साखरेचे खाणार त्याला..!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
1 Jun 2009 - 7:01 pm

तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही. अहो अक्षरशः सुन्न झालो होतो. पुन्हा खाईन असे वाटत नाही!)
आता भारतात असताना वेगवेगळ्या सणवारांच्या, लग्नामुंजींच्या, सत्यनारायणाच्या निमित्ताने गोडाचे पदार्थ खायला मिळतात पण तेव्हा आपल्याला माज असतो, तेव्हा त्याची एवढी किंमत नसते आणि त्याचे खरे महत्त्व समजते ते तिथून बाहेर पडल्यावर!
इथे अमेरिकेत आल्यापासून एकतर आजूबाजूला गोड खाणार्‍या लोकांचे प्रमाण कमी; सारखे 'ओ, माय गॉड सो मेनी कॅलरीज!' करुन चिंताक्रांत असतात बरेचसे लोक! (ज्यांनी कमी खायला पाहिजे ते मात्र ऐकत नाहीत ते पिझ्झा, बर्गर, चीजकेक हाणत असतातच तो भाग वेगळा :) ) पण एकूणच त्यामुळे आपल्या गोड खाण्यावर नकळत बंधने येतात हे नक्की!
शिवाय इथे मिठाईची दुकाने, हलवायांची दुकानेही नाहीत (निदान माझ्या भागात तरी नाहीत - न्यू जर्सीला आहेत असे ऐकून आहे). 'इंडियन ग्रोसरी शॉप' नावाच्या तद्दन दुकानात टीनच्या डब्यातले गुलाबजाम किंवा प्लास्टिकच्या बॉक्समधल्या जिलब्या घेताना मनात कळ उमटते, (हे म्हणजे कादरखानने नटसम्राटची भूमिका केल्यासारखे असते! :T ) पण दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने त्याला पर्यायही नसतो.

असो, तर आज मिठाईची आठवण होण्याचे कारण परवा इथे आमच्या गुजराती शेजार्‍यांकडून समजले की जवळच एक मंदीर आहे आणि त्यात गुजराती समाजाचे हलवाई मिठाई बनवून देतात!
ही बातमी ऐकून बरं वाटलं आणि माझं मन मला झटक्यात माझ्या गावात, अहमदनगरला, घेऊन गेलं. नगर जिल्ह्याची एक गंमत आहे, तसा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा असला आणि त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा सतत प्रश्न असला तरी कसा कोण जाणे इथे अतिशय उत्तम प्रतीचा खवा फार पूर्वीपासून मिळतो. पारनेर, पाथर्डी अशा तालुक्याच्या ठिकाणी दुधाचा खवा करुन तो नगरला आणून विकणे हा परंपरागत व्यवसायच आहे. तुम्ही जर सकाळी सकाळी ६.३०-७ वाजता नगरच्या एस.टी.स्टँडवर गेलात तर भाजीच्या मोठ्या टोपल्या असतात तसल्या टोपल्यात झाकून आणलेले खव्याचे गोळे गाड्यांच्या टपावरुन उतरवून घेणारे गवळी दिसतील. किंवा खुद्द नगरपासून साधारण ८-१० मैलाच्या परिसरातून रोज सकाळी सायकलवरुन, मोटरसायकलवरुन दुधाचे मोठे कॅन आणि खव्याच्या टोपल्या, डबे आणणारे गवळी दिसतील. ह्यांचा वेषही अगदी ठराविक असतो. पायजमा, पांढरा शर्ट, गांधीटोपी किंवा धोतर, पांढरा शर्ट आणि रंगीत पागोटे - ह्या पागोटं वाल्यांना भरघोस मिशाही असतात! माझ्या बाबांना सकाळीच साधारण ४-५ मैलाची रपेट करायची सवय गेली कित्येक वर्षे आहे. मी दहा -बारा वर्षाचा असल्यापासून बर्‍याचवेळा त्यांच्याबरोबर फिरायला जायचो. त्यावेळी जाता येता हे गवळी लोक दिसायचे.

तर असे हे गवळी थेट हलवायांच्या दुकानात खवा आणि दूध घेऊन जायचे. तिथे दुधाचे कॅन रिकामे करायचे आणि खवा द्यायचे. भल्या पहाटेला गायी-म्हशींच्या धारा करुन, ८-१० मैलाची रपेट करुन आलेले हे गवळी भुकेजलेले असत. हलवायाकडेच ठाण मांडून
साजूक तुपातली, पिवळीधमक्-सोनेरी, गरमागरम जिलबी आणि ताजी भजी असा भरपेट नाष्टा झाला की चंची सोडून निवांत पान-तंबाखू लावून, जरा शिळोप्याच्या गप्पा करुन हे परतीच्या प्रवासाला सायकलवर टांग टाकून निघायचे. हे दृश्य मी अनेकवेळा बघितले आहे.
'बंबईवाला हलवाई' हे दुकान कापडबाजाराच्या एका बाजूच्या अगदी तोंडावर आहे. त्याचा मालक झालानी, हा माझ्या वडिलांचा शाळेतला विद्यार्थी. त्यामुळे त्याच्या दुकानावरुन जाताना तो 'नमस्ते सर' म्हणून बाबांना हटकून नमस्कार करायचा. एकदा बाबांच्या मागे लागून मी त्याच्या मुदपाकखान्यात प्रवेश मिळवला. एवढ्या कॅन दुधाचे हे लोक करतात तरी काय असा प्रश्न मला पडलेला. मी आत गेलो. रसरसलेल्या चुलाणावर भल्यामोठ्या काहिलीत दूध उकळत होतं आणि अंगात फक्त बनियन आणि अर्धी चड्डी घातलेला, कानात रंगीत डूल घातलेला एक तरतरीत, पोरसवदा राजस्थानी तरुण, लांब दांड्याच्या लोखंडी झार्‍यानं ते दूध ढवळत होता. ते दृश्य मी अवाक होऊन बघत होतो. ते बासुंदीसाठी दूध आटवणे सुरु होते. काहिलीतली साय ढवळून, खरवडून पुन्हा त्या दुधातच ढवळणे सुरु होते. दुसर्‍या कढईत आटलेल्या दुधात बदाबदा साखर घालून पुन्हा ढवळून आटवायला सुरुवात झाली. असं ते दृश्य डोळेभरुन पाहून मी बाहेर आलो. झालानीनं मला एका द्रोणातून गरमागरम बासुंदी दिलीन. बाबांकडे मी प्रश्नार्थक नजरेनच बघितलं ते घे म्हणाले. मी ती प्यायलो. त्या ताज्या बासुंदीची खरपूस चव न्यारीच. त्यानंतर त्यापेक्षा उच्च बासुंदी मी फक्त नरसोबाच्या वाडीला पुजार्‍यांकडे प्रसादाचे जेवण जेवताना खाल्ली आहे. कुरुंदवाड, दत्तवाड, दानवाड, नरसोबाची वाडी ह्या सगळ्या कॄष्णाकाठची बासुंदी म्हणजे अतिशय दाट, गंधासारखी घोटीव आणि अतिशय उत्कृष्ट चवीची असते. ह्या ठिकाणाव्यतिरिक्त तशी बासुंदी मला कुठेही खायला मिळाली नाही! असो. कुठून कुठे भटकून आलो बघा एका क्षणात!

नगरला 'घासगल्ली' नावाचा एक रस्ता आहे. पूर्वी टांगे असायचे त्यावेळी घोड्यांचा घास तिथे विक्रीला असे तेव्हापासून हे नाव पडले, आता जवळजवळ सगळे टांगे गेले तरी नाव अजून तसेच आहे. तर ह्या रस्त्याच्या साधारण मध्यावर 'बन्सीमहाराज' म्हणू एक मिठाईवाला आहे. मारवाडी समाजात आचार्‍याला महाराज म्हणतात. हे दुकान गुलाबजामसाठी अतिशय प्रसिद्ध. त्याचे गुलाबजाम सकाळी ९ ते दुपारी १२ एवढ्यातच मिळायचे त्यानंतर शिल्लकच रहायचे नाहीत! (आताची परिस्थिती वेगळी असेल कदाचित पण माझ्या लहानपणी तरी असं होतं). साखरेच्या पाकात पोहोणारे गुलाबजाम फारच खास दिसतात. ह्याच बन्सीमहाराजचे तेलीखुंट भागातही अजून एक दुकान आहे. सणासुदीला गुलाबजाम आणायचे असले तर मी हमखास पेढेघाटी डबा पिशवीत टाकून त्यात गुलाबजाम घेऊन अतिशय सावधपणे, बेताबेताने घरी येत असे. देवाला नैवेद्य दाखवेपर्यंत कशीबशी कळ काढून कधी एकदा जेवायला बसतो असं होऊन जाई (निदान त्यावेळी तरी वरण-भातापासून सुरुवात न करता थेट गुलाबजाम पासून का करत नाहीत असं मला नेहेमी वाटे! :D )

पेढा आणि निकालांचा (परीक्षेचे असोत किंवा प्रसूतीचे ;) ) फारच जवळचा संबंध आहे! त्याखेरीज उगीचच कोणी नुसती मिठाई म्हणून पेढे घरी आणून खाल्लेत असं माझ्यातरी बघण्यात नाही. 'महेंद्र पेढावाला' हा प्रसिद्ध पेढेवाला ही नगरच्या पेढ्याची ओळख आहे. अतिशय उत्तम प्रतीच्या खव्यापासून उत्तम प्रतीचे पेढे बनवानेत ते महेंद्रनेच. त्याचे केशरी पेढेही तितकेच प्रसिद्ध आहेत. तोंडात अक्षरशः विरघळणारा, पिठाचा गोळा खाल्ल्यागत टाळूला न चिकटणारा, अतिशय चविष्ट असा पेढा ह्याच्याकडे मिळतो. पेढे उत्तम व्हायला खवाही तसाच हवा. ताजा खवा कसा ओळखावा ह्याचीसुद्धा परीक्षा आहे. प्रथम दर्शनातच खवा हा किंचित तांबूस रंगावर, तुपाळ, तुकतुकीत असा दिसायला हवा. चिमूटभर तोंडात टाकून बघितल्यावर खमंग, खरपूस चव लागायलाच हवी. आंबूस, पिठूळ, गुळगुळीत चव लागली तर खवा शिळा, भेसळयुक्त, कच्चा किंवा यातील काहीही असू शकते. (बाकी सातारी साखरेत घोळलेले पेढे किंवा पुण्याच्या चितळ्यांचे पेठे मला कधीच आवडले नाहीत :()
तशी ह्या महेंद्रकडची बालूशाहीसुद्धा एकदम बढिया! अगदी अरवाळ, पापुद्रे सुटणारी, गोडीला बेतशीर बालूशाही म्हणजे मेजवानी असते.
पूर्वी ह्याच्याकडे फरसाणही उत्तम मिळत असे. त्याचाही मी भोक्ता होतो. त्यातल्या खमंग खुसखुशीत ढब्बू गाठी खायला मला फार आवडायचे.हल्ली एवढ्यात त्याच्याकडचे फरसाण चाखलेले नाही त्यामुळे सध्याचा दर्जा कसा आहे हे सांगता येत नाही.
म्हैसूरपाक हा पदार्थ मी पहिल्यांदा ह्याच्या दुकानात बघितला. तांबूस रंगाचे, छोटे-मोठे जाळीदार ठोकळे बघून मी त्याचे नाव विचारले आणि हा म्हैसूरपाक आहे हे समजले. तो मला फारसा कधी आवडला नाही.

साजूक तुपातले मोतीचुराचे लाडू हा माझा आणखी एक आवडता प्रकार. माझ्या मुंजीच्या वेळी नारायणअय्या हे कानडी आचारी घरीच बुंदी पाडायला बोलावले होते. बुटकेसे, चष्मावाले, बोलण्यात भरगच्च कानडी हेल असलेले, खांद्यावरचा पंचा आणि हातातला भला भरभक्कम झारा सावरत बोलणारे नारायणअय्या मला अजून आठवतात. वाड्यातल्या गच्चीवरच चुलाण मांडून त्यातल्या मोठ्या कढईत झराझरा बुंदी पाडून ती साजूक तुपातून तळून, ठक्कठक्क असा आवाज करुन झार्‍यात घेऊन, एका लयबद्ध झटक्याने ती शेजारच्या वर्तमानपत्रावर हलकेच ओतणारे अय्या मला फारच मोठे जादूगार वाटले होते! रात्रीच वळून गच्चीवर वाळायला ठेवलेल्या पिवळ्याधम्मक लाडवांचा तो नजारा अजूनही स्मृतीत कोरलेला आहे!

वर उल्लेखलेल्या पदार्थांच्या मानाने मला रसमलई किंवा रसगुल्ले हे पदार्थ तसे जरा डावेच वाटत आलेले आहेत. (तरी मी खायचे सोडत नाही हा भाग अलाहिदा ;) पण ती माझी पहिली आवड नव्हे! )

श्रीखंड हा पदार्थ ज्याने कुणी शोधला त्याला माझे लाख सलाम! पण तेही कसे घरी केलेले हवे. रात्री न विसरता साययुक्त, ताजे दही भरपूर प्रमाणात फडक्यात टांगून ठेवावे, सकाळी सगळे पाणी गळून गेल्यावर, विटांचे वजन देऊन उरलासुरला पाण्याचा अंश काढून घोटीव चक्का कापडातून हलकेच काढून घ्यावा, नंतर जेवढ्यास तेवढी साखर घालून हा चक्का पुरणयंत्रातून घोटून घ्यावा, सोबत दुधात घोटलेल्या केशराचा अर्क टाकावा, जायफळ लावले असेल तर उत्तमच, चारोळ्या, बदामाचे काप टाकून हे थंडगार श्रीखंड खाण्यास द्यावे! अहाहा!! असले श्रीखंड खाऊन दुपारची पडी मारणे म्हणजे स्वर्गसुखच! विकतच्यापैकी मला वारणाचे श्रीखंड आवडले होते. ते अजून मिळते की नाही माहीत नाही. 'अमूल'चेही चांगले असते.

उकडीच्या मोदकांचा उल्लेख केला नाही तर गणपतीबाप्पा सोंडेने एक फटका मारल्याखेरीज रहाणार नाही. अरवाळ पारी असलेले, पोटात गूळ-खोबर्‍याचे गुलगुलीत सारण भरलेले, वरून मजबूत तूप सोडलेले (असले पदार्थ खाताना उगीच तोंडदेखले चमचाभर वगैरे तूप घेणार्‍या लोकांची मला कीव येते, असे करणे हा मोदकांचा अपमान आहे असे माझे मत आहे! X( ), वाफाळते मोदक गटकणे हा आनंद ज्याने घेतला नाही तो जगलाच नाही असे मी म्हणेन!

तर असा हा माझा गोडाचा प्रवास लहानपणापासून चालू झालेला आहे. वाढत्या वजनाचे भय अतिरेकी नसले तरी आता पूर्वीपेक्षा जपूनच खातो हे ही खरेच. नशिबाने अजूनतरी मधुमेहासारखे काही पाठीमागे लागलेले नाही (लागूही नये अशी आशा आहे!).
'साखरेचे खाणार त्याला देव देणार' ह्या म्हणीवर माझा असलेला विश्वास मला माझी गोडयात्रा चालू ठेवण्यास हात(तोंड)भार लावतो आहे हे नक्की! :)

चतुरंग

समाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2009 - 8:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं ... रंगाशेट, आज तुम्हाला जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद आणि आत्ता यातलं काही खायला मिळणार नाही म्हणून थोडा खुन्नस!

मस्त लिहिलं आहेत. मला एकदम आजोबा घरी बनवायचे त्या पेढ्यांची आठवण झाली. विनायकी चतुर्थीला ठाण्याला यायचे ते स्वतः गायींचं दूध काढण्यापासून, खवा बनवेपर्यंत सगळं काम स्वतःच करायचे. मी मोजून दहा पेढे त्यांच्या डब्यात प्रसादासाठी ठेवायचे आणि बाकीचे अर्थात आमच्या 'सिक्रेट' जागी! एक-दीड दिवसात पेढे गायब! साखर न घाललेले ते पेढे इतके अप्रतिम लागायचे ... गावच्या जंगलात चरलेल्या गायींच्या दूधाची चव का चुलीवर आटवलेलं दूध का आजोबांचं प्रेम हे मात्र न उलगडलेलं कोडं आहे!

विजुभाऊ's picture

2 Jun 2009 - 3:53 pm | विजुभाऊ

व्वा.....वाडीच्या बासुन्दीच्या आठवणीने बरे काही जागे केलेत रंगाशेठ.
तिथे मिळणारी कवठाची बर्फीसुद्धा एकदम बेष्ट असते केशरी रंगाची आंबट गोड

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

मस्त कलंदर's picture

2 Jun 2009 - 11:25 pm | मस्त कलंदर

लेख वाचता वाचताच खूप काही गोड खाण्याची इच्छा झालिये...
बाकी.. वाडी.. औदुंबर म्हटलं की कवठाच्या बर्फीची हटकून आठवण येते...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति's picture

1 Jun 2009 - 9:04 pm | क्रान्ति

नुसत्या गोड पदार्थांच्या आठवणीनं सुद्धा सण साजरा करतोय, असं वाटलं. खूप मस्त जमलीय बासुन्दी!
<:P :) <:P
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

अनामिक's picture

1 Jun 2009 - 9:08 pm | अनामिक

चतुरंग.. बरोबर लंच टायमाला गोडाची आठवण करून दिलीत त्याबद्दल निषेध! मीसुद्धा तुमच्या सारखाच गोडघाश्या! गोड अतिप्रिय!!
तुमचा लेख भरपूर आवडला... तुमच्या तोंडात लग्गेच साखर पडो!

-अनामिक

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 9:10 pm | नितिन थत्ते

नगरला जात असे तेव्हा महेंद्र पेढावाल्याकडचे पेढे नेहमीच घेत असे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

स्वामि's picture

1 Jun 2009 - 9:20 pm | स्वामि

बम्बइवाल्याकडचा बटाट्याचाचिवडा सांगायला विसरलात की!तो गोड नसतो म्हणुन सांगीतला नसेल. :)

धनंजय's picture

1 Jun 2009 - 9:35 pm | धनंजय

काय लिहिले आहे.

मी देखील "खाईन तर तुपाशी" संप्रदायातला आहे. त्यामुळे डाएट, सॅकरीन वगैरे काही प्रकार नाही. स्वास्थ्यासाठी म्हणून घरात साधारण गोड पदार्थच नसतात, अन असले तर तुपा-सारखेचे.

तुमच्या नगर सारखा माझ्या गोव्यातील खेडेगावातला कुठला हलवाई नाही :-(

वाचून खूप मजा वाटली.

प्राजु's picture

1 Jun 2009 - 9:50 pm | प्राजु

खूप खूप गोड झालाय लेख!
नगर बद्दल माहिती नाही, पण नरसोबाच्या वाडीचे पेढे, बासुंदी... म्हणजे ब्रह्मानंदी टाळी.
तसं श्रीखंड आम्रखंड हे प्रकार इतके नाही आवडले कधी.. पण मोतीचूराचे लाडू, कलाकंद.. सूतरफेणी, सोनपापडी हे मात्र खूप आवडतात. जिलेबी विशेष नाही..
मात्र.... रसमलाई खूपच आवडते.
लेखाने जुन्या आठवणी जागवल्या हे नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिंटी's picture

2 Jun 2009 - 11:13 am | मिंटी

प्राजु ताईशी सहमत. फारच गोड झालाय लेख.
नगरबद्दल मलाही फारशी माहिती नाही... पण नरसोबाच्या वाडीची बासुंदी, पेढे मस्तच....
तुमच्या लेखामुळे मला आमच्या पंढरपुरच्या देशपांड्यांच्या पेढ्याची आणि मी गेल्यावर आवर्जुन माझ्यासाठी आज्जी घेते त्या बासुंदीची आठवण झाली.....
जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद :)

Nile's picture

1 Jun 2009 - 10:20 pm | Nile

वा! तुमच्या बरोबर मीही नगरला जाउन आलो.

द्वारकादास ची लस्सी राहीली का आवडत नाही? मँगो आईसक्रीम घालुन तर हेवन! :)

मैसुरपाक पदार्थ दक्षिणेत उत्तम मिळतो. चैनईला एक मिठाईवाला आहे (चैन्नई स्वीट्स) त्यांच्या वर्धापनदीनी मैसुरपाक हा निम्म्या किमतीत मिळतो (त्यांच्या संस्थापकाने मैसुरपाक शोधला असं ते म्हणतात). तो अजीबात आपल्या जाळीदार कोरड्या मैसुरपाकासारखा नसतो. मस्त तुपाळ आणि लई भारी लागतो. :)

अवांतरः तुम्ही म्हणता त्या झालानीचा मुलगा माझ्या बरोबर (बहुदा त्याच) शाळेत होता. त्यात आम्ही नविपेठेत. कधीही लहर आली कि चाल्ले, मिठाई, वडे, वगैरे खायला. मला नगरच्या बटाटावड्यांइतके इतर कुठलेच आवडले नाहीत.

सगळ्यात जास्त काय मुकत असेन तर संक्रांत, पतंग उड्वुन आता ७ वर्षं झाली. :( :(

@स्वामी: मला वाटत आशिर्वाद जास्त प्रसिद्ध आहेत चिवड्यासाठी.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 10:23 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे तुम्ही दोघांनी काय जोडीने येऊन मारायचे ठरवले आहे का? एक फोटो टाकते, दुसरा वर्णनं लिहितो. काय चाललाय काय, आँ? जीव जाईल ना एखाद दिवशी फटकन्.

अरे भिया (भय्या नाही, भियाच) एकदा आमच्या इंदौरला (इंदूर नाही, इंदौरच) या. सराफ्यात नेतो तुम्हाला. अगदी तिथली आठवण करून दिलीस रे रंगा. तिथे म्हणजे रबडी जर का हाताने खाल्ली तर नंतर साबणाने धुवूनही हाताचा ओशटपणा पूर्ण जात नाही. सातार्‍याला गेलं की कंदी पेढा ठरलेलाच. मामाच्या लग्नात असाच घरी आचारी बोलवून पाडलेली बुंदी आणि आजीची / आईची नजर चुकवून त्या ताज्या बुंदीचे भरलेले बकाणेच्या बकाणे आठवले. मला मुगाचा शिरा अजिबात आवडत नाही. माझ्या लग्नात नेमकं पंचपक्वान्नात हेच शिरासाहेब हजर. आणि सासूबाईंनी आग्रह करूकरू चांगला दोनदा वाढला होता बचकन् पानात. तेही आठवलं. आजही गुरूवारी बरेच वेळा तो पिवळाधम्मक पेढा नजरेसमोर येतो आपसूक. गुढीपाडव्याची वाट बघायचो दोन कारणांसाठी, श्रीखंड / जिलबी तर असायचंच पण मान असायचा गाठीचा. ती गाठ्यांची माळ आदल्यादिवशी घरी आणली की जाम खुणावयाची. संकष्टीला / अंगारकीला आजी २१ मोदक तळायची. मोदक आवडायचे म्हणून मग मला बाप्पा पण आवडायचा लहानपणी. मोदक खाणारा बाप्पा भन्नाटच वाटायचा, एकदम एखाद्या दोस्तासारखा.

खरंच खूप मस्त आठवणी जाग्या झाल्या.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

1 Jun 2009 - 11:24 pm | टारझन

काय चाललाय काय, आँ? जीव जाईल ना एखाद दिवशी फटकन्.

ए कोण आहे रे तिकडं ? पकडा पकडा त्याला ... साला.... "तथास्तु" म्हणून पळतोय आं ... =))

रंगाकाका .. लै भारी राव .. स्मायलीज पेरलेला शिरालेख आवडला :)

|| ॐ टाराय नम: ||

शाल्मली's picture

1 Jun 2009 - 10:33 pm | शाल्मली

वा वा!
एकदम गोड झाला आहे लेख!
भारतीय पदार्थांची खरी चव बाहेर आल्यानंतरच कळते खरंच..

लेख वाचून पुण्यातील काका हलवाईंकडची रसमलाई आणि चितळ्यांकडचे आम्रखंड याची आठवण झाली. :)

--शाल्मली.

अवलिया's picture

1 Jun 2009 - 10:42 pm | अवलिया

मस्त लेख हो रंगाशेट!
मागल्याच आठवड्यात महेंद्रचे पेढे खाल्ले हो... ढुम ढुम ढुमाक :)
कदाचित पुढल्या आठवड्यात परत जाणे झाले तर तुमच्या वाटेचे पण खाईन :)
आणि मुद्दाम तुम्हाला कळवेन ;) ढिंग चाक ढिचांग ढिंग चाक ढिचांग <:P

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2009 - 10:59 pm | भडकमकर मास्तर

लेखही मस्त गोड झालाय...

मलाही गोड खूप आवडतं..
.. कोणताही गोड पदार्थ आवडत नाही असं नाही.. काही फार फार आवडतात तर काही थोडे कमी आवडतात...

अवांतर : लहानपणी बरेचसे सण त्याबरोबर केल्या जाणार्‍या गोडधोड पदार्थांसाठी मनात जोडले गेलेले असत... त्यासाठी त्या सणांची उत्सुकतेने वाट पाहिली जायची .....
आता वाटेल तेव्हा वाटेल ते उपलब्धही असतं आणि विकत आणून लगेचच्या लगेच खाता येतं त्यामुळे खाण्याच्या गोडधोड पदार्थांची तितकी उत्सुकता संपली आहे...
सालं हे चांगलं झालं की वाईट हेही अजून कळत नाहीये...
:(
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

रेवती's picture

1 Jun 2009 - 11:07 pm | रेवती

आता वाटेल तेव्हा वाटेल ते उपलब्धही असतं आणि विकत आणून लगेचच्या लगेच खाता येतं त्यामुळे खाण्याच्या गोडधोड पदार्थांची तितकी उत्सुकता संपली आहे...
मला असं वाटतं हे वाईट झालं. का?
सणावारी तर श्रिखंड, बासुंदी, पुरणपोळी इ. पदार्थ मिळतातच पण इतरवेळी हापूसच्या फोडींचा साखरांबा, गुळांबा, स्ट्रॉबेरीचा मुरांबा, कैरीच्या किसाचा साखरांबा हे आणि असे अनेक प्रकार
कमी कालावधीत संपवावे लागतात. ;) मग वजन वाढतं.
त्यानंतर आपण म्हणतो," काय हे? गोडानं वजन वाढलं.";)

रेवती

संजय अभ्यंकर's picture

1 Jun 2009 - 11:16 pm | संजय अभ्यंकर

हा लेख उशीरा टाकल्या बद्दल!
आता नगरला गेलो की, मैं हूं और वोह महेंद्र है!

परंतु, अलीकडे नगरला गेलो असतान रोज सकाळी ५-५.३०ला बस स्टँड वर चहा प्यायला जात असे, तेथे हे खवेवाले काही दिसले नाहीत!

अबे बिका सराफेकी रबडी अकेलेही निगलकर हमें जलाते हो|
और छप्पन दुकान भूल गये क्या?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

ऋषिकेश's picture

1 Jun 2009 - 11:24 pm | ऋषिकेश

याला म्हणतात जातीवंत खवैय्याने लिहिलेहा "खादी" वरील लेख! खुप आवडला
मी हलवायाच्या दुकानात घोंगावणार्‍या माश्यांच्या वरचढ तिथे घोंगावत असतो. त्यामुळे तुमचा हा लेख लै लै आवडला :)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

बापु देवकर's picture

1 Jun 2009 - 11:28 pm | बापु देवकर

हा लेख आणी त्याच्यावरच्या प्रतिकिया वाचुन तोंडाला गोड गोड चव आली...

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 11:37 pm | छोटा डॉन

प्राजुताईच्या प्रतिसादाशी सहमत ...
उत्तम झाला आहे लेख, अगदी रक्तातील आणि डोळ्यातील शुगर वाढण्याइतका ...

बासुंदीवरुन आठवले, आमच्या गावकडेही रंगाशेठ वर्णन करतात तसेच गवळीआप्पा बासुंदी वाढायला यायचे, वर्षानुवर्षे एकाच माणसाकडुन बासुंदी घेत असल्याने त्यालाही आवड्-निवड पक्की कळलेली. एखाद्या दिवशी तो स्वतःच हाक न मारता दारात येऊन "मावशी, आज भट्टी मस्त जमली आहे, घ्या एक लिटरभर बासुंदी" असे सांगुन हक्काचे माप वाढुन जायचा. ती खरेदी चालु असताना शँपल म्हणुन दिलेल्या वाटीभर फुकटच्या बासुंदीची चव अजुन जिभेवर जाणवते.
गाव सुटले तशी बासुंदीही सुटली, आज कमीत कमी ६-७ वर्षे झाली असतील मनोसोक्त बासुंदी खाऊन ...

आमचे गाव देवस्थानाचे, प्रसादाच्या गोड पदार्थांची मुबलक रेलचेल.
मग साधे पेढे, फिक्के पेढे, कंदी पेढे, सारखफुटाणे, माव्याची बर्फी, बत्ताशे किती खाल्ले ह्याला मोजमाप नाही. अगदी सहज गावातुन फिरायला निघाले तरी एखाद्या ओळखीच्या दुकानात जाऊन हाताने उचलुन एखादा पेढा तोंडात टाकायला कुनाच्या परवानगीची गरज नसायची. गेले ते दिवस ...

बाके दिवाळीच्या वेळेसच्या नैवेद्यच्या बेसनलाडु आणि अनारश्यांचे तर काय वर्णन करायचे ? अप्रतिमच ...
तसेच प्रेम "जिलेबी"बद्दल ....
लग्नावळीत आणि देवाच्या कार्यात किती जिलब्यांचे आकडे खाल्ले ह्याला मोजमाप नाही, मोहनदासाचा किंबा बुंदीचा मोतीचुराचा लाडु हा एक असाच जेवळावळीतला फेमस आणि सर्वोत्तम प्रकार, वाढण्याची पद्धत म्हणजे हाताने नव्हे तर परातीत भरुन अक्षरशः परात ताटात रिकामी करायची. "नाही" म्हणण्याची सोय नाही कारण शेजारी बसलेले हात धरुन ठेवायचे व "वता वता, त्याचे काय ऐकता, आयला ५ लाडु जड आहेत होय ? " अशा आरोळ्या ....
मग हे लाडु सरले नाहीत तर पंगतीत "लाडवांची फेकाफेक" ह्या डोळ्यांनी पाहिली आहे ...

मात्र कधी "श्रीखंड्/आम्रखंडाची" आसक्ती वाटली नाही, आवडीने मागुन घ्यावे अशी कधीच इच्छा झाली नाही. कॉलेजच्या दिवशातल्या मेसमधल्या पाणी सुटलेल्या आंबट श्रीखंडाने आणि रव्याच्या अथव्या साबुदाण्याच्या खीरीने त्यांच्या आयुष्यातील इंटरेस्ट संपवला. आजसुद्धा समोर श्रीखंड आले की नकोसे वाटते ...
तोच प्रकार "म्हैसुरपाकाबद्दल", अतिगोड असणारा व हाताला तसेच तोंडाला चिकटणारा म्हैसुरपाक खावा असे मुळीच वाटले नाही.

घर सुटले तसे रसमलाई, रसगुल्ला, गुजराथी मिठाया, बर्फ्या ह्यांचे प्रमाण जास्त वाढले.
पदार्थ जरी उत्तम असले तरी घरची "पुरणपोळी" अजुन ह्यांच्यासमोर वरचढ ठरते असे मनाला राहुन राहुन वाटते. वर्षातुन मुश्किलीने १ वेळा पुरणपोळीचा योग असल्याने उपलब्ध पर्याय "गोड मानुन" घ्यावे लागतात ...

लिहील तेवढे कमीच , की-बोर्डला मुंग्या लागतील पण यादी संपायची नाही.
तरीही "गोड पेये" ह्यात आलीच नाहीत , त्यांचीही भली थोरली यादी आहेच की.

छे, फारच नॉस्टलेजिक केले बॉ रंगाशेठनी. चालु द्यात ...

------
( आठवणीतला ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अनाडि's picture

1 Jun 2009 - 11:48 pm | अनाडि

आरे किती मोठा प्रतिसाद देत बसताय,दिवसाला ५ -५ पाने भरुन खरडवह्या भरवताय ,
तेवढा वेळ कंपनीत कामाला दिला असता तर कशाला कंपनी दिवाळखोरीत जाईल?
:)

रंगाशेठ,
लै ग्वाड झालाय लेख.पण अशाने लोकांना मधुमेह व्हायचा.

अनाडि
ब्दुल नारायण डिसुझा.

श्रीमंत दामोदर पंत's picture

2 Jun 2009 - 4:49 pm | श्रीमंत दामोदर पंत

+१

डान्याशी सहमत.......
माझं सासर आहे डॉन्याच्याच गावचं..... साखरपुडा झाल्यावर बायकोच्या आज्जीला भेटायला गेलो होतो त्यावेळी तिथली बासुंदी चाखली होती..... सुंदरच चव....

वर बर्‍याच जणांनी उल्लेख करुन वाडीच्या बासुंदीची आणि कवठबर्फीची आठवण करुन दिलीये..... आता लौकरच जायला हवं या ठिकाणी..... :)

रंगाशेठ सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद :)

भाग्यश्री's picture

1 Jun 2009 - 11:37 pm | भाग्यश्री

वाह मस्त गोड झालाय लेख! मीही गोडखाऊ..
नगरची बरीच खादाडीची ठिकाणं कळली, आता सासरी गेल्यावर कुठे जायचे ते कळले! :) नवरा आणि सासरची मंडळी तिखट खाऊ त्यामुळे मलाच सगळं मिळेल! :)
बाकी पहीलं वाक्य जबरी!! सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे माझा जीव की प्राण आहे! :)

www.bhagyashree.co.cc

नंदन's picture

2 Jun 2009 - 12:10 am | नंदन

सुरेख लेख, रंगराव. शिरा, पेढे, मोदक, बासुंदी, गुलाबजाम... नुसती यादी वाचूनच तोंडाला पाणी सुटलं. (फक्त पुरणपोळी कशी राहिली?) लहानपणी खाल्लेल्या गोड पदार्थांची गोडीच निराळी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

2 Jun 2009 - 4:29 am | चित्रा

असेच म्हणते. पण मस्त लेख. गोडखाऊ नसूनही लेख आवडला.

लहानपणी माझ्या चुलतबहिणीच्या आजीकडे जेवायला बोलावले की मला आवडते म्हणून ती हमखास पुरणपोळ्या करायची. तिच्यासारख्या मऊसूत पुरणपोळ्या नंतर कधीच खाल्ल्या नाहीत.

रव्याचे लाडू संपले वाटते?

यशोधरा's picture

2 Jun 2009 - 12:16 am | यशोधरा

मस्त गोड लेख! :)

घाटावरचे भट's picture

2 Jun 2009 - 1:10 am | घाटावरचे भट

यस यस... लेख मस्तच. :)

पिवळा डांबिस's picture

2 Jun 2009 - 2:25 am | पिवळा डांबिस

आयला, नुसतं वर्णन वाचूनच डायबेटिस झाल्यासारखं वाटतंय. ब्लड शुगर चेक केली पाह्यजे!!!
(इथे अंगावर शहारे आल्याची स्मायली!)
आता संध्याकाळी जळजळीत मिसळ खाल्लीच पाहिजे!!!
:)
सॉरी रंगा, आम्हाला गोड आवडत नाही ना त्यामुळे अशी विसंगत प्रतिक्रिया द्यावी लागली!!
पण लेख छान आहे, आवडला!!

संदीप चित्रे's picture

2 Jun 2009 - 3:15 am | संदीप चित्रे

ज्याला 'स्वीट टूथ' म्हणतात तसा मला खरंतर नाहीये पण पेढा आणि मोदक म्हणजे जीव की प्राण रे !!
का लेखा नाही नाही त्या आठवणी ताज्या करवतो ?
न्यू जर्सीला ये लवकर आता एकदा...
आपण 'सुखाडिया'च्या दुकानातून ताजी जिलेबी घेऊ, 'डिंपल'मधे भेळ - पुरी आणि वडा-पाव खाऊ, जस्सी लस्सी मधून ताजा उसचा रस पिऊ आणि मग मस्तपैकी मसाला पान खात घरी येऊन गप्पांची मैफल जमवू :)

चित्रादेव's picture

2 Jun 2009 - 3:41 am | चित्रादेव

वरती लिहिलेले सर्व पदार्थ आवडतात. पूरणपोळीचा उल्लेख नसल्याने 'अगोड' लेख आहे थोडास, खरे तर निषेधच. :)
सत्यनारायणाचा केळ घालून प्रसाद म्हणजे जीव की प्राण. त्या १००० तुळशी वहाणे कधी संपून भटजी सांगतो की नेवैद्य आणा ह्याची मी वाट पहायची. आईने नैवेद्य दाखवला की जवळजवळ वाडगा भरून रूम मध्ये खात रहायची. दुसर्‍या दिवशी हाच प्रसाद आणखी मस्त लागतो. कसे तरी तोंड धूवून ब्रेकफास्ट म्हणजे पुन्हा वाडगाभर प्रसाद. (ह्या साठी आईला नेहमी लोकांना घरी पुन्हा प्रसाद भरून देवू नकोस असे सांगायचे.) :)

असेच कंदी पेढे सुद्धा आवडत मावशीने गावाहून पाठवलेले.
वरील पदार्थांबरोबर पुरण पोळी हा एक आवडीचा प्रकार. होळीचा नेवैद्य झाला की ४ पूपो शुद्ध तूपात माखून आणि ग्लासभर दूध पिवून आदल्या संध्याकाळपसून रंग उडवायचे. दुसर्‍या दिवशी रंग पंचमीला पुन्हा सकाळी ४ पूपो ,ग्लासभर दूध खावून ९-२ वाजेपर्यन्त रंग उडवणे मग घरी येवून तिखट मटण नाहीतर चिकन रस्सा. मग झोप चार तास. संध्याकाळी पुन्हा तेच ४ पोळ्या आणि दूध मग खेळायला. एवढे खावून अंगाला मास चिकटलेले. :)
उकडीचे मोदक एकावेळी पाच खल्ल्याशिवाय उठणे नाहीच. तसे येता जाता दिवसभरात गणपतीच्या पुढ्यातले नैवेद्यातले उचलत रहायचो माव्याचे मोदक सुद्धा. आई पुन्हा डिश भरून ठेवी.

आता फक्त कॅलरीजच दिसतात..... ते कॉउच बसून चार पूपो खावून गेले ते दिवस म्हणण्याची हिम्मत नाही का ते चार तास खेळण्याचे दिवस नाही उरलेत. जेमतेम एक पोळी तीही भित भित खाते आताशी. :(

विनायक प्रभू's picture

2 Jun 2009 - 6:50 am | विनायक प्रभू

लेख हॉ

सहज's picture

2 Jun 2009 - 6:59 am | सहज

लेख व प्रतिक्रिया अतिशय गोड. मिपावरील सर्वात जास्त कॅलरीयुक्त लेख असावा.

सत्यनारायणासाठी केलेला शीरा, पेढे, आम्रखंड, श्रीखंड, पुरणपोळी इ इ सगळेच आवडते असले तरी सध्या रसमलाई हा माझा सर्वात आवडता पदार्थ आहे. तसेच नुसती मिठाई म्हणून पेढे घरी आणून खाल्लेत/खातो :-)

खाण्यासाठी जन्म आपुला :-)

मेघना भुस्कुटे's picture

2 Jun 2009 - 8:46 am | मेघना भुस्कुटे

मलापण गोड खायला आवडत नाही विशेष. पण तरी काय झालं! खाण्यावरचं खवय्याचं प्रेम कळायला का गोड आवडावं लागतं?!
मस्तच झाला आहे लेख.
बासुंदी, शिरा, जिलब्या, श्रीखंड हे तर दिवाणखान्यातले मानकरी. पण मला थोडे मागल्या दारचे पदार्थ आवडतात. कोकणात करिंदे म्हणून एक कंद मिळतो. तो किसून तुपावर भाजून त्याची खीर करतात. किंचित केशरी रंगाची ही खीर मला खूप आवडते. झालंच तर नारळाच्या पाण्यात अळीव भिजवून त्याचे बाळंतिणीसाठी लाडू करतात, तेही फार मृदू - तोंडात हलकेच विरघळणारे लागतात. त्यातली गोडी साखरेची नव्हे, गुळाची. शिवाय खरवस? तुम्ही खरवस कसा विसरलात? साखर घातलेला खरवस पिचपिचीत लागतो. गूळ घालून शिजवलेला चांगला खमंग लागतो.
असो...
यादी अनंत आहे!

मनिष's picture

2 Jun 2009 - 11:33 am | मनिष

मलापण गोड खायला आवडत नाही विशेष. पण तरी काय झालं! खाण्यावरचं खवय्याचं प्रेम कळायला का गोड आवडावं लागतं?!
मस्तच झाला आहे लेख.

हेच म्हणतो....अफाट झाला आहे लेख! :)
मला बंगाली मिठाई म्हणजे जीव की प्राण, त्यामानाने श्रीखंड, पुरणपोळी नाही आवडत एवढी....पन उकडीचे मोडक......यम, यम! लिटरभर लाळ सुटली तोंडाला....

विसोबा खेचर's picture

2 Jun 2009 - 10:16 am | विसोबा खेचर

'साखरेचे खाणार त्याला देव देणार' ह्या म्हणीवर माझा असलेला विश्वास मला माझी गोडयात्रा चालू ठेवण्यास हात(तोंड)भार लावतो आहे हे नक्की!

जियो...! :)

रंगा, खा रे बिनधास्त.. काय होत नाय..! :)

लेखही गोड झाला आहे! :)

तात्या

वेताळ's picture

2 Jun 2009 - 11:20 am | वेताळ

खुपच छान आणि गोग्गोड लेख लिहला आहे. नरसोबावाडीचे पेढे व कवटाची बर्फी एकदम झक्कास असते राव. उद्या जाणार आहे वाडी ला.बाकी आमचे वारणा श्रीखंड अजुनही मिळते बाजारात. तेही वेगवेगळ्या फ्लेव्हर मध्ये. या कधी तर वारणानगर ला .बाके लेख वाचुन तोंड एकदम गोड झाले बर का.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अभिज्ञ's picture

2 Jun 2009 - 11:26 am | अभिज्ञ

लेख प्रचंड आवडला.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार

एकदम गोग्गोड लेख हो रंगा सेठ.

बासुंदीचे नाव काढलेत आणी हरिपुरला खाल्लेल्या बासुंदीची आठवण झाली. त्यासारखी बासुंदी पुन्हा म्हणुन कधी खायला मिळाली नाही.

अजुन एक आवडता पदार्थ म्हणजे खरवस, आ हा हा क्या बात है. आजोळी सांगलीला बर्‍याचदा दुपारच्या काही बायका चिक विकायाल यायच्या, मग आजीच्या मागे लागुन लागुन तो चिक विकत घेउन खरवस करायला लावायचा आणी पोटभर हाणायचा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2009 - 12:06 pm | स्वाती दिनेश

लेख एकदम 'गोड' झाला आहे,
मला अतिगोड आवडत नसले तरी हा लेख खूप आवडला.
पुपो चा उल्लेख आणि केक सारखे विदेशी गोड पदार्थ राहिले ना..
स्वाती

अनंता's picture

2 Jun 2009 - 12:06 pm | अनंता

संध्याकाळी उतारा म्हणून झणझणीत कोल्हापूरी मिसळ चापावी लागणार :)

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

श्रावण मोडक's picture

2 Jun 2009 - 2:43 pm | श्रावण मोडक

बेळगावचा कुंदा, गोकाकचा कर्दंट, कुरुंदवाडची कवठाची बर्फी, धारवाड-हुबळीचे मांडे, धारवाडी पेढे, खान्देशातला कलाकंद (साध्या दुकानांतून मिळणारा, तिथंच मिळणारं ते लंब्या-चौड्या कढईत उकळत असणारं दूध, वर चमच्यातून टाकलेली साय). सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

मुक्तसुनीत's picture

3 Jun 2009 - 8:48 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. लेख आवडला !

मैत्र's picture

2 Jun 2009 - 3:16 pm | मैत्र

नगरच्या आठवणी जाग्या केल्यात...
मस्तच लिहिलं आहे... आणि एक एक नेमक्या जागा...

चितळे रोडच्या कोपर्‍यावर तो एक भय्या जिलबी तळत असतो. आणि त्याच्याच बाजूला ते खवे वाले आहेत बरेच. असे मोठ्या मोठ्या कसल्या तरी झाडाच्या पानात गुंडाळलेले मोठे मोठे ताज्या खव्याचे गोळे (नक्की कसली पानं असतात ती ? फ्लॉवरच्या पानासारखी दिसतात :)) लहानपणी जवळ जवळ प्रत्येक वेळी आजोळहून येताना किंवा कोणी भेटायला आलं घरी तर खवा यायचा. तसे गुलाबजाम आजवर परत कुठेच खाल्ले नाहीत... या भय्याची ही जिलबी पण थोडी वेगळी.. थोडी बारीक, जराशी कडक आणि गरमागरम. एकदम चितळ्यांची केशरी आणि मऊ जिलबी नाही...
तेली खुंटावरचं बन्सीमहाराजचं दुकान, बम्बईवाला तर बेस्टच. त्याचे नमकीन पदार्थ मस्त असतात पण आता या पक्वान्नांच्या यादीत जरा तोंडीलावणं म्हणून चाललं असतं...

नगरमधून एकदम रस्ता चुकून कुरुंदवाडच्या घट्ट एकसारख्या घनतेच्या अप्रतिम बासुंदीची आठवण करायला गेलात :) ... एकदा जायलाच हवं परत त्या बासुंदी साठी.
बुंदी - नगरला पद्धतच आहे का बुंदी घरी पाडण्याची?... पुण्यात असले काही लाड नाहीत त्यामुळे लग्ना कार्यात तो सोहळा बघणे ही एक भारीच मजा असते तिथे. गरम गरम नुकतेच वळलेले लाडू इतके मस्त दिसतात :)

माणिक चौकाजवळ आजोळ होतं त्यामुळे महेंद्र, बम्बईवाला आणि द्वारकासिंग लस्सीवाला हे सगळं एकदम शेजारी..
हो दत्ताच्या देवळाजवळ सोपानाचा वडासुद्धा :)

आता आजोळ एकत्र राहिलं नाही आणि वाडाही नाही. चौदाच्या डझनाने आख्खी पाटी आंबे आणणारे आजोबा नाहीत आणि बादल्या (हो!) भरून केलेला रस नाही... काही महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा रात्री कापड बाजारात गरम दूध आणि दिवसभरात द्वारकासिंगच्या फेर्‍या मात्र चुकवल्या नाहीत.

कोजागिरीला सुट्टी नसल्याने आजोळी कधी गेलो नाही त्यामुळे 'चांदोबाची साखरेची टोपी' काही खायला मिळाली नाही...

गोड लेखाबद्दल खूप धन्यवाद !!

चतुरंग's picture

2 Jun 2009 - 4:35 pm | चतुरंग

माझ्या गोड आठवणीत सगळे इतके रमून गेलात ह्यामुळे खरंच खूप बरं वाटलं! भारतीय पदार्थात मिठायांनी आपल्या मनाचा एक कोपरा अगदी घट्ट धरुन ठेवलेला असतो त्याला स्पर्श करण्याचा एक प्रयत्न अनायासेच घडला.

३_१४ अदिती - घरच्या खव्याचे पेढे क्लासच लागत असणार. तसही खवा उत्तम असेल तर साखर न घालता नुसताच मस्त लागतो! :) आजोबांचं प्रेम आठवलं हे किती छान!
धन्याशेठ - तुझ्या खेडेगावाला हलवाई नाही ह्याचं वाईट वाटलं. हलवाई हवाच त्याशिवाय मजा नाही! अधून मधून हा लेख वाचत जा तेवढाच आधार! ;)
प्राजू - हो कलाकंद, सुतरफेणी, सोनपापडी हे मलाही आवडतात. मस्तच आठवण करुन दिलीस!
स्वामी, Nile - चिवड्यांना ह्या पंगतीत स्थान नव्हते. त्यांची आपण कधीतरी वेगळी स्वतंत्र पंगत बसवूयात! :)
बिपिनभिया - अरे ती इंदौरची रबडी खायची आहे रे, अगदी बोटं बुडवून चाखायची आहे, आजवर नुसतंच ऐकत आलोय पण कधी योग आहे माहीत नाही! लवकरच येईल असे मला वाटते आहे ;)
टार्‍या - 'शिरालेख'! मस्तच शब्द. लेका तुझ्या डोक्यात काय स्वतंत्र शब्दकोष बसवून घेतला आहेस का? तू गुलाबजाम प्रेमी आहेस हे माहीत आहेच कधी भेटलो की फक्त गुलाबजाम पार्टी करुयात! पातेल्याच्या हिशोबातच बोलायचं! :D
शाल्मलीताई - चितळ्यांचं आम्रखंडही छान असतं हे बरोबर.
अवलिया - तुम्ही नगरला जाता हे माहीत नव्हतं. छान म्हणजे आमचा महेंद्र तुम्हालाही पेढे खिलवतो हे ऐकून मस्त वाटलं.
भडकमकर मास्तुरे - आता सततच्या उपलब्धतेमुळे गोडाची उत्सुकता कमी झाली आहे हे एकप्रकारे वाईट झाले आहे. पण तुम्ही सरसकट कुठूनही मिठाई आणून न खाता गिनेचुने हलवाई गाठून त्यांची पेश्शल मिठाई खायचा प्रघात ठेवलात तर असे वाटणार नाही! :)
संजय अभ्यंकर - अरेच्या, आपणही नगरला जाता तर. माझ्या गावाचा फेरफटका करणारे बरेच लोक आहेत की इथं! हे मला मिठाईइतकंच गोग्गोड वाटलं! :)
ऋषीकेश - तुझं घोंघावणं असंच सुरु राहूदे! ;)
डॉन्या - अरे केवढा दिलसे प्रतिसाद दिला आहेस? खर्‍या खादाडीला साजेसा आहे एकदम. मान गये! :)
भाग्यश्री - अरे वा नगर तुझं सासर तर! मग काय मज्जाच. पाहिजे तितका ढीग लावायला सांगायचं नवर्‍याला मिठायांचा किंवा सगळी दुकानं इतकी जवळ आहेत की रोज चालतही जाऊ शकतेस आणि त्यांना कुणाला आवडत नाही म्हणज तूच येताजाता चापू शकतेस! ;)
नंदन, चित्राताई, - पुरण्पोळीसारखा तालेवार पदार्थ विसरलो नाही पण किती लिहू, लोक मला हावरट म्हणतील की काय अशी शंका आल्याने मिठाईचे दुकान बेतानेच सजवले! =P~ पण गरमगरम दुधाबरोबर तुपात भिजलेली पुपो ह्म्म्म्म्म्...अंमळ त्रास झाला! ~X(
पिडा - सॉरी. तुमचे मानकरी वेगळ्या पंगतीत आहेत! :H
संदीप - तुझं 'सुखडायी' आमंत्रण लवकरच स्वीकारावं लागेल असं दिसतं आहे! वा वा पान खात गप्पांचा फड किती वर्ष झाली असतील! :?
चित्रादेव - पुपो बद्दल वर लिहिलंच आहे. शिरा, मोदक आवडणार्‍या तुम्ही आहात हे ऐकूनही मस्त वाटले. :)
प्रभू - तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाहीच मी!
सहज - कुठल्याही परीक्षेशिवाय पेढे मिठाईसारखे आणून तुम्ही खाता हे ऐकून मस्त वाटलं! :)
मेघना - अळिवाचे लाडू मलाही आवडतात. त्यांना एक शांत अशी चव असते अलगद जातात तोंडात अगदी! खरवस!! कसली आठवण दिलीस? छ्या. अस्वस्थपणा आला आणि हो गुळातलाच हवा तो. (ह्या भाभेमध्ये योग येईल का? :W )
मनीष - उकडीचे मोदक वाला तूही आहेस छान! :)
तात्या - ठाण्याला येईन तेव्हा तुम्ही तुमच्या खास ठेवणीतल्या हलवायांकडे घेऊन जायचंय हे ठरलं! :)
वेताळ्बुवा - कवठाच्या बर्फीच्या आठवणीने पाझरलो! माझी मावशी ही बर्फी मस्त करते. वाडीपेक्षा छान. त्यांच्या बर्फीत अतीसाखर असते.
अभिज्ञ - धन्यवाद! :)
स्वातीताई - हो केक राहिलाच पण ह्या सगळ्या धोतरवाल्या पदार्थात तो सुटाबुटातला जरा बाजूला पडला! ;)
श्रावणदा - कर्दंट - अरे खल्लास! मांडे - अहो मनातच खात होतो आता खरेच खावे लागणार. मागे नगरला गेलेलो तेव्हा कोणीतरी बेळगावला जाऊन आणले होते दोन दिवस फक्त मांडे+दूध असाच मिताहार घेऊन राहिलेलो! ;) धारवाडि पेढ्यांबद्दल ऐकून आहे पण अजून योग यायचाय! :(
मैत्र - तुम्हीही नगरकर आहात हे छानच! अहो माणिकचौक म्हणजे आमच्या घरापासून चालत पाच मिनिटे! व्यनि करा सविस्तर बोलू! :)
ज्या कुणा खवय्यांचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल त्यांनी नाराज होऊ नये! हा लेख गोड मानून घेतल्याबद्दल पुनश्च आभार! :

चतुरंग

नाना बेरके's picture

2 Jun 2009 - 7:51 pm | नाना बेरके

व्वा ! मिपावरचा फार सुंदर लेख आहे हा. आपल्याला फार आवडला बोआ.

कळस's picture

2 Jun 2009 - 9:12 pm | कळस

वा चतुरंग ..
जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद !! आम्ही चितळे रोडला राहायचो..
रामप्रसाद चिवडा आणी रुचीराची (नेता सुभास चौक ) गरमागरम जिलेबि कस काय विसरला रे भो ?

कळस

आनंदयात्री's picture

3 Jun 2009 - 4:50 pm | आनंदयात्री

काय फक्कड जमलाय लेख. आता गोड आणी फक्कड शब्द एकत्र आल्याने फक्कीच्या लाडवांची आठवण येणे सहाजिक !!
उत्तम उत्तम लेख .. यापुढे औरंगाबादला जातांनी गाडी जरा नगर मधे रेंगाळेलच !!

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jun 2009 - 5:05 pm | प्रकाश घाटपांडे

ही गोड जवळीक आवडली. तशे आमी बी गोडघाशे. जायफळ घातलेले श्रीखंड खाल्ले कि काय जडत्व येत मस्त. मी शि-यात दुध घालुन खातो. तिखट खायला आवडत नाही. एखादे वेळी खाल्ल तर दुस-या दिवशी दाह होतो.
गोड खाणे आणी गोड बोलणे याचा एकमेकाशी काही संबंध नाही पण गोड बोलणार्‍या माणसांपेक्षा गोड खाणारी माणसे आवडतात.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

3 Jun 2009 - 9:07 pm | लिखाळ

वा ! फारच मस्त लेख आणि मस्त प्रतिसाद :)
एकदम मजा आली.
मला सुद्धा गोड खूप आवडते. लहानपणी माझी आई रोज एका लहान रुमालात चक्का टांगायची आणि सकाळी श्रीखंड करुन डब्यात द्यायची :) त्याची आठवण झाली.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

निखिल देशपांडे's picture

3 Jun 2009 - 11:49 pm | निखिल देशपांडे

रंगाकाकाचा गोडाचा लेख वाचला आणि लगेच प्रितिक्रिया लिहायचा विचार केला. पण गोडाचा विषय त्याला घाईत काय प्रतिसाद देणार असे म्हणुन शेवटी लिहायला उशिरच झाला. खरे तर गोड पदार्थ म्हणजे आपला एकदम जिव की प्राण. अगदी लहानपणा पासुन मला आजी आई सगळे गोडघाश्याच म्हणायचे. म्हणजे माझे गोडाचे वेड इतके होते की कधी कधी आई झोपल्यावर हळुच डब्बा काढुन चोरुन साखर खायचो. बरेच वेळा पकडल्याही जायचो त्या साठी अगदी आइच्या हातचे धपाटे पण अनेक वेळा खाल्लेत. आता जर मला कोणी विचारले "तुझा आवडता गोड पदार्थ कुठला?" तर मी उत्तर नाही देउ शकणार.

तर सुरवात करुयात जालन्यापासुन, आमचे घर अगदी भर चौकातच होते. घराचा खालिच एक हॉटेल होते तिकडे रोज सकाळी खवा पोहचवायला दुधवाले यायचे. ह्यातल्या काही दुधवाल्यांकडुन आई खवा विकत घ्यायची. मग व्हायचा तो गुलाबजामुन बनवायचा एक राजेशाही कार्यक्रम. गुलाबजामौन मी कितीही आणि केव्हाही खाउ शकतो. तर आई च्या हातच्या गुलाबजामुनची चव कधी बाहेरच्याला कधीच नाही येणार. आमच्या घरा खालच्या हॉटेलाची खासियत म्हणजे बालुशाही,अप्रतिम अशी बालुशाही इथे मिळायची. माझ्या मुंजिच्या वेळेस सुद्धा घरच्यांनी ह्याच हॉटेलच्या आचार्‍याकडुन बालुशाही बनवुन घेतलेली. तर जालन्यातली अजुन एक आठवण म्हणजे आजीच्या हातच्या पाकातल्या पुर्‍या. आहाहा आतापण त्या पुर्‍यांची चव तोंडात आहे. अजुन एक आजिच्या हातचा पदार्थ म्हणजे अनारसे. एकदा आमच्या ओळखिच्या जोशि कांकुकडे गेलो असताना त्यांना स्टॉव वर खाली बसुन अनारसे करताना बघितले होते. त्याचा दुसर्‍याच दिवशी आइच्या मागे लागुन अनारसे बनवायला लावले. माझ्या हट्टापायी आईने अनारसे बनवले खरे पण मी ते खायला तयार नव्हते कारण काय तर ओईने जोशी काकु सारखे खाली बसुन अनारसे नव्हते बनवले. तसे जालन्याला मला बाहेरचे गोड खाल्लेले आठवत नाही.

बाबांच्या होणार्‍या बदला मुळे अमरावती-नागपुर्-अमरावती असा प्रवास घडलाच. अमरावतीच्या रघुवीर मिठाईया मधेली काजुकतली तर अप्रतिमच होती. नागपुर मधे असताना तसेच हल्दिराम चे सोनकेक. त्यावेळेस हल्दिराम अमेरिकेत पोहचले नव्हते. चिखलदर्‍या जवळ मेळघाट मधे सेमाडो ह येथे जि रबडि खाल्ली तशी रबडी आजगायत नाही खाल्लि हो. त्या नंतर औरंगाबाद मधे मिलन मिठाई मधले बर्फी किंवा अप्पा हालवाईचा पेढा जबरदस्त होता. उत्तम मधल्या सारखी इमरती तर कुठेच मिळात नाही. आजही औरंगाबाद ला गेल्यावर बरेच वेळा उत्तम मधे जाउन इमरती घेवुन येतो. आता पेढ्यावरुन आठवतो तर कुथंलगिरीचा प्रसिद्ध पेढा. कुथंलगिरी बिड जिल्हातले एक छोटेसे गाव. पण तिथला कलमी पेढा म्हणजे काय विचारुच नका. ह्या गावावरुन कुठे तरी एकादा गेल्याचे आठवते. हायवेच्या दोन्ही बाजुला फक्त खव्याची व चक्क्याचिच दुकाने. तर ह्या कुथंलगिरीची प्रसिद्ध पेढे खुलताबादच्या भद्रा मोरोती मंदिरात सुद्धा मिळते. भद्राला गेलो आणि पेढे आणले नाहीत असे कधिच झाले नाही. पेढ्याची पुढची आठवण म्हणजे आंबाजोगाईतील योगेश्वरी देविच्या मंदिराबाहेरिल कलमी पेढे. घरात पेढे आणलेले असले तर आइच्या हातात यायचा तो रिकामा डब्बाच.

ह्यात सगळ्यात महत्त्वाचे दोन गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि श्रिखंड. आमच्या घरात सगळेच लोक पुरणपोळीचे शौकिन आहेत. घरी पुरणपोळी वर्षातुन कितीहि वेळा बनवली तरि नेहमई आईला त्रास द्यायला म्हणनार "पुरणपोळी खाउन खुप वर्ष झाली ग आई". होळी, श्रावणातला शुक्रवार, नवरात्रात नवमीला, पुरणपोळी नक्कीच बनायची पण सर्वात वेगळ्या चवीची बनते ती फक्त महालक्ष्मीच्या (गौरी) नैवेद्याची. आमच्या कडे नेहमी स्पर्धा लागते कोण सगळ्यात जास्त पुरणपोळी खाते ह्याची. जिंकतो अर्थात मीच. पण ती तव्यावरुन गरम सरळ पानात वाढलेली त्यावर मस्त तुपाची धार सोडलेली पुरणपोळी मी कोणत्याही वेळेस खाउ शकतो. तसेच शिळी झाले पण पुरण पोळी मी कितिही पोट भरलेले असेल तरी खाउ शकतो. श्रिखंड मला आवडते ते चक्क्यापासुन घरी बनवलेले. काही ठरावीक दिवशी आमच्या कडे श्रिखंड नक्किच बनते. माझ्या कडे ह्यातले दोन काम असायचे एक तर औरंगाबाद्ला भावे आणि कं कडुन चक्का घेउन येणे आणि दुसरे म्हणजे चक्का पुरण यंत्रातुन काढुन देणे. साखरभात हाही माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे.

काही विचित्र पदार्थ सुद्धा मी गोड खायची इछा झाल्यावर खातो. दाण्याचा कुट साखर ही त्यातलिच एक. कधी गोड खायची इच्छा झाली व काहिच सापडत नसेल तर सरळ वाटीत शेगंदाण्याचा कुट घ्यायचा त्यात थोडी पठी साखर टाकायची किंवा साधी साखर टाकायची झाली आमची स्विट डिश तयार. ह्याच प्रकारचा शेंगदाण्याचा लाडु, साबुदाण्याचे लाडु. तसेच एक गडगिळ नावाचा पदार्थ आहे ज्याची पाककॄती मला माहित नाही. पण गुळ आणि कणिक ह्या पासुन बनवतात असे वाटते. आजीच्या हातचा खाल्लेला आज पण आठवतो. खिर हा प्रकार मला फारसा काही आवडला नाही. आता बंगाली मिठाई वैगेरे खातो पण ती सुध्धा फारशी आवडत नाही.अरे ह्या सगळ्यात आईच्या हातचा कलाकंद राहिलाच. दुध नासले की मी नाचायचो आता कलाकंद मिळणार म्हणुन. तसेच फक्की हा प्रकार म्हणजे तर विचारु नका. शाळेत असताना डब्ब्यात फक्की कितिदा नेली असेल सांगता येत नाही. अजुन बरेच पदार्थ आठवतायत पण आता इतकेच लिहितो.
==निखिल

स्मिता.'s picture

29 Sep 2011 - 7:56 pm | स्मिता.

जुन्या धाग्यांत उचकापाचक करताना हा ना वाचलेला धागा उघडला आणि कुठुन दुर्बुद्धी झाली असे वाटले. किती रसिकपणे तसेच निगुतीने सर्व पदार्थांच्या आठवणी लिहिल्या आहेत! वाचता वाचता तोंडचे पाणी आवरेना.

पणा आता इकडे यातला एक तरी पदार्थ डोळ्याला दिसेल तर शप्पथ. त्यामुळे त्यांच्या आठवणीतच पुढचे किमान चार-आठ दिवस झुरतच काढावे लागणार असं दिसतंय. रंगा भाऊजी, कुठे फेडाल हे पाप?

त्यात प्रतिसादकर्त्यांनीही एकाहून एक प्रतिसाद लिहिले आहेत. निदेंचा प्रतिसाद तर मूळ लेखाला पुरवणीच आहे.

(हा धागा वाचून जश्या माझ्या आत्म्याला यातना झाल्या तश्याच आणखी काही आत्म्यांना व्हाव्या या एकाच 'पाशवी' उद्देशाने हा धागा प्रतिसाद देवून वर आणत आहे.)

काही नाही हो, ढेकर देतोय. मस्त सगळ्या गोष्टी खाल्ल्याचा फील येतोय.
उकरुन काढल्याबद्द्ल थँक्स

पैसा's picture

29 Sep 2011 - 11:01 pm | पैसा

स्मिता, 'खाणकाम' केल्याबद्दल धन्यवाद!
रेवती आणि मकी, तुमचे नवरे दुष्ट आहेत! ;) मला एक क्रीम बिस्कीट खाल्लं तर मोठं पाप केल्यासारखं वाटतंय आणि इथे...
जाऊ दे झालं...

रंगाशेट, त्या मूगडाळीच्या शिर्‍याने माझी पण विकेट एकदा घेतली होती. एका लग्नात हे काय आहे खाऊन बघूया म्हणून सुरुवातीलाच खाल्ला आणि मग आणखी काही न खाताच परत आले!

प्रचेतस's picture

10 Jun 2016 - 11:41 am | प्रचेतस

भारी लेख. नगरचा खवा आणि बासुंदी खूपदा खाल्लीय. रगडा कचोरी हा प्रकार पहिल्यांदा नगरलाच खाल्ला होता.
नृसिंहवाडीच्या बासुंदीला आता पूर्वीची मजा नाही. साखर ओतू ओतू खूपच गोडमिट्ट करतात आताशा.

माझीही शॅम्पेन's picture

10 Jun 2016 - 12:17 pm | माझीही शॅम्पेन

इथे अमेरिकेत आल्यापासून एकतर आजूबाजूला गोड खाणार्‍या लोकांचे प्रमाण कमी; सारखे 'ओ, माय गॉड सो मेनी कॅलरीज!' करुन चिंताक्रांत असतात बरेचसे लोक!

अमेरिकेन लोक साखर खात नाहीत किवा कमी खातात अस सुचवत असल्यास ते बर्‍याच अंशी चुकलेले वाक्य आहे पुढील पदार्थामधून सामन्यता: अमेरिकन लोक बरीच साखर घेतात जस की कॉफी , सॉफ्ट ड्रिंक्स , विविध प्रकारचे केक , कप-केक , स्मूदिज , पाय , गोळ्या , चॉकलेटस , चुइन्ग गम्स , आईसक्रीमस असे अनेक पदार्थ आहे , नुसत मॅकडोनाल्डच 1 महिना सतत खाल्ल्ल आणि प्याल तर एक 4 X 3 च टेबल भरून साखर पोटात जाते (संदर्भ :- बिग फॅट मिल डॉक्युमेंट्री)

तिमा's picture

10 Jun 2016 - 3:40 pm | तिमा

ज्या दिवशी मला मधुमेह होईल त्यादिवशी माझ्या जगण्यांतला आनंदच संपेल. आमच्या तीन पिढ्यांनी रोज गोड खाल्ले आहे आणि तरीही त्या साखर खाण्याच्या साईड इफेक्ट मधून सगळे सुटलेत.
रंगाशेठचा हा जुना लेख आज परत वाचून आता लवकरात लवकर बासुंदी खाल्ली जाईल, असे मनाशी नक्की केले आहे.
का कुणास ठाऊक, आज अचानक सुरतच्या अस्सल घारी ची आठवण झाली.

वाह काय एकेक आठवणी काढल्यात!!

पिशी अबोली's picture

10 Jun 2016 - 5:08 pm | पिशी अबोली

मजा आली वाचून. गोडाचं विशेष प्रेम नाही, पण लेख मात्र आवडला.. :)

तिमा's picture

10 Jun 2016 - 7:16 pm | तिमा

साखरेचे खाणार त्याला देव (लवकर) नेणार!