कोर्नेट वादनाची साथ करू लागला.त्याच्यावर 'जो किंग'च्या वादनाचाही खूप प्रभाव होता. पण लुईची पत्नी लिल हार्डेन हिने त्याला 'जो'च्या प्रभावातून बाहेर पडायला आणि स्वत:ची शैली विकसित करायला भाग पाडलं. त्यामुळे लुई पुढे ट्रंपेट, क्लेरिओनेट अशी वाद्ये हाताळू लागलाच पण त्याची स्वत:ची एक वेगळीच गायनाची शैलीही त्याने बनवली जी पुढे अत्यंत लोकप्रिय झाली.

लुईच्या संगीताला त्याच्या गायनाची जोड मिळाल्यावर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्याचे सांगीतिक दौरे वाढले. समाजातील उच्चभ्रू लोकांमध्ये त्याला मान मिळू लागला जो त्याकाळात कृष्णवर्णीयांना मिळणे अगदी दुरास्पद होते. यामुळे अनेक कृष्णवर्णी कलाकार मत्सरग्रस्त झाले पण लुईने आपली सामाजिक बांधिलकी कधीच सोडली नाही. आपल्या संगीताच्या माध्यमातून त्याने नेहमीच वांशिक भेदाला विरोध केला. आपली वेगळी चूल न बनवता गौरवर्णीयांच्या बरोबरीने आपलं संगीत सादर करून हा भेद मिटवण्याचाच त्याने प्रयत्न केला.

अत्यंत हाल-अपेष्टा भोगून स्वकर्तृत्त्वाने मोठ्या झालेल्या लुईचा गमत्या स्वभाव अगदी शेवटपर्यंत टिकला. त्याच्या आजूबाजूला तो सतत हास्याची कारंजी उडवायचा आणि वातावरण प्रफुल्लीत ठेवायचा. तो भरपूर गोष्टी वेल्हाळ होता. स्वत: विषयी सुद्धा त्याने अनेक प्रसंग गोष्टींच्या माध्यमातून सांगितले आहेत.

संगीत क्षेत्रात लुई 'पॉप्स' म्हणून ओळखला जायचा पण त्याबरोबरच त्याला 'सॅचमो' या टोपण नावानेही लोक हाक मारायचे. या नावामागचं कारुण्य मात्र लोकांना माहीत नव्हतं. असं लुईच सांगायचा की लहान लुई जेव्हा रस्त्यावर नाचगाणी करून कुटुंबाला हातभार लावायचा तेव्हा लोकांनी त्याच्याकडे फेकलेली नाणी दुस~या टग्या मुलांनी नेऊ नयेत म्हणून तो ती नाणी तोंडात ठेऊन त्याचा सॅचेल म्हणजे पिशवी (Satchel) सारखा वापर करायचा आणि म्हणूनच त्याला Satchel-mouth किंवा Satchmo हे नाव मिळालं होतं.

जवळ जवळ अर्ध्या दशकाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत असणा~या लुईच्या कारकिर्दीत त्याच्या अनेक संगीतकार-गायकांशी जोड्या जमल्या. त्यापैकी त्याची गायिका एला फित्झराल्ड आणि श्वेतवर्णीय गायक बिंग क्रॉस्बी यांच्या बरोबरची जोडी खूप लोकप्रिय झाली. लुई बरोबर फ्रॅन्क सिनात्रा आणि डॅनी के यांच्या जोड्यादेखील खूप गाजल्या.

यांची एकत्र गाणी ऐकण म्हणजे पर्वणीच असायची.

लुई आणि एला यांच्या गाण्यांची झलक.....

http://www.youtube.com/watch?v=io0uqrp9dco

http://www.youtube.com/watch?v=GeisCvjwBMo&feature=related

http://www.youtube.com/watch?v=ma91kie8G3A&feature=related

लुई आणि बिंग यांच्या गाण्यांची झलक....

http://www.youtube.com/watch?v=dC3VTBG0tRc

http://www.youtube.com/watch?v=BwwdKrGGRlI&feature=related

लुई आणि फ्रॅन्क यांच्या गाण्याची झलक.....

http://www.youtube.com/watch?v=A9k4uKcuLGk

लुई नि डॅनी के यांची धमाल.....

http://www.youtube.com/watch?v=jm6ktYq0Yxk

१९६४ साली लुईने इतिहासच घडवला. त्याआधीच्या तीनही वर्षी बिलबोर्ड काऊन्टडाउन मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या 'बीटल्स'ना त्यांच्या त्या स्थानावरून पदच्युत करून लुईच्या "Hello, Dolly!" या गाण्याने प्रथम क्रमांक पटकावला. मूळचे 'करोल चेनिंग'चे हे गाणे लुईने आपल्या जबरदस्त ढंगात असे पेश केले की त्याने लोकप्रियतेचा कळसच गाठला. हे गाणे २००१ मध्ये 'ग्रॅमी हॉल ओफ फेम' मध्ये अंतर्भूत केलं गेलं.

लुईचे "Hello, Dolly!" इथे बघा नि ऐका......

http://www.youtube.com/watch?v=kmfeKUNDDYs

'लुई आर्मस्ट्राँग' १९७१ साली क्वीन्स, न्यू यॉर्क इथं हृदय विकाराच्या धक्क्याने वयाच्या सत्तराव्या वर्षी वारला. अत्यंत गरीबीत जन्माला आलेला आणि अत्यंत श्रीमंतीत मृत्यू पावलेल्या लुईने त्याच्या संपूर्ण आयुष्यादरम्यान कुणालाही दुखावलं नाही तर त्यांच्या हृदयात आनंदाच्या चांदण्याचीच उधळण केली.

'जाझ' नावाच्या लघुपटाचा निर्माता 'केन बर्न्स' याने एकाच वाक्यात लुईची महती वर्णिली आहे - "Armstrong is to music what Einstein is to physics and the Wright Brothers are to travel." ती लुईच्या संगीताचा आणि आयुष्याचा विचार करता अगदी यथार्थ म्हणता येईल.

कलासंगीतप्रकटनविचारलेखमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

छान लेख, उत्तम ओळख.

व्हिडो पाहिल्यावर २०१२ डूम्स डे मधील त्या जहाजावरच्या गायकाची आठवण झाली.

रामदास's picture

3 Feb 2011 - 7:46 pm | रामदास

पण कलाकाराचे चरीत्र लेखन म्हणून हा लेख वाचला आणि आवडला.

सुंदर लेख..
आपल्या परिणिता मधले 'कैसी पहेली' हे गाणे ज्या दोन गाण्यांपासून 'ईन्स्पाअयर' झालेले आहे, त्यातील एक लुई आर्मस्ट्राँग चे 'अ कीस तू बिल्ड अ ड्रीम ऑन' हे होय. दुसरे गाणे 'नेवर ऑन संडे' हे आहे. ही माहिती आपल्या 'खुपते तिथे गुप्ते' मधून मिळाली. खाली दोन्ही गाण्याचा 'लिंका' दिलेल्या आहेत...
१. http://www.youtube.com/watch?v=NDgncPD0bew
२. http://www.youtube.com/watch?v=h8RPinFZQhk

प्रास's picture

4 Feb 2011 - 9:19 pm | प्रास

लिंकांबद्दल आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

रमताराम's picture

3 Feb 2011 - 8:53 pm | रमताराम

सुरेख ओळख करून दिली आहे. दुव्यांबद्दल आभार.

निमिष ध.'s picture

3 Feb 2011 - 11:49 pm | निमिष ध.

लुई आर्मस्ट्राँगची समर्पक ओळख करुन दिल्याबद्दल प्रास चे आभार. जाझ संगीताला लोकप्रिय करण्यात त्याचे योगदान वादातित आहे. काही महीने आधी वाचनालयात त्याच्यावरचे एक पुस्तक वाचण्यात आले होते. अत्यन्त हालाखितुन वर आलेल कलाकार.

अमेरिकन त्रिशंकू's picture

4 Feb 2011 - 12:32 am | अमेरिकन त्रिशंकू

प्रास, लूई आर्म्सस्ट्राँग (सॅचमो) हा माझा अतिशय आवडता गायक आहे. त्याच्याबद्दल धागा काढल्याबद्दल धन्यवाद.

त्याची अनेक गाणी लोकप्रिय आहेत पण माझी दोन खास आवडती गाणी तुम्ही सांगायचे विसरलात

विंटर वंडरलँड
http://www.youtube.com/watch?v=RKUSR7YnsgI

स्कोकिअ‍ॅनः
http://www.youtube.com/watch?v=RWC1bVRLQTU&feature=related

अजून बरीच आवडती गाणी आहेत. वेळ मिळाला की अजून लिंक्स टाकतो.

प्रास's picture

4 Feb 2011 - 9:17 pm | प्रास

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

अहो, लुईची खूप गाणी इथे टाकायचा मोह होत होता पण सगळं टाकणं शक्यच नव्हतं. शेवटी तुमच्या सारख्या दर्दी माणसासाठीही काही बाकी ठेवायला हवंच ना...... :)

तुम्ही टंकलेल्या लिंकांबद्दल धन्यवाद आणि बाकीच्याही लवकर टंका हा हट्ट.....

छान लेख. कलाकाराची ओळख आवडली.

आत्मशून्य's picture

4 Feb 2011 - 9:13 am | आत्मशून्य

फोटो मात्र क्लोझपची अ‍ॅड करण्यासाठी असवा आसे वाटते.

गुंडोपंत's picture

4 Feb 2011 - 11:05 am | गुंडोपंत

लुई आर्मस्ट्राँगची विस्तारपूर्वक ओळख करुन दिल्याबद्दल प्रास चे आभार.
ओळख आवडली.
अपराधासाठी सुधारगृहात डांबलेल्या मुलांना ते संगीत शिकवायचे आणि लुईही तेव्हा आपल्या सावत्र वडिलांच्या पिस्तुलीतून हवेत फैरी झाडल्याच्या आरोपावरून तिथेच काही दिवस मुक्कामाला होता. संगीताची आवड असलेल्या लुईला यामुळे स्वत:ला व्यक्त करायचा एक मार्ग गवसला आयुष्याचा मार्ग गवसणेच महत्त्वाचे असते हो.

सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार.

यामुळेच अधिक लिहिण्याचा धीर येतो....... :)

प्रास महाराज , आपण थोर आहात .आपले लुइस आणि फ्रेडी वरचे फारच छान लेख ... जबरदस्त .. ( वाचल्यावर आपला गाववाला भेटल्याचा आनंद झाला ) सध्या आपण का लिहीत नाही ? BTW लुइस आर्मस्ट्राँग ने पूर्वी मुंबईत ( ताज मध्ये ) परफॉर्म केले आहे , हे माहिती असेलच ना ?

सुंड्या's picture

28 Sep 2016 - 2:03 pm | सुंड्या

व्हाट अ वंडरफुल वर्ल्ड.., आपलं फेवरेट...एकदम मस्त व्यक्ति/विषय बद्दल माहिती.

मारवा's picture

28 Sep 2016 - 2:10 pm | मारवा

अप्रतिम लेख
फार आवडला.