नमस्कार, मिपाकरहो.
सादर करीत आहे दुसरा भाग, ह्यात फक्त लिखाण आहे, फोटो पुढच्या आठवड्यांत गणेशा अपडेट करेल.
पहिल्या भागाचा दुवा - http://misalpav.com/node/16350
पुढे चालु -चांगवटेश्वरच्या दर्शनानंतर आम्ही नारायणपुर येथे आलो, इथे दोन मंदिरं आहेत, पहिल एकमुखी दत्ताचे आणि दुसरं नारायणेश्वराचे. एकमुखि दत्ताचे हे माझ्या माहितीतलं एकच देउळ आहे, एका मोठ्या हॉलसारखं हे देऊळ आहे, त्यात असलेली पुरुषभर उंचीची दत्ताची मुर्ती खुप रेखीव व सुंदर आहे. नंतर शेजारीच असणा-या नारायणेश्वराच्या देवळात गेलो. हे शंकराचे देउळ जमिनसपाटीच्या थोडं खाली आहे, ६-७ पाय-या उतरुन खाली जावं लागतं, आधी पाहिलेली दोन्ही देवळं जमिनिच्यावर जोत्यावर बांधलेली होती. याचा सभामंडप मोठ्या खांबावर तोलुन धरलेला आहे तर त्यात लावलेल्या भरपुर धुपामुळे खुप छान वातावरण निर्मिती झालेली होती. धुपाचा धुर व वास सगळ्या देवळात भरुन राहिलेला होता व शिवायलाचे जे एक पवित्र पण गुढ वातावरण असते त्याचा अनुभव येत होता.
येथे देवळांच्या बाहेर बराच बाजार भरलेला होतो, भाजी पासुन ते खेळण्यापर्यंत, थोडक्यात मॉल ऑन ऱोड. आम्ही पण मॉल मध्ये गरजेच्या वस्तुंची खरेदी केली. मी एका माझ्या संसाराशी इमान राखुन मेथी व हरभ-याची भाजी घेतली तर गणेशाने होलसेल मध्ये चिकु खरेदी केले तसेच सगळ्यांनी मिळुन एक कडक व एक नरम असे दोन पेरु खाल्ले. या सगळ्यात आत्मशुन्यांना वाघनखे व दात दिसले, यावर उभ्या उभ्या एक महाचर्चा करुन घेतली सगळ्यांनी. विकणारा त्या नखावरची तार व इतर लक्षणे सांगत होता तर आत्मशुन्य वगळता इतर कोणाचा वाघनखे या प्रकाराशी प्रत्यक्ष संबंध न आल्याने जरा सावध होता, मला तर मेलेल्या वाघाचे नख आपल्या जिवंत गळ्याला लागणार ही कल्पनाच भितीदायक वाटत होती. शेवटी त्या विक्रेत्याने ही नखं व दात २-३ महिन्यापुर्वी मारलेल्या वाघाचे आहेत हे सांगितल्यावर लगेच आम्ही टेकसॅव्ही लोकांनी सकाळपासुन कमावलेल्या आत्किम ज्ञानाचा उपयोग करुन तिथेच गुगल वर अशातच मारलेल्या वाघांबद्दल सर्च मारला व समाधानकार उत्तर न मिळाल्याने, एसेमेस द्वारे मतदान घेउन ती नखं व दात खरेदी करणे योग्य नाहि असे ठरवले. असेही त्या दाताचा शुभ्रता पाहुन येत्या काळात टुथपेस्टच्या जाहिरातित वाघ आले तर आम्हाला नवल वाटणार नाही .
इथुन पुढे केतकावळे येथिल बालाजी मंदिरात आलो. आत्तापर्यंत सरकारी किंवा काहीच व्यवस्थापन नसलेली मंदिर पाहिलेली होती, त्या पुढे हे एका कंपनीने उभारलेले मंदिर व त्याचे कार्पोर्रट पद्धतिने केलेल व्यवस्थापन लगेच डोळ्यात भरते. आवाराच्या प्रवेशद्वारावरच्या सुरक्षारक्षकापासुन ते मंदिराच्य अंगणात भाविकांनी सांड्लेले प्रसादाचे कण उचलणा-या कर्मचा-यापर्यंत सगळ्याच व्यवस्था काटेकोर आहेत. मंदिरात प्रवेश करताना वाहत्या पाण्याने पाय धुण्याची व्यवस्था देखिल याचाच एक भाग आहे. इथले दर्शन अतिशय छान झाले, मला बालाजी हा देव त्याच्या वॅभवाच्या खुल्या प्रदर्शनासाठी नेहमीच वेगळा वाटत आला आहे. असो. बाहेर पडताना प्रसाद देणारे सेवक सुद्धा गोड बुंदी द्रोणात देताना त्यांच्या हातात प्लॅस्टिकचे मोजे घातलेले होते. प्रसाद घेउन बाहेर प्रांगणात बसुन खाल्ला, या वेळी आम्ही वेळेच्या खुप पुढे आहोत याची जाणिव झाली, म्हणजे अजुन भुक लागली नव्हती आणि तशात कॅलास गार्डनला जाण्यात काही मजा नव्हते, म्हणुन मुळ कार्यक्रमात नसणारे बनेश्वर या ठिकाणी जायचे ठरले.
बनेश्वरचे देउळ हे पुणे सातारा रोडवर नसरापुर फाट्यावरुन आत आहे. हे मंदिर पण नारायणेश्वराच्या मंदिरासारखे जमिनसपाटीच्या खाली आहे. पेशव्यांनी बांधलेल्या या मंदिरात दोन कुंड व मंदिराच्या बाजुचे पाट यातुन पाणी खेळवुन त्या काळातील तांत्रिक करामातीचा एक नमुना दाखवलेला आहे, ही करामत आता प्रत्यक्ष होते की नाही हे कळाले नाही. येथे चिमाजी अप्पांणी पोर्तुगीजांकडुन जिंकुन आणलेली एक मोठी घंटा ठेवलेली आहे.
आता मात्र पोटातल्या भुकेची जाणिव होत होती त्यामुळे इथुन निघुन खेड-शिवापुरला निघालो, वाटेत टोलनाक्यावर सर्वात अव्यवस्थित व अतिशय हळु जाणारी रांग निवडण्यात मला पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे यश आले, आणि नेहमी माझ्या या यशाबद्दल माझे सहर्ष अभिनंदन करणारी माझी बायको बरोबर नसल्याने माझे डोळे अंमळ पाणावले. शेवटी ब-याच वेळाने टोल भरुन आम्ही आजच्या सहलीच्या शेवटच्या मुक्कमी कॅलास गार्डन येथे पोहोचलो. आज रविवार आणि माया कॅलेंडरप्रमाणे फक्त एक वर्ष जगबुडीला उरल्याने या ठिकाणी खुप गर्दी होती पण ती छान पण होती, त्यामुळे आमचा वेटिंग पिरियड अजिबात बोअर झाला नाही. आमच्या नावाचा पुकारा झाल्यावर आम्ही पटकन उड्या मारत मिळालेल्या जागी बसलो, पुन्हा वेटिंग पण पुन्हा छान गर्दी त्यामुळे नो ईश्यु. बसल्या बसल्या मिपावरचे धागे, शॉर्टफॉर्म काही मोजके धागे व त्यावरचे प्रतिसाद यावर खुली पण हळु आवाजात चर्चा झाली, आवाज मोठा असता तर छान गर्दी कमी झाली असती ही भिती होती. तेवढ्यात आमच्य टेबलवर टिझर म्हणुन वाटिभर शेंगादाणे आले, आणि ते संपायच्या आतच आमची ताटं आली. गरमागरम भाकरी, पिठलं, आमटि, उसळ, घोसावळ्याची भजी व गरम कढी तर बाजुला तुपाचे तांबलं, हिरव्या मिरचीचा ठेचा व कांदा,टोमॅटो,काकडी बरोबर कॅरी हे सगळं पाहुन हात टाळ्या देणं घेणं सोडुन व तोंडानं बोलण्याचं सोडुन खाण्याच्या कामाला जुंपले गेले . ह्या कामातुन हात व तोंडाची पुढचा अर्धा तास सुटका नव्हती. कामात बदल असावा म्हणुन हात वेटरला खुण करीत होते व कुणाच्या एकाच्या तोंडातुन भाकरी, कढी, बेसन, कॅरी, काकडी असे महत्वाचे लिमिटेड शब्द बाहेर येत होते. पोट भरुन जेवण करुन व नंतर पान खाउन आम्ही परत घराकडे परतलो. रात्रीचे साडेनऊ वाजले होते, वाटेत भरत, आत्मशुन्य यांना ड्रॉप करुन शेवटी गणेशा माझ्या घरापाशी लावलेली त्याची प्रेमाची अपाची घेउन घरी गेला आणि या वर्षाची पहिली सहल सुफळ संपुर्ण झाली.
काही तांत्रिक माहीती -
मार्ग - वारजे (पुणे) - भुलेश्वर- सासवड- चांगवटेश्वर- नारायणपुर- केतकावळे-बनेश्वर -खेड शिवापुर - वारजे. -- अंतर १७२ किमी. वेळ- सकाळी ११ ते रात्री ९.३० -- खर्च - रु. ३२५ प्रत्येकी एकुण ( प्रवास, नाष्टा व रात्रीचे जेवण व टोल).
आत्मशुन्य,गणेशा व भरत, या सहलीत सहभागी झाल्याबद्दल अतिशय धन्यवाद. तुमच्या सहकर्याने व सहभागाने या वर्षाची फिरायची सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे आणि या बाबतीत हे पुर्ण वर्ष असेच आनंदाचे जाईल ही खात्री आहे. तसेच या सहलीच्या उपक्रमाला आपणांकडुन प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो.
चोविस उत्तरी कहाणी एका उत्तरी सुफळ संपुर्ण.
हर्षद.
प्रतिक्रिया
20 Jan 2011 - 2:30 pm | गणेशा
हर्शद साहेब , आपलेच धन्यवाद मानायला हवेत खरेच.
इतके छान प्लॅनिंग केलेच ..
पण वृत्तांत पण खुप छान लवकर दिला.
पुढच्या वेळेस पण तुम्हीच ऑर्गनायझर असावेत अशी इच्छा.. बाके कोठे ही चला आपले काहीच म्हणने नाही.
धन्यवाद.
20 Jan 2011 - 3:45 pm | आत्मशून्य
.
20 Jan 2011 - 2:50 pm | पिंगू
पुढच्या वेळेस मीपण सोबत येईन म्हणतो.. धागा काढताना जरा लवकरच काढा. म्हणजे वेळेची जुळवाजुळव करता येईल..
- पिंगू
20 Jan 2011 - 3:59 pm | डावखुरा
मीपण...(जर शक्य झाले तर...पुढच्या वेळेला...)
केतकावळा मंदिर मस्तच आहे..
वेंकटेश्वरा हॅचेरीज् (वेंकीज्) वाल्याचे आहे ना...२-३ वेळेला गेलो आहे...
मला खुप आवडते...
प्रतिबालाजी...
20 Jan 2011 - 4:09 pm | ५० फक्त
@ लालसा, होय ते व्यंकटेश्वरा हॅचरीज यांचेच आहे. असे अॅकले आहे की हे पुर्ण मंदिर भारतीय वास्तुशास्त्राच्या सर्व नियमांना धरुन बांधलेले आहे.
हर्षद.
20 Jan 2011 - 4:12 pm | मुलूखावेगळी
छान वर्नन
पन फोटो मिस्सिन्ग आहेत
20 Jan 2011 - 4:21 pm | ५० फक्त
मुवे, उरलेले फोटो गणेशाच्या कॅमेरात आहेत आणि या ठिकाणी म्हणजे नारायाणपुर व बालाजी येथे फोटो काढायला परवानगी नाही, पुढच्या मंगळवारी नाही तर बुधवारी गणेशाने काढलेले फोटो टाकतो.
हर्षद.
20 Jan 2011 - 7:32 pm | रेवती
वृत्तांत खुसखुशीत तरीही माहितीपूर्ण झालाय.
मॉल ऑन रोड, वाघनखाचा किस्सा आणि टोल भरतानाची सगळ्यात हळू रांग असे छोटे किस्से मजेदार आहेत.;)
25 Jan 2011 - 2:23 pm | भरत
हर्शद, गणेशा व आत्मशून्य याना धन्यवाद,
खूपच छान झाली ट्रीप............