कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार (भाग १?)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
26 Jul 2010 - 1:06 am


थोडं ऐतिहासिकः

'कव्वाली' चा उगम आहे उर्दू शब्द 'कव्ल' मध्ये. 'कव्ल' म्हणजे 'सत्य असावं असं मानलं जाणारे गृहीत-शब्द', आणि हे सत्यतेचं स्थान या शब्दांना मिळतं कारण ते असतात 'ज्ञानी माणसाचे शब्द'. मूळात ही प्रथा सुरू झाली ती सूफी संतांनी त्यांच्या भक्ती-मार्गाच्या प्रवासात देवाची स्तुती करतांना केलेल्या शब्दोच्चारांनी. हे 'कव्ल' उच्चारणारे ते 'कव्वाल' आणि त्या लयबद्द उच्चारणाला म्हणतात 'कव्वाली', ऐतिहासिक दृष्ट्या आधी पर्शिया (आताचं इराण) आणि भरतखंडात (आताच्या भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागात) कव्वालीचा उगम आणि प्रसार झाला. आता हा गायनप्रकार मलेशिया, इंडोनेशिया, बांगला देश या मुस्लीम देशांत तर पसरला आहेच पण जगभरात इतरत्रही लोकप्रिय आहे. या गायनाचा इतिहास बहुतेक हजार-एक वर्षं जुना असावा.

कव्वालीचं धार्मिक अंगः
सुफी विचारधारा ही इस्लाम धर्माचा एक थोडासा वेगळा असलेला भाग. मुख्य मुस्लीम धर्म तसंच सुफी विचारधारा दोन्ही हे मान्य करतात की माणूस देवाकडे पोहोचण्याच्या मार्गात आहे ('तरीका'), फरक इतकाच की मुख्य मुस्लीम धर्मात असं मानलं जातं की मानवाचं देवाशी मिलन मृत्यूनंतरच होऊ शकतं, तर सुफी विचारधारेनुसार जिवंतपणीही असं देवापर्यंत पोहोचणं शक्य आहे. आणि या अशा देवापर्यंत पोहोचण्याच्या अनेक सुफी मार्गांपैकी कव्वाली हा एक. कुराणानुसार माणसाने देवाचं ध्यान किंवा स्मरण करावं ('धिक्र'), हे स्मरण मुक्याने असावं किंवा शाब्दिक. कव्वाली हे शाब्दिक 'धिक्र'चं एक रूप. [सुफी विचारधारेच्या जन्माचं श्रेय बहुतेक असावं मोईनुद्दीन हसन चिस्ती या मूळच्या सिजिस्तान प्रांतात (आजच्या 'सिस्तान' किंवा पूर्व इराण आणि पश्चिम अफगाणिस्तान या भागात) जन्मलेल्या आणि वाढलेल्या ख्वाजाचं (११४३-१२३४). हा पुढे दिल्लीला येऊन त्याच्या ज्ञानी प्रवचनांनी कीर्तीमान झाला. त्याच्या अखेरच्या काळात तो राजस्थानातील अजमेर येथे स्थायिक झाला, त्याचा दर्गा सर्वधर्मीय श्रद्धास्थान म्हणून आजही प्रसिद्ध आहे. याच कालावधीत इराणच्या चिस्ती या सुफी पंथातील एक संत अमीर खुस्रो देहेलवी हाही भारतात आला, आणि त्याने भारतीय संगीत आणि सुफी संगीत यांचा मिलाप घडवून कव्वाली या प्रकाराला लोकमान्यता मिळवून दिली, या जाहीर कार्यक्रमांना मैफिल-ए- समा म्हणत असत.]

कव्वाली: गायनप्रकार

कव्वाली गायनात काही ठराविक टप्पे असतात. सुरूवातीला तालवाद्यांच्या अनुपस्थितीत केवळ अतिशय आशयघन बोलांच्या स्वरूपात सुरूवात होते ती 'आलापां'नी. थोड्या वेळाने येतात ते फिरून-फिरून आवर्तित होणारे शब्द किंवा ओळी ('हाल'), यावेळी शब्दांचं तितकंसं महत्व नसतं, इथे उद्देश असतो तो -टाळ्या आणि वाद्यसंगतीत- श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचा. यानंतर खूप वेळाने येते ती स्थिती 'फना'ची, ज्यावेळी गायक, श्रोते आणि गायनविषय (इथे 'देव' या अर्थाने) या सर्वांचं एकरूप होणं. इथे कव्वालीच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये बरेचदा श्रोते तल्लीन होऊन टाळ्या वाजवत नाचू लागतात. द्रुतगती दादरा आणि केहेरवा हे तबल्याचे ताल प्रामुख्याने कव्वालीत वापरले जातात, 'फना' ही स्थिती build-up करायला हे ताल खूपच महत्वाचे आहेत. रागांबद्दल बोलायचं झालं तर बिलावल, खमाज, काफी आणि कल्याण हे चार राग कव्वाली गायनात प्रामुख्याने वापरले जातात असं वाचनात आलं. ['हाल' आनि 'फना' यांच्या मध्ये स्थित असणारा 'सरगम' हा प्रकार नुसरत फतेह अली खान या गुणी गायकाने कव्वालीमध्ये खूप यशस्वी प्रकारे प्रसिद्ध केला त्याची काही उदाहरणं आंतर्जालावर पहायला मिळतात.]

कव्वालीचे पाच मुख्य प्रकार असल्याची माहिती आंतर्जालावर मिळते. 'हम्द' म्हणजे देवाची (अल्लाची) स्तुती, 'नात' म्हणजे प्रेषिताची (मुहंमद पैगंबरांची) स्तुती, 'मनकबत' म्हणजे इमाम अली किंवा सुफी संत अशा धर्मगुरूची स्तुती, 'मार्सिया' म्हणजे धर्मगुरूच्या मृत कुटूंबियांची स्तुती (हा प्रकार फक्त शिया मुसलमानांमध्येच गायला जातो) आणि पाच्वा कव्वाली प्रकार म्हणजे 'गझल', ज्यात एकमेकांवरील प्रेमाचं वर्णन असतं. या गायनप्रकारात बरंच स्वातंत्र्य घेतलेलं आढळतं, यात प्रियकर-प्रेयसीचं प्रेम असू शकतं, देव-आण-भक्ताचं प्रेम असू शकतं, इतकंच काय, मद्यपींच्या मद्याविषयीचंही प्रेम असू शकतं! (अर्थात्, या प्रेमाचा संबंधही देवाशी लावला गेलेला आहे; मद्य म्हणजे 'अमूर्ताचा ध्यास', मद्य आणून देणारी 'साकी' म्हणजे देव किंवा देवाप्रती घेऊन जाणारा मार्गदर्शक धर्मगुरू, आणि मधुशाला ('मयखाना') म्हणजे आत्म्याला अखेर निर्वाण लाभतं ते स्थान.) या पाच गायनप्रकारांखेरीज 'काफी' ही सिंधी किंवा पंजाबी गायकी आणि 'मुनादियात' ही इराणात रात्रीच्या वेळी म्हंटली जाणारी कव्वाली हेही दोन प्रकार आहेत.

कव्वाली-पार्टी:

कव्वाली गाणार्‍या पथकाला 'हमनवा' किंवा 'पार्टी' म्हणतात. यात साधारणपणे ८-१० लोक असतात, यांपैकी एक मुख्य गायक, १-२ उप-गायक, एक-दोन हार्मोनियम वादक (बहुधा गायकांपैकीच एक-दोघे ही वाद्यं वाजवतात), एक तबला-ढोलक वाजवणारा, आणि इतर साथीदार टाळ्या वाजवून कोरस मध्ये ताल धरतात. पुरूष हमनवा मांडी घालून कव्वाली गायनाला बसतात तर स्त्रिया (कव्वाली गायिकांचं प्रमाण जाहीर कार्यक्रमांमध्ये लक्षणीय रीत्या कमी असलं तरी फिल्मी कव्वाली गातांना) दोन्ही पाय एकाच दिशेला मुडपून बसतात. [आबिदा परवीन ही प्रसिद्ध गायिका कव्वाली साठी नामांकित असली तरी टाळ्या व कोरस यांचा वापर न करता ती गात असल्याने तिची कव्वाली इतर कव्वालांच्या जातकुळीतली म्हणून ओळखली जात नाही.] कव्वालीत आधी बरेचदा सारंगी साथीला असायची, पण दर दोन गाण्यांमध्ये तिच्या तारा परत जुळवाव्या लागत असल्याने हल्ली हार्मोनियम आधिक वापरात असते. गाणारे पुढे तर वाजवणारे आणि कोरस मध्ये साथ देणारे मागे अशी साधारण दुपदरी बैठक असते.

कव्वालीची जेंव्हा जाहीर बैठक होते, तेंव्हा 'सरगम' खूप आवडली तर किंवा 'फना' च्या वेळची अनुभूती अगदी तीव्र असेल तर बरेचदा श्रोते गायकांवर नोटा उधळून टाकतात, याला 'वेल' म्हणतात; अशी 'वेल' पुन्हा पडत राहिली तरी गायक-वादक न थांबता कव्वाली पुढे चालू ठेवतात. [अनेक व्हिडीओज मध्ये हा प्रकार पाहतांना मला एक नक्कीच जाणवलं - असं 'रसभंग' करणारं वर्तन पं. भीमसेन जोशींच्या किंवा इतरही कुणा एकाग्र गायकाच्या बैठकीत झालं तर बहुधा कानफटात बसेल 'वेल'वाल्याच्या!]

कव्वालीची प्रसिद्धी:
बरीच शतकं दर्ग्यांमध्येच सीमित असलेली कव्वाली पुढे अकबर आणि इतर राजांच्या दरबारांमध्ये आणि जाहीर मैफिलींमध्ये आली. आजच्या तिच्या प्रसिद्धीला कारणीभूत आहेत हिंदी चित्रपट, पण हा गायनप्रकार भारतीय उपखंडाबाहेर जगभर प्रचलित करण्यात सहभाग आहे नुसरत फतेह अली खान आणि पाकिस्तानातीलच साबरी ब्रदर्स या कलाकारांचा. यांपैकी नुसरत फतेह अली खान यांनी पाश्चिमात्य कलाकारांबरोबर सहकार्य करून 'फ्यूजन कव्वाली' प्रसिद्ध केली.

हिंदी चित्रपटांमध्ये कव्वाली आली ती १९६० च्या दशकात. त्यानंतर अगदी आता-आतापर्यंत प्रत्येक यशस्वी चित्रपटात एक तरी कव्वाली हवीच असा फॉर्म्युला होता. या कव्वालींपैकी काही कव्वाली धार्मिक असल्या तरी बहुतांशी ही गाणी सामाजिक रूप घेऊन किंवा प्रेमिकांचे सवाल-जवाब या स्वरूपात आपल्यापुढे आल्या. आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे, बैठकीतील आमने-सामने बसणार्‍या कव्वाल आणि श्रोत्यांचा 'ऐकण्याचा' जमाना संपून आधी चित्रीत करून ठेवलेली गाणी प्रेक्षक नंतर 'पहाणार' हा बदल झाल्याने फिल्मी कव्वाली 'प्रेक्षणीय' कशी होईल याकडे निर्मात्या-दिग्दर्शकांचं लक्ष केंद्रित झालं. तुम्ही या पुढे जेंव्हा मेहेफिल-ए-समा मधलं नुसरत किंवा इतर कव्वालांचं गाणं पहाल तेंव्हा त्यातल्या कलाकारांचं 'दिसणं' किती दुय्यम आहे (घामाघूम होणारे चेहेरे, अगदी गबाळे वाटू शकतील असे काहींचे कपडे, वगैरे), आणि याच्या उलट चित्रपटांमधील ऋषीकपूर-झीनत इत्यादींचे परफेक्टली कलर-मॅच केलेले पोषाख आणि कोरियोग्राफ केलेल्या हालचाली यात कव्वालीचे अर्थ फारसे महत्वाचे रहात नाहीत हे जाणवतं.

वाचकांना उत्सुकता आहे असं दिसलं तर यापुढच्या भागात गाजलेल्या कव्वालींचे काही नमूने पेश करीन, अन्यथा इथेच विराम!

संस्कृतीसंगीतधर्मइतिहाससमाजआस्वाद

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

26 Jul 2010 - 1:42 am | पुष्करिणी

सुंदर लेख, खूप आवडला. कव्वाली आवडतेच पण इतकी माहेती नव्हती, धन्यवाद.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मस्त कलंदर's picture

26 Jul 2010 - 4:12 pm | मस्त कलंदर

सुंदर लेख.. आवडला यात शंकाच नाही.. या निमित्ताने, ना तो कारवाँकी तलाश है, चढता सूरज, तेरे कदमोंमे सर अपना झुकाकर हम भी देखेंगे.. वगैरे कव्वाल्या सरसरून गेल्या नजरेसमोरून...
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.. :)

मीनल's picture

26 Jul 2010 - 2:34 am | मीनल

हे सर्व माहिती नव्हते, कव्वालीत फक्त टाळ्या वाजवतात हे माहित होते.
अजून लिहा.

क्रान्ति's picture

26 Jul 2010 - 9:02 am | क्रान्ति

लेख आवडला. कव्वाली प्रकार खूप आवडतो, म्हणून मनापासून ऐकत होते फक्त, आणि तो एक धार्मिक गीतप्रकार आहे एवढी जुजबी माहिती होती. पण या लेखातून तिचे वेगवेगळे पैलू वाचायला मिळाले. या विषयावर आणखी माहिती मिळाली, तर नक्कीच आवडेल.

[इथे ताजुद्दिन बाबांच्या दर्ग्यात जेव्हा दर्शनाला जावं, तेव्हा खरी उत्कट कव्वाली ऐकायला मिळते. केवळ एक ढोलकी आणि पेटी यांची साथसंगत असते आणि कव्वालांचे भारदस्त आवाज. ती कव्वाली ऐकण्यात वेगळीच अनुभूती येते.]

निखिल देशपांडे's picture

26 Jul 2010 - 12:17 pm | निखिल देशपांडे

लेख आवडला
कव्वाली बद्दल बरीच नवीन माहीती वाचायला मिळाली

सहज's picture

26 Jul 2010 - 12:23 pm | सहज

मलेशीया, इंडोनेशीया, दक्षीण थायलंड येथे डिकीर बारात नावाचा एक सांस्कृतीक कार्यक्रम बराच लोकप्रिय आहे.

त्याचे एक रोचक आधुनिक रुप.

श्रावण मोडक's picture

26 Jul 2010 - 4:47 pm | श्रावण मोडक

लेख आवडला. या निमित्ताने गुजरातमध्ये एका गावात होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या कव्वाली महोत्सवाची आठवण झाली. गावाचं नाव विसरलो. पण ते नंदुरबार जिल्ह्याला लागून आहे. तिथं दरवर्षाला हा महोत्सव होतो. गाजलेले कव्वाल येतात.

प्रभो's picture

26 Jul 2010 - 6:10 pm | प्रभो

लेख आवडला.. :)

मेघवेडा's picture

26 Jul 2010 - 6:15 pm | मेघवेडा

पुढील भागांच्या प्रतीक्षेत. :)

संदीप चित्रे's picture

1 Aug 2010 - 10:12 am | संदीप चित्रे

खूपच चांगली माहिती मिळाली.
पुढच्या लेखांची वाट बघतोय.

ऋषिकेश's picture

1 Aug 2010 - 10:28 am | ऋषिकेश

वा! छान माहिती
मराठीमधे खरे-कुलकर्णी जोडगोळीचे कव्वालीच्या अंगाने जाणारे "नामंजूर" हे गाणेही श्रवणीय आहे.

जयंत कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 11:16 am | जयंत कुलकर्णी

बहूगूणीजी,

फार सुंदर लेख.
आपण आभ्यास करून, वेळ काढून हा लेख लिहीलेला असणार.
येथे हा आमच्यासाठी माहितीपूर्ण लेख टाकलात या बद्दल आभार.

बहुगुणी's picture

1 Aug 2010 - 11:43 am | बहुगुणी

इथे आहे.

कसा वाटला ते तिथेच कळवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 11:50 am | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम !!!

स्वाती दिनेश's picture

1 Aug 2010 - 11:54 am | स्वाती दिनेश

लेख आवडला.कव्वाली ऐकायला आवडते पण त्याबद्दल इतकी माहिती नव्हती. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत.
स्वाती