एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते. ( त्याला असेलही कदाचित पण मला नक्की ठावं नव्हतं.) दहावी व बारावीलाही तो बोर्डाबाहेर लै लांब उभा होता. "अशी मुलं आपल्या समाजात काय हो शिकत असतील? "असा प्रश्न सगळ्या हुश्शार मुलांना व त्यांच्या पालकांना पडतोच, होय ना? "त्याने Bsc ला ऍडमिशन घेतली असेल, होय ना?" एकदम बरोब्बर!
यथावकाश काही वर्षांनी पदवी मिळाल्यावर Msc पण झाली. बारावीनंतर ६किंवा ७ वर्षे लागली असतील हे सगळं व्हायला ( डुलक्या मारत मारत). कोणता विषय घेतला होता, असा प्रश्न पडू देऊ नका. कारण आपल्याला काहीच फरक पडत नाही. दुसरं म्हणजे मुळातच Bsc वगैरे या बाजूना स्कोप नसतोच मग कशातही करू द्या की आम्हा काय त्याचे? थोडक्यात तो स्वर्गीय IIT किंवा जमिनीवरील साधा अभियंता नव्हे. डॉक्टर, CA ( आमचा परम्प्रिय ( परमप्रिय नव्हे) मित्र जयंतसारखा) वकीलही नव्हे. तो परदेशातही राहत नाही. अभिनेता/ त्री, मॉडेलही नाही. ही निंदा नव्हे तर ओळख आहे त्या मुलाची. तुम्ही ओळखलं का कोण ते?
त्याच्यााबद्दल आपण आपल्या नातलगांशी, मुलांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करणार का? काहीच विशेष नाहीए मग काय कप्पाळ सांगायचं अशा माणसाबद्दल. खरंच की, कारण त्याने नेमकं काय केलं, सध्या काय करतोय ते नीटपणे कळलं तर पाहिजे की राव. तुम्ही त्याला काल किंवा आज टीव्हीवर बघितलं असाल, एका मुलाखतीला उत्तर देताना. तो तोंडाला मास्कबिस्क लावून सांगत होता काहीतरी. सगळे शब्द मास्कनेच गिळल्यामुळे काही फारसं कळलं नाही. असो. त्याच्या कंपनीने detection kit शोधलंय. जे विकण्याचा परवाना त्याला परवाच मिळालाय. निव्वळ अडीच तासात रोगनिदान होऊ शकते. एका किटमध्ये अनेकशे रुग्णांची तपासणी करता येऊ शकते. सध्या एका आठवड्यात लाखभर किट बाजारात पुरवण्याची त्याच्या कंपनीची क्षमता आहे. आता तुम्ही रोग नक्की ओळखला असाल. तोच तो अवघ्या जगाचा जिव्हाळ्याचा विषय झालाय तो Covid 19. आता तरी मुलगा ओळखा की हो.
त्याच्या घरी पितळ्याची एक पानसुपारी ठेवायची एक मस्त Vintage कार होती. त्याच्या घरात कुठेही बसलं तरी ती कार लक्ष वेधून घ्यायची. त्याची आई मोठ्ठ कुंकू लावून तिचं भव्य कपाळ मिरवत आम्हाला काहीबाही खायला द्यायची. मधेच अभ्यासावर विषय आला की आम्ही तो टाळून गच्चीत पळायचो. ज्या गच्चीत मी आयुष्यात पहिल्यांदा ह्या मुलाच्या मांजरीने चिमणीला पकडून तिला फस्त करताना बघितले होते. बहिणींची खोडी काढल्यावरून ह्याच्या आईला मी कधीतरी ह्याला रागेजताना, धपकवताना पण बघितलंय. पण खरंच सांगतो , मित्राच्या आईचे त्याला ओरडणे, धपकवणे फारच मोहक असते. त्याचे बाबा संध्याकाळी खाली दुकानात असायचे. शांत, समाधानी चेहरा कुटुंबाला हात देण्यासाठी करावी लागणारी मध्यमवर्गीय धडपड लपवत राहायचा. तरीही डोळ्यांत एक जरबही होती. ह्याला ह्याचे मिस्कील डोळे बाबांकडून आणि फसफसतं मनमोकळं हसू त्याच्या आईकडून मिळालंय. हा दुकानही सांभाळायचा. "अख्ख्या दुकानातील वस्तूंच्या किंमती तुला पाठ कश्या?" हा माझा आवडता प्रश्न असायचा. मी त्याची खात्री करायचो. वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमती विचारायचो . मला शाळेत गणितात उत्तम गुण मिळायचे. ह्या मुलाला त्यापेक्षा कमी मिळायचे. पण माझा पहिला किंवा दुसरा नंबर मी मनातल्या मनात ह्या मुलाला अनेकवेळा देऊन टाकला होता. त्या दुकानात बसल्या बसल्या त्याला मिळालेल्या व्यवहारज्ञानाने दुनियेची व माणसांची पारख करण्याची हातोटी मिळाली, असं तो मानतो. नुसतं दुकांन नाही तर सकाळी 4 ते 9 दुधाचा धंदाही हा पठठ्या आरामात बघायचा. गद्धे पंचविशीत बऱ्याच वेळा सकाळी ७ ते ८:३० या वेळेत जयंत, मी आणि ह्याच्या दुधाच्या दुकानात वैश्विक, अध्यात्मिक व तरुणाईने बहरलेल्या चर्चा झडलेल्या आहेत. ( जयंत हे वेगळंच प्रकरण आहे. त्याबद्दल वेगळा अध्याय लिहायला लागेल.) ओळखलंत का नाही?
हा इसम सायकलने पुणे ते लोणावळा जातो व सायकलनेच परतही येतो. डोंबिवलीतली २ वर्षांपूर्वीची सायकल स्पर्धा जिंकलेली आहे. त्याला ड्रायविंग आवडते म्हणून तो पुण्याहून त्याच्यासारख्याच काही उनाड मित्रांना घेऊन त्याची गाडी घेऊन लडाखला गेला होता व गाडी चालवत चालवत परत आला. लडाखने त्याच्या पायावर स्नेहांकन करून त्याचा आदरसत्कार करून परत पाठवलं होतं. त्याच्या मामाच्या 'राजूर' गावाजवळचे बरेचसे किल्ले त्याने पायाखालून घातलेले आहेत. त्याच्या हातात कॅमेरा देऊ नका. तो जीवघेणे फोटो काढतो ( ही १००% स्तुती आहे). तुम्ही त्याच्या कविता वाचल्यात का? कृष्ण व कर्ण, राधाकृष्ण, दुपार...? नाही? बरं निदान तुम्ही त्याचे वेगवेगळ्या मासिकांमधले लेख वाचले असाल? 'मानवाची उत्क्रांती' या विषयावर तुम्ही आठवडाभर त्याचं व्याख्यान ठेवू शकता. 'साबण' या विषयावर त्याचा लेख वाचायला साबणांनीही गर्दी केली होती म्हणे. एकेक शब्द मोजका असतो, तो वाक्यात चपखल बसतो, वाक्यरुपी फुलांचे परिच्छेदात्मक हार ओवले जातात. ज्यांच्या अर्थांचे सुवास तुमच्या आसपास दरवळत राहतील. तुमच्या जगण्याच्या जाणीवा समृद्ध करत राहतील. मी म्हणतो, वाचून तर बघा. पण आधी सांगा ओळखलं का ह्याला?
Molecular Biology, Biochemistry, DNA,Genetics, RNA, Biotechnology ही यादी लांब आहे. या विषयांवर हा मुलगा गप्पा मारू शकतो. ह्याची lab आहे. He is executive director of Mylab Solutions. ही सुरू करायचा विचार कसा व कुठे आला, याची मनोरंजक कहाणी आहे. एकदा त्यालाच विचारा. माणूस एकदम निवांत आहे. मातीत मुळं घट्ट असलेला एकदम मोकळाढाकळा आहे. बोलण्यात तुम्हाला कधी धोबीपछाड टाकून आडवा करेल याचा भरवसा नाही. तुमचं बोलणं ऐकताना किंवा वाचताना त्याचे ते रहस्यमयी डोळे चमकले तर समजून जा की तुमच्यावर उल्कापात होणार आहे. तरीही त्याचा धाकटा लेक त्याला वेळोवेळी आडवा घालण्यात यशस्वी होतोच. त्याला मिळालेल्या अनेक देणग्यांपैकी Humour ही फार मोठ्ठी देणगी आहे. आता तर तो पुण्यात राहायला आला मग काय विचारायची सोय नाही. खांद्यावर दोन शालेच्या जोडी हा नेहमीच घेऊन फिरतो. आपल्याला कोणत्या देणग्या मिळाल्यात हे सगळ्यांनाच कळत नाही. ती देणगी जरा विरळाच असते पण ह्यांच्याकडे आहे असं वाटतं. एव्हाना कमीत कमी कुतूहल तरी वाटतंय की नाही? की एवढं सगळं कसं जमवलं ह्या गडयाने? राक्षसासारखं वाचलंय, वाचतो हा माणूस. माणसं, त्यांची आयुष्यही वाचायला शिकला. जगण्याची काही विशिष्ट सूत्रे, नियम कधीच नव्हती व नसतीलही. याने स्वतःच्या अनुभवावरून सूत्रे बनवली; त्यावर काम केले; जोखीम घेणं हा पाया मानला. तरीही हा मनुक्ष योगायोगाला गुरू मानतो.
आज त्याची भारतातील एकमेव कंपनी आहे जी सर्व भारतीयांच्या आरोग्याकरता अत्यावश्यक असे काम करतेय. अशी माणसं समाजाकरता अमूल्य ठेवी असतात. हेवा नेहमी वाईट नसतो. सकारात्मकही असू शकतो की . तुम्हाला ह्याचा वाटला तर अजिबात नवल वाटून घेऊ नका. हे सगळं त्याच्या यशाबद्दल नव्हे. खूप दिवस हे मनात दडलेलं होतं. निमित्त गावत नव्हतं. आज गावलं खरं. शिक्षण चुकीचं नसतं. ते कसं, कुठं वापरावं, कसं वाढवावं हे कळायला पाहिजे. त्यापेक्षाही सतत स्वतःला जाणीवपूर्वक शिकवत रहायला पाहिजे. सगळंच काही पालक, शिक्षक देऊ शकत नाही ना? आपल्या आत खोलवर दडलेल्या स्वतःला नेहमीच स्कोप असतो. त्याला विचारून तर बघा. त्याला कोणत्यातरी एका डिगरीने झाकून टाकू नका.
यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे. तसंही हा माणूस यशाबिशात अडकून जाऊन तिथे राहुट्या ठोकून बसणारा नाही. हा आपली कर्मे करत पुढे जाईल. अशा पावलांना बोरकरांनी आधीच गौरवून ठेवलंय " देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालली ". तुम्हीच मागून त्याच्या सावलीकडे बघत बसाल. ती पण त्याच्याबरोबर मोठी होत जाईल व तुम्हाला झाकून टाकेल. प्रेरणा देऊन सोडून देईल. ह्या माणसाकडे बघितलं तर-
" नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता ॥ "
हा श्लोक आठवतो. मित्रा, आम्हाला असंच प्रेरित करण्यासाठी खूप खूप पुढे जा. डोंगरबिंगर माहीत नाही रे! पण मानवजातीला अडचणीच्या काळात मदत करण्याने उत्तुंग वाटतोस. (भाई, पुढच्या वेळेला रोगराई पसरूच नये म्हणून काही शोधून ठेवा.) तुम्ही सगळेच ( आणि मी सुद्धा) सध्या कोरोनाच्या कृपेने मोकळे आहोत म्हणून जरा धारिष्ट्य दाखवलं. त्याबद्दल ऐसपैस माफी असावी. मला तरी ओळखलंत का?
शैलू, तुझ्यासारखा मित्र लाभल्याचा सार्थ अभिमान आहे.
तुझ्या सर्व कुटुंबियांचंही मन:पूर्वक अभिनंदन !
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
२४.०३.२०२०
प्रतिक्रिया
29 Mar 2020 - 11:53 am | कुमार१
शैलेंद्र यांचे पुन्हा एकवार मन:पूर्वक अभिनंदन !
29 Mar 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शैलेशची ओळख आवडली आणि काम तर नंबर एक.
आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
29 Mar 2020 - 1:00 pm | Nitin Palkar
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!
29 Mar 2020 - 1:10 pm | चांदणे संदीप
<<<यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>>
हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला.
सं - दी - प
29 Mar 2020 - 1:12 pm | प्रचेतस
शैलेंद्रचे मनःपूर्वक अभिनंदन. परिचय खूप सुरेख.
29 Mar 2020 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे
शैलेंद्र साहेब वळख ठेवा म्हन्लं.
30 Mar 2020 - 9:52 am | मोदक
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D
जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!
30 Mar 2020 - 10:08 am | भ ट क्या खे ड वा ला
फार मोठे काम करताय शैलेंद्रजी .
तुमच्या लेखांचा पंखा आहेच . या कार्यामुळे आदर वाढलाय .
30 Mar 2020 - 10:40 am | किरण कुमार
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , असेच उत्तमोत्तम कार्य तुमचे हातून घडत राहो .
30 Mar 2020 - 2:06 pm | चिगो
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे.
ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..
30 Mar 2020 - 2:23 pm | किसन शिंदे
शैलेंद्रचे अभिनंदन कितीवेळाही केले तरी कमी पडेल त्याच्या या कार्यामुळे.
30 Mar 2020 - 9:51 pm | मित्रहो
शैलैंद्र यांचे मनःपूर्वक अभिनंदन. फार मोठे काम केले आहे.
30 Mar 2020 - 11:21 pm | प्रशांत
शैलेंद्र यांचे पुन्हा मन:पूर्वक अभिनंदन!
31 Mar 2020 - 3:18 am | हरवलेला
डोंबिवली फास्ट !!!
31 Mar 2020 - 6:34 am | तुषार काळभोर
आणि मायमराठी यांचेही..
31 Mar 2020 - 5:55 pm | पुंबा
शैलेंद्र सर, त्यांचे सर्व सहकारी व कुटुंबिय यांचे हार्दिक अभिनंदन!
31 Mar 2020 - 8:20 pm | राघव
शैलेंद्र आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
आणि अभिजीत, ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
31 Mar 2020 - 11:46 pm | दुर्गविहारी
ओळख आवडली आणि ती करून दिल्याबद्दल जोगळेकर साहेबांचे आभार !
शैलेंद्र सर यांच्या कार्यबधदलं अभिमान आहे. _/\_
1 Apr 2020 - 5:52 pm | निनाद आचार्य
शैलेंद्रजी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन!
लेख छान जमलाय.
2 Apr 2020 - 2:17 am | टीपीके
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार
आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते.
राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
2 Apr 2020 - 11:42 am | शशिकांत ओक
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन.
पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते!
गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे.
पण
लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....
4 Apr 2020 - 7:04 am | लौंगी मिरची
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ?
लढताना मेली म्हणुन ?
ये बात कुछ हजम नहि हुई .
4 Apr 2020 - 7:07 am | लौंगी मिरची
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन .
एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही
( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) )
जोक्स अपार्ट ..
अभिमान वाटतो तुमचा :)
6 Apr 2020 - 9:00 pm | अर्धवटराव
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो.
जय हो _/\_
8 Apr 2020 - 12:11 pm | धर्मराजमुटके
पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.