(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा
भाग एक - http://misalpav.com/node/८१२७
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष. असा पम्या पत्रकार व्हायच्या कुठ्ल्यातरी कोर्सला अॅडमिशन घेतो आणि कुठ्ल्याशा पेपरमधे सुट्टीत ईंटर्नशिप करतो. तिथे त्याला पत्रकारितेतले जे नमुने भेटतात, त्यांच्या वागण्याने प्रभावित होऊन पम्या पत्रकारितेतच करीअर करायचे ठरवतो. त्याला त्याच वृत्तपत्रात लगेच नोकरीसुद्धा मिलते, पण त्याची डायरी त्याच्या एका टर्रेबाज मित्राच्या हाती लागते आणि...... आता पुढे वाचा........
१ जून
आज नोकरीचा पहिला दिवस म्हणुन पहाटे लवकर उठलो. खरेतर रात्री झोप लागलीच नाही. डोळ्यासमोर रात्रभर ऑफिस नाचत होते. उघड्या डोळ्यानी रात्रभर स्वप्ने पाहिली त्यात मी स्वताला बातम्या गोला करताना पाहत होतो, ऑफिस मधे बातम्या लिहित होतो, संपादक माझे आणि माझ्या बातम्यांचे कौतुक करत होते आणि एकदा तर मला सर्वश्रेष्ठ बातमीदार असा पुरस्कार मिल्याचेही.... आई-बाबाचा घरात वावर सुरु झाला आणि मी बिछान्यातून उठलो. दात घासले तर बाबा स्वतः माझ्यासाठी हातात चहाचा कप घेउन उभे. कमावता मुलगा झालो ना आता मी. सकाळी आईने नाश्त्यात छान शिरा केला, दुधातला. घराबाहेर पडताना हातावर दही पण घातले तिने. बाबा आणि निमीने पण ऑल द बेस्ट म्हटले. साला दहावीची परीक्षा दिली तेव्हा पण एवढे सोहाळे झाले नव्हते. अर्थात आपण तरी कुठे स्कॉलर होतो. बहुदा सगळ्याना आधीच माहिती होते परीक्षेत आपण काय दिवे लावणार ते - आधीच्या नऊ परिक्शान्मधे तसेच निकाल होते ना? पण आता नाही.... साला फ्यामिली आपल्यावर एवढा जीव टाकते, आपण पण दाखवणार पम्या काय चीज आहे ते. नाय मोठा पत्रकार झालो तर बोलायचे.
बरोब्बर सकाळी दहा वाजता ऑफिस मधे गेलो तर कोणीच रिपोर्टर आले नव्हते. मग तिथेच बसून टाईमपास केला. फीचर सेक्शन मधे काही पोरी कामावर आल्या होत्या त्यातल्या एक-दोन दिसायला जरा बर्या होत्या पण त्यांच्याकडे बघितले तरी रागाने घूरत होत्या. साल्या स्वतःला काय माधुरी दिक्षीत समजतात काय? कट्ट्यावर असतो तर नीट नडलो असतो पण आता इथे काम करायचे उगीच इज्ज़तिचा फालूदा नको करून घ्यायला. आणि एकदा रिपोर्टर म्हणुन काम सुरु केले की लय पोरी रांगेत येतील लाइन द्यायला.
शेवटी दुपारी एक वाजता चीफ रिपोर्टर बाराथे आले. सुरुवातीला माझ्याकडे लक्ष दिले नहीं त्यानी. दुसरेच काम करत बसले. एक वाजता संपादक आगलावे आले. नंतर बाराथेनी मला सम्पादकांपुढे उभे केले. त्यांनी मॅनेजर कड़े पाठवले जॉइनींग रिपोर्ट द्यायला. तिथून बराथेंकडे आलो तर त्यानी भले मोठे लेक्चर दिले... "पत्रकारिता हे जबाबदारीचे काम आहे. बातमी पूर्ण सत्य हवी... विश्वासार्हता... शुद्ध भाषा..." माती अन मसण.... काय काय बोलले. मी आपले ऐकून घेतले. नंतर मला स्थानिक कार्यक्रमांची यादी करायला सांगितली. चांगली पंचवीस-तीस कार्यक्रमांची यादी होती. हात मोडून आले लिहिता लिहिता. साला एवढे परीक्षेत लिहिले असते तर मार्क तरी चांगले पडले असते. आज तेव्हढेच काम केले.
२ जून
सकाली ऑफिस मधे जावून कामवाटप वही पाहिली तर परत माझ्या नावापुढे स्थानिक कार्यक्रमांची यादी करण्याचेच काम. बाराथे यायला बराच वेळ होता म्हणुन म्हणले ते संपवून टाकू आणि नविन काम मागू. निमंत्रने ठेवतात ती फाईल पाहिली तर चांगली चाळीस निमंत्रणे होती. च्यायला! आजचाही दिवस सगळा स्थानिक कार्यक्रमांची यादी करण्यातच जाणार वाटते. साला ही कारकूनगिरी करायला पत्रकार झालो का? पण शेवटी झक मारत फाईल उचलली आणि रिपोर्टर सेक्शन मधे गेलो. फीचर सेक्शन मधली ती बारीक चिन्गळी सारखी माझ्याकडे बघत होती. कनखीमधून तिच्याकडे बघत बघत स्थानिक कार्यक्रमांची यादी तयार करत बसलो. आयला ही चिन्गळी बहुतेक लाइन मारतीय आपल्यावर. आपणही आहोतच तसे स्मार्ट. गल्लीतला झंड्या नेहमीच म्हणतो मी म्हणजे दिट्टो अजय देवगण सारखा दिसतो. तशी चिन्गळी पण बरी आहे दिसायला. गोरी आहे, ऊंची पण आपल्याला मॅचिंग.. जरा जास्तच काटकुळी आहे, पण चालेल. तशीही झीरो साईझची चलती आहे.... काहीतरी करून ती एंगेज आहे का माहिती काढली पाहिजे....
3 जून
आज तीस स्थानिक कार्यक्रम होते....... चिन्गळी नक्कीच लाइन मारतीये...
४ जून
आज वीसच कार्यक्रम केले. काही निमंत्रणे गुपचुप कचरापेटीत टाकली... चिन्गळीचे नाव सरीता आहे.....
५ जून
आज सरीताची सुट्टी होती. कामात लक्ष लागले नाही पण पंचवीस कार्यक्रमांची यादी केली आणि पत्रकावरून तीन बातम्या लिहिल्या. बराथेनी बातम्या तपासताना व्याकरण कच्चे म्हणून लेक्चर दिले आणि व्याकरणाचे पुस्तक वाच असा उपदेश केला. साला येडाच आहे. अभ्यास करायचा असता तर इथे नोकरी कशाला केली असती...
६ जून
आज सुट्टी पण संध्याकाली ऑफिसच्या बाहेर अन्नाच्या हॉटेलसमोर जाउन उभा राहिलो. सरीता ३२ नम्बरच्या बसमधे चढली. मी स्कूटरवर मागे गेलो. ती प्रीतनगर मधे रहाते. बापाचे नाव सुरेश दिवटे... पहिलवान आहे तो.... जरा सावध रहा पम्या, सटकला तर बडवून काढेल.
प्रतिक्रिया
12 Jun 2009 - 3:24 pm | श्रावण मोडक
चालू दे. जोरात आहे डायरी.
चिंगळी हा अगदी खास पारिभाषीक शब्द आहे की काय न्यूजरूममधला. पूर्वी आम्हीही हाच शब्द थोड्या फरकाने चिंगी असा वापरायचो.
साला एवढे परीक्षेत लिहिले असते तर मार्क तरी चांगले पडले असते.
हे किती सत्य लिहिलंस रे. मी नेहमी ऑफिसात हेच वाक्य सुभाषीत म्हणून सगळ्यांना सांगतो. भारंभार बातम्या लिहिण्यापेक्षा पेपर नीट दिले असते तर या धंद्यात येऊन पडण्याची वेळ आली नसती हे सारखं सांगावं लागतं. अर्थात, त्यात मी स्वतःही असतोच म्हणा. लहानपणी अभ्यास केला असता तर...
जाऊ द्या. किती खंत करावी काय गमावलं आहे त्याची?
बाकी तुझ्या डायरीचा आकार पाहता, तू आता तीन-चार कॉलमी बातम्या कधी लिहिणार आहेस हे विचारावेसे वाटते. पण तरी ठीक आहे. पहिली डॅश, दुसरी सिंगल आता तिसरी डीसी. म्हणजे पुढे टीसी, फोरसी म्हणायला हरकत नाही.
पहिली असाईनमेंट कधी? पहिली रात्रपाळी कधी? त्यात काय-काय धमाल आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे.
12 Jun 2009 - 3:36 pm | घाशीराम कोतवाल १.२
मोडक साहेबांशी शब्दशा सहमत
पुनेरी शेट भाग जरा मोठे करा ना राव!!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
12 Jun 2009 - 5:13 pm | बापु देवकर
भाग लिहीण्यात एवढी कंजुषी का?...जरा मोठे भाग टाका राव..
बाकी मस्तच लिहीताय...
12 Jun 2009 - 5:50 pm | वेताळ
येवु दे जोरात.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
12 Jun 2009 - 7:27 pm | मनसे
वाचत राहावी अशी डायरी !!
खुप छान आहे डायरी. मिसळ्पाव वर वाचकानसाठी एक पर्वणी आहे.
12 Jun 2009 - 10:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पत्रकार साहेब, छोटा भाग आला पुन्हा! आणखी मोठे भाग टाका हो, मजा येत आहे वाचायला.
13 Jun 2009 - 1:38 am | Nile
मागच्या वेळेपेक्षा मोठा आला! अशीच 'प्रगती' चालु दे! पम्याची हो! ;)
13 Jun 2009 - 8:43 am | नन्या
हा पत्रकार काय छोट्या जहिरातीच असलेल्या पेपर मधे काम करतो काय? बातमी कशी ३-४ कॉलमी असावी.
बाकी मस्तच लिहीताय...