उन्हाळ्यातील सायंकाळी शीतल वार्याच्या झुळुकेच्या प्रतीक्षेत असावं आणि कोपर्यावरून ती हवीहवीशी वाटणारी हाळी यावी.....''मोगरा आला मोगरा , ताजा ताजा मोगरा.....'' नकळत श्वास आता कधीही तो मदमस्त करणारा मनमोहक सुगंध लडिवाळपणे साद घालेल या विचारानेच अलवार होतो ....
जसजशी मोगर्याची रास असलेली हातगाडी जवळ येते तसतसे एवढा वेळ रुसलेले वारेही हळुवारपणे आजूबाजूला खेळू लागते. आणि त्याच वार्याच्या लहरींबरोबर येतो मोगर्याचा तो आल्हादक सुवास!
शुभ्र चांदण्यांची गंधित, कोमल रास...मोगर्याच्या त्या सुगंधाने आणि नेत्रसुखद दर्शनानेच निम्मा शीण निघून जातो. हात त्या कोमल, मखमली पाकळ्यांच्या अल्लड स्पर्शासाठी आसुसतात. पण त्याच वेळी त्यांचे ते नाजूक पंख आपल्या हस्तस्पर्शाने चुरडले तर जाणार नाहीत हाही विचार अस्फुटसा उमटत असतो. मग त्या मौक्तिक राशीतील काही सुगंधी कण आपल्या ओंजळीत घरंगळतात आणि त्यांच्या धुंदावणार्या सुवासात सारे तन-मन चिंब भिजते. मालती, मल्लिका, चमेली, जूही, मोतिया, जाई-जुई-सायली....नावे-रूपे किंचित भिन्न, पण सुगंधाची भाषा मात्र तीच!
कधी कोणाच्या घरासमोरून जाताना त्यांच्या बागेतला तोच तो चिरपरिचित मोगरा एखाद्या वाफ्यातून, कुंडीतून, वेलींतून आपल्या गंधखुणांनी साद घालत राहातो. हिरव्या कंच पर्णसंभारातून डोकावणारी ही चांदणफुले त्यांच्या नितळपणामुळे मनाच्या कोपर्यात कायमची घर करून राहतात.
वेली मोगरा, डबल मोगरा, मदनबाण, बटणमोगरा.... प्रत्येकाची रूपे, गंधछटा जरी भिन्न तरी मनाला आल्हाद देण्याची सुगंधी वृत्ती तीच! आपल्या केवळ अस्तित्त्वाने शीतलतेचा अनुभव देणारे त्यांचे औदार्य काय सांगावे!
बंगलोरच्या फुलांच्या बाजारपेठेत मला अजून एक सुगंधी मोगरा गवसला. म्हैसूर मल्लिगे त्याचे नाव! तसा तो कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूतही आढळतो. अतिशय देखणे रूप आणि मधाळ, गोड, चित्ताकर्षक सुगंध. त्याच्या त्या देखण्या, सुवासिक राशी आणि अतिशय सुबकपणे गुंफलेल्या मल्लिगेच्या माळा, हार यांनी मला खरंच वेड लावले!
बंगलोरच्या मुक्कामी मी रोज ती फुले, माळा विकत घेण्याच्या मिषाने त्या बाजारपेठेत हिंडायचे आणि त्या रेशीमकळांना डोळ्यांत साठवून घेत, त्यांचा गंध रोमांरोमांत भिनवून घेत त्या माळा घेऊन मुक्कामी परतायचे. तेथील स्त्रिया जेव्हा आपल्या विपुल केशसंभारात ह्या माळा भरघोस हस्ते गुंफून हिडताना दिसायच्या तेव्हा त्या फुलांचा दिमाख काही औरच असायचा!
आणि तेथील देवळांमधील मल्लिगेची आरास पाहिली, देवाच्या मूर्ती मल्लिगेच्या कलात्मक हारांमध्ये अलंकृत झालेल्या पाहिल्या की डोळ्यांचे पारणे फिटायचे! पुन्हा ह्या फुलांनी मला माटुंग्याच्या फुलबाजारात दर्शन दिले तेव्हा झालेला आनंद काय सांगू! हिरव्या-काळसर पानांत बांधलेला तो गजरा विकत घेऊन मी जेव्हा घरी आले तेव्हा त्याच्या लावण्य-सुगंधात सारे घर-दार माखून निघाले.
मुंबईच्या बेस्टच्या प्रवासात किंवा लोकलच्या प्रवासात जशा ह्या मोगर्याच्या थैल्या घेऊन अनेक स्त्री-विक्रेत्या झरझर जादुई बोटांनी सराईतपणे सुंदर गजरे, माळा गुंफताना दिसायच्या त्याचप्रमाणे बंगलोरच्या बसप्रवासातील फुलराण्यांचे हात झरझर वेण्या गुंफताना पाहून मन स्तिमित व्हायचे. दोन्हीकडे मोगर्यासोबत गुंफली जाणारी फुले वेगळी होती. अबोली, कण्हेर, गुलाब, तुळजाभवानी झेंडू, तुळस अशा विविध रंगसंगतीने त्या मोगर्याचे सौंदर्य अजूनच खुलवण्याचा तो लोभस आविष्कार कितीतरी मनांना प्रसन्न करत असेल!
आजही त्या मोगर्याच्या नुसत्या स्मरणाने, दर्शनाने दिवसभराचा भार हलका होतो. ओठांवर आपसूक गाण्याची लकेर येते. मनातल्या सुगंधाच्या कुपीत फेसाळत्या शुभ्र लाटांप्रमाणे चमकणारा, खिळवून ठेवणारा हा मोगरा पुन्हा एकदा आपल्या स्वर्गीय गंधाची उधळण करतो आणि त्याच्या त्या स्मृतीतरंगांमध्ये सारे अस्तित्त्वच पुन्हा एकवार न्हाऊन निघते!
-- अरुंधती
प्रतिक्रिया
2 Apr 2010 - 7:34 am | बिपिन कार्यकर्ते
मस्त!!!
बिपिन कार्यकर्ते
2 Apr 2010 - 8:03 am | चित्रा
फोटो खूपच आवडला.
एकदम मोगरा खुडून घ्यावा असा आला आहे.
बंगळुरूमध्ये लहानपणी त्यांच्या फुलांच्या मार्केटमध्ये गेल्याची आठवण आली. तिथे पहिल्याने मी कधीच नव्हते पाहिले असे गडद रंग फुलांचे पाहिले होते.
2 Apr 2010 - 6:41 pm | चक्रमकैलास
व्वा...!! बघून खरंच खूप छान वाटलं...ध्न्यवाद..!!
--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
2 Apr 2010 - 9:37 am | sur_nair
सुंदर. अतिशय आवडीचे फुल. एखादी कळी का असेना काय सुवास दरवळतो. माझी आजी (केरळ ) अशीच फुले माळून देवाला हार व गजरे करायची. इथे Detroit मध्ये घरी कुंडीत एक रोप लावलं आहे पण तिकडच्यासारखा धड वास म्हणून नाही त्याला. फोटो लाजवाब आहेत.
2 Apr 2010 - 10:46 am | इन्द्र्राज पवार
दुर्गाबाई यांच्या "ऋतुचक्र"ची आठवण झाली इतके प्रभावी आणि विलोभनीय वर्णन केले आहे ! मन:पूर्वक धन्यवाद. मोग-याप्रमाणेच आमच्याकडे इथे कोल्हापुरात चाफ्याला अतोनात महत्व ! लाल चाफा, सोन चाफा (दोन्ही एकच का? विचारले पाहिजे कुणाला तरी !) देव चाफा हा आणखीन एक प्रसिद्ध प्रकार...... कवठी चाफा..... हिरवा चाफा.....नाग चाफा.....!!! किती तरी छटा आणि तितकाच वेड लावणारा सुगंध !! "म्हैसूर मल्लिगे " नावावरून एक हसरी आठवणदेखील ताजी झाली. हुबळी येथील एका पाहुण्याच्या घरी गेलो असताना तेथील पाचसहा वर्षाच्या एका बाहुलीसारख्या दिसणा-या मुलीला "येन री मल्लिगे" या नावाने एका ज्येष्टाने मारलेली हाक आठवते. त्यावेळी मल्लिगे हे नाव पुरुषी वाटले होते, पण नंतर त्याचा अर्थ "मोगरा" असा आहे हे माहीत झाल्यावर त्या बाहुलीविषयी विलक्षण ममत्व वाटू लागले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
2 Apr 2010 - 1:17 pm | स्वाती दिनेश
मस्त!
मोगर्याचा सुगंध मलाही खूप आवडतो.
मोगर्याचे गजरे, डबलमोगर्याचे पानासकटचे फूल केसात माळायला आवडते आणि उन्हाळ्याच्या काहिलीत माठातले मोगर्याने सुवासिक केलेले थंडगार पाणी... अहाहा!
फ्रिजच्या पाण्याने तहान भागत नाही पण ह्या पाण्याने मात्र समाधान होतं.
स्वाती
2 Apr 2010 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार
झकास !
वेगळ्याच विषयावरचे सुंदर लेखन हो अरुंधतीतै.
फोटु पण एकदम टवटवीत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
2 Apr 2010 - 8:33 pm | शुचि
आवडला हा सुवासिक लेख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
3 Apr 2010 - 10:37 pm | अरुंधती
केवळ डोळ्यांना आणि मनाला आल्हाद देण्याचा हेतू होता! प्रतिसादाबद्दल आभार! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
4 Apr 2010 - 11:17 am | राजेश घासकडवी
नुसती चित्रं पाहूनच प्रसन्न वाटलं...त्याच्या आसपासचं लेखन त्या वासाइतकंच मनोहर...
पण त्या मोगऱ्याच्या सुवासाच्या शृंगारिक अंगाविषयीही थोडं आलं असतं तर बहार आली असती. त्याच्या अभावी लेख 'यु' सर्टिफिकेशनवाला झाला...म्हणजे काही वाईट नाही, पण...
राजेश
4 Apr 2010 - 12:06 pm | डावखुरा
राजेशजी आपणास मोगऱ्याच्या सुवासाच्या शृंगारिक अंगाविषयीही माहिती असल्यास लिहावे....
प्रतिसाद मिळेलच....अपेक्षाभंग होणार नाही अशी अपेक्षा
"राजे!"
4 Apr 2010 - 11:25 am | पर्नल नेने मराठे
मोगरा..मी वेडी होते ही फुले पाहुन......
चुचु
4 Apr 2010 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोगरा आवडला....!
4 Apr 2010 - 12:02 pm | डावखुरा
मला माझे बालपण आठ्वले......माझ्या आजोळी परसबागेत अशीच अनेक गुच्छ मोगरा, रातराणी, सायली,चाफ्याची झाडे आहेत.....
उन्हाळ्याच्या सुट्यांत जेव्हा आजोळी जायचो तेव्हा सकाळी उठ्ल्यावर एकच काम परसबागेत फिरणे आणि देवपुजेसाठी फुले वेचणे.....
फोटो व वर्णनही छान....
(लहानपण देगा देवा...) "राजे!"