सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.!
रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता. मराठी व तिच्या उपभाषा यापासून पुढची पिढी कशी दूर होत चालली आहे, इतर राज्यातील/प्रदेशातील व धर्मातील लोकांना उत्तम मराठी बोलता येत असूनपण त्यांना तिच्यापासून अप्रत्यक्षपणे कसं तोडलं जात आहे, काही ठिकाणी मराठी भाषिकच मराठी भाषेचे शत्रू बनत चालले आहेत या गोष्टींवर लेखकाने आपले भाष्य केले आहे .. त्यामधील काही मजकूर तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला..
कोणतीही भाषा जितकी वापरात राहील तितकी बहरते. तिचा वापर कमी करणाऱ्या या तीन प्रमुख गोष्टी, ज्या बदलणं आपल्या हातात आहे.
१. घरी लहान मुलांशी इंग्रजीत बोलणं -
मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याचे प्रमाण सगळीकडे वाढलेलं आहे. प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनही मराठीशी नाळ जुळून राहू शकते; परंतु त्यांच्याशी जर फक्त इंग्रजीतच बोललं गेलं तर तर ती निश्चितपणे तुटून जाते. आणि ही गोष्ट करणारा एक मोठा गट शहरी भागातून दिसून येतो. अशा घरातल्या मुलांना मराठी धड बोलताही येत नाही, मग पुस्तकं वाचणं, नाटक सिनेमे पाहणं दूरच राहिलं. या घरांमधून मराठीचा वापर संपणार हे नक्की.
२. अमराठी लोकांच्या मराठी बोलायच्या प्रयत्नांना दाद न देणं -
घराबाहेर पडल्यावर मराठी न वापरण्याचा कल आज मुंबई बाहेरही पसरलेला दिसतो. महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये गेल्या पंधरा एक वर्षात हिंदीने मुक्त प्रवेश केलाय. हे काही अंशी अपरिहार्य आहे. म्हणजे बांधकामासाठी किंवा बदलीच्या नोकरीवर एक दोन वर्षांसाठी आलेल्या लोकांना मराठी शिकायला पुरेसा वेळ नसतो; पण त्यातले काही जण जेव्हा ती बोलायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना आपण, विशेषतः मुंबईकर कितपत प्रोत्साहन देतो? मराठीबद्दल वाटणाऱ्या लाजेमुळे, सगळ्यांनी आपल्या पद्धतीची मराठी बोलली पाहिजे या अट्टहासामुळे किंवा समोरच्याला मराठी शिकवायच्या आळसामुळे आपण त्यांना मराठीपासून दूर लोटतो का?
डॉ. मित्रू नावाच्या एका तेलगू मुलाचा अनुभव बोलका आहे, भाषेची आवड असल्यामुळे अहमदनगरला पोस्टिंग झाल्यावर तो लगेच मराठी शिकला; पण मुंबईत आला तेव्हा त्याच्यासोबत एकही व्यक्ती मराठीत बोलेना. "हॉस्पिटलमधल्या मावश्या आणि एक-दोन नर्स फक्त बोलायच्या. बाकीच्यांना सतत सांगूनही काही फायदा झाला नाही. "ते त्यांच्या त्यांच्यात मराठी बोलायचे पण माझ्या संग इंग्लिश नाहीतर हिंदीच." मुंबईत मित्रुसरखा अनुभव अनेकांना येतो.
३. आपल्याहून वेगळ्या ढंगाच्या मराठीला कमी लेखणं, चुका काढणं, हसणं आणि ती बोलणाऱ्याचे कळत नकळत अपमान करणं -
भाषेच्या बाबतीत घडणारी ही अजून एक गोष्ट. ती exclusive बनवून तिच्या विशिष्ट स्वरूपालाच प्रतिष्ठा देण्याची वृत्ती. ती 'शुद्ध' करण्याच्या आणि ठेवण्याच्या नादात उलट ती अधिकाधिक पुस्तकी, एकसाची बनून आक्रसली जाते. मुंबई पुण्यात राहणारे आणि प्रमाण मराठी बोलणारे लोक याबाबतीत कसे वागतात?
कुठल्याही ग्रामीण किंवा (इतर) शहरी भागातून मुंबई पुण्यात येणाऱ्यांची मराठीच्या बाबतीत एक मोठी पंचाईत होते. त्यांच्या भाषेला तिथल्या मातीचा गंध असतो. प्रमाण भाषेची कितीही अत्तरं फवारली तरी तो अधूनमधून जाणवतोचं- जो इथल्या लोकांना जराही सहन होत नाही. मग पाठीमागून कुत्सित हसण्यापासून ते तोंडावर खिल्ली उडवण्यापर्यंत त्यांना खाली पाडण्याचे सगळे उपाय करून होतात.
" पुण्या - मुंबईच्या लोकांनी भाषेवरनं, उच्चारांवरनं गम्मत म्हणून केलेली थट्टा जिव्हारी लागायची. तोंडातून एकही शब्द काढणं नकोसं वाटायचं." अभिनेत्री किरण खोजे सांगते. " प्रमाण भाषा अंगवळणी पडेपर्यंत तो एक मोठा स्ट्रेसच होऊन बसला होता."
शहरात येऊनही आपला गावचा ढंग टिकवणारे उमेश जगताप, पूर्णानंदसारखे नट फार कमी आहेत. काही जणांना हे दोन्ही ढंग लीलया जमतात; पण कित्येक मुलं-मुली, एकदा शहरी भाषा शिकली की पुन्हा गावाच्या ढंगात बोलायला लाजतात. काहींची सवय मोडते. यामुळे किती ढंग, किती बोली लोप पावल्या असतील याची गणतीच नाही आणि हे सगळं जर नैसर्गिक गतीनं झालं तर ठीक; पण बऱ्याच वेळेस ते असं दुसऱ्याला खिजवून होत असतं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट केलेली एका नामवंत कॉलेजमध्ये शिकवणारी सोनाली पवार म्हणते, " आजकाल मी मराठी बोलतच नाही. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांच्याशी हिंदी. एकवेळ घमंडी म्हणून घेणं परवडलं पण कुणी आपल्याला घाटी बोललं, आपली लायकी काढली की लई त्रास होतो."
उत्तम इंग्रजी बोलणारे असे अनेक सोनाली, मित्रु मराठीपासून दूर चाललेत.
( लेखक: भूषण कोरगांवकर, लोकरंग पुरवणी लोकसत्ता, दिनांक: २६ फेब्रुवारी २०२३.)
फक्त मराठी भाषा दिनापुरतं मराठीचे गोडवे गाणारे स्टेटस ठेवून मराठी असण्याचा पोकळ अभिमान बाळगून मराठी भाषेचा विस्तार सोडा ती टिकवणे देखील अशक्य होऊन जाईल. वरील लेखातील गोष्टींचा बारीक विचार करून त्या टाळण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काही करू शकलो तर मराठी आणि महाराष्ट्रीय म्हणून जन्म घेतल्याचं सार्थक होईल. वेगळेपणाचं महत्व लक्षात घेऊन, थोडं सजग होऊन वागण्यात बदल केले आणि आपणच आपल्या भाषेला आणि भाषिकांना थोडं प्रेम, थोडी प्रतिष्ठा दिली तर हे सहज शक्य आहे…!
धन्यवाद..
संपूर्ण लेख: