मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा).
प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे :
मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो. तोपर्यंत करोनाबद्दल फारशी काळजी करण्यासारखे वातावरण नव्हते. उदयपुरात बाजार वगैरे सर्व नेहमीप्रमाणे चालू असले, तरी परदेशी प्रवासी कंपन्यांनी केलेली मोठमोठी हॉटेल- आरक्षणे रद्द केली गेली होती. परिणामी टॅक्सीवाले, गाईड, खास गोऱ्या टुरिस्टांसाठी बनवलेले सामान विकणारे दुकानदार वगैरे मंडळीत घबराट पसरलेली होती.
दिल्लीला परतल्यावर Luftansa कडून परतीची उड्डाणे रद्द झाल्याचे समजले, मग धावपळ सुरु झाली. पुढले सर्व बेत रद्द करून शक्य तितक्या लवकर अमेरिकेला परतणे मुलांसाठी गरजेचे होते. सरतेशेवटी भारतातून अमेरिकेला जाणारे एरिंडियाचे अगदी शेवटले उड्डाण गाठून मंडळी तिकडे पहुचली, आणि पुन्हा घरी आम्ही दोघेच उरलो.
यथावकाश टाळ्या - थाळ्या - पणत्यांसह गाजावाजा होत ताळेबंदीचा प्रकार सुरु झाला. मार्च-एप्रिलात दिल्ली परिसरातले हवामान मस्त असते. त्यातून आकाश अगदी निळेभोर आणि संध्याकाळची आकाशातली रंगांची नित्यनूतन उधळण.
(ऐका : रवींद्रनाथांची रचना: নীল দিগন্তে ওই ফুলের আগুন লাগল )
https://www.youtube.com/watch?v=Hq5CM0IJMoE
अशा आकाशात मुक्तपणे विहरणारे पक्षी, प्रदूषण- धुळीपासून मुक्ती, आजवर अननुभूत अशी शांतता, घराबाहेर पडायचे नसल्याने आपसूकच लाभणारी विश्रांती, या सर्वातून “प्रभू अजि गमला” असे वाटू लागले. वाचन चित्रकला, संगीत यात मनसोक्त रमता येऊ लागले.
प्रकरण २ : आमचे ‘तिकिटेच्छुत्व’ आणि ‘चल री सजनी’
पुढे मे - जून मध्ये उन्हाळ्याचा तडाखा जाणवू लागल्यावर मात्र आधीचा सगळा रोम्यांटिसिझमपणा वगैरे लयाला जाऊन हवालदिल होणे सुरु झाले. एव्हाना सक्तीचे घरकोंडत्व देखील कंटाळवाणे वाटू लागले होते. तिकडे मुलांनाही आमची काळजी वाटू लागली होती. विशेषतः आम्हाला इकडे काही झाले तर फ्लायटा बंद असल्याने कुणी येऊ शकत नव्हते, आलेच तरी विमानतळावरून सरळ दोन आठवडे क्वारंटाइन साठी रवानगी. त्यातून आमचा काही वर्षांपासूनचा हलकट शेजारी मला इकडे शिंक वा खोकला आल्याचा सुगावा लागला तर “कहीं ये ‘वो’ तो नहीं” या शंकेने तात्काळ पोलिसांना फोन करून क्वारंटाइनरुपी नरकात मला ढकलणार, याबद्दल त्याची भेदक, शोधक, संशयी नजर ग्वाही देऊ लागली होती. एरवीच्या निरुपद्रवी “और कैसे चल रहा है ?” या प्रश्नाला आता एक वेगळीच सैतानी धार चढलेली वाटत होती.
त्याच सुमाराला एरिंडिया च्या ‘वंदे भारत’ फ्लायटा सुरु झालेल्या होत्या. पाहिल्यांदा त्यासाठी बुकिंग सुरु झाले तेंव्हा एका रात्रीत बावीस हजार सिटा विकल्या गेल्या म्हणे. आमच्यासारखे हजारो तिकिटेच्छू, एकसमयावच्छेदेकरून (... अहाहा - शे.ए.हा.श.वा.सं.मि…) एरिंडिया-घोषित विविक्षित वेळी आपापल्या परीने तिकिटप्राप्तीयत्न करत असल्याने हवे तेंव्हाचेच तिकीट लाभणे अवघड दिसत होते. आपण रेल्वेच्या ‘तात्काल’ आरक्षणासाठी बरोबर दहाला तयार बसावे, आणि नाव-वय-लिंगादि टाईपेस्तोवर उपलब्ध बर्था संपाव्यात, असेच काहीसे घडत होते.
सरतेशेवटी आमची वर्णी लागली, आणि २८ जूनचे तिकीट लाभले. सध्या एवढा दूरचा प्रवास करण्याची फारशी इच्छा नसलेल्या सौ. ने पण माझ्या ”चल री सजनी अब क्या सोचे” ला “हम है तैयार चलो” असा प्रतिसाद दिला आणि आम्ही तयारीला लागलो.
मशारनिल्हे (पुन्हा एकदा - अहाहा - शे.ए.हा.श.वा.सं.मि…) फ्लायटांमध्ये ‘यात्रियों की सुविधा के लिए’ तीन-चार वेळा पुरेल, एवढे खाण्याचे सामान, पाणी वगैरे एका मोठ्या पिशवीत भरून प्रतिएक सिटेवरी ठेविलेले असते, असे ‘वंदे भारत’योगेच अमेरिकेला पहुचलेल्या एका हितचिंतकांकडून समजले, शिवाय “तरी शक्यतो तुम्ही घरीच बनवलेले अन्न घेऊन जा” असा प्रेमळ सल्लाही मिळाला.
(… इथे काही जिज्ञासू वाचक अशी पृच्छा करतील, की हे “अहाहा - शे.ए.हा.श.वा.सं.मि” प्रकरण काय आहे बुवा/बाई ? अर्थात या शंकेचे समाधान करणे आता क्रमप्राप्तच आहे. तर “शे.ए.हा.श.वा.सं.मि.” म्हणजे “शेवटी एकदाची हा शब्द वापरण्याची संधी मिळाली”.
प्रकरण ३ - आला, मंगल दिन तो आला… (संगे कोविड घेऊनि आला ?)
(ऐका : मंगल दिन आज … कुमार गंधर्व)
https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw
रात्री दीड वाजता उड्डाण असल्याने आम्ही संध्याकाळी साडेसातला घरून निघालो, तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
यथावकाश दिल्ली विमानतळावर पोचल्यावर सौ. च्या गुडघेदुखीमुळे तिच्यासाठी चलित-चक्रासनाची योजना केली. आम्हाला लाभलेला चलित-चक्रासनचालक त्याच्या मते आम्हाला खूपच मदत करत होता. हातमोजे घातलेले आपले हात तो अनेक गोष्टींना लावत होता. मला विविध फॉर्म आणून देणे, आमच्या आणि इतरांच्या ब्यागा उचलणे, खाली पडलेला बोर्डिंग पास तत्परतेने उचलून देणे, फॉर्म भरत असताना अगदी जवळ उभे राहून मी काय लिहितो हे डोकावून बघत गरज नसता सल्ले देणे, चलित-चक्रासन मागल्या बाजूने योग्य ते दांडे धरून न ढकलता भलत्याच ठिकाणी धरणे या त्याच्या लीला बघून खरेतर “ आता माझी सटकली” असे झाले होते, पण ‘आपण स्वतःहून घराबाहेर पडून जी जोखीम पत्करली आहे, तिची ही तर फक्त सुरुवात आहे, असली ड्रामा तो आगे हय’ असे मानून त्याला थोडीशी सौम्य समज देण्याचा क्षीण यत्न केला. (“ तरी मी सांगत होते” हे पालुपद इथून पुढले तीसेक तास वारंवार ऐकत रहावे लागणार, याची खात्री पटण्याची हीच ती सुवर्णबेला)
पुढे बोर्डिंग पास तपासून आम्हाला मुखावरणे देण्यात आली. माझी सीट मधली असल्याने मला पूर्णवेळ चेह-यावरील ढाल, मुखावरण आणि प्लास्टिक अंगरखा घालूनच बसावे लागणार होते.
तिथल्या एका दर्पणात आपले ते सोंग बघून “ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार” असा माझाच मला प्रश्न पडला, आणि “आप के हसीन रुख पे आज नया नूर है” असेही मी स्वतः:लाच म्हणून घेतले. तेवढ्यात सौ. ने "देखतेही रहो आज दर्पण ना तुम, फ्लायटका ये महूरत निकल जायेगा” अशी तंबी दिल्यावर “चलो दिलदार चलो” म्हणत आमची स्वारी निघाली.
विमानात स्थानापन्न झालो तेंव्हा प्रत्येक सिटेवर आमच्या हितचिंतकाने उल्लेखिलेली भली मोठी पिशवी ठेवलेली होती. तिजला "कृपया अपने सॉमने वॉली सीट के नीचे” रखण्याची ‘हिदायत’ मिळाली. यथावकाश ती उघडून बघितल्यावर तिच्यात तीन लिटर पाणी, अन्य पेये, चिप्सादि अरबटचरबट पदार्थ, दही, काहीतरी तुपाळ मिठाई आणि अलमिनच्या पातळ पत्र्यात लपेटलेले काही शिजवलेले अन्न असे होते. त्यातले फारसे काही न घेता आम्ही घरून नेलेलेच खाल्ले, शिवाय ते खट्टामीठा, चिपा वगैरे पण चरले. पुढे वॉशिंग्टनास विमान बदलून शेवटी पोचलो एकदाचे घरी.
प्रकरण ४ - वादळापूर्वीची शांतता आणि वादळात अडकली जीवननौका....
अमेरिकेत मुलाने काही गृहोउद्योग बळेच अंगावर घेतले होते, जसे दोन वर्षांपूर्वी आम्ही मोठ्या मेहनतीने स्वहस्ते पॉलिशलेल्या फर्निचरास हल्ली बोकाळलेल्या टूम प्रमाणे हस्तिदंती रंग लावणे वगैरे. मग त्यासाठीचे सामान आणणे, रेजमालाने टेबल-खुर्च्या रगडणे वगैरे उद्योग सुरू झाले. त्याशिवाय लांब पायी फिरायला जाणे, आम्ही येणार/आलो म्हणून केलेले चमचमीत पदार्थ हादडणे हे सर्व सुरू झाले. खरेतर आम्हाला किमान दोन दिवस व्यवस्थित विश्रांति घेणे आणि खाण्यावर संयम ठेवणे गरजेचे होते, पण ...
... मग तीन -चार दिवसात भयंकर खोकला होऊन कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला. ताप अजिबात नव्हता. भारतातून आणलेले कफ सिरप घेऊन काडीचाही फरक पडला नाही. दिवसेंदिवस अशक्तपणा वाढत जाऊन रात्रंदिवस अंथरुणावरच पडून राहू लागलो.
ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनाची टक्केवारी ९४ ते ९७ वगैरे असली, तरी श्वासावर एरव्ही असणारा थोडाबहुत ताबा नष्ट होऊन लोहारच्या भात्याप्रमाणे सतत जोरजोरात अतिशय वेगाने श्वास चालू लागला. एक सेकंदही श्वास रोकणे शक्य नव्हते. सतत गुंगीत असल्यासारखे झाले, अन्नावरची वासना उडून अन्नाकडे बघावेसेही वाटेनासे झाले. तीस-चाळीस वर्षांपूर्वी दिवंगत झालेले आईवडील सतत डोळ्यासमोर येऊ लागले आणि "आई मला वाचव, बापू मला यातून बाहेर काढा " असा सतत धोशा सुरु झाला. हे मनातल्या मनात होते की तोंडातून तसे शब्द उच्चारले जात होते, मला ठाऊक नाही. कधी अचानक जुन्या हिंदी सिनेमाच्या गाण्यांच्या लडीच्या लडी उलगडल्या जात. मुकेश, हेमंतकुमार, गीता दत्त, मुबारक बेगम वगैरे अगदी आपल्या कानात येऊन गात आहेत, असे वाटायचे. शौच्याला लागणे फार दुर्मिळ झाले. प्रवासात संपवलेली हल्दिरामची पौचे नजरेसमोर येऊन ओकारीसारखे वाटायचे आणि आपल्याला त्या शिळ्या पदार्थातून विषबाधा झाली, असे वाटून स्वतःचाच पश्चात्तापयुक्त संताप यायचा. आपण बरे झाले पाहिजे या एकाच विचाराशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत अजिबात मन रमत नव्हते.
तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. अशक्तपणामुळे आम्हाला तिकडे जाताही आले नसते. याबद्दल मुलाने त्याच्या कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही. घरीच योग्य ती खबरदारी घेत आराम केल्याने हळूहळू ठीक होतील.
त्याच सुमारास इंदौरच्या माझ्या एका मित्रानेपण त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारून त्यांनी प्रिस्क्रिबलेल्या औषधांची यादी मला कळवली. त्यात भूक लागावी म्हणून अमुक गोळ्या, खोकल्यासाठी तमुक, स्ट्रेस कमी करण्यासाठी, ताप येऊ नये यासाठी अमुकतमुक अशी ती यादी होती. माझ्यामते तहान - भूक लागणे, झोप येणे वगैरे सगळे नैसर्गिक रीत्याच व्हायला हवे, त्यासाठी गोळ्या घेणे वगैरे मला अजिबात पटत नाही, आणि असे काही होणे, ही पण निसर्गाचीच एक योजना आहे, रोगप्रतिकारक यंत्रणेने आता पूर्ण शरीराचा ताबा घेऊन आघाडी सांभाळल्यामुळे अन्नावरची वासना उडणे वगैरे सर्व झालेले आहे, याची मला खात्री वाटत होती. स्ट्रेस वगैरे तर काही नव्हतेच. मग ती यादी बाजूला ठेवली. मागे चिकनगुनियाच्या वेळीपण कोणतेच औषध घेतले नव्हते. मुदत संपल्यावर आपोआप बरा झालो होतो. आपण यातून नक्कीच बाहेर पडणार याची मला खात्री वाटत होती. जीवेषणा अजिबात क्षीण झालेली नव्हती.
दहा-बारा दिवस असेच गेल्यावर जरासे बरे वाटू लागले. थोडेसे खाणे आणि घरातच चालणे फिरणे सुरू झाले. कायप्पा वगैरेवर “वाफारा घ्यावा किंवा नाही” सारखे उलटसुलट वाद येत असले तरी सकाळी काढा, दिवसा मिठाच्या गुळण्या आणि वाफ घेणे, रात्री हळदीचे दूध वगैरे करत राहिलो.. शिवाय रोज एक तरी लिंबू ( मध्यरात्री जाग यायची तेंव्हा घसा भयंकर कोरडा पडलेला असायचा, त्यावेळी लिंबूपाणी प्यायचो !) आणि तासभर उन्हात बसणे, काजू, अक्रोड वगैरे खाणे हेही करत होतो.
आणखी जरा बरे झाल्यावर मला एकदम आठवले की व्हॅनगॉगला त्याच्या डॉक्टरने सांगितले होते की तू पेंटींग करत रहाशील तोवरच ठीक (जिवंत) रहाशील… मग जरा उत्साहाने माझा स्टुडियो वगैरे आवरून मागल्या वर्षी अपूर्ण राहिलेली चित्रे भितींवर टांगली. सर्व सामान सुसज्ज करून जमेल तेवढे पेंटिंग सुरु केले. यातून उत्साह वाढला आणि बाहेर फिरायला जाणे वगैरे सुरु केले.
इथे मला माझ्याच मिपावर गेल्या नोहेंबरात लिहिलेल्या एका कवितेची आठवण येते आहे. त्या कवितेत अगदी अशीच परिस्थिती वर्णिली आहे:
तुका म्हणाला
उरलो आता
उपकारापुरता ...
मी म्हणालो
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
नुरली शक्ती
विरली काया
शिथिली गात्रे
आटली माया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
खपलो झिजलो
कोड चोचले
देहाचे पुरवाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
वाटले -
जिंकेन जग.
लोळेन -
सुखात मग.
धडपडलो - कडमडलो
नको तिथे अन गेलो वाया ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
हताश फिरलो
उदासवाणा
शोधत फिरलो
विगतदिनांच्या
पुसलेल्या त्या पादखुणा ...
उरलो आता
भिंतीवरल्या
फोटोपुरता.
एके दिवशी आणि अचानक
उन्मळला चैतन्य-झरा
विस्मयलो गहिंवरलो आणिक -
अनुभवाला आनंद- सोहळा
उचलला-
कुंचला -
रंग झराले झरा झरा
सूख दाटले -
दुःख आटले -
चित्र रंगले भरा भरा
उरलो आता
भिंतीवरल्या
रित्या चौकटी
भरण्याला
चित्रानंदी लावुनि टाळी
गीत सृजेचे गाण्याला...
या सर्व अनुभवातून गेल्यावर वाटू लागले , की माझ्यासाठी ही एक इष्टापट्टीच होती. आता उर्वरित आयुष्यात आरोग्य हे सर्वोपरी, अन्य सगळे दुय्यम मानून जगायचे. त्याप्रमाणे आता नियमितपणे व्यायाम, योगासने, प्राणायाम, सकाळ-संध्याकाळ पायी चालणे, आहाराबद्दल सजगता हे सर्व करू लागल्यावर एक नवीनच ऊर्जा जागृत झाल्यासारखे वाटू लागलेले आहे.
कल्पना करा, की आपण एका प्रचंड मोठ्या घरात अगदी एकटे राहात आहोत. मदतीला घरात किंवा आसपास कोणीही नाही. घरातील सगळी आवश्यक यंत्रणा आणि कामे आपल्याला एकट्यालाच सांभाळायची आहे. अर्थात वर्षानुवर्षे आपण हे करत आलेलो असल्याने सगळे अंगवळणी पडलेले आहे. मग एक दिवस अचानक समजते की आपल्या या घरात कोणी एक उपटसुंभ शिरलेला आहे, जो आपल्याला ठार करून घराचा ताबा मिळवण्याच्या खटपटीत अहोरात्र आहे. तो आपल्याला कधीच दिसत नाही पण त्याचे अस्तित्व मात्र जाणवत राहाते…. एकीकडे आपण घाबरूनही जातो आणि जास्त सावधगिरीनेही वागू लागतो …. आपल्या जीवावर उठलेला तो उपटसुंभ आता जणू घराचा कायमचा रहिवासीच झालेला आहे..... आपण जोवर अत्यंत सजगतेने जगत आहात, तोवरच जिवंत राहू, एकादी क्षुल्लकशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते.
…. मित्रहो, सध्याच्या करोना - पर्वात आपल्यापैकी प्रत्येकाची स्थिती अशीच आहे, आणि ती किती काळ तशी राहील हे कुणीच सांगू शकत नाही. क्षणोक्षणी सावध राहणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी सांगितलेल्या “सावधपण सर्वविषयी’ आणि “अखंड सावधान रे। प्रयोग प्रेत्न मान रे। प्रसंग हा तुफान रे। नकोचि वेवधान रे।।” या वचनांचा खरा अर्थ आता कळतो आहे.
ही झाली माझी कहाणी. हे करोना प्रकरण वैयक्तिक वा सामजिक-आर्थिक वगैरे दृष्ट्या काही लोकांसाठी एक इष्टापत्ती ठरल्याचे तुमच्या माहितीत आलेले असेल, तर अवश्य इथे लिहावे अशी विनंती करतो.
प्रतिक्रिया
14 Aug 2020 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत.
एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते.
दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा.
आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2020 - 6:27 pm | चित्रगुप्त
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो.
.
नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात.
बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
14 Aug 2020 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच चित्र आवडली. मनःपूर्वक आभार. काळजी घेत राहा. आणि मिपावर येत राहा.
आभार...!
-दिलीप बिरुटे
14 Aug 2020 - 10:35 am | कुमार१
छान
आवडले.
चलित-चक्रासन>>> हे फारच आवडलं !
14 Aug 2020 - 7:10 pm | चित्रगुप्त
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.
14 Aug 2020 - 9:15 pm | कुमार१
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती
१. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही.
२. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे .....
a. एखाद्याची प्रतिकारशक्ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो.
b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो.
इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते.
३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते:
a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता
b. त्यांची प्रजनन क्षमता आणि
c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद
14 Aug 2020 - 1:37 pm | चौकटराजा
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले !
मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !
14 Aug 2020 - 7:23 pm | चित्रगुप्त
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार.
तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा.
लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.
14 Aug 2020 - 3:28 pm | विनिता००२
छान लिहीलेत :)
ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.
14 Aug 2020 - 7:58 pm | चित्रगुप्त
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार.
लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?
14 Aug 2020 - 6:56 pm | संजय क्षीरसागर
करोनावर इतका भारी लेख आतापर्यंत कुठे लिहिला गेला नसेल !
तुमच्या सॉलीड पॉजोटीविटीला सलाम !
14 Aug 2020 - 7:00 pm | संजय क्षीरसागर
आणि
चित्रं तर बेफामच !
15 Aug 2020 - 3:14 am | चित्रगुप्त
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.
14 Aug 2020 - 7:02 pm | दुर्गविहारी
मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो.
असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)
15 Aug 2020 - 3:17 am | चित्रगुप्त
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.
14 Aug 2020 - 7:36 pm | चौकस२१२
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..."
- पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत?
- आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ?
" कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"
हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का?
इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते
कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले
गैरसमज करून घेऊ नका
15 Aug 2020 - 8:50 pm | चित्रगुप्त
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे:
(१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही?
उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही
(२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत?
उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील.
(३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ?
उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?)
(४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का?
उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते.
थोडे अवांतर:
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे.
सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे.
टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात.
आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे.
इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते.
टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.
26 Aug 2020 - 6:16 am | चौकस२१२
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात.
काळजी घ्या ...
येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त
( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )
14 Aug 2020 - 7:44 pm | शशिकांत ओक
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
...
ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
18 Aug 2020 - 10:32 pm | चित्रगुप्त
@शशिकांत ओकः
ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले.
... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.
18 Aug 2020 - 10:57 pm | शशिकांत ओक
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!
15 Aug 2020 - 12:26 am | चांदणे संदीप
माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक.
चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट.
तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला.
आता चित्रमय धागा येऊद्या भारी.
सं - दी - प
18 Aug 2020 - 10:54 pm | चित्रगुप्त
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले.
'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली.
बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.
15 Aug 2020 - 12:14 pm | चौथा कोनाडा
कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह प्रवास अतिशय सकारात्मक आहे, दुसर्याला देखील उर्जा देणारा !
पेंटीग्ज तर भारीच आहेत !
18 Aug 2020 - 10:58 pm | चित्रगुप्त
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.
15 Aug 2020 - 2:53 pm | मराठी_माणूस
औषध न घेताच बरे झालात हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.
15 Aug 2020 - 4:31 pm | Gk
छान
16 Aug 2020 - 8:43 am | अनिंद्य
गाणी, चित्रे पेरलेला अनुभव आवडला. सुखरूप बाहेर पडलात हे बेस्ट !
16 Aug 2020 - 10:18 am | बबन ताम्बे
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.
16 Aug 2020 - 2:22 pm | लई भारी
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली.
अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-)
संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.
17 Aug 2020 - 10:08 am | श्रीरंग_जोशी
आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते.
आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.
17 Aug 2020 - 12:53 pm | शाम भागवत
झकास लेखन.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)
25 Aug 2020 - 11:37 pm | खिलजि
काका सुंदर अतिसुंदर लिवलंय .. या नकारात्मक लहरींमध्ये असे सकारात्मक लिखाण भरपूर प्रेरणा देते ...
26 Aug 2020 - 9:11 am | सुमो
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन.
आवडलं !
27 Aug 2020 - 10:51 pm | पाषाणभेद
वा छान लिहीले आहे.
तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते?
मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही?
बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.
29 Aug 2020 - 2:45 am | चित्रगुप्त
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी)
मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे:
१. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे....
२. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे.
हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.
21 Sep 2020 - 8:35 pm | पाषाणभेद
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.
22 Sep 2020 - 11:25 am | vikramaditya
मेमरी strings copy pasted? तज्ञ बोलवा़
22 Sep 2020 - 12:00 pm | कानडाऊ योगेशु
ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात.
उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.
5 Sep 2020 - 10:43 am | Gk
एकटे मरा !!!
5 Sep 2020 - 10:46 am | Gk
करोनाने औषध
एकटे मरा !!!!!
15 Sep 2020 - 8:57 pm | शशिकांत ओक
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही.
घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही!
एकटे मरा...