अगस्त्य जीव नाडीच्या कथा भाग ३...
‘गन काढलेली आहे. चला पळा.’ ती नक्षली टोळी लगेच अंधारात नाहीशी झाली.
एकदा अगस्त्य जीव नाडीमधील रामदर्शनाच्या आदेशावरून त्याचे वाचक श्री. हनुमत दासन चेन्नईहून भद्राचलमच्या प्रवासाला निघाले त्यावेळी घडलेल्या कथा ते सांगतायत.
एकदा एकांचे भविष्य कथन करत असताना दासनना अगस्त्य महर्षी सांगते झाले की त्या व्यक्तीच्या उपाययोजनेसाठी तुला आन्ध्र प्रदेशातील भद्राचलम या गावी जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यावे लागेल. आता महर्षींच्या आदेशाने प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार म्हटल्यावर दासन जायला तात्काळ तयार झाले. प्रवास सुरु झाला. मजल दरमजल करत ते भद्राचलमला पोचले. मात्र तिथे गोदावरी नदीला मोठा पुर आलेला. ते मंदीर नदीच्या काठावर असल्याने तेथे ही प्रचंड पाणी आलेले पाहून त्यांची निराशा झाली. मंदिरात पाणी शिरलेले. मूर्ती बुडालेल्या. पुजारी व पुजासाहित्य विकणारे सर्वजण पाण्याच्या भितीने तो भाग सोडून गेलेले. आपण नेमके चुकीच्या वेळी आलोय असे त्यांना वाटू लागले. यावर आता काय करायचे असे वाटून त्यांनी जीव नाडी काढून त्यातून महर्षींचा काय आदेश आहे असे विचारावे असे म्हणून जीव नाडीची ताडपत्रे उलगडली. त्यात महर्षींनी सांगितले की पाण्याला आलेल्या पुरामुळेच मी तुला इथे यायला सांगितले होते. कारण थोड्यावेळात नदीचे पाणी ओसरायला लागेल. त्यावेळी तुला एक अदभूत दर्शन होईल की प्रभू रामचंद्र गोदावरीच्या प्रवाहाचे पूजन करायला उपस्थित आहेत. तो सोहळा फक्त तूच पहावास अशी जुळवणी करण्यासाठी तुला मी उपस्थित केले आहे. आता इथेच मनांत ध्यान कर व रामनामाचा जप कर. ध्यानातच तुला सर्वगोष्टींचे ज्ञान होईल.
आता दासनना ध्यानासाठी जागा शोधणे आले. त्या वेळी त्या मंदिरात काम करणारा एक जण त्यांना भेटला. त्याचे काम मंदिरातील दागदागिने व अन्य मौल्यवान वस्तूंचा संरक्षक म्हणून काम करत होता, असे त्यांना नंतर कळले. कोण, कुठून आले आदी चौकशी करता त्याला जीव नाडी पहायची उत्सुकता जाग्रृत झाली. मला जीव नाडीतून भविष्य सांगणार असाल तर मी तुम्हाला ध्यानासाठी जागा देईन म्हणून त्याने पेच टाकलान. म्हणून त्या आणीबाणीच्या काळातही दासननी वाचनाला सुरवात केली. त्यात अगस्त्य महर्षींनी त्याच्या पूर्वजन्माचे वर्णन करून सध्याच्या त्याच्या कामाबद्दल सांगायला सुरवात केली.
ते म्हणाले, ‘अरे, तू अनेक अपराध केले आहेस. मंदिरातील ट्रस्टचे दागिने चोरून तू तुझ्या घरातील तांदुळाचा शिधा ठेवायच्या खोलीत ते दडवून ठेवले आहेस की नाही? एका स्त्री बरोबर पत्नीच्या अपरोक्ष तुझे अनैतिक संबंध आहेत? तुला ‘पॅरालसिस’ नावाचा रोग होणार आहे.’ ते सर्व ऐकून तो पेचात पडला.
कुठून विचारले असे त्याला झाले. मानावे का नाही याचा संभ्रम झाला. चोरी व स्त्रीसंबंध लपवता येतील पण आपल्याला रोग होणार म्हटल्यावर त्याचे धाबे दणाणले. ‘बर, पण यावर काही उपाय आहे का?’ असे विचारून त्याने तोड काढली. ‘एक तर मंदिराच् सर्व दागदागिने व रोकड तू प्रामाणिकपणे परत कर व आपल्या अंगवस्त्राला दुसऱ्या पत्नीचा दर्जा द्यायचे सर्वांसमक्ष मान्य कर’. असा आदेश आला. ते ऐकू तो सर्द झाला. म्हणाला, ‘अहो मी जर तसे केले तर माझी नोकरी नक्की जाईल. माझ्यापेक्षा भयानक खोटेपणे व अक्षम्य अपराध करणारे ही आहेत, मग मलाच का असा ‘चोरलेले धन परत कर’ असा आदेश तुम्ही द्यावा. इतरांना ही शिक्षा व्हायला हवी’. त्याने आपले डोके लढवून तर्क केला. त्यावर दासन काहीच बोलले नाहीत. त्यांना ध्यानाला बसायची सोय करून तो तेथून गेला. मधे दोन तासाचा काळ उलटला. पाणी कमी होऊ लागले.
अगस्त्य महर्षींनी म्हटल्याप्रमाणे दासनना अत्यंतिक अनूभूतिचा प्रसाद मिळाला. इतकेच ते त्या प्रसंगाबद्दल सांगतात. ध्यानातून उतरल्यावर दासननी तो जामदारखान्याचा रक्षक येताना पाहिला. त्याने त्यांना एका कोंदट खोलीत नेले व बरोबर आणलेले बोचके उघडून त्यातून दागदागिने, मौल्यवान वस्तू व रोकड ऐवज दाखवला. ते पाहून दासनांचे डोळे दिपले. काही क्षणांतच त्या बलदंड दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातापायातील त्राण नाहीसा झाला व तो पहाता पहाता कोसळला. तो काही सांगू पहात होता. दासनांच्या लक्षात आले की त्याच्यावरून वारे गेल्याने त्याची वाचा गेली होती. अगस्त्यांचा कथन खरे ठरले होते!
त्या तिथून बाहेर पडल्यावर त्यांची भेट एका लक्षाधीशाशी झाली. त्यांनी त्यांना आपल्या घरी नेले. पुर परिस्थितीमुळे ते ही कारने भद्राचलम रेल्वे स्टेशनवर त्यांना बरोबर घेऊन जायला तयारीला लागले. एका कारमधे त्यांची घरची मंडळी व दासन निघाले. बाकीचे अन्य कारमधे होते. वाटेत नक्षली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. अंधारात त्यापैकी म्होरक्याने बॅटरीच्या प्रकाशात ड्रायव्हरला खाली उतरवले व इतरांचा पैसाअडका व दागिने लुटायचा प्रयत्न केला. त्यांच्याशी बोलून उपयोग नव्हता. त्यांच्या उद्धट धमक्यांमुळे सर्व काही त्यांच्या स्वाधीन करणे शहाणपणाचे होते. मागील सीटवर बसलेल्या हनुमत दासनांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले. मागचा दरवाजा व काचेच्या खिडक्या आतून लॉक होत्या त्यामुळे चोरट्य़ांना त्या बाहेरून उघडता आल्या नाहीत. लक्षाधीशाच्या तरुण मुली, त्यांच्याकडील दागदागिने व खुद्द त्यांच्याकडील जीव नाडीच्या पट्यांचे पॅकेट या सर्वांचे कसे रक्षण करावे असा पेच पडला होता. त्यांनी जीवनाडीच्या पॅकेटला एका रेशमी कापडात गुंडाळून ठेवले होते. त्याला काही व्हायला नको या विचाराने त्यांनी ते हातात घ्यायला उचलले. त्याच वेळी त्या म्होरक्याची नजर पडली. त्याला वाटले की मागच्या बाजूला बसलेल्याने कदाचित आत्मरक्षणासाठी बंदूक काढला असावी. असे वाटून तो ओरडला, ‘ ‘गन काढलेली आहे. चला पळा.’ ती नक्षली टोळी लगेच अंधारात नाहीशी झाली. आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते! ... भाग -३- समाप्त. भाग - ४ पुढे चालू....
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 11:49 pm | शशिकांत ओक
मिपाकारंनो,
भाग २ घाग्यावरील प्रतिक्रियेने करमणूक झाली. काहींना भल्या मोठ्य़ा बंदुकीने नाडी ग्रंथांचा उंदीर मारल्याचा दंभ झाला. मात्र तात्यांनी नाडीला देवी स्वरूप मानून और आने दो अशी फरमाईश केलेली पाहून हुरुप आला. नाडी ग्रंथ वा नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर ते टॉम आणि जेरी कार्टून मधील जेरी सारखे विरोधकांना जेरीला आणणारे आहेत हे चतुर व सूद्न्य वाचक जाणतात. मी मी म्हणणारे काही काळाने गारद झाले. तेंव्हा इतरांची काय कथा. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
10 Mar 2010 - 9:13 pm | कौंतेय
नाडी ग्रंथ वा नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर ते टॉम आणि जेरी कार्टून मधील जेरी सारखे विरोधकांना जेरीला आणणारे आहेत हे चतुर व सूद्न्य वाचक जाणतात.
मेलो!!!!! जेरी महर्षी... टॉम अँड नाडी
9 Mar 2010 - 11:54 pm | चतुरंग
ही अगस्त्य नाडी एकदम रिअल टाईम मध्ये भविष्य कथन करते आहे की! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, महर्षींनी कुठली आरटॉस वापरली असावी बरं? :?)
(एम्बेडेड)चतुरंग
9 Mar 2010 - 11:59 pm | वेताळ
खरच अशी जीवनाडी पॅकेट आपल्या सैन्याला वाटायला पाहिजेत.
वेताळ
10 Mar 2010 - 3:29 am | अर्धवटराव
असहि काहि आहे जगा मध्ये ???
(अचंभित) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
10 Mar 2010 - 7:57 am | प्रमोद देव
तुमच्या त्या 'नाडी'शास्त्रावर आमचा काही विश्वास नाही...पण त्या निमित्ताने एकेक सुरस कथा वाचायला मात्र मजा येतेय. लहानपणी चांदोबा वाचतांना अशीच मजा यायची.
येऊ द्या अजून. आम्ही वाचायला तयार आहोत.
10 Mar 2010 - 8:57 am | प्रकाश घाटपांडे
मनोरंजक. पुढचा भाग येउ द्यात
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
10 Mar 2010 - 9:19 am | राजेश घासकडवी
त्या दागिन्यांचं पुढे काय झालं? असा हल्ला होणार हे दासनना आधीच माहीत होतं का? की महर्षींनाच फक्त ते माहीत असल्यामुळे ही अनुभूती येण्यासाठीच महर्षींनी दासनना पाठवलं होतं? प्रत्यक्ष रामच तर नक्षलवादींच्या म्होरक्याचं रूप घेऊन आला नव्हता ना? भद्राचलमला काय घडलं? ते भद्राचलममध्येच राहील का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं - चौथ्या किश्तमे.
वाट पाहातो आहे.
राजेश
10 Mar 2010 - 9:20 am | बिपिन कार्यकर्ते
ओकसाहेब, चालू द्या. मनोरंजक कथा वाचायला मिळत आहेत. पण दरवेळी तात्याने परवानगी दिली आहे हे कशाला हो? :) कोणी नाही डिलिट करणार धागा. ;)
पुढच्या भागाची वाट पाहतोय.
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 9:30 am | टारझन
डीलीट करणार्याच्या डोक्यावर आम्ही मिर्या वाटू ;) हॅहॅहॅ ..
आहो .. बंदुकीत गोळ्या ही लिमीटेड असतात .. आणि मारण्यासाठी मुडची सुद्धा गरज असते ना ? ;) वेळ आणि मुडच्या उपलब्धतेनुसार भल्या मोठ्या बंदुकीने आम्ही णाडी ग्रंथाच्या उंदराची मारत राहु :)
-(मोठ्या बंदुकीवाला शिकारी) टारोबा हंटर
10 Mar 2010 - 8:22 pm | jaypal
शस्त्रास्त्र व मसाले व्यापरी
फेकुचंद नाडाणी
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/