रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. हलके हलके झापड येऊन त्यांना डोळा लागणार एवढ्यात कसल्यातरी गलक्याने त्या दचकून उठल्या.
रस्त्यावरून बऱ्याच बाइक्सचे एकसाथ येतानाचे, हलगीचे आणि कसल्या कसल्या घोषणांचे आवाज येत होते. आत्ता? रात्री साडेबारा वाजता? ह्या लोकांना काही काळवेळ आहे की नाही? अस्वस्थ मनाने मीनाताईंनी अंगावरची चादर दूर केली व खिडकीतून बाहेर रस्त्यावर डोकावल्या.
समोरून वीस-पंचवीस बाईकस्वार जोरजोरात घोषणा देत येत होते. दोघा-तिघांच्या मागे हलगी वाजवणारे तरुण उलट्या दिशेने तोंड करून बसलेले दिसत होते. कोणी शिट्ट्या मारत होते, कोणी घसा फोडून ओरडत होते...... "जय भवानी, जय शिवाजी! " "जय शिवाजी, जय भवानी! "
त्यांच्या सगळ्यांच्या त्या एकत्रित गलक्याने आधीच डोके ठणकत असलेल्या मीनाताईंच्या मस्तकात जोरात कळ गेली.
ह्या कार्ट्यांना कोणी कधी वेळेचे भान नाही का शिकवले?
अशी कशी रात्री बेरात्री, मवाल्यांसारखी रस्त्यावरून गोंधळ घालत हिंडत आहेत ही पोरटी?
ह्यांना काही घर-दार नाही का? आणि कसल्या कर्कश्श शिट्ट्या, किती घसा ताणून घोषणा, त्यात त्या हलगीची भर!
फ्लॅटचे दार उघडून मीनाताईंनी शेजारच्या पानसरेंची बेल दाबली. लगेच दार उघडले. दारात पानसरे काकू त्रस्त चेहऱ्याने, कपाळाला आठ्या घालून उभ्या होत्या. मीनाताईंना पाहताच त्यांनी, "ऐकलंत ना कसला धिंगाणा चाललाय बाहेर.... " अशाच शब्दांनी सुरुवात केली.
पानसरे काका शर्ट, लुंगी व सपाता अशा वेषात खाली काय चाललं आहे पाहायला निघाले पण होते!
मीनाताई व पानसरेकाकूंचे "कशी झोप डिस्टर्ब झाली" संभाषण चालू होते तेवढ्यात पलीकडच्या फ्लॅटमधील मारवाडीण दार उघडून, तिचा घुंगट सावरत सावरत प्रश्नार्थक चेहऱ्याने मीनाताई व पानसरेकाकूंकडे पाहत बाहेर आली.
"एटले, काय झाला? ते कसलं आवाज येती? " तिने तिच्या नेहमीच्या तोडक्या-मोडक्या मराठीत सवाल केला.
आता हिला काय आणि कसं समजावायचं ह्याचा दोघी विचार करत असतानाच पानसरे काका जिन्याच्या पायऱ्या चढत वर आले. त्यांच्या मागोमाग मारवाडणीचा शेटही आला. तिच्या "सू थयु? "वर त्याने तिला घरात चलण्याची खूण केली. "चला, आमी आता झोपायला जाते. तुमी बगा तुमाला ते आवाजात येते का झोप ते! आन त्ये लोगांचा काय पन भरोसा नाय हा, काका, तवा तुमी उगाच त्येंना काय सांगाया जाऊ नका. गुडनाईट! "
मारवाड्याच्या बोलण्यासरशी पानसरे काकूंनी काकांना हात धरून दाराच्या आतच ओढून घेतले. "काय म्हणत होता तो शेट? " काकूंचा धास्तावलेला प्रश्न.
"अहो, उद्या, म्हणजे -- आज, शिवजयंती! खाली चाललाय तो सगळा धिंगाणा त्या निमित्तानं बरं! ती खाली नाचताहेत ना, ती जवळपासच्या तरुणमंडळांची पोरं आहेत.... काहींनी तर 'लावली' पण आहे....तर्र झाली आहेत नुसती! आणि मग काय!! आधीच मर्कट.... तशातली गत! म्हणे रात्रभर हिंडणार आहेत आरोळ्या देत! आता ह्यांच्याबरोबर आपलीपण झोपमोड.... ह्यँ... काही खरं नाही! " पानसरे काका तणतणत आतल्या खोलीत निघून गेले.
मीनाताईही आपल्या घराकडे निघाल्या.
"बघा ना! " पानसरे काकू फणकारल्या, "ह्या मेल्यांना काही सोयरसुतक तरी आहे का, म्हणावं, दहावी-बारावीच्या परीक्षा चालू आहेत. घरात लहान बाळं, आजारी, म्हातारी माणसं आहेत. पण हे कसलं ऐकणार म्हणा! त्यांची अस्मिता, बाणा दुखावला जातो, म्हणे! आता शिवाजीमहाराज ह्यांच्या स्वप्नातच आले होते जसे काही सांगायला - माझ्या जयंतीला रात्रभर धुडगूस घाला रे रस्त्यावर, म्हणून! वाटतं, चांगला एक सोटा घ्यावा हातात आणि रपारप रट्टे घालावेत एकेकाच्या पाठीत! " काकूंचा चेहरा संतापाने लाल झाला होता. मीनाताईंनी त्यांना समजावल्यासारखे खांद्यावर थोपटले व आपल्या फ्लॅटमध्ये शिरून दरवाजा लावून घेतला.
खाली गोंधळ तसाच चालू होता. त्यात आता मोबाईलवर ढँ ढँ वाजणाऱ्या एमपी थ्री आयटेम गाण्यांची भर पडली होती.
पोलिसांना फोन लावावा का? मीनाताईंच्या डोक्यात एक विचार अचानक चमकून गेला.
"हॅलो, कंट्रोल रूम? आमच्या इथं काही तरुण मुलं दारू पिऊन गोंधळ घालताहेत. तुम्ही तुमची गस्तीची गाडी पाठवाल का? फार त्रास होतोय हो! डोळ्याला डोळा नाही.... " मीनाताईंनी आपला पत्ता, नाव, फोन नंबर इत्यादी सर्व तपशील दिले आणि पोलिसांची गाडी येण्याची वाट पाहत बसल्या.
जरा वेळानं अचानक बाइकस्वारांची पांगापांग झाली. त्यानंतर दोनच मिनिटांत पोलिसांची गाडी आली. जरा वेळ गाडीचं इंजीन तसंच चालू ठेवून तिथं थांबली, थोडा वेळ तिथे जवळपास घिरट्या घातल्या. तिथे रेंगाळणाऱ्या एक-दोन मुलांना हटकले व पुन्हा निघून गेली. त्यानंतर दहा - पंधरा मिनिटांतच सर्व बाइकजत्रा परत लोटली. पुन्हा एकदा हलगी, शिट्ट्या, घोषणांचा कानात दडे बसवणारा आवाज.... पुन्हा तेच अश्लील हावभाव.... शिवरायांचं नाव घेत ढोसलेली दारू....बेभान, बेधुंद!! हीच का आमची मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठी बाणा?
मीनाताईंनी मोठा निः श्वास सोडत कापसाचे चांगले दोन मोठे बोळे कानांत खुपसले, डोकेदुखीवरची गोळी घेतली आणि कपाळाला बाम चोळून, डोळे घट्ट मिटून रात्र संपायची वाट पाहत राहिल्या.
--- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
9 Apr 2010 - 10:19 pm | घाशीराम कोतवाल १.२
तात्या मला लोकांच्या खवत लिहिता येत नाही आहे
You are not allowed to post in this guestbook.
असा मेसेज येतो माझा लोकांच्या खवत लिहायचा अधीकार काढुन घेतला काय :?
10 Apr 2010 - 2:10 am | टारझन
व्हर्जन अपग्रेड कर मेल्या घाश्या ... ते १.२ एक्स्पायर झालं आसंल :)
बाकी लेख उत्तमच :) न्हेमीप्रमाणे!
10 Apr 2010 - 1:43 am | शुचि
मस्त लेख आहे. मी वाचला होता कुठेतरी. भयंकर न्युइसन्स होतो अशा प्रकारांचा.
आमच्या घराशेजरी लग्नकार्यालय आहे. मला कळत नाही लग्न करायची चूक २ व्यक्तींनी केली की लोक फटाके उडवून ती साजरी कशाला करतात :) ..... एकदा आग लागली होती त्या कार्यलयाला अशा प्रकारांमुळे का होमामुळे :(
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 4:11 am | सुचेल तसं
ते मोठ्ठाल्ले रथ, ट्रॅक्टर घेऊन मिरवणुकी निघतात आणि त्यावर धडकी भरवणारे स्पीकर्स.... एका समाजाने सुरु केलं की बाकीचेही समाज त्यांच्या त्यांच्या उत्सवाला ध्वनी-हल्ला चढवतात..
10 Apr 2010 - 10:42 am | तिमा
प्रत्येक व्यक्तिची आवाज सहन करण्याची क्षमता त्याच्या बुध्दीच्या व्यस्त प्रमाणात असते असे कुठे तरी वाचले होते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
10 Apr 2010 - 1:35 pm | मदनबाण
ज्या राज्यात शिवजयंती दोनदा (एक सरकारी अन् दुसरी तिथी प्रमाणे ) साजरी केली जाते तिथे या गोष्टी घडल्या तर नवलं कसले ???
शिवाजी महाराज आता फक्त हार घालण्यापुरतेच आठवले जातात...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
11 Apr 2010 - 6:59 pm | अरुंधती
प्रतिसादाबद्दल आभार! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/