माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव.
बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.
बाबूराव बागुलांचा हा कथासंग्रह म्हणजे साठोत्तरी साहित्य प्रवाहातील दलित साहित्याच्या उदयाच्या काळातील लेखन. याच कथासंग्रहाने दलित साहित्याची पायाभरणी केली. या कथासंग्रहात एकूण दहा कथा. पाच दलित आणि पाच सर्वसाधारण विषयावरील कथा, त्यांच्या या कथासंग्रहातील मला आवडलेल्या वानगीदाखल काही कथा या प्रमाणे......
'गुंड' या कथेत आंतरराष्ट्रीय इथोपियन गुन्हेगार झोपडपट्टीत राहत असतो. महाकाय शरीर हे त्याचे वैशिष्ट्ये. त्याच्याकडे कोणीही जात नाही. गेल्या वीस वर्षात त्याने स्त्रीचा चेहरा पाहिलेला नाही. जर्मन वेश्येने त्याला त्याची महाकाय देहयष्टी पाहून नकार दिलेला असतो त्यामुळे स्त्रीविषयक भयंकर संताप त्याच्या मनात भरलेला असतो. अशा गुन्हेगाराकडे झोपडपट्टीतील ’जयंतीबेन’ नावाची स्त्री आईच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसे मागायला जाते. हा गुंड सावकारास धमकावून पैसे आणतो, जयंतीबेनच्या आईची अंत्ययात्रा काढतो, प्रेताला स्वतः: खांदा देतो. आयुष्यात पहिल्यांदा त्याला रडावे वाटते, अशी ही कथा. वेळप्रसंगी जात धर्म विसरून माणसं कशी एकत्र येतात आणि एक अट्टल गुन्हेगार कसा भावुक, प्रेमळ होतो त्याची ही कथा.
’वानर’ ही कथा एका पहेलवानावर आधारीत आहे. 'बापू पहेलवान’ त्याच्या सासुरवाडीतील पहेलवानाकडुन कुस्तीत हरल्यामुळे बापू पहेलवान वर्षभर मेहनत करतो, त्याची आई त्याच्यासाठी खर्च करते. आणि नेमक्या कुस्त्या उद्यावर आलेल्या असतात. बापू पहेलवानाची बायको ’सखू’ त्याचे जेवण घेऊन त्याला भेटण्यासाठी जाते. वर्षभर बायकोपासून दूर राहिलेल्या ’बापू’ चा संयम सुटतो. तेव्हा त्याची आई म्हणते तुझ्या बायकोच्या माहेराचा पहेलवान जिंकावा म्हणुन तुझे तपभंग केले. तिचेच कारस्थान आहे. ते ऐकून तो बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. दुस-या दिवशी बापू पहेलवान कुस्तीच्या डावात हरतो. आणि आईच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी पहिलवानाचा खून करण्याचा तयारीला लागतो अशी ही वानराच्या मेंदूच्या बापू पहेलवानाची कथा.
' जेव्हा मी जात चोरली होती’ या कथेतील नायक शिकलेला आहे. त्यामुळे शोषणाची त्याला जाणीव झालेली आहे. तो नवविचाराचा आहे. या कथेतला नायक जात चोरून राहत असतो, पण त्याची खरी जात उघडकीस येते, तेव्हा त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण होते. कथेच्या शेवटी नायक म्हणतो ’त्यांचा मार मी कोठे खाल्ला ? मनूने मला मारले. मारणा-या लोकांचा दोष नाही. त्याच्या मनात मनू आहे म्हणुन त्यांनी मारले अशी ही कथा.
बाबूराव बागुलांच्या लेखनाने मराठी साहित्यात कधीच व्यक्त न झालेला विषय मांडला. त्यामुळे त्यांची कथा वेगळी वाटते. बाबुरावांची कथा प्रथमच झोपडपट्टीतील अनुभव ताकदीने उभे करते. तिथले दारिद्र, तिथल्या पिसाट वासना, तिथले संवेदहीन जगणे, तिथले वातावरण , जीवनाच्या दाहक बाजू, शोषितांचे लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये. 'जेव्हा मी जात चोरली होती' आणि 'मरण स्वस्त होत आहे' या दोनही कथासंग्रहातून वाचकाला एका नव्या जगाची ओळख होते म्हणुन तेव्हा त्या काळात हे कथासंग्रह चर्चेचे ठरले नसतील तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर
" आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." *
त्यांच्या लेखनाने पांढरपेशी वाचकांना धक्काच दिला. त्याच बरोबर टीकाकारांनी त्यांचे लेखन अवास्तव, एकांगी, अस्ताव्यस्त लेखन, कृत्रिम संवाद अशी टिकाही केलीच आहे. तरीही दलित कथेंचे शिल्पकार, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, आणि बाबूराव बागुल यांचे नामोल्लेख टाळुन दलित साहित्याचे मोठेपण सिद्ध करता येणार नाही.
" मी शतकांच्या स्वप्नांचा अविष्कार आहे, उगवत्या जीवनाचा भाष्यकार आहे" दारिद्र, दु:ख व दैन्य याच्या विळख्यातून दलित मुक्त व्हावा. जुने जग लयाला जावे म्हणुन ते मरणाला आवाहन करतात.ते लिहितात-----
मरणा !
" तु येणार आहेस ना; तर लवकर येकायेच्या कल्पवृक्षावरून चैतन्याचा स्वर्गीय पक्षीस्वर्गात उडून जाण्यापूर्वीच ये.तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल करमाझ्या जळत्या जीवाला लागला तरउरीची संपेल क्षणी जळजळबुजतील वळ युगायुगाचेविरतील ओहळ जुन्या जखमांचे मनामनातलेहोईन मी शुद्ध चांगलासा तरुणकधी कबीर,कधी उमर खय्यामगेला ज्या चितारुनमरुन मी मेघासारखा संचारेन वार्यावरतीकधी गिरीच्या शिरी राहूनउभा गाईन गीते लखलखती." *
मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ? असो....!!!
मराठी साहित्यातल्या एका प्रतिभावंताला एका साहित्य वाचकाची भावपूर्ण श्रद्धांजली !!!!
* संदर्भ: दलित साहित्य वेदना आणि विद्रोह - भालचंद्र फडके.
प्रतिक्रिया
30 Mar 2008 - 9:45 am | सृष्टीलावण्या
तुमचा लेख वाचून बाबुराव बागुलांचे साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळते. अण्णाभाऊ साठे हे असेच
अजून एक बहुजन साहित्यातील असामी असे मला अलिकडेच आढळून आले.
>
>
साता समिंद्रापल्ल्याडला माझा शब्द,
शब्द नाहीयेच तो,
लहलहणारा जळजळीत लाव्हा,
जर उच्चारलाच नाही तो
तर त्वचेलाही फुटतील
शब्दांचे धुमारे
- कवि अरुण कांबळे.
30 Mar 2008 - 9:49 am | प्रमोद देव
मना मनातल्या दर्या बुजल्याशिवाय काही खरे नाही.
ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला तरच ह्या अशा साहित्यिकांच्या साहित्यातून आपण काही तरी बोध घेतला असे होईल. अन्यथा नुसती पोकळ आत्मीयता ठरेल ती.
31 Mar 2008 - 12:22 pm | सहज
प्रमोदकाकांशी सहमत.
बाबूराव बागूल यांचे अनुभव, तो कालखंड, त्यांची मते यावर सगळे आपापल्या परीने चिकित्सा करतीलच पण महत्वाचे काय ते प्रमोदकाकांनी वर उल्लेखलेले.
बाकी लेख अथ पासुन इतिपर्यंत अतिशय प्रभावी झाला आहे सर. हा लेख वाचून बरेच जणांना बागूलांचे लेखन वाचायची इच्छा होणार.
प्रा. डॉ. इतका सुंदर लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.
30 Mar 2008 - 10:54 am | प्रभाकर पेठकर
" आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील."
कोणी कोणाला घरं द्यायची? कुठल्या दलितांना शहरवासीयांनी हाकलून दिले? गिरगावातल्या चाळीत अनेक उच्चवर्णीय एका खोलीत १०-१२ असे राहताना पाहिले आहेत. त्यांच्या देहातून राक्षस निर्माण झाल्याचे आढळले नाहीत. झोपडपट्टीत राहून अक्षरशः म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करून M.Sc. करून परदेशी शिष्यवृत्तीवर परदेशात गेलेला माझा मित्र मला ठावूक आहे. अशा अनेक व्यक्ती मला ठावूक आहेत. पण तरीही झोपडपट्टीतील जीवन व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक नसतं हे मला मान्य आहे. पण ध्येयाने प्रेरीत कुणाही व्यक्तीस उत्कर्ष साधण्याच्या आड आजूबाजूची परिस्थिती येत नाही असे वाटते. पण ध्येयप्राप्ती पोषक वातावरणा इतकी सहज साध्य नसते.
पोषक वातावरणातही किती देहातून देव जागृत होतात? शहरी जीवनात वाढलेले कितीतरी 'राक्षस' आपण आजूबाजूला वावरताना पाहात असतोच. खून, जुगार, शिवीगाळ, गुंडगिरी, दंगली, जातीयवाद,धर्मवाद, फसवणूक, भ्रष्टाचार, आर्थिक पिळवणूक, बलात्कार, स्त्रियांचे शोषण, बालपण हरवलेले बालमजूर अशा अनेक रोगराईत आपण शहरी जीवन जगत असतो. झोपडपट्टी बाहेरील जग सुवर्णकांतीने झळाळणारं नाही. तेही 'भयानक'च आहे.
श्री. बाबुराव बागुलांचे साहित्य माझ्या वाचण्यात आले नाही. पण म्हणून त्यांच्या साहित्याच्या दर्जाचे उच्चत्व मी नाकारतो आहे असे नाही. मी फक्त इथे दिलेल्या ३-४ ओळींच्या एका परिच्छेदाचे, मनात कुठलाही आकस न बाळगता,विश्लेषण केले आहे, एवढेच.
मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. या पेक्षा मोठे दुर्दैव काय ?
ह्याबद्दल मात्र वाईट वाटले. के.ई.एम्. सारखी अद्ययावत इस्पितळे, अगदी नगण्य व्यक्तींवरही, मोफत उपचार करतात. तरीही अशी परिस्थिती का उद्भवावी? त्याच बरोबर, त्यांचे अनेक वाचक, सह-साहित्यिक, साहित्य परिषदा, साहित्य संम्मेलनांना अनुदान देणारे सरकार आणि घेणारे संम्मेलनाध्यक्ष हे एका थोर साहित्यिकाच्या अंतःकाळी इतके उदासीन कसे राहू शकतात? हाही पोषक वातावरणात जन्मलेल्या/वाढलेल्या देहांमधील राक्षसच आहे नं? असो.
श्री. बाबुराव बागुलांचे साहित्य वाचून पाहीनच.
30 Mar 2008 - 12:46 pm | विसोबा खेचर
बिरुटेशेठ,
अतिशय सुरेख लेख! खरं सांगायचं तर बागूल वारल्यावर आपल्याकडून असा एखादा उत्तम लेख येईल अशी अपेक्षा मी केलीच होती!
या लेखामु़ळे मिपाच्या समृद्धतेत निश्चितच भर पडली आहे असं वाटतं!
ते ऐकून तो बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. दुस-या दिवशी बापू पहेलवान कुस्तीच्या डावात हरतो. आणि आईच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी पहिलवानाचा खून करण्याचा तयारीला लागतो अशी ही वानराच्या मेंदूच्या बापू पहेलवानाची कथा.
बापरे! भयानक आहे...
कथेच्या शेवटी नायक म्हणतो ’त्यांचा मार मी कोठे खाल्ला ? मनूने मला मारले. मारणा-या लोकांचा दोष नाही. त्याच्या मनात मनू आहे म्हणुन त्यांनी मारले अशी ही कथा.
अगदी वास्तववादी विचार...!
तू तात्काळ आलास तर अन् तुझा कोमल कर
माझ्या जळत्या जीवाला लागला तर
उरीची संपेल क्षणी जळजळ
बुजतील वळ युगायुगाचे
वेदना सुंदर असते आणि म्हणूनच ती इतकं सुंदर बोलू शकते!
असो,
बिरुटेसाहेब, लेख केवळ अप्रतीम!
तात्या.
30 Mar 2008 - 5:39 pm | सुधीर कांदळकर
साहित्याची आपण जी जबरदस्त ओळख करून दिली आहे त्याला तोड नाही. काही वर्षापूर्वी म टा मध्ये 'जात चोरली' चे परीक्षण आले होते, ते खास नव्हते. धन्यवाद.
"आम्हाला तुम्ही घर देत नाही. शहरात राहू देत नाही. त्यामुळे मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण, झोपड्यात राहायचं. गृहजीवनापेक्षा गलिच्छ जगायचं, आईबापांपुढे, तरुण भावा-बहिणींसमोर,मुलामुलींसमोर स्त्री-पुरुषांचे सबंध यायचे.घाणीत गर्दीत, ओशाळलेल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे. खून, जुगार,दारुभट्ट्या बघत मुलं वाढायची. अशानं देहातले देव कसे जागृत होतील." *
हे दाहक व धक्कादायक आहे.
जात चोरली आता वाचीनच.
बाबुरावांना श्रद्धांजली.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
30 Mar 2008 - 6:08 pm | पंकज
वेदाआधी तू होतास
वेदाआधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून
विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ ऋचा ’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव,
तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस
आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले
हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.
हे नारी
तुझे ललित, सुंदर नारीपण
मनमोहक आहे.
नेत्रसुखद आहे.
तुझ्या सुरेख, सुडौल शरीरावर
निसर्ग आणि नियती
प्रगट करतात तरूणपण
तेव्हा तुझे नश्वर शरीर
होते अजरामर.
अनेक
कलाकृतींचे प्रदर्शन
वा प्रदर्शनीय संग्रहालय
तुझ्या दर्शनानेच कलावंतांना
सुचतात कलाकृती आणि वास्तुशिल्पे
तुझ्या आशयपूर्ण उरोजावरून
देवालयाची मस्तके,
कळस साकार झाले आहेत
आणि ती स्वर्गाशी
सतत संवाद करतात असे मानले जाते आहे.
हे नारी,
तुझे प्रिय प्रेयसीपण तर
पूर्वीपासून काव्यनाटकांना अमर करते आहे.
अन् घरोघरी, सर्वभर
तुझे पत्नीपण सर्व पतींना
स्वर्गासम वाटते आहे.
तुझेच तुझे आईपण तर
परमेश्वराला भारी भरते आहे.
श्रद्धा, भक्तिभाव तुझ्यामुळेच
घरोघरी, मनोमनी आकाराला आलेले आहे.
धर्मप्रचारकांनी हे तुझे महन मंगळपण
त्यांच्या देवासाठी लुटले आहे, लाटले आहे.
तुझे प्रेमळ आईपण पाहून
तुझी सर्व पोरावली माया पाहून
पिता परमेश्वराची कल्पना
प्रेषितांना सुचली.
अशी तू,
सर्व महन्मंगल कल्पनांची माता तू !
पहिल्या प्रेमाची मालकीण तू !
प्रियतमा तू !
स्वर्गाहून सुंदर तू !
प्रिय पत्नी तू !
संसारातील स्वर्ग तू !
वासना विकारांचा वसंतोत्सव तू !
देव, धर्म, देवळांहून भारी तू !
नारी म्हणूनही
आई म्हणूनही !
( म.टा.दि.२७ मार्च, २००८)
30 Mar 2008 - 7:37 pm | ऋषिकेश
वा! सर!!.. केवळ अप्रतिम लेख!!..
मी स्वतः बागुलांचं कोणतेही लेखन वाचलेले नाहि त्यामुळे जास्त भाष्य करू शकत नाही.. परंतू तुमच्या लेखनाने बाबुरावांचे लेखन वाचायलाच पाहिजे असे वाटले.
असो... बाबुरावांना श्रद्धांजली!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
30 Mar 2008 - 8:24 pm | चतुरंग
बाबुराव बागुलांबद्दल ऐकून होतो पण त्यांचे लिखाण वाचलेले नाही. तुमच्या लेखाने ती उत्सुकता जरुर चाळवली गेलीये.
देहातले देव आणि राक्षस ह्या मुद्यांबाबत मी पेठकर काकांशी सहमत आहे.
झोपडीतल्या जिण्यात तर चोथाच असतो पण अहो पांढरपेशा समजातला दंभ आणि मानसिक रोग बघितले की काय म्हणावे ते समजत नाही!
माझ्या बाबांचे काही मित्र होते त्यांना आमच्या ओळखीतलेच इतर काही लोक लग्न समारंभ घरगुती समारंभाना बोलवायला फारसे उत्सुक नसत. हे कशाचं लक्षण आहे?
तसेच माझ्या अगदी जवळचे ओळखीचे असेही काही लोक आहेत की जे अगदी गरीबीतून, १० बाय १० च्या दोन खोल्यात राहून, रद्दीची फाटकी पुस्तके वाचून मोठे झाले स्वतःच्या पायावर उभेच राहिले असे नाही तर मोठे घर बांधून तिथे आई-वडिलांना सुखाचा निवारा दिला. त्यांच्या आई-वडिलांनी समाधानाने तिथेच शेवटले श्वास घेतले - सवर्ण असल्याने कोणत्या आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नव्हता. आपल्या समाजाचा तो एक फार मोठा विरोधभास आहे. सर्वसामान्य माणूस हा दोन्ही बाजूकडे कसा विभागला जाईल ह्याची योग्य ती काळजी राजकारणी घेत रहतात आणि आपण ती त्यांना घेऊ देतो हे दुर्दैव!
'आमचा बाप आन् आम्ही' हे डॉ. नरेंद्र जाधवांचे पुस्तक मी वाचले आहे. त्यात तीही सगळी भावंडे वडाळ्याच्या झोपडपट्टीसारख्या वातावरणातच मोठी झालेली आपल्याला दिसतात. त्यांच्या वडिलांची दूरदॄष्टी कामी आली. ती जिद्द, तो पीळ, ते सगळ्यापार भेदून जाणे हे जातीशी आणि वातावरणाशी फारसे संबंधित नाही असे वाटते.
बागूलांच्या शेवटल्या दिवसात जर एवढी उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली असेल तर श्री.म. माट्यांनी लिहिलेल्या "उपेक्षितांच्या अंतरंगात" फारसा बदल झालेला नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते!
चतुरंग
31 Mar 2008 - 7:56 am | धोंडोपंत
श्री. बाबुराव बागुलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. माणसाला विश्वाचा केंद्रबिंदू मानणारा एक मानवतावादी गेला याची खंत आहे.
आपला,
(खिन्न) धोंडोपंत
बिरूटेसाहेब,
लेख अप्रतिम झाला आहे. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमचे लेखन आम्हाला मनापासून आवडते.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
31 Mar 2008 - 8:55 am | नंदन
आहे. अप्रतिम लेख! बाबूराव बागुलांना माझीही विनम्र आदरांजली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Mar 2008 - 8:40 am | प्राजु
बाबूराव बागूल यांचे साहित्य वाचनात नाही आले. पण आपन लिहिलेल्या लेखाने त्यांच्याबद्दल बरिच माहिती समजली. विशेषतः कविता अतिशय सुंदर..
मरुन मी मेघासारखा संचारेन वार्यावरती
कधी गिरीच्या शिरी राहून
उभा गाईन गीते लखलखती
या ओळी खूपच आवडल्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
31 Mar 2008 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे
बिरुटे सरांनी बागुलांच्या साहित्याचा थोडक्यात परिचय करुन दिला या बद्द्ल धन्यवाद.
विवेकालाही विद्रोहाची दखल घ्यावीच लागते. बागुलांना विनम्र आदरांजली.
प्रकाश घाटपांडे
31 Mar 2008 - 10:26 am | आनंदयात्री
सरांकडुन असा लेख अपेक्षित होताच. बागुलांच्या साहित्याची चांगली ओळख करुन दिली आहे, यावरुन बागुलांचे साहित्य जात पात सोडुन इतर सामाजिक गोष्टींना - प्रश्नांना स्पर्श करते असे लक्षात येते. या साहित्य ओळखीबद्दल सरांचे धन्यवाद.
31 Mar 2008 - 11:31 am | भोचक
बागूलंचा आणि माझा माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने थेट नाही तरी बर्यापैकी संबंध आला. त्यांच्या निमित्ताने असलेल्या वर्तुळाशीही आला. बाबूराव दलित समाजातील मोठे तत्वचिंतक लेखक होते, पण त्यांचे मोठेपण दुर्देवाने समाजाच्या एका मोठ्या गटापर्यंत पोहोचले नाही. त्याचवेळी दलितांमधील नेते मंडळींनी त्यांच्याशी फारशी जवळीक साधली नाही. मला माझ्या एका दलित पत्रकार मित्राने याचे कारण सांगितले. बाबूराव ऊर्फ आबा कम्युनिझमला मानणारे होते. मार्क्सच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. म्हणूनच वर्गविहीन समाजाची रचना त्यांच्या कवितांतातून कथांतून दिसून येते. त्यांची साम्यवादी भूमिका दलित नेत्यांना अडचणीत टाकणारी होती. त्यामुळे हे नेते त्यांच्याकडे फारसे गेले नाहीत. वास्तविक एवढी दलित आत्मकथने गाजली. पण आबांनी आपल्या नजरेने टिपलेल्या जगाचे वास्तव (ते आत्मचरित्र नसतानाही) कथांमधून मांडल्यानंतरही (ते सकस असतानाही) जेवढे गाजायला हवे तेवढे गाजले नाही. कारण आबा गाजवून घेणार्यांतले लेखक नव्हते. आणि गाजवून घेणार्यांची चळवळीत ते शिरले नाहीत. त्यांचे अनेक कथासंग्रह उपलब्ध नाहीत. अखेरीस नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने त्यांना गेल्या वर्षी जनस्थान पुरस्कार दिला, त्यावेळी प्रतिष्ठानने ही पुस्तके प्रकाशित करण्याचे जाहीर केले. वास्तविक आताच्या काळातील फार मोठा लेखक हा होता. पण त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही दलित मंडळी एकत्र आली नाहीत, ही आणखी शोकांतिका.
शेवटच्या काळात त्यांची अवस्था अतिशय हलाखीची झाली होती. नाशिकरोड पल्याड असलेल्या विहितगावात ते रहात होते. तिथली वस्तीही कष्टकर्यांची होती. अतिशय छोटे घर. त्या घरात ते बसलेले असत. कुणीही जाऊन त्यांच्याकडे बसत असे. मार्क्सवादापासून अनेक वाद कोळून प्यायलेला, स्वतंत्र विचारसरणी असलेला हा लेखक एवढ्या साध्या परिस्थितीत रहातो, याचे आश्चर्य आणि दुःखही वाटे. त्यांनी जी नोकरी केली, ती दुय्यम स्वरूपाचीच होती. त्यामुळे त्यातून पैसे त्यांना फारसे मिळत नसत. त्यामुळे उतारवयातही त्यांना सुख असे काही लाभले नाही. या काळात अनेक दलित लेखक त्यांच्याकडे येत. त्यांच्याकडून पुस्तकांकडून प्रस्तावना लिहून घेत. पण त्यांच्यासाठी म्हणून फार कमी जणांनी काही केले.
7 Apr 2008 - 8:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बागुलांच्या लेखनाबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली त्याचेही खूप समाधान आहे, तसेच ज्यांनी त्यांच्या विषयाबाबत स्पष्ट मते मांडली,माहिती दिली तीही आवडली.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे