सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत.
माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत! त्याने हे खूळ दिले नसते आणि मीदेखील वाहवत जाऊन भारांचा संग्रह जमा करू शकलो नसतो.
ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा पहिला भाग.
कादंबरीची सुरुवात होती ते फ्रान्सचे कॅप्टन हेक्तर सर्वादाक आणि रशियाचे काऊंट तिमाशेफ यांच्या खुमासदार संवादाने! एका 'नाजूक' प्रकरणापाई हे दोन सद्गृहस्थ एका द्वंद्वाच्या तयारीची वेळ ठरवतात आणि आपापल्या मार्गाने जातात. हेक्तरचा इमानी नोकर बेन झूफ हा त्यांच्या बरोबर असताना एक मोठा धमाका होतो आणि अचानक द्वंद्व आणि 'नाजूक' प्रकरण सगळे एका बाजूला राहते आणि एक आगळावेगळा प्रवास चालू होतो.
वातावरणात एकाएकी झालेला बदल, बदलते गुरुत्वाकर्षण, २४ तासांच्या दिवसारात्री ऐवजी ६ तास दिवस -६ तास रात्र, झपाट्याने जवळ येत असलेला सूर्य, एकंदर पृथ्वीची बदललेली रचना आणि पृष्ठभाग ह्या लोकांना आश्चर्यात टाकतात. ह्या बदलाच्या शोधात कॅप्टन साहेब निघतात आणि त्यांच्या सोबत येऊन मिळतात ते दर्यावर्दी असलेले काऊंट तिमाशेफ. बोटीचा कप्तान प्रकोपिअस हा ह्या दुकलीचा तिसरा कोन बनतो आणि हे काऊंटसाहेबांच्या बोटीत जमीन आणि काही ओळखीचे प्रदेश दिसतात का ह्या शोधात निघतात.
शोधात त्यांना बऱ्याच अचंब्यात टाकणाऱ्या गोष्टी कळतात. जसे त्यांच्या भूभागाने मागे टाकलेला शुक्र, कधीही न ढळणाऱ्या ध्रुवताऱ्याने सोडलेले आपले अढळपद, त्या जागेवर विराजमान झालेला एक नवाच ध्रुवतारा! सारखे बदलणारे तापमान आणि ह्यात भरीला भर म्हणूनच की काय की तर पाण्यावर तरंगत मिळणाऱ्या बंद गोष्टीतील काही कागदावर लिहिलेले 'अनाकलनीय मजकूर'!
'गालिया???
फेब्रुवारी १५. सूर्यापासूनचे अंतर
५९,०००,००० लीग.
जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत
अंतर तोडले; ८२,०००,००० लीग.
ठीक चालले आहे! छान! उत्तम !!!'
ह्या मजकुराने ते हैराण होतात.
हे नक्की कसले अंतर आहे? आणि को एवढ्या वेगाने ते पार पाडत आहेत?
ह्या सर्वांची उत्तरे शोधता शोधता त्यांना अजून मंडळी सामील होतात . काही स्पॅनिश लोक, एक डच ज्यू, आणि एक लहानगी निरागस इटालियन निना आणि तिचे लहान कोकरू मार्झी!
ह्या प्रवासात खूप गंमती-जमती आहेत.
पूर्ण जग एकीकडे आणि आपले मॉन्तमार्त्र एका ठिकाणी समजणारा बेन झूफ...भूगोलाचे उत्तम ज्ञान बागळणारा प्रकोपिअस, आणि त्याच्या उलट असणारे कॅप्टन साहेब... एकदम चिंगू असणारा डच ज्यू इसाक आणि त्याचे स्पॅनिश कामगार...
आणि पाहुणचार आणि वेडाचार करणारे इंग्लिशमन तर धमालच!
हा पूर्ण प्रवास एका रोमांचक वळणापाशी येऊन थांबतो. पुढे काय होणार ह्याची उत्सुकता मनाला लागून राहते आणि पुस्तक संपते ते पुढच्या प्रवासाच्या सुरुवातीकडे बोट दाखवून- 'मुक्काम शेंडेनक्षत्र'!
ह्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांची आतील चित्रे. त्या चित्रांबद्दल बोलताना त्यांनी एक खास खुलासा केला आहे.
पूर्वी जेव्हा प्रिंटींगचे तंत्रज्ञान प्रगत नव्हते, तेव्हा ब्लॉक किंवा मुद्रा ना बनवता लाकूड कोरून त्यावरून ती छापून घ्यावी लागत . (आपल्याकडचे शिळा प्रेसचे टेक्निक काहीसे असेच आहे). तर ही जुन्या आवृत्तीमधली चित्रे महद्प्रयासाने मिळवून त्याबरहुकूम ब्लॉक बनवायचा निष्फळ प्रयत्न करून नंतर चित्रकार परब यांच्याकडून जशाच्या तशी चित्रे बनवली . (नंतर आलेल्या इंग्रजी प्रतींमध्ये चित्रे नव्हती). ज्याला आपण इलुस्ट्रॅटेड कॉपी म्हणतो हा प्रकार त्यावेळेस ते वापरत होते , जेणेकरून वाचकांना काय चालले याची दृश्य कल्पना देखील यावी.
ह्याचा पुढचा भाग वाचावा की चुकून हातात पडलेले 'उडती छबकडी' वाचावी, हा गोंधळ सध्या डोक्यात चालू आहे. छबकडी जशीच्या तशी नीट अवस्थेत लवकर परत करण्याच्या वॉर्निंगमुळे काहीच कळत नाही.
तुम्हीच सांगा आणि कुठल्या पुस्तकाचा परिचय तुम्हाला वाचायला आवडेल हे देखील तुम्हीच सांगा.
ही जबाबदारी तुमच्यावर सोडून मी सध्या तुमची रजा घेतो.
लवकर आणि नक्की कळवा.
धन्यवाद!
ता.क.- मी भागवतांची खालील पुस्तके खूप आशेने आणि मेहनतीने शोधत आहे. मिळाल्यास कृपया मला देऊ शकत असाल तर नक्की संपर्क साधा. पुस्तकाचा योग्य तो मोबदला अथवा बदल्यात कुठले पुस्तक हवे असल्यास नक्की कळवा, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. (संपर्क- +९१ ८९५६८ ६८३३२)
१. मायापूरचे रंगेल राक्षस- लाखाणी बुक डेपो
२. मुक्काम शेंडेनक्षत्र- लाखाणी बुक डेपो
३. काळा बाण-लाखाणी बुक डेपो
४. चंद्रावर स्वारी-लाखाणी बुक डेपो
५. झपाटलेला प्रवासी-लाखाणी बुक डेपो
६. किल्ल्यातील कारस्थान-लाखाणी बुक डेपो
७. उडती छबकडी- भारतीय ग्रंथ भवन
८. माझा विक्रम
९. वैतागवनातील वाफारे
१०. चिन्याचा चिन्याचा जमालगोटा
११. भटकबहाद्दर
१२. हिंमतवान जासूद- (लाखाणी बुक डेपो-बहुतेक)
१३. सगळं सगळं ठीक होतं- मॅजेस्टिक बुक डेपो
१४. अक्रुघान ते पिक्रुघान
१५. तोरणा कुणी जिंकला
१६. खरा खजिना
१७. काश्याची काशियात्रा
१८. लाख मांजरी
१९. अलकनंदा आणि जादूगार जिम
२०. समुद्र सैतान- लाखाणी बुक डेपो
२१. सफरचंद-लाखाणी बुक डेपो
२२. शाळेतली भुताटकी- मॅजेस्टिक बुक डेपो
२३. वनस्पतींचा जादूगार- मॅजेस्टिक बुक डेपो
२४. पबुताईच्या गोष्टी- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
२५. पबुताईची फ कशी झाली- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
२६.निळा मासा- नाग विदर्भ प्रकाशन
२७. एक चमत्कारिक रात्र- नाग विदर्भ प्रकाशन
२८. अंतराळात अग्निबाण- मॅजेस्टिक बुक डेपो
प्रतिक्रिया
31 Jul 2018 - 7:11 am | गवि
शेंडेनक्षत्रही तितकंच अफलातून आहे. लहानपणी या दोन पुस्तकांतून भारा एका विलक्षण जगात घेऊन गेले होते.
हेच नव्हे तर इतर खूप खूप पुस्तकं.
तुमच्या विशलिस्टमध्ये "खजिन्याच्या बेटावर संजू राजू" आणि "जयदीपची जंगलयात्रा" नाहीत हे वाचून ती पुस्तकं तुमच्याकडे ऑलरेडी आहेत अशी समजूत होऊन प्रचंड असूया वाटली आहे. बाकी सर्व एकीकडे आणि ही दोन पुस्तकं एकीकडे असं लहानपणी होतं. तरीही ती कुठेतरी गेली. आता मिळणं जवळजवळ अशक्य.
31 Jul 2018 - 8:34 am | अजिंक्य विश्वास
तुमचा अंदाज एकदम अचूक आहे. तुम्ही उल्लेख केलेली आणि तशीच (फास्टर फेणे गृहीत न धरता) भारांची जवळपास ६० पुस्तके जमा आहेत. त्यात जयदीपची जंगलयात्रा, खजिन्याचा बेटावर संजू-राजू, तैमूरलंगाचा भाला, दिपमाळेचे रहस्य, चंद्रावर स्वारी, अदृश्य माणूस, झपाटलेला प्रवासी(पॉप्युलर प्रकाशन), ढब्बूराजा, भाग्यशाली सिक्सर, भटकबहाद्दर, मायापूरचे रंगेल राक्षस (उत्कर्ष प्रकाशन), तारास बलबाचे दोन पुत्र, हाजीबाबाच्या गोष्टी, खजिन्याचा शोध, पिझारोचे थैमान, रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी, कैद्याचा खजिना, भाराभर गवत, दुःख पर्वताएवढे, रॉबिन्सन आणि मंडळी, भटांच्या वाड्यातील भुतावळ, ही आणि अशीच अजून पुस्तके आहेत. वर लिहिलेली पुस्तके सध्या मिळत नाहीत. आणि त्यातच ज्यूल्स व्हर्नचे अनुवाद देखील आहेत जे लाखाणी बुक डेपोने आणले होते. बघू काय होते आता?
जयदीपने आणि बाकी मंडळींनीसुद्धा बालपण बहारदार केले होते हे नक्की.
31 Jul 2018 - 10:01 am | गवि
ती दोन पुस्तकं तुम्ही कुठून मिळवलीत?
-(आशाळभूत) गवि
31 Jul 2018 - 9:23 pm | अजिंक्य विश्वास
1 Aug 2018 - 10:32 pm | अजिंक्य विश्वास
पुस्तकांच्या बाबतीत मीदेखील आशाळभूत, हावरा, इर्षा बाळगणारा, असूया मनात धरणारा आहे. तुम्ही नक्की कुठली पुस्तके म्हणत आहात? सूर्यावर स्वारी आणि अदृश्य माणूस एका मित्राला मुंबईला चक्कर मारायला लावून मिळवली आहेत. (अर्थात त्याची कृपा खूप महत्त्वाची) आणि खजिन्याचा बेटावर संजू-राजू आणि दिपमाळेचे रहस्य हे लकडी पुलावर आणि सरस्वती मंदिर शाळेसमोर बसणाऱ्या काटकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ आहेत त्यांच्याकडून घेतली होती. ते सध्या नसतात तिथे.
तुम्हाला हवी असली तर अजून एक कॉपी मिळाली तर नक्की तुमच्यासाठी घेईन मी. :)
1 Aug 2018 - 11:15 pm | गवि
ख.बे.सं.रा. आणि ज.जं.
1 Aug 2018 - 11:30 pm | अजिंक्य विश्वास
कळाले. मिळाली की नक्की देईन तुम्हाला.
31 Jul 2018 - 8:39 am | प्रचेतस
ह्यतील बरीचशी पुस्तके वाचली होती पूर्वी. आता फारसे आठवत नाही मात्र.
31 Jul 2018 - 10:00 am | ज्योति अळवणी
भारांच्या पुस्तकांनी लहानपणी वेड लावलं होत. त्यातूनच साहस कथा, गूढ कथांची आवड निर्माण झाली. आज जे काही थोडं फार लेखन झालं आहे ते त्यांच्या पुस्तकावर जोपासलेल्या विचारसरणीमुळे
31 Jul 2018 - 9:18 pm | अजिंक्य विश्वास
अगदी खरे आहे
31 Jul 2018 - 10:13 am | यशोधरा
धागा आवडला.
31 Jul 2018 - 5:17 pm | सिरुसेरि
छान माहिती . भा रा . भागवत यांची "बोला बोला मुंछासेन" आणी " गप्प बसा मुंछासेन" हि २ पुस्तकेही अशीच गमतीशीर आहेत .
31 Jul 2018 - 9:17 pm | अजिंक्य विश्वास
नक्कीच. कुठे उपलब्ध आहेत ह्याची काही कल्पना आहे का तुम्हाला? माझ्या ग्रंथालयात ही पुस्तके उपलब्ध नाहीत म्हणून तर त्यांचा शोध घेणे चालू आहे सध्या
31 Jul 2018 - 7:11 pm | ढब्ब्या
किशोर मासिकाचे सर्व अन्क आता ईथे उपलब्ध आहेत, त्यात भा रा . भागवत यान्च्या बर्याच कथा देखील आहेत
http://kishor.ebalbharati.in/archive/index
कदाचीत तुम्हाला मदत होईल
31 Jul 2018 - 9:16 pm | अजिंक्य विश्वास
धन्यवाद सर. किशोरचे माझे आवडते अंक मी आधीच डाऊनलोड केले आहेत. फक्त हार्ड कॉपी हातात यायची वाट पाहत आहे मी. लहानपणी मी जे ज्या स्वरूपात वाचले आहे त्याच्यातच गुंतून पडलो आहे . ☺️
31 Jul 2018 - 11:05 pm | नाखु
संकलीत संग्राह्य म्हणून काढलेले अंक सदोष बांधणी केली असलेले आहेत,पाने उलटसुलट, गायब असे.
फक्त विज्ञान कथा संपादीत, संकलित आहे का?
आता किशोर नसलेला किशोर वाचक नाखु
1 Aug 2018 - 12:41 am | ढब्ब्या
संकलीत संग्राह्य म्हणून काढलेले अंक सदोष बांधणी केली असलेले आहेत,पाने उलटसुलट, गायब असे.
फक्त विज्ञान कथा संपादीत, संकलित आहे का? >> आहे तेच अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याने असा काही प्रयत्न केला नाही व फार चिकित्सा देखील केली नाही
2 Aug 2018 - 2:07 pm | राघव
एक भुताळी जहाज म्हणून पण त्यांचे पुस्तक वाचलेले आठवते..!
बाकी त्यांनी केलेले अनुवाद तुम्ही या यादीत समाविष्ट केलेले नाहीत?