चवीने खाणार त्याला...

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in जनातलं, मनातलं
16 Sep 2009 - 7:53 pm

ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात. आणि मग एखाद्या गवयाने सुराला सूर जोडत गात जावे तसंच कधी आमटीचा भुरका, कधी लोणच्याचं बोट तर कधी स्निग्ध तुपाने सुस्नात मोदकाचा घास असं चवीला चव जोडत खवय्ये खात जातात. मोदकांवर पळ्यांनी आग्रह पड्तच जातो, रिकाम्या झालेल्या वाटया घरच्या अन्नपूर्णांच्या प्रेमाने भरतच जातात. हास्यविनोदात सामील झालेल्या बाप्पाचे डॊळेपण हसताना बारीक झालेले असतात. शेवटी कुणीतरी उठून बडिशेप, विडे आणतो आणि पानं हलतात. मघाच्या आरतीतल्या भक्तीरसाबरोबरच आता इतर अनेक रसांनी ती खोली तुडुंब भरून गेलेली असते!

मी जपानाला आले आणि ह्या ताटावरच्या मैफिलीत रंग भरले जाईनात. पण त्याच वेळेस माझ्या आजुबाजूची माणसं मात्र “उमाई” “ओइशिई” म्हणत त्या जेवणावर चॉपस्टिक्सने तुटून पडली होती. आणि मग एकदम लक्षात आलं. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला मनगटावर मारे गजरेबिजरे बांधून गेलं तरी लावणीचा ठसका मिळणार नाही; शास्त्राच्या पुस्तकात भटांची गजल असणार नाही. तसंच जपानी जेवणातही घरच्या चवी सापडणार नाहीत. असा “परि तू जागा चुकलासी”चा साक्षात्कार मला झाला तेव्हाच मी जपानी जेवणात ख-या अर्थाने रस घ्यायला लागले.

जपानी जेवण ही काही (नुसतीच) खायची गोष्ट नाही…ती तर लिहायही, बघायची गोष्ट आहे. जपानी भाषेत “आधी डोळ्यांनी खावं आणि मग हातांनी” (मे दे ताबेतेकारा, ते दे ताबेरु) अशा अर्थाची म्हणच आहे. एखाद्या मादक यौवनेने “drink to me only with thine eyes” म्हणावं आणि वारुणीशिवायच नशा यावी तसंच “eat to me only with thine eyes” असं म्हणणा-या जपानी जेवणाकडे बघूनच समाधान होतं. पसरट वाटीत तोफुचा (तोफु=सोयाबीनचं पनीर) पांढराशुभ्र चकचकीत ठोकळा, त्याच्यावर टेकवलेलं टिकलीएवढं हिरवं वासाबी (वासाबी=जपानी मोहरीची चटणी), वरून भुरभुरलेल्या पातीच्या कांद्याच्या हिरव्या भिंगो-या, आणि पांढ-याशुभ्र तोफुवरून वहाणारे सोयासॉसचे तपकिरी ओघळ! बाजूला सुशीच्या रंगीबेरंगी गुंडाळ्या, एकीकडे तेनपुराच्या (तेनपुरा=जपानी भजी) आरस्पानी आवरणातून डोकावणारी गाजरं, वांगी, रताळी.भारताच्या शोधात निघालेला कोलंबस जसा अमेरिकेला जाऊन पोचला तसाच चवीच्या शोधात निघालेला खवय्या इथे नितांतसुंदर सौंदर्यापाशी येऊन पोचतो.

निसर्गाने जपानला भरभरून दिलंय. मग जपानी माणूसही निसर्गाला आपल्या घरचाच एक असल्यासारखा प्रेमाने वागवतो. घर कितीही लहान असलं तरी तिथे झाडांना, पानाफुलांना त्यांची अशी जागा असते. कधी घरापुढे अंगण असतं (त्याला “निवा” म्हणतात), तेव्हढीही जागा नसेल तर घराच्या दारात आल्यागेल्याचं स्वागत करायला ताजी रंगीत फुलं उभी असतात. तेही नसेल तर अगदी किमानपक्षी बाथरूमच्या कट्ट्यावरच्या एवढ्याशा जागेत चिमुकल्या वाटीत, काचेच्या भांड्यात फुलं, पानं, वेली असतातंच. जपानच्या एका वर्षात चार ऋतू आपापलं वैशिष्टय जपत मोठया गुण्यागोविंदाने नांदत असतात. ऋतू सरत जातात तसा बदल पहिल्यांदा हवेत होतो आणि मग तिथून थेट जेवणात उतरतो. त्या त्या ऋतूचं वैशिष्टय असलेल्या भाज्या, फळं हे सगळं जेवणात येतं. मला माझ्या शाळेतली मुलं कुतुहलाने विचारतात,” तुमच्या इंडियातल्या वांग्याची चव इथल्यासारखीच असते का?” आता वांगं म्हटल्यावर माझ्या जिभेवर येते ती भरल्या वांग्याची चव किंवा वांग्याच्या कापांची चव. पण दोन्ही मसालेदारच. त्यामुळे मला काहीही उत्तर देता येत नाही. जपानी जेवणात पदार्थाची मूळची नैसर्गिक चव मारून टाकायचा प्रयत्न नसतो. म्हणूनच मग भेंडीचा बुळबुळीतपणा, कारल्याचा कडवटपणा, कोबीचा करकरीतपणा, कच्च्या गाजराचा गोडवा हे सगळं जसं आहे तसं ताटात उतरतं. हे सगळं माझ्या जिभेला रुचलं नाही तरी त्यातली “जे जसं आहे ते तसं” स्वीकारायची भावना मात्र मला आवडते.

जपानी जेवणात सी-वीड (नोरी) वापरतात. माझे आईबाबा जपानला आले असताना योशिदासाननी खास माझ्या आईबाबांसाठी ताज्या सी-वीडचे हिरवे कागद मागवले होते. त्यावर भात पसरून, आत भाज्या घालून गुंडाळून खायचं होतं. (थोडक्यात नोरी फ्रॅंकी!) माझ्या आईने तो प्रकार तोंडात घालताक्षणीच,”ह्याला खारट पाण्याचा (पक्षी: माशाचा) वास येतो आहे!” असं मराठीत म्हटलं. इकडे योशिदासान जपानीत सांगत होत्या, “हे फार चांगल्या प्रतीचं सी-वीड आहे कारण ह्याला अजून समुद्राचा वास येतोय!” माझी चांगलीच पंचाईत झाली. त्यावेळी तिथली भाषेची दरी माझ्यातल्या दुभाष्याने भरून काढली असती तरी ही सांस्कृतिक दरी मात्र मी सोयिस्करपणे मौनानेच भरून काढली.

इथे आल्यावर मला नेहमी “तुम्ही लोक हाताने का जेवता?” असं सगळेच एकदातरी विचारतात. त्यावर उत्तर म्हणून मी त्यांना “उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म” समजावून सांगते. आपल्याच शरीरात वास करणा-या शक्तिरूपी ईश्वराला चेतवण्यासाठी पोटाच्या यज्ञकुंडात दिलेली आहुती म्हणजे जेवण! पंचप्राण एकवटून केलेली शक्तीची प्रतिष्ठापना म्हणजे जेवण. आपल्या जेवणात असं पंचेंद्रियं जागवणारं सगळं काही असतं. मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटतानाचा जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं. असं हे आपल्या “वदनीकवळ”चं पावित्र्यच मला वज्रासनात ताठ बसलेला जपानी, समोरचं बुटकं सोनेरी कलाकुसर केलेलं टेबल, त्यावर मांडलेले असंख्य चिमुकले वाडगे, ते अदबीने हाताच्या ओंजळीत उचलून एकेक घास शांतपणे तोंडात घालणा-या जपानी माणसात दिसतं. भले चवी वेगळ्या असतील पण आकाशातल्या ज्या अदृश्य शक्तीचा अंश आपण ग्रहण करीत आहोत त्याविषयी कृतज्ञतेची भावना मात्र “वदनीकवळ” म्हटलं काय किंवा “इतादाकिमास” म्हटलं काय सारखीच आहे असं मला वाटतं.

मागे एकदा असंच डिक्शनरीशी खेळ करताना मी “जपान” ह्या शब्दाचा अर्थ पाहिला होता. जसा चायना शब्दाला विशिष्ट अर्थ आहे (संदर्भ: bull in a China shop!) तसंच जपान म्हणजे लाकडी भांडी वॉर्निशने चमकवून त्यांवर लाखेने केलेलं सोनेरी नक्षीकाम. लाखेचेच नव्हेत पण चिनीमातीचे, भूमितीतल्या आणि भूमितीबाहेरच्या सगळ्या आकारांचे (मेपलच्या पानाचे, साकुराच्या पाकळीचे, चंद्रकोरीचे) सुंदर ताटल्या, वाटया, वाडगे इथे पाहिले. एवढंच नव्हे तर खोलगट बांबू, शिंपले, वेताच्या टोपल्या ह्यांचादेखील कलात्मकतेने वापर केलेला पाहिला. एकदा तर “सफरचंदाचं ग्लटन” नावाचा प्रकार तर चक्क लालचुटुक सफरचंद पोखरून त्यातच बनवलेला होता! आणि देठाचा भाग झाकण म्हणून ठेवला होता. तिथे “गाजराची पुंगी”सारखं “सफरचंदाची वाटी, आतलं संपलं तर ठीक नाहीतर मोडून खाल्ली!” हे मी किती वेळा मनात म्हटलं! समोर वाढलेलं ते सगळं सौंदर्य डोळ्यात आणि मग पोटात साठवून घेताना परत एकदा “उदरभरण नोहे...”तल्या उदात्ततेचीच अनुभूती आली.

जेवण (मग जपानी असूदे नाहीतर आपलं!) कुणालाही एवढं प्रिय का वाटावं? कारण जेवणातून मिळणारं समाधान नेहमीच चवीत नसतं. ते मनात असतं. जेवणाशी चित्र/ आठवणी जोडलेल्या असतात. आपण नुसतंच जेवत नसतो. तेव्हापुरत्या त्या सुखद आठवणी जगत असतो. हेच बघा नां...रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी. ह्या सगळ्यातून तेव्हापुरता का होईना धकाधकीपासून दूर गोव्याचा संथ समुद्रकिनारा, मऊशार वाळू, खा-या वा-यांवर सळसळणारे माड ह्या सगळ्याचा आभास निर्माण होतोच नां? जे आपल्याकडे तेच जपानात. इथे उन्हाळ्यात सोमेन नूडल्स खातात. बाहेर उन्हाची काहिली वाढलेली असते. तशातच पाण्याची किंवा उन्हाळ्यातल्या स्वच्छ आकाशाची निळाई सोमेनच्या बाऊलमधे उतरलेली असते, त्यात बर्फाचे खडे आणि त्यावर तरंगणा-या पारदर्शक सोमेन नूडल्स. मग त्या सोमेन सुर्रकन ओढून खाताना आतपर्यंत जाणवलेला बर्फाचा गारेगार स्पर्श...ऐन उन्हाळ्यात हिवाळ्याचा आभास होतो. A way to one’s heart goes through stomach किंवा A way to one’s stomach goes through heart दोन्हीही तितकंच खरं असतं. इथल्या जेवणाशीही माझ्या काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक वेळी जेवताना त्यानीच जेवणाला चव येते.

आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा jet lag गृहित धरतोच नां! पहिले काही दिवस आपल्या आजुबाजूचं जग शांत झोपलेल असताना आपण जागे असतो. आणि त्यांची कामाची वेळ झाली की आपले डोळे मिटायला लागतात. पण म्हणून “मी माझ्या वेळेप्रमाणेच वागणार!” असा आडमुठेपणा न करता आपणच आपलं घड्याळ लावून घेतोच ना! माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतोच. त्यामुळे आता मी घड्याळाबरोबरच माझी जीभही इथल्या चवींशी लावून घेतली आहे. आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.

हे काही इतर फोटो:

संस्कृतीपाकक्रियाजीवनमानराहणीदेशांतरप्रकटनआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

16 Sep 2009 - 8:35 pm | श्रावण मोडक

पदार्थांच्या चवी राहू दे बाजूला क्षणभर. या लेखनाची चव न्यारीच. सोबतची छायाचित्रेही सुरेखच.
पहिला परिच्छेद त्या वातावरणात घेऊन जाणारा. वा. यौवना, कोलंबस, चव ते सौंदर्य... सुरेख.

बेसनलाडू's picture

16 Sep 2009 - 10:01 pm | बेसनलाडू

(खवय्या)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

21 Sep 2009 - 11:15 am | विजुभाऊ

वा लेखानाची चव न्यारीच आहे.
पुलंच्या अपुर्वाईतले "शेवटी संस्कार म्हणजे काय......" आठवले.
साठवून ठेवावा असाच एक झकास फर्मास लेख :)

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

दशानन's picture

16 Sep 2009 - 8:21 pm | दशानन

लै भारी लिहले आहेस गं !

मस्त !

फोटो तर.... :| न बोललेलेच बरं !

************

अरे कोणी आहे काय... हे असलेले फोटोवाले + पाककृतीवाले धागे बंद करा रे .... कोणी तरी गचकल्यावर करणार आहात की काय ;)

प्राजु's picture

16 Sep 2009 - 8:06 pm | प्राजु

काय लिहिलं आहेस सई!!!
शब्दच नाहीत!! घरातल्या जेवणावळींपासून ते प्रेमाइतक्याच गुलाबी असलेल्या सोलकढी पर्यंत शब्द न् शब्द सुरेख आहे.
वर्णन करण्याची तुझी हातोटी तुफान आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

16 Sep 2009 - 8:19 pm | चकली

मस्त...
चकली
http://chakali.blogspot.com

मदनबाण's picture

16 Sep 2009 - 8:24 pm | मदनबाण

व्वा,फारच सुंदर लिहले आहेस... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

http://www.timesnow.tv/videoshow/4327416.cms

सूहास's picture

16 Sep 2009 - 8:30 pm | सूहास (not verified)

सही..सही ..सही..सही
सही..सही... सही..सही

मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटतानाचा जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं.>>>>

शब्द संपले...

हेच बघा नां...रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी.>>>>

अग ,गप की जरा..निचीतीन जगु देत नाही ही लोक्स...

सू हा स...

अनामिक's picture

16 Sep 2009 - 8:36 pm | अनामिक

अप्रतिम लिहिलं आहेस...
शब्दागणीक जीभेवर वेगवेगळ्या चवी आल्यात... फोडणीचा उग्र वास, कुरड्यांचा कुरमुरीतपणा, मोदकावरच्या तुपची धार, टोफूचा लिबलिबीतपणा, वसाबीचा ठसका, नुडल्स... सगळं सगळं जीभेवर तरळलं. काय सूंदर वर्णन केलं आहेस... शब्दच नाहीत!

तू शेवटी लिहिलेलं "माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतो" हे अगदी खरं...

-अनामिक

रेवती's picture

16 Sep 2009 - 8:42 pm | रेवती

मस्त लेखन!
जपानमध्ये एकूणच टेबलांवर जेवणाची मांडणी सुरेख असते असे फोटू बघून कळते. सुबक ताई आपल्या जेवणाच्या पद्धती व जपानी पद्धतींचा छान मेळ या प्रकटनात घातलाय!
ते दोन छोटे मासे खरे आहेत की काय?
आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.
बहोत खूब!!

रेवती

सुबक ठेंगणी's picture

17 Sep 2009 - 5:37 am | सुबक ठेंगणी

शुद्ध शाकाहारी गोड मासे आहेत ते...त्यात लाल बीन्स (आझुकी) चं पुरण भरलेलं आहे. ह्या माशांचं नाव 'थाई' असं आहे.

गणपा's picture

16 Sep 2009 - 8:47 pm | गणपा

ज ब ह र्‍या.......
कल्लास लिहिलय.
दुसरा फोटु अप्रतिम . दोघे ज्याम टरकलेले दिसतायत. :)

धमाल मुलगा's picture

16 Sep 2009 - 8:58 pm | धमाल मुलगा

काय जब्बरदस्त वर्णन करतेस गं!
'केवळ अप्रतिम' ह्याशिवाय दुसरं काही सुचेनाच बघ प्रतिक्रिया द्यायला :)

असो, फार काही बोलत नाही अन ह्या सुंदर प्रकटनाला माझ्या चंद्रमौळी प्रतिसादाचं ठिगळ काही वाढवत नाही!
बस्स, मनापासुन आवडलं हे सांगायचा हा केविलवाणा प्रयत्न...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2009 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

_/\_

तुझं प्रकटन खूप खूप आवडलं हे तुझ्यासारख्याच सुंदर भाषेत नाही सांगता येणार, तरीही ही पोच.

अदिती

निरागस मनानी, निरागस जीवनाकडे निरामयपणे तुला पाहता येतय.
सुबक ठेंगणी नाव घेऊन, सुरेख सुंदर वर्णन करता येतय;
म्हणूनच केवळ आम्हाला मिसळपावाच्या हॉटेलात सुग्रास जपानी जेवणातले पदार्थ,
सुबक ताटात सजवून मिळत आहेत.
असेच येऊ देत आणखी.

धन्य सई!
धन्य मिसळपाव!!
आणि धन्य आपण सारेच!!!

लवंगी's picture

16 Sep 2009 - 9:12 pm | लवंगी

तुझ्या लेखनशैलीच कौतुक करु कि फोटोच हेच कळेना.. खूप छान लिहितेस ग.. वाचतच रहावस वाटत.. परत परत वाचल..

घाटावरचे भट's picture

16 Sep 2009 - 9:13 pm | घाटावरचे भट

अ त्यं त
सुं द र
ले ख न
!
!
!

स्वाती२'s picture

16 Sep 2009 - 9:29 pm | स्वाती२

अप्रतिम!

sujay's picture

16 Sep 2009 - 9:49 pm | sujay

काय बोलू??
पर्दाथ, लेखन शैली सगळच अप्रतीम.

आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात.

सुरवातीलाच वीकेट काढलीत.

( 感謝の)
सुजय

चतुरंग's picture

16 Sep 2009 - 10:15 pm | चतुरंग

पहिल्याच परिच्छेदाच्या शेवटाला डोळे पाण्याने भरुन आले आणि गदगदून आले! एखादी अनुभूती स्वतःला येणं आणि अनुभूती आलेली दुसर्‍यापर्यंत पोचवता येणं हे अंतर तुझ्या लिखाणानं केव्हाच पार केलं.
"अन्न हे पूर्णब्रम्ह" असं साक्षात तू जगलेली आहेस हे लिखाणातून दिसतं.
त्या त्या चवींशी, पदार्थांशी जोडलेल्या आठवणी आपण जगत असतो हे केवढं मोलाचं वाक्य आहे. ते यज्ञकर्म यथासांग पार पाडा म्हणजे त्याच्या आठवणीही तशाच असतील आणि त्या पुन्हापुन्हा अनुभवता येतील.
वाक्यावाक्याला मनातून दाद देत होतो. लेख पुन्हा कितीदातरी वाचेन पण पहिल्या वाचनाची प्रतिक्रिया दिली नसती तर मी तुझ्या लेखणीवर अन्याय केला असता!

(अत्यानंदित)चतुरंग

स्वप्निल..'s picture

17 Sep 2009 - 12:57 am | स्वप्निल..

अतिशय सुंदर लेख!!

स्वप्निल

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2009 - 10:18 pm | बिपिन कार्यकर्ते

सकाळी परत एकदा प्रयत्न करीन प्रतिसाद द्यायचा. आत्ता एक ग्लासभर पाणी (इनो टाकलेलं) पिऊन झोपतोय.

(त्रस्त) बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

17 Sep 2009 - 7:00 am | छोटा डॉन

काल रात्री बिपीनदाचा फोन आला की "पटकन इनो घेऊन ये" म्हणुन, मी म्हटले काय झाले असेल बॉ ?

त्याचे कारण आज कळाले.
खत्तरनाक लेख आहे, सईबाई अगदी "चवीने" जेवणार्‍यांपैकी दिसतात, सुबक जेवणाइतका लेखही सुबकच झाला आहे ...
जपानी जेवणाची टेस्ट घेण्याची इच्छा खरोखर झाली आहे ..

आता इथुन पुढे "खाणे, जाऊ दे, हा बोलण्याचा विषय नाही" असे म्हटले तर मी त्याला हा लेख दाखवेन ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

प्रशांत उदय मनोहर's picture

16 Sep 2009 - 10:44 pm | प्रशांत उदय मनोहर

>>भले चवी वेगळ्या असतील पण आकाशातल्या ज्या अदृश्य शक्तीचा अंश आपण ग्रहण करीत आहोत त्याविषयी कृतज्ञतेची भावना मात्र “वदनीकवळ” म्हटलं काय किंवा “इतादाकिमास” म्हटलं काय सारखीच आहे असं मला वाटतं.<<
क्या बात है! जियो..
आपला,
(खादाड) प्रशांत
---------
प्रशांत म्हणे, होता यमकांचे अतिसार
काव्यपंक्ती पडती एकावर एक टुकार
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

संदीप चित्रे's picture

16 Sep 2009 - 11:07 pm | संदीप चित्रे

>> >> रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी >>

का त्रास देते सई?
एकूणच हा लेख खूप म्हणजे खूपच आवडला.
नक्की जपून ठेवीन.
'taste lag' -- काय मस्त शब्दरचना आहे ! जियो !!

तुला लवकरच दुपारी जेवायला चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन मिळो आणि त्याच संध्याकाळी भेळ मिळो ह्या शुभेच्छा !

वर्षा's picture

16 Sep 2009 - 11:10 pm | वर्षा

वाह! माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेख सवडीने वाचेनच. फोटो लगेच पाहिले. निव्वळ अप्रतिम. बर्‍याच आठवणी जाग्या केल्यास ग! सुगोई!

क्रान्ति's picture

16 Sep 2009 - 11:24 pm | क्रान्ति

सई, किती सुंदर लिहितेस! कोणताही विषय तुझ्या हाती आला, की त्याचं सोनं होतं तुझ्या लेखणीनं. मग तो मुकादे असो, कुमामोतो असो, टी पार्टी असो, की लट उलझी असो! खूप सुरेख लिहितेस आणि खूप सहज लिहितेस! =D> =D> =D> =D>

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

प्रभो's picture

16 Sep 2009 - 11:32 pm | प्रभो

आवरा रे... दोन दिवसात चारदा गचकलो....

खरचं जपानी कधीच खाल्लं नसल्यने मी चवीवर काही बोलूच शकत नाही...त्यामूळे तू लिहिलयस ती पूर्व दिशा (जपान पण पूर्वेलाच)... :) पण लेखन १ नंबर....लेखनात सगळ्या चवी उतरल्यात सुगरणबाई (कारल्याचा कडूपणा सोडून)....साष्टांग नमस्कार बाई..

अवांतरः नाना, तुझा तो रडका फोटो दे रे दोन दिवस ऊधारीवर

नेत्रेश's picture

20 Sep 2009 - 1:59 pm | नेत्रेश

३ ते ६ महीने लागतात जपानी फूड 'चवीला' छान आहे म्हणायला.

तो पर्यंत आपला वरण भात आठवतो प्रत्येक घासाला.

स्व-अनुभवा वरुन सांगतो.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2009 - 11:40 pm | विसोबा खेचर

!!!

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2009 - 12:25 am | प्रभाकर पेठकर

लेख आणि छायाचित्र.... दोन्ही सुरेख. हार्दीक अभिनंदन.

काही जपानी पाककृती चिकटवा की फलकावर.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

शाल्मली's picture

17 Sep 2009 - 1:07 am | शाल्मली

अथ पासून इतिपर्यंत सुंदर लेखन!
तुमची लेखनशैली फारच सुंदर आहे.
सोबतचे फोटोही सुरेख.. सजावट फार छान दिसत आहे. त्या ताटल्या, काचेचे वाडगेही आपली जपानी संस्कृती दिमाखात दाखवत आहेत. :)

--शाल्मली.

धनंजय's picture

17 Sep 2009 - 1:17 am | धनंजय

मस्त लिहिले आहे

हुप्प्या's picture

17 Sep 2009 - 2:07 am | हुप्प्या

पुलंच्या पूर्वरंगची व माझे खाद्यजीवन ह्या लेखांची आठवण झाली. तीच भावना पण तरीही ओरिजिनल.
लेख खूप आवडला.
हे वाक्य तर खूपच आवडले.
>>
त्यावेळी तिथली भाषेची दरी माझ्यातल्या दुभाष्याने भरून काढली असती तरी ही सांस्कृतिक दरी मात्र मी सोयिस्करपणे मौनानेच भरून काढली.
<<

नंदन's picture

17 Sep 2009 - 6:03 am | नंदन

चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी. ह्या सगळ्यातून तेव्हापुरता का होईना धकाधकीपासून दूर गोव्याचा संथ समुद्रकिनारा, मऊशार वाळू, खा-या वा-यांवर सळसळणारे माड ह्या सगळ्याचा आभास निर्माण होतोच नां?

- व्हय म्हाराजा! (आधी आमेन लिहिणार होतो. पण त्यात काही दम नाही :))

अप्रतिम लेख! टेस्ट लॅगबद्दल शंभर टक्के सहमत आहे. सशिमी किंवा निगिरीला तळलेल्या माशांची किंवा दबदबीत कालवणाची सर नसली असं सुरुवातीला काही काळ कायम डोक्यात येत असलं तरी सवयीने, सरावाने हळूहळू त्यांचाही आनंद लुटता येतोच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

17 Sep 2009 - 7:18 am | सहज

उत्कट व उत्कृष्ट लेख.

बरेचदा फोटो, लेखनाची लज्जत वाढवतात. इथे तर ते फोटो पार फिके पडावेत इतके रसरशीत लेखन. ते सुद्धा जपानी अन्नाचे फोटो फिके पाडलेस म्हणजे केवळ कमाल!!!! बरेचदा सेहवाग म्हणायचा की समोर साथीला सचिन असल्यावर फलंदाजी एकदम सोपी होउन जाते. तसे काहीसे झाले असावे. :-)

सुरवातीला जपानी अन्न, ते कच्चे मासे खाणे कसेसेच वाटले होते पण एकदा पदार्थ कळले, चवी कळल्या की कळते की कितिही लहान किंवा मोठ्या ठिकाणी जेवायला गेले तरी तेथील कुक प्रत्येक डीश ही सर्वोत्तम बनावी याकरता झटतो, अतिशय भक्तिभावाने आपली सर्व कला, ज्ञान त्यात ओततो . अगदी साधी टपरी किंवा भारी रेस्टॉरंट मधे गेलो तरी तिथे लहान मुलांकरता रंगेबिरंगी कटलरी असते. बाकी आता आपल्या "करी"ची चव जपान्यांनी एकदम आपलीशी केली आहे. एखादी तरी "करी डीश" बर्‍याच रेस्टॉरंट मधे असते आजकाल. जपान्यांना आपली भजी (त्यांचा टेंपुरा) फार आवडते.

मिसळभोक्ता's picture

18 Sep 2009 - 12:06 am | मिसळभोक्ता

देवा, पुढच्या जन्मी मला सुबक ठेंगणीच्या जन्माला घाल !

(नको, पुढच्या जन्मी विमुक्त, आणि नंतरच्या जन्मी सुबक ठेंगणी.)

-- मिसळभोक्ता

मीनल's picture

17 Sep 2009 - 6:13 am | मीनल

मी फारच उशीरा वाचत आहे. मला जे जे काही लिहायचे आहे ते सर्व लिहून झालेल आहे वरती.
काय लिहू अजून?
शब्दा शब्दातून चित्र उभ केलस. सुगंध दिलास, चव दिलीस आणि ती तृप्ती सुध्दा.
ग्रेट!!!

मीनल.

सखी's picture

17 Sep 2009 - 7:59 pm | सखी

शब्दा शब्दातून चित्र उभ केलस. सुगंध दिलास, चव दिलीस आणि ती तृप्ती सुध्दा.
ग्रेट!!! ग्रेटच!!! - पहीला परीच्छेद खासच.

विष्णुसूत's picture

17 Sep 2009 - 7:16 am | विष्णुसूत

मराठित वाचलेल्या उत्तम लेखां मधे हा लेख आहे असे मी समजतो.
सु ठें ची प्रतिभा उल्लेखनीय आहे.
लेखिकेला उत्तेजना पर काहि तरी पुरस्कार / बक्षीस मिळायला हवे असे माझे मानस आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद.

विष्णुसूत

नंदू's picture

17 Sep 2009 - 11:43 am | नंदू

"प्रतिभावान"

हेच म्हणतो. उत्कृष्ठ लेखनासाठी मिपा गौरव सारखा एखादा पुरस्कार असल्यास आमचं मत सुठेजींनाच.

मीनल's picture

17 Sep 2009 - 7:34 am | मीनल

सहमत
मीनल.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Sep 2009 - 7:58 am | भाग्यश्री कुलकर्णी

लै भारी.फोटो आणी लेखनही.

हर्षद आनंदी's picture

17 Sep 2009 - 8:50 am | हर्षद आनंदी

वाचता वाचता डोळ्यांपुढे भरलेले घर, बसलेली पंगत क्रमाक्रमाने येत गेले. मस्त वाटले.

हाताने खाण्याची सवय फक्त भारतात (हिंदु पध्दतीत) आहे ना?

“उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म”
आपल्याच शरीरात वास करणा-या शक्तिरूपी ईश्वराला चेतवण्यासाठी पोटाच्या यज्ञकुंडात दिलेली आहुती म्हणजे जेवण! पंचप्राण एकवटून केलेली शक्तीची प्रतिष्ठापना म्हणजे जेवण. आपल्या जेवणात असं पंचेंद्रियं जागवणारं सगळं काही असतं. मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटतानाचा जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं.

हे एक नंबर..

दिपक's picture

17 Sep 2009 - 9:19 am | दिपक

रविवारचा उनाड दिवस असावा. ताजा फडफडीत बाजार मिळावा, बघताबघता घरातल्या बल्लवा(वी)चा परिसस्पर्श होऊन चंदेरी मासोळीची तुकडी सोनेरी होऊन ताटात पडावी. त्या सामिषाला उतारा म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ, जाळीदार घावनं, बरोबर (प्रेमाइतकीच) आंबटगोड, गुलाबी सोलकढी असावी. ह्या सगळ्यातून तेव्हापुरता का होईना धकाधकीपासून दूर गोव्याचा संथ समुद्रकिनारा, मऊशार वाळू, खा-या वा-यांवर सळसळणारे माड ह्या सगळ्याचा आभास निर्माण होतोच नां?

:) मेलो... खल्लासच !

काय आवडलं हे सांगायला पुर्ण लेख इथे पेश्ट करावा लागेल. अप्रतीम वर्णन.. फोटु तर लाजवाब. कोकणात असताना सकाळ-सकाळी उकड्या तादंळाची पेज फणसाच्या भाजीबरोबर खाताना जे स्वर्गसुख मिळते अगदी तसेच वाटले.

जियो सुठें !!

स्मिता श्रीपाद's picture

17 Sep 2009 - 11:37 am | स्मिता श्रीपाद

आपल्याच शरीरात वास करणा-या शक्तिरूपी ईश्वराला चेतवण्यासाठी पोटाच्या यज्ञकुंडात दिलेली आहुती म्हणजे जेवण! पंचप्राण एकवटून केलेली शक्तीची प्रतिष्ठापना म्हणजे जेवण. आपल्या जेवणात असं पंचेंद्रियं जागवणारं सगळं काही असतं. मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटतानाचा जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं.

अशक्य लिहिलयस गं सुबक.....
आणि चतुरंग म्हणतात तसंच खरच डोळे भरुन आले माझेही...

तुला दंडवत __/\__

-स्मिता

यशोधरा's picture

17 Sep 2009 - 12:00 pm | यशोधरा

सुरेख सुठें! :)

JAGOMOHANPYARE's picture

17 Sep 2009 - 12:02 pm | JAGOMOHANPYARE

मसालेभातावर तूप पडल्यावरचा भूक चाळवणारा वास असतो, पापडाचा/भज्यांचा कुरुम् कुरुम नाद असतो, सात्त्विक भातावर वरणाची पिवळीजर्द ओलावण, लोणच्याचा लालभडकपणा किंवा चटणीचा हिरवा ताजेपणा असे रंग असतात. त्यातच ऊनऊन भात हाताने कालवतानाचा त्याचा लुसलुशीतपणा, श्रीखंडाचं बोट चाटतानाचा जाणवणारा रवाळ स्निग्धपणा अशी स्पर्शाची संवेदना जागी होऊन हे यज्ञकर्म पूर्णत्त्वाला जातं>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

अप्रतिम.......... असं वरण भात करायचा गेले २ महिने प्रयत्न सुरु आहे................. :(

पाककृतीवर लेख लिहायचा म्हणजे भल्याभल्यान्ची डाळ शिजत नाही.... पण तुम्ही मात्र अगदी पाचो उन्गलिया सहजपणे घी मध्ये घालून दाखवलीत... ! :)

वर्षा's picture

17 Sep 2009 - 12:15 pm | वर्षा

म-हा-न लिहिलयस बाई!! तू जपानवर लिहित जा...बाकी जपान-संबंधित विषयांवर म्हणायचंय मला. आम्ही आहोतच त्यावर उड्या टाकायला!

नंदन's picture

17 Sep 2009 - 12:15 pm | नंदन

न्यूयॉर्क टाईम्समधला निरनिराळ्या तर्‍हेने सजवलेले बेन्टो बॉक्सेस वरचा लेख/सादरीकरण.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

समंजस's picture

17 Sep 2009 - 12:32 pm | समंजस

वा!! केवळ अप्रतिम!!!
खाद्दपदार्थ/जेवण/अन्न/खाणे या विषयावर पहिल्यांदाच एवढा सुदंर आणि अप्रतिम लेख वाचला.

दिपाली पाटिल's picture

17 Sep 2009 - 12:39 pm | दिपाली पाटिल

तु काय खतरी लिहीतेस गं...तुझा लेख वाचुन रात्री १२ वाजता पण जबरदस्त भुक लागलीये...

दिपाली :)

अवलिया's picture

17 Sep 2009 - 12:47 pm | अवलिया

!!!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अजिंक्य's picture

17 Sep 2009 - 2:09 pm | अजिंक्य

उत्कृष्ट लेख.
सुंदर लेखनशैली, आणि अप्रतिम छायाचित्रण.
अशी मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद.
(माझी जरा चूकच झाली, जेवण झाल्यावर नेटवर बसलो!
हे वर्णन वाचून आणि फोटो बघून भूक आणखी चाळवल्यासारखं झालं!
आता पुढच्या वेळी जेवणाआधीच नेट चालू करून, आधी बघून घेत जाईन!!)
अजिंक्य.

मेघना भुस्कुटे's picture

17 Sep 2009 - 8:25 pm | मेघना भुस्कुटे

'सुंदर' लेख. नेहमीच्या सपक विशेषणासारखा नव्हे, जपानी जेवणाच्या दर्शनासारखा. मजा आली.

रामदास's picture

17 Sep 2009 - 8:49 pm | रामदास

आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा jet lag गृहित धरतोच नां! पहिले काही दिवस आपल्या आजुबाजूचं जग शांत झोपलेल असताना आपण जागे असतो. आणि त्यांची कामाची वेळ झाली की आपले डोळे मिटायला लागतात. पण म्हणून “मी माझ्या वेळेप्रमाणेच वागणार!” असा आडमुठेपणा न करता आपणच आपलं घड्याळ लावून घेतोच ना! माझ्यामते ह्या jet lag च्या हातात हात घालून taste lag ही येतोच. त्यामुळे आता मी घड्याळाबरोबरच माझी जीभही इथल्या चवींशी लावून घेतली आहे. आजही घरची वेळ माझ्या कॉंप्युटरच्या कोप-यात सतत जागी असते तशाच घरच्या सगळ्या चवी माझ्या मनाच्या एका कोप-यात अजूनही जाग्या आहेत.


उदरभरणाचा सुंदर लेखाजोखा.
वर दिलेला परीच्छेद इतका आवडला की वारंवार वाचला.

चित्रा's picture

18 Sep 2009 - 3:55 am | चित्रा

सुंदर लेखन.

वरील अनेकांशी सहमत. !

"सुबक ठेंगणी"ने लिहिलेला सुंदर आणि सचित्र लेख वाचायला जरा उशीरच झाला. पण आज वाचला व धन्य वाटलं. तिनं व्य.नि. वर तिचा असा मनसुबा मला कळविला होता, पण अनेक लेखांच्या महापुरात (delugeमध्ये) मी तो मिस केला खरा.

लेख खरंच अप्रतिम आहे. जपानी जेवण न जेवलेल्यांनासुद्धा तिची अतीशय सहजसुंदर व ओघवती भाषा व अनेक सहज वाटणार्‍या उपमा मोहवून टाकतातच, पण माझ्यासारख्या जपानी जेवण "पचविणार्‍या"ला तर पुनःप्रत्ययाचा आनंद देतात. माझा हा प्रतिसाद माझ्या स्वानुभवांवर आधारित असून "सुबक ठेंगणी"ला आलेले अनुभव आणि माझे अनुभव बरेचसे सारखे वाटले.

लेख वाचताना १९७२ सालच्या पहिल्या भेटीत आलेल्या जपानी जेवणापासून ते आज आवडीने जपानी रेस्टॉरंट्सना भेट देण्यापर्यंतची प्रगती डोळ्यासमोरून गेली.

आमची मुकुंद कंपनीतील सहा इंजिनियर्सची "टोळी" जपानला गेली. पैशाचा ठणठणाट असल्यामुळे हॉटेल परवडण्यासारखे नव्हते व आमची सोय त्या-त्या कंपन्यांच्या र्‍यो (ryo) मध्ये (म्हणजे ब्रह्मचारी कर्मचार्‍यांसाठीचा आश्रम) मध्ये केली गेली होती. अर्थातच जेवणाच्या बाबतीत "आनंद"च होता.

वाफाळलेल्या भातावर कच्चे अंडे फोडून गुरगुटून खाणे म्हणजे न्याहारी होती. आम्हा सहाजणात एकमत झाले होते की जपानी जेवणाचे दोन प्रकार असतात: (१) बेचव व (२) अत्यंत बेचव.

पण हळू-हळू रामेन (ramen)/उदों (udon) पासून आवड निर्माण होऊ लागली. मग लक्षात आले की एकदा का सोयसॉसचा वास आवडायला लागला की मग ते जेवण आवडू लागते. व तसेच झाले.

आमच्याकडे दरवर्षी दोनदा जपानी इंजिनियर्स येत. (हो, अगदी आषाढी-कार्तिकी). एकाद्या आठवड्यानी त्यांचं, "आम्ही 'मिसो' सूप मिस करतोय" सुरू व्हायचं. हे न्याहारीला घ्यायचं अगदी (जपानी) बाबाआदमच्या काळापासून प्यालं जाणारं सूप आम्हीही चाखलं होतं आणि आमच्या मनात यायचं की "च्या मारी, त्यात मिस करण्यासारखं काय आहे?"

पण पुढच्या ३-४ भेटीत आम्ही चांगल्या हॉटेल्समध्ये राहिलो व चांगले जपानी जेवण जेवलो. आज या नवीन चवींवर ("सुबक ठेंगणी"प्रमाणेच) मी मात केली आहे. आज सगळे जपानी पदार्थ मी व माझी पत्नी-मुले आवडीने खातो (मिसो सूपसह). त्यातल्या खुब्याही माहीत झाल्या आहेत. 'वासाबी' कितीही गोंडस दिसत असलं तरी ते आपल्या हिरव्या दिसणार्‍या चटणीसारखं खाल्लं तर नाकाच्या आतल्या पदराची वास घेण्याची शक्ती ५-१० मिनिटं नाहीशी होते, ते अगदी "टिकलीसारखं"च लावायचं असतं, तेही शक्य तो सोय सॉसबरोबर वगैरे!

आज सुकीयाकी, शाबू-शाबू, टेंपूरा (बरोबरच्या मुळ्यावर आधारित सॉसबरोबर), Japanese fried rice (नाव विसरलो, कदाचित याकीमिशी), सुशी व साशीमी (raw-fish based), sea weed... सगळं मला आवडू लागलं आहे. "तेप्पन याकी"च्या सर्कसपटू बल्लवचार्याच्या अनेक लीलाही आवडतात.

माझा "फूड लॅग" कधीच गेला आहे व आता बर्‍याचदा "अरे, बर्‍याच दिवसांत जपानी जेवलो नाही" असं मनात येतं.

"सुबक ठेंगणी"चा लेख वाचताना हा सर्व प्रवास डोळ्यासमोरून गेला व खूप आनंद झाला. "सुबक ठेंगणीचे इतका सुंदर लेख व माहितीपूर्ण लिहिल्यबद्दल मनःपूर्वक आभार.

जपानबद्दलच्या अशा लेखांचे मिपाकर खूप-खूप स्वागत करतील यात शंका नाही.

जाता जाता: माझ्या माहितीतल्या जपानी लोकांना भारतीय जेवण खूप आवडते व "ओइशी देस" करत ते त्यावर ताव मारतात.

सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सही रे सई's picture

21 Apr 2012 - 12:34 pm | सही रे सई

फारच अप्रतिम लिखाण केलं आहे ... किती रसाळ आणि जिवंत.. मला पहिला परिच्छेद वाचून मी लहानपणी एकत्र कुटुंबामधे अनुभवलेली सगळ्यांची पंगत आठवली.. तीची आठवण करून दिल्याबद्धल लेखिकेला शतशः आभार.

उत्खनक's picture

6 Dec 2014 - 11:16 am | उत्खनक

उत्खनन :-

अत्यंत आवडलेले लेखन. जेवणाचं तर जाऊच देत... साध्या वर्णनानं जीव जायची वेळ आलीये! :)

विजुभाऊ's picture

6 Dec 2014 - 11:25 am | विजुभाऊ

उत्खनक महोदय शतशः धन्यवाद.
इतका सुंदर लेख पुन्हा वर आणल्याबद्दल.

पुन्हा वाचलं पुन्हा तेवढच आवडलं. या ताई सध्या गायब झालेल्या दिसतात :(