हनी बंचेस ऑफ ओट्स!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 6:22 pm

खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

१९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते!

पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली. हातातोंडाची गाठ पडावी ह्याकरता आठवड्याला ७ डॉलर अशा अतिशय तुटपुंज्या रकमेत मी दिवस काढले. त्यावेळचे आठवड्याभराचे सगळे हिशोब माझ्या आठवणीत अगदी पक्के कोरले गेलेत - दूध $१.१९, ब्रेड $०.८९, टूथपेस्ट आठवड्याच्या सरासरीने $०.३४, साल्वेशन आर्मीमधले डोनेशन केलेले कपडे, तेही असेच सरासरी $०.२७ - चुकूनमाकून कधी $७ पेक्षा कमी खर्च झालाच तर जमलेली चिल्लर मी जिवापाड जपत असे, अगदी पेनी अन पेनी! युनिवर्सिटीतल्या वाचनालयातलीच पुस्तके वापरण्याखेरीज माझ्याकडे मार्ग नव्हता इतकेच नव्हे तर रेस्तरॉंमधल्या भांडी धुण्याच्या कामाचे मोल मला फार होते कारण त्यानंतर मिळणारे "मोफत जेवण"! हळूहळू मी सरावलो तसा नवीन संधींचा शोध घेण्याची मानसिकता तयार झाली. २००१ साली मी मॅग्ना-डॉनेली कॉर्पोरेशन ह्या कंपनीकडे बिनपगारी समर इंटर्न म्हणून रुजू झालो.माझ्या जिवापाड काम करण्याने तीनच महिन्यात मला पूर्णवेळ पगारावर बढती मिळाली ती पुढचे ९ महिने!

डिसेंबर २००३ मधे जेव्हा मला पदवी मिळाली तेव्हा माझ्या बचत खात्यामधे शिल्लक होती $२२९ पण माझ्या डोक्यावर एका पेनीचेही कर्ज नव्हते! आठवड्याच्या शेवटी वाचवलेल्या पेनीज जमा केल्या तर $३.२४ जमले होते, अगदीच किरकोळ रक्कम होती ती पण माझ्या पदवीच्या पहिल्या वर्षापासून जे 'हनी बंचेस ऑफ ओट्स' चे दोन बॉक्सेस मला खुणावत होते ते घेण्याइतकी नक्कीच!

अजूनही ते बॉक्सेस मी जिवापाड जपलेत कारण माझ्या आयुष्यातला एक अतिशय कठिण काळ, ज्यावेळी मला माझे शिक्षण, माझा वीसा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून काम करण्याचे मर्यादित तास, एका संपूर्णपणे अपरिचित देशात राहण्याचा ताण ह्यांनी माझे दूरगामी लक्ष्य ढळू नये ह्याकरता मला बळ दिलं, हे सगळे सगळे मला त्या दोन खोक्यांमधे दिसतं!
त्या चार वर्षात कमावलेल्या आत्मविश्वासामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या दोन पूर्णवेळ समर इंटर्नशिप्स मी नाकारु शकलो आणि अ‍ॅनालॉग डिवायसेस ह्याच कंपनीत समर इंटर्नशिप मिळवली कारण मला माझ्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्सच्याच क्षेत्रात काम करायचं होतं! तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अ‍ॅनालॉग डिवायसेसच्या क्लायंट केअर ग्रुपमधे येण्याची ऑफर जेव्हा मला मिळाली तेव्हा माझ्यासमोर पेच होता की मी नुकतीच मिळवलेली प्रॉजेक्ट लीडरशिपची जबाबदारी घेऊ की ती ऑफर स्वीकारु? पुन्हा एकदा माझ्या तात्कालिक चिंतांवर मात करीत मी ती ऑफर स्वीकारली कारण त्यामुळे मला कंपनीची बिझनेस ऑपरेशन्स कशी चालतात हे बघण्याची संधी मिळणार होती. माझे आवडते 'हनी बंचेस ऑफ ओट्स' खातखातच मी हा निर्णय घेतला होता हे सांगणे न लगे!

---------------------------------------------------------------
(आमच्या कंपनीमधला एक इंजिनिअर शिकागो युनिवर्सिटीत एम बी ए करायला निघालाय. त्याच्याशी बोलताना त्याने मला सांगितले की युनिवर्सिटीसाठी त्याने एक निबंध लिहिलाय त्यात त्याने स्वतःची कहाणी दिली आहे. ती वाचल्यावर मला आश्चर्य वाटले. त्याच्याशी आणखीन बोललो तेव्हा समजले की गेल्या ११ वर्षात तो भारतात फक्त एकदा जाऊ शकला कारण पैसेच नव्हते! वयाच्या १२ व्या वर्षी त्याची आई गेली तेव्हापासून मोठे होऊन अमेरिकेत शिक्षण घ्यायचे हा ध्यास त्याने घेतला. तो पूर्ण केला. गेल्या सहा वर्षातली बरीचशी कमाई तो पुढची दोन वर्षे एमबीए करण्यासाठी खर्च करेल आणि मग आणखीन मोठ्या पदावर काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण होईल!
त्याला विचारुन मी त्या निबंधाचं भाषांतर मिपाकरांसाठी सादर केलं. हे करण्यामागे दोन उद्देश होते - एकतर सुस्थितीतल्या मुलामुलींना अशा कठिण परिस्थितीतून पुढे आलेल्या लोकांचे ताजे आदर्श डोळ्यांसमोर नसतात ते मिळावेत आणि दुसरे असे की अमेरिकेत येणारे सगळेच लोक हे पिसांच्या विमानावर बसून येतात आणि मजेत शिक्षण घेत गुबगुबीत खुर्चीत बसून नोकर्‍या करतात असा ज्या लोकांचा समज असेल तर तो काही अंशी दूर व्हावा!)

देशांतरसमाजजीवनमानराहणीविचारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

31 Jul 2010 - 6:41 pm | स्वाती२

जिद्दीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

रेस्तरॉंमधल्या भांडी धुण्याच्या कामाचे मोल मला फार होते कारण त्यानंतर मिळणारे "मोफत जेवण"!

एकेकाळी माझ्या नवर्‍याची परिस्थीती अशीच होती.

चंबा मुतनाळ's picture

31 Jul 2010 - 9:22 pm | चंबा मुतनाळ

परदेशात शिक्षण घेणार्‍या बहुतेक सर्व मुलांना अशा आर्थीक अडचणींतून मात करुन जायला लागते. मला पण ३० वर्षांपूर्वी राणीच्या देशात उपहारगृहात भांडी घासल्याची आठवण आहे. परतावा २ पाऊंड आणी जेवण असायचा. पण तो उमेदीचा काळ होता, आणी त्याची मला लाज वगैरे कधीच वाटली नाही.

- चंबा

खालिद's picture

31 Jul 2010 - 10:20 pm | खालिद

बर्‍यापैकी साऱखी परिस्थिती.

३-३ पार्ट टाइम जॉब्स. आणि हे सर्व सांभाळून थिसिस चा रिसर्च बघणे.

MS करण्यासाठी 70 credits लागली. research assistantshhip चे पैसे फी भरयला जातात म्हणून RA असताना पण कॅफे मधे पार्टटाइम जॉब्स सुरुच.

३ वर्षे जशी काढली ती आयुष्यभर लक्षात राहणार आहेत.

लेख आवडला हेवेसांनल.

अवांतरः - बूथ ला जाणार आहेत का तुमचे मित्र?

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 10:29 pm | चतुरंग

युनिवर्सिटी ऑफ शिकागो

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 6:20 am | आमोद शिंदे

बूथ युनिवर्सिटी ऑफ शिकागो मधेच आहे ना?

http://www.chicagobooth.edu/

चतुरंग's picture

3 Aug 2010 - 6:50 am | चतुरंग

मला इतकी कल्पना नाही.

चतुरंग

श्रावण मोडक's picture

31 Jul 2010 - 7:05 pm | श्रावण मोडक

आज, आत्ता यावेळेस माझा एक मित्र कॅनडात पेट्रोलपंपावर रोजंदारी करून जगतोय. शिक्षण संपलंय. मंदीच्या लाटेत सापडला. नोकरी मिळण्याची बोंब. त्यात कॅनडातील आधी नोकरी कॅनडियन्सना या धोरणाचा फटका. इथून जाताना शिक्षणासाठी कर्ज काढले आहे, त्याची फेड प्रामाणिकपणे करतोय. विशेष म्हणजे, या फेडीसाठी त्याने काही मुदत मागितली बँकेकडे, हप्ता कमी करून मागितला तर बँकेतून आधी त्याच्याकडं संशयानंच पाहिलं गेलं. तो प्रश्न त्याच्या पत्नीनं मार्गी लावला. आठवड्याची काटोकाट कमाई पोट भरण्यासाठीच जाते. परवा फोनवर सांगत होता, त्यानुसार मधला काही काळ त्याला उत्पन्नाच्या विचाराने केवळ दिवसा एक वेळ जेवूनच काढावा लागला आहे. हा संघर्ष असतोच. अमेरिका असो वा युरोप. सारं काही सुस्थितीत होतंच असा गैरसमज असूच नये. अमेरिका, युरोपच का? इथंही तसंच होत असतं. पुण्यातही असे दाखले आहेतच माझ्यासभोवती. खेड्यांतून आलेल्या मुलांचे. हा संघर्ष लादणारी परिस्थिती सार्वत्रिक असतेच.
लेखाचा हेतू उत्तम. लेखही चांगलाच.

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 7:12 pm | चतुरंग

हा संघर्ष लादणारी परिस्थिती सार्वत्रिक असतेच.

एकदम पते की बात! हेच अधोरेखित करायचे होते. लांबून बर्‍याचदा चकचकीत वाटणार्‍या दुनियेतले अंतर्गत संघर्ष हे इथून तिथून सारखेच असतात, फरक असेल तर तपशिलांचा!

चतुरंग

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 5:11 am | आमोद शिंदे

>>घर्ष हे इथून तिथून सारखेच असतात, फरक असेल तर तपशिलांचा!

पण तपशिलातच तर घोळ घातला आहे ना! मूळ पीडीएफ जमल्यास इथेच चढवता का? आणि आमच्या प्रतिक्रियाही लेखकू महाशयांना पोचवा..

सन्जोप राव's picture

1 Aug 2010 - 9:00 am | सन्जोप राव

आठवड्याला सात डॉलर्स हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी असे कष्ट उपसणे, मग त्यातून हळूहळू विकास आणि मग समृद्धी हे असे फक्त भारतातून अमेरिकेत / कॅनडात / परदेशात गेलेल्यांबाबतच घडते असा काहीसा या भाषांतरित लेखाचा सूर वाटला. दोष भाषांतरकर्त्याचा नाही, पण ज्या गोष्टीने मोटिव्हेशन मिळावे असे लेखकाला वाटते, तीच गोष्ट उदाहरणार्थ भारतात राहून अपरिमित कष्ट उपसून शेवटी यशस्वी होणार्‍या लोकांचा उपमर्द करते असाही एक समज होण्याची शक्यता आहे. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे, पण सगळीकडेच असे आहे. कष्ट कुणाला चुकले आहेत? कुणी ओट बॉक्सेस जपून ठेवील, तर कुणी सुकी भेळ ज्यातून बांधून आणली तो कागद. फरक फक्त इतकाच आहे. मिसळपाववरील एका सन्माननीय सदस्याने फक्त चणे खाऊन आणि पाणी पिऊन काही दिवस काढले आहेत. सात डॉलर्समध्ये आठवडा काढण्यापेक्षा हे कमी कष्टदायक आहे काय?
हे फक्त भारतातून अमेरिकेत गेलेल्या आणि तिथे यशस्वी झालेल्यांचे ग्लोरिफिकेशन आहे, असे कुणाला वाटले तर त्याचे नवल वाटायला नको. बाकी दृष्टीकोन, चष्मे वगैरे गल्लीबोळ आहेतच.

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2010 - 7:40 pm | स्वाती दिनेश

त्या मित्राच्या जिद्दीचे कौतुक! त्याची स्वप्ने लवकर पूर्ण होवोत ही सदिच्छा!!
स्वाती

त्या मित्राच्या जिद्दीचे कौतुक आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.

हा संघर्ष लादणारी परिस्थिती सार्वत्रिक असतेच.

सहमत आहे. माझा एक मित्र असाच जिद्दीने तिथे शिकला.. पुढे गेल्यावर्षी जरा स्थिरस्थावर झाल्यावर लग्न केले आणि लग्नाच्या सुट्टीवरून बायकोसह अमेरिकेत परतताच हातात पिंक स्लिप (कारण मंदी) !! बायको तिथे एम.एस. करत असल्याने तिच्या डिपेंडन्ट विजावर ३ महिने काढल्यावर पुन्हा नोकरी मिळाली तोपर्यंत त्याने भारतात कळवलेही नव्हते.

विकास's picture

1 Aug 2010 - 1:14 am | विकास

सर्वप्रथम, चतुरंगने सांगितलेली गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे. जरी त्यातील काही मुद्दे मला पटले नसले तरी... कदाचीत त्यात त्याची सांगण्यात गल्लत होत असावी अथवा शिकागोचे प्राध्यापक प्रवेश देत नसताना नीट वाचत नसावेत. ;)

लग्न केले आणि लग्नाच्या सुट्टीवरून बायकोसह अमेरिकेत परतताच हातात पिंक स्लिप (कारण मंदी) !!

माझे लग्न डिसेंबर मधे होते, जुलै मधे कसेबसे (त्यावेळेसाठी) चांगले घर मिळवले होते. नोव्हेंबर मधे कामावर एच आरचा व्हिपि आला आणि स्पेशल रूममधे घेऊन म्हणाला तुझे काम खूप चांगले आहे, पण कंपनीची स्थिती चांगली नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देत आहोत... त्याचे शांतपणे ऐकले पण डोकं फिरलं होत! मग तो गेल्यावर बाहेर येऊन बॉसवर रागावून बोलणार होतो, की तुला माहीत नाही का मी माझे लग्न आहे म्हणून? तेव्हढ्यात तीच म्हणाली, "माझा सुद्धा जॉब गेला आहे!" :( मग शांत झालो. पुढचे ८ दिवस जरी कामावर होतो तरी बर्‍याच माहीती केवळ माझ्याकडे होत्या त्या व्यवस्थित तिथल्या ज्येष्ठ व्यवस्थापकाला दिल्या, कंपनी प्रेसिडंटला "विश यू ऑल द बेस्ट" चे पत्र दिले आणि राम राम म्हणले..

जॉब गेला त्या दिवशी शांतपणे घरी आलो. माझ्यापेक्षा माझे मित्र आणि हितचिंतकच घाबरले होते. कारण एकूण त्यावेळेस देखील जॉब कंडीशन (मिळवण्याची) चांगली नव्हती. खिशात उद्याचे पैसे आहेत का ते माहीत नव्हते पण तरी देखील जमेल तसे जमेल तितक्या मिनटांचे फोन घरी आणि चित्राला फोन करायचो. तिकीट काढले का प्रश्नाला उत्तर, "हो हो काढतोच आहे.. " इतके असायचे. मला एका मित्राने जॉब ऑफर केला पण सॉफ्टवेअर मधे जाण्याची इच्छा नव्हती म्हणून त्याला सांगितले की, "८ दिवस थांब काहीच झाले नाही तर तू म्हणतोस तसा प्रयत्न करेन."

अचानक एका जनरल काँट्रॅक्टरकडे सिव्हील इंजिनियरींगशी संबधीत जॉब कळला. तो भारतीयच होता. मला अचानक आठवले की मी पर्यावरणाप्रमाणेच स्थापत्यशास्त्रात पण शिकलोय ;). पुढे काही समजायच्या आत हातात जॉब होता... मग घरी सगळे सांगितले. नवीन जॉब घेण्याची तारीख नंतरची घेतली आणि जे आधीच्या कंपनीत राहीलो असतो तर तीनच आठवडे लग्नासाठी जाऊ शकलो असतो, त्या ऐवजी जवळपास दोन महीने एकूण सुट्टी घेता आली.

.......

पुढे बराच काळ गेला... ग्रीन कार्ड घेण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले पण वेळ कमी होता. तमाम एक्सपर्ट वकील म्हणाले की तुला वेळेअभावी मिळणे शक्य नाही, भारतातच जावे लागेल. मनातल्या मनात म्हणले. की नक्कीच जाईन पण मला वाटेल तेंव्हा, वकीलांच्या कमी अकलेमुळे आणि ते म्हणतात म्हणून नाही... मग वकील न घेता, नोकरीच्या मुळे मिळणार्‍या ग्रीनकार्ड ऐवजी "देशाच्या हितासाठी" नावाच्या विशिष्ठ प्रकारातून ग्रीन कार्डसाठीचा आम्हीच अर्ज तयार केला. ज्यांच्यासाठी कामे करून हातातून सुदैवाने बर्‍याच भरीव गोष्टी झाल्या होत्या त्या सर्वांनी पाठींबा देणारी पत्रे दिली. त्यात ज्या कंपनीने मला काढले होते त्या कंपनीने देखील माझ्या कामामुळे त्यांचे प्रचंड आगीनंतर किती जॉब वाचण्यास मदत झाली ते देखील होते. अर्थातच ग्रीन कार्ड मिळाले.

एकूणच या दोन्ही वेळेस तसेच इतर अनेक वेळेस, "If you strongly desire something with your heart, the whole world conspires to fulfill your desire." या वाक्याचा अनुभव आला...

Pain's picture

2 Aug 2010 - 2:48 pm | Pain

एकूणच या दोन्ही वेळेस तसेच इतर अनेक वेळेस, "If you strongly desire something with your heart, the whole world conspires to fulfill your desire." या वाक्याचा अनुभव आला...

Not necessarily. किमान माझ्याबरोबर तर कधीच नाही !

चित्रा's picture

31 Jul 2010 - 8:02 pm | चित्रा

चतुरंग यांनी उत्तम काम केले आहे, ही माहिती लोकांपुढे आणून. स्वाती यांच्यासारखेच म्हणते. या मुलाच्या कष्टाचे आणि जिद्दीचे कौतुक आणि वाटचालीसाठी शुभेच्छा.

परंतु, या मुलाने केलेल्या पहिल्या चार वर्षांत केलेल्या पैशाच्या विनियोगातील काटेकोरपणा मला बहुदा जमला नसता. आमच्या राज्यात किंमती सतत चढ्याच असल्याने ७ डॉलरमध्ये आठवडाभर राहणे शक्य झाले नसते. आमच्याकडे दुधाच्या गॅलनची सध्याची किंमत ही साधारणपणे $३.४९ आहे, दहा वर्षांपूर्वीही ती याहून फार कमी नव्हती (अगदी स्वस्त दुकानांमध्येही). हे दूध कितीही आठवडाभर पुरवले तरी या पैशातून बाकीच्या काळातील आठवड्याचा खर्च निघणार नाही. पोटाची खूपच आबाळ करावी लागली असती, असेही वाटते, आणि मला ते विशेष लाँगटर्म सोल्युशन (चार- एक वर्षांसाठी) म्हणून रूचत नाही. पण या सर्व धडपडीमागची घरावर कर्जाचा बोजा पडू नये ही इच्छा कळते, आणि समजते.

बाकी राहण्याच्या खर्चाचे वर्णन या लेखात नाही, ही लेखातील एकच उणीव वाटते. मुलाने कशा प्रकारे राहण्याचा खर्च मिळणार्‍या पैशातून काढला तेही लिहायला हवे होते.

स्वताई होती असे त्याने सांगितले. त्याने पोटाला मारले असावे असे वाटत नाही परंतु अतिशय काटेकोर नियोजन करावे लागलेच.
राहण्याचा खर्च कसा भागवला ही उणीव असेलही पण त्या तपशिलापेक्षा मला ह्या लेखात द्यायचा संदेश निराळा आहे आणि तो पोचला असे वाटते. :)

चित्रा's picture

1 Aug 2010 - 12:03 am | चित्रा

उणीव हा शब्द अगदी गरजेचा नव्हता हे खरे, पण राहण्याचे इथले खर्च आपण पाहतो. ते डोक्यात होते. अमेरिकेत न राहणार्‍या लोकांना इथे होऊ शकणार्‍या खर्चाची कल्पना नसते. ते लेखात दिसले नाही, म्हणून उणीव म्हटली, एवढेच.. पण संदेश पोचला. आणि कळकळही जाणवली.

अशा काटेकोरपणे नाही, तरी अतिशय ओढाताणीतून आमची काही वर्षे गेली आहेत, त्यामुळे हा लेख महत्त्वाचा वाटला, आणि कोणाला इथे यायचे असल्यास याही महत्त्वाच्या खर्चाची कल्पना असावी असे वाटले. भारतात राहताना हॉस्टेलमध्ये राहत नसल्यास राहण्याचा खर्च आपण तरूण विद्यार्थी असताना डोक्यातही घेत नाही. इथे आल्यावर पहिला झटका बसतो, की मिळकतीतील १/४ ते १/३ हिस्सा नुसत्या राहण्याच्या जागेसाठी जातो. ते लेखात दिसले नाही, म्हणून ती एकच उणीव आहे असे म्हटले.

आमोद शिंदे's picture

31 Jul 2010 - 10:09 pm | आमोद शिंदे

जवळपास चार डॉलर तर दूध, ब्रेड, पेस्ट आणि कपडे ह्यातच गेले. वाण सामान (डाळ तांदूळ तेल इ.इ.), आंघोळीचा साबण, दाढीचे साहित्य, चपला/बूट, (मिशीगन राज्यातील थंडी बघता) थंडीसाठी लागणारे साहित्य, बसचा पास इ.इ अनेक जिवनावश्यक गोष्टी उरलेल्या ३ डॉलरमधे जमवणे मिशीगनच काय कुठल्याही राज्यात शक्य नाही.

चतुरंग यांनी उत्तम काम केले आहे
असेच म्हन्तो.त्यन्च्या जिद्दीला सलाम !!!!!
माझा एक मित्र. आम्ही बरोबरच बीई केले. त्याने फारच बिकट परीस्थीतीत बीई पुर्ण केले.१००० रुपये पगाराची पहिली नोकरी मिळाली. त्यातच लग्नही झाले.मग पुण्यामधे डिप्लोमा कॉलेजवर १८०० पगाराची नोकरी. त्यात आई-वडील आनी २ लहन मुले. बीई ला फस्ट क्लास नस्ल्याने डिगरी कॉलेजवर शिकवण्याची सन्धि नाही. अशातच त्याला युनिव्हर्सीटीम्ध्ये नविनच आलेल्या क्लास ईंप्रुव्हमेंट नियमाची महिती मिळाली. पुन्हा ३-४ विशयाची परिक्षा दीली आनि फस्ट क्लास मिळवला.आता त्याला डिगरी कॉलेजवर शिकवण्याची सन्धि मिळाली.पगार वाढ्ला.१४-१६ तास काम करायचा. प्राईव्हेट क्लास घ्यायचा.
एवढ सगळं चालु असताना त्याने मुंबई आयआयटीची परिक्षा दिली.गेट स्कोर मिळवला. विनापगार एम-टेक पुर्ण केलं. कॉलेजने बढती दिली. पुन्हा साहेबानी पीएचडी ची पात्रता परिक्षा दीली. स्कोर आला. कॉलेजने स्पोन्सेर केले पण विनापगार. आयआयटीच्या तुट्पुन्ज्या स्टायपेंड वर ४ वर्शात पीएचडी झाला.आयआयटीच्या कॅम्पस ईंटरव्ह्युव्ह मधे सिलेक्ट झाला. आता मोठ्या पगाराची नोकरी करत आहे तैवानमधे.

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 9:09 pm | चतुरंग

अशाच गोष्टी समोर याव्यात ही अपेक्षा होती. ती पूर्ण होताना बघून बरे वाटले.

काहीतरी कमी असले की मिळवण्याची जिद्द धगधगती राहते. सगळे आपसूक पुढे आले तर ती आग राहत नाही. इथून पुढे आपल्या मुलांमुलींना सगळे काही देण्याची धडपड करताना आईवडिलांना हा सुद्धा विचार करावा लागणार आहे असे वाटते.

नेत्रेश's picture

31 Jul 2010 - 9:10 pm | नेत्रेश

ही गोष्ट वाचुन अजुन एक घटना आठवली.

माझ्या मित्राने त्याच्या बहीणीला एम एस करण्यासाठी प्रोत्साहन देउन अमेरीकेत बोलावले होते. ती बिचारी कधी एकटी कुठे न गेलेली घाबरत घाबरतच अमेरीकेत पोहोचली. हा मित्र वेस्ट कोस्टला. ती इस्ट कोस्टला.

तीची ओळख त्याच दिवशी अमेरीकेत आलेल्या आणखी एका भारतीय मुलीशी झाली. त्यांनी सिनीअर्स च्या मदतीने एक रुम (शेअरींग मध्ये) मीळवली. त्या नंतर दोघींनी घरी फोन केले. आणी समजले की त्या दुसर्या मुलीची आई, ही मुलगी विमानात बसल्यावर थोड्याच वेळात हार्ट अ‍ॅटॅकने देवाघरी गेली होती. आताच भारतातुन कर्ज वगैरे घेउन आलेली ही मुलगी परतही जाउ शकत नव्हती. त्यामुळे ती प्रचंड दु:खात. मित्राची बहीण पण खुप घाबरुन गेलेली. सारखा फोन आणी होम सिक होउन रडणे. "मला परत जायचे आहे" असे सांगणे. या मित्राचे तीला समजावणे, आणी तीला अमेरीकेत आणण्या साठी आणी युनिवर्सिटीच्या फी साठी घातलेले पैसे फुकट जातील म्हणुन टेंशन मध्ये असलेला मित्र. बापरे, फार कठीण होते ते ६-७ दिवस.

अर्थात काही दिवसांनंतर सगळे सुरळीत झाले. दोघी एम एस झाल्या व नोकरी, लग्न करुन ईथेच सेटल झाल्या. पण हा प्रसंग न कायम आठवणीत राहीला.

आमोद शिंदे's picture

31 Jul 2010 - 9:26 pm | आमोद शिंदे

गेल्या सहा वर्षातली बरीचशी कमाई तो पुढची दोन वर्षे एमबीए करण्यासाठी खर्च करेल आणि मग आणखीन मोठ्या पदावर काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण होईल!

त्याला पुढील वाटचालीस जरूर शुभेच्छा!!

पण ह्या सगळ्याचे कौतुक करावे का नाही हा प्रश्न पडला आहे. वरती मोडकांनी म्हंटल्याप्रमाणे कष्टाचे डोंगर उपसत यश मिळवणे ही प्रवृत्ती सगळीकडेच दिसून येते. आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या वकुबाप्रमाणे मेहनत करुनच आज जे काय आहे ते मिळवले आहे. हा लेख म्हणजे त्या कष्टांची शोकेसमधे मांडणी करुन विद्यापीठात प्रवेश मिळवण्याचा तद्दन बाजारू प्रयत्न वाटला. परखड मता बद्दल क्षमस्व.

अजूनही उपसत आहेत ह्यात शंका नाही.

>>>हा लेख म्हणजे त्या कष्टांची शोकेसमधे मांडणी करुन विद्यापीठात प्रवेश मिळवण्याचा तद्दन बाजारू प्रयत्न वाटला.

असे तुला का वाटले? मी इतर कोणीच असे कष्ट (किंवा यापेक्षा जास्त कष्ट) केले नाहीत असे म्हणालोच नाही. माझ्या लेखाचा उद्देशही मी वरती तळटीपेत करड्या अक्षरात लिहिला अहे.
(शिवाय इथल्या विद्यापीठात प्रवेश मिळवताना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात हे सांगणारे निबंध लिहावे लागतात त्यामुळे हा बाजारु प्रयत्न नाही.)

पुढे जाऊन असेही म्हणतो की सध्याच्या जमान्यात आर्थिक स्थैर्य बर्‍यापैकी आलेले जे लोक आहेत त्यांच्या मुलांना ह्या अनुभवापासून वंचित रहावे लागेल का आणि त्यामुळे एक प्रकारचे शैथिल्य त्यांच्यात येईल का असे वाटते. म्हणून अशी उदाहरणे समोर येत रहावीत असे वाटते.

(त्या मुलाशी जेव्हा मी हा लेख भाषांतरित करुन टाकण्याबद्दल बोललो तेव्हा तो म्हणाला की जरुर टाक त्यातून लोकांना इन्स्पिरेशन मिळाली तर उत्तमच आहे. आणखी एक गोष्ट - बांगलादेशातून आलेल्या एका रेफ्यूजी विद्यार्थ्याला हा मुलगा आत्तापासूनच शक्य ती मदत करत आहे. त्याचे म्हणणे असे की मला माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार तर मी फेडू शकणार नाहीये परंतु माझ्यासारखे जे कष्टात आहेत त्यांचे कष्ट थोडे कमी करु शकलो तरी ती एकप्रकारे परतफेडच आहे.)

आमोद शिंदे's picture

31 Jul 2010 - 9:59 pm | आमोद शिंदे

>>असे तुला का वाटले? मी इतर कोणीच असे कष्ट (किंवा यापेक्षा जास्त कष्ट) केले नाहीत असे म्हणलेलेच नाही. माझ्या लेखाचा उद्देशही मी वरती तळटीपेत करड्या अक्षरात लिहिला अहे.

अरे माझी टिप्पणी तुझ्या लेखावर नाहीच आहे! तू फक्त भाषांतर केले आहेस. तुझा उद्देशही स्पष्ट आहे. माझा रोख मूळ लेखकावर आहे. तसेच मी किती हालअपेष्टा सोसल्या ह्याचे रसभरित वर्णन करुन विद्यापीठात प्रवेश मिळवण्याच्या बाजारु प्रवृत्तीला आहे.

हालाखीची परिस्थीती- त्यातुन झुंझ -अपयश -पुन्हा प्रयत्न यशस्वी असा प्रवास दाखवणार्‍या डझनावारी सुंदर कथा असताना मला ह्या लेखात काही वेगळे दिसले नाही.

अच्छा मग आपण दोघे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लेखाकडे बघत आहोत त्यामुळे निष्कर्ष वेगवेगळे येणारच! धन्यवाद! :)

लेख आवडला.

तुमच्या मित्राचे अभिनंदन आणी शुभेच्छा!!!

*हनी बंचेस ऑफ ओट्स! माझे आवडते सिरियल्स आहेत. :)

सोम्यागोम्या's picture

31 Jul 2010 - 11:07 pm | सोम्यागोम्या

माफ करा पण ७$ चा हिशेब काही पटला नाही. परिस्थिती अतिरंजित करण्यासाठी ७$ चा आकडा घेतला असावा असा संशय यायला जागा आहे.
१. अमेरिकेत कुठेही काम केले तरी प्रत्येक राज्याच्या कायद्या नुसार कमीत कमी वेतन तरी द्यावेच लागते. २००१ ला इंटर्नशिप मिळाली. १९९७ पासून चे फेडरल व मिशिगन स्टेअचे मिनिमम वेज प्रति तास $५.१५ होते. दुवा.

>>>>आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून काम करण्याचे मर्यादित तास

२. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आठवड्याचे कायद्यानुसार २० तास काम करु शकतो. (म्हणजे महिन्याचे $ ४१२ मिळु शकतात)
३. लेखक जिथे रहायचा तिथे घर भाडेही असेलच. साधारण स्वस्तात स्वस्त शहरात ४००$ भाडे महिन्याचे धरले वर चार जण रहात असले तरी विज पाणी बिल धरून ११०$ ते १५० $ कमित कमी
खर्च आलाच. ७$ चा एक असे ४ आठवडे तर लेखकाचे एकूण उत्पन्न महिन्याचे १३८ $ धरूया. त्या हिशोबाने त्यांनी महिन्यात २६.७९ तास काम केले. चला २७ तास पकडू. उरलेले कायदेशीर ५३ तास लेखकाने काम केले नाही.

गणित बाजुला राहु द्या २८$ मध्ये महिना भागत असेल यावर तरी विश्वास बसत नाही. एवढ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असतील तर याला पूर्णपणे परिस्थीतीच कशी काय जबाब्दार आहे?
आपण स्कॉलरशिप मिळवली नाही, पूर्ण कायदेशीर तास काम केले नाही, चांगला कँपस जॉब मिळवला नाही, प्रवेश घेते वेळेस युनिव्हर्सिटी मध्ये पुरेसे कँपस जॉब्स आहे का नाही याची चौकशी केली नाही, आपण पेड इंटर्नशिप मिळवू शकलो नाही असे महत्त्वाचे मुद्दे नाहीत का?

दूध $१.१९, ब्रेड $०.८९, टूथपेस्ट आठवड्याच्या सरासरीने $०.३४ एवढाच खर्च होता का? कांदे, बटाटे, भाज्या, तेल, मसाले, फोन बिल, अंगाचे साबण, लाँड्री याचा खर्च नव्हता का?

>>>>हातातोंडाची गाठ पडावी ह्याकरता आठवड्याला ७ डॉलर अशा अतिशय तुटपुंज्या रकमेत मी दिवस काढले.
यात घरभाडे धरले आहे काय? नसेल तर अशी अर्धसत्य सांगणा-या अतिरिंजित वाक्यांचे प्रयोजन काय?

चित्रा यांच्या प्रतिक्रियेत त्यांनी हाच मुद्दा मांडला आहे.

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 11:08 pm | चतुरंग

ह्या लेखाचा उद्देश बारीक सारिक हिशेब बघणे आणि त्याची उलट तपासणी असा नाहीये. गाभ्याची गोष्ट लक्षात घ्या, तपशील महत्त्वाचे नाहीत. असो. ह्यापेक्षा जास्त काही लिहीत बसणे शक्य नाही.

सोम्यागोम्या's picture

31 Jul 2010 - 11:32 pm | सोम्यागोम्या

>>गाभ्याची गोष्ट लक्षात घ्या
गाभ्याचा पाया तुम्हीच अवास्तव व खरा न वाटणारा लिहिला आहे. तुम्ही स्वतःहून फक्त गाभा न सांगता ७$ चा हिशेब दिला आहे. त्यामुळे सविस्तर प्रतिक्रिया दिली होती.

प्रत्येकाने मेहनत करावी व आपले उद्दिष्ट गाठावे या बद्दल दुमत नाही. तपशीलांची अपेक्षा नाहीए. तुम्ही तुमच्या मित्राने सांगितले म्हणून सत्य मानून ते लिहिलेत. नवख्या लोकांचे गैर समज होवू नयेत. एखाद्या अमेरिकेला जाण्याची मनिषा असलेल्या विद्यार्थ्याला "बापरे ७$ मध्ये आठवडा काढावा लागतो" असे वाटू नये.

आपण जेव्हा एखादा विषय मांडतो तो जबाबदारीने मांडावा एवढीच अपेक्षा.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jul 2010 - 11:04 pm | बिपिन कार्यकर्ते

स्फूर्तिदायक. बाकी काही प्रतिक्रिया वाचून एवढेच वाटले... चश्मे चश्मे की बात है!!!

प्रियाली's picture

1 Aug 2010 - 3:03 am | प्रियाली

मूळ लेखाची प्रत आंतरजालावर आहे का? लेकीला वाचायला देईन म्हणते. ;)

तुमच्या मित्राचे आमच्यातर्फे कौतुक करा. कठिण परिस्थितीची जाणीव माणसाने सतत ठेवावी. आयुष्य सुकर होते असे मला वाटते.

असो.

हातातोंडाची गाठ पडावी ह्याकरता आठवड्याला ७ डॉलर अशा अतिशय तुटपुंज्या रकमेत मी दिवस काढले.

हे मलाही जरा अतिशयोक्त वाटले. खाण्यापिण्याखेरीज इतर अनेक खर्चही असतात ज्यांचा उल्लेख या $७ च्या खर्चांत नाही.

जिद्दीचे कौतूक, वाटचालीसाठी शुभेच्छा.

(अशा कथा भारताच्या अंतर्गतच खेड्यातून शहरात आलेल्यांच्या, झोपडपट्टीमधून विद्यापीठापर्यंत मजल करणार्‍यांच्या ऐकल्या आहेत. माधुकरी, नादारी, करत-करत शिक्षण मिळवणार्‍या भैरप्पा, दया पवारांची आत्मचरित्रे हल्लीच वाचली. अधूनमधून गप्प बसणार्‍या मित्रांना बोलते केले, की त्यांच्या स्फूर्तिदायक कथा ऐकायला मिळतात. परदेशात मात्र एकाकी लढा द्यावा लागतो, आईवडलांनासुद्धा सांगता येत नाही - त्यांना करता तर काही येणार नाही, काळजी उगाच वाटेल - हे एक अधिक ओझे असते.)

चित्रा's picture

1 Aug 2010 - 9:15 am | चित्रा

परदेशात मात्र एकाकी लढा द्यावा लागतो, आईवडलांनासुद्धा सांगता येत नाही - त्यांना करता तर काही येणार नाही, काळजी उगाच वाटेल - हे एक अधिक ओझे असते.

अगदी, असेच म्हणते.
पण तरी एक अनुभवांतून शिकले आहे - जर कधी आधाराची गरज पडेल तेव्हा घरच्यांची थोडी मदत घेतली, त्यांच्याशी होणार्‍या त्रासांवरून बोलले, तर सर्वांच्या प्रेमाने, थोड्याबहुत सहाय्याने वेळ निघून जाते. अट्टाहासाने दरवेळी आपली लढाई आपणच लढायची, यापेक्षा मित्र-सुहृदांची मदत मागणे हाही कधीतरी एक ऑप्शन असू शकतो.
आम्ही दोन्ही (घरच्यांना कठीण प्रसंगी विश्वासात घेणे/ अजिबात न घेणे) केले आहे, त्यामुळे बोलण्याचा अधिकार आहेच असे समजून लिहीते आहे. :)

असो.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 1:20 pm | मिसळभोक्ता

परदेशात मात्र एकाकी लढा द्यावा लागतो, आईवडलांनासुद्धा सांगता येत नाही - त्यांना करता तर काही येणार नाही, काळजी उगाच वाटेल - हे एक अधिक ओझे असते.)

काय बोललास, धन्याशेठ

लढा सगळीकडेच असतो. फक्त इथे तो एकाकी असतो, हाच फरक !

मस्त ! बुल्स आय ! (अर्र, मराठी संकेतस्थळ आहे नाय का? मग "बैलाचा डोळा" !)

चतुरंग's picture

2 Aug 2010 - 4:21 pm | चतुरंग

एकाकी लढा ही मानसिकदृष्ट्या चटकन खचवणारी गोष्ट असते.
कित्येक छोटे मोठे त्रास तर सांगितलेच जात नाहीत कारण लांबून काही मदत होण्यापेक्षा काळजीनेच तिकडचे लोक अर्धे होणार.

नंदन's picture

2 Aug 2010 - 1:56 pm | नंदन

श्रामो आणि धनंजय यांच्या प्रतिक्रियांशी सहमत. लेखामागचा उद्देश आणि कळकळ पोचली.

स्वाती२'s picture

1 Aug 2010 - 7:28 am | स्वाती२

च्च! $७ वरुन किती काथ्याकुट! असे असु शकते की इतर खर्च वजा जाता या व्यक्तीला स्वतः वर खर्चायला आठवड्याला $७ उरत असतील. कॅफेटेरियात काम केले तर जेवण फुकट होते. तुम्हाला जर का कुठे खरेदी करायची माहित असेल तर अनेक वस्तू तुम्ही खूप कमी पैशात/जवळ जवळ फुकट मिळवू शकता. बरेचदा बिकट परिस्थीती पाहून मित्र रहायच्या जागेची सोय कमी पैशात/फुकटात करतात. साऊथ डाकोटात माझा नवरा आणि त्याचे मित्र घर रेंट करुन राहायचे. तेव्हा बिकट परिस्थीतीत सापडलेले बरेच जण तिथे पथारी पसरायचे. या लोकांनी एक दुकान शोधले होते. तिथे थोडे पॅकेज डॅमेज झालेले सिरिअल,क्रॅकर्स, सूप वगैरे खूप स्वस्तात मिळत.
जॉब बद्दल तर स्प्ष्ट उल्लेख आहे
पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली.

मात्र काही वेळा परिस्थीती अचानक बदलते. ९९ मधे इथे आलेल्या बर्‍याच जणांना २००० च्या रिसेशनचा फटका बसला. प्रोफेसरच्या बजेट मधे कपात झाली की त्या प्रमाणात असिस्टंटशिपही घटते. १९९७ च्या आशियायी आर्थिक संकटात देखिल बर्‍याच जणांचे प्लॅनिंग कोलमडले होते.
शेवटी महत्वाचे एवढेच की घरच्यांना कर्जात न लोटता या व्यक्तीने कष्टाने ध्येय गाठले.

मुक्तसुनीत's picture

1 Aug 2010 - 9:57 am | मुक्तसुनीत

लिखाण आवडले.

प्रत्येकाकडे एक स्टोरी असतेच. या व्यक्तीची स्टोरी मला प्रेरणादायक वाटली. त्यामधे पवित्रा आहे किंवा प्रदर्शन आहे असे वाटले नाही.(या न्यायाने कुठलेही आत्मपर लिखाणाच "पोझ घेऊन केलेले" वाटेल.) डॉलर्सचा नेमका हिशोब काय असा प्रश्न मला पडला नाही.

पुरणपोळी's picture

1 Aug 2010 - 12:58 pm | पुरणपोळी

हि आमची फार फार आवड्ती सिरियल... विद्यापीठात असताना हाणलेले डबेच्या डबे आठवले...
मला मजबूत असिस्टटशिप आणि तगडी स्कऑलरशिप मिळत होति....
एश केली...:)

एक प्रेरणादायी अनुभव कथन इथे दिल्या बद्धल धन्स... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2010 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>एक प्रेरणादायी अनुभव कथन इथे दिल्या बद्धल धन्स...

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 11:38 am | मिसळभोक्ता

हल्लीच कंपनीत एका लीडरशिप कॉन्फरन्सला अस्मादिकांना का कोण जाणे स्टेजवर बोलावले. आणि मुलाखत घेतली.

पहिलाच प्रश्नः तुम्हाला सर्वात जास्त कशाचा अभिमान आहे ?

आता किती छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्यात ?

म्हणून थोडा वेळ विचार केला, आणि म्हटले: "आय अ‍ॅम प्राउड ऑफ हाऊ फार आय हॅव कम, व्हेन नो वन इन द वर्ल्ड, इन्क्लुडिंग मी, एक्स्पेक्टेड मी टू डू सो वेल."

सतरा वर्षांपूर्वी माझी परिस्थिती तुमच्या मित्रापेक्षा बरी होती. पण माझ्या शिक्षणासाठी माझ्या आई-वडीलांना कर्ज घ्यावे लागले नाही, हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा होता.

अनुभव आवडला. हिरव्या नोटांच्या खाली अशा खूप जखमा असतात. त्या नोटांचा माज येऊ देत नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 2:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय, श्रामो आणि मिभोकाकांचे प्रतिसाद आवडले आणि पटले.

जिद्दीला सलाम.
अशा गोष्टी अधूनमधून वाचत राहिल्या की प्रेरणा मिळते सतत कष्ट करण्याची, धडपड करण्याची आणि आहे त्यात समाधान न मानत बसण्याचीही!

हिरव्या नोटांच्या खाली अशा खूप जखमा असतात. त्या नोटांचा माज येऊ देत नाहीत.
क्या बात है!!

स्वप्निल..'s picture

3 Aug 2010 - 11:49 pm | स्वप्निल..

>>अनुभव आवडला. हिरव्या नोटांच्या खाली अशा खूप जखमा असतात. त्या नोटांचा माज येऊ देत नाहीत.

नेमकं हेच डोक्यात होतं .. व्वा!!

समुपदेशनाच्या पुस्तकात हा एक धडा संकलीत करा .
चतुरंग ,भारतीय वेळापत्रकाप्रमाणे अगदी योग्य वेळी टाकलेला लेख .
सध्या अ‍ॅडमीशनसाठी रोज इतर पालकांसोबत रांगेत उभा राहतो आहे. त्या चार तासात सगळ्या मुलांनी आणि पालकांनी वाचण्यासारखा लेख आहे.
मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाकडे एक स्टोरी असतेच.
हे फक्त भारतातून अमेरिकेत गेलेल्या आणि तिथे यशस्वी झालेल्यांचे ग्लोरिफिकेशन आहे
रावसाहेब मी असहमत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार

जिद्दीला सलाम.

इथे साला स्वदेशात-स्वशहरात -शिक्षण पुर्ण असुन - स्वतःच्या व्यवसायत असुनही रात्री १ क्वार्टरची जमवाजमव करायला मारामार होते.

अवलिया's picture

2 Aug 2010 - 2:20 pm | अवलिया

सहमत आहे.

१) पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली.
२) रेस्तरॉंमधल्या भांडी धुण्याच्या कामाचे मोल मला फार होते कारण त्यानंतर मिळणारे "मोफत जेवण"!
३) २००१ साली मी मॅग्ना-डॉनेली कॉर्पोरेशन ह्या कंपनीकडे बिनपगारी समर इंटर्न म्हणून रुजू झालो.
४) माझ्या जिवापाड काम करण्याने तीनच महिन्यात मला पूर्णवेळ पगारावर बढती मिळाली ती पुढचे ९ महिने!

नशीब एवढे सगळे मिळाले.
हल्ली यातले काहीच मिळत नाही.

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 5:14 am | आमोद शिंदे

नशीब एवढे सगळे मिळाले.
हल्ली यातले काहीच मिळत नाही.

पुढच्या वेळेस प्रवेशासाठी असे काही लिहावे लागणार. "खिशात पैसे नाहीत म्हणून डंपस्टर मधला बूट काढून चघळून त्यावर आठवडा काढला."

प्रत्येकाची लढाई वेगळी असते. आणि प्रत्येकाकडे स्टोरी असते हे खरेच आहे.
पण नोकर्‍यांचे चित्र अमेरिकेत खूप झपाट्याने बदलते/खालावते आहे.
आज-काल जीआरई/अण्डरग्रॅड चा भक्कम स्कोअर आणि सधन कौटुंबिक स्थितीच्या जोरावर अनेक मुले चांगल्या अमेरिकन विद्यापिठात प्रवेश मिळवतात. हिमतीने शिकतात सुद्धा. पण डिग्री हातात आली तरी नोकरीची(कँपस इ.) शक्यता नसतेच. असलीच तर धूसर असते.
अमेरिकेत नोकरी शोधायला जास्त दिवस राहता सुद्धा येत नाही. सगळ्यांना पीएचडी साठी पुढची ३-४ वर्षे गुंतवणुक (वेळ/पैसा) जमेलच असं नाही. म्हणून बरेच लोक हिरमुसले होऊन परतात.

सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत शिकायला जाणार्‍यांपुढे आज वेगळे - शिक्षणा पलिकडचे प्रश्न आहेत.
अशा पार्श्वभूमीवर - "अमेरिका: लँड ऑफ ड्रिमस्" ची जादू ओसरतीये. त्यामुळे ९० चे दशक संपता संपता लिहिलेला लेखकाचा अनुभव इथे निव्वळ प्रेरणे पलिकडे कितपत उपयोगी पडतो असा प्रश्न मला पडलाय. लेखकाचा तसा ह्या लेखाचा उपयोग व्हावा असा उद्देश आहे का नाही हे ही माहित नाही.

चतुरंग's picture

3 Aug 2010 - 10:26 pm | चतुरंग

>>>सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत शिकायला जाणार्‍यांपुढे आज वेगळे - शिक्षणा पलिकडचे प्रश्न आहेत.
अशा पार्श्वभूमीवर - "अमेरिका: लँड ऑफ ड्रिमस्" ची जादू ओसरतीये. त्यामुळे ९० चे दशक संपता संपता लिहिलेला लेखकाचा अनुभव इथे निव्वळ प्रेरणे पलिकडे कितपत उपयोगी पडतो असा प्रश्न मला पडलाय. लेखकाचा तसा ह्या लेखाचा उपयोग व्हावा असा उद्देश आहे का नाही हे ही माहित नाही.

चांगला मुद्दा उपस्थित केला आहेत विंजिनेर.
अमेरिकेत शिक्षण घेणार्‍याने काय गोष्टींना तोंड द्यायची तयारी ठेवावी हा ह्या लेखाचा अतिशय मर्यादित उद्देश झाला.

माझ्या लेखातच तळटिपेत करड्या अक्षरात मी जे म्हटले आहे ते पुन्हा एकदा देतो -
>>हे करण्यामागे दोन उद्देश होते - एकतर सुस्थितीतल्या मुलामुलींना अशा कठिण परिस्थितीतून पुढे आलेल्या लोकांचे ताजे आदर्श डोळ्यांसमोर नसतात ते मिळावेत

आमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी काय कष्ट काढले हे आत्ताच्या पिढीला सांगून फारसा अर्थ नसतो कारण ही पिढी ते रिलेट करु शकत नाही, आपण त्यांना ह्या गोष्टी का सांगतो आहोत हे त्यांना विजुअलाईज करणे जवळजवळ अशक्य असते कारण त्यांनी तशी परिस्थिती बघितलेली नसते. असे असताना कष्टांची किंमत, जिद्द, कठिण परिस्थितीत न हारता पुढे कसे जावे, रिसोर्सफुल कसे असावे वगैरे त्यांना आयुष्यभरासाठी (आणि त्यांनाच का आपल्यालाही) उपयोगी पडणार्‍या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोचवाव्यात ही अडचण असते. ह्या मुलाची कहाणी इथे देण्यामागे तो उद्देश जास्त महत्त्वाचा आहे की अगदी आत्ताच्या काळात २००४-२००५ पर्यंत, ज्याच्याशी ही मुलं स्वतःला रिलेट करु शकतात, असे कष्ट घेणारी मुले आहेत हे समजावे. आपल्याला उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टी ह्या 'सुखसोयी' ह्या सदरात मोडतील इतक्या बिकट परिस्थितीतून अनेक लोक वर येतात हे समजावे हा उद्देश.
हे सुद्धा लगेच समजले आणि मुले एकदम गुणीबाळ झाली अशी अपेक्षा नाहीच पण डोक्यात कुठेतरी किडा घुसवून ठेवायचा, तो हळूहळू विचार करुन वाढेल, निरीक्षणाने त्याला एक रुप येईल आणि मग मुले स्वतःच ते शिकत जातील अशी अपेक्षा.

विंजिनेर's picture

4 Aug 2010 - 9:24 am | विंजिनेर

पण डोक्यात कुठेतरी किडा घुसवून ठेवायचा, तो हळूहळू विचार करुन वाढेल,

सुप्तरूपात किडा असला म्हणजे पुढे कधीतरी नक्की कामास येतो. किडा डोक्यात घुसवणं महत्वाचं हे खरंच :)