बंदूक भाग १.
नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार.