पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
6 Jun 2010 - 8:41 pm

तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.

कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"! स्वावलंबनाचे व स्वकष्टाच्या कमाईचे महत्त्व समजण्यासाठी त्याचा फार उपयोग झाला. त्यामुळेच मी कधी छोटासा जॉब कर, कधी इंग्रजी वृत्तपत्रांत काहीबाही लेख पाठव तर कधी शिकवण्या घे असे नाना उद्योग करून गरजेबरहुकूम धन जोडण्याच्या कामी असे. सुदैवाने इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांच्या टेकूमुळे मला अर्थार्जनाच्या संधींची कधीच कमतरता भासली नाही.

तर एक दिवस अचानक एका मित्रशिरोमणींचा फोन आला. त्यांची ओळख असलेल्या एका मिशनरी संस्थेत एका पाद्रीबुवांना गोर्‍या साहेबाच्या भाषेतून (इंग्रजीतून) मराठी शिकवण्यासाठी सुयोग्य व्यक्ती हवी होती. 'तुला ह्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे का? ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले! मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्त्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. माझ्या सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रूपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोश इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. ते सर्व घबाड पाहिल्यावर मला काय आनंद झाला म्हणून सांगू! घरी मी अक्षरशः उड्या मारीत परत आले.

त्यानंतर मी माझ्या ६८ वर्षांच्या तरुण विद्यार्थ्यालाही भेटले. छोटीशी, जेमतेम पाच फूट उंची असलेली, कमरेतून किंचित वाकलेली मूर्ती, काळासावळा वर्ण, पिकलेले आखूड केस व डोळ्यांना जाडसर भिंगांचा चष्मा! हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता! त्यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांचे हे गुण भावले. कारण उत्साहापोटी त्यांनी ग्रंथालयातून मराठी शिकण्यासाठी त्यांना उपयुक्त वाटलेली २-३ पुस्तके मला दाखवायला आणली होती. थोडी जुजबी चर्चा करून दुसरे दिवसापासून आमची साहेबाच्या भाषेतून मराठीची शिकवणी सुरू झाली.

तीन महिन्यांच्या आमच्या ह्या शिकवणीत आम्ही दोघांनी आपापल्या भाषा- संस्कृती - तत्त्वज्ञान- विचार इत्यादींची भरपूर देवाणघेवाण केली. आमचे हे पाद्रीबुवा मराठीतून बोलायला बऱ्यापैकी तयार होत असले तरी लिखाणात खूप कच्चे होते. मी त्यांना जो गृहपाठ देत असे तोदेखील ते कसाबसा पूर्ण करीत. जमलं तर चक्क अळंटळं करीत. स्वभाव तसा थोडासा रागीटच होता. शिवाय ते वयाने एवढे मोठे होते की सुरुवातीला मला त्यांना गृहपाठ न करण्याबद्दल, टाळाटाळीबद्दल रागावायचे कसे हाच प्रश्न पडत असे. पण माझी ही अडचण संस्थाप्रमुखांनी सोडवली. "खुशाल शिक्षा करा त्यांना, " प्रमुखांनी मला खट्याळपणे हसत सांगितले. मीही पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ह्या विद्यार्थी पाद्रीबुवांना जास्तीच्या गृहपाठाची शिक्षा देत असे. मग तेही कधी लहान मुलासारखे रुसून गाल फुगवून बसत, तर कधी गृहपाठाचा विषय निघाला की इतर गप्पा मारून माझे लक्ष दुसरीकडे वेधायचा प्रयत्न करीत. कधी माझ्यासाठी चॉकलेट आणीत तर कधी एखादी अवघड किंवा अवांतर शंका विचारून विषयांतर करता येतंय का ते पाहत. अर्थात मीही स्वतः कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला सर्व दिशाभूल तंत्रे तोंडपाठ होती! त्यामुळे मी त्यांच्या दोन पावले पुढेच असे. मग त्यांच्या चाळिशीच्या फ्रेमआडून माझ्या दिशेने कधी वरमलेले तर कधी मिश्किल हास्यकटाक्ष टाकण्यात येत असत!

ह्या काळात अवांतर गप्पांच्या ओघात त्यांनी मला त्यांची जीवनकहाणीही थोडक्यात सांगितली. दक्षिणेतील एका छोट्याशा गावात परिस्थितीने गरीब ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बरीच भावंडे आणि पाचवीला पुजलेले दारिद्र्य! शाळेतही त्यांची अभ्यासात खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती! अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले ते! पण फुटबॉलमध्ये करियर करण्यासाठी घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मग त्यांनी धर्मकार्याला वाहून घेतले. त्याबदल्यात त्यांना ठराविक वेतन सुरू झाले, पोटापाण्याचा प्रश्न मिटला आणि त्या कामातच सगळी हयात गेली. जास्त शिक्षण नसल्यामुळे ह्याही क्षेत्रात अडचणी येत गेल्या. अनेक अपेक्षाभंग पचवावे लागले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिशनच्या कामासाठी पुण्यासारख्या अनोळखी प्रांतात, अनोळखी लोकांमध्ये, वेगळ्या भाषा व संस्कृतीच्या प्रदेशात त्यांना धाडण्यात आले. पण तशाही अवस्थेत त्यांची शिकण्याची तयारी, नवी भाषा आत्मसात करून ती बोलायचा उत्साह खरोखरीच स्तुत्य होता. शारीरिक व्याधी, म्हातारपण, वयाबरोबर येणारी विस्मृती ह्या सर्व आव्हानांना तोंड देत ते आपल्या नव्या जबाबदारीसाठी तयारी करत होते. पण मग कधी कधी त्यांचाही धीर सुटे. संस्थेतील राजकारणाने ते अस्वस्थ होत. आपल्यावर अन्याय झालाय ही भावना त्यांचा पाठलाग करत असे. त्यातल्या त्यात सुख म्हणजे रोजच्या साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टींमध्ये त्यांना मानसिक आराम मिळत असे. पण तिथेही अपेक्षाभंग झाला की ते कमालीचे अस्वस्थ होत. खास करून मिशनच्या भोजनकक्षात दिले गेलेले खाणे त्यांच्या पसंतीचे नसले की ते हमखास सायंकाळी त्याविषयी माझ्याकडे एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करीत. मग खाण्यावरून त्यांचे लक्ष अभ्यासात आणण्यासाठी मला खरीखुरी कसरत करावी लागत असे.

एक दिवस आमच्यात अशीच नेहमीच्या गृहपाठाच्या विषयावरून भलतीच खडाजंगी उडाली. आज पाद्रीबुवा भलतेच घुश्शात होते! ''तू मला मुद्दामहून अवघड गृहपाठ देतेस! तुला माहीत आहे मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला थोडे कमी दिसते, ऐकूही कमी येते. पण तरी तू मला कसलीही सूट देत नाहीस! हे चांगलं नाही!'' मला खरं तर त्यांचा संपूर्ण आविर्भाव पाहून मनात हसायला येत होते. पण तसे चेहर्‍यावर दिसू न देता मी अगदी मास्तरिणीच्या थाटात उत्तरले, ''हे बघा, नियम म्हणजे नियम! जर मी तुम्हाला सूट देत बसले तर तुम्हाला तीन महिन्यातच काय, तीन वर्षांमध्येही मराठी लिहिता - बोलता येणार नाही! बघा, चालणार आहे का तुम्हाला?'' त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त आपल्या हातातील वही जरा जोरात टेबलवर आपटून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मला काळजी होती ते त्यांचा रक्तदाब रागापायी वाढतो की काय! पण आमचा तास संपेपर्यंत त्यांचा पारा बराच खाली आला होता. मग मी निघताना ते हळूच म्हणाले, ''सॉरी हं! आज जास्तच चिडलो ना मी? तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. पण वय झालं की होतं असं कधी कधी!'' आणि मग माझ्याच पाठीवर सांत्वना दिल्यासारखे थोपटून त्यांची छोटीशी मूर्ती प्रार्थनाकक्षाच्या दिशेने दिसेनाशी झाली.

ख्रिसमस जवळ आला होता. आमच्या पाद्रीबुवांना त्यांच्या गावाची, प्रदेशाची फार आठवण येत होती. मी त्यांच्यासाठी एक छोटेसेच, स्वहस्ते बनवलेले शुभेच्छापत्र ख्रिसमस अगोदरच्या सायंकाळी घेऊन गेले. दुसर्‍या दिवसापासून मिशनला चार दिवसांची सुट्टी होती. परंतु चार दिवसाचा कालावधी त्यांच्या जन्मगावी जाऊन परत यायला अपुरा असल्यामुळे पाद्रीबुवा जरा खट्टूच होते! त्या सायंकाळी मी त्यांना ते शुभेच्छापत्र दिल्यावर मात्र त्यांचा मूड जरा सावरला. मग ते भरभरून त्यांच्या गावाविषयी बोलत राहिले. आज मी त्यांना मराठीतूनच बोलण्याची सक्ती केली नाही. अगदी निघताना त्यांनी हळूच एक खोके माझ्या हातात ठेवले. आतून मस्त खरपूस, खमंग गोड वास येत होता. औत्सुक्याने मी आत काय आहे ते विचारले तर माझा विद्यार्थी मला थांगपत्ता लागू द्यायला अजिब्बात तयार नाही. मी तिथून बाहेर पडणार इतक्यात त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या टेबलावरील ''बी हॅपी'' लिहिलेला शंखाकृती पेपरवेट उचलला व माझ्या हातात कोंबला. त्यांच्या डोळ्यांत दाटून आलेले धुके पाहून मी पण माझे शब्द गिळले. घरी आल्यावर खोके उघडून पाहिले तर आत मस्त संत्र्याचा केक होता. त्यांनी अगत्याने दिलेली ती भेट आमचा ख्रिसमस गोड करून गेली.

त्या अल्प काळात त्यांना शिकवण्यासाठी माझी जी तयारी झाली, जी तयारी मला करावी लागली, त्यामुळे माझे मराठी व इंग्रजी भाषाकौशल्य सुधारण्यास फार मदत झाली. नवनवीन पुस्तके, मिशनचे वाचनालय व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मिशनच्या इमारतीतील शांत प्रार्थनागृह ह्यांचाही मी लाभ घेतला. बघता बघता तीन महिने संपले. आमच्या पाद्रीबुवांना आता त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारायची होती. माझीही कॉलेजची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. काहीशा जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गुरूशिष्याचे स्नेहाचे हे अनोखे नाते आता संपुष्टात येणार होते. शेवटच्या दिवशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या, आणि त्याही मराठीतून! मी निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. आणि उद्यापासून सक्तीची मराठी शिकवणी संपणार याचा आनंदही त्यांच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. मी त्यावरून त्यांना चिडवले देखील! त्यांची छोटीशी आठवण म्हणून त्यांनी मला एक छोटे बायबल देऊ केले व त्यांचा आवडता पायघोळ ट्रेंचकोट मी नको नको म्हणत असताना माझ्या हातांत कोंबला.

आज त्याला बरीच वर्षे लोटलीत. पुढे निवृत्ती स्वीकारल्यावर ते त्यांच्या जन्मगावी परत गेले. पाद्रीबुवा आता हयात आहेत की नाही हेही मला ठाऊक नाही. पण अजूनही मी कधी कपड्यांचे कपाट आवरायला काढले की एका कप्प्यात सारून ठेवलेला तो कोट मला पाद्रीबुवांची आठवण करून देतो! त्या तीन महिन्यांच्या काळात त्यांना शिकवण्याबरोबर मीही बरेच काही शिकले. त्यांची आठवण मनाच्या एका कोपर्‍यात सदैव राहील.

-- अरुंधती

संस्कृतीवावरधर्मभाषाजीवनमानशिक्षणप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

6 Jun 2010 - 8:54 pm | शुचि

अनुभवांनी तुझं विश्व संपन्न आहे गं अरु. छान लिखाण.

खूप म्हणजे फार वाईट वाटलं त्या पाद्रीबाबांना फूट्बॉल मधे गती असूनही खेळता आलं नाही त्याचं. दारीद्र्यासारखा शाप नाही : (
बिचारे !!

मनाला चटका लावून गेलं तुझं लिखाण.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

आळश्यांचा राजा's picture

6 Jun 2010 - 9:10 pm | आळश्यांचा राजा

(नेहेमीप्रमाणेच) छान!

आळश्यांचा राजा

धनंजय's picture

7 Jun 2010 - 12:28 am | धनंजय

विद्यार्थ्याचा आणि शिक्षिकेचा कौतूक-मिश्रित आदर वाटतो आहे.

संदीप चित्रे's picture

7 Jun 2010 - 12:39 am | संदीप चित्रे

असे अनुभव जगण्यात राम निर्माण करणारे असतात.
हा अत्यंत वेगळा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स, अरूंधती.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

पुष्करिणी's picture

7 Jun 2010 - 1:51 am | पुष्करिणी

छान अनुभव..

पुष्करिणी

मस्त कलंदर's picture

7 Jun 2010 - 4:52 pm | मस्त कलंदर

मस्त अनुभव गं.
मी काही वर्षांपूर्वी सीबीडी मध्ये राहत होते. तेथेही एक आजोबा रोज रात्री मार्केटातल्या आईसक्रीम पार्लरमध्ये येऊन तिथल्या काकांशी गप्पा मारत बसत. ते काका आमच्याही ओळखीचे होते.. त्यामुळे ते आजोबाही ओळखीचे झाले. रोज त्यांना गप्पा मारायला कुणीतरी हवे असे. ते तसे होते दाक्षिणात्य ख्रिश्चन. म्हणून त्यांना मराठी शिकायची होती. मी आणि रूममेट आठवड्यातून २-३ वेळा जात असू, नाहीतर मग ते फोन करून बोलवायचे.. नको नको म्हटले तरी बर्‍याचदा आईसक्रीम द्यायचे नाहीतर मग काहीतरी दाक्षिणात्य मिठाया घेऊन यायचे...
नंतर त्या पार्लरवाल्या काकांनी सांगितले की त्यांची सर्व मुले-नातवंडे परदेशात असतात..नि त्यांना एकटेपणा छळतो.. महत्वाची गोष्ट म्हणाजे त्या अजोबांना चांगलेच मराठी येत होतं..

असेच एकदा ते बोलता बोलता त्यांचा वाढदिवस कधी असतो ते सांगून गेले. मग त्या दिवशी आम्ही दोघी त्यांच्यासाठी केक नि बुके घेऊन गेलो.. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.. गेल्या दहा वर्षांत कुणी त्यांना आठवणीने विश पण केलं नव्हतं..
आता बरीच वर्षे झाली सीबीडी सोडून.. त्यांच्याशी संपर्कही नाही.. माहित नाही कुठे असतील ते!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चतुरंग's picture

7 Jun 2010 - 10:33 pm | चतुरंग

शिक्षिका आणि विद्यार्थी ह्यांची ही अनोखी जोडगोळी आदरणीय आहे! :)

चतुरंग

सहज's picture

8 Jun 2010 - 6:19 am | सहज

आवडला.

काही वेळा अशीच भेट झालेल्या एका अश्याच बिशपचा पगार एक दिवशी वर्तमानपत्रातुन कळला वर्षाला एक मिलियन डॉलर्स + ऑल एक्स्पेन्सेस पेड. चर्च म्हणले तर छोटे म्हणले तर मोठे. छोटे या करता की एका विशिष्ट समुदायाकरता असलेले चर्च. मेंबर काही प्रचंड संख्येत नाहीत व मोठे या करता की उलाढाल.... बर हे का लिहले तर ...

>ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता!

अहो कॉर्पोरेटमधे फतवे निघाले की सगळ्यांना सांगू ते कोर्सेस करावे लागतात...

असो.

लेख आवडला.

अवलिया's picture

8 Jun 2010 - 11:20 am | अवलिया

+अहो कॉर्पोरेटमधे फतवे निघाले की सगळ्यांना सांगू ते कोर्सेस करावे लागतात...

+१

(काय दिवस आलेत... सहजरावांना सहमती द्यावी लागत आहे)

--अवलिया

दत्ता काळे's picture

8 Jun 2010 - 6:38 am | दत्ता काळे

छान... अनुभव ....लेख आवडला.

Pain's picture

8 Jun 2010 - 8:52 am | Pain

हा लेख तुमच्या ब्लॉगवर केव्हाच वाचलाय. अजून लिहा.

मदनबाण's picture

8 Jun 2010 - 10:52 am | मदनबाण

सुंदर अनुभव कथन... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

श्रीराजे's picture

8 Jun 2010 - 11:21 am | श्रीराजे

उत्तम लिखाण आणि छान अनुभव..!

अरुंधती's picture

8 Jun 2010 - 12:56 pm | अरुंधती

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

मस्त कलंदर, मनाला स्पर्शून जाणारा अनुभव! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

9 Jun 2010 - 4:20 pm | स्वाती२

सुरेख अनुभव!