एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
15 Jun 2010 - 12:03 pm

''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे.

कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी. तेव्हा चुभूदेघे )

तर ही एस्पेरांतो भाषा नक्की आहे तरी काय?

बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्यांना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत. थोडक्यात, युरोपियन व आशियाई भाषांच्या अभ्यासकांना ही भाषा अवगत करणे अजिबात कठीण नाही. मात्र ह्या भाषेचा उद्देश जगातील सर्व समूहाला एका सामायिक पर्यायी भाषेत एकमेकांशी संवाद साधता यावा हा आणि हाच आहे. आज जगातील लाखो लोक तरी ही भाषा आपल्या स्थानिक भाषेगत सफाईने बोलतात. पुण्यातील ह्या भाषेचे अभ्यासक व एस्पेरांतोच्या भारतातील संघाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम म्हणतात त्याप्रमाणे ही काही परिषदांमध्ये, अभ्यासकांच्या मेळाव्यात काथ्याकूट करायची भाषा नव्हे; तर ही जनसमूहाची - सामान्य माणसाची भाषा आहे.

भाषेचे जनक

एल. एल. जामेनहोफ

(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)

पोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) जामेनहोफ या सद्गृहस्थांनी इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व प्रांतिक भेदांचे मूळ लोकांचा आपापसात परस्पर संवाद नसण्यात आणि तो संवाद करण्यासाठी एखादी सामायिक भाषा नसण्यात आहे याबाबतीत त्यांचे ठाम मत होते. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे. दुर्दैवाने जामेनहोफ यांच्या तिन्ही मुलांची होलोकास्टमध्ये हत्या झाली.

भाषेच्या नावामागील इतिहास

जामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ. स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ ''आशा बाळगणारा'' असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ''ल इंतरनॅशिया लिंग्वो'' (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.

एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये

१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे.

२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.

३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते.

४. सोपेपणा: ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.

५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य.

आज ह्या भाषेत कित्येक हजार पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संगीत व काही प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच जगभरातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य ह्या भाषेत रुपांतरित झाले आहे. संपूर्ण दुनियेत ह्या भाषेला आत्मसात केलेली मंडळी तिचा उपयोग जगभरात प्रवास करताना, पत्रमैत्रीसाठी तर करतातच! जगातील एस्पेरांतो बोलणारे लोक एकमेकांच्या घरी आतिथ्याचा विनामूल्य लाभ घेतात. शिवाय एकमेकांच्या भेटीगाठीत फक्त एस्पेरांतो बोलण्यावर भर, परस्पर संस्कृती-पाककला-परंपरा-विचार इत्यादींची एस्पेरांतोच्या माध्यमातून देवाणघेवाण ह्याही गोष्टी आठवणीने पाळल्या जातात. ह्या भाषेसंदर्भातील वेगवेगळ्या परिषदा, संवाद, स्नेहसंमेलनांतून निरनिराळ्या ठिकाणी एस्पेरांतो बोलणारे लोक एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करतानाच ह्या भाषेचा मूळ उद्देश जपण्याचे काम करतात.

भाषेचा उद्देश

ह्या भाषेला निर्माण करण्यामागे जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी... ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. त्यात स्थानिक भाषेला ही भाषा पर्याय म्हणून गणणे, भाषावैविध्यात खंड पाडणे हे उद्देश अजिबातच दिसत नाहीत. एक तटस्थ, कोणतीही विशिष्ट संस्कृती नसलेली व स्वतःची वेगळी ''वैश्विक'' संस्कृती असलेली ही भाषा तिच्या ह्या वैशिष्ट्यांमुळेच अनेक टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे. तसेच ह्या भाषेतील शब्द प्रामुख्याने युरोपियन धाटणीचे असल्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. मानवी इतिहासातील एक समृद्ध, विचारपूर्वक आणि ऐतिहासिक - क्रांतिकारक पाऊल म्हणून ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.

ह्या भाषेतील काही शब्द उदाहरणादाखल :

हॅलो : सालूतोन : Saluton
येस : जेस : Jes
नो : ने : Ne
गुड मॉर्निंग : बोनान मातेनोन : Bonan matenon
गुड आफ्टरनून : बोनान वेस्पेरोन : Bonan vesperon
गुड नाईट : बोनान नोक्तोन : Bonan nokton
ऑल राईट : बोने : Bone
थॅंक यू : दांखोन : Dankon
प्लीज : बोन्वोलू : Bonvolu

भाषा कशी शिकायची?

इंटरनेटच्या जमान्यात काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ही भाषा शिकू शकता.

त्यासाठी http://www.lernu.nethttp://www.ikurso.net या संकेतस्थळांवर नजर टाका.

मराठीत ह्या भाषेवरील पुस्तकाची निर्मिती डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी केली आहे. मला इंटरनेटवर पुस्तक मागवण्यासाठीचा त्यांचा मिळालेला पत्ता हा असा : बी ३, कांचन नगरी, कात्रज, पुणे - ४६.
ईमेलः anibani@rediffmail.com

तसेच ह्या विषयावर तेलुगू व इंग्रजी भाषेत डॉ. रंगनायकुलू यांनी पाठ्यपुस्तकनिर्मिती केली आहे.
त्यांचा मिळालेला पत्ता असा :

P V RANGANAYAKULU
(ranganayakulu@hotmail.com , pvranga@rediffmail.com)
asista profesoro, 46 Junior Officers' Quarters, Behind TTD Admn Bldgs, KT Road, Tirupati 517 501, Andhra Pradesh.

(वरील पत्ते हे इंटरनेटवर मिळालेले असून त्यांची लेखिकेने खात्री करून घेतलेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी! )

चित्रफितींच्या लिंक्स

तसेच ह्या विषयावर यूट्यूबवरही काही चित्रफिती उपलब्ध आहेत. त्याही जरूर पाहाव्यात!
त्यांच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

या भाषेविषयी काही बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आल्या आहेत. त्यातीलच ही एक बातमी :

http://www.thehindu.com/2008/02/13/stories/2008021359100400.htm

माझे शिक्षक

माझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांच्याविषयी दोन शब्द लिहिल्याखेरीज हा लेख संपवता येणार नाही. त्यांच्या माध्यमातूनच मला या भाषेची सुरेख ओळख झाली. अनेक विद्यार्थ्यांशी, समाजातील विविध स्तरांतील लोकांशी सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. उत्साह, नैपुण्य, विनम्रता, सौहार्द आणि कार्यनिष्ठा यांचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. अनेक वर्षे समाजकल्याण खात्यातील महत्त्वपूर्ण अधिकारपद निभावल्यावर निवृत्तीनंतरही समाजहितासाठी झटणारे डॉ. अब्दुल सलाम ज्या सफाईने, सहजतेने वावरतात, बोलतात त्यावरून त्यांना दृष्टीचे सुख नाही हे कोणाला कळणारही नाही! पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कार्यातले झपाटलेपण, त्यांची तळमळ समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. त्यांचे मोकळे हास्य, वागण्यातील सुसंस्कृतता त्यांच्या विश्वनागरिकत्वाचीच प्रचीती देते. डॉ. सलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन!

(लेखातील बरीचशी माहिती विकिपीडियामधून साभार!
विकीपीडियाची लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Esperanto)

डॉ. अब्दुल सलाम यांना आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता :
HELPO FOUNDATION

India Office:
5, Archana Corner, Saluke Vihar Road, Pune - 411 048, India.
Tel.: +91-20-26855632, 26855644. Fax: +91-20-26855644.

Email: helpo@vsnl.com
http://www.helpo.in/index.htm

-- अरुंधती

संस्कृतीवावरभाषासमाजजीवनमानशिक्षणप्रकटनलेखमाहिती

प्रतिक्रिया

बबलु's picture

15 Jun 2010 - 12:44 pm | बबलु

अरुंधती ,
मस्त माहिती.

आधी कधी ऐकलं नव्हतं या भाषेबद्दल.

चला... आज नविन माहिती मिळाली.

....बबलु

अरुंधती's picture

15 Jun 2010 - 7:05 pm | अरुंधती

धन्यवाद बबलु! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

ह्याची मुळाक्षरे कशी आहेत? किती आहेत?
वेताळ

अरुंधती's picture

15 Jun 2010 - 7:04 pm | अरुंधती

प्रतिसादाबद्दल धन्यवाद वेताळ! :-)

मी दिलेल्या लिंक्समध्येच ही सर्व माहिती उपलब्ध आहे. कृपया आपण त्या लिंक्स पूर्ण वाचून पहाव्यात ही विनंती. माझ्या लेखाचा उद्देश केवळ अश्या प्रकारची एखादी भाषा अस्तित्वात आहे याविषयी माहिती देणे हा असल्याने मी फार तपशीलवार लिखाण केलेले नाही.

तरीही आपण विचारलेली माहिती ही अशी :

Writing system

Main article: Esperanto orthography

Esperanto is written with a modified version of the Latin alphabet, including six letters with diacritics: ĉ, ĝ, ĥ, ĵ, ŝ (with circumflex) and ŭ (with breve). The alphabet does not include the letters q, w, x, or y except in unassimilated foreign names.

The 28-letter alphabet is:

a b c ĉ d e f g ĝ h ĥ i j ĵ k l m n o p r s ŝ t u ŭ v z

All letters are pronounced approximately as in the IPA(International Phonetic Alphabet), with the exception of c and the letters with diacritics.

उर्वरित माहिती आपल्याला विकिपीडिया लिंकवरही मिळेल!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

II विकास II's picture

15 Jun 2010 - 4:33 pm | II विकास II

बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्यांना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत.
== मराठी भाषेतील काही शब्द नाही का? ही भाषा आधिच युरोपियन भाषाचे जवळ जाणारी आहे, असे आरोप झाली आहे.

ह्या प्रयोगाचे व्यवहारीक मुल्य किती???

अरुंधती's picture

15 Jun 2010 - 6:56 pm | अरुंधती

विकास, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

एस्पेरान्तो ही जगातील भिन्न भाषिक लोकांना जोडणारी भाषा.... मग त्यात नक्की कोणकोणत्या भाषांमधलेच शब्द आहेत हा मुद्दा तुलनेने गौण ठरतो. त्यामुळे जेव्हा ही भाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची मातृभाषा कोणतीही असो (उदा: जर्मन, हिंदी, इंग्रजी, रशियन, मराठी इ.) वा ते लोक कोणत्याही संस्कृती/ देश/ भागातून आलेले असोत.... ते एकमेकांशी बोलू शकतात, संवाद साधू शकतात. फार मजा येते असा संवाद साधताना.... समोर चायनीज माणूस उभा असतो आणि तो काय बोलतोय हे आपल्याला कोणत्याही दुभाषाची मदत न घेता वा त्याच्या मातृभाषेविषयी काहीही माहिती नसताना कळू शकते.... कारण बोलली जाणारी सामायिक भाषा.

मला तरी ही भाषा शिकायला सोपी वाटली. इतरांचे मी सांगू शकत नाही. परंतु आजवर भारतात ही भाषा बोलणारेही बरेच लोक तयार झालेत. मी दिलेल्या लिंक्स पाहिल्यात तर तिथे त्या भाषेतील भरपूर साहित्य, शिकणार्‍यांचे अनुभव, व्हिडियोज, या भाषेवर होणारी टीका वगैरे भरघोस माहिती मिळेल.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2010 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यु....!

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

15 Jun 2010 - 7:19 pm | धमाल मुलगा

अशीही भाषा आहे?
भारीच्चे की! :)

पण एकुण बाज पाहता, आमच्यासारख्या भारतीय भाषा आणि थोडीफार इंग्रजी येणार्‍यांना हे थोडं कठीण जाईल असं वाटतं. हां, ज्याला इतर युरोपियन भाषांची माहिती आहे त्यांना सोपं जाईल बहुतेक.

मात्र नवनवीन भाषा शिकण्याचा छंद असणार्‍यां लोकांसाठी छानच आहे. :)

धन्यवाद अरुंधती!

अरुंधती's picture

15 Jun 2010 - 7:37 pm | अरुंधती

तुमचा प्रामाणिक प्रतिसाद आवडला. :-)
ही भाषा माझ्याबरोबर काही मराठी माध्यमातून दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, बरीच वर्षे संसार करत असलेल्या गृहिणी, निवृत्त लोक, व्यावसायिक आणि हौशी असे बरेच जण शिकत होते.... कोणीच असे भाषा स्कॉलर नव्हते. तरीही सर्वांना ही भाषा फार चटकन अवगत होते.
कारण शिकवायची पध्दत!
सर्वात आधी व्याकरण, फोनेटिक्स, वाक्यरचना वगैरे तपशीलात न जाता सरळ सरळ रोजच्या व्यवहारातील उपयोगी शब्द, शुभेच्छा, वाक्प्रचार, वाक्ये बोलायला शिकवले जाते. ही मुख्यतः बोलीभाषा आहे, त्यामुळे बोलण्यास सुटसुटीत असेच तिचे रूप आहे. जसजसा भाषेविषयीचा आत्मविश्वास वाढत जाईल तसतसे हळूहळू इतर तपशील शिकवले जातात. त्यामुळे लोक ही भाषा बोलायला तरी नक्की व पटापट शिकतात! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

15 Jun 2010 - 9:23 pm | धमाल मुलगा

म्हणजे एकदम सोप्पं काम आहे म्हणा की.
पहायला हवं एकदा.. तेव्हढीच मजा येईल नव्या भाषेची. :)
(भले मला त्याचा कुठे उपयोग करता येईल न येईल..ती बाब अलाहिदा, पण शिकायला काय इश्टेट जात नाही आपली. :) )

बाकी, बोलीभाषा बोलीतुनच शिकवण्याची युक्ती उत्तमच. नाहीतर बर्‍याचदा व्याकरण वगैरे घोळात बराचसा उत्साह निघुन जातो आमच्यासारख्यांचा.

अरुंधती's picture

16 Jun 2010 - 8:57 am | अरुंधती

आक्शि बरुबर! आणि ही भाषा आंतरजालावरच शिकण्याची सोय आहे म्हटल्यावर अजूनच उत्तम! शुभेच्छा! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Dhananjay Borgaonkar's picture

15 Jun 2010 - 8:43 pm | Dhananjay Borgaonkar

बोनान लेख :)

अरुंधती's picture

16 Jun 2010 - 8:57 am | अरुंधती

दांखोन, धनंजय साहेब! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2010 - 9:30 pm | पिवळा डांबिस

सह्ही!
या वीकांतालाच शिकायला सुरवात करतो!!!!
:)

अरुंधती's picture

16 Jun 2010 - 8:58 am | अरुंधती

शुभेच्छा! मजा येईल शिकताना :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रामदास's picture

16 Jun 2010 - 9:08 am | रामदास

पोरं आजकाल माझे एसेमेस वाचतात.
कच्च्याचा हिशोब लिहायला काही व्यवस्था आहे का या भाषेत.?

अरुंधती's picture

16 Jun 2010 - 11:03 am | अरुंधती

कच्च्याचा हिशेब म्हणजे? मला कळाले नाही. :-)
कृपया सांगाल काय?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/