कविता

लाख चुका असतील केल्या...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Jan 2021 - 4:40 pm

निसटले वर्ष मला
पाठमोरेसे दिसले
त्याची बघून हताशा
माझे काळीज द्रवले

म्लान वदनाने त्याने
हलकेच विचारले
जगशील का रे पुन्हा
दिस चार माझ्यातले

विचारात मी पडलो
चार कोणते निवडू
आनंदात गेले ते, की
चुकांनी जे केले कडू

निवडले मग चार
चुका मोठ्या केल्या ज्यात
सुधारेन म्हणताना
गेलो आणखी गर्तेत

नवे वर्ष नव्या चुका
करण्याची आहे संधी
असे असता कशाला
भूतकाळा द्यावी संधी?

चुकाजाणिवकविता

यमकं बिमकं, कविता बिविता..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
30 Dec 2020 - 4:52 pm

तू म्हणालास ,
"यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच
माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच."
मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू?
आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही,
अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का?
समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं?
नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं?
तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल.
कसा हात मागितला? ओठाचा कोपरा हळूच हसेल.
हळवा स्पर्श वाचताना गाल होतील लाल लाल,
पुढची गोष्ट गाणंच जणू, पाय हळूच धरतील ताल.
वाचता वाचता मध्ये मध्ये डोळे माझे मिटून जातील,

प्रेम कविताकवितामुक्तक

योगेश्वर...

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
20 Dec 2020 - 5:08 pm

योगेश्वर....

अज्ञानी जीव, होई वेडापिसा..
तयाचे समाधान, योगेश्वर.

मनी असे नित्य, प्रश्नांचे आवर्त..
तयाचे उत्तर, योगेश्वर.

भवनदी माजी, आशेचा भोवरा..
रक्षी तो सोयरा, योगेश्वर.

देहाच्या ममत्वे, दु:ख निरंतर..
आनंद निधान, योगेश्वर.

मानवी जीवन, वृत्तीचा पसारा..
तयासि निवृत्ती योगेश्वर.

दासाचि इच्छा, चुको गर्भवास..
तयासि मुक्ती, योगेश्वर.

साधकासी लागे, स्वरूपाची आस..
निजरूप त्याचे, योगेश्वर.

भक्ती, ज्ञान, योग, मार्ग जरी भिन्न..
परब्रह्म एक, योगेश्वर.

जयगंधा..
२४-११-२०१७.

कविता

मन तुझे-माझे

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
15 Dec 2020 - 1:12 am

तुझ्याशी बोलता
मन माझे जणु बेभान होते
तुझ्याचं विचारात
मन माझे विरते

तु जवळ नसता
मन तुझ्यासाठीच झुरते
विरहात ही
मी तुझ्यातच रमते

तु कितीही दुर असावा
तरी तुझ्या मनाला
कधीही माझा विसर
न व्हावा

कितीही मैलांचे
अंतर असले तरी
मनाने तु सदैव
माझ्या पास असावे
तनाने दुर असलो
तरी मनाने एकरूप व्हावे!

-Dipti Bhagat
4 March, 2019

कविताप्रेमकाव्यमुक्तक

कविता

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
10 Dec 2020 - 5:58 pm

मनमोहन कृष्ण येतो स्वप्नी
मधुर पावा मनात गुंजतो.
होते मी हि राधा वेडी.
अंगणी चाफा डोलू लागतो !!
चाफ्याच्या मधूर सुगंध लहरी ,
दरवळती दूर दूर रानी वनी
गंधाने त्या वेडा होऊन
कृष्ण येतो माझ्या स्वप्नी...!!
चाफा माझा सोनसळी
सुगंध अनुपम जगात ,
जीवा शिवाची भेट घडवतो,
राधा कृष्णाच्या रूपात !!
-वृंदा

कविता

सामान्य माणूस....

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
10 Dec 2020 - 11:11 am

सामान्य माणूस...

वर्गात लोकं म्हणती स्कॉलर,
जपतो आमची स्वच्छ कॉलर,
सहसा नशिबी नसतात डॉलर,
खिशात फक्त ओंजळभर चिल्लर...

रांगोळीत आमच्या सजते,
आकांक्षांची नक्षी,
स्वप्नांच्या झाडावर रोज,
नव्या इच्छांचे पक्षी...

मनातल्या नकाशावर,
आयुष्याची रूपरेखा,
वाळूत काढतो रेषा,
ते आम्ही पांढरपेशा...

सुख दुःखाच्या प्रसंगी,
आम्हा सोडत नाही चिंता,
डोळ्यासमोर सतत फिरतो,
महागाईचा वरवंटा..

कोणतीही असो दशा,
आम्ही सोडत नाही दिशा,
कर्तृत्वाला झळाळी देते,
आमच्या मनातली आशा..

कविता

अक्षयपात्र

अमलताश_'s picture
अमलताश_ in जनातलं, मनातलं
10 Dec 2020 - 11:00 am

स्वतःशी कणभर असताना
दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते
तेव्हा तो भेटतो.
कणभराने तृप्त होतो.
अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं .
खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा
आटत नाही.
लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो
विझतच नाही.
अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा
कृष्णसखाच लागतो.
कृष्णसखा भेटतो.
फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची
द्रौपदी व्हावं लागतं .

कविताप्रकटन

मी पाहिलंय...

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
4 Dec 2020 - 7:20 am

मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या.
उमलताना फुलताना, मस्त बहरताना.
काहींना झाडावरच कोमेजताना.
काहींना निर्माल्य होताना.

मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण.
अविचल स्तब्ध असताना.
प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना.
मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना.

मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला.
अधाशीपणे सुख उपभोगताना.
कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना.
कधी दैवाकडे जोगवा मागताना.

मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे.
अंतराळाला गवसणी घालताना.
हव्व्यासाच्या नादी लागताना.
जमिनीशी नातं तोडून टाकताना.

कविता

आरसा

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
3 Dec 2020 - 12:19 pm

झालं गेलं गंगेला मिळालं,
विचार करू नये फारसा.
बाकी सगळे ऐकतात हो,
पण ऐकत नाही तो फक्त आरसा.

आरशाची एक मोठी गंमत असते,
त्यात पाहिल्यावाचून राहवत नाही.
प्रतिबिंब नव्हे प्रखर सत्य ते,
अधिक काळ पाहवत नाही.

आरशावर का चिडू मी,
तो थोडीच आठवणी साठवत होता.
पण त्याच्या कडे पाहताना नेहेमी,
मला माझा भूतकाळ आठवत होता.

हल्ली आरशात मी बघतच नाही,
कारण मग नंतर मन रमतच नाही.
आता कल्पनेतच जगीन म्हणतो,
सत्याला सामोरं जाणं जमतच नाही.

कविता

चंद्रायण..!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
2 Dec 2020 - 4:50 pm

ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!

पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!

पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!

स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!

एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!

उचलून चंद्र-मेणा,
र्‍हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!

— सत्यजित

shabdchitreगाणेभावकवितामाझी कविताशृंगारकविताप्रेमकाव्यरेखाटनस्थिरचित्र