बरेच दिवस पाळत ठेवून असलेल्या घरात, आज शेवटी चोरी करण्याचा निर्णय खंडुने घेतला. घरातील तरुण मंडळी सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याचे त्याच्या हेरांनी त्याला सांगितले. आता घरात केवळ म्हातारे आजोबा. म्हणजे थोडक्यात काम फत्ते ! उच्च मध्यमवर्गीय वस्तीमधल्या ३ बेडरुम च्या घरात कुठल्या कीमती वस्तुंवर डल्ला मारता येईल याची खंडुची मनातल्या मनात उजळणी देखील करुन झाली. त्या दृष्टीने हत्यारे (टुल्स) ची जमवाजमव सुद्धा झाली. सगळ्या गोष्टी छान जुळून आल्याबद्दल त्याने मनोमन समाधानही व्यक्त केले. 'इंतजार का फल मीठा ही होता है' अशी वाक्ये आठवून खूश सुद्धा झाला. या प्रोजेक्ट मधे मदत केलेल्यांना कुठल्या थ्री-श्टार हाटिलात पार्टी द्यायची हे ही ठरवून झाले आणि मग खंडुने छान २ तास ताणून दिली.
आपली रोजची औषधे घेऊन रात्री १० ला आजोबांनी खोलीतला दिवा घालवला. पलंगाला पाठ लागल्या- लागल्या घोरायला लागण्याचे वय आता गेले असे म्हणत आजोबांनी झोपेची आराधना सुरु केली. बाहेरच्या खोलीत कहितरी खुडबुड ऐकू आली तेंव्हाच घड्याळात २ चे ठोके पडले. या म्हातारपणाचे काही खरे नाही, एकटं असलं कि जरा जास्तच भास होत रहातात म्हणत त्यांनी कूस बदलली.
खंडू ने नेहमीच्या सरावाने एक एक इलेक्ट्रोनिक वस्तूचे कनेक्शन कापून वस्तू मोकळी करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर आलेल्या रंग्या अन उस्मान्याने हळू हळू छोट्या छोट्या गोष्टी खोक्यात भरायला सुरुवात केली. हे सगळेच नेहमीचे असल्याने एका ठराविक लयीत सर्वांच्या हालचली सुरु होत्या. आजोबा ज्या खोलीत होते ती आधीच बाहेरून कडी लावून बंद करण्यात आली होती.
इकडे आजोबांना परत परत काही आवाज ऐकू येवू लागले आणि ते धडपडत पलंगावर उठून बसले. हे भास नक्कीच नाहीत असे त्यांना खात्रीने वाटू लागले. बाहेरच्या खोल्यांमधून त्यांना ठळक हालचाल जाणवली. त्यांना वाटले कार्यक्रमात बदल होवून मुले परत आली कि काय, म्हणून त्यांनी मुलांना हाका मारायला सुरुवात केली. इकडे खंडू, रंग्या आणि उस्मान्याने कान टवकारले. आजोबा जागे झाले जणू..असं म्हणून थोडा कानोसा घेत त्यांनी आपले काम चालू ठेवले.
मुलं आपल्या हाकेला उत्तर का देईनात म्हणून मग आजोबांनी शेजारच्या स्टूल वर ठेवलेला चष्मा अंदाजाने उचलला आणि तो डोळ्याला लावून अंधारातच पलंगावरून उतरून दाराकडे जायला लागले. बाहेरच्या कामाला अजून गती येऊन आवाज वाढले होते. आयत्या वेळी आजोबा काही गोची करतात का अशा विचाराने हे तिघेही थोडे सतर्क झालेले.
बाहेरच्या खोल्यांमध्ये काहीतरी विपरीत चालू आहे अशी शंका आता आजोबांच्या मनात यायला लागली. दारापाशी येऊन त्यांनी ते उघडायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या लक्षात आले कि दार बाहेरून बंद आहे. त्यांना क्षणात सगळे कळून चुकले. आपल्या घरात चोरी होत आहे आणि आपल्याला इथे डांबून ठेवण्यात आले आहे...आपल्याला काही करता येणार नाही अशा विचाराने आजोबांच्या मनाचा थरकाप उडाला...आणि त्याच वेळी अचानक त्यांच्या छातीत एक जोराची कळ आली.. आई गं करत ते कळवळून खाली पडले. पडताना दारावर आपटले आणि डोक्याला खोक पडून रक्त यायला लागले.
दाराचा एवढा मोठा आवाज झाला कि बाहेर तिघांचे हात थबकले. रंग्या आणि उस्मान्या तिथून लवकर सटकायची तयारी करू लागले. बरेचसे सामान बटोरून झाल्यामुळे आता काढता पाय घ्यायला हरकत नव्हती. असा विचार करून ते बाहेर पडलेही. सामान बरोबर आणलेल्या गाडीत भरले आणि आता निघणार तेवढ्यात खंडू म्हणाला..त्यो म्हातारा ठीक आसंल नव्हं ? न्हाई दाराचा येवढा मोठ्ठा आवाज झाला म्हून आपली शंका येत्या. काही बरं वाईट झालं नसंल न्हवं त्येचं? रंग्या आणि उस्मान्याच्या कपाळावर आठी चढली. त्या दोघांची तिथून निघण्यासाठी घाई सुरु झाली, पण खंडू चा पाय काही निघेना. त्याने या दोघांना गाडी घेऊन अड्ड्यावर जायला सांगितले आणि तो परत वर आला. आजोबांच्या खोलीच्या दाराशी आल्यावर त्यांच्या वेदनेने विव्हळण्याचा आवाज त्याला ऐकू आला. त्याने हळूच दाराला बाहेरून घातलेली कडी काढली आणि टोर्च च्या प्रकाशात पाहू लागला. दारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आजोबा त्याला दिसले. त्याने क्षणाचाही विलंब न करता आजोबांना उचलले..तशाही अवस्थेत आजोबांनी त्याच्याशी झटापट केली आणि बोलण्याचा प्रयत्न केला. आता हा आपले काय करणार या विचारात असतानाच त्यांना परत छातीतून एक कळ आली व ते बेशुद्ध झाले.
आजोबांना उचलून खाली आणून खंडू ने रिक्षाला हात केला आणि ती थेट जवळच्या हॉस्पिटल कडे न्यायला सांगितली. हॉस्पिटल मध्ये त्यांना भरती करून देताना खंडूला स्वतःचे नाव सांगावे लागले आणि मोबाईल नंबर द्यावा लागला. हे सगळं करत असताना आजोबांना वाचवायचे एवढाच विचार होता त्याच्या मनात. बाकीच्या परिणामांची काळजी तो करत नव्हता. चोरी हा पेशा त्याने मजबुरीत पत्करलेला होता, पण कधी कोणाची हत्या केली नव्हती. आत्तापर्यंत इतक्या घरफोडी केल्या पण असा प्रसंगही कधी आला नव्हता, त्यामुळे त्याच्या बुद्धीला जे पटेल, कळेल ते तो करत होता. हॉस्पिटल मध्ये आजोबांवर उपचार सुरु झाले आणि तो तिथून निघाला.
" काही का असेना तो चोर होता, त्याने घर धुऊन नेलं अन आपण असं गप्पं बसायचं? पक्या तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास नं तरी मला हे पटणार नाही. जे योग्य नाही ते नाही...." प्रकाश आणि केतकीच्या वादातील हे ठरलेले शेवटचे वाक्य! हे वाक्य आले कि प्रशांत गप्पं बसतो आणि तो वाद तूर्तास तिथेच थांबतो...मिटतो असा मी म्हणणार नाही !
प्रकाश माझ्या मामेबहिणीचा मामेभाऊ (!) फारसं काही अवघड नाहीये हे नातं समजायला. पण आम्ही सगळे समवयस्क असल्याने तो लांबचा नातेवाईक कमी आणि जवळचा मित्र जास्त होता. आणि केतकी त्याची बायको, हे जाणकारांना एव्हाना समजले असेलच. हा चोरीचा झाला तो सगळा प्रकार प्रकाश च्या घरी आणि कथेतील आजोबा म्हणजे प्रकाशचे बाबा.
खंडू आजोबांना हॉस्पिटल मध्ये सोडून निघून गेला. दुसऱ्या दिवशी आजोबा शुद्धीवर आले आणि मग डॉक्टरांनी लगेच आजोबांकडून प्रकाश आणि त्याच्या बहिणीचा नंबर घेवून त्यांना बोलावून घेतले. प्रकाश-केतकीला एकदम दोन धक्के बसले..एक म्हणजे घरातील चोरी आणि दुसरे बाबांची तब्येत. आल्यावर डॉक्टर कडून त्यांना सगळा वृत्तांत समजला. डॉक्टर एवढंच म्हणाले कि त्या परोपकारी माणसाने वेळेत आणले आजोबांना म्हणून आज तुम्ही त्यांना पाहू शकताय. नाहीतर लागोपाठ २ हृदयविकाराचे झटके आल्यानंतर आजोबा वाचणे जरा मुश्कील होते. आजोबा डॉक्टरांना त्या माणसाबद्दल फार काही सांगू शकले नव्हते...पण तो निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांनी सगळी रामकहाणी समजल्यावर सर्वतोपरी प्रकाशवर सोपवली होती. आजोबांना खंडूची काहीच माहिती नव्हती, तो दिसतो कसा हे पण ते नीट सांगू शकत नव्हते. खरं तर 'त्या' माणसाचं नाव 'खंडू' हे डॉक्टरांनीच त्यांना मिळालेल्या माहितीवरून सांगितलेले. परंतु हा माणूस चोर आहे आणि आपले घर फोडून त्याने तिथे चोरी केलेली आहे हे मात्र त्यांना खात्रीने माहित होते. आता त्याला पोलिसांच्या तावडीत देणे किंवा सोडून देणे हा एक मोठा प्रश्न होता. सगळे ऐकल्यावर प्रकाशला फक्त एवढेच जाणवत होते कि तो कोणी का असेना, आज त्याने आपल्या बाबांचे प्राण वाचवलेले आहेत. सामान तर चोरी करून झालेलेच त्यांचे. बाबांसाठी खंडू ने एवढे करण्याची काही आवश्यकता नव्हती. खंडू ने त्यांना त्यावेळी हॉस्पिटल ला नेले नसते तर आज आपण फार वेगळ्याच मनस्थितीत असतो व गेलेल्या सामानाचे दुखः नं होता आपण आपल्या बाबांना गमावून बसल्याचे जास्त दुखः झाले असते.
बऱ्याच विचारासंती प्रकाशने खंडूबद्दल पोलिसात तक्रार न देण्याचा निर्णय घेतला होता....जो केतकीला - त्याच्या बायकोला अजिबातच पटला नव्हता. आज या गोष्टीला ६ वर्षं झाली पण प्रकाश व केतकीच्या संसारात हा विषय धुसफुसत राहिला आहे. केतकीचे म्हणणेही तसे बरोबर आहे. तिचा मुद्दा असा कि तो आहे तर चोरच, त्याला तसाच सोडल्याने अजून कित्ती घरफोडी त्याने केल्या असतील. तुम्ही त्याची पोलिसात तक्रार न केल्याने एका गुन्हेगाराला बाहेर मोकळे सोडले आहे... तू पण एक गुन्हेगारच आहेस असे ती प्रकाशला म्हणत असते. त्यांच्यातील हि धुसफूस कमी व्हावी असे मला व बाकी भावंडांना खूप मनापासून वाटते, पण नक्की कोणाची बाजू घ्यावी तेच कळत नाही.
म्हंटलं मिपावर आपल्या एवढी थोर मंडळी आहेत, तेंव्हा त्यांच्याशी चर्चेतून यावर काही उपाय मिळतो का ते बघावे.
प्रतिक्रिया
23 Oct 2010 - 4:44 am | इंटरनेटस्नेही
म्हंटलं मिपावर आपल्या एवढी थोर मंडळी आहेत, तेंव्हा त्यांच्याशी चर्चेतून यावर काही उपाय मिळतो का ते बघावे.
१. आजोबांना सदर हदयविकारचा झटका जर खंडु व त्याच्या अन्य साथीदारांच्या घरात घुअसण्याच्या जाणीवेमुळे निरमाण झालेल्या तणावामुळे आला असेल, तर प्रकाश यांची चुक आहे.
२. मात्र तसे नसुन जर तो हदयविकारचा झटका आजोबांना त्याच्या वयाला अनुसरून आला असेल, तर मात्र प्राकाश यांनी केले ते योग्यच केले.
--
(थोर) इंट्या.
23 Oct 2010 - 5:10 am | शुचि
खंडूचा "गुन्हा" एका पारड्यात आणि "चांगुलपणा" दुसर्या पारड्यात घातला तर चांगुलपणाचं पारडं जड होते आहे. कारण त्याने धोका असतानाही सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून , मदत केली. दुसरं तो अजूनही घरफोड्या करत असेल वगैरे जर तर ला काही अर्थ नाही. त्यामुळे प्रकाशने केले ते १००% बरोबर केले.
23 Oct 2010 - 5:28 am | नगरीनिरंजन
अर्थातच परस्पर तक्रार नाही केली पाहिजे. जरी केतकीचा मुद्दा तात्विक दृष्ट्या बरोबर असला तरी काही तांत्रिक आणि मानवी कारणांमुळे प्रकाशने तक्रार देऊ नये असेच मला वाटते. तांत्रिक कारणे अशी: जरी प्रकाशने तक्रार केली आणि पोलिसांनी खंडूला पकडलं तरी चोरीच्या गुन्ह्यासाठी खंडूला फार तर दोन-तीन वर्षांची शिक्षा होईल. या दोन-तीन वर्षांमध्ये खंडू चोरी करणे सोडून देण्याइतका बदलेल असे समजण्यास काहीही आधार नाही. उलट अटक होणे हा त्याचा एक व्यावसायिक धोका असल्याने तो सहन करण्याची त्याच्या मनाची पूर्ण तयरी असण्याचीच शक्यता जास्त. दुसरं म्हणजे चोरी होऊन बराच काळ लोटल्याने खंडूकडे मुद्देमाल सापडणे आणि त्या अनुषंगाने त्याला चोर सिद्ध करणे वाटते तितके सोपे नाही. शिवाय तक्रार करायला इतका वेळ का घेतला हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. महत्त्वाचे आणि मानवी दृष्टीकोनातून दिसलेले कारण असे की चोरी करताना का होईना पण वडीलांचे प्राण वाचवले याबद्दल जराही कृतज्ञता दाखवली नाही यामुळे खंडूचा चांगुलपणावरचा विश्वास आणखी कमी होईल किंवा अविश्वास आणखी दृढ होईल.
सगळ्यात योग्य म्हणजे हॉस्पिटलमधून खंडूचा नंबर घेऊन त्याच्याकडे कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्याला सांगून पोलिसांकडे तक्रार करणे.
23 Oct 2010 - 6:34 am | शिल्पा ब
सहमत.
23 Oct 2010 - 8:22 pm | काव्यवेडी
खन्डू हा सराइत चोर आहे. त्याने आजोबान्साठी जे काही केले तो केवळ
अपवाद आहे. त्यामुळे त्याचा वाल्मिकी झाला असे मानण्याचे कारण नाही.
त्त्यामुळे प्रकाशने त्याची तक्रार करावयास हवी होती. त्यायोगे खन्डूला आपले वर्तन
सुधारण्याची कदाचित सन्धि मिळाली असती. शेवटी खन्डू चे वर्तन आणि प्रकाश चे वर्तन हे
या ठिकाणी केवळ त्यान्च्या पुरतेच योग्य आहे.
26 Oct 2010 - 4:10 am | मराठमोळा
आजोबांना हार्ट अॅटॅक हा खंडुच्या चोरी करण्यामुळेच आला. त्याला चोरीची शिक्षा ही व्हायलाच हवी.
पोलिसात चोरीची तक्रार तरी कमीत कमी केलीच असावी, घरातल्या वस्तुंचा ईंशुरंस असेल तर, मग पोलिसांनी आजोबांचा जबाब नोंदवला असेल तर त्यांना खंडु ला पकडणे काही अवघड नाही.
पोलिसात चोरीची/घरफोडीची तक्रार जर केली नसेल तर ती न केल्यामागचे कारण समजले नाही.